मंगळवार, १० फेब्रुवारी, २०२६

2583. जगात सर्वश्रेष्ठ प्रेम आई वडीलांचेच असते

    वृद्धाश्रमाच्या गेटवर आईने आपल्या थरथरत्या हाताने अमितच्या गालावरून हात फिरवला आणि हसून म्हणाली, "बाळा, तू काळजी नको करू रे. आम्हाला या चार भिंतीत तुझ्या घरापेक्षा जास्त सुख मिळेल, कारण तिथे तुला आमचा 'त्रास' होत होता, आणि इथे फक्त तुझी 'आठवण' असेल! फक्त अधूनमधून फोन करत जा, म्हणजे तुझा आवाज ऐकून आमचं पोट भरेल."​
​     अमित हा एका मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या हुद्द्यावर होता. दिसायला रुबाबदार, राहायला अलिशान फ्लॅट आणि सोबतीला मॉडर्न विचारांची बायको, प्रिया. सगळं काही छान चाललं होतं, पण या सुखी चित्रात त्याला एकच गोष्ट खटकत होती, त्याचे म्हातारे आई-बाबा. ​बाबांना दमा होता, त्यामुळे रात्री त्यांच्या खोकल्याचा आवाज आला की प्रियाची झोप मोडायची. आईला गुडघेदुखी होती, त्यामुळे तिला चालायला त्रास व्हायचा आणि घरात कधी काही सांडलं की प्रियाचा पारा चढायचा. त्यामुळे अश्या गोष्टींवरून प्रिया खुप वेळा भांडायची. रोजच्या कटकटींना कंटाळून प्रियाने अमितला अल्टीमेटम दिला, "अमित, एकतर तुझे आई-बाबा या घरात राहतील किंवा मी!"
​अमितने खूप विचार केला. शेवटी बायको आणि स्टेटससमोर त्याला आई-वडिलांचं प्रेम कमी पडलं. त्याने जड अंतःकरणाने आई-बाबांना सांगितलं, "तुम्हाला मी एका चांगल्या 'केअर सेंटर'मध्ये (वृद्धाश्रमात) ठेवतो. तिथे तुमची काळजी घ्यायला माणसं असतील."
आई-बाबांनी एकमेकांकडे बघितलं. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं, पण मुलाच्या सुखासाठी त्यांनी ते ही मान्य केलं. ते हसत हसत वृद्धाश्रमात गेले.​
​     अमितने स्वतःच्या मनाला समजावण्यासाठी नियम केला की, दर महिन्याच्या १ तारखेला आई-बाबांच्या खात्यावर १०,००० रुपये पाठवायचे. जेणेकरून त्यांना कशाची कमी पडणार नाही. सुरुवातीला तो अधूनमधून फोन करायचा. पण कामाच्या व्यापात आणि पार्ट्यांच्या नादात फोन कमी झाले. वर्षातून एकदा दिवाळीला फक्त तो जाऊन त्यांना भेटायचा. 
आई विचारायची, "बाळा, तब्येत बरी आहे ना?" आणि तो घड्याळाकडे बघत म्हणायचा, "हो आई, मला उशीर होतोय, निघतो मी." ​अशी ५ वर्षे गेली.​
      ​काळाने अचानक कुस बदलली. अमितच्या कंपनीत मोठा घोटाळा झाला आणि त्याचे नाव त्यात गोवले गेले. त्याची नोकरी गेली. मार्केटमध्ये बदनामी झाल्यामुळे कोणी काम देईना. शेअर मार्केटमध्ये लावलेला पैसा बुडाला. कर्जाचे हप्ते थकल्यामुळे बँकेने घर आणि गाडी जप्त केली. प्रिया सुद्धा त्याच्यासोबत हळूहळू भांडणं करू लागली. पैश्यांवरून ती त्याला नको नको ते बोलू लागलो. आणि एक दिवस जे घडायचं ते घडलं. ​ज्या प्रियासाठी त्याने आई-वडिलांना सोडलं होतं, त्या प्रियाने वाईट काळात त्याची साथ सोडली. "भिकारी माणसासोबत मी राहू शकत नाही," असं म्हणून ती निघून गेली.
​अमित रस्त्यावर आला. खिशात एक रुपया नव्हता. दोन दिवस तो उपाशी होता. मळलेले कपडे, वाढलेली दाढी आणि पोटात भुकेची आग... त्याला अचानक आपल्या आई-बाबांची आठवण झाली. "त्यांना जाऊन भेटतो, निदान तिथे दोन घास जेवायला तरी मिळेल," या आशेने तो त्या वृद्धाश्रमात पोहोचला. ​
​अमित गेटवर पोहोचला. वॉचमनने त्याला अडवलं. त्याने मॅनेजरला बोलावले. मॅनेजर अमितला बघून गंभीर झाले.
"अमित साहेब? तुम्ही? आणि या अवस्थेत?" अमितने मान खाली घातली. "माझे आई-बाबा... त्यांना भेटायचंय."
​मॅनेजर शांतपणे म्हणाले, "साहेब, कदाचित तुम्हाला माहित नाही... गेल्या आठवड्यातच तुमच्या वडिलांचं निधन झालं. आणि त्या धक्क्याने दोन दिवसांनी तुमची आई सुद्धा गेली."
​अमितच्या पायाखालची जमीन सरकली. तो तिथेच गुडघ्यावर बसून रडू लागला. ज्या आई-बापाने त्याला मोठं केलं, त्यांना शेवटचं बघायला सुद्धा तो आला नव्हता.
"मला माफ करा... मी नराधम आहे..." तो ओक्साबोक्शी रडत होता.
​मॅनेजरने त्याला आपल्या केबिनमध्ये नेलं. पाणी दिलं. आणि कपाटातून एक जुनी डायरी आणि एक चेकबुक काढलं. "अमित साहेब, रडू नका. तुमच्या आई-बाबांनी जाताना हे तुमच्यासाठी दिलंय."
​अमितने थरथरत्या हाताने ते बघितलं. तो एक बँक चेक होता. रक्कम होती - ८ लाख रुपये!
अमितला विश्वास बसेना. "हे... हे पैसे कोणाचे?" ​मॅनेजरने सांगितलं, "हे तुमचेच पैसे आहेत. तुम्ही दर महिन्याला जे १०,००० रुपये पाठवायचे ना? त्यांनी त्यातला एक रुपया सुद्धा स्वतःवर खर्च केला नाही."
​अमितने ती डायरी उघडली. पहिल्याच पानावर बाबांच्या थरथरत्या अक्षरात लिहिलं होतं: ​"बाळा अमित, आम्हाला माहित होतं की एक दिवस तुझ्यावर वाईट वेळ येईल. बिझनेस आणि नोकरीचं काय सांगता येत नाही रे... पण आई-बापाची माया कायम असते. वृद्धाश्रमात जेवण मिळायचं, तेच आम्ही खायचो. मला औषधाची गरज असायची, तेव्हा तुझी आई म्हणायची - 'औषध नको, पैसे वाचवू, अमितला कधीतरी लागतील.' आईला चप्पल हवी असायची, पण ती अनवाणी चालायची, म्हणायची - 'अमितच्या संसाराला हातभार लागेल.'
बाळा, तू आम्हाला घराबाहेर काढलंस, पण आम्ही तुला मनातून कधीच काढू शकलो नाही. हे पैसे घे आणि पुन्हा नव्याने सुरुवात कर. फक्त एकच इच्छा आहे... तुझ्या पोटात दोन घास गेले की आम्हाला वरती शांती मिळेल.
"तुझेच, आई-बाबा."
​अमितने तो चेक छातीशी कवटाळला. तो मोठमोठ्याने हंबरडा फोडून रडत होता. त्या ८ लाख रुपयांच्या कागदाला आज त्याला त्याच्या आई-बाबांच्या रक्ताचा वास येत होता. त्याने पाठवलेले पैसे त्यांनी स्वतःचे पोट मारून, औषधं न घेता साठवले  सर्वात मौल्यवान गोष्ट गमावली होती. आज त्याच्याकडे पैसे होते, पण डोक्यावर हात ठेवायला ते 'हाथ' नव्हते.
जो आई वडिलांला विसरेल, त्याला देव मंदिरात दर्शन देईल, पण त्याच्यावर  कृपा कधीच करणार नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...