मंगळवार, १० फेब्रुवारी, २०२६

2579. तिचा प्रश्न कधी कोणाला पडला का?

 'संध्या मॅडम अभिनंदन.. शेवटी प्रमोशन घेतलेच तुम्ही,' रजत संध्याजवळ येत बोलला.
  'थॅक्यू सर..अहो, मिनूच्या शिक्षणासाठी प्रमोशन घेत नव्हते पण आता तीच बाहेर गेली शिकायला तर इथे काय आणि तिथे काय.. कुठेही नोकरी तर करायची आहे,' संध्या हसत म्हणाली.
   'अगदी बरोबर बोललात तुम्ही.'
   'संध्या मॅडम अभिनंदन तुमचे.. तुम्ही गेल्यावर   ऑफिसमध्ये आम्हाला करमणार नाही. तुम्ही कशा ऑलराऊंडर आहात.. प्रत्येक गोष्ट अगदी मनापासून आणि छान करण्यात तुमचा हातखंडा आहे.' पलक जवळ येत बोलली.
   'थॅक्यू, पण जरा जास्तच तारीफ करताय तुम्ही.'
   ' त्यात तारीफ कसली तुम्ही आहातच एकदम परफेक्शनिस्ट. सगळ्यांनी संध्यांचं अभिनंदन करण्यासाठी तिच्या भोवती रिंगण घातले. संध्या गेली दहा वर्षे प्रमोशन नाकारत आली होती पण यावेळी तिला टाळता आले नाही. दहा वर्षांपासून मिनूच्या शिक्षणासाठी तीने शहरातीलच ब्रांच मध्ये बदली घेतली होती. बारावी नंतर मिनूला दुसऱ्या शहरात ऍडमिशन मिळाली आणि आजपर्यंत आपल्या पंखाखाली असलेल्या मुलीचे दूर जाणे तिला पचवणे जड जात होते त्यामुळे ती फारच सैरभैर झाली होती. तिची अवस्था बघून सासूबाईंनी तिला समजावले की यावेळी प्रमोशन घे आणि जरा बाहेर जा.. तेवढाच बदल होईल. म्हणून यावेळी तिने प्रमोशन घेतले. पण बदली जरा लांबच झाली होती शिवाय इथलं वातावरण हिवाळ्यात फार कमी असायचं म्हणून ती सध्या एकटीच आलेली.
    इतक्या वर्षात नवीन ठिकाणी ती एकटीच आली होती आणि एकटीचं काही महिने राहणार होती. नवीन शहर, नवीन ऑफिस, नवं घर सगळंच तिच्या साठी नवीन होतं. जेथे तिने फ्लॅट किरायाने घेतला होता ती एक चार माळ्यांची छोटी स्कीम होती. प्रत्येक माळ्यावर चार फ्लॅट. खाली पार्किंग. फ्लॅट छान ऐसपैस आणि हवेशीर होता. आईबाबा येतील तेव्हा त्यांना ही आवडणार हे निश्चित ती मनातल्या मनात खुष झाली.
तिने चार दिवस सुटी घेतली आणि घर लावायला घेतलं. दोन मदतनीस ठेवल्या एक घरकामासाठी आणि दुसरी स्वयंपाकासठी. त्यांच्या मदतीने तीने घर व्यवस्थित लावून घेतले. तसं तिला फारसं सामान आणायचं नव्हतं. पण तीन चार वर्षांचा मुक्काम राहणार म्हणून सामानांची गर्दी वाढत गेली. चार दिवसांत तिने घर छान लावून घेतलं. किराणा भरून घेतला, गॅसचं कनेक्शन घेतले. आजूबाजूचा परिसर समजून घेतला. काय कुठे मिळते हे बघून घेतलं. तिची फ्लॅट मधील लोकांशी ओळख व्हायची होती. हळूहळू ओळख करुया आता इथे आपल्याला काही वर्षे रहायचेच आहे. 
  सगळं बस्तान बसलं आणि उद्या ऑफिसला जायचं म्हणून तिने सगळं आवरून ठेवलं. दुसऱ्या दिवशी दोघी सकाळी आल्या आणि कामे पटपट आवरून साडे आठला बाहेर पडल्या. सवयीप्रमाणे ती साडेनऊला बाहेर पडली. घराला लॉक लावत होती तर समोरच्या दोन फ्लॅटची दारं उघडली.. दोघी जणी बाहेर आल्या एक झाडांना पाणी टाकण्यासाठी तर दुसरी रांगोळी टाकण्यासाठी. ती त्यांच्या कडे बघून गोड हसली. दोघी तिच्याकडे बघतच राहिल्या.. 'गुड मार्निंग,'  तिने म्हटले.
  'गुड...गुड..  मार्निंग,' दोघी म्हणाल्या. 
  'मी इकडे नवीनच रहायला आली आहे.
  हो चारपाच दिवसांपासून तुमच्या घरी बहुतेक सामान लावण्याचं काम सुरू होतं. झाले का लावून?'
  'हो झाले.. आजपासून ऑफिस सुरू...चला येते मी बाय.' म्हणत ती लिफ्टकडे वळली. 
  'बाय... दोघी म्हणाल्या पण त्यांच्या नजरा तिला तिच्या पाठीवर जाणवत होत्या. खाली आली आणि आपल्या कारकडे जाऊ लागली. एकजण खाली आपली कार पुसत होता...दोन सिनिअर सिटीझन गप्पा मारत उभे होते.. एक जण बहुतेक ऑफिसला निघाला होता. तिला जाणवले की ती सगळी तिच्याकडे बघत आहेत. कदाचित आपण नविन आहोत म्हणून असतील बघत मनात विचार करून तिने गॉगल लावला आणि आपली कार घेऊन निघून गेली. 
   ऑफिसमध्येही तिच्यावर नजरा खिळलेल्या तिला जाणवल्या. तिने सगळ्यांशी परिचय व्हावा म्हणून दुपारी मिटींग ठेवली. त्यातही तिला वातावरण कसं आखडलेलंच वाटले. तिला वाटले आपण नवीन आहोत म्हणून असेल कदाचित...जाऊ दे वेळ लागेल एडजस्ट व्हायला. मनात विचार केला आणि कामाला लागली. 
 महिना झाला होता पण ऑफिसमध्ये  सहजपणा आलेला तिला दिसत नव्हता उलट तिच्या केबीनमध्ये कोण्या पुरुष कर्मचाऱ्याला तिने बोलावले तर इतर कर्मचारी तिरक्या नजरेने तिच्या केबीनकडे बघतांना तिला काचेतून दिसायचं. महिला कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आजकाल तिला काहीसा कुत्सित भाव दिसायला लागला होता तर तिच्या केबिनमध्ये येतांना पुरुष कर्मचा-यांच्या चेहऱ्यावरचे भाव तिच्यातल्या स्त्रीला चांगलेच वाचता येत होते. घरी पण तिला असेच काहीसे अनुभव येत होते. तिच्या ऑफिसमध्ये जाण्याच्या वेळी पार्किंग मध्ये घुटमळणा-या पुरुषांची संख्या वाढलेली दिसत होती.. तर ती दिसताक्षणी फ्लॅटमधील स्त्रीयांची होणारी कुजबुज तिला आता अस्वस्थ करु लागली होती. 
   
    'आई, मला तुमच्याशी थोडं वेगळं बोलायचं आहे.' रात्री आईंना ती फोनवर बोलली. 
   'का गं काय झाले?' आईंनी काळजीने विचारले तेव्हा तिने त्यांना सगळं सांगितलं. आईंनी शांतपणे ऐकून घेतले.
   'संध्या, तु आजपर्यंत जेथे काम केलं तेथे तुझ्या राहाणीमानाची सगळ्यांना सवय झाली होती आणि तुझ्या बद्दल सगळ्यांना माहीती पण होती. आता तु ज्या ठीकाणी गेली आहेस तिथे त्यांना तुझ्या बद्दल काहीही माहिती नाही. तु एकटी रहातेस, तु गळ्यात मंगळसूत्र घालत नाहीस की हातात बांगडी घालत नाहीस.  साडी पध्दतशीरपणे घालतेस आणि त्यावर स्लीवलेस ब्लाऊज घालतेस. काय आहे ना बेटा एकटी स्त्री जर अशी देखणी दिसत असेल तर आम्हा बायकांच्या पोटात दुखायला लागतं आणि आम्ही तिच्याबद्दल लगेच वेगळा विचार करायला लागतो. पुरूषांनाही अशी एकटी स्त्री आपल्याशी बोलली तर लगेच त्यांची कॉलर टाईट होते आणि त्यांना वाटायला लागतं की ही स्त्री आता आपल्या जाळ्यात फसत आहे..
   'आई..
'अगं, मी तुला नाही म्हणत आहे मी आपल्या आजूबाजूच्या लोकांची मानसिकता सांगत आहे. प्रत्येक एकट्या स्त्रीच्या वाटेला हे येतंच. इथे दुसऱ्या स्त्रिया तिला समजून घेत नाहीत की तिच्या पाठीशी उभ्या रहात नाहीत म्हणून अशी परिस्थिती येते.. ते जाऊ दे आम्ही दोघे येतो तिकडे.. तु काळजी करू नकोस.. आणि एक आपण जर काही चुकीचे वागत नसलो ना तर कोणाच्या बापाला घाबरायचे नाही कळलं.
  'हो आई.' काही वेळ बोलून तिने फोन ठेवला. आईंशी बोलल्यानंतर बं-याच गोष्टीच्या मागची कारणे तिच्या लक्षात येऊ लागली. कारण कळले तर निदान करणे सोपे होते. एकदोन दिवसांत आईबाबा येणार म्हणून ती निश्चिंत झाली. पण इथल्या थंडीत त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून उद्या काय आणायचे याची एक लिस्ट तिने बनवली आणि शांतपणे झोपली‌. 
    दोन दिवसांनंतर आईबाबा दोघेही आले. तिच्या घरी दोघांना आलेलं बघून समोरच्या घरातल्या दोघींच्या चेहऱ्यावर थोडं आश्चर्य दिसले. सकाळी नेहमीप्रमाणे ती ऑफिसला जायला निघाली. आज तर तीनही फ्लॅटच्या तिची जणी बाहेर बोलत उभ्या दिसल्या.
 'गुड मॉर्निंग.' तिने नेहमीप्रमाणे म्हटले.
  'गुड मॉर्निंग.. आईबाबा आलेत का?'
   'हो.'लिफ्ट आली तशी त्यांना बाय करून ती निघाली. आज खाली फक्त दोन सिनिअर सिटीझन दिसले. ती मनातल्या मनात हसत निघून गेली. पुढच्या आठवड्यात आईंनी एक छोटेखानी पार्टीचं आयोजन केले आणि त्यात बिल्डींग आणि ऑफीसमधील सगळ्यांना बोलावले. सगळ्यांना उत्सुकता लागून होती की ही पार्टी कोणत्या कारणांसाठी देण्यात येत आहे. 
  आईंनी फ्लॅटच्या पार्किंगमध्येच सगळी व्यवस्था केली. छोटासा मांडव टाकला. आजकाल तर कुठलाही कार्यक्रम अगदी पटकन आणि छानपैकी करता येतो कारण सगळे काम करणारे एक फोन केला की  उपलब्ध होतात. ठरल्याप्रमाणे सायंकाळी सगळे जमा झाले. संध्याने हलक्या जांभळ्या रंगाची काठापदराची साडी घातली होती. त्यावर मॅचिंग दागिने, केसांचा अंबाडा त्यावर कुंदाच्या फुलांचा गजरा...नेहमीपेक्षा आज ती खुप सुंदर दिसत होती. आईंंनीही अबोली रंगाच्या सिल्कची साडी आणि स्लिव्हलेस ब्लाऊज घातलेलं. बाबां पण छान तयारी करून आले होते. त्यांना बघूनच सगळे प्रभावित झाले. 
  हॅलो, हॅलो... आईंनी माईक हातात घेतला.आवाज ऐकून सगळे शांत बसले.
'सर्वप्रथम आपण सगळे आलात त्याबद्दल आम्ही आपले मनापासून आभार मानतो. आज या छोटेखानी कार्यक्रमाच्या आयोजनामागचं कारण असं की आज आमच्या दिवंगत मुलाचा जन्मदिवस आहे. आमचा मुलगा सैन्यात होता आणि आठ वर्षांपूर्वी देशाचं रक्षण करतांना त्याला वीरगती प्राप्त झाली होती. त्याच्या मुलीनेही वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत याचवर्षी डिफेन्स एकादमी जॉईन केली आहे. याच वर्षी आमच्या सूनबाईंंचंही प्रमोशन झाले. याचसोबत तुमच्या सगळ्यांशी परिचय व्हावा हा हेतू ठेवून आम्ही आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचा फायदा असा झाला की यानंतर संध्याकडे बघण्याचा सगळ्यांचा दृष्टिकोन एकदम बदलला.परत कोणाच्याही नजरा तिच्या पाठीवर तिला बोचल्या नाहीत.
'काय गं काय म्हणतेस कसं सुरू आहे तुझ?' आईंनी तिला विचारले.
'आई, झाले सगळं बरोबर.. आता कोणाचाही कसलाही त्रास नाही,' संध्या हसत बोलली.
'तुझा तर प्रश्न सुटला गं पण तुझ्या सारख्या ज्या स्त्रिया एकट्या राहतात त्यांना होणारा किंवा त्यांना जाणिवपूर्वक दिला जाणारा त्रास, लोकांचा त्यांच्याकडे बघण्याचा वाईट दृष्टिकोन, तिच्या असहाय्यतेचा फायदा उचलण्याची विकृत मानसिकता कधी बदलेल कोण जाणे. एकट्या स्त्रीने स्लिव्हलेस घालायचे नाही,नटायचे नाही, सुंदर दिसायचे नाही हे ठरविण्याचा अधिकार आम्हाला कोणी दिला?'आईंनी उदास स्वरात म्हटले. या प्रश्नाचे उत्तर तर संध्याकडेही नव्हते. तुमच्याकडे आहे का?

वैशाली गोस्वामी 
#अंतरंगमनाचे 

एक स्त्री म्हणून हा प्रश्न तुम्हाला कधी पडतो का? कथा कशी वाटली अभिप्राय अवश्य द्या. आवडल्यास #अंतरंगमनाचे पेजला फॉलो करा ही नम्र विनंती. आपलीच लेखनसखी वैशाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...