मंगळवार, १० फेब्रुवारी, २०२६

2572. ओटा

 ठाण्याची त्यांची बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला काढल्यावर. बर्‍याच शोधाशोधी अंती, मंदार आणि मेघनाला एक नवी जागा मिळाली होती. जी त्यांच्या अपेक्षेएवढी जरी नसली, तरी अगदीच यथातथाही नव्हती. आणि ह्या जागेसाठीच बिल्डर देणार असलेल्या भाड्यात, दोनेक हजाराची भरच टाकावी लागणार होती त्यांना. त्यामुळेच ह्या ही पेक्षा मोठी जागा, त्यांना ठाणा मेन सिटीत घेता येणं तरी शक्यच नव्हतं. एकमेकांच्या मनाची समजूत काढत, मंदार आणि मेघना आले होते ह्या घरी राहायला. 
तसेही दोघेच होते ते. लग्नाला सात वर्ष उलटली होती... बरेच डाॅक्टर्स - वैद्य, नी उपास - तापासही झाले होते दोघांचेही. पण अजूनही त्यांच्या घरी, पाळणा हलला नव्हता. आणि आता खरंतर दोघांनीही आशा सोडली होती, नी परमेश्वराची मर्जीही मानली होती. यापुढील संपुर्ण आयुष्य आपण दोघंच एकमेकांना, ह्याची खूणगाठ दोघांनीही आपापल्या मनाशी पक्की बांधली होती. 
नविन घर आॅलमोस्ट टापटीप लाऊन झाल्यावर, मंदार मेघनाला म्हणाला... "रात्रीचे नऊ वाजायला आलेत... मेघना तू ही दमली असशील... चल आपण कोपर्‍यावरच्या उडप्याकडे जाऊन, पुरी भाजी वगैरे काहीतरी खाऊन येऊ". मेघना अर्थातच दमली होती त्यामुळे, तिने मंदारचा प्रस्ताव अगदीच उचलून धरला... आणि म्हणाली... "चालेल... पण कधीची तहान लागलीये मला... मी पटकन माठातलं पाणी पिते, नी येतेच... तोपर्यंत तू सँडल्स घालून तयार रहा". इतकं बोलून मेघनाने किचन मध्ये जाऊन, ओट्यावर हात टेकत... एका भांड्यात माठाचं पाणी भरलं, नी घटाघटा पिऊन टाकलं तिने ते. आणि मागे वळून बोलली ती... "नाहीतर मीच पटकन मुगाच्या डाळीची खिचडी लाऊ का?... अगदी अर्ध्या तासाच्या आत होईल". मंदारला कळेचना, हा अचानक उत्साह कुठून आला मेघनामध्ये. पण मग त्यानेही सँडल्स काढले पायातले, नी तो बेडवर बसला. 
बोलल्या प्रमाणे अगदी अर्ध्या तासाच्या आत... वाफाळती खिचडी, त्यावर साजूक तुप, कैरीचं लोणचं आणि दोन भाजलेले पोह्याचे पापड... असं ताट मंदारसमोर आलं. खरंतर मुगडाळीची खिचडी म्हणजे, असा काही खास पदार्थ नाही... पण आत्ताच्या ह्या खिचडीचा सुगंध, काही औरच येत होता. मंदारने न राहवून पहिला घास तोंडात घेतला, आणि तो थक्कच झाला. इतकी चविष्ट मुगडाळीची खिचडी, आजतागायत कधी केली नव्हती मेघनाने. मेघनाच्या चेहर्‍यावरही ती लपवू पहात असलेलं, स्वतःच्याच कामगीरीचं आश्चर्य... मंदारने अचूक टिपलेलं. मस्त जेवण झालं होत... खुश झाला होता मंदार. मग पुन्हा जरा किरकोळ सामानाची राहिलेली मांडामांड करुन, मंदार नी मेघना झोपी गेले. 
पुढील सकाळी मंदारला जाग आली, ती चहाच्या चढवलेल्या आधणाच्या गंधानेच. मंदार खडबडून उठला, नी किचनमध्ये गेला. मेघना ओट्याला चिकटूनच, चहाच्या पातेल्यातून चमचा फिरवत उभी होती. मंदार उठल्याचं पाहून, त्याच्याकडे हसत बघून... मेघनाने त्याला फ्रेश व्हायला सांगितलं. मंदार फ्रेश होऊन येईपर्यंत, चहाचा कप तयार होता. मंदारने पहिला घोट घाईतच घेतला, घरभर सुटलेल्या गंधाने न राहवून... आणि अक्षरशः कृतकृत्य झाला तो. इतका फक्कड चहा आजपावेतो ना मेघनाला कधी जमला होता, ना मंदारने कधी कोणाकडे प्यायला होता. तृप्त झाला होता मंदार... आणि त्याची तृप्तता कळून, समाधान पावली होती मेघना. 
तेवढ्यात मंदार बोलला... "मेघना आज शनीवारचा, तो आपला बेकरीवाला मस्त पॅटीस ठेवतो... आणि अक्षरशः दोनेक तासात, सगळे खपतातही... मी पटकन खाली उतरुन, घेऊन येतो आपल्याला गरमागरम पॅटीस... मी दोन खाईन... तू?". "मी एकच रे बाबा".... असं म्हणत मेघना वळली रिकामे कप उचलत, नी ओट्यापाशी जाऊन सिंकमध्ये ते विसळू लागली. आणि अचानक बोलली ती, पायात सँडल्स अडकवणार्‍या मंदारकडे बघत... "नाहीतर मंदार मस्तपैकी कांदे पोहे करु का मीच?... अगदी थोड्यावेळात होतील बघ... कशाला उगीच ती तेलकट पॅटिसं खायची?". मंदार पुन्हा एकदा बघतच बसला होता मेघनाकडे. 
शनीवार अगदी भुर्र करुन उडून गेला होता. रात्रीचे साडेबारा झाले होते... सगळी आवराआवरी करुन, मंदार - मेघना अकराच्या दरम्यान अंथरुणावर पडले होते. दमलेली मेघना, अगदी पुढच्याच मिनिटाला गुडूप झोपीही गेली होती. मंदार मात्र अजूनही जागा होता, अगदी टक्क डोळ्यांनी. नाईट लँपच्या मंदशा दुधाळ प्रकाशात, तो मेघनाकडे बघत होता. आश्चर्य दाटून आलं होतं त्याच्या मनात. म्हणजे इतरवेळी बाहेरचं काही खायला आणायचं म्हंटलं की... कधीच आडकाठी न करणारी मेघना, काल रात्री ह्या घरी आल्यापासून... अगदी सगळं स्वतःच करु पहात होती. म्हणजे जुन्या घरीही खाणं - पिणं, ती स्वतःच बनवत असे... पण तरीही मेघनाची गणना, काही सुगरणींत वगैरे होण्यातली नव्हती. म्हंटलं तर ठाकठीकच स्वैपाक करणारी होती ती. पण ह्या नव्या घरी तिने केलेली... काल रात्रीची मुगाच्या डाळीची खिचडी, आजचा सकाळचा चहा, त्यानंतरचे कांदे पोहे, दुपारच्या जेवणात केलेल्या लुसलुशीत पोळ्या आणि कुर्मा भाजी, संध्याकाळच्या भुकेला केलेली ओली भेळ, आणि पुन्हा रात्री केलेला पुलाव आणि जोडीला टाॅमॅटोचं सार. हा एकूण एक बेतच अत्यंत उच्च अशा दर्जाचा होता, आणि तिने तो सगळा कृतीतही आणलेला अतिशय उत्साहात. म्हणजे... "स्वैपाकखोलीत फारशा न रमणार्‍या, नी स्वैपाकात बेताचाच हात असलेल्या मेघनाने... हे इतकं सारं कसं काय एकहाती केलं?... आणि ते ही कधी नव्हे एवढं चविष्ट?" हा विचार करता करताच कधीतरी झोप लागली मंदारला. 
मध्यरात्री अचानक कुठल्याशा खुडबुडीने, मंदारला जाग आली. आणि त्याला किचनमध्ये ओट्यापाशी, कोणाचीतरी हालचाल जाणवली. त्याने चमकून बाजूला पाहिलं, तर मेघना अगदी गाढ झोपलेली. स्वैपाकखोलीतील देव्हार्‍यात असलेल्या झिरो बल्बच्या किंचितशा उजेडात, मंदारला नक्कीच कोणाची तरी लगबग जाणवली. तो अंथरुणावर उठून बसला, नी वाकून बघू लागला. तोच भर्रकन त्याच्या डोळ्यांसमोरुन, अतिशय वेगात कोणीतरी गेल्याचा भास झाला त्याला. ते जे कोण गेलं त्याचा वेग इतका होता की... मंदारला फक्त एक नऊवारी नेसलेलं कोणी, डोक्यावरुन पदर घेतलेलं आहे इतकंच दिसलं. चिक्कारच घाबरला मंदार... आणि पुन्हा अंथरुणावर पडून, घट्ट मिटल्या डोळ्यांनी झोपून राहिला तो. आता स्वैपाकखोलीसहीत, अख्ख घर शांत झाल्याचं भासलं होतं त्याला. 
सकाळी जेव्हा जाग आली मंदारला... तेव्हा उकळणार्‍या चहाच्या सुगंधाने, जणू अख्ख्या घराला उकळ्या फुटत होत्या. रविवारची सकाळ, अंमळ अधिकच प्रसन्न उजाडल्या सारखी वाटली मंदारला. फ्रेश झाला मंदार... नी तो अमृतासम चहा पिऊन, तातडीने बाहेर पडला तो... "येतो थोड्या वेळेतच" असं मेघनाला सांगून. दुपारच्या जेवणावेळी मंदार घरी परतला... तर त्याचं स्वागत केलं तेच मुळी, लसणाच्या फोडणीत परतलेल्या मेथीच्या आणि हाताने थापलेल्या भाकरीच्या... खमंग, खरपूस सुवासानेच. हाताच्या बुक्कीने कांदा फोडला मग मंदारने, आणि मेघनाला दिला अर्धा. जेवता जेवता मंदार, सारखा त्या ओट्याकडे बघत होता. काही वेळाने मेघनाच्या हे लक्षात येऊन, तिने कारण विचारलं मंदारला. तोडलेला भाकरीचा तुकडा, तसाच हातात धरुन मंदार बोलू लागला... 
"मेघना मी सकाळी अभ्यंकरांकडे गेलो होतो, ज्यांची ही जागा आहे... काही चौकशी करायची होती मला त्यांच्याकडे... पण तेव्हा मला कळलं की, अभ्यंकर हे सेकंड ओनर आहेत ह्या जागेचे... ही जागा मुळात होती देवस्थळींची... सदानंद आणि राधा देवस्थळी यांची... सदानंद देवस्थळींना, लग्नाच्या पुढल्याच वर्षी देवाज्ञा झाली... त्यांच्या मागोमागच त्यांचे वृद्ध आई - वडीलही गेले पाठोपाठ, मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न होऊन... आणि राधा देवस्थळी एकट्याच उरल्या मग ह्या घरात... अशिक्षित आणि सामान्य वकूबाच्या देवस्थळी बाईंकडे, दोन गूण मात्र असामान्य होते... त्यातला एक म्हणजे स्वैपाक... फार उत्तम स्वैपाक करत देवस्थळी बाई... मग उदरनिर्वाहासाठी त्यांनी घरी स्वैपाकाचे डबे करुन, बाहेर आॅफिसेसमध्ये द्यायला सुरुवात केली... बाहेरुन इथे कुटूंबाला सोडून कामानिमित्त आलेल्यांसाठी, रात्रीची घरगुती खानावळही सुरु केली... ह्या ओट्यावर त्या काळी, खोर्‍याने अन्नपदार्थ शिजलेत मेघना... ह्या ओट्याच्या कोपर्‍या कोपर्‍यात... अगदी कणाकणात, देवस्थळी बाईंच्या हाताचा वास आहे... आणि तोच आपसुकपणे तुझ्या हातांवर चढला मेघना, जेव्हा तू त्या ओट्याला शिवलीस... देवस्थळी बाई गेल्यावर, त्यांच्या दूरच्या एका भाच्च्याने हा फ्लॅट अभ्यंकरांना विकला... पण अभ्यंकरांचा संसार दोनाचा तीन नी तीनाचा चार झाला, तसा हा वन रुम किचन त्यांना लहान पडू लागला... आणि ते दुसरीकडे रहायला गेले, हा फ्लॅट तसाच ठेऊन... आपणच त्यांचे पहिले भाडेकरु आहोत मेघना... आणि तुला एक सांगू... जेव्हा मी अभ्यंकरांना विचारलं की, ही जागा सोडल्यावर त्यांना काही वेगळं जाणवलं का?... तर ते काय म्हणाले माहितीये?... अभ्यंकर म्हणाले... बाकी काही नाही, पण मिसेसच्या हाताची काहीतरी अद्भूत अशी चव हरवली... इथेही ती चांगलाच स्वैपाक करते, पण ती जी एक रया होती... ती मात्र गेली ती गेलीच... अभ्यंकर पुढे म्हणाले की... त्यांना देवस्थळी बाई, स्वैपाकखोलीत वावरतांना दिसायच्या अधूनमधून... आणि त्यांनी जे वर्णन केलं राधा देवस्थळींचं... अगदी डिट्टो तशाच बाई, मला सुद्धा काल रात्री दिसल्या मेघना". 
मेघना आता पुरती हबकलेली, हे सगळं ऐकून. आपल्या हाताला अचानक आलेल्या दैवी चवीविषयी, तिच्या मनातून जे काहूर उठलेलं... ते शमलं होतं एव्हाना. मेघनाने बसल्या जागीच, एकदा वळून पाहिलं ओट्याकडे... आणि मनापासून हात जोडले. मंदारकडे वळत मेघना बोलली त्याला... "आपण हा फ्लॅट विकत घेऊया मंदार... आपली नवी जागा जी होतीये ती विकू... माझ्याही हातात चव राहिल चांगल्यापैकी, आणि तुझ्या हातात पैसे ही राहतील बर्‍यापैकी". मंदारने मेघनाकडे बघत मान हलवली, मंदसं हसतच. अचानक काहीतरी आठवून, मेघनाने विचारलं त्याला... "मंदार... पण तू मला देवस्थळी बाईंचा, दुसरा गुण सांगितलासच नाहीस?". मंदार बोलला... "देवस्थळी बाई नवजात मुलांचं, मालिश नी आंघोळ करायच्या... त्यांना स्वतःचं मुल नव्हतं... त्यामुळेच लहान मूलांना न्हाऊ - माखू घालणं, फार फार मन लाऊन करायच्या त्या... आपल्याला मुल नसल्याची मनातून भरुन राहिलेली खंत, ममता बनून देवस्थळी बाईंच्या हातांतून भरभरुन पाझरत असावी... लहान बाळांच्या अंगावर". एवढं बोलून, मंदार आणिक जिवणी पसरवून हसू लागला मेघनाकडे बघत. आणि हे ऐकून, मेघनाही तोंड भरुन हसू लागली मंदारकडे बघत. हसता हसता दोघांच्याही डोळ्यांतून, पाणी वाहू लागलं होतं. मंदारने हातातल्या भाकरीच्या तुकड्यात भाजी भरत, तो घास मग मेघनाला भरवला होता.
.
.
.
.
.
दिड वर्ष झालेलं आता, मंदार - मेघनाला इथे येऊन. मागल्याच महिन्यात मंदारने... त्यांच्या रिडेव्हलपमेंट होत असलेल्या सोसायटीतील, जागेचा सौदा केला होता. आणि त्या व्यवहारासमोर, अभ्यंकरांकडून ही जागा विकत घेतली होती त्याने. आणि मागल्याच महिन्यात... मेघना माहेरुन पुन्हा या घरी राहायला आली होती, लग्नाला आठ वर्ष उलटून गेल्यावर त्यांना झालेल्या... त्यांच्या बाळाचं बारसं पार पाडून. 
मंदार - मेघनाने, त्यांच्या मुलीचं नाव ठेवलं होतं... 'राधा'.

- सचिन श. देशपांडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...