मंगळवार, १० फेब्रुवारी, २०२६

2536. वरद

 पहाटेच्या पावसाच्या हलक्याशा सरींनी त्यांना जाग आली.त्यांनी घडाळ्यात पाहिले ३.३० वाजले होते,मनातल्या मनात म्हणाल्या ५.३० उठायलाचं हवे ७.३० ला गुरुजी येतील.
आज गणेश चतुर्थी होती.त्या एकट्या असल्या,तरी हौसेने गणपती आणत होत्या ५ दिवसांचा.त्याची षोडषोपचाराने प्रतिष्ठापना करून ५ दिवस वेगवेगळे गोड पदार्थ त्याच्यासाठी करत होत्या. घरातील काल आणून ठेवलेल्या मूर्तीकडे त्यांनी पाहिले आणि त्या पार त्यांच्या बालपणातल्या काळात हरवल्या.
एवढ्याश्या त्या खणाचा परकर पोलका घालून सारख्या गणपतीच्या अवतीभोवती फिरत असत.त्यांच्या माहेरी गणपती अगदी दणक्यात साजरा करत. वेगवेगळे पदार्थ,महिलांचे खेळ, गौरींचा जागर खरंच खूप छान वाटे सगळे.त्यांचा जीव त्या गणेशात अडकलेला असे,मूर्ती विसर्जनाला त्या अत्यंत भावुक होत.गंमत म्हणजे त्यांना गणपतीचे "वरद" हे नाव खूप आवडे.
वेगवेगळी आयुधे असोत,मोदक असो....पण एक हात मात्र त्याचा कसा सगळ्यांना वर देण्यासाठी उंचावलेला असतो... म्हणून तो 'वरद'.
आई आणि बाबा नेहमी म्हणत तुला मुलगा झाला की ठेव हो नाव "वरद."
यथावकाश तिचे लग्न झाले. नवरा,घरची माणसे खूपच चांगली मिळाली.
नवरा अतिशय बुद्धिमान होता,स्वप्रयत्न, स्वकष्ट यावर त्याचा जोर होता आणि त्यानुसार भरभर वरच्या पोस्ट त्याला मिळत गेल्या.एकच मात्र... तो प्रचंड नास्तिक होता, तरीही त्याने तिच्या आस्तिकतेवर कधी आडकाठी आणली नाही.तिला २ मुलीच झाल्या,मुलग्याचे नाव वरद ठेवायचे होते,ती इच्छा मात्र अपूर्णच राहिली.पण मुलीही बापासारख्या प्रचंड हुशार, मेहनती कधी मोठ्या होऊन मोठ्या मोठ्या हुद्यावर नोकरीला लागल्या,नि लग्न करून आपल्या स्वतःच्या घरट्यात विसावल्या ते कळलेचं नाही.
लग्न झाल्यापासून ही स्वतःला आवड म्हणून गणपती आणत होती.त्याचं सगळं करत होती, मध्येच नवरा म्हणे,चेष्टा करी, तुझा बाप्पा कधीतरी प्रसन्न होऊ देत तरी,दृष्टांत देऊ देत तरी...!
ती म्हणे,वेळ आली की येईल तो बरोबर.आज तर ती ६५ कडे झुकत होती,नवरा २ वर्षांपूर्वी देवाघरी गेला,मुली लग्न होऊन लांबच्या घरी,आता तिच्याकडे येणारा गणपती आणि ती. त्याच्यासाठी अकरा मोदक करणार उकडीचे,हो अकराचं. कारण... आहे कोण खायला? ही दोन खाणार... नि उरलेले कामवालीच्या मुलांना देणार. असूदे...त्यांनाही सणाचा आनंद.
असा विचार मनात चालू असताना ५.३० वाजल्याचे तिच्या लक्षात आले आणि ती लगबगीने उठली.तिने भरभर सारे आवरले,पूजेची तयारी केली.
७.३० ला गुरुजी आले,त्यांनी पूजा केली,सुवासिक फुले,पत्री, अगरबत्ती आणि मंद प्रकाशातील गणरायाचे मनमोहक रूप पाहून ती अगदी सुखावली.खोऊन ठेवलेल्या खोबऱ्याचे सारण तिने केले,बटाटा भाजी,पुरी,वरण भात असा सरंजाम झाला,आता फक्त उकड काढून मोदक करणे बाकी होते.
केळीचे पान आणायला परसदारी गेली,तिथे पाय घसरून पडली.तेव्हा उजवा हात अंगाखाली आला नि हाड मोडल्याचे तिला जाणवले.घरात आली.उजवा हात तिला हलवताही येईना,शेजारी कुठे सांगायला जाणार...!आज सगळीकडे गणपतीची धामधूम, राहु देत,बघू काय होतेय.
थोडा वेळ गेला,नि दरवाजा वाजला म्हणून तिने दार उघडले, दारात एक तेजस्वी डोळ्यांचा,शांत,संयमी चेहऱ्याचा माणूस उभा होता. हिने विचारले काय काम आहे? तो म्हणाला,काकू, "तुम्ही मला ओळखले नाहीत का? "मी तुमच्या मोठ्या मुलीच्या वर्गात होतो.इथेच खालच्या आळीत राहायचो.आलो तर भेटून जावे म्हणून आलो.तिने त्याला घरात घेतले,पण साशंक मनाने तिने स्मरणशक्तीला जोर दिला,पण मुलाचे नाव,चेहरेपट्टी काही आठवेना.त्याला बसा म्हणाली, आणि हळूहळू ती त्याचे निरीक्षण करू लागली.
हा आपला बसलाय नि मुलींच्या वेगवेगळ्या आठवणी सांगतोय.त्या ऐकून ती निर्धास्त झाली.म्हणजे हा असेल मुलींच्या वर्गात.
जेवणाची वेळ होत आली,तसा हिचा धीर सुटत चालला.हिचा हात तर काम करत नव्हता,नि बाप्पाला मोदकांचा नैवेद्य कसा दाखवणार? तिच्या मनाची घालमेल ओळखली त्याने नि विचारले,"काकू,काही प्रॉब्लेम आहे का? "
ही नाही म्हणत असतानाचं त्याचे लक्ष तिच्या हाताकडे गेले, सुजलेला हात दिसताच त्याने विचारल्यावर हिने सगळे सांगितले.तो म्हणाला,मी कुकर लावून देतो,
ती म्हणाली,बाकी जेवण तयार आहे रे... फक्त मोदक करायचे राहिले आहेत.
तो म्हणाला, एवढेच ना? तेही मला येतात,द्या मी करतो.
प्रचंड अपराधी भाव तिच्या मनात दाटून आला,कोणाचा कोण त्याला कसे सांगायचे मोदक करायला? ती नको नको म्हणत असतानाही त्याने तांदूळ पीठ शोधून उकड काढली,मोदक केले एकसारखे २१.एखाद्या बाईलाही लाजवेल असे पटकन काम केले त्याने.तिने त्याचा हात धरला नि म्हणाली,गेले कित्येक वर्षात कोणी आले नाही असे आपुलकीने करायला,
बस मी तुला जेऊ घालते माझ्या हाताने.जेव भरपूर म्हणजे मलाही समाधान मिळेल.
तोही गालातल्या गालात हसत म्हणाला,"काकू जेऊन तर मी जाणारचं आहे,कारण मोदक मला प्रचंड प्रिय आहेत".
हिने त्याला जेवायला वाढले, आज सणावाराचे कोणीतरी आपल्याकडे हक्काने जेवत आहे,हे पाहून ती खूप आनंदी झाली.त्याचे जेवण आटोपले.
तो निघाला तेव्हा तिने पटकन त्याला नाव विचारले, आल्यापासून तिचे मन बेचैन होते,तुम्ही कोण आला होतात असं सांगू हो लेकीला? तिने त्याला विचारले.
तो म्हणाला,सांगा तिला 'वरद देव' आला होता.
येतो पुन्हा नक्की,तृप्त झालो.
तो बाहेर पडला नि भरभर फोनजवळ गेली नि तिने लेकीला फोन करून सांगितले,अगं... तुझ्या वर्गातला तो "वरद देव" आला होता आज.
मुलगी म्हणाली,"आई,असा कोणी मुलगा माझ्या वर्गात नव्हता नि आपल्या खालच्या आळीतही नव्हता,काय झालं ग? "तिला मुलगी काय म्हणते तेच कळेना आणि तिच्या लक्षात आले,मगाच पासून जेवण वाढण्यापासून ते लेकीला फोन करेपर्यंत ती सगळी कामं उजव्या हाताने करत होती.
काय बोलावे ते सुचेना तिला. अश्रुभरल्या डोळ्यांनी गणेशाच्या मूर्तीसमोर ती उभी राहिली आणि म्हणाली,वरद विनायका असाच पाठीशी रहा रे बाबा...
आज धन्य झाले मी,
धन्य झाले..!
  
 ©सौ राधा रायकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...