एक ४५च्या आसपासची टिपिकल भारतीय गृहिणी ओपीडीत आली होती.
चेहरा उतरलेला, डोळ्यांखाली काळी वर्तुळं, केसांची घनता कमी झालेली, खांदे झुकलेले, त्वचा निस्तेज आणि हातात नेहमीची फाईल.
बिचारीची तक्रारही तिच्यासारखी साधीच होती,”डॉक्टर, पोट काही केल्या नीट होत नाही.सारखं जुलाब,पोटात मुरडा,कधी उलटी,कधी अॅसिडिटी,कधी गॅसेस तर कधी नुसताच गच्चपणा.”
नेहमीप्रमाणं कारणीमिंमासा सुरू झाली..औषधं,पाणी,
ताणतणाव, इतर आजारांचा इतिहास..पण सगळं ठीक..
मग सहज विचारलं,”जेवणाचं काय? तुम्हीच बनवता?”
उत्तर आलं, अगदी अभिमानानं “हो डॉक्टर..मीच बनवते”.
“आणि काहीच वाया घालवत नाही?”- मी
“हो..अन्न वाया कसं घालवायचं? फ्रिजमध्ये ठेवते.. खाल्ल्याशिवाय समाधानच नाही.”
इथंच केसचा खरा खलनायक समोर आला किंबहुना शाकाहारी, मांसाहारी, मिश्राहारी प्राण्यांच्या यादी सोबत अजून एक श्रेणी जोडायला हवी ती म्हणजे उष्टाहारी प्राणी आणि तो म्हणजे भारतीय मध्यमवर्गीय गृहिणी.
त्यांना जे सांगितलं तेच तुम्हालाही सांगतो.
शिळं म्हणजे फक्त थंड झालेलं नाही, बर्याच जणांचा गैरसमज असतो की अन्न शिळं झालं म्हणजे फक्त चव बदलते पण वैद्यकशास्त्र सांगतं शिळं अन्न म्हणजे जंतूंसाठी खुलं आमंत्रण.
शिजवलेलं अन्न थंड होताच त्यात बॅक्टेरिया, फंगस वाढायला सुरुवात होते विशेषतः भात,मटकी, रस्साभाजी, दही आणि मांसाहार हे पदार्थ शिळे राहिले की त्यात साल्मोनेला, इ.कोलाय,स्टॅफिलोकोकस सारखे जंतू मौज करायला लागतात.
“उरलेलं अन्न फ्रिजमध्ये ठेवलं म्हणजे सुरक्षित होतं” हा अजून एक मोठा गैरसमज. फ्रिज जंतूंची वाढ फक्त मंद करतो पण पूर्ण थांबवत नाही शिवाय वारंवार बाहेर काढणं-पुन्हा गरम करणं-अर्धवट गरम अन्न हे सगळं मिळून पोटासाठी एक टाईम बॉम्ब तयार करतात.
या गृहिणीच्या पोटात नक्की काय चाललं ते तपासणीअंती कळेलच जसं गॅस्ट्रोएन्टेरायटिस, आतड्यांची सूज,पचनसंस्थेची बिघडलेली नैसर्गिक जंतुसंरचना अर्थात गट फ्लोरा.
थोडक्यात दररोज थोडं-थोडं विष आणि हळूहळू पोट हार मानतं. शिळं अन्न खाल्ल्याचे संभाव्य दुष्परिणाम म्हणजे सतत जुलाब, पोटदुखी आणि मुरडा, उलटी,मळमळ,आम्लपित्त, अशक्तपणा आणि दीर्घकाळात कुपोषण.
शिळं कधी चालेल? तर कधीतरीच, लगेच फ्रिजमध्ये ठेवलेलं, २४ तासांच्या आतलं, नीट गरम केलेलं, ज्याचा वास/चव/रंग बदललेला नाही ते.
रोजच रोज, फ्रिजबाहेर ठेवलेलं दोन-तीन वेळा गरम केलेलं.
आंबट वास येणारं,रंग बदललेलं,फसफसणारं हे तर सरळ डस्टबिन योग्य.
हे पेशंट औषधांमुळं बरं होईलच पण खरं औषधंय “शिळं अन्न टाळणं”
मी तर नेहमी म्हणतो पोटासारखा सहनशील अवयव नाही पण ते एकदा बिघडलं तर काही म्हणजे काहीच उमजू देत नाही !
डॉ प्रज्ञावंत देवळेकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा