मंगळवार, १० फेब्रुवारी, २०२६

2535. ती फक्त मित्र शोधत असते

 आजकालच्या नात्यांचा एक वेगळाच चेहरा समोर येतो. एखादी स्त्री केवळ माणूस म्हणून, साध्या मैत्रीच्या नात्याने एखाद्या पुरुषाशी बोलते. मनापासून विचार शेअर करते, तर लगेच काही दिवसांत तो पुरुष तिला सरळ सांगतो  “मला तुझ्यावर प्रेम झालंय.” ना त्याला तिचं वय महत्त्वाचं वाटतं, ना तिची जीवनस्थिती, ना तिचं मन फक्त स्वतःची आकर्षणाची भावना तो “प्रेम” समजून बसतो.
बर्‍याचदा ते पुरुष तिशीतले असतात तर ती स्त्री चाळीशीतील. आयुष्यात अनेक अनुभव घेतलेली, भावनिकदृष्ट्या परिपक्व. तरीसुद्धा तो एकच संवाद, एकच सहानुभूतीचा सूर, किंवा साधं लक्ष  यालाच प्रेम समजून तीव्र उतावळेपणाने कबुली देतो. आणि त्यावर वरतून म्हणतो “प्रेमाला वय नसतं.”
खरं तर स्त्रीला पुरुष हवा असतो  पण प्रियकर म्हणून नाही तर एक मित्र, एक समजून घेणारा सहप्रवाशी म्हणून. ती नात्याचा अर्थ जाणते, अंतर समजते. सीमांची जाणीव ठेवते. तिच्या बोलण्यात जिव्हाळा असतो पण तो बंधनरहित, स्वच्छ आणि सन्मानपूर्वक असतो. स्त्री जर खरंच एखाद्या नात्याकडे पुढे जायचं ठरवते तर ती स्वतः संकेत देते  नजरेतून, वर्तनातून, हळूहळू. पण ती कधीच उतावीळपणे “मी तुझ्यावर प्रेम करते” असं बोलून दाखवत नाही. उतावीळ पुरुष मात्र या शांत भावनांना चुकीचा अर्थ लावतात. स्त्रीचं आदराने केलेलं बोलणं त्यांना जवळीक वाटतं, तिचं समजून घेणं त्यांना विशेषत्वाचा भास करून देतं आणि मग ते अचानकपणे कबुली देऊन मोकळे होतात  जणू जबाबदारीच नाही, विचारच नाही. इथे खरी समस्या समजुतीच्या अभावाची आहे. स्त्रीला का बोलता येतं सहज? कारण तिला विश्वास हवा असतो. तिला आधार हवा असतो  पण मालकी नाही.
तिला सहकारी हवा असतो  पण भिंती ओलांडणारा नाही.
प्रेम हे फक्त आकर्षण किंवा भावनिक कमकुवत क्षण नसतो. प्रेम म्हणजे परिपक्वता, संयम, एकमेकांच्या मर्यादा समजून घेणं. वयाला खरंच प्रेम नाही, पण जबाबदारीला मात्र असतं.
स्त्रीची साधी, सौम्य मैत्री ही प्रेमाची मागणी नसते  ती सन्मानाची अपेक्षा असते. पुरुषांनी हे समजायला हवं 
प्रत्येक जवळीक प्रेम नसते, प्रत्येक संवाद नात्यात बदलत नाही,
आणि प्रत्येक स्त्री तुमच्याच दिशेने झुकलेली नसते. कधी कधी ती फक्त मित्र शोधत असते आणि तेवढाच सन्मान तिला हवा असतो.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...