सागर महाशब्दे...आमच्या बिल्डिंगमधल्या, एका 2bhk फ्लॅटमध्ये एकटाच रहात असे. साधारण चाळिशीचा… अतिशय गबाळा. हत्तीच्या डोक्यासारखं खुरट्या, तुरळक केसांचं टक्कल...खुंट वाढलेली पांढरी दाढी, डोळ्यांखाली गडद काळी वर्तुळं… कपडे फक्त काही गोष्टी झाकल्या जाव्यात म्हणून घालायचे असतात, असा ठाम समज.
त्यामुळं कुठल्याही रंगाच्या चुरगळलेल्या शर्टाला, कुठल्याही रंगाची मळलेली पॅन्ट वर्ज्य नसे. चेहर्यावर कायम बारा वाजलेले असत. बिल्डिंगच्या कुठल्याही कार्यक्रमात हा भाग घेत नसे. मग तो वर्धापन दिन असो, वा असो AGM.
आम्ही मुलं तेव्हा त्याला ‘सागरगोटा’ म्हणत असू. आमच्यासाठी तो निर्जिव दगड होता, बस्स… खाली क्रिकेट खेळतांना ह्याच्या ग्राउंड फ्लोअरलाच असलेल्या घराच्या गॅलरीत, नेमानं आमचा बाॅल जात असे… मग आमच्यापैकीच कुणी गॅलरीतून आत उतरत, तो बाॅल काढत असे.
दोन-तीन वेळा तर आम्ही त्याच्या बाथरूमच्या काचाही फोडल्या होत्या… पण हा सागरगोटा एका शब्दानं आम्हा मुलांना कधी बोलला नाही. शरिराला लागू नये म्हणून कर्णाला जशी जन्मतःच कवचकुंडलं होती, तशी ह्यालाही ती मिळाली होती… अर्थात मनाला लागू नये म्हणून. पठ्ठ्या नवरसांच्या पार गेलेला होता जसा काही!
तर एकदा असाच आमचा बाॅल त्याच्या गॅलरीत गेला. मी तो मारलेला त्यामुळं, नियमाप्रमाणं गॅलरीतून आत उतरणं मलाच भाग होतं. तसा मी उतरलोही होतो… पण बाॅल त्या दिवशी जरा अधिकच धिटाईनं वागत, त्या उघड्या दारातून चक्क आत शिरला.
बाॅलचा माग काढत मग मीही आत शिरलो. हाॅलमध्ये सागरगोटा नव्हता. प्रचंड पसारा… अस्ताव्यस्त पडलेलं सामान आणि कसलासा कुबट वास. घराचाही जणू जगण्यातला इंटरेस्ट संपलेला.
मी तसाच नेटानं आत गेलो. समोरच एक लाकडी शोकेस होतं… पूर्ण रिकामं. फक्त मधला एक स्क्वेअर सोडून… त्यात एक खूप मस्त, गोड असा पिंक कलरचा टेडी बिअर ठेवला होता… ‘Someone Special’ छातीवर लिहिलेला.
मला तो तिथं, त्या घरी वाळवंटातल्या ओॲसिस सारखा भासला. मग पुढं चारेक वर्षांत सागरगोटा घर विकून गेला कुठेतरी निघून… अर्थातच कुणालाही न सांगता, कुठं चाल्लाय ते.
ह्या गोष्टीलाही झाली की आता तीस वर्ष… सध्या मी चाळिशीचा आहे. लग्न होऊन दोन मुलांचा बाप आहे आणि मी ही ती बिल्डिंगच काय, पण नागपूरही सोडलंय कधीचच.
तर, अशा तर्हेनं आयुष्य नाकासमोर चाललंय ह्या मुंबापुरीत… स्वतःपुरतं जमवण्यातही बेदम दमण्यात चाललंय. पिचून घेऊन जिवंत शरीर स्वतःचं दिवसभर, रात्रीचं मेल्यासारखं झोपण्यात चाललंय… एकंदरीत आयुष्य बर्यापैकी सुखात चाललंय आपलं, असं स्वतःलाच समजवण्यात चाललंय.
खरंतर सुखात चाललेलं… हो, गेल्या आठवड्यापर्यंत… चित्रे काकूंच्या घरी जाईपर्यंत.
चित्रे काकू… साधारण सत्तरीच्या आसपास. प्रचंड तेजस्वी नी देखण्या. साधी, स्वच्छ रहाणी. निर्मळ वाणी. सततची हसरी जिवणी लाभलेल्या… गेल्या आठवड्यातच आमच्या बिल्डिंगमध्ये रहायला आलेल्या.
त्यांचा सामानाचा ट्रक आणि माझी रिक्षा एकत्रच थांबले गेटवर… त्यामुळं रात्री नऊ वाजता मीच सापडलो चित्रे काकूंना आयताच. मग अजून दोघा-चौघा मित्र मंडळींना बोलावून, आम्हीच त्यांचं सामान लावून दिलं होतं.
सगळं साधारण रफली लावून झाल्यावर, काकूंनी अतिशय प्रेमानं पिशवीतून ती वस्तू काढली, जी पिशवी त्यांनी ट्रकभध्ये ठेवली नव्हती… आपल्या हातातच सांभाळली होती.
चौफेर नजर फिरवत काकूंनी ती वस्तू ठेवायला एक मोक्याची जागा हेरली… अन् ती वस्तू त्या वास्तूत स्थानापन्न झाली.
ती वस्तू पाहुनच खरंतर मला पुन्हा नागपूर आठवलं होतं… आमची चंद्रदर्शन बिल्डिंग… आणि तिथं रहाणारा सागर महाशब्देही… 'Someone Special' छातीवर लिहिलेला पिंक कलरचा टेडी बिअर होता तो!
काकूंकडून खोर्यानं आभार घेऊन मी घरी आलो… पण तो ‘टेडी’ अन् त्या निमित्तानं आठवलेला ‘सागरगोटा’ काही माझ्या डोक्यातून जाईना. लाखो टेडी बनले असतील असे डिट्टो, हे कितीही पटत असलं, तरी त्यातले दोन बरोब्बर माझ्याच डोळ्यांसमोर का यावेत…? तेही त्या दोन्ही व्यक्तींनी प्राणपणानं जपलेले.
मला अचानकच आठवली मग ती अख्यायिका सागरगोट्याबद्दल उठलेली त्या काळी… की म्हणे कुठल्यातरी मुलीकडून तो फसवला गेला. प्रेमभंग झाला त्याचा… आणि म्हणूनच असा भणंगासारखा राहतो तो.
मी लगेच नागपुरात चार-पाच ठिकाणी फोन लावले… होते-नव्हते ते सगळे सोर्सेस वापरले, सागरगोट्याला शोधण्यासाठी… आणि अखेर दोन दिवसांनी मला त्याचे व्हेअरअबाऊट्स मिळाले.
सागरगोटा सध्या पुण्याला कर्वे रोडला, टोळ हाॅस्पिटल जवळच्या एका बिल्डिंगमध्ये रहात होता. मी माझ्या पुण्याच्या मित्राला त्याचा पूर्ण पत्ता दिला नी सांगितलं, “काहितरी सांगून घूस त्याच्या घरात, नी फक्त बघ हाॅलमध्ये पिंक कलरचा टेडी बिअर, अजूनही जपून ठेवल्याप्रमाणे कूठे ठेवलेला दिसतोय का?”
दुसर्याच दिवशी रात्री मित्राचा मला फोन… “अरे घराचा गोठा केलाय भावड्यानं… पण तू म्हणतोयस तो ‘टेडी’ मात्र ठेवलाय हां जपून… अगदी शोकेसच्या बंद काचेत!”
हे ऐकलं नी अचानकच अंगात काहिसं बळ संचारल्यासारखं झालं. कुठलाही मागचा-पुढचा विचार न करता दुसर्या दिवशी सकाळी सकाळीच मी चित्रे काकूंच्या घरी जाऊन थडकलो.
“काकू, सागर महाशब्देंना ओळखता तुम्ही?”
“हे नाव कुठून कळलं तुला?”
“काकू, ते जाऊ द्या… मला सांगा, फक्त हो की नाही!”
“हो.”
“कसं काय?”
“We were going steady at that time…”
“What…? मग काय झालं नेमकं?”
“One day he met with an accident… आणि त्यातच गेला तो!”
“काय…? कुणी सांगितलं तुम्हाला?”
“काय कुणी सांगितलं…?”
“हेच की, तो गेला!”
“माझ्या बाबांनी… मग दोनच दिवसांत आम्ही नागपूर सोडून मुंबईला आलो.”
“तुम्ही बघून नाही आलात त्याची डेडबाॅडी?”
“My father didn't allow me to do so… आपली हुशार मुलगी धक्का बसून वेडी होईल, अशी भिती वाटली त्यांना.”
“And u believed on that bloody sheet… m sorry…”
“काय बोलतोयस तू…? आणि तुला कळलं कुठून हे नाव, ते नाही सांगितलंस!”
“मला सांगा, हा असाच सेम टेडी त्याच्याकडेही होता?”
“हो, होता… आम्ही एकत्रच घेतलेली ती पेअर… आणि ठरवलं होतं एकेक ठेवायचा एकमेकांकडे. मी माझा आजही ठेवलाय जपून… पण त्याच्याकडचा बहुधा त्याच्यासोबतच…”
“त्याच्याकडेही आहे… आजही… प्राणापलिकडे जपून ठेवलेला… एकट्यानं… as he is also single… jst like u!”
“काय…? अरे तू काय बोलतोयस…? थट्टा नको उगीच भलत्याच विषयात…”
हे बोलून चित्रे काकू वळल्या, नी पाहिलं तर दारात उभा होता तो… अस्ताव्यस्त, विस्कटलेला, आणिक् म्हातारा झालेला. मी माझ्या मित्राला त्याला पुढ्यात घालून आणायला सांगितलेला ‘तो’!
तोंडाचा आ वासून चित्रे काकू मट्टकन खाली बसल्या. त्यांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता… त्यांच्या दोन्ही डोळ्यांतून पूर लोटला होता.
एक पाय सरपटवत तो त्यांच्याकडे आला. त्यानं त्यांना त्याच्या थरथरत्या हातांनी खांद्याना धरून उठवलं. दोघं भान विसरुन एकमेकांच्या डोळ्यांत पहात उभी राहिली… ईतक्या वर्षांचं ते हरवलेलं प्रेम त्यांना अजिबात शोधावं लागलं नव्हतं… कारण ते तिथंच होतं… डोळ्यांच्या दोन जोडी बाहुल्यांतून जपलेलं… त्या जिवापाड जपलेल्या, एक जोडी ‘टेडी बिअर’ सारखंच!
.
.
.
.
.
दादरच्या ब्राम्हण सभागृहात आज सनईचे सूर वाजतायत… चकचकीत गोटा, कोरीव पांढरी फ्रेंच बिअर्ड, गोल्डन काड्यांचा चश्मा, उंची शेरवानी घालून तयार झालेला आमचा सहा फूटी सागरगोटा… मोरपिशी पैठणीतल्या, दागिन्यांनी मढलेल्या, निरातिशय देखण्या काकूंना साॅल्लिड टफ देतोय.
मी चिक्कार खूष आहे, कारण चित्रे काकूंनी कन्यादानाचा हक्क तर मला दिलेला आहेच… शिवाय सागरगोट्याचा करकचून कान पिळायचा मानही माझ्याकडेच आहे. MNCतली ‘मल्टिटास्कींग’ कधी नी कुठं कामी येईल, सांगता नाही येत हेच खरं !
- सचिन श देशपांडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा