बाळकृष्ण हा सैन्यातून निवृत्त झालेला सैनिक; आपल्या गावी शेतीवाडी सांभाळत वास्तव्य करत होता. घरामध्ये संजय नावाचा एक पदवीधर मुलगा त्याला होता. संजय एका सरकारी बँकेत ऑफिसर म्हणून तालुक्याच्या ठिकाणी काम करत होता, तर सुनबाई संजना घरकामात सासूबाईंना स्वयंपाक घरात मदत व गोठ्यातील गाई गुरांची व्यवस्था बघत असे. बालकृष्णला घरात सर्वजन बाबा म्हणत. पण त्यांचे पुढे नामकरण पुढे 'भिमबाबा' असे झाले. हे नाव बदलण्याचे कारण म्हणजे एक गम्मत होती.
संजय-संजनाला 'गौराई' नावाची दोन अडीच वर्षाची नात होती. आजोबा आणि तीचे खूप पटत असे. दिवसभर ती आजोबांच्याच मागे मागे असे. ती लहान असल्याने फक्त पप्पा, आई, बाबा, असे मोजकेच शब्द बोलत. त्यांच्याकडे एक महाभारतातील गोष्टीचे सचित्र पुस्तक होते. बाबा तिला त्या पुस्तकातील चित्रे दाखवत दाखवत गोष्टी सांगत. तिला ती लहान असल्याने त्या गोष्टी एवढ्या समजत नसे.पण चित्रे पाहण्यात तिला जास्त रस होता. गौराईची सर्वात आवडती गोष्ट म्हणजे 'भीम-बकासुराची'. कारण बैलगाडी भरून जेवण जेवत असलेला बकासूर आणि त्याच्या बाजूला उभा असलेला बलदंड भीम हे चित्र तिला खूप आवडायचे. बाळकृष्ण म्हणजे तिचे बाबा सुद्धा मिलिटरीमन असल्याने त्यांचे शरीरही पिळदार व बलदंड होते. ते कधी बनियनवर असतील तेंव्हा किंवा अंघोळ करून टॉवेल गुंडाळून यायचे तेंव्हा ते गौराईच्या नजरेस त्यांचे पिळदार शरीर पडायचे आणि त्यांनाच ती भीम,भीम म्हणत चीडवीत असे. पुढे पुढे त्यांना 'भीमबाबा' असेच म्हणायला लागली. घरातसुद्धा बोलताना तिचे आई पप्पा म्हणत 'अग तुझे भीमबाबा कुठे गेले?' 'जा भीमबाबाना सांग चहा घ्यायला या,' असेच म्हणायला लागेल व तेंव्हापासून त्यांचं टोपण नाव 'भीमबाबा' असेच पडले. आसपासचे लोक सुद्धा त्यांना त्याच नावाने बोलायला लागले.
तशी भीमबाबा आणि गौराईची जोडी गावात प्रसिद्ध होती. कारण जत्रा असो नाहीतर देवळात जाणे असो,की आणखी कोणाकडे जाणे असो ही जोडी तेथे भेटनारच. कधी गौराई भीमबाबाच्या कडेवर दिसली नाही तर ओळखीचे माणस, त्यांना हमखास विचारात, 'अरे, गौराईला नाही आणलं बरोबर.'
पण एक दिवस असा उजाडला की तो भीमबाबा आणि सर्व कुटुंबाला मोठा शॉक बसला. गौराई आणि ह्या कुटुंबाची ताटातूट झाली. भीमबाबा आणि त्यांच्या कुटुंबासाठी तो काळा दिवस होता. त्याचे असे झाले, ते पावसाळ्याचे दिवस होते. भीमबाबाना आपल्या सैन्यामधून निवृत्त झालेल्या मित्राकडे पेन्शन संबधी काही गोष्टी विचारायच्या होत्या. त्या मित्राचे गाव समोरासमोर होते. म्हणजे मधे एक नदी आडवी जात होती व नदीवरील लाकडी पूल ओलांडला की मित्राचे गाव सुरू होत. भीमबाबा पायात चप्पल घालून निघाले, तोच गौराईने ते पहिले. ती रडायला लागली. तिला सुद्धा भीमबाबा बरोबर जायचे होते. भीमबाबा तिला समजावत होते, सांगत होते, "अग आत्ता परत येतो, तू येऊ नकोस, पाऊस येणार आता." घरचे सुद्धा तिला तेच म्हणत होते. पण ती रडायची थांबत नव्हती.
शेवटी तिला कडेवर घेऊन ते निघाले. बरोबर तिचा रेनकोट घेतला. पावसाळी वातावरण होते पण अजून पाऊस येत नव्हता. भीमबाबा तिला घेऊन लाकडी पूल पार करून मित्राच्या घरी पोहोचले. जवळ,जवळ अर्धा तास त्यांच्या गप्पा झाल्या. पण पाऊस आता सुरू झाला होता. गौराई सुद्धा रडू लागली व घरी घरी म्हणू लागली. कदाचित तिची खाण्याची वेळ झाली असेल. भीमबाबांनी मित्राचा निरोप घेऊन व गौराईला रेनकोट चढून ते निघाले. ते पुलाजवळ येई पर्यंत पाऊस आणि वाऱ्याचा वेग वाढला होता.पुलखालच्या नदीच्या पाण्याची पातळी खूप वाढली होती. पाणी जवळ जवळ पुलाला चिटकून वाहत होते. सैन्यात काम केल्याने असल्या गोष्टीची त्यांना भीती वाटत नव्हती. पण एकाएकी पुलाच्या मध्यभागी आल्यावर भीमबाबांना लाकडी पुलाच्या थोडीशी वर आलेल्याला फळीमुळे ठेस लागली. त्यांनी कठड्याला पकडले, कडेवर गौराई होती, पण वाऱ्याचा वेग व जोरदार पाऊस असल्याने कडेवर बसलेल्या गौराईची पकड ढिली पडली आणि पाहता पाहता गौराई नदीतील वाहत्या पाण्यात पडली आणि पाण्याच्या वेगा बरोबर वाहू लागली.
भीमबाबा आता जोरात गौराई गौराई ओरडू लागले. रडू लागले. भीमबाबा पुलाच्या कठड्याला धरून बसून जोर जोऱ्यात ओरडू व रडू लागले. हे दृश्य तेथून जाणाऱ्या दोघा तिघांनी पाहिले. ते धावत आले त्यांनी आधार देऊन त्यांना उठवले. ते पुलाच्या कठड्याला धरून ओरडून रडत सांगू लागले आमची गौराई नदीत पडली, शोधा कोणीतरी तिला. तिला कोणीतरी वाचवा, पण आता वेळ निघून गेली होती. वेगवान पाण्याने तिला केंव्हाच दृष्टीआड नेले होते.
मदतीला आलेले लोक त्यांच्याच गावातील असल्याने त्यांनी भीमबाबानां ओळखले. एकाने घरी निरोप धाडला. प्रसंग काय घडला तो सांगितला. घराचतील लोकांचे हातपाय गळाले. सर्व शोक करू लागले.
तोपर्यंत दोघा तिघांनी भीमबाबांना धरून घरी आणल. घरी आल्यारोबर त्यांनी टॉवेल खेचून घेतला आणि त्याच्यात तोंड खुपसून बेडवर डोक खाली करून ओक्साबोक्शी रडू लागले. आतापर्यंत आजूबाजूचे लोक जमा झाले. काही वेळाने डोके वर काढून मुलाला रडत रडत म्हणून लागले '"संजू, मला माफ कर,अरे मी काहीच करू शकलो नाही. पोरगी रडू लागली म्हणून मी घरी आणू लागलो. पण पुलावर ठेस लागल्याने माझा तोल गेला आणि पोरगी ,आपली गौराई हातून निसटली. देवाने मलाच का नाही वाहून नेले." असे म्हणूम पुन्हा टॉवेल मधे पुन्हा डोक खुपसून रडू लागले. संजय सुद्धा निशब्द झाला होता त्याने जवळ येऊन बाबांच्या पाठीवर हात ठेवला आणि हुंदके देऊ लागला. घरात संजय हा संयमित व शांतपणे विचार करणार माणूस होता. तोही ह्या घटनेने ढासळा होता. त्याची पत्नी मात्र रडत रडत बाबांना म्हणाली "काय बाबा, काय प्रसंग आणलात, तरी मी म्हणायचे मुलीला सारख सारख बाहेर नेऊ नका. दृष्ट लागली माझ्या मुलीला. तुम्ही आर्मीतले असून माझी पोर सांभाळता आली नाही ना?" अर्थात ते आईचे मन बोलत होते. आज पर्यंत ती बाबांना अस डायरेक्ट बोलली नव्हती. पण कोणत्याही आईसाठी अस दुःख हे अभाळा एवढ असत. त्यावर संजयने तिला गप्प करत म्हणाला संजना शांत हो, ही वेळ कोणाला दोष देण्याची नाही. आपली गौराई फक्त नदीत वाहत गेली, काय सांगावे ती कुणाला तरी मिळेल आणि आणून देईल.
घरी आलेल्या दोघांबरोबर संजय पोलीस स्टेशन मध्ये जाऊन रिपोर्ट करून आला. तिथे पोलिसांनी अशी माहिती दिली की वरच्या बाजूला असलेल्या धरण भागात खूप पाऊस पडल्याने व घोक्याच्या पातळीवर पाणी भरल्याने सरकारने त्याचे दरवाजे उघडण्यास सांगितले आणि नदीला पूर आला,आतापर्यंत अशा मिसिंगच्या ४/५ केसेस झाल्यात.
तो दिवस आणि रात्र भीमबाबा व कुटुंबासाठी काळ रात्र दिवस ठरली. कोणी कोणाशी बोलत नव्हते. शेजाऱ्यांनी त्यांच्यासाठी पीठल-भात करून आणला व बळेच त्याना खाऊ घातले. पोलिसांकडून शोध मोहीम चालू आहे असे वारंवार सांगण्यात आले. इतर सर्व पोलीस ठाण्याना ही घटना कळविण्यात आली. नदीत वाहून जाणारे कोणी व्यक्ती जिवंत किंवा मृत मिळाल्यास पोलिसांना कळविण्यास सांगावे अशी सूचना सर्वत्र दिली गेली.
दुसऱ्या दिवशी संजनाचे आई वडील व भाऊ भेटण्यास घरी आले. सगळ्यांनी हळहळ व्यक्त केली. त्यांनी 'काही नाही, मुलगी वाहून गेली आहे, आज ना उद्या मिळेल अशी समजूत संजना व संजय ची काढली. आई वडिलांना पाहून संजनाचा बांध तुटला व ती जोरा जोराने रडू लागली.आई वडील भाऊ तिची समजूत काढत होते. काही वेळाने संजनाने बोलू लागली. म्हणाली "गौराईचे बाबा जास्त लाड करायचे, सारखे सारखे बाहेर न्यायचे, पावसाळी दिवस पाहिला नाही. मिलीटरीचा माणूस.. पण काय झाले असे म्हणत" ओक्साबोक्सी रडू लागली. ती ह्या घटनेत बाबांना जबाबदार ठेवण्याचा प्रयत्न करत होती. संजयने तिला एक शब्द बोलू नको म्हणून तिला गप्प केले. तिचा भाऊही म्हणाला "नियातीने ठरविले तर आपण काय करू शकतो." तरी तिची बडबड व रडणे चालू होते. शेवटी भाऊ पुढे होऊन बोलला, "ताई असे घडणे कोणाच्या हातात नसते, प्रत्येकाचे प्रारब्ध सटवाई लिहून गेलेली असते." तो पुढे म्हणाला "गौराई दिड वर्षांची असतना तू माहेरी आली तेंव्हा तू चांदोबा दाखविण्यास टेरेसवर गेलीस तेंव्हा काय झाले होते माहीत आहे ना? तो भाऊ पुढे सांगनार, तेवढ्यात त्याच्या आईने त्याच्याकडे चूप,चूप म्हणून खूण केली, पण त्याचे लक्ष नव्हते, तो पुढे सांगू लागला, "गौराई गच्चीवरून तुझ्याच कडेवरून खाली पडली. पण खाली गवताच्या पेंढ्या असल्याने ती वाचली होती." त्यावर त्याची आई म्हणाली, "तुला काही कळतंय का ? कुठला प्रसंग कधी सांगयचा." त्यावर संजय एवढेच म्हणाला "अरे हे तर संजनाने मला सांगितलेच नव्हते पण इट्स ओके,असे म्हणत पुढे म्हणाला "म्हणून म्हणतो उगाच कोणाला दोष देऊ नकोस, घडणाऱ्या गोष्टी घडतात आपण फक्त निमित्त असतो." असे म्हणून तो विषय बंद केला. आणि संजनालाहीआपली चूक कळाली. ती बाबांना बोलली "बाबा मला माफ करा, मी नाही तर एक आईच मन बोलल अस समजा. मूल गमविण्याचे काय दुःख असते ते आईलाच माहीत असते म्हणून कदाचित मी भावनेच्या भरात बोलले असेल." तेंव्हा भीमबाबा म्हणाले "अग तुला माफ केले ग, पण मीच मला कसे माफ करू" असे बोलून खाली मान घालुन ते डोळे पुसू लागले.
असे दिवसा मागून दिवस गेले; पण गौराई काही जिवंत मिळाली नाही किंवा तिची बॉडी पोलिसांना मिळाली नाही. भीमबाबा आणि कुटुंबाची शोककळा संपता संपत नव्हती सर्वजण घरात जवळ जवळ निःशब्द होऊन रोजची कामे करत व वावरत होती. सगळ्याना ते घर ही एक निर्जीव वास्तू वाटू लागली. घरातील जिवंतपणा संपला होता.
ह्या घटनेला आता काही महिने झाले असतील. संध्याकाळी ऑफिस मधून आल्यावर संजयने, संजनाला, बाबांना, आईला एकत्र बोलावले आणि सांगीतले की मला एक गोष्ट सांगायची आहे. तो म्हणाला "मला बँकेत प्रमोशन मिळाले आहे. मला शहरात म्हणजे पुण्यात पोस्टिंग मिळाली आहे. तेंव्हा मी १० दिवसात तेथे कामावर रुजू होईल. तो पुढे म्हणाला सध्या मला बँकेतून राहण्यासाठी क्वार्टर मिळाले आहे. परंतु मी काही दिवसात बँकेतून लोन घेऊन पुण्यात स्वतःचे घर घेणार आहे. तेंव्हा आपण सगळे पुण्याला शिफ्ट होऊ. नाहीतरी गौराई गेल्याने हे घर सगळ्याना सुने सुने वाटत आहे. जणु काही घर खायला उठले आहे असे वाटते. आई बाबांना दोघांनाही सांगतो की तुम्ही ही तेथच राहायला या. तेथे सर्वांचे दुःख कमी होतील." त्यावर आई विचार करून बोलली "अरे बाळा, आम्ही इथेच राहतो. आम्हाला दुसरीकडे करमनार नाही. जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंत इथेच गावात राहू, हात पाय थकले की येऊ तुझ्याकडे पुण्याला. परत इथे आपली शेतीवाडी आहे." त्यावर संजय त्यांना म्हणाला "मला आणखी एक चांगली बातमी द्यायची आहे. संजना गरोदर आहे. आम्ही तुम्हाला सांगणारच होतो पण अचानक आपली गौराई आपल्याला सोडून गेली. त्या दुःखात ते सांगायचे राहून गेले." ही बातमी ऐकून आईबाबांचे चेहरे खुलले. संजय पुढे हे ही म्हणाला की "तशी ती बाळंतपणासाठी तिच्या माहेरी आईकडे जाईल. पण तुम्ही आलात तर तेव्हढीच मदत होईल" त्यावर आई म्हणाली "बाळा मदतीला मी केव्हांही येईल, पण कायमचे आम्ही इथंच राहू." बाबांनी पण डोलावून हो हो म्हणत त्यांची संमती सांगीतली.
आशा रीतीने संजना व संजय आता पुण्यात राहू लागले. बँकेतून कर्ज काढून पुण्या जवळील भागात कमी किमतीत मिळाला म्हणून दुमजली बंगला घेतला. संजयचा विचार होता की वरचा मजला योग्य भाडेकरू मिळाला की भाड्याने देता येईल म्हणजे त्याच्या कर्जाचे हप्ते निघून जातील.
संजना योग्यवेळी बाळंतीण होऊन तिला मुलगा झाला. त्याचे नाव 'गणेश' ठेवण्यात आले. आई बाबाच्या अधून मधून पुण्याकडे चकरा होऊ लागल्या. आता दोघांना गणेशचा लळा लागला होता. त्यामुळे ते निमित्त काढून जास्तीत जास्त दिवस पुण्यात जाऊ लागले. गणेशच्या आगमनामुळे आता गौराई गेल्याचे दुःख थोडे कमी झाले असले तरी पुरे पुसून गेले नव्हते आणि जाणार सुद्धा नव्हते. संजयच्या आईबाबानी आता पुण्यात संजयकडेच राहण्याचे ठरविले. त्यामुळे मुलाला व सुनेला आईबाबांची मदत मिळाली व त्यांना सुद्धा आपल्या नातवा बरोबर राहण्यात आनंद मिळत मिळू लागला. गौराईचे भीमबाबा म्हणजेच संजयचे बाबा-आई आता नवीन घरात रमू लागले होते. बाबा रोज सकाळ संध्याकाळी जेंव्हा वेळ मिळेल तेंव्हा पुण्यात फेरफटका मारत व येताना बाजारहाट आणून देत.
एकदा पुण्यात रस्त्याने जाताना एक इसम त्याच्यात पुढे आला आणि वाकून पायाला स्पर्श करत म्हणाला "सर नमस्कार." बाबांना समजले नाही की हे कोण गृहस्थ आहे. पण त्यांनी लगेच आपली ओळख सांगितली. "सर मी रामचंद्र. मी आर्मीत होतो. आम्हाला सुरुवातीला जे आर्मी तर्फे जे प्रशिक्षणत दिले गेले तेथे तुम्ही प्रशिक्षक होता. तुम्ही मला माझी शिस्तबद्ध कवायत व इतर कौशल्य पाहून सर्वांपुढे उभे करत आणि म्हणत "हा बघा माझा मुलगा कसा छान कवायत करतोय आणि इतरांना सांगायचे की हा करतोय तसेच मला तुमच्याकडून हवे."
आता बाबांच्या लक्षात आले. सिविल ड्रेस मध्ये त्यांनी रामचंद्रला ओळखले नाही, सैन्यात असताना रामचंद्रांची वारंवार भेट होई. तो एक कुशल सैनिक होता. वडील मुलाचं अदृश्य नात त्यांच्यात निर्माण झाले होते. बाबांना आता सर्व काही आठवले. ते म्हणाले " सॉरी, तुला सिविल ड्रेस मध्ये ओळखले नाही. तू इथे पुण्यात राहतोस काय?"
तेंव्हा तो म्हणाला "काय सांगू सर, सध्या मी वेगळ्याच टेन्शन मध्ये आहे. मी निवृत्त झाल्यावर इथे पुण्यात एका बँकेत सेक्युरिटी ऑफिसर म्हणून काम करतोय. पण रहायला इथून जरा लांब एका गावात आहे. रोज अपडाऊन करतो. पण आता वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. पत्नीला कॅन्सर डिटेक्ट झालाय. ती समोरच्या हॉस्पिटल मध्ये केमो (केमोथेरपी)चा उपचार घेत आहे. त्याला दोन तीन तास लागणार असल्याने मी औषधे इत्यादी खरेदीसाठी बाहेर पडलो आहे. उपचार झाला की मी गावी माझ्या घरी निघणार. असे बऱ्याच वेळा यावे जावे लागणार बहुतेक" हे सांगताना तो खूप दुःखी झाला. तो पुढे म्हणाला "सर, मी इथे आसपास भाड्याने जागा मिळतेय का पाहतोय. तुमच्या पाहण्यात आली तर जरूर सांगा. अरे पण हो तुमच्या बद्दल विचारायचे राहिले. तुम्ही इथेच पुण्यातच राहता का ? "
त्यावर बाबा म्हणाले अरे तुझे भाड्याच्या घराचे काम झाले असे समज. आजच मी माझ्या मुलाशी बोलतो. त्याचे जवळच दुमजली बंगला आहे. मी त्याच्याकडेच राहतोय. वरचा भाग भाड्याने द्यायचा आहे" असे म्हणून त्यांनी रामचंद्रांचा फोन नंबर लिहून घेतला. पुढे मुलाने म्हणजे संजयने, बाबांच्या ओळखीचा भाडोत्री मिळाल्याने होकार दिला. आता रामचंद्रांचे बिर्हाड; संजयच्या बंगल्यात, वरती भाडेकरू म्हणून राहू लागले. विशेष म्हणजे म्हणजे रामचंद्र व पत्नीला एक गणेश पेक्षा थोडी मोठी 'गौरी' नावाची मुलगी होती. तिचे व संजयच्या मुलाशी म्हणजे गणेश बरोबर खूप पटत असे. दोन्ही लहान मुलांना आता खेळण्यास, मस्ती , चेष्टा करण्यास सवंगडी मिळल्याने दोन्ही फॅमिली खूप आनंदात होती. गौरी आपल्या आईला आई म्हणून हाक मारत असे. तीला प्रश्न पडला की गणेशच्या आईला काय हाक मारावी. बाबांनी तो प्रश्न चुटकी सरशी सोडविला. ते म्हणाले "तीला तू 'मोठीआई' म्हणत जा." गणेश व गौरीचा दिवसभर घरात धुमाकूळ चाले. बाबांना तर गौरी नाव एकून आपल्या नातीची म्हणजे 'गौराई' ची आठवण होई व ते कधी कधी थोडे दुःखी पण होत. पण तात्पुरते. कारण आता गौरीने आता गौराई ची जागा भरून काढली होती. आपल्याला दुसरी नात दिली म्हणून त्यांनी देवाचे आभार मानले. नाहीतरी ते आर्मीमध्ये रामचंद्रचे कौतुक करताना प्रेमाने 'माझा मुलगा' कसा कवायत करतो ते पहा' असेच ते म्हणत होते. रामचंद्र आपला मानलेला मुलगा म्हणजे गौरी ही आपली दुसरी नातच आहे असे ते मानू लागले होते.
पण एक दिवस ह्या सर्वांच्या आयुष्यात पुन्हा एक मोठे वादळ आले. पण हे वादळ तसे सुखदायी होते तितकेच भावनेच्या लाटेवर हेलकावणारे होते.
बाबा रात्रीचे जेवण करून वर पहील्या मजल्यावर रामचंद्रकडे गप्पा मारत होते. काही वेळाने त्यांच्यात संजय ही सामील झाला. तसा रामचंद्र बायकोच्या चाललेल्या कॅन्सर ट्रीटमेंट मुळे थोडा दुःखी होता. संजय व रामचंद्र दोघे बँकेत असल्याने आणि बाबा आणि रामचंद्र आर्मी मध्ये होते म्हणून तिघांचे चांगले जमे. बोलता बोलता बाबांनी रामचंद्राला सहज विचारले, काय रे , तुझ्या पत्नीचे माहेर कुठले. गौरीचा जन्म सुद्धा तेथेच झाला असेल ना?
रामचंद्र सांगू लागला,"अहो बाबा,ती आम्हाला झालेली मुलगी नाही. ती दत्तक मुलगी आहे." त्यावर रामचंद्रने जे पुढे सांगितले ते ऐकून संजय आणि बाबा तर उडालोच. रामचंद्र पुढे सांगू लागला काही वर्षा पूर्वीची गोष्ट आहे मी नेहमीप्रमाणे सकाळी नदीच्या किनारी मॉर्निंग वॉक साठी गेलो होतो. नदीच्या दिशेने खालच्या बाजूला एक झाड खूप वाकले होते. कारण आदल्यादिवशी खूप पाऊस व वारा चालू होता. नदीला पूर आला होता. तेंव्हा मला त्या झाडावर कापड दिसले. मी कुतूहलाने जवळ गेलो तर काय एक लहान मुलगी फ्रॉक झाडाच्या फांद्यात अडकल्याने बेशुद्ध अवस्थेत लोंबकळत होती. मी तिला घरी आणली. डॉक्टरांना बोलाविले व त्यांनी हॉस्पिटल मध्ये नेऊन उपचार चालू केले. दुसऱ्या दिवशी ती बरीचशी शुद्धीत आली. आम्ही तिला नाव विचारले तेंव्हा ती बोबडे बोलात गवाई! गवाई ! असे काही बोलत होती." पुढे भीमबाबा अस काही बोलली होती"
एवढ रामचंद्रने सांगितल्यावर बाबा काही बोलणार इतक्यात संजयने त्यांना चूप अशी खूण केली व रामचंद्रांला " पुढे सांग" असे म्हणाला"
रामचंद्र सांगू लागला "आम्हाला डॉक्टरांनी सांगितले ही केस पोलिसांची आहे. तुम्ही हिला पोलिसांच्या ताब्यात द्या. मग आम्ही तेच केले. पुढे पोलिसांनी त्यांची कारवाई सुरू केली पण मुलीच्या पालकांचा पत्ता मिळाला नाही. आम्ही अधून मधून पोलिसांना विचारात होतो पण ते म्हणायचे अजून कशी तपास लागला नाही.
संजयची बाबा मध्ये काही बोलायचं प्रयत्न करत होते तेंव्हा संजयने पुन्हा त्यांना गप्प करत म्हणाला "बाबा थांबा, रामचंद्रला पूर्ण सांगू दे."
रामचंद्र पुढे सांगू लागला "नंतर असे कळाले की आम्हाला मिळालेल्या मुलीला तिच्या पालकांचा पत्ता न लागल्याने पोलिसांनी अनाथ आश्रमांत ठेवले आहे. तसे मला व माझ्या पत्नीला मुल-बाळ नव्हते. डॉक्टराकडून तपासणी केल्यावर त्यांनी सांगितले होते की काही शारिरीक त्रुटी मुळे माझ्या पत्नीला मुल होणार नाही. तेंव्हा आम्ही विचार केला की आपल्याला नदीतत सापडलेल्या मुलीलाच दत्तक घेतले तर! त्यासाठी पोलिसांच्या व अनाथालयच्या व इतर कायदेशीर बाबी पूर्ण करून तिला दत्तक घेऊन तिला घरी आणलं. ती लहान असल्याने तीचे नाव 'गवाई' सांगायची तेंव्हा आम्हाला वाटलं कदाचित ते गौरी असेल म्हणून तिचे नाव गौरी ठेवले.
आता संजय, संजयची बाबा सुन्न पडले. काही काळ
स्तब्धता पसरली. संजयच्या बाबांना हसावे की रडावे हे समजेना. बाबा सांगू लागले "अरे रामचंद्र गौरी तुला मिळाली तेंव्हा तिच्या अंगावर हिरव्या रंगाचा रेनकोट आणि लाल रंगाचा फुला फुलांचा फ्रॉक होता ना? त्यावर रामचंद्र घरात गेला व बॅगेतून रेनकोट व फ्रॉक काढून आणला व म्हणाला हो हे बघा, तुम्ही म्हणता त्या रंगाचेच हे कपडे तिच्या अंगावर होते. दत्तक घेण्यापूर्वीची आठवण म्हणून मी जपून ठेवले आहेत. बाबा पुढे म्हणाले "रामचंद्र हे सांग की गौरीच्या पाठीवर जन्म खून आहे व उजव्या कानाच्या मागे तीळ आहे का? हे ऐकून रामचंद्र आश्चर्यचकित झाला, म्हणाला हे सर्व तुम्हाला कसे ठाऊक?
तेंव्हा संजय त्याला म्हणाला "सांगतो, प्रथम तू पूर्णपणे काय घडले ते सांगितले ह्याबद्दल धन्यवाद. आता मी काय बोलतो ते शांतपणे ऐक " गौरी जे तिचे नाव 'गवाई' सांगत होती ते नाव गौराई अस होत. ती आमचीच मुलगी होती आणि तिने भीमबाबा म्हणून उलेख केला ते हे आमचे हे बाबा. ते ऐकून रामचंद्र उडालाच.
मग संजयने टप्या टप्याने कसे घडले ते सांगितले. ती बाबांच्या कडेवर असताना पुलावरून कशी पडली. ती बाबांना भीमबाबा का म्हणायची हे ही सांगितले. संजय पुढे म्हणाला "तेव्हाच पोलिसांनी इतर पोलीस स्टेशनला बरोबर माहिती दिली असती तर गौराई आम्हाला केव्हाच मिळाली असती. पण ते आमच्या हातात नव्हतं आणि नशिबात सुद्धा. आम्ही ती मेली म्हणूनच समजलो होतो. देवानेच तुझी भेट घडून आणली आणि तुला इथे आणल. पण लक्षात घे आम्ही तिच्यावर आता हक्क मागत नाही. ती तुमच्याच ताब्यात राहील. तेच कायदेशीर व माणुसकीला घरून असेल. तुम्ही तिचा सांभाळ केलाय. तुम्ही दत्तक घेतली नसती तर कदाचित आजही अनाथ आश्रमात खितपत पडली असती. तुमच्या रूपाने एक घर तिला मिळाले. तुमच्या पासून हिरावून घेऊन तुम्हाला आम्ही दुःखी करणार नाही."
नंतर संजयने विचार करून सांगितले "हे बघ रामचंद्र, आणि बाबा तुम्ही सुद्धा ऐका. "आता ही गोष्ट फक्त आपल्या तिघात ठेवा. घरात कोणालाच सांगू नका. गौरीला तर नाहीच नाही.आणि हो गणेशाची आई व गौरीची आई ह्यांना तर नकोच नको. स्रिया ह्या भावनिक असतात. मुलांच्या बाबत तर प्रचंड भावनिक असतात. मुलांचे व आईचे प्रेम व नात अतूट असते. त्यांना ही गोष्ट समजली तर गौरीच्या स्वामीत्वासाठी दोन आया मध्ये रस्सीखे सुद्धा होऊ शकते. त्यात गौरीची आई कॅन्सर सारख्या आजाराला झुंज देत आहे. तेंव्हा ही गोष्ट आपल्या तिघात ठेऊ आणि जेव्हा मुले सज्ञान होऊन आपल्या पायावर उभे राहतील तेंव्हाच ही गोष्ट दोन्ही आयांना आणि दोन्ही मुलांना सांगू. तोपर्यंत हयाबाबत त्यांच्या कोणत्याही भावनेला ठेस लागेल असे आपण काही बोलू नये अथवा करु नये."
संजयची हे विचारपूवर्क म्हणणे रामचंद्र व बाबा दोघानाही खूप पटले. बाबा तर म्हणू लागले, "आपली गौराई जिवंत आहे हे ऐकून माझ्या मनावरचे सगळे ओझे निघून गेले आहे. रामचंद्र सुद्धा माझ्या मुलासारखा आहे. मी तर म्हणेन रामचंद्र आता आपल्या फॅमिलीचा एक सदस्य बनला आहे. जोपर्यंत शक्य होईल तोपर्यंत त्याने इथेच रहावे."
रामचंद्र सुद्धा म्हणाला "संजयदादा बोलतोय ते बरोबर आहे. सध्या माझी पत्नी कॅन्सर सारख्या रोगाशी झुंज देत आहे. ती आताच हया रोगामुळे खचून गेली आहे. तिने गौरीला आतापर्यंत पोटच्या पोरी सारखे वाढविले आहे. गौरी बद्दलचे हे सत्य ती कसे घेईल किंवा सहन करीन हे माहीत नाही. संजयदादाचे जे म्हणणे आहे की गौरी सज्ञान व स्वतःच्या पायावर उभी होत नाही तो पर्यत दोघींना सांगू नयेन हे १०० टक्के बरोबर आहे. उगाचच भावनिक वादळ निर्माण व्हायला नको. मी शक्यतो इथेच राहण्याचा प्रयत्न करीन, म्हणजे दोन दोन आईचे प्रेम गौरीला मिळेल फक्त त्यांना आताच वस्तुस्थिती सांगायची नाही. गौरीला ही गणेश सारखा एक गोड भाऊ मिळाल्याने दोघांची बालपण आनंदात जाइल."
परंतु नियतीच्या हातात वेगळेच होते. रामचंद्रची पत्नी केमो थेरपीमुळे आधीच अशक्त झाली होती. पुढे तिची प्रकृती अचानक ठासळू लागली. तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले पण दुर्दैवाने तिचे निधन झाले. रामचंद्रावर दुःखाचा डोंगर कोसळला. रडणाऱ्या गौरीला बाबांनी जवळ घेऊन तिची समजूत काढत होते. मी तुझा भीमबाबा आहे ना, पोरी रडू नकोस म्हणत ते स्वतःचेच डोळे पुसत होते. भीमबाबा हे नाव ऐकून ती थोडी कावरी बावरी झाली, आणि तिने बाबांना मिठी मारली. घरातील सर्वांनी रामचंद्रचे सांत्वन केले आणि सांगितले "तू काळजी करू नकोस आमचे कुटुंब तुझेच आहे अस समज. संजना म्हणाली भावजी रडू नका आम्ही आहोत ना, तुमच्या गौरीला मी आईची माया देईन.
कालांतराने संजयने संजनाला 'गौराई' बाबत घडलेली संपूर्ण घटना सांगितली तेंव्हा तिचा आनंद तर गगनात मावेनासा झाला.
लेखक:- पी. बी. बुगदे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा