तो सहावी - सातवीत होता. दुपारची शाळा असे त्याची, नी घरी येईपर्यंत सहा होत असत त्याला. तो किल्लीने दरवाजा उघडे... बुट काढून जागेवर ठेवी... मोजे धुवायला टाके... दप्तर खुंटीला अडकवून ठेवी... हात - पाय - तोंड धुऊन तो कपडे बदलत असे. त्याचं हे इतकं करुन होईपर्यंत... त्याची शाळेत शिक्षिका असलेली आई येत असे घरी, साडे सहा दरम्यान.
सर्वात आधी कडकडून भेटत दोघं रोज. तो मग पाणी देई आईला... अगदी पाचच मिनिटं आई सोफ्यावर बसे. ते पाणी पिऊन झालेलं थंड रिकामं भांड, दोन्ही डोळ्यांना लावे ती. तेवढंच काय ते तिचं शिणवटा भागवणं असे. मग अजिबात न रेंगाळता, ती फ्रेश व्हायला जाई. बाहेरची साडी काढून, साधी घरातली साडी नेसे ती. दोन कप चहाचं आधण चढवे... तिच्यासाठी नी त्याच्या बाबांसाठी. बरोब्बर सात वाजता आई देवासमोर दिवा लावत असे... उदबत्ती ओवाळत असे... दोन - चार श्लोक म्हणत असे... उदबत्ती खोचून ठेवत असे उदबत्ती घरात. आणि तो मंद सुगंध घरभर पसरु लागलाच असे की, त्याच्या बाबांची ठरलेली बेल वाजे.
तो दार उघडे... बाबांच्या खांद्यावरची बॅग घेऊन, ती आत नेऊन ठेवे. बाहेर येतांना मग बाबांसाठी, पाण्याचा ग्लास घेऊन येई तो. बाबा एका घोटात, ते ग्लासभर पाणी पित असत. ते पितांना त्यांची मान वर वर जात असे, पण डोळे मात्र स्थिरावले असत त्याच्यावरच. त्याच गप्पा असत बाप - लेकानी मारलेल्या, एकमेकांच्या डोळ्यांतून. मग पुढचं सगळं ठरल्याप्रमाणे होत असे. आईचं स्वैपाक - पाणी... बाबांच्या बातम्या नी काही प्रोग्राम्स... आणि त्याचा अभ्यास. साधारण अकराच्या सुमारास, दिवे बंद होत असत. मग डोक्यावरुन ओढलेल्या पांघरुणातून त्याला ऐकू येत असत, आई - बाबांच्या गप्पा कुजबुजत मारलेल्या... त्यांचे महिन्याचे हिशोब, कधी जुळलेले... तर कधी फसलेले. असे त्याचे उगवलेले सगळे दिवस... मुंग्यांसारखे एका ओळीत चालत, मावळून जात.
पण... पण त्या दिवशी... त्या दिवशी त्याचे बाबा आलेच नाहीत. दिवेलागणीला अचूक घरी येणारे बाबा, दोनेक तास उलटून गेले होते वर तरी आले नव्हते. तेवढ्यात अचानकच कुठलासा जळका वास आला त्याला, आणि ऐकू आला आईचा कापरा आवाज पाठोपाठ... "देवासमोरचा दिवा विझला". प्रचंड घाबरले होते ते दोघंही. "आत्ता येतील, अडकले असतील कुठेतरी" असं मनाला समजावत पाह्यली जाणारी बाबांची वाट... फोलच वाटू लागली होती अचानक. अनोळखी रस्त्यावरुन एक वळंण लागावं... नी वळल्या वळल्या समोरच डेड एन्ड यावा, तसं काहीसं वाटलं होतं त्याला. मग त्याच्या आईने पदर खोचलेला... कसेतरी बांधलेले केस मोकळे करत, पुन्हा कसेतरीच बांधलेले. त्याचा हात पकडत... दोघांनी पायांत चपला सरकवल्या, नी बाहेर पडली होती ती दोघं. कुठे जाणार होते... कुठे शोधणार होते बाबांना कोण जाणे. रात्री नवाच्या सुमारास... उपाशी पोटी बाहेर पडलेले ते दोघे, अखेर सकाळी साडे पाच वाजता, घरी आले होते.
.
.
.
.
.
दोन बोटांत अडकवलेली सिगारेट संपून... तिचा चटका लागला त्याला, नी भानावर आला तो आठवणींतून. त्या दिवशी त्याने नी त्याच्या आईने... बाबांना शोधण्यासाठी केलेली वणवण, त्याला आज तिस वर्षांनीही जशीच्या तशी आठवत होती. डोळे भरुन आले त्याचे, नी त्याने आजूबाजूला पाहिलं... तो एकटाच होता CST स्टेशनवर. शेवटची गाडी चुकली होती त्याची... मोबाईल पुर्णपणे गेलं. मघापासून त्याला त्याचं लहानपण आठवण्यामागे, त्याचा हा हताशपणाच तर होता.
त्याची आॅफिसहून घरी परतण्याची वेळ ठरलेली नसे... आणि त्याच्या बायकोच्या परतण्याचीही. ज्या दिवशी दोघं वेळेवर येत घरी, तेव्हा एकतर दोघांत अजिबात संवाद नसे... किंवा मग भांडणच होत असत. त्यांचा सातवीतला छोकरा ही, खालीच कुठेतरी वेळ काढत असे मग. देवाला दिवा लावला जात नसे, अन् तसबिरींना रोजच्यारोज हारही घातला जात नसे. आई नी लेक जेवायला एकत्र बसत... नी लेकाकरवी सांगितला गेलेला "ताट वाढलंय" हा निरोप ऐकून... स्वतःचं ताट घेऊन तो, वेगळ्या खोलीत बसत असे. लेकाने त्याला आॅफिसमधून आल्यावर, कधी पाणी आणून दिलं नाही... की त्यानेही कधी बघितलं नव्हतं कौतुकाने त्याच्याकडे. रात्री झोपतांना मुलगा त्याच्या रुममध्ये झोपत असे... बायको त्यांच्या रुममध्ये... तर TV बघता - बघता तो, बर्याचवेळा हाॅलच्या सोफ्यावरच. एकंदरच बिकट अवस्था होती, त्याच्या सो काॅल्ड संसाराची. त्यामुळे ओला किंवा उबेर करुन... पाचशे - सहाशे खर्चुन ठाण्याला जाणं त्याच्या घरी, हे अजिबातच करावंसं वाटलं नव्हतं त्याला. कारण मुळात दोन्ही बाजूंनी, ओढ अशी नव्हतीच.
दिडच्या सुमारास स्टेशनवर येऊन बसला होता तो, आणि दोन तास उलटले होते एव्हाना. इतरवेळी स्टेशनवर न चालणारी सिगारेट, "यावेळी कोण विचारतंय" असा विचार करत, पून्हा शिलगावली त्याने. अर्ध्या तासांत आता पहिली ट्रेन येणार होती. "बायको नी लेकाला कळलं तरी असेल का, की मी घरी नाहीये"... हा विचार मनात येऊन, खिन्नपणे हसला तो मान हलवत. संपत आलेली सिगारेट त्याने जमिनीवर टाकून, पायाखाली विझवली. हळुहळु लोकं येत, तुरळक गर्दी जमली स्टेशनवर. पहिली ट्रेन आली... तो त्याच्या फर्स्ट क्लासच्या बोगीत जाऊन बसला... तासाभराने ठाण्याला उतरला. ठाण्याला नौपाड्याला रहाणारा तो, दोन नंबर प्लॅटफाॅर्मवर आला बाहेर पडण्यासाठी, आणि... आणि थबकलाच तो... हबकलाच... स्टेशनच्या बाकड्यावर बसलेल्या, त्याच्या बायको - लेकाला बघून. ते दोघेही झप्पकन उठले तो दृष्टीस पडताच. लेक धावत आला त्याच्याकडे, नी कडकडून मिठी मारली त्याने... त्याच्या बाबाला... पण ती जागेवरच उभी होती. पंजाबी ड्रेस, नी त्यावर अजिबात मॅचिंग नसलेली ओढणी घातलेली तिने... कदाचीत घरातून घाई घाईत बाहेर पडतांना, जी हाती लागली होती ती. केस चापात कमी अडकलेले, नी मोकळेच जास्त सूटलेले तिचे. लेकाच्या खांद्यावर हात ठेवत, तो चालत तिच्यापाशी गेला. तिने दोन्ही हातांच्या मुठी... मारल्या छातीवर त्याच्या, नी घट्ट मिठी मारुन त्याला... रडू लागली ती ओक्साबोक्शी. तिघंही एकमेकांना बिलगून, तिथेच उभे होते मग बराचवेळ.
.
.
.
.
.
अगदी त्या दिवशी सारखंच घडलेलं सगळं... हो... डिट्टो तिस वर्षांपुर्वीसारखंच. तिसवर्षांपुर्वी त्याच्या बाबांचीही, अशीच शेवटची गाडी चुकली होती... आणि ते ही असेच पहिल्या ट्रेन ने आले होते मग. फिर फिर फिरुन स्टेशनच्या बाकड्यावर येऊन बसलेले... तो नी त्याची आई. भरभरुन रडले होते आणि दोघेही, समोरुन येतांना दिसलेल्या त्याच्या बाबांना बघून. फक्त मिठी नव्हती मारली एकमेकांना, त्या काळानुरुप.
एक गोष्ट त्याला नक्की कळून चुकलेली एव्हाना... की नवरा - बायको - मुलांना भले वेळ नसेल हल्ली एकमेकांबरोबर घालवायला, आधीच्या पिढीसारखा. पण कोणी वेळेत पोहोचलं नाही घरी, तर मनापासून वाटणारी काळजी मात्र तेवढीच असते... आणि तेवढंच असतं मागोमाग दाटून येणारं प्रेमही.
त्याने आपले दोन्ही हात बायको नी लेकाच्या खांद्यावर ठेऊन, त्यांना घट्ट जवळ घेतलं. एकत्र चिकटून एकमेकांना... बाहेर पडले ते तिघं स्टेशनच्या, घरी जाण्याकरता. खरंतर... नव्याने 'दिवेलागण' झालेल्या, त्यांच्यातील नव्या नात्यासहं... 'त्यांच्या' घरी जाण्याकरता.
---सचिन श. देशपांडे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा