आपल्याला पडलेल्या पश्नांची उत्तर म्हणून आपण स्वतःच आत्मविस्वासाने त्यासाठी उभं रहायचं असत....❇️🌺🌹💐🚺🌻‼️
आयुष्यात कधी कधी असा एक काळ येतो, जेव्हा सगळीकडून रस्ते बंद झाल्यासारखे वाटतात. आपण कोणाकडे तरी आशेने बघतो, वाटतं की कुणीतरी येईल, आपल्याला या संकटातून बाहेर काढेल किंवा आपल्या प्रश्नांची उत्तरं देईल. पण खरं सांगू का? माणसं फक्त खांदा देऊ शकतात, चालायचं मात्र आपल्यालाच असतं. समोर प्रश्नांचा डोंगर उभा असताना, जेव्हा मदतीचे सगळे हात आखडते घेतले जातात, तेव्हाच माणसाला स्वतःच्या खऱ्या ताकदीची जाणीव होते. अशा वेळी रडत बसण्यापेक्षा किंवा नशिबाला दोष देण्यापेक्षा, एकच गोष्ट करायची असते आणि ती म्हणजे, उत्तर म्हणून स्वतःच उभं रहायचं असतं.
जग अनेकदा आपल्याला गृहीत धरतं. आपल्या क्षमतेवर शंका घेतं. कधी परिस्थिती आपल्याला गुडघ्यावर टेकवायचा प्रयत्न करते, तर कधी माणसं आपल्याला मागे खेचतात. अशा वेळी शब्दांनी उत्तरं देऊन काहीच साध्य होत नाही. उलट, आपण जितकं स्पष्टीकरण देतो, तितके आपण कमजोर भासतो. त्याऐवजी, आपलं अस्तित्वच इतकं प्रबळ करायचं की पाहणाऱ्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्या व्यक्तिमत्त्वातच मिळावं. संकट कितीही मोठं असलं, तरी ते आपल्या जिद्दीपेक्षा मोठं नसतं. जो माणूस स्वतःच्या पायावर ठाम उभा राहायला शिकतो, त्याला मग जगाच्या कुबड्यांची गरज उरत नाही.
स्वतःच उत्तर होणं म्हणजे काय? तर जेव्हा सगळीकडे नकार असतो, तेव्हा स्वतःमध्ये एक 'होकार' जिवंत ठेवणं. जेव्हा जग म्हणतं की "हे तुला जमणार नाही", तेव्हा शांतपणे आपल्या कामातून ते करून दाखवणं. आपण कुणीतरी वाचवायला येण्याची वाट बघतो, तिथेच आपण हरतो. त्यापेक्षा स्वतःचा रक्षणकर्ता स्वतःच व्हायचं. आपल्या आयुष्याची कथा आपणच लिहायची आणि त्यातला नायकही आपणच व्हायचं. शेवटी, ही लढाई कोणा दुसऱ्यासोबत नसतेच, ती स्वतःशीच असते. कालच्या 'मी' पेक्षा आजचा 'मी' किती खंबीर आहे, हेच महत्त्वाचं असतं. त्यामुळे आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आला, तरी डगमगू नका. डोळ्यांत जिद्द आणि मनात विश्वास ठेवा. जगाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या कृतीतून मिळू द्या. कारण आयुष्याच्या या खेळात, जेव्हा पर्याय संपतात, तेव्हा खंबीरपणे स्वतःच एक उत्तर बनून उभं राहणं, यातच खरं जगणं आहे.
संकटं प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, पण काही माणसं त्या संकटांनी मोडून पडतात, तर काही माणसं त्याच संकटांना उत्तर म्हणून खंबीरपणे उभी राहतात. तुमच्या संघर्षाच्या काळात तुम्हाला 'उत्तर' म्हणून उभं राहण्यासाठी कोणत्या विचाराने किंवा व्यक्तीने सर्वात जास्त बळ दिलं? कमेंट मध्ये नक्की सांगा.
या जगात दोन प्रकारची माणसं आपल्याला दिसतात, भेटतात व वेगवेगळे अनुभव देऊन जातात. चांगली आणि वाईट. यातल्या चांगल्या माणसासाठी जग थांबलेलं असतं. आपल्याकडे खरोखरच ताकद असेल एखादा निर्णय घेण्याची, तर आपण थांबण्याची गरज नाही. आपल्या आयुष्यात कधी निराशा येणार नाही. आपली जर लायकी असेल, तर आपलं श्रेय आपल्याला दिल्याशिवाय कोणत्याही संघटनेला गत्यंतरच नसतं. कारण लायक लोक मुळातच या जगात फार कमी असतात. निर्णय घेऊ शकणारे, संघटना करणारे, जमवून घेणारे, एकमेकांशी चांगले वागणारे लोक कमी असतात. त्यामुळे समाजाला त्यांची अत्यंत गरज असते. पण आपण जर आपल्या बद्दलच्या अवाजवी अपेक्षा बाळगल्या , तर निराशेशिवाय आपल्या पदरात काही येणार नाही.
कोणत्याही गोष्टीची किंमत फक्त दोनच वेळी कळते. जेव्हा ती मिळत नाही आणि जेव्हा ती हरवते त्या दरम्यानच्या काळात तिची किंमत कळत नाही. तुमच्याकडे जे आहे, त्याबद्दल कृतज्ञ रहा आणि तक्रार करणे थांबवा. हे तुमचे तक्रार करणे इतर सर्वांना कंटाळा देते, हे तुम्हाला चांगले नाही व त्यामुळे समस्येचे समाधानही होत नाही. अहंकार आणि गैरसमज यामुळे माणुस महत्त्वाच्या गाेष्टीपासून दूर राहताे. गैरसमज सत्य ऐकू देत नाही, आणि अहंकार सत्य पाहू देत नाही. चुकीचा माणूस आपल्याशी कितीही गोड बोलत असला तरी एक दिवस तो आपल्यासाठी आजार बनेल. पण चांगला माणूस कितीही परखड बोलत असला तरी एक दिवस तो आपल्यासाठी औषध बनू शकतो. निवड आपल्या आपल्या सुजाणतेवर अवलंबून आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात. फरक फक्त इतकाच आहे. जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते.
आंधळा माणूस एका मंदिरात गेला, मंदिरात दर्शन घेत असलेले लोक त्याला बघून म्हणाले, दर्शनाला आलाय देवाला बघु शकणार का? आंधळा म्हणाला, काय फरक पडतोय माझा देव तर मला पाहतोय ना. दृष्टी नाही तर दृष्टीकोन चांगला पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा