मंगळवार, १० फेब्रुवारी, २०२६

2587. कॅाफीचा कप

 दोन वर्षापूर्वीची गोष्ट ! माझ्या अमेरिकेतील ईस्ट लाईम नावाच्या गावात घराजवळच चालण्यासाठी उत्तम ट्रॅक आहे. विटकरी रंगाचा ! त्याच्या आजूबाजूला असलेल्या लाल मेपल, शुभ्र ओक, ब्लॅक बर्च सारख्या उंच झाडांनी सजलेला. नटलेला ! नेहमीप्रमाणे मी तिथे चालायला गेले होते. हवेत खूप गारवा होता. तासभर चालून झाल्यावर रस्ता क्रॅास करून समोरच्या मेकडॅानल्डस् मधे जाऊन काहीतरी गरम प्यावं असा विचार मनात आला म्हणून चालता चालता तिकडे गेले. गाडी ट्रॅकजवळील पार्किंग लॅाटमधे पार्क केली होती.
    आत जाऊन कॅाफी ॲार्डर केली व लक्षात आलं की पर्स गाडीत राहिली आहे. खिशातही पैसे नव्हते. गाडी जिथे पार्क केली होती तिथं चालत जाण्यास मला १५-२० मिनिटं लागणार होती. होजे नावाचा माणूस माझी ॲार्डर घेत होता. त्याला म्हटलं, “माझी गाडी ट्रॅक जवळ पार्क केलेली आहे. त्यातून मी पर्स घेऊन येते व परत ॲार्डर देते.”
होजेनं ॲार्डर तशीच ठेवली..”डोंट वरी अबाऊट इट ! गारवा वाढला आहे बाहेर ! आज तुला माझ्याकडून कॅाफी ! मी तुला ट्रॅकवर चालून इथे कॅाफी घ्यायला येताना खूप वेळा बघितलय.” त्यानं गरम वाफा येणारी कोलंबियन कॅाफी मला आणून दिली.. कॅाफीचा सुगंध मन सुखावून गेला.. 
मी त्याचे मनापासून आभार मानले. कॅाफी पिऊन गाडीकडे गेले. पर्स घेऊन मेकडॅानल्डस् मध्ये आले व कॅाफीचे पैसे देऊ केले. “नो नो नो - कॅाफी वॅाज ॲान मी..”होजेने पैसे घेतले नाहीत. मी बाहेर पडताना होजेच्या मॅनेजर जवळ त्याचे कौतुकही केले.. 
    काळा वर्ण, अतिशय सडसडीत अंगकाठी व प्रसन्न हास्य असलेल्या होजेबद्दल मला कुतूहल वाटलं. पुढच्या वेळी होजे भेटला तेव्हा त्याची मी चौकशी केली..”दिवसभर काम करून मी रात्री कॅालेजला जातो. बायको, दोन मुलं, व आई आहे घरी..पैसा पुरत नाही तरीही मी कॅालेजला जायचं ठरवलय कारण आत्ता त्रास झाला तरी नंतर चांगली नोकरी मिळेल.”
“छान !! काहीही करून कॅालेज संपव. अनेक स्कॅालरशिप असतात. मदत लागली तर सांग. नोकरी, मुलं यातून अभ्यासाला वेळ झाला नाही तरी सोडून देऊ नको.” माझ्यातील शिक्षिका बोलली. 
साधा वेटर..मिनिमम वेज वर काम करणारा..पण खरंच..
“देणं” पैशाच्या श्रीमंतीवर अवलंबून नसतं. मनाच्या श्रीमंतीवर अवलंबून असतं हे मला आजवरच्या अनुभवाने माहिती होतं.
दोनच महिन्यात ख्रिसमस आला. त्यावेळी मी त्याला पाकिटात पैसे घालून भेट दिले. तो नाही म्हणत होता तरी मुलांसाठी काहीतरी घे म्हणून त्याला मी ती भेट घ्यायला लावली.
ख्रिसमसनंतर दोन महिने खूप बर्फ पडल्याने मी ट्रॅकवर चालायला गेले नव्हते. हवा सुधारताच मी नेहमीप्रमाणे ट्रॅकवर गेले. हवेत हलकसं धुकं होतं ! मंद वारा होता. मेपल, ओक, बर्च तसेच ध्यानस्थ ऋषी- मुनींसारखे उभे होते! चालून झाल्यावर मी कॅाफी घेण्यासाठी मेकडोनल्डस् मध्ये गेले. आत जाताच काउंटरवर एक नवीन मुलगी दिसली.
“होजे दिसत नाही आज?” मी इकडेतिकडे बघितलं. 
ती मुलगी हसली. “ओह, यू मस्ट बी द वॅाकिंग लेडी, मिसेस रानडे !” होजेने तुमच्याबद्दल सांगितलं मला..मी होजे ची बायको रोझ ! त्याला गेल्या महिन्यात एक मोठी स्कॉलरशिप मिळाली. तो आता फुलटाईम कॅालेज करत आहे.. मजेशीर गोष्ट काय माहिती आहे? ज्या दिवशी त्याने तुम्हाला फ्री कॅाफी दिली. त्याच दिवशी त्याने स्कॉलरशिपसाठी अर्ज केला होता. स्कॅालरशिप मिळताच त्याला वाटतं की जेव्हा आपण इतरांसाठी काहीतरी करतो तेव्हा सर्वप्रथम देव आपलंच भलं करतो !” रोझ चुणचुणीत होती. 
मी ऐकत राहिले.. “तुम्ही ख्रिसमसला दिलेली भेट फारच कामी आली. मुलगा लेगो सेट पाहिजे म्हणून हट्टास पेटला होता पण आमच्याकडे खेळणी घेण्यासाठी पैसे नव्हते. तुम्ही दिलेल्या पैशातून लेगो सेट व मुलीचा ड्रेस आला..मुलं खूष झाली.. आईसाठी पण पर्स घेतली.. ती लेडी पैशापेक्षाही गुडलक घेऊन येते आपल्यासाठी.. म्हणाला होजे” तिनं मी विकत घेतलेली कॅाफी आणून दिली. मी समाधानाने बाहेर पडले..
   काही महिन्यांनी वॅालमार्टला गेले तेव्हा अचानक होजे दिसला ! कडक इस्त्रीची पॅंट, पांढरा शर्ट व टाय लावून उभा होता. मला बघून घाईघाईने पुढे आला.“व्हॅाट अ सरप्राईज ! हाऊ आर यु? हल्ली वॅालमार्ट मध्येच कॅफे आहे ! तिथे पंधरा मिनिटांनी जाऊया का..माझा कॅाफी ब्रेक आहे वीस मिनिटांचा!” मी होकारार्थी मान हलवली..
होजे माझी कॅाफी घेऊन आला..”मॅनेजर झालोय आता वॅालमार्टमधे..डिग्री संपत आल्याने ! बरा पैसा मिळतो. तुम्ही जाता का रोज चालायला?” होजेला काय विचारू काय नको झालं होतं.. 
“हो जाते ना बरेचदा. मुलं कशी आहेत? रोझ कशी आहे?” मला कुतूहल होतं.. 
“मॅम, मला पहिल्यांदा तुम्हाला काही सांगायचंय. त्या दिवशी तुम्ही पर्स विसरलात म्हणून मी तुम्हाला फ्री कॅाफी दिली पण त्यात माझा काही मोठेपणा नव्हता. तुम्ही येण्यापूर्वी माझा बॅास मला वेडंवाकडं बोलला होता. तुझी कस्टमर रिलेशन्स चांगली नाहीत वगैरे म्हणाला. त्याला दाखवण्यासाठी मी तुम्हाला फ्री कॅाफी दिली. तुम्ही बॅासजवळ माझं कौतुक पण केलंत. पण कॅाफी देण्यात माझा स्वार्थ होता. त्यात मनाचा निर्मळपणा नव्हता.” होजेच्या आवाजातला प्रामाणिकपणा मला जाणवला.. 
“होजे, इटस् ओके. माणूस स्वत:साठीच सारं काही करत असतो. हा जगाचा नियम आहे. त्यात तुझी फारशी चूक नाही.” मला त्याचं वागणं अक्षेपार्ह वाटलं नव्हतं..
“नाही मॅडम! जे देतो दुसऱ्याला ते देताना मन शुध्दच हवं.. आपला फायदा तोटा बाजूला ठेवून ते करावं..आणि जे द्यायचं ते लहान असो वा मोठं असो..उत्तमच असलं पाहिजे..आपल्याला जमेल तेवढं उत्तम असंच द्यावं.. आज मला तुम्हाला सगळं सांगितल्यावर बरं वाटलं.. 
माझ्या डोळ्यासमोर क्षणभर कठोपनिषदातील नचिकेत येऊन गेला..वाजश्रवास, आपल्या वडीलांना दानात ढोंगीपणा नसावा हे सांगणारा व त्यासाठी यमलोकी पोचून मृत्युचं रहस्य विचारणारा. होजेला हे तत्वज्ञान कोणी शिकवलं असेल असं नक्कीच वाटून गेलं.
आठवड्यापूर्वी परत होजे दिसला. सहकुटुंब सहपरिवार. मी त्याची माझ्या यजमानांशी ओळख करून दिली. खर सांगतो..तुमच्या बायकोने मला गुडलक आणलं असे त्यांना म्हणाला. मुलं गोड होती..रोझ पण खुषीत होती. सगळं व्यवस्थित चाललेलं बघून मला खूप आनंद झाला होता.. 
होजे व कुटुंबाला भेटून घरी परतताना माझ्या मनात एकच विचार होता..दान हे केवळ वस्तूचं नसतं..ते मनाच्या अवस्थेचं प्रतीक असतं. त्या विचारसरणीचं द्योतक असतं..
त्या दिवशी मला जाणवलं..
 एक साधा कॅाफीचा कप..दोन अनोळखी जीवांना जोडून गेला..
एक साधा कॅाफीचा कप.. आयुष्याचे हजारो कंगोरे दाखवून गेला..
एक साधा कॅाफीचा कप ..प्रामाणिकपणा दाखवून गेला..
आणि 
एक साधा कॅाफीचा कप “जे देतो ते उत्तमच द्यावं… आणि मन शुद्ध ठेवून द्यावं.” असं गहन तत्त्वज्ञान शिकवून गेला.. 

©® ज्योती रानडे
2025 JyotiRanade. All rights reserved.
सत्य घटनेवर आधारित

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...