मंगळवार, १० फेब्रुवारी, २०२६

2570. क्षण

 प्रशांतने आज मोग-याचा गजरा आणला होता. बेल वाजताच प्रज्ञाने दार उघडले आणि रोजच्या सवयीप्रमाणे परत त्याच्यासाठी पाणी आणायला स्वयंपाकघराकडे वळली. तितक्यात प्रशांतने हिंदी मुव्हीतल्या हीरो प्रमाणे प्रज्ञाला पाठीमागून गच्च मीठी मारली.
प्रज्ञाला ह्याची सवयच उरलेली नव्हती. तिला 'काय चालले'? हे कळलंच नाही आणि गांगरलेल्या अवस्थेत तिने विचारलं, "अचानक असं?.
"नाही वागु शकत का?" तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच उलट प्रश्न प्रशांतने विचारला.     
प्रशांत ने जरी गजरा आणला तरी त्याच्या डोळ्यात उदासी स्पष्ट झळकत होती. 
प्रज्ञाला नीटसा अर्थबोध झाला नाही. ती, "चहा ठेवते" म्हणत तिथून निघाली.
प्रशांतला आज हाततोंड धुवून फ्रेश होण्यातही इंटरेस्ट नव्हता. काहीतरी होतं जे त्याला आतून पोखरत होतं.
जबरदस्तीने तोंडावर पाणी मारून तो बेडरूमच्या खिडकीतून बाहेर बघत बसला होता. आज मुले संध्या मावशीकडे राहायला गेली होती. शाळेतून परस्पर त्यांना काकांनी नेले होते आणि उद्या रविवार असल्याने तिकडेच राहणार होते. चहाला उकळी फुटली आणि मंद सुवास दरवळला. तिच्या नाकातून वाफ मेंदूपर्यंत गेली. विचार धावू लागले.
आज काय झाले? असा प्रशांत सांगूनही गजरा आणत नाही. तिला आठवलं गेल्या सोमवारी तिने तसं सांगितलं तर तो भनकला होता.
"काय असतं तुम्हा बायकांचं? बाजारात जातेस ना? घेऊन यायचं ना मग स्वतःसाठी. पैसे असतातच ना!"
प्रशांत आपल्या नावासारखाच होता. जरी हृदयात प्रेम होते तरी ते खोल दडलेले होते. सागराच्या पोटात काय नि् किती दडलेले हे कुणीतरी आजपर्यंत पाहू शकलं का? मग प्रशांत तो. त्याचं तरी कसं कळणार? त्याचे ते सगळे शब्द जसेच्या तसे तिच्या मनपटलावर येऊन भांडत होते तोवर चहा जास्तीचा घोटला गेला.  दोन कप भरून ती सरळ बेडरूम कडे वळली.
प्रशांतचे लक्ष नव्हतेच. तिने आत येताच "चहा घे"  म्हणत
त्याच्या खूप जवळ जाऊन उभी राहिली. पण हा तंद्रीतच..
प्रज्ञाच्या मनात असंख्य विचार क्षणार्धात येऊन वादळ आणून गेले. ह्याची नोकरी गेली असेल का? कुणाची वाईट बातमी असेल का? माझ्या माहेरी सगळे सुखरूप असतील ना? एक ना दोन असे हजार प्रश्न मुंग्या चालतात तशा तिच्या मनावर चाल करून गेले. स्वतःला सावरत ( हे स्त्रियांना पटकन जमतं. तेव्हाच तर एका रात्रीत त्या दुस-याच्या आई-बाबांना स्वतःचे आई-बाबा मानायला तयार होतात.)
ती प्रशांतचा हात हातात घेऊन म्हणाली, "काही टेंशन आहे का? हे बघ ! नोकरी जरी गेली ना तरी असा मानसिक खचू नको. मी आहे ना तुझ्यासोबत. काहीही झाले असले तरी आपण मिळून रस्ता शोधू. काय झालं? ते तर सांग."
एका दमात ती सगळं बोलून गेली, काहीच विषय माहित नसताना.
पण "मी आहे ना तुझ्यासोबत" हे वाक्य ऐकताच प्रशांत तुटला. त्याच्या मनात उठलेल्या वादळाला जणू एक दिशा मिळाली. 'काळिज पिळवटणा-या भावनांना शब्दांचा आधार दिला तर काहीतरी गवसेल' हा मार्ग मिळाला. आता त्या भावना उफाळून आल्या होत्या.  भरतीच्या वेळी कुठं स्वतःवर ताबा ठेवता येतो प्रशांताला?
त्याच्या डोळ्यात पाणी तरळले. प्रज्ञाने त्याला बेडवर बसवून त्याचं डोकं स्वतःच्या छातीवर ठेवत म्हणाली, "तुला बघून त्रास होतोय रे. नको असा गप्प बसू.  संवादाने मोठमोठे वाद मिटतात तर तुझी समस्या नाही का मिटणार?"
अगं आज ते आॅफीस जवळच राहणारे मि. गाडगीळ गेले. सकाळीच माझ्याशी बोलले आणि संध्याकाळी बाहेर पडलो तेव्हा त्यांच्या हॉटेल समोर  गर्दी होती. विचारलं तर.......
हिने कधीच गाडगीळांचं नाव  ह्याच्या तोंडून ऐकलं नव्हतं.
गेलेल्याचं दुःख स्पष्ट ह्याच्या चेह-यावर दिसत असताना ह्याने गजरा का आणला?
विचार करून करून पार मेंदुचा भुगा व्हायची वेळ आली.
"खूप कमी वय होतं का?"
"नाही गं. तसं नाही. साठच्या आसपास असतील...."
"अरे ! इतका हळवा का होतोस? हार्ट अॅटकने संपलं असेल?"
(रोज मिडिया वर सिरीयल्स मध्ये इतके मृत्यू बघून भावना मेल्यात सगळ्यांच्या. तो यमदूत ही वर बसून विचार करतोय, हल्ली त्याला कुणीच घाबरत कसं नाही?)
प्रज्ञाच्या बोलण्यावरून स्पष्ट होत होतं की त्याच्या मृत्यूचं ह्याने का  टेंशन घेतलं?
तो मात्र आतून गुदमरत होता. आता जर बोलला नसता तर नक्कीच हार्ट अॅटकने गेला असता. 
आपल्या भावनांना त्याने भाषेचे, शब्दांचे लेप लावत जखमांना भरण्याचा प्रयत्न केला. मूक भावनांना शब्दांचा स्पर्श होताच त्या गहिवरल्या आणि मुलायम बनत त्या मनाला कुरवाळत बोलू लागल्या. त्याच्या डोळ्यासमोर सकाळची सकाळ जशास तशी तरळली. आज घरातून डब्याची पिशवी आणि फाइल्स सांभाळत हा आॅफीस मध्ये जात असताना त्याला मि. गाडगीळ भेटले होते. भारतीय स्वभाव,  प्रत्येकाशी सहज संवाद साधण्याचा त्याच्यातही होताच.
"काय काका कसं चाललंय? काकूंची तब्येत बरी का आता?"
गाडगीळ म्हणाले होते की, 'ते उद्या खंडाळ्याला जात आहेत.'
प्रशांत त्यांची विनोदाने खील्ली उडवत म्हणाला, "अरे व्वा ! आता म्हातारपणात मज्जा करायची तर"......
मि. गाडगीळ खुप छान उत्तरले होते. 
अरे ! आईचं आजारपण आणि मुलांचं संगोपन, कामाचं दडपण आणि मुलांसाठी जमवायचं होतं धन.
ह्या सगळ्यात तिच्यासाठी वेळच काढला नाही. मागच्या महिन्यात आजारी पडली तेव्हापासून खिन्न राहते. मुलं आपापल्या संसारात व्यस्त आहेत. म्हटलं आतातरी आपण स्वतःसाठी, तिच्यासाठी जगावं.
"व्वा व्वा छान. मस्त या फिरून."  म्हणत प्रशांत आपल्या कामात रमला.
खरंतर गाडगीळांचं बोलणं त्याला तंतोतंत पटलं होतं. 'किती सुंदर विचारधारा' असं तो मनातल्या मनात मनाला समजावून सांगत होता. पण हे सारं वरवरंच राहिलं. आवडलेला विचार हा मेंदूत ठेवून स्मरणशक्तीच्या कप्यात बसवणा-या अनेक महाभागांपैकी प्रशांत ही एक निघाला. हा विचार मेंदू ऐवजी हृदयात बसवून जर परिवर्तन करण्याचा निश्चय केला असता तर योग्य वळणावर जीवन गाडी धावली असती. पण तसं काही झालं नाही. प्रशांत ने त्या विचाराला शाबासकी देत हुलकावलं आणि कामात गुंग झाला.
सात तासानंतर ही बातमी त्याला मिळाली आणि तो पुरता भांबावला. त्याच्या डोक्यात एकच विचार होता, तो म्हणजे जे गाडगीळ बोलले ते त्याला जीवन जगण्याची कला शिकवून गेले. 
त्याला गेल्या सोमवारी तो प्रज्ञावर  कसा ओरडला?  हे आठवलं. आपण तिच्याकडे दुर्लक्ष करत तिच्याच सुखासाठी पैसा कमावतो म्हणत तिला सुखापासून लांब ठेवतो हे प्रखरतेने जाणवलं. 
अगदी फुलांच्या बागेत राहून गंध न घेताच ती फुले निर्माल्यात जमा होतात तसेच काहीसे आपण जिवनाचे करत आहोत हे त्याच्या मेंदूला कळत होतं. 
फक्त कळलं नव्हतं तर आता ते वळलं सुद्धा. त्याचे पाय आपसूक फुल वाल्याकडे वळले. आणि तो मोगरा साक्ष होता त्याला सुखाची गुरुकिल्ली सापडल्याची.
भरलेले कप तसेच पडले होते. पण प्रशांत रिता झाला.
मन रितं होत असताना 'रितं होण्यात एक वेगळाच आनंद असतो'  हे तो अनुभवत होता.
मग प्रज्ञाचा चेहरा आपल्या ओंजळीत भरून मन मोकळे करत म्हणाला, "प्रज्ञा! जीवन वाळूच्या कणा प्रमाणे आहे . कितीही घट्ट पकडले तरी क्षणात ते क्षण निसटतात.
चुटकीसरशी आपलं जीवन संपतं आणि जगायचं राहून जातं."
मि. गाडगीळ गेलेत पण खरं सांगतो, त्या क्षणी त्यांनी क्षण जगून घ्यायचे... अगदीच न पळता... जरा थांबून जगायचे हे शिकवून गेले.
अगं  सुखासाठी पैसा हवा पण पैसा आल्यावर आपण पैश्यामागे पळतो आणि सुख बाजूला पडते. गाडगीळ पण आता सुखाने राहायचं, स्वतःसाठी जगायचं म्हणत होते पण वेळ संपली हे त्या़ंच्या गावीही नव्हतं.
प्रत्येक छोट्या गोष्टीत हे सुख पहुडलेलं असतं फक्त ते आपण नजरेआड करतो. 
अगं तुला साडी किंवा सोन्याची हाव कधीच नव्हती. फक्त मोग-याची ती छोटीशी फुले देखील आपला संसार गंधाळायला पुरेसी होती. पण मी तितकही करु शकलो नाही. मला माझीच लाज वाटते.
प्रज्ञा ने आपले हात त्याच्या पाठीवर थोपटत त्याचे स्पर्शानेच सांत्वन केले.
अरे! कामाच्या व्यापात विसरतोस तू आणायला फुले. मी पण ना उगाच हट्ट करते.
पण एक मात्र खरं की कितीही कामे असली तरी मिळेल तेवढ्याच वेळात एकमेकांची प्रशंसा किंवा केलेल्या कामाची योग्य शब्दात पावती द्यायचीच. 
असं बोलताना तिच्या डोळ्यात वेगळीच चमक होती. 
ती दिलखुलासपणे म्हणाली, "तुला वेळ नाही असं मी नेहमी रडगाणे गाते पण माझंही चुकतं रे. तू आल्यावर काय काय घडलं दिवसभरात आणि किती कामे झाली किंवा किती कामे राहिली विचारायची तसदी घेत नाही. खरंतर ह्या संवादातून आपण एकमेकांच्या समस्या जाणत योग्य साथी बनू शकतो.
      प्रशांत आता शांत झाला होता. वादळ शमले होते. सगळी सृष्टी लखलखीत झाली होती. नेमकी वाट आणि चालण्याचा थाट गवसला‌ होता. गाडगीळ गेले पण सहज बोलण्यातून प्रशांतला जगण्याचा महामंत्र देऊन गेले. जिच्या सोबतीने आपण संसाराच्या झळा सोसण्यात तरबेज होतो तिच्या भावनांना योग्य वेळी योग्य मान देण्यातच खरा पुरुषार्थ आहे हे त्यांनी प्रशांतच्या हृदयात उतरवलं. त्या सहज बोलण्याच्या एका क्षणामुळे त्याला जीवन वाट गवसली अगदी प्रेमात चिंब झालेली. जगण्याच्या अर्थाचे मोठमोठाले फलक लावलेले गवसले त्याला ह्या वाटेवर. ते एकमेकांच्या मीठीत होते आणि सूर्यास्ताचा सूर्य खिडकीतून संधीप्रकाश त्या दोघांवर टाकत चालला होता. भास्कराने आपली सारी ऊर्जा आज प्रशांत आणि प्रज्ञावर उधळली होती. पश्चिमेला जात होता  परत सकाळी नवी उर्जा घेऊन परतण्यासाठी.  आजचे ते अनमोल क्षण जीवनभर त्यांना आनंद देणारे ठरणार होते. ते क्षण कणाकणात आनंद आहे हे सांगत होते आणि हेच क्षण नेमके दोघांना वेचता आले. हे उमगण्याचे क्षण जर चुकले असते तर मात्र प्रशांतही दुसरा गाडगीळ बनत जीवन न जगताच  संपला असता.

दीपा बंग

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...