तशी रानातली माती अजून जरा ओलसर होती. आनं पहाटेच्या गार वाऱ्यात धुकं जमिनीवर झुकून बसलेलं. सावित्री बैलजोडीच्या गळ्यात दाव बांधत होती. तिच्या हातात ताकद होती, पण मनात अस्वस्थता. आज शाळेत जायचं होतं. गुरुजी काल म्हणाले होते,
“उद्या वह्या घेऊन ये, तुला पुढच्या वर्गात बसवतो.” पण वह्या घ्यायला घरी पैसं कुठं होतं. आई रोज भांगलायला जात होती. बाप दिवसभर शेतात राबायचा, संध्याकाळी हातातली सगळी कमाई दारूत घालायचा. बैलजोडीचं पोट भरत भरत घरचं पोट रिकामंच राहत होतं.
सावित्री तशी हुशार होती. आकड्यांत पटाईत, वाचनात तरबेज. पण हुशारीचं मोल दारिद्र्याला कधीच नव्हतं.
दुपारच्या उन्हात ती रानात वखरं चालवत होती. घामानं अंग भिजलं होतं. नांगर धरलेले हात थरथरत होते, तेवढ्यात बाप आला. चेहऱ्यावर आज वेगळंच समाधान होतं.
“सावित्री आज लवकर घरी ये,” एवढंच म्हणाला.
त्या शब्दांत काहीतरी दडलंय हे तिला कळलं, पण तिनं विचारलं नाही.
त्या दिवशी संध्याकाळी घरात पाटील, दोन वयस्कर माणसं बसली होती. सावित्री कोपऱ्यात उभी होती. आईचं डोकं खाली, बाप गप्प.
“पोरगी आता मोठी झाली. घर सावरायचं तर हिचं लगीन केलं पाहिजे,” पाटील ठामपणे म्हणाला.
सावित्रीनं पहिल्यांदाच धीर करून बोलण्याचा प्रयत्न केला, “माझी शाळा अजून बाकी हाय.” त्यावर पाटलानं हसत उत्तर दिलं,
“लेकी शाळा पोरांसाठी असते. पोरींन काय शिकायचं?”
दोन दिवसांत लग्न ठरलं. कुठलाच थाट नव्हता. उलट बापालाच चार हजार रुपये मिळाले. त्या पैशातून घरासाठी नवं सामान घेतलं गेलं.
त्या दिवसापासून सावित्रीचं आयुष्य मात्र पूर्णपणे बदलून गेलं.
सासरी गेल्यावर कामांचा डोंगर तिच्यावर कोसळला. पहाटे उठून जनावरं, मग रान, मग घर. नवरा तसा वाईट नव्हता, पण सासऱ्याच्या शब्दाबाहेर जाण्याची त्यांची हिंमत नव्हती. दिवस कष्टात जात होते. ती हसणं विसरून गेली होती. काही महिन्यांत तिचं पोट वाढू लागलं. दवाखान्यात डॉक्टर म्हणाली,
“पोरीगी हाय.” त्या एका वाक्यानं घरात गोंधळ उडाला.
“आम्हाला वंशाला दिवा पाहिजे,” सासरा म्हणाला.
“ही पोर आता ठेवायची नाही,” सासू ठाम होती.
सावित्री शांत होती. पण मनात वादळ उठलं होतं. त्या रात्री ती रानात गेली. बैलजोडीपाशी बसून त्यांच्या मानेवर हात फिरवत राहिली.
“तुम्ही तरी मोकळे आहात,” असं पुटपुटली. डोळ्यातलं पाणी जमिनीत मिसळलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी ती कुणाला काही न सांगता थेट पोलीस ठाण्यात गेली. तिथं उभी राहून तिनं आवाज न वाढवता सगळं सांगितलं.
“हे बघा माझं लगीन माझ्या मर्जीविरुद्ध झालं. तवा म्या काय बोलले नाय, माझं शिक्षण बी बंद केलंयां. आनं आता पोटातली पोर पाडायच म्हणत्यात.
” गाव हादरलं. पंचायत बसली. सासरचे, बाप सगळेच पोलिसांसमोर उभे राहिले. सावित्रीनं कुणालाच मारलं नव्हतं, शिव्या दिल्या नव्हत्या. पण तिनं एका विचाराला आव्हान दिलं होतं. वंशाला दिवा हवा म्हणून पोरींचं आयुष्य विझवणाऱ्या मानसिकतेला तिनं शिक्षा द्यायची ठरवली होती. त्या दिवशी सावित्री हरली नव्हती. पहिल्यांदाच ती स्वतःसाठी उभी राहिली होती.
पोलीस ठाण्याच्या बाहेर सावित्री उभी होती. तिच्या पायाखालची जमीन घट्ट होती, पण मन थरथरत होतं. आतमध्ये बाप, सासरा, नवरा सगळेच वेगवेगळ्या खुर्च्यांवर बसलेले. कुणाच्या डोळ्यात राग होता, कुणाच्या लाज, कुणाच्या भीती. सावित्री मात्र शांत होती. इतकी शांत की स्वतःलाच आश्चर्य वाटत होतं.
सगळ्याची चौकशी सुरू झाली. बाप डोळे चोळत म्हणाला,
“आमची गरीबी हाय साहेब… चूक झाली.”
सासरा म्हणाला, “आमचं काय चुकलं? आम्हाला वंशाला दिवा पाहिजेच.”
आनं नवरा मात्र गप्प. मान खाली. त्याच्या गप्पपणा सावित्रीच्या काळजाला टोचून गेलं. तिनं ह्याच माणसासाठी आपण घरदार सोडलं होतं.
दोन दिवसांत गावात बातमी पसरली.
“सावित्रीनं पोलिसांत तक्रार केली.”
कुणी म्हणालं, “लय हिम्मतवान पोरगी हाय.”
कुणी कुजबुजलं, “घराची अब्रू काढली.”
पण सावित्रीला आता ह्या शब्दांचं ओझं उरलं नव्हतं. तिनं आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःचा विचार केला होता.
तिला माहेरी परत पाठवलं गेलं. तेच कच्चं घर, तेच तुटक भिंती, पण मनात काहीतरी बदल झालेला. आईनं तिला पाहताच मिठी मारली.
“तू बरोबर केलंस गं,” एवढंच म्हणाली.
बाप मात्र दूर बसून राहिला. त्याच्या डोळ्यात पहिल्यांदाच भीती होती — पोरीची नाही, तर स्वतःच्या चुकीची.
काही दिवसांनी सरकारी बाई आली. पोट तपासलं. कागद लिहिले.
“पोरगी सुरक्षित हाय. काळजी घ्या,” म्हणाली.
सावित्रीन आपल्या पोटावर हात फिरवला. आत एक जीव हलत होता. तो पहिल्यांदाच तिचा वाटला.
गावात परत पंचायत बसली. पण यावेळी सावित्री उभी होती. खाली मान घालून नाही, तर डोळ्यांत डोळे घालून.
“पोरीचं आयुष्य विकायला ठेवलेलं न्हाय,” ती म्हणाली.
आवाज थरथरत होता, पण शब्द ठाम होते. काहीजण खाली पाहू लागले. काहींच्या चेहऱ्यावर राग होता, पण कोणीच बोललं नाही.
महिने सरले. सावित्रीनं पुन्हा वही हातात घेतली. अंगणात बसून अक्षरं गिरवत होती. पोट मोठं होत होतं, पण मन हलकं होतं. आई बाजूला बसून पाहायची.
“तू शिक. आम्ही कसंतरी जगतो,” ती म्हणायची.
एक सकाळ उजाडली. वेदना सुरू झाल्या. शेजारच्या बायका जमल्या. दवाखान्यात नेलं. तासन्तासांच्या वेदनेनंतर एक रडणं ऐकू आलं. नर्स हसत म्हणाली,
“मुलगी छान हाय.” सावित्रीनं डोळे मिटले. दोन थेंब गालावरून ओघळले. दुःखाचे नव्हते ते, सुटकेचे होते.
ती पोर हातात घेताना सावित्री हळूच म्हणाली,
“तू दिवा हायस… पण कुणाच्या वंशाचा नाहीस. तू माझ्या जगण्याचा दिवा हायस.” त्या क्षणी तिच्या आयुष्यातली खरी शिक्षा पूर्ण झाली होती —
कुणाला फाशी देऊन नाही, तर एका चुकीच्या विचाराला हरवून.
मुलीच्या जन्मानंतर सावित्रीचं आयुष्य थांबलं नाही, उलट ते नवं वळण घेऊन पुढं सरकू लागलं. पोरगी कडेवर घेऊनही ती वही हातातून सोडत नव्हती. अंगणात बसून अक्षरं गिरवायची, कधी आईला वाचून दाखवायची. गावातल्या बायका तिला पाहून म्हणायच्या,
“ही बघा, पोरगी कडेवर अन् शहाणपण हिच्या डोक्यात.” सावित्री हसायची, पण त्या हसण्यात आता भीती नव्हती.
हळूहळू गावात तिचं नाव वेगळ्या अर्थानं घेतलं जाऊ लागलं. आधी कुजबुज होती,
“बापाविरुद्ध पोलीसात गेलेली पोरगी.”
आता मात्र बोलणं बदललं, “लय हिम्मतवाली हाय.”
एखाद्या घरात पोरगी जन्माला आली की आईबाप घाबरून बसायचे. तेव्हा सावित्री तिथं पोचायची. पोरगी कडेवर घेऊन समोर बसायची अन् शांतपणे बोलायची, “हीच पोर उद्या तुमचं नाव उजळणार हाय.” तिच्या शब्दांत जोर नव्हता, पण अनुभवाची आग होती.
एके दिवशी गावात पंचायत बसली. कारण दुसऱ्या घरातली पोरगी पाडायची चर्चा सुरू झाली होती. सावित्रीला कुणी बोलावलं नव्हतं, पण ती गेली. सगळ्यांसमोर उभी राहिली.
“म्या काय शिकवायला आले न्हाय,” ती म्हणाली,
“पण माझ्या अंगावरून गेलेलं दुःख तुम्हाला दाखवायला आले.”
तिनं आपली गोष्ट सांगितली. कुणाचं तोंड खाली गेलं, कुणी अंग चुकवलं. पहिल्यांदाच पंचायत गप्प बसली.
त्या दिवसानंतर सावित्री नुसती बाय राहिली नाही, ती आवाज बनली. सरकारी बायांसोबत गावोगाव फिरू लागली. पोरींची नोंदणी, लसीकरण, शाळेत दाखला — सगळीकडे ती पुढं असायची. लोक तिला नावानं नाही, “ती सावित्री बाई” म्हणू लागले.
बाप तिच्याकडे पाहताना आता मान खाली घालत नव्हता. एक दिवस तोच म्हणाला, “पोरी म्या चुकलो.” ते दोन शब्द तिच्यासाठी मोठे होते. सासरच्यांनी परत ये म्हटंल ल, पण सावित्रीनं नकार दिला.
“माझं आयुष्य म्या आता स्वतः घडवते,” एवढंच म्हणाली.
पोरगी हळूहळू मोठी होत होती. सावित्री तिला कुशीत घेऊन सांगायची,
“तू जन्माला येताना लढाई जिंकून आलीस.” त्या पोरगीच्या डोळ्यात कुतूहल असायचं, भीती नाही.
गावात बदल होत होता. हळूहळू का होईना, पण पोरीकडे पाहण्याची नजर बदलत होती. सावित्रीला माहीत होतं, ही सुरुवात आहे. लढाई अजून मोठी आहे. पण आता ती एकटी नव्हती. तिच्यासोबत तिची पोर होती… आणि तिच्यासोबत उभं राहिलेलं एक गावही हळूहळू तयार होत होतं.
अनेक वर्षं सरली. सावित्रीचं अंगण बदललं नाही, भिंती अजूनही कच्च्याच होत्या; पण त्या भिंतींमध्ये उभा राहणारा माणूस बदलला होता. अंगणात बसून आता ती फक्त अक्षरं गिरवत नव्हती, तर आयुष्याची गणितं सोडवत होती. गावातल्या पोरी सकाळी तिच्या घरी येऊ लागल्या. कुणी वही घेऊन, कुणी फक्त ऐकायला. “शिकणं म्हणजे मोठं होणं न्हाय,” सावित्री सांगायची, “शिकणं म्हणजे डोकं वर करून जगणं.”
तिची पोरगी, गौरी, आता शाळेत जायला लागली होती. पाठीवर दप्तर, डोळ्यात स्वप्नं. सावित्री दररोज तिला शाळेपर्यंत सोडायला जायची. परतताना वाटेत थांबून त्या ओढ्याकडे पाहायची. कधी काळी तिथं उभी राहून तिनं रडलेलं आठवायचं, अन् स्वतःशीच हसून म्हणायची,
“तू तेव्हा हरली नव्हतीस.”
गावात आता पंचायतीत सावित्रीचं नाव आदरानं घेतलं जात होतं. कुठंही पोरीचा विषय निघाला की लोक म्हणायचे, “सावित्री बाईला विचारा.” ज्यांनी कधी तिच्यावर बोट दाखवलं होतं, तेच आता सल्ला घ्यायला यायचे. बदल मोठा नव्हता, पण खरा होता.
एक दिवस तालुक्यातून अधिकारी आले. स्त्री शिक्षणावर कार्यक्रम होता. सावित्रीला बोलायला सांगितलं. ती स्टेजवर उभी राहिली. साधी साडी, पायात चप्पल, पण आवाजात आत्मविश्वास.
“म्या काय मोठी न्हाय,” ती म्हणाली, “म्या फक्त शिकायला थांबले न्हाय. माझ्या पोरगीसाठी, तुमच्या पोरींसाठी उभी हाय.” टाळ्यांचा आवाज तिच्या कानात नाही, तर काळजात घुमला.
कार्यक्रमानंतर एक बाई पुढं आली. म्हणाली, “तुम्ही नाही उभी राहिली असती, तर माझी पोर आज नसती.” सावित्री काहीच बोलली नाही. फक्त तिचा हात घट्ट धरला. त्या स्पर्शातच सगळं उत्तर होतं.
संध्याकाळी घरी परतताना सावित्री रानात थांबली. सूर्य मावळतीला लागला होता. लालसर प्रकाश जमिनीवर पसरला होता. तिनं गौरीचा हात हातात घेतला.
“बघ,” ती म्हणाली, “दिवा बाहेरून आणायचा नसतो. तो आत पेटवायचा असतो.” गौरी हसली. त्या हसण्यात भविष्य उजळत होतं.
सावित्रीनं कुणाला ना शिक्षा दिली नव्हती. ना तिनं कोणाचं घर मोडलं नव्हतं. पण तिनं एक जुना अंधार मोडून काढला होता. वंशाला दिवा पाहिजे म्हणणाऱ्या विचारांवर तिनं स्वतःचं आयुष्य उजेड म्हणून उभं केलं होतं. आणि त्या उजेडात आता अनेक पोरीनंच्या वाटा स्पष्ट दिसू लागल्या होत्या.
©️ कैलास मोरे ✍️ ✍️ ✍️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा