मंगळवार, १० फेब्रुवारी, २०२६

2585. प्रोफाइल पिक्चर

 प्रवीण माझ्या केबिनचं दार ढकलून आत घुसला आणि सरळ माझ्या समोरच्या खुर्चीत येऊन बसला. 
"शुभ सकाळ मित्रा !" हसतमुख चेहऱ्याने आपल्या टकलावर हात फिरवत मिश्किल डोळ्यांनी माझ्याकडे रोखून बघत तो पुटपुटला. खरं तर नॉक न करता माझ्या केबिनचं दार डायरेक्ट ढकलण्याची शामत ऑफिसमधल्या इतर कुणाच्यातच नव्हती, पण प्रवीणची गोष्ट वेगळी होती. प्रवीण माझ्यापेक्षा दहा वर्षांनी मोठा पण आमच्या मैत्रीचे सूर मात्र छान जुळले होते. मी त्याचा बॉस होतो खरा पण ऑफिसमधील कामापुरताच ! इतर वेळी त्याचाच वरचष्मा असे. मी आमच्या कंपनीचा सी.ई.ओ. होतो आणि अर्थातच डायरेक्टर बोर्डाच्या खास मर्जीतला होतो. वयाच्या तिशीतच गलेलठ्ठ पगाराच पॅकेज, कंपनी कार, वर्षातून एकदा लॉंग लिव्ह, अशा सर्व फॅसिलिटीज मी उपभोगत होतो. हे सर्व प्राप्त करण्यासाठी मी गेली पाच वर्षे अविरत कष्ट केले होते. रात्रीचा दिवस करून कंपनीला सतत प्रॉफिट मिळवून दिला होता. आणि म्हणूनच ' आय वॉज डिझर्विंग इट !'
टेबलावर ठेवलेल्या कपातील कॉफीचा एक घोट घेऊन मी प्रवीण कडे बघितले.
" कॉफी घेणार ? ..."
"मागवं, पण साखर जास्त! " प्रवीण म्हणाला. " अरे साखर खायची नाहीयेना तुला ?" प्रवीण हसला. "चालतं रे कधीतरी ... मागव साखरेचीच!" इंटरकॉमवरून सेक्रेटरीला कॉफी पाठवायला सांगून मी माझ्या चेअरमध्ये आरामात रेलून पाय ताणले. 
"बोलं, आज सकाळी सकाळीच काय काम काढलसं ?" मी विचारलं. 
"काही नाही, आज मस्त मूड आहे माझा. म्हटलं जरा तुझ्याशी गप्पा माराव्यात !" टेबलावर बोटांनी तबल्याचा ठेका धरत प्रवीण बोलला.
"परवा फेसबुकवर अंजलीने तिचा प्रोफाईल फोटो अपडेट केलाय. सॉलिड मस्त दिसतीये फोटोत. शेकड्यांनी लाईक्स मिळालेत फोटोला !" प्रवीणचे बोलणे ऐकून माझ्या कपाळावर नकळत आठी उमटली. 
"हो का ? मला दोन दिवसात वेळच मिळाला नाही फेसबुक बघायला." मी हलकेच म्हणालो. माझी थाप प्रवीणकडे पचणं शक्यच नव्हतं. तबल्याचा ठेका तसाच ठेवून प्रवीण म्हणाला,
"नाही पटलं ! माझ्याशी खोटं बोलू नकोस. कबूल आहे की तू सोशल मीडियावर कधीच रिऍक्ट होत नाहीस. तुझा स्वभावच नाही तो ! पण तिच्या फोटोला तू साधं लाइक ही केलं नाहीस ?"
केबिनचं दार नॉक झालं. कॉफीचा कप ठेवून प्यून निघून गेला. कॉफीचा घोट घेत प्रवीणनं एक खोल सुस्कारा टाकला.
"असं वागू नये रे सचीन ! म्हणजे तू असं मुद्दाम करतोयस असं मी म्हणत नाहीये. तू मनानं खरच खूप चांगला आहेस. मी तुला अगदी अंतर्बाह्य ओळखतो. पण या छोट्या छोट्या गोष्टींना आपल्या आयुष्यात किती महत्त्व आहे हे तुला कळत नाही. तू तिचा फोटो लाईक केलायस की नाही यानं इतरांना काहीच फरक पडत नाही, पण तिला पडतो. तुझ्या लाईक आणि कॉमेंटची सर इतर शेकडो लाईक्स आणि कमेंट्सला आली नसती." प्रवीण क्षणभर थांबला, "बाय द वे मला एक सांग, ... फेसबुक वर फ्रेंड रिक्वेस्ट कोणी कोणाला पाठवली होती ? आय मीन तू तिला की ..."
"तिने मला पाठवली होती." टेबलावरील पेपरवेटशी चाळा करीत मी बोललो. 
"वाटलंच मला ..." गडगडाटी हास्य करत प्रवीण म्हणाला. 
"आयला, तिला फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवण्यापुरता तरी स्वतःचा इगो बाजूला ठेवायचास की ... बरं कुठे होतो आपण ? हं ... का नाही तिचा फोटो लाईक केलास ?" 
"सध्या कामाचं प्रेशर किती आहे बघतोयस ना तू ? गेले कित्येक दिवस आम्ही एकमेकांशी नीट बोललो सुद्धा नाहीये !" मी चाचरत बोललो. 
"त्याचा लाईक करण्याशी काय संबंध आहे ? दुसऱ्याला अँपरीशिएट करायला शिक ना जरा ... आणि कामाचं प्रेशर कायमचं राहणार आहे, त्यासाठी तू नित्यकर्माच्या गोष्टी सोडल्या आहेस का ? मग यासाठी ही वेळ काढ. लक्षात ठेव, मोकळा वेळ कोणाकडेच नसतो. वेळ हा काढावाच लागतो. वेळीच जागा हो नाही तर जन्मभर पस्तावायची पाळी येईल." बोटाने टेबलावर धरलेला ठेका थांबवत प्रवीण उठला. 
"चल भेटू संध्याकाळी " असं म्हणून निघून गेला. 
थोडा वेळ मी तसाच स्तब्ध बसून राहिलो. स्मार्टफोनवर फेसबुक उघडून अंजलीच्या प्रोफाइलमध्ये पाहिलं. तिनशे बावीस लाईक्स, एकशे बावन्न कॉमेंट्स! कॉमेंट्स वाचू लागलो. 'ब्यूटीफुल, गॉजियस, सुंदर ' ... हा कोण अजय जोशी ? कॉमेंट मधे लिहलयं ...
"चेहरा है या चांद खिला 
जुल्फ घनेरी छाव है क्या
सागर जैसी आखोंवाली
ये तो बता तेरा नाम है क्या"
माझ्या तळहातांना घाम फुटला. अंजलीने लाईक केलीये ही कॉमेंट. अजय जोशीचा प्रोफाईल मी बघू लागलो. पोस्ट ग्रॅज्युएट इन कॉम्प्युटर इंजिनीरिंग, रनिंग ओन बिझनेस ... स्टेटस सिंगल ... 
मी ताडकन जागेवरून उठलो. घाईघाईत अंजलीचा नंबर डायल केला. रिंग वाजत राहिली ... 
नो आन्सर ... 
घामाचा थंड ओघळ माझ्या पाठीवरून खाली सरकला. कारची किल्ली उचलून मी घाईघाईने केबिन बाहेर पडलो ! सेक्रेटरीच्या प्रश्नार्थक मुद्रेकडे दुर्लक्ष करून मी लिफ्टमधे शिरलो आणि पार्किंग फ्लोअरचे बटण दाबले. पाचच मिनिटांनी माझी कार वेगाने अंजलीच्या अपार्टमेंटकडे निघाली होती. 
'अंजलीने माझा फोन का उचलला नाही ? असं खरं होतं नाही कधी ... ती अजय जोशी बरोबर तर नसेल ?' 
जोरजोरात डोकं हलवून मी येणारे विचार झटकून टाकले. अंजलीच्या बिल्डिंगमधील लिफ्टची वाट न पाहता मी जीने चढू लागलो. तिसऱ्या मजल्यावरील तिच्या अपार्टमेंटची बेल मी अधीरपणे वाजवली. तब्बल चार मिनिटांनी दार उघडलं गेलं. ती चार मिनिटं मला अक्षरशः चार युगांसारखी वाटली. दारात ती उभी होती. टॉवेलने तिने केस बांधले होते. 
नुकताच शॉवर घेतला असावा. तिचं ओलेतं सौन्दर्य पाहून माझ्या काळजाचा ठोका चुकला.
"वॉव सचिन तू? ... व्हॉट अ सरप्राइज ! ये ना आत !" धडधडत्या हृदयाने मी आत शिरलो. तक्रारीच्या सुरात म्हणालो, "माझा फोन का नाही उचललास ? ..."
"कधी केला होतास ?" तिने विचारलं.
"थोड्या वेळापूर्वी .... अर्धा तास झाला असेल ..."
"काय झालंय तुला सचिन ? अरे नऊ ते दहा मी स्विमींगला नाही का जात ? तुझा फोन काय टँक मध्ये उचलू ?" खळखळून हसतं अंजली म्हणाली . क्षणात सगळा उलघडा झाला. मनावरचं दडपण हलकं झालं.
"चल पटकन चेंज कर , आज आपण लंचला बाहेर जायचंय ... आणि नंतर मूव्हीला ! आज मी सुट्टी घेतलीये . आज पूर्ण दिवस आपण दोघं एन्जॉय करायचाय ..."
"वॉव ग्रेट ....... " अंजली चित्कारली. 
"पण हे सगळं कशासाठी ?"
"तुझ्यासाठी डार्लिंग ! तू परवा फेसबुकवर तुझं प्रोफाईल पिक अपडेट केलंस ना, ते मला खूप आवडलं. म्हटलं इतरांसारखं कोरडं लाईक आणि कॉमेंट करण्यापेक्षा, असं वेगळं सरप्राइज देऊन तुला अँपरीशिएट करूया ! ..."
" यू आर सिम्पली ग्रेट सच्चू .... आय रिअली लव्ह इट " डोळ्यांतले आनंदाश्रू लपवतं अंजली माझ्या मिठीत शिरली, आणि त्या मिश्किल हसणाऱ्या टकल्याचे मनोमन आभार मानत मी तिला घट्ट कवटाळले .

 © मिलिंद अष्टपुत्रे .    ✍️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...