१) खूपच समंजस होता तो. तिच्याशी कायम अदबीने आणि अंतर राखून बोलायचा.तिच्या सुंदरतेमुळे तिच्या मागेमागे फिरणा-या इतर मुलांसारखा नव्हता तो.नकळत ती त्याच्याकडे ओढली गेली. हळूहळू प्रेम फुलत गेले. एकदा बोलता बोलता त्याच्या बोलण्यातले एकदोन शब्द तिला खटकले. ती सावध झाली. त्याच्याबद्दलची माहिती पुन्हा त्याला विचारली.त्यानेही सविस्तर माहिती दिली.आक्षेपार्ह काहीच नव्हते.तरीही तिने माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. पण कुठेच काही ट्रेस लागेना.तिला वाटले आपण उगाचच संशय घेतला. पण सहज बोलताबोलता तिने जवळच्या मैत्रिणीला हे सांगितले . ती मैत्रीण तिला एका समाजसेविकेकडे(ताई) घेऊन गेली.ताईने दोन दिवसात तपास पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
दोन दिवसानंतर तिला समजले की तो भलताच कोणीतरी होता.त्याचे नाव गाव सारेच वेगळे होते.तिला सुरूवातीला विश्वासच बसेना पण ताईने त्याचे आधारकार्ड तिच्या हातात ठेवले. आपले आयुष्य उध्वस्त होता होता वाचले याची तिला जाणीव झाली.
.....आज ती फावल्या वेळात ताईसोबत काम करते.
२) एखाद्यासाठी वेड होण काय हे त्याच्यामुळे तिला समजले. तासनतास तिच्या कॉलेजच्या बाहेर उभे राहणे.तिला घरापर्यंत सोबत देणे,तिने सांगितलेले किरकोळ कामही तत्परतेने मन लाऊन करणे.
तिला मनापासून आवडला तो.पण त्याच्याशी लग्नाला घरून परवानगी मिळणार नाही हे तिला माहित होते कारण ब-याच गोष्टी घरच्यांना पटल्याच नसत्या.
बरेच दिवसानंतर तिने एकदा विचारले.
"आपण पळून जाऊया का?"
"चालेल.मी केव्हाही तयार आहे."
"आणि लग्न कुठे करायचे?"
"लग्न ? त्याची काय जरूर? आपण लिव्ह ईन मध्ये राहू ना? तुला माझ्यावर भरोसा नाही का?"
तिला ते पटले नाही.तिने त्याच्याशी संबंध तोडले. संबंध तोडल्यानंतर तो बदलला.आक्रमक झाला.तिला फोनवर धमकी देऊ लागला. सोबत काढलेले काही फोटो सोशल मिडीयावर टाकेल सांगू लागला. लिव्ह ईनसाठी दबाव टाकू लागला.त्याचे खरे रूप बघून ती हादरली.
ती सैरभैर झाली.घरीही सांगता येईना.आत्महत्येचे विचार मनात येऊ लागले.तिने रवीवार आत्महत्येसाठी निश्चित केला.संध्याकाळी घरी कोणी नसते. तशात कोणीतरी तिला 'ताई' चे नाव सुचवले.ती ताईला भेटली.ताईने तिला धीर दिला. चारच दिवसात चाव्या फिरल्या.. त्याचे फोनच काय तो स्वतःही गावात दिसेनासा झाला.तिने सुटकेचा निश्वास टाकला.तिने ताईला मदत करणे सुरू केले.
आज सहज तिने कॕलेन्डरवर नजर टाकली.बापरे! ताई भेटली नसती तर आज आपले वर्षश्राद्ध झाले असते....
३) तो खूप श्रीमंत असावा.तिला महागड्या गिफ्ट द्यायचा.महागड्या बाईकवर तिला फिरायला घेऊन जायचा ,ज्या पदार्थाचे नावही कधी ऐकले नाही असे पदार्थ तिला उंची हॉटेलात नेऊन खाऊ घालायचा. मध्यमवर्गीय असलेल्या तिला हे सगळे स्वप्नवत वाटायचे. एकदा तो तिला पबला घेऊन गेला. सॉफ्ट ड्रींक दिले.तिला ते कडवट लागले म्हणून त्याचे लक्ष नाही बघून तिने ते टाकून दिले. तो सहज म्हणाला
" sex करायचा? वरती रूम आहेत."
ती थरथरली."नको." तिचे मध्यमवर्गीय संस्कार मध्ये आले.
"ठीक आहे.माझ्याबरोबर थोडा डान्स तर करशील?"
तिच्याबरोबर नाचता नाचता तो म्हणाला "मला निदान किस तर देशील?"
तिच्या संमतीची वाट न पहाता तो तिला कोपऱ्यातल्या अंधारात घेऊन गेला.चुंबन घेताघेता त्याचे हात तिच्या शरीरावर फिरू लागले.ती उत्तेजित झाली.
"रुममध्ये यायचे?" तो तिच्या कानात हळुवारपणे म्हणाला.
ती होच म्हणणार होती तेवढयात तिचा मोबाईल वाजला.
"काय गं किती उशीर?" आईचा आवाज ऐकताच ती भानावर आली.
"मला घरी सोड लगेच." ती म्हणाली
रात्री कितीतरी वेळ तिच्या शरीरावरचे त्याचे स्पर्श तिला आठवत राहिले,उत्तेजित करत राहिले. केव्हातरी झोपेत तिच्या सबकाॕन्शन्स माईंडने तिला सतर्क केले. तू माझे पहिले प्रेम हे तो नेहमी सांगतो मग सहजपणे चुंबन कसे घेतो. शरीरावर त्याचा फिरणारा हात सराईत कसा? हॉटेलच्या वरती रूम मिळतात आणि तिथे **x करता येतो हे याला कसे माहित? निघतांना याच्या डोळ्यांत सावज निसटून चालले असे भाव कसे? म्हणजे याअगोदरही तो मुलींना घेऊन पबमध्ये?....
ती थरारली. काहीतरी गडबड आहे.
नंतर दोन तीनदा आईला संशय येतो हे सागून तिने त्याच्याबरोबर जायचे टाळले. एकेदिवशी सकाळीच पेपरला ती ज्या पबमध्ये गेली त्या पबवर पोलीसांची धाड पडल्याची बातमी आली. त्याचा फोटोही होता. मुलींला जाळ्यात ओढायचे नंतर रूममध्ये तिचे व्हीडीओ काढायचे आणि पुढे तिला ब्लॕकमेल करायचे. त्यांना वाममार्गाला लावायचे हा त्याचा धंदाच होता. त्याला त्याचे फंडीगही होते. त्याचे खरे नावही भलतेच होते. आपण केवढ्या मोठ्या संकटातून वाचलो याची तिला जाणीव झाली. पोलीसांना ह्या पबच्या गैरप्रकाराबाबतची तक्रार समाजसेविका ताई यांच्या संस्थेने केली होती.
तिने ताईचे मनोमन आभार मानले. आपण नशीबाने वाचलो पण भविष्यात अनेक मुली ह्या दलदलीत जाण्यापासून रोखणा-या ताईच्या संस्थेत जाऊन ताईला प्रत्यक्ष भेटायचेही तिने ठरवले....
© ® विवेक चंद्रकांत
* कथा प्रचारकी आणि ढोबळ कथानक असणाऱ्या वाटण्याची शक्यता आहे.पण सावध करण्यासाठी आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा