कामाच्या निमीत्ताने माझा बराच प्रवास होत असतो. बराचसा प्रवास कारने होतो पण कधी कधी बसनेही होतो. अलीकडेच माझ्या सोलापूर ते सांगली बस प्रवासातला हा अनुभव.
संध्याकाळी पाचची वेळ. बस जवळजवळ भरली होती. हीच बस पुढे कोल्हापूरला जाते, त्यामुळे नियमीत प्रवास करणारे या बसला असतात. माझी विंडो सीट होती. गाडीची वेळ झाली तरी माझ्या शेजारची सीट अद्याप रिकामीच होती. मीही म्हंटलं बरं आहे..आरामात प्रवास होईल. रिक्लायनर सीट असली तरी शेवटी शेजारी कोणी सहप्रवासी असेल तर तुमच्या हालचालींना मर्यादा येतातच. पण मला बस अटेन्डन्टच्या बोलण्यावरुन जाणवलं की जी कोणी व्यक्ती माझ्या शेजारच्या सीटवर होती, ती यायच्या वाटेवर होती. गाडी दहा मिनीटे लेट झाली होती. बरेच सहप्रवासी 'अहो सोडून द्या गाडी..एकदा चुकली की कळेल की वेळेवर यायला पाहिजे' असा आग्रह करीत होते.
शेवटी सव्वापाच वाजता दरवाजा उघडला आणी…ओssहोss..तुम्हाला सांगतो..एक मुर्तीमंत सौंदर्य बसमधे अवतरीत झालं.
पांढ-या शुभ्र रंगाचा टाॕप, निळ्या रंगाची जिन्स आणि डोळ्यावर काळा गाॕगल या पेहरावात 'ती', मेकअपचा फारसा तामझाम नसतानाही इतकी ग्रेसफुल दिसत होती की ज्याचं नाव ते.
बस सोडा म्हणना-यांचा 'आ' वासला गेला. सगळी बस फक्त आता तिच्याकडे पहात होती. बस लेट झाल्याची किंवा न सोडल्याची खंत माझ्या मते त्यावेळी बसमधल्या तमाम पुरुषांपैकी कोणालाही वाटली नसावी.
मला तर मनाताल्या मनात गुदगुल्याच झाल्या. मनमे लड्डु फुट रहे है चा प्रत्यय आला. इतक्या सुंदर स्त्रीसोबत पुढील पाच तासांचा प्रवास करायचा ही भावनाच किती सुखद होती..!!
ती माझ्या सिटशी आली. तिला एकदा आत येताना पाहिल्यावर मी मुद्दाम खिडकीतून बाहेर पहायचं नाटक करीत राहिलो. सुंदर स्त्रीयांना पहिल्याच नजरेत फार भाव देउ नये असे मी कुठेतरी वाचलं होतं. तिने येउन तिची बॕग वरच्या रॕकमधे कशीबशी घुसवली आणि तेवढ्यात ड्रायव्हरने बस पुढे घेतली.. झालं...बाईसाहेब सरळ माझ्या दिशेने झेपावल्या आणि काही कळायच्या आत तिचे नाजूक हात माझ्या छातीवर येउन आदळले. आता मात्र मी शिष्टाचाराला धरुन लगेच तिला हाताला धरुन सरळ उभे केले. कारण त्या 'पडण्याने' ती हेलपाटली होती आणी जरा गोंधळलीही होती.
तिने लगेच 'साॕरी हं..सर..' असं ओशाळून म्हणत माझी माफी मागीतली. मी वरवर थोडा शिष्ट चेहरा करत 'इट्स ओके' म्हणालो. पण तुम्हाला खरं सांगतो, पुढच्या दहा मिनीटात मी त्या गरीब ड्रायव्हरचे दहा वेळा तरी आभार मानले..काय वेळ साधली होती त्याने. माझ्या अंगात अजून विज सळसळत होती..हृदयाची धडधड वाढली होती.
तिने मात्र ड्रायव्हरला 'कळत नाही का याला पॕसेंजर सिटवर बसेपर्यंत गाडी चालू करु नये...मूर्ख ड्रायव्हर…' असे म्हणत त्याला एक उपाधी देउन टाकली.
प्रवास सुरु झाला. पुढचे पाच तास म्हणजे पन्नास ओव्हर खेळून काढायचे होते..पिचचा अंदाज येइपर्यंत पुढे येउन खेळत आधीच विकेट फेकून देणे म्हणजे गाढवपणा आहे हे आयुष्यात क्रिकेट न खेळूनही मला ठाउक आहे.
त्यामुळे पुढचा अर्धा तास मी काही बोललो नाही.
ती तिच्या मोबाईल फोन वर बहुधा कोणाशी तरी चॕटींग करत असावी..कारण तिचं प्रचंड वेगात काही टायपिंग चालू होतं. दुस-याच्या मोबाइलमधे डोकाउ नये हा शिष्टाचार मला ठाउक आहे. तरी नजर तिरकी करुन किंवा सहज लक्ष गेलं तरी मला दिसत होतं की ती दोन्ही हातांनी एकदम सुसाट इंग्रजी टायपींग करत होती. बराच वेळ चॕटींग केल्यावर तिने फोन पर्समधे ठेवला. मी आपलं खिडकीतून बाहेर सरत चाललेली सुंदर संध्याकाळ न्याहाळात होतो. किंवा तसा आवीर्भाव चेह-यावर ठेवला होता.
एवढी सुंदर स्त्री शेजारी बसली आहे तिच्याशी काही तरी बोलले पाहिजे असे माझे मन मला सारखे सांगत होते. पण सुरवात कशी करावी या विचारातच बराच वेळ गेला.
मग अचानक तिनेच मला विचारलं
'सर, तुम्ही कोल्हापूरला चालला आहात का?'
अचानक आलेल्या या बाउन्सर प्रश्नाने मी आधी चमकलोच.
'अं..नाही नाही..मी सांगलीला उतरेन..' मी सावरत म्हणालो.
'ओह..अच्छा..तुम्ही सोलापूरला नेहमी येतो का?'
'हो महिन्यातून एक दोनदा येउन जातो… सेल्स मधे आहे..इकडे क्लायन्ट्स आहेत त्यामुळे यावं लागतं..' मीही आता 'ओपन अप' व्हायला सुरवात करत म्हंटलं.
वरवरच्या गप्पा सुरु झाल्या. तिने दिलेल्या माहितीवरुन एवढे कळाले की ती पुण्याला एका इवेंट मॕनेजमेंट कंपनीत पार्टनर आहे. सोलापूरला एक इवेंट आटोपून आता तिचा पुढचा इवेंट कोल्हापूरला होता, तिकडे ती निघाली होती. साधारण दहा बारा वर्षे ती या क्षेत्रात काम करतेय असे तिने मला सांगितले. यावरुन ती सध्या वयाच्या 'मध्य तिशीत' (मिड थर्टीज) असावी असा मी कयास बांधला. तसंही शिष्टाचाराचे सारे काॕन्ट्रॕक्ट पुरुषांकडेच असतात. त्यामुळे बायका एकवेळ पुरुषांना सहजपणे पगार विचारु शकतात पण पुरुष बायकांना वय अजिबात विचारु शकत नाहीत. 'ते' नेहमीच, अंदाज बांधणे या प्रकारात मोडत राहते. अशावेळी आपले लक्ष समोर बोलणा-या स्त्रीकडे पूर्णपणे आहे असे जरी पुरुष दाखवत असले तरी त्यांच्या चेह-यावर जाउ नका..बॕक आॕफ दी माईंड त्यांच्या डोक्यात तिच्या संभावित वयाचे कॕलक्यूलेशन्स चालू असतील. जसे वनडे मॕचमधे खेळणा-या बॕट्समनच्या डोक्यात रनरेटचे गणित चालू असते.
'मी दोन वर्षांपासून ब्लाॕग्ज लिहीते..मला लिहायची आवड आहे..' असे ती म्हणाली, तसा मी कॕलक्यूलेशन्स मधून बाहेर आलो.
'अरे वा..छान आहे..नियमीत ब्लाॕग्ज लिहायला खूप अभ्यास लागत असेल नाही..?' मी तिला भाबडा प्रश्न विचारला.
'मीही लिहीतो' असं अगदी मनात येउनही मी तिला सांगायचं टाळलं. समोरच्या व्यक्तीची अधिक माहिती काढायची असेल तर आपण त्याच क्षेत्रात आहोत हे आधीच सांगू नये असे मी एका 'सेल्स ट्रेनिंग' मधे ऐकले होते, व मी ते नियमीत फाॕलो करतो.
नवीन बाॕलर असेल तर अगदी तेंडुलकर देखील एखादी ओव्हर मेडन खेळून काढतो. इथे तर माझ्यासमोर 'ग्लेन मॕग्रा' होती.
ती मला मग अगदी उत्साहाने सांगू लागली..ब्लाॕगमधे किती शब्दात आपले मत मांडावे लागते..ब्लाॕगसाठी कसा विषय निवडावा..तुम्हाला फाॕलोवर्स कसे मिळत जातात..जसे तुमचे ब्लाॕग्ज लोकांना आवडू लागतात तसं 'वार्ड आॕफ माउथ' ने तुमचे ब्लाॕग फाॕलोवर्स कसे वाढू लागतात..सध्याच्या काळात प्रसिद्ध 'ब्लाॕगीज' कोण आहेत…वगैरे वगैरे...
ती बोलताना इतकी आवेगाने बोलत होती की असं वाटत होतं की तिने बोलत रहावे व आपण ऐकत रहावे. तिचे हे बोलणे ऐकताना मी माझ्या चेह-यावर कुतुहलमिश्रीत कौतुक भाव इतका बेमालूम ठेवला होता की मलाच जाणीव झाली की 'अरे लिहीण्या बरोबरच आपल्याकडे थोडी अभिनयकलाही आहे की..!'
असो..हा ब्लाॕगचा विषय संपेपर्यंत बस एका हाॕटेलवर थांबली. फ्रेश होउन मी काउंटरवर येउन एक डोसा आॕर्डर केला व डोसा घेउन एक कोप-यातले मोकळे टेबल पाहून बसलो. मी मुद्दामच तिला शोधायचा,पहायचा प्रयत्न केला नाही. सुंदर स्त्रीबरोबर वागताना कधीही तुम्ही तिच्या प्रभावामधे आहात हे कळू देउ नये, असे मी कुठेतरी वाचलय. (हे असले ज्ञान कुठेतरी वाचलय वर खपवणे किती सोप्पय नाही..?) त्यामुळे उगाच अशा सुंदरींना हात करुन माझ्या टेबालवर बस ये असे सांगायचा शहाजोगपणा करु नये..नाही तर नेमके दुसरीकडे बसून ते आपला 'पचका वडा' करुन अगदी सांबारात बुडवून खायचे...
आता फक्त बस मधले कोणी दुस-याने येउन टेबलवर समोर बसू नये एवढीच देवाला मनोमन प्रार्थना केली. देवाने ती ऐकली.
पाचच मिनीटात क्लब सँडविच एका प्लेटमधे घेउन ती माझ्या समोर येउन बसली. मी इतर टेबलवर बसलेल्या सहप्रवाशांकडे सहज नजर टाकली. आता त्यांच्या डोळ्यात मला अगदी 'असुया-द खंजर' दिसत होता. म्हणजे देवाने एखाद्यावरच किती मेहेरनजर करावी..नाही का?
'सर तुम्ही एक सँडविच घ्याल? मी मुद्दामच एक एक्सट्रा घेतला..' तिने बसल्याबरोबर मला विचारलं.
मी मनोमन खूश झालो..पण पुन्हा अभिनय…आउडसाइड दी आॕफ स्टंप आलेला बाॕल कितीही मोह झाला तरी सोडून द्यावा..
मी विनयशील पणे तिला म्हणालो..
'ओ..थँक्स..पण..तुम्ही घ्या..मला हा डोसा पुरेसा होइल...उलट तुम्हीच हा डोसा शेअर करा..हवा तर..'
'चांगला बनवलाय का डोसा?' असे म्हणत तिने डोश्याचा एक भाग उचलून चाखला सुद्धा. बाई 'इम्पलसिव्ह' सदरात मोडणारी होती. एखादी गोष्ट मनात आली की करुन टाकायची..कसली भिडभाड नाही..
'हूँsss...छान बनवलाय की डोसा....मी घेईन थोडा..पण तुम्हाला हा अर्धा सँडविच तरी घ्यावा लागेल सर..' असे म्हणत तिने माझ्या 'हो' ची वाट न पाहता अर्धा सँडविच एक प्लेटवर घेत माझ्यासमोर ठेउनही दिला..
'मघा तुम्ही बोलता बोलता म्हणालात सर, तुम्हाला नाॕव्हेल्स वाचायला आवडतात...तुम्ही कोणाला फाॕलो करता..?'
आता हा माझा प्रांत होता. समोर स्पिन अॕटॕक आल्यावर जसे बॕट्समन हेल्मेट काढून कॕपवर खेळू लागतात तसे मी सुरु झालो. मग अगदी सोशल नाॕव्हेल्समधे डिकेन्स, जेन आॕस्टीन पासून जेफ्री आर्चर पर्यँत, डिटेक्टिव्ह नाॕवेल्समधे काॕनन-डायल, अगाथा ख्रिस्ती ते अलिकडच्या राॕबर्ट गॕलब्रेथपर्यंत आणि स्पाय नाॕव्हेल्स मधे ले-कार, काॕनरॕड पासून फोरसाइथ पर्यंत सर्वांचा उल्लेख आला. मग त्यात आमचे काही काॕमन फेवरेट्स निघाले. (नशीब हो..दुसरे काही नाही..) खाणे संपवून गाडीत बसल्यावरही आमच्या या फेवरेट्सवर आमच्या छान गप्पा सुरु होत्या.. फक्त आता मी विंडो सीट तिला देउन स्वतः बाजूच्या सीटवर आलो होतो, कारण मला आधी उतरायचे होते.
ती शेजारी बसल्यापासून मी तसा आकसूनच बसलो होतो. कुठूनही तिला चुकीचा स्पर्श होउ नये व तिचा गैरसमज होउ नये याची मी पुरेपूर काळजी घेत होता. पण या बसेसचा एक प्राॕब्लेम असतो..यांना मधे एकच हँड रेस्ट असतो..त्यामुळे मनात असो नसो तुमचे हात नकळत एकमेकांना स्पर्श करीत राहतात. तिने पूर्ण प्रवासात अजिबात अशा नकळत झालेल्या स्पर्शांची दखल घेतली नाही..उलट आवडीच्या विषयावर बोलताना ती अगदी नजरेत नजर मिसळून बोलत होती..मलाच अवघडल्यासारखे होत होते आणी मी मधेच नजर चोरत होतो. तिची मात्र फुल बॕटिंग सुरु होती. तिच्या आवडत्या इंग्रजी नाॕव्हेलिस्टवर भरभरुन बोलत होती.
नाॕन स्ट्रायकर एंडला असलेला बॕट्समन जसा भरातल्या खेळाडूला खेळताना फक्त पहात रहायचा आनंद घेतो तो मी घेत होतो.
शेवटी तिला एक फोन आला तसे आमचे संभाषण थांबले. तिला कोल्हापूरला पोहोचल्यावर कोणी तरी पिक-अप करायला येणार होते, त्याला ती कुठे व किती वाजता यायचे आहे या सूचना करत होती. त्यानंतर तिचे लागोपाठ दोन तीन फोन झाले. सांगलीही फक्त अर्धा पाउण तासाच्या अंतरावर आली होती.आपणही आवरतं घ्यावं असा विचार आला.
तिच्या आतापर्यंतच्या बोलण्या वागण्यावरुन मला एवढं नक्कीच जाणवलं होतं की ही स्त्री फक्त सुंदरच नव्हती तर अतिशय हुशार, कर्तबगार पण तितकीच लाघवी स्वभावाची होती. मी विचार केला की चला आपल्या आजच्या प्रवासात या चतुरस्त्र ललनेचा एवढा सहवास, एवढ संभाषण आपल्या भाग्यात लिहीलं होतं..हे ही नसे थोडके.
खरं तर सुरवातीला मी जरी तिच्या बाह्य सौंदर्याने प्रभावित झालो होतो तरी मला आता तिचे आंतरिक सौंदर्य जास्त भावले होते.
मी शांत व अंतर्मुख झालेलं पाहून तिही शांत बसून होती. तिच्या मनात त्याक्षणी काय चालले असेल असाही एक विचार येउन गेला. पण मी स्वतःशीच हसून तो झटकून टाकला.
मिरज आले तसे मी तिच्याकडे पाहिले. तिचा डोळा लागला होता. किंती शांत व प्रसन्न चेहरा दिसत होता तिचा.
'सर. मी उतरायच्या आधी तुमचा नंबर घेइन ह़ं, आणि माझाही तुम्ही घ्या..' असे ती मला आम्ही खाण्यासाठी थांबलो तेंव्हा आवर्जून बोलली होती. पण आता तिला मुद्दाम उठवून नंबरची देवाणघेवाण करणे मला बरोबर वाटले नाही.
सांगलीत माझ्या घराजवळचा स्टाॕप आला तसा मी उतरुन जाण्यासाठी बॕग घेउन पुढे आलो. तिला तोवर जाग आली असावीही कदाचित, पण मला मागे वळून तिच्याकडे पहायचे धाडस झाले नाही. तुमच्या मनोनिग्रहाची परिक्षा असते अशावेळी.
मला उतरवून बस पुढे जात असाताना मात्र मला राहवले नाही व आम्ही बसलेल्या सिटच्या खिडकीकडे मी सहज पाहिले...
ती माझ्याकडेच पहात होती...आमची नजरा नजर होताच ती गोडशी हसली व निरोपा साठी हात हलवला…
मला काहीच सुचले नाही...मी फक्त एक स्मित चेह-यावर ठेउन तिच्याकडे पहात राहिलो…बस दिसेनाशी होइपर्यंत...
मग मी स्वतःशीच मोठ्याने हसलो..एक शिळ घातली..व चालत पुढे निघालो...
माझे घर माझी आतुरतेने वाट पहात होते…!!
© सुनील गोबुरे . ✍️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा