मंगळवार, १० फेब्रुवारी, २०२६

2571. शापित राजकन्या

 अहमदाबाद विमानतळावर बोर्डिंगची उद्घोषणा होण्याची मी डोळे बंद करून वाटत बघत होतो . माझं विमान  चांगलं तासभर उशिराने सुटणार होतं. इतक्यात कोणीतरी माझ्या खांद्यावर थोपटून मला जागं केलं. मी डोळे उघडले. माझ्या समोर उभा असलेल्या व्यक्तीने हाताने दर्शवत मला सांगितले,
"सर आपको वो भाईसाहब बुला रहे हैं". त्याने बोट दाखवलं त्या दिशेने मी पाहिले तर खरंच एक माणूस मला गयावया करत बोलवत होता. माझी छोटी बॅग उचलून सावकाश पावलं टाकत मी त्या माणसाजवळ जाऊन पोहोचलो. मी पोहोचताच त्याने तिथल्या सीटवरचं सामान उचलून मला बसायला जागा दिली. 
"सर तुम्ही मराठी दिसताय ? मी मानेनेच हो म्हटले. "सर मी धीरज पटेल. मुंबईला रहातो बरीच वर्षे. त्यामुळे बऱ्यापैकी मराठी बोलता येते. ही माझी बायको सेजल आणि ही माझी मुलगी सोनल. हिने मघाशी तुम्हाला आमच्या समोरून चालत जाताना बघितले आणि ओळखले. म्हणून तुम्हाला मी इथे बोलवून घेतले.
धीरज हे सगळं बोलत असताना अचानक माझ्या लक्षांत आलं की ह्याच कुटुंबाला मी बघितलं होतं चार पाच दिवसांपूर्वी मुंबई विमानतळावर. छोट्या सोनलचा चेहरा का कोण जाणे माझ्या लक्षांत राहिला होता. तेच कुटुंब आज परत भेटणं हा योगायोग नक्कीच नव्हता.
मी माझी बॅग खाली ठेवून सोनलला शेक हॅंड करण्यासाठी हात पुढे करत म्हणालो," सोनल, मी सतीश अंकल" तिने हात जरूर मिळवला पण ती काही बोलली नाही. इतक्यात धीरज मला म्हणाला," सर सोनल बोलू शकत नाही."
"म्हणजे" मी काहीच न कळल्याने धीरजला विचारले.
"सर सोनल जन्मतः मुकी आहे.
ते ऐकून मी सुन्न झालो. इतक्या गोड दिसणाऱ्या बाहुलीला परमेश्वराने शापित केलंय ह्यावर विश्वास बसत नव्हता माझा.
सोनलने खुणेनेच मला मी छान दिसतो असं सांगितलं आणि माझे डोळे पाणावले. इतक्या छोट्या मुलीने चार पाच दिवसांपूर्वी बघितलेल्या मला आज ओळखले हे आश्चर्यकारक होते.
"सर तुम्ही बसा बरं आधी." धीरजला माझी दोलायमान स्थिती समजली. मी परत माझ्या सीटवर बसलो. धीरजच्या तोंडून सगळं ऐकून सोनलच्या जन्माच्या वेळी परमेश्वराच्या मनांत नेमकं काय होतं हे समजत नव्हते मला.
धीरजचे वडील अहमदाबादचे कापडाचे व्यापारी. त्यांचा पिढीजात व्यवसाय होता. मुंबईतील अनेक व्यापाऱ्यांसोबत वाढत जाणारा धंदा बघून त्यांनी धीरजला मुंबईला पाठवलं कायमचं. दहा वर्षापूर्वी त्याचे लग्न झाले. सोनल आज सहा वर्षांची आहे. नाॅर्मल डिलिव्हरी होऊन जन्माला आलेली ही छोटी बाहुली पटेल खानदानामधली पहिलीच मुलगी म्हणून सगळ्यांची लाडकी. सुरवातीचे कौतुकाचे दिवस संपल्यावर एक दिवस डॉक्टरांनी ते भयानक वास्तव धीरजला सांगितले. धीरज आणि सेजल तर पार हादरून गेले होते ते ऐकून. पण तरी देखील त्या धक्क्यातून वेळीच सावरत त्यांनी परिस्थितीशी जुळवून घ्यायला सुरुवात केली. सेजलने खुप धीराने त्यांच्या घराला  आणि धीरजला सावरलं. नंतर तिचा आणि धीरजचा सोनलला जमेल तेवढे सामान्य मुलीप्रमाणे जगवण्याचा आटापिटा सुरू झाला.  तिच्या सारख्या मुलांची शाळा शोधण्यापासून सुरवात झाली. अभ्यासाचा प्रश्नच नव्हता.  सोनल बोलायचा खुप प्रयत्न करायची पण ते आम्हाला चटकन् समजायचं नाही. मग तिच्या शाळेने आम्हा दोघांना तिच्याशी कसं बोलायचं आणि ती काय बोलते ते ओळखायला शिकवलं. सोनलला संगीत ऐकायला फार आवडतं . टिव्हीवर होणारे डान्सचे कार्यक्रम बघून ती नाचायचा प्रयत्न करते. शिवाय बऱ्यापैकी चित्र काढते. तिची रंगांची चांगली ओळख आहे. 
धीरजचं बोलणं मी इतक्या एकाग्रतेने ऐकत होतो की सोनल माझ्या जवळ येऊन कधी उभी राहिली ते मला कळलं देखील नाही.
का कोण जाणे पण मी तिला छातीशी कवटाळून घेतलं. पण पुढच्या क्षणी मी स्वतःला सावरलं आणि मी तिला म्हणालो," मला तुझ्याशी खेळायला यायचंय तुझ्या घरी" मी काय म्हणालो ते धीरजने खाणाखुणा करून सोनलला सांगितले. ते ऐकून ती जागीच उड्या मारत टाळ्या वाजवायला लागली.
"सर खरंच याल तुम्ही आमच्या घरी " धीरजचा उतावळा प्रश्न.
"नक्की येईन. एकदाच नाही तर खुप वेळा येईन." हे ऐकून धीरजने माझा मोबाईल नंबर घेऊन त्यावर त्याचा पत्ता मला व्हाॅट्स ऍपवर पाठवून कसं यायचं ते समजावून सांगितले.
इतका वेळ सगळं शांतपणे बसून आमचं संभाषण ऐकणारी सेजल तिच्या जागेवरून उठून माझ्या जवळ आली आणि म्हणाली," खरंच आलात तुम्ही तर सोनलला खुप आनंद होईल. ती अनोळखी व्यक्तीशी कधी बोलत नाही. पण तुम्हाला मघाशी इथून पुढे जाताना तिने ओळखले ह्यात काही तरी वेगळेपण आहे येवढं खरं. "
इतक्यात बोर्डिंगची उद्घोषणा झाली. आम्ही लाईनीत उभं राहून विमानात प्रवेश करायला सिद्ध झालो. आधीच खुप उशीर झाला होता. माझ्या सीटच्या वर असलेल्या कप्प्यात माझी बॅग ठेवून मी सीटवर बसलो. हवाई सुंदरी हातवारे करत नेहमीच्या सुचना देत असताना माझ्या डोळ्यांसमोरून सोनल जात नव्हती.
सारखा राहून राहून एकच विचार मनांत येत होता तो हा की ह्या गोड राजकन्येला परमेश्वराने शापित का केलं असेल?
आमचं विमान हळूहळू उड्डाणाच्या ठिकाणी जायला पुढे पुढे सरकत असताना धीरजने सांगितलेली सोनलच्या जन्मापासून आजपर्यंत त्याने आणि सेजलने दिलेली अग्नीपरिक्षा मला अधिकाधिक बैचेन करत होती. त्या दोघांनी आजवर समाजाच्या झेलेलेल्या नजरा, मिळालेली फुकटची सहानुभूती, साधं सोपं आयुष्य जगताना देखील सोनलमुळे आलेली बंधनं, त्यामुळे त्यांचा झालेला कोंडमारा ह्या सगळ्यांचा विचार मी माझ्या नकळत करु लागलो होतो आणि ती शापित राजकन्या का कोण जाणे हळूहळू माझ्या आयुष्यातील एक जवळची व्यक्ती बनू पहात होती.

© सतीश बर्वे
०१.०२.२६.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...