सुरेशच्या मनात लहानपणा पासूनच मुक्या प्राण्यांबद्दल विशेष ममता होती. लहानपणी गावाकडे राहताना खरे तर त्याला कुत्रा पाळण्याची तीव्र इच्छा होती. पण आई-वडिलांच्या विरोधामुळे कधी हे शक्य झाले नाही. सुरेशचे आता लग्न झाले होते आणि तो मोठ्या शहरात आता नौकरी करत होता. नौकरी सोबत वेळ भेटेल तसे सुरेश प्राणी मित्र संघटनेसाठी देखील काम करत असे. खास करून भटक्या आणि जखमी प्राण्यांना सुरेश वैद्यकीय मदत मिळवुन देण्याचा पुरेपुर प्रयत्न करत असे.
त्या दिवशी कार्यालयातून निघाल्यावर संध्याकाळी घरी परतताना सुरेशच्या दुचाकी समोर एक कुत्र्याचे पिल्लू आले होते. खरे तर ते पिल्लू चाकाखाली येऊन गंभीर जखमी झाले होते. ते पिल्लू जेमतेम १५ दिवसाचे असेल. त्या छोट्या कुत्र्याच्या पिल्लाची एकंदरीत जखमी परिस्थिती बघता सुरेशने त्याला तात्काळ वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिले. मात्र वैद्यकीय उपचारा नंतरही ते पिल्लू चालण्याच्या परिस्थिती मध्ये नव्हते. मात्र सुरेशला त्याचा जीव वाचवण्यात यश आले होते.
त्या कुत्र्याच्या पिल्लाची एकंदरीत जखमी परिस्थिती पाहता सुरेश त्याला स्वतःच्या घरी घेऊन गेला. पिल्लू व्यवस्थितपणे चालण्याच्या परिस्थिती पर्यंत आले की त्याला परत मुळ जागी सोडू असा सुरेशचा विचार होता. त्याच्या सोसायटी मध्ये खरेतर कुत्रा पाळायला परवानगी नव्हती. पण त्या पिल्लाला घरातच ठेवायचे होते आणि पिल्लू जखमी असल्याने त्याला सोसायटीची चिंता वाटली नाही. ते कुत्र्याचे पिल्लू ठीक होण्यास तब्बल १ महिना लागला. या १ महिन्यात सुरेश आणि त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा त्या कुत्र्याच्या पिल्ल्यावर बराच जीव जडला.
ते कुत्र्याचे पिल्लू आता दीड महिन्याचे झाले होते. ज्या जागी ते पिल्लू सापडले होते सुरेशने त्याच जागी त्या पिल्लाला परत सोडले आणि सुरेश घरी परत आला. मात्र पुढील चारच दिवसात ते कुत्र्याचे पिल्लू रस्ता शोधत आणि भटक्या कुत्र्यांपासून स्वतःचा बचाव करत परत सुरेशच्या घरापर्यंत पोहोचले. सुरेशचे घर हे त्या पिल्यासाठी आता कुटुंब बनले होते. सुरेशने त्याचा जीव वाचवला होता म्हणुन त्या पिल्याचा देखील सुरेश आणि कुटुंबीयांच्या प्रती खुप लळा निर्माण झाला होता. खरेतर सुरेश आणि त्याच्या कुटुंबीयांना त्या छोट्या पिल्लाला घरीच ठेवायची इच्छा होती. मात्र सोसायटीच्या नियमांमुळे त्यांनी आत्तापर्यंत स्वतःच्या भावनांना आवर घातला होता.
ते कुत्र्याचे पिल्ल्याला परत त्याच जागी सोडले तरीही ते पुन्हा परत येईल याची आता कुटुंबीयांना खात्री पटली होती. ते पिल्लू आता घरासोबतच सोसायटीतही वावरू लागले होते. सुरेशचे कुटुंब त्या पिल्याच्या स्वच्छतेची सोसायटीत पूर्ण काळजी घेत होते. मात्र तरीही कुत्रे पाळण्या वरून सोसायटीतील सदस्यांच्या तक्रारीला सुरुवात झाली होती. शेवटी सोसायटीतील सदस्यांनी सुरेशला स्पष्ट सांगितले की एक तर त्या पिल्लाला २४ तास तुमच्या घरातच ठेवा अन्यथा त्याला दुसरीकडे सोडुन या.
सुरेश परत एकदा त्या पिल्लाला २५ किमी दूर सोडून येतो. यावेळेस त्याने कुत्र्याच्या पिल्लाच्या डोळ्यावर पट्टी देखील बांधलेली असते. सुरेश असे करताना खरे तर आतून खुप निराश होता कारण त्याचा त्या पिल्यावर खुप जीव जडला होता. आणि सोसायटीतील सदस्यांना वाटत होते की कुत्र्याची समस्या आता स्थायी स्वरूपात सुटली आहे. मात्र परत एकदा रस्ता शोधत, भटक्या कुत्र्यांपासून स्वतःचा बचाव करत पुढील ८ दिवसातच ते पिल्लू सुरेशच्या घरी परत येते. आता मात्र सुरेश आणि कुटुंबीयांच्या विचारांना ब्रेक लागलेला असतो. सोसायटी सदस्य तक्रारीच्या भूमिकेतून आता वादावादीच्या भुमिकेत शिरले होते. सोसायटीत पहिल्यांदाच त्या कुत्र्याच्या पिल्लाचा बंदोबस्त करण्यासाठी मीटिंग आयोजित करण्यात आली.
जगात सल्ले देणाऱ्यांची कमी नसते. सोसायटी मीटिंगमध्ये एकाहून एक भारी सल्ले देणारे महाभाग सापडत होते. कुणी सांगत होते की महानगर पालिकेत कुत्रे पकडण्याचा अर्ज द्या. कुणी म्हणत होते गावाकडे घेऊन जा आणि कायमचा घरात बांधुन ठेवा. कोणी म्हणत होते की कुत्र्याला घेऊन अशा सोसायटीत जा जिथे कुत्रा ठेवायला परवानगी आहे. टोकाचा तिरस्कार करणारा एक महाभाग तर अन्नातून विष घालून त्या पिल्लाला स्वतः ठार मारायला तयार झाला होता.
सुरेश आणि कुटुंबीय मात्र द्विधा मनस्थिती मधुन जात होते. सुरेशला प्राण्यांवर प्रेम करणे आणि प्रत्यक्षात प्राणी सांभाळणे यामधील फरक फार तीव्रपणे जाणवत होता. ते पिल्लू आता ३ महिन्याचे झाले होते आणि कुटुंबातील एक सदस्य बनले होते. त्याच्या मुलांना तर त्या पिल्याचा खुपच लळा लागला होता. सुरेश सारखा विचार करत होता की हे पिल्लू आपल्या आयुष्यात काय उद्देश घेऊन आले असेल बरे? सुरेशने आजपर्यंत जी प्राण्यांची सेवा केली होती बहुदा ते पिल्लू त्या सर्व उपकरांची परतफेड करण्यासाठीच आले होते.
कारण त्या दिवशी अशीच गंभीर घटना घडली. ते ३ महिन्याचे पिल्लू सोसायटीच्या पार्किंग मध्ये सुरेशच्या लहान मुलांसोबत खेळत होते. असे म्हणतात की प्राण्यांना येणाऱ्या संकटाची चाहूल लागत असते. सुरेशच्या मुलाच्या दिशेने ब्रेक फेल झालेली एक कार भरधाव वेगाने येत होती. सुरेशचा मुलगा त्या कारखाली येणार एवढ्यात त्या कुत्र्याचे पिल्ल्याने मुलाच्या अंगावर उडी घेत त्याला ढकलले. सुरेशच्या मुलाचा जीव त्या पिल्ल्याने वाचवला होता. मात्र ते पिल्लू परत एकदा गंभीर जखमी झाले होते.
यावेळेसही सुरेशने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या कुत्र्याच्या पिल्लाचे आयुष्य तेवढेच होते बहुतेक. त्या ३ महिन्याच्या आयुष्यात ते पिल्लू सुरेशच्या मुलाचा जीव वाचवून गेले होते. बहुदा सुरेशने आयुष्यभर प्राण्यांना मदत करून कमावलेल्या पुण्याईची परतफेड एका मुक्या प्राण्यानेच केली होती. आजपर्यंत सोसायटीसाठी त्रासदायक वाटणाऱ्या त्या पिल्यासाठी आता मात्र प्रत्येक सदस्य हळहळ व्यक्त करत होता.
कथा लेखक : राहुल बोर्डे, पुणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा