भास्करस्य यथा तेजो मकरस्थस्य वर्धते । तथैव भवतां तेजो वर्धेतामिती कामये ॥ मकरसंक्रान्तिपर्वणः सर्वेभ्य: शुभाशयाः ॥
अण्णा आजोबांनी खणखणीत आवाजात श्लोक म्हटला आणि नेहमीप्रमाणे सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये आज संक्रांतीनिमित्त महिलावर्गाचे हळदीकुंकू आणि सोसायटीतील सर्वांसाठीच पावभाजी- आईस्क्रीमची पार्टी होती. वैभवीने अण्णांना तिळगूळ देऊन "गोड बोला" म्हणून नमस्कार करताच त्यांनी नेहमीप्रमाणे संस्कृत श्लोक म्हटला.
"व्हाॅट डझ इट मीन ? या श्लोकाचा अर्थ काय ?"
"जसे सूर्याचे तेज मकर संक्रमणानंतर वाढत जाते तसेच तुमचेही तेज, यश, कीर्ती वाढत जावो. तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून संक्रांतीच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद." अण्णा हसून म्हणाले.
"आणि मकर संक्रमण म्हणजे काय ?' राजसने विचारले.
"मी सांगते." नंदिनीकाकू म्हणाली.
"मकर संक्रमण म्हणजे सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. 'संक्रमण' म्हणजे बदल. संक्रांतीपासून सूर्य उत्तरेकडे सरकत असल्याचा भास होतो. म्हणजे तो आणखी आणखी उत्तरेकडे उगवू लागतो. उत्तरायण सुरू होते. हळूहळू दिवस मोठे आणि रात्री लहान होऊ लागतात. थंडीचा कडाका ओसरू लागतो. रब्बी पिकांचा हंगाम सुरू होतो. गहू, सरसू अशा पिकांचा हंगाम. आपल्या भारतात कृषिप्रधान संस्कृती होती. त्यामुळे उत्तरायण सुरू झाले की पिकांसाठी अनुकूल झालेल्या स्थितीचा आनंद साजरा करण्यासाठी मातीचा सुंदर घडा - 'सु' घट घडवून त्याची पूजा करत. मातीचे - धरणीमातेचे आभार मानण्यासाठी. 'सुघटा' ची पूजा. पुढे 'सुघट' चा अपभ्रंश 'सुगड' झाला. सुगड हे सुबत्तेचे, समृद्धीचे प्रतीक आहे. म्हणून संक्रांतीच्या दिवशी सुगडामध्ये तीळ, शेंगदाणे, उसाचे करवे, बोरं, गाजर, हरभरा, गव्हाच्या लोंब्या घालून त्याची पूजा करतात. मात्र अनेकांना यातले काहीही माहित नसते."
"अरुणा काकू, तू आयुर्वेदिक डॉक्टर आहेस. मग as a doctor तू संक्रांतीबद्दल काही सांगू शकशील का ?" क्षिप्राने विचारले.
"हो. नक्कीच डियर. संक्रांत म्हटलं की तिळगूळ आलाच. तिळाचे तेल हे नैसर्गिक माॅईश्चरायझर आहे. कोरड्या त्वचेसाठी वरदान. तिळामध्ये ई व्हिटॅमिन असते. ते थंडीमध्ये शरीराला आवश्यक ती उष्णता देते. गुळामध्ये आयर्न, मॅग्नेशियम असते. तिळगूळ एकत्र खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारशक्ती - immunity वाढते. संक्रांतीच्या आधीचा दिवस भोगी. उपभोगाचा, आनंदाचा सण. भोगीला घेवडा, वांगी, बटाटे,कोनफळ, गाजर, हरभरा, भुईमुगाच्या आणि इतर शेंगा, तिळगूळ घातलेली 'भोगीची भाजी' करतात. शिवाय तीळ लावलेली बाजरीची भाकरी, रुचकर खिचडी. हे सगळेच पदार्थ अतिशय पौष्टिक आहेत. शिवाय या काळात सेरोटोनिन या हॅपी हार्मोनचा स्तर वाढतो. त्यामुळे अंगात उत्साह संचारतो. कोवळ्या उन्हातून डी व्हिटॅमिन मिळते. म्हणून मोकळ्यावर पतंग उडवण्यासारखे खेळ खेळले जातात."
"ग्रेट ! किती मस्त माहिती आहे ही !"
"आज्यो, महाभारतात पितामह भीष्म यांना उत्तरायण लागल्यावर मरायचे होते ना ?"
"होय ओजस. बरोबर आहे तुझं." अण्णा गंभीरपणे म्हणाले. "भीष्माचार्यांना 'इच्छामरणाचा' वर मिळाला होता. त्यामुळे महाभारताच्या युद्धात शरशय्या म्हणजे बाणांच्या शय्येवर पडूनही त्यांनी उत्तरायण सुरू झाल्यानंतरच प्राण सोडायचा निश्चय केला होता. उत्तरायण सुरू होणे म्हणजे 'तमसो ss मा ज्योतिर्गमय' - अंधाराकडून प्रकाशाकडे, चैतन्याकडे जाण्याचा प्रारंभ. भगवद्गीतेतसुद्धा उत्तरायणात, शुक्ल पक्षात, दिवसाउजेडी, पूर्ण शुद्धीवर असताना मृत्यू येणे उत्तम असे सांगितले आहे. त्यामुळे भीष्मांनी उत्तरायण सुरू झाल्यानंतर देहत्याग केला.
"आपले सण, उत्सव यामागे निश्चित स्वरूपाची वैज्ञानिक, खगोलशास्त्रीय कारणे आहेत. ती शोधायला हवीत. त्याची माहिती करून न घेता नुसत्याच आंधळेपणाने प्रथा पाळणे, अमूक एक गोष्ट राहिली, केली नाही तर पूजा अपूर्ण राहिल असले खुळचट विचार करणे ही झाली अंधश्रद्धा. Technicality. मात्र आपली श्रद्धा सजग असायला हवी." नंदिनीकाकू म्हणाली.
" काकू, 'काक' म्हणजे कावळे ओरडायला लागले गं पोटात." ऐश्वर्या कुरकुरली.
"चला चला. पावभाजी वाट बघत्ये."
मंडळी लगबगीने पोटपूजा करायला उठली.
✍🏻 रश्मी साठे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा