निरंजन हा एका गरीब घरातील होतकरू मुलगा. परिस्थितीमुळे शिक्षण सातवीतच सोडावे लागले पण कष्टाला कधी मागेपुढे पाहिले नाही. शहरातील एका यशस्वी भेल व चाट सेंटरमधे काम करू लागला .सुरूवातीला फक्त तयारी करू लागला,डिश धुण्याचे कामही आनंदाने केले, पण म्हणतात ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ,उपजत बुद्धी चमकल्याशिवाय रहात नाही. हळू हळू सर्व डिशेस बनविण्यात तो तरबेज झाला.
झालं असं की हे चाट सेंटर एका प्रसिद्ध महाविद्यालयाच्या आवारात होतं. शिक्षणाचं वय तर निघून गेलं होतं पण विद्यार्थी आणि विद्यार्थिनी पाहून निरंजनला खूप हेवा वाटायचा. त्याच महाविद्यालयात सुधा शिकत होती. घरी सर्वसाधारण परिस्थिती असली तरीही ती शिकवण्या वगैरे करून शिक्षण पूर्ण करण्यासाठी धडपड करत होती. दररोज महाविद्यालयात येता जाता तिचे लक्ष निरंजनकडे जायचे . मान वर न करता आपलं काम करणार्या निरंजनचे तिला कौतुक वाटत असे .हे कौतुकच प्रेम आहे हे कळण्याचे तिचे वय नव्हते.
हळू हळू सुधा निरंजनकडे आकर्षित होऊ लागली. निरंजनबद्दल सर्व माहिती असूनही तिने त्याच्याशी विवाह केला. निरंजननेही समाज आणि नातेवाईकांना सुधाचा चुकीचा वाटणारा निर्णय बरोबर आहे हे सिद्ध करण्यासाठी रक्ताचं पाणी करून तिच्या शिक्षणासाठी पैसा मिळवण्याचा चंग मनोमन बांधला होता.
पुढे जाऊन त्याने आजवरचा अनुभव गाठीशी बांधून एका सुसंस्कृत, सुशिक्षित कॉलनीत स्वतःचा छोटा भेल आणि चाट विक्रीचा व्यवसाय सुरू केला. आणि सुधाचे शिक्षण सुरुच ठेवले. चौकात संध्याकाळी चार च्या सुमारास भेल सेंटरचा गाडा उघडायचा आणि नऊ साडेनऊपर्यंत विक्री व्हायची. एकूणच चांगलं बस्तान बसलं होतं. सुधानेही ग्रॅज्युएशन पूर्ण करून MBA ला प्रवेश घेतला होता.
कितीही चांगली वस्ती म्हणली तरी काही टवाळखोर( एकनिष्ठ कार्यकर्ते कम सतरंजीउचले) मुलांची टोळी याही काॅलनीत होती. ही मुले निरंजनला त्रास देऊ लागली. चौकात जिथे भेल सेंटर आहे ते अतिक्रमण म्हणून ग्राह्य धरले जाईल असे सांगून बलाढ्य राजकारणीय पक्षाची भीती घालून हप्ता वसूल करू लागले. दररोज वीस पंचवीस जणांना फुकटचे खायला द्यावे लागे.
गरीबी आणि पत्नीचे शिक्षण यासाठी एकेक रुपया महत्वाचा होता आणि हा त्रास जास्तीचा .त्याने जागा बदलायचा निर्णय घेतला. चौकात दररोज संध्याकाळी पाचसहाच्या दरम्यान वाॅक ला जाऊन परत येऊन काॅलनीतील कट्टयावर काही पेन्शनर, काही विद्यमान शिक्षक आणि इतर नोकरवर्गात कार्यरत जेष्ठ मंडळी बसत असत. त्यांचं लक्ष असायचं निरंजन वर. या जेष्ठ मंडळींपैकी एक काका, काॅलनीचे चेअरमन होते.
चेअरमन काका निरंजनला म्हणाले, " तू माझ्या घराच्या कंम्पाऊंड च्या बाजूलाच गाडा उभा करत जा आणि खुर्च्या स्टूल वगैरे रात्री घरी जाताना माझ्या घराच्या कंम्पाऊंडच्या आतमध्ये ठेव. बघू पुढे काय झालं तरी आमचं लक्ष आहे."
चारपाचदिवस अगदी छान गेले. त्यानंतर एक दिवस चेअरमन काकांना ती मुलं गाड्याजवळ आलेली दिसली. काकांनी पटापट फोन करून आपल्या ग्रुपला बोलवले. सगळे पाचदहा मिनीटांत हजर झाले. त्यातले पाटीलकाका जबरदस्त व्यक्तिमत्व, कोल्हापूरी गावरान भाषा आणि पिळदार मिशी, सुशिक्षित असले तरी आपला ग्रामीण बाज ते राखून होते.
पाटील काका पुढे गेले टोळीतल्या मुलांतील म्होरक्याला म्हणाले, " काय चालवलंय रे लेकाच्यांनो घरात आईबाला माहित तरी असतंय का तुम्ही कुठं बोंबलत फिरताय ते? गरीबाचं पोरगं इमानदारीनं चार पैसे मिळवायलंय तर त्याला त्रास देताय स्वतःच्या कष्टाचं दोन रुपये मिळवायची अक्कल हाय का नालायकांनो? परत या गाड्याजवळ दिसाच मग बघतो एकेकाला? " एकदम वीसभर जेष्ठ माणसं आपल्याला विरोध करतायत आणि आजूबाजूच्या महिला पण बाहेर आल्यावर ती मुलं धूम पळाली.
निरंजनने तर काकांचे पायच धरले," खूप खूप उपकार झाले काका. तुमच्या रूपाने देवच आला बघा. "
पाटील काका म्हणाले, "अरे एवढा प्रामाणिकपणे कष्ट करतोयस तर घाबरतोयस कशाला? तू चल पुढं आमचं सर्वांचं लक्ष आहे. "
पाच वर्षे झाली पत्नीचे शिक्षण तर झालेच. आणखी दोन भागांमध्ये मजूर ठेवून चाट सेंटरच्या शाखा काढल्या. कार्यक्रमांच्या मोठ्या आॅर्डरी मिळू लागल्या. संसाराच्या वेलीवर दोन फुलं उमलली. आज सकाळी सगळ्या जेष्ठ पेन्शनर ग्रुपला सहकुटुंब नव्या घराच्या ( स्वप्नातल्या राजमहालाच्या ) गृहप्रवेश समारंभासाठी आग्रहाचे आमंत्रण देण्यासाठी पत्रिका आणि पेढ्यांचा बाॅक्स घेऊन निरंजन चेअरमन काका आणि सर्वांच्या घरी प्रत्यक्ष आला होता. पाटील काकांना साश्रू नयनांनी म्हणाला , " काका, तुमच्यामुळे हे सर्व शक्य झालं. "
पाटील काका म्हणाले, "अरे वेड्या रडतोस काय असा? निरंजन अरे आज तुझ्या प्रमाणिक कष्टाचं चांदणं भर उन्हात हसतंय बघ. अरे सोन्यासारखी बायको पोरं, सावलीला घर झालं. तुझी प्रगती बघून छाती अभिमानाने भरून आली. अरे बापकमाईच्या, बेईमानीच्या लाखो रुपयांपेक्षा स्वकष्टाचे हजार रुपये खूप मोलाचे असतात. असाच प्रामाणिकपणे अजून भरभराट करशील यात शंका नाही "
हा प्रसंग सांगताना असं वाटतं समाजात प्रत्येक घटनेत आपल्याला काय करायचं जाऊ दे ज्याचं कर्म त्याच्याबरोबर असा विचार न करता अशा जेष्ठ मंडळींचा वरदहस्त, आधार जर होतकरू, बेरोजगार तरूणांना मिळाला तर चांगल्या संस्कारात वाढलेले तरूण नैराश्यात, वाईट मार्गावर जाण्यापासून रोखले जातील. एक जरी तरूण वाया गेला तर सगळं कुटुंब देशोधडीला लागत असतं. हे आजच्या काळातील जळजळीत सत्य आहे.
🖋 कल्याणी पाटील...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा