"हॅलो, वहिनी अहो, माझी पण पाळी आली, काय करायचं आता? आईंना ह्या वयात होईल का 'गौरींच' करायला?" मी घाबरतच जाउबाईना फोन केला. तर आई मागेच होत्या. "अगं, किती घाबरतेस, पाळी आली आहे, काही गुन्हा नाही झाला" आई. मी अवाक, ह्यांच्या मनात काय चालू असेल? कसं होणार पुढचे ३-४ दिवस? तरी बरं, सजावट झाली आहे, रांगोळी, भाज्या, फुलं, विड्याची पानं सगळं आणलं आहे. तरी साड्या नेसवणे, पाउलं काढणे, मुखवटे मीरवणे, सगळी मांडामांड, रात्रीचा नैवेद्य आणि पुरणावरणाचा स्वयंपाक सगळं आई कसं करतील? मी गोळ्या घ्यायला हव्या होत्या का? काय करू मी आता? "अगं, तुम्ही दोघी नका काळजी करू, 'त्या' सगळं बरोब्बर करून घेतात..." आई. मी अजून आश्चर्यचकित...
" सचिन ,तू आणि मिलिंद दोघांनी ३ दिवस सुट्टी टाकायची आहे आणि अहो, तुम्ही पण ते ऑनलाइन काय काय चालू असतं ते बंद करायचं" २० वर्षांपूर्वीच्या आई अशाच असतील असा मला भास झाला. ह्यावर्षी माहेरवाशीणींना आणायला कोण जाणार?थोडी उत्सुकता आणि थोडं अपराधीपण अशा मिश्र भावना मनात ठेवून रात्री झोप लागली 'गौरी आवाहनाच्या' दिवसाची वाट पाहत...
थोडका साधा स्वयंपाक तो ही मुलांच्या आणि नवऱ्याच्या मदतीने आईंनी १० वाजेपर्यंत अगदी तयार करून ठेवला. मुहूर्त दुपारी दीड नंतरचा असल्याने आई अगदी निवांत आणि खूप confident वाटत होत्या. जेवणं लवकर आटोपून त्यांनी मोठ्या नातवाला ठशाचा वापर करत रांगोळीने पावलं काढायला लावली आणि भाऊजींना त्यात हळदी कुंकू वहायचं फर्मान सोडलं. ह्यांना तर सकाळीच you tube वर साडी नेसवायचा विडिओ नीट बघून ठेव म्हणून order दिलीच होती.खरं तर सगळ्यांनाच हे नवीन होतं पण आईंनीच पुढाकार घेतला होता त्यामुळे नकाराचा प्रश्न नव्हता. 'कसं जमेल' ते 'झालं बघ साड्या नेसवण' हा प्रवास आई आणि ह्यांनी अपेक्षेपेक्षा खूप कमी वेळात केला. मांडलेल्या मुखवट्यांची पूजा झाल्यावर खरी आमच्या दोघींची उत्सुकता ताणली गेली होती, आता काय? चक्क आईंनी "सचिन, मिलिंद सोवळं नेसलात ना, घ्या ती ताटं. एक हाताने मुखवटे धरत प्रत्येक पावलावर ताट ठेवायचं आणि उचलायच जमेल ना?" मिश्कीलपणे आमच्याकडे बघून हसल्या देखील. 'कोण आलं, गौर आली, सोन्या चांदीच्या पावलांनी आली' ह्यातला पुरुषांच्या आवाजातला गोडवा ऐकताना स्त्री आणि पुरुषी दोन्ही इगो गळून पडत होते आणि आईंबद्दलचा आदर द्विगुणित होता. भावांनी मिरवत आणलेल्या बहिणी त्यांच्या जागेवर विराजमान झाल्या तेव्हा अगदी समाधानी दिसत होत्या. संध्याकाळचा नैवेद्य, आरती निर्विघनपणे पार पडली आणि छोटा चिंटू त्याचा डोरेमन घेऊन आला, "आज्जी, मला सोवळं आणलं तर पुढल्या वेळी ह्याला पण बसवू" सारं घर हास्यात विरघळून गेलं....
गौरीपूजनादिवशी मात्र आई लवकर उठल्या. भाऊजींना दारापुढे फुलांची रांगोळी काढायला सांगितली तर ह्यांना भाज्या चिरायला बसवलं. "तुम्ही मुली म्हणायच्या तेव्हा ऐकलं नाही मी, पण खरच १६ भाज्या एकत्र करत जाऊ इथून पुढे" अगदी मोठ्या मनाने म्हणाल्या. दोन्ही मुलांना आणि नवऱ्याला हाताशी घेत अगदी साग्र संगीत स्वयंपाक आणि पूजा आरती झाली. जेवणाची तयारी, खरकटी आवरणं, ओटा साफ करणं सारं काही मुलांकडून त्यांनी करून घेतलं. आमचा 'आमच्याशिवाय कोण करणार ' चा अभिमान क्षणोक्षणी गळून पडत होता.आम्ही दोघी तर मनोमन आईंनाच दंडवत घालत होतो. कोरोनाच्या कृपेमुळे फक्त ५ बायकांना हळदी कुंकवाला बोलावल्यामुळे पुढचं काम अगदीच सोप्प होतं.
गौरी विसर्जन आणि आम्ही मोकळ्या झाल्यावर आम्ही स्वतःहून आईंकडे गेलो आणि त्यांचं कौतुक केलं. " अगं, करतच होते की इतकी वर्षे पण सुना आल्यावर आपणहून बाजूला होऊन instructor ची भूमिका बजावायची, ते क्रिकेटमधले खेळाडू करतात ना तसं. आता जग बदललंय, तुझ्या ऑफिसमध्ये आले होते तेव्हा पाहिलं तुला किती लोक मॅडम मॅडम करत मान देत होते. तुम्ही घराबाहेरही काम करता, घरीही करता मग सासवांनी पण मुलांना तसच training नको का द्यायला? लहानपणापासून द्यायला हवं हे तितकंच खरं पण मागाहून का होईना शहाणपण आलं मला. जाणवलं की आपण मुलांना involve करून घेतलच नाही आजपर्यंत त्यामुळे सणवार ही बायकांचीच जबाबदारी असते असं त्यांनाही वाटतंय जे चुकीचं आहे. येणाऱ्या काळात असं होत राहिलं तर आणखी पुढच्या पिढीतल्या मुली सुरुवातीलाच नकार देतील. आपल्या रूढी परंपरा जपण्यासाठी मुलांनाही सामावून घेणं हा सोपा उपाय आहे". किती साधा उपाय आईंनी आम्हाला दाखवला होता ज्याच्याने आम्हाला मदत होणार , पुरुषांनाही त्यातली तीव्रता व मेहनत कळणार, सगळं घर एकत्र येणार आणि आपोआप पुढच्या पिढीवर संस्कार होणार... एक दगडात अनेक पक्षी.... मी आईंकडे बघतच राहिले.
"तुझ्या त्या कविता लिहिणाऱ्या मैत्रिणीला सांगशील का ग, प्रयत्न करते आहे मी सणावाराला 'पाळी' देखील मान्य करायचा, त्या दिवसातला पगार स्वीकारतोच ना आम्ही मग देवपूजा का नाही?थोडा वेळ लागेल एवढंच" आई. ह्यावेळीच्या गौरी आम्हाला, आम्ही काहीही न करता, प्रसादात आईंचं नवं रूप आणि आम्हाला विचारांची प्रगल्भता देऊन गेल्या हे खरंच....
©️®️डॉ शिल्पा जोशी क्षीरसागर
मागच्या वर्षी लिहिलेली कथा पण मुद्दाम आधी पोस्ट करत आहे, काय हरकत आहे आपणपण बदलायला ?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा