तसं बरंचसं कृतार्थ आयुष्य जगून तो गेला. म्हणजे बरंच जगला आणि मग गेला. तसा तो वरवर कशातही गुंतलेला नव्हता त्यामुळे चटकन मुक्त झाला. मजल दरमजल करत तो एका विस्तीर्ण मैदानाच्या एका टोकाशी येऊन पोहोचला. आता त्यापुढे बराचसा चढ दिसत होता. त्यानं पाऊल चढावर जाण्यासाठी टाकलं आणि त्याच्या लक्षात आलं की पाठीवर बरंच ओझं शिल्लक आहे. आणि कितीही प्रयत्न केला तरी ते पाठीवर घेऊन चढणं निव्वळ अशक्य आहे. इतका वेळ ते ओझं आहे ही जाणीवच नव्हती. त्याने बराच प्रयत्न केला पण ते शक्य झाले नाही.
इतक्यात कुठूनतरी एक मनुष्य पुढे आला. उघडाबंब, सावळ्या वर्णाचा, खुरटलेली दाढी, कंबरेला एक पंचासारखं काहीतरी गुंडाळलेले... तो आला तोच हसत. गडगडाटी हसला.
“काय झालं?” याने चमकून विचारलं.
“बेट्या... तुला ओझं टाकूनच पुढे जावं लागेल रे. मी इथला रक्षक. मी इथे कायम असतो. आलेल्यांना मार्गदर्शन करायला. होतं काय? आलेली प्रत्येक व्यक्ती थोडी बेसावध असते आणि ओझं तसंच घेऊन डोंगर चढायचा प्रयत्न करते. आणि या ओझ्याची गंमत म्हणजे तो तुम्ही स्वतः टाकल्याशिवाय निघत नाही.” तो म्हणाला
“पण... कसलं ओझं आहे हे?”
“तुच बघ की....” तो हसला. आणि याने पाठीवरची जड सॅक उतरवली आणि रक्षक म्हणाला त्याप्रमाणे सॅक उलटी केली, तशी तिच्यातून बरंच काही खाली पडलं.....ते पडलेलं सामान बघून तो थक्कं झाला. त्या निरनिराळ्या आकाराच्या आणि रंगांच्या चकचकीत बिया होत्या.... हे काय आहे?... त्याच्या मनात आले. तशी रक्षक म्हणाला... एकेक बी उचलून निरखून बघ... त्याने तसं केलं. आणि तो थक्कच झाला..
त्या बिया म्हणजे त्याच्या आंतर्मनात दडून बसलेल्या अनंत स्मृती होत्या. प्रत्येक बी स्वतंत्र आणि समृध्द. प्रत्येक बी मधे निरनिराळ्या स्मृतींच्या दृकश्राव्य आणि सघन नोंदी.... बालवाडीत बाईंनी दिलेल्या इवल्याशा चापटीचा तो अवमानकारक ओरखडा, जो लौकिकार्थाने आपण कधीच विसरलो आहोत असं त्याला वाटे तो तितकाच ठळक होता, कारण ती चापट मारुन झाल्यावर, अपमानाने डोळ्यात आलेलं पाणी शेजारी बसलेली नयना गुप्ते नावाची बालमैत्रिण तिच्या इवल्याशा केशरी रुमालाने पुसत होती. नयना गुप्ते? साठपासष्ठ वर्षात कधीच आठवली नाही? कुठे असेल.... त्याने दुसरी बी उचलली... कोकणात चिपळूणला आजोळी गेल्यावर आजीआजोबांचं ते जुन्या बांधणीचं घर, माजघरातला तो टिपिकल कुंद गंध, परसदारी न्हाणीघराच्या बाहेरचा तो तांब्याचा बंब, त्यातल्या जळणाचा सुगंध, गोठ्यातल्या गाईम्हशींच्या शेणामुताचा गंध, जो त्याला अतिशय आवडे, जुन्या लाईफबॉय साबणाचा सुगंध, स्वयंपाकघरात पाठमोरी उभी पण किंचित वाकलेली आजी, तिचं गडद हिरव्या रंगाचं पातळ, ती पाठमोरी असली तरी तिच्या समोर मऊभाताचं पातेलं असणार हे त्याला ठाऊक होतं. पोह्याचे पापड, खमंग साजूक तूप आणि मेतकूटाचा नॉस्टॅल्जिक सुगंध...आणि त्याच्या आत्ताच्या जीभेवर ती चवही रेंगाळली.... त्याने चमकून रक्षकाकडे बघितलं..... पण आता देह कुठेय? चव?.... रक्षक हसला... अरे ही देखील स्मृतीच रे... देह नसला तरी आभास...आणि मग पुढे असंख्य बिया तो एकापाठोपाठ उचलत निरखत गेला.... त्याच्या कॉलेजमधल्या पहिल्या प्रेयसीचं चुंबन, त्याची पहिली आकाशी रंगाची फुलपॅन्ट, त्याच्या मुंजीत आवडीची साडी घेतली नाही म्हणून फुरंगटून बसलेली त्याची आत्या, जनी नावाची मोलकरीण, स्वतःशीच बडबडत जाणारा बाबूराव नावाचा गावातला वेडा, भैरवकडची खुसखुशीत कचोरी आणि चिंचेची चटणी, काही संदर्भ न लागणारी अवखळ प्रेमपत्रं, इंदोरी पोहे, कॉलेजातल्या रिया मनचंदानीचं डीप क्लिवेज, श्रावणात घरी होणारं लघुरुद्र, ओशाळवाणं हसणारी बयोबाई गोखले, बोलता बोलता छत्रीच्या दांडायावर तर्जनीने टकटक करणारे कानविंदे मास्तर, "यंदा आमच्या मंदाचं लग्नाचं बघेन म्हणतो" असं दरवर्षी पौष महिन्याच्या शेवटी म्हणणारे आणि ऐन साठीतच तिचं लग्न न बघता निवर्तलेले बापटकाका..... “ही सगळी माणसं आणि या आठवणी? कुठे होत्या इतकी वर्षे? म्हणजे त्या माझ्यातच दडलेल्या होत्या? आश्चर्य आहे...”
“होय रे” रक्षक म्हणाला. आता तो त्याच्या शेजारी उकिडवा बसून हसला... “हे सगळे... ही असली अनंत ओझी घेऊन आपण युगानुयुगे चालत असतो. आता एक काम कर. या सगळ्या बिया त्या शेजारच्या निळ्या रंगाच्या कुंडीत टाकून दे म्हणजे ओझं नष्ट होईल. आणि मग असाच हलक्या मनाने डोंगर चढून पुढे उतर.... की नव्या जन्मात प्रवेश करशील पण त्याआधी तुझ्या पाठीवर अशाच पण अपरिपक्व नवीन बियांची पिशवी ठेवली जाईल. त्यात नव्या स्मृतींचे नाजुक कोंब असतील. तुझा नवा जन्म युरोपात कुठेतरी आहे म्हणे.... तुझ्या बॅप्टिस्माच्या वेळी चर्चबेलच्या आवाजापासून तुझ्या ग्रॅन्डमाने बनवलेल्या केकपासून आणि अठराव्या वर्षी तुझ्या पहिल्या सेक्स पासून पुढे तुझ्या ऐंशीव्या वर्षी होणाऱ्या मृत्यूपर्यंत अनंत स्मृती दडलेल्या आहेत....हा मधला डोंगर कोणी स्मृती घेऊन चढत नाही.... पण तरीही काही डॅम्बिस मंडळी माझ्या नकळत काही बिया लपवून नेतात आणि पुढच्या जन्मातल्या बियांसोबत मिसळून टाकतात अन् मग म्हणे मागच्या जन्माच्या गोष्टी आठवून मन व्यथित होतं.... ही लफडी करायला सांगितले होतं कुणी?”
“हो... तुमचं बरोबर आहे. पण काही बिया सुरेख आहेत. त्यांचा त्याग करणं नको वाटतं” तो म्हणाला
“अरे हो. पण आठवणींचा त्याग करुन पुढे जाणं आणि नव्या बियांचा स्विकार हेच विधिलिखित आहे तर मग तसंच करावं” रक्षक म्हणाला
“एक विचारु? मी टाकून दिलेल्या बियांचं काय होतं? किंवा मला पुढे ज्या बिया मिळणार आहेत त्या नवीन कोऱ्या करकरीत आहेत की अशाच कुणीतरी टाकून दिलेल्या?” तो
“या बिया अक्षय असतात. त्या नष्ट होत नाहीत ऊर्जेच्या नियमासारख्या... आता त्यावर प्रोसेस होते. संदर्भ बदलले जातात, ठळक गोष्टी वगळता बरंच काही बदलतं आणि थोड्या नव्या रुपात त्या आणखीन कोणीतरी नेतं... म्हणजे त्याला दिल्या जातात.... हे असं चक्र युगानुयुगे सुरु आहे. चल सगळी सॅक रिकामी केलीस ना? निघ आता....” रक्षक
“एक विनंती आहे.... मी ती मऊभात, तूप, मेतकूटाची स्मृती बी घेऊ का?” तो ओशाळवाणं हसून म्हणाला...
“नको.... तुला तेवढ्यासाठी म्हणजे ती स्मृती अनुभवांसाठी कोकणात यावं लागेल. निराळी माणसं असतील, संदर्भ बदललेले असतील. गोंधळ होईल. आणि मग त्या एका बी साठी तुला एअरपोर्टवर तुझा पासपोर्ट चोरीला जाणं, तिथे एकाशी उगाच वाद, एका मुलीशी तात्पुरती इन्व्हॉल्व्हमेंट या सगळ्या त्रासदायक बिया पण घ्याव्या लागतील पुढच्या स्टेशनवरुन.... त्यापेक्षा रिक्त हस्ताने जा. नव्या अनुभवांसाठी नव्या बिया घे असं मला वाटतं....”
त्रयस्थ मनाने त्या निळ्या कुंडीत सर्व बिया टाकून त्याने हात झटकले आणि रक्षकाकडे बघून स्मितहास्य करत तो शांतपणे डोंगर चढू लागला....
✍🏻 सचिन मधुकर परांजपे (पालघर)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा