एखादी गोष्ट मिळवायची असेल, तर माणसाकडे जिद्द लागते. एकदा ध्येय निश्चित केले की, माणूस त्याच्या हात धुवून मागे लागतो. सातत्य, चिकाटी, मेहनत, परीश्रम, त्याग यातून तो अपेक्षित ध्येय गाठतो. कारण प्रत्येकाला हवं ते मिळवण्यासाठी कष्ट करावेच लागतात. खेळाडू तर लहानपणापासून परीश्रम करत असतात. ते खेळासाठी आणि देशासाठी सर्वस्व त्यागून खेळतात. असाच एक खेळाडू खेळला आणि जिंकला, फक्त मैदानावरच नाही तर आयुष्यात ही जिंकला. लहानपणी झालेल्या अपघातमुळे पायातील त्राण गेले. मात्र, जिद्दीने पुन्हा उभा राहत शर्यतीत जिंकून विश्वविक्रम प्रस्थापित केला. कोण असेल हा खेळाडू आणि नेमकं काय घडलं असेल पाहूया.
कॅनसस स्टेट मधील छोट्याशा शाळेत एक ग्लेन कनिंघम नावाच्या सात वर्षाच्या मुलगा शिकत होता. तो शाळेत अपेक्षे पेक्षा लवकरचं पोहचायचा. त्या दिवशी शाळेत भयाण आग लागली. या आगीत हा मुलगा अडकला. जेव्हा विद्यार्थी आणि शिक्षक शाळेत पोहचले तेव्हा त्यांच्या लक्ष्यात आलं कि हा मुलगा त्या आगीत अडकलेला आहे.
शाळेत लागलेली आग या मुलाच्या अगदी जीवावर बेतली होती. त्याला कसंबसं त्या आगीतून बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढलं गेलं. त्याला रुग्णालयात भरती केल्या नंतर त्याची हालत पाहून डॉक्टर म्हणाले, "पुढच्या काही दिवसांत तो मुलगा नक्कीच मरण पावेल, कारण आगीमुळे त्याच्या जवळ जवळ पोटा खालील सर्व शरीर जळालेलं आहे."
पण बहुतेक त्या मुलाला एवढ्या लवकर मरण पत्करायचा नव्हतं. जगण्याच्या प्रचंड इच्छाशक्तीने त्या मुलाला तारले आणि डॉक्टरही हे पाहून आश्चर्यचकित झाले. पण डॉक्टरांनी सांगितलं, "पोटा खालील सर्व भाग जळल्यामुळे तो परत कधीच चालू शकणार नाही."
त्याला रुग्णालय मधून बरं करून सोडण्यात आलं. रुग्णालयातून घरी आल्या नंतर आपल्या पायावर पुन्हा एकदा सक्षमपणे उभे राहण्यासाठी मुलाने आत्यंतिक प्रयत्न करायला सुरुवात केली. दररोज त्याची आई त्याच्या पायांची मालिश करायची. तो सारखा प्रयत्न करायचा, पण ते त्याला अवघड जात होतं. व्हिलचेअरच्या मदतीने तो आता बाहेर जाऊ लागला. एक दिवस त्या मुलाने अगदी व्हिलचेअर वरून अंग सोडून दिलं आणि जमिनीवर तो पडला. रांगतच एका आधाराला धरून उभा राहिला. हळू हळू त्याचा आत्मविश्वास वाढू लागला. तो दररोज उठून उभा राहण्याचा प्रयत्न करू लागला. एक दिवस कोणताही आधार न घेता तो मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहिला. शेवटी त्याच्या आईने घेतलेली काळजी आणि त्याचा दृढनिश्चय यामुळे तो चालू लागला. यानंतर हळूहळू तो धावू लागला. घरातून शाळे पर्यंत तो धावत जात असे. यानंतर महाविद्यालयात धावपटूंच्या गटात तो सहभागी झाला. यानंतर त्याने अनेक मोठ मोठ्या स्पर्धेत भाग घेऊन मेडल्स मिळवली.
सन १९३४. न्यूयॉर्क मधील जगप्रसिद्ध मेडिसन स्वेअर गार्डन वर या मुलाने धावण्याच्या शर्यतीत विश्वविक्रम प्रस्थापित करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्या मुलाचे नाव डॉ. ग्लेन कनिंघम. ग्लेन उर्वरित आयुष्यात स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील की नाही याचीही शाश्वती नव्हती. मात्र, सकारात्मक विचार आणि आत्मविश्वासाच्या जोरावर अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली.
बोध
कनिंघम अनेकांचे प्रेरणास्रोत आहेत. जीवनात कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी निराश न होता; त्यावर मात करण्याची प्रचंड इच्छाशक्ती, जिद्द, संयम आणि सातत्य मनी बाळगले की गोष्टी शक्य होत जातात. यशाचं कोणतही रहस्य नसतं, त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. अपयशातून शिकावं लागतं आणि यासोबत जर जिद्द असेल तर काहीही सिद्ध करू शकतो.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा