शनिवार, १६ सप्टेंबर, २०१७

8. ...नाहीतर तुमचे आयुष्य शून्य होईल.

            लग्नाची ही  पहिली दोन-तीन वर्षे मात्र छान गुलाबी, मऊ, तरल आणि स्वप्नाळू असतात. हातात हात घालून गप्पा मारायचे असतात. नवनवीन स्वप्ने रंगवायची असतात. पण हे हि दिवस पटकन उडून जातात आणि कदाचित ह्याच काळात बँकेतील शून्य थोडेसे कमी होतात. कारण थोडी हौस-मौज केली जाते. थोडं हिरण-फिरणं होतं, खरेदी होते. मग हळूच चाहूल लागते बाळाची आणि वर्षभरातच पाळणा हालू लागतो. सर्व लक्ष आता बाळावर  केंद्रित होते. त्याच खाणं-पिण, उठ-बस, शी-शु, त्याची खेळणी, त्याचे कपडे, त्याचे लाड, कौतुक... वेळ कसा फटाफट निघून जातो. एव्हाना तिचा हात नकळत त्याच्या हातून सुटलेला असतो. गप्पा मारणं, हिंडणं-फिरणं केंव्हाच बंद झालेलं असतं. पण दोघांच्याही हे लक्षात येत नाही. अशातच तिशीचा उंबरठा ओलांडलेला असतो. बाळ मोठं होत जात. ती बाळात गुरफटत जाते आणि तो आपल्या कामात. घराचा हफ्ता, गाडीचा हफ्ता आणि त्यात बाळाची जबाबदारी; त्याच्या शिक्षणाची भविष्याची सोय आणि त्याच बरोबर बँकेत शून्य वाढवायचे टेंशन. तो पूर्णपणे स्वतःला कामात झोकून देतो. बाळाचे शाळेत admission  होते. तो मोठा होऊ लागतो. तिचा सगळा वेळ बाळाचे उठ-बस करता-करता संपतो. एव्हाना पस्तिशी आलेली असते, स्वतःच घर असतं, गाडी असते. बँकेत ब-यापैकी शून्य जमा झालेले असतात पण तरी काहीतरी कमी असते आणि पण ते काय ते समजत नसते. त्यामुळे तिची चिडचिड वाढलेली असते आणि त्याचा ही वैताग वाढत जाते आणि तो मग दार विकेंडला 'एकच प्याला' सुरु करतो. 
       दिवसामागून दिवस जात असतात; मूल मोठं होत असतं. त्याचं  स्वतःच एक विश्व तयार होत असतं. त्याचीही दहावी येते आणि जाते तोपर्यंत दोघांनीही चाळीशी ओलांडलेली असते. बँकेत शुन्यांची भर पडतच असते. एका निवांत क्षणी, त्याला मग ते जुने दिवस आठवतात... वेळ साधून "तो" तिला म्हणतो, अग, ये जरा अशी समोर , बस जवळ; पुन्हा एकदा हातात हात घालून गप्पा मारू, कुठंतरी फिरायला जावू.... ती जरा विचित्र नजरेनेच त्याच्याकडे बघून म्हणते, 'कुठल्याही वयात काहीही सुचतं  तुम्हाला; ढीगभर काम पडलीयत मला आणि तुम्हाला गप्पा सुचतायत' कमरेला पदर खोचून ती निघून जाते. मग येते पंचेचाळीशी, डोळ्यावर चश्मा चढलेला असतो; एक दोन सुरकुत्या डोकावत असतात. केस आपला काळा  कलर सोडू लागलेले असतात... मूल आता college मध्ये असतं. बँकेत शून्य वाढत असतात. तिनं आपलं नाव भजनी मंडळात घातलेलं असतं आणि ह्याचे विकेंडचे 'एकच प्याला' चे कार्यक्रम सुरूच असतात. मूल college  मधून बाहेर पडतं. आपल्या पायावर उभा राहतं, आता त्याला पंख फुटलेले असतात आणि एक दिवस ते दूर परदेशी उडून जातं. आता त्याच्या केसानी काळ्या रंगाची आणि काही ठिकाणी डोक्याची साथ सोडलेली असते. तिलाही चश्मा  लागलेला असतो. आता तो तिला "म्हतारी" म्हणू लागतो, कारण हाच म्हातारा झालेला असतो. पंचावन्न सोडून 'साठी' कडे वाटचाल सुरु होते. बँकेत आता किती शून्य आहेत हे ही  त्याला माहित नसतं. एकच  प्यालाचे कार्यक्रम एव्हाना आपोआप बंद होत आलेले असतात... औषध-गोळ्या यांच्या वेळा, वार ठरलेले असतात. डॉक्टरांच्या तारखाही ठरलेल्या असतात. मूल मोठं झाल्यावर लागतील म्हणून घेतलेलं चार-पाच खोल्यांचं घर अंगावर येत असतं. आता मूल कधीतरी परत येईल ही  वाट बघणं तेवढंच काय ते हातात असतं. 
         आणि तो एक दिवस येतो. संध्याकाळची वेळ असते. म्हातारा झोपाळ्यावर मंद झोके घेत बसलेला असतो. म्हातारी तिन्ही सांजेचा दिवा लावत असते. म्हातारा लांबूनच हे बघत असतो आणि तेवढ्यात फोन वाजतो. तो लगबगीने जाऊन फोन घेतो, समोरून मुलगा बोलत असतो. मुलगा आपल्या लग्नाची बातमी देतो आणि परदेशीच राहणार असेही सांगतो. म्हातारा थोडा गडबडतो, काय बोलावे हे त्याला सुचत नाही. म्हातारा मुलाला बँकेतल्या शून्याविषयी काय करायचं ते विचारतो... आता परदेशातल्या शून्याच्या मानाने म्हाता-याचे शून्य म्हणजे मुलाच्या दृष्टीने चिल्लरच असते. तो म्हाता-याला एक सल्ला देतो, 'एक काम करा. त्याचा एक ट्रस्ट करा आणि वृध्दाश्रमाला द्या आणि तुम्हीही तेथेच रहा.' पुढचं थोडंसं  जुजबी बोलून मुलगा फोन ठेऊन देतो. म्हातारा पुन्हा झोपाळ्यावर येऊन बसतो., म्हातारीची दिवाबत्ती होत आलेली असते. "तो" तिला हाक मारतो, 'अग ये आज पुन्हा हातात हात घालून गप्पा मारू..' म्हातारी चक्क म्हणते,'हो आलेच' म्हाता-याला विश्वासच वाटत नाही.आनंदाने त्याचा चेहरा उजळून निघतो. त्याच्या डोळ्यांत  अश्रू दाटून येतात. त्याच्या एका डोळ्यातून एक अश्रू खाली येतो. तो गालावर येतो आणि अचानक थिजून जातो. डोळ्यातलं तेज कमी-कमी होत जातं... आणि ते निस्तेज होतात. म्हातारी आपलं आटोपून म्हाता-या शेजारी झोपाळ्यावर येऊन बसते आणि म्हणते, 'बोला, काय बोलायचंय....' पण म्हातारा काहीच बोलत नाही... ती म्हाता-याला हात लावते. शरीर थंडगार पडलेले असते आणि डोळे एकटक म्हातारीला बघत असतात... क्षणभर म्हातारी हादरते. सुन्न होते, तिला काय करावं हेच सुचत नाही. पण एक-दोन मिनिटात ती लगेच सवारते. हळूच उठते. पुन्हा देवघरापाशी जाते. एक उदबत्ती लावते. देवाला नमस्कार करते; आणि पुन्हा झोपाळ्यावर येऊन बसते. म्हाता-याचा थंडगार हात घेते आणि म्हणते, 'चला कुठे जायचंय फिरायला' आणि 'काय गप्पा मारायच्यात तुम्हाला? बोला...' असं म्हणत म्हातारीचे डोळे पाणवतात. एकटक नजरेने ती म्हाता-याकडे बघत असते. आणि हळूच तिच्या डोळ्यातले अश्रू गोठून जातात आणि म्हातारीची मान अलगद म्हाता-याच्या खांद्यावर पडते. झोपाळ्याचा मंद झोका सुरूच असतो. झोपाळ्याचा मंद झोका सुरूच असतो.....  
                   त्याच्यासाठी नुसते शुन्यच जमा करत बसू नका मुलासाठी नाहीतर तुमचे आयुष्य शून्य होईल... 

लेखक- अज्ञात     
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील           

बुधवार, २ ऑगस्ट, २०१७

7. प्रेत फाडायचं आणि आयुष्य शिवायचं

      वडीलांच्या निधनानंतर पोरकं होणारं कुटुंब सांभाळण्यासाठी तिनं जणू काही आपलं आयुष्यचं गहाण टाकलं. शवचिकित्सा करण्याच्या म्हणजेच पोस्टमॉर्टम करण्याच्या खोलीत. तिचं नाव शीतल रामलाल चव्हाण. कोवळ्या वयात तिच्या हातून लेखणी गळून पडली आणि तिथं आला छिन्नी-हातोडा आणि ब्लेड. स्वत:चं फाटलेलं आयुष्य शिवण्यासाठी, टाके घालण्यासाठी तिला फाडावी लागतात प्रेतं. या कामानं तिच्या संवेदना बधीर झाल्या आहेत. रडूनच विसरुन गेलीय ती. आता थोडं वेगळं काम करायचं आणि वेगळं जगायचं स्वप्न तिच्या डोळ्यात तरळूलागलंय. पण या स्वप्नाला खतपाणी कोणी घालेल? पंख कोण देईल?
     23 जुलै 2014 च्या कोवळ्या दुपारी भोरमध्ये पोहोचलो. तेंव्हा ऊन-पावसाचा एक सुंदर खेळ सुरु होता. खेळ म्हणण्याऐवजी एक सुंदर जुगलबंदी सुरु होती. सवाल जबाब सुरु होता. बालकवींची कविताच भोरमध्ये सर्वत्र संचार करत आहे की काय, असं वाटत होतं. कोणे एकेकाळी संस्थान असलेल्या भोरमध्ये चौकाचौकात वेगवेगळ्या समग्राटांची होर्डिंग्ज झळकत होती. कधी एकदा पाऊस थांबेल, असंचे लोकांना वाटत होतं. धरणं भरली होती. शेती कोवळी मऊशार झाली होती. एका चौकात गाडी थांबवून आम्ही गाडीतून उतरलो. समोरुन उंच, सडपातळ अशी एक मुलगी आली. "ताई बाहेर गेलीय. अर्ध्या तासांत येईल." असं ती म्हणाली. क्षणभर ती थांबली आणि म्हणाली, "सर, तुम्ही आमच्या घरी कसे येणार...! रस्ता तर चिखलानं-पाण्यानं भरलाय. बाहेर भेटता का तिला?" "नाही." म्हणत आम्ही तिच्या घरावर नजर टाकली. पाच पत्र्यांचं तिचं घर दिसू लागलं. रस्त्यावर माणसं रोखून धरणारा चिखल दिसू लागला. चिखल तुडवत आम्ही परत येऊ, असं तिला म्हणजे गुड्डीला सांगितलं आणि आम्ही माघारी वळलो. तात्याच्या खानावळीत मस्त जेवलो. हा तात्या म्हणजे पूर्वीचा कामगार. भोरमधलं औद्योगिक क्षेत्र कोसळलं, तेंव्हा याची नोकरी गेली. पुन्हा मिळाली नाही. तात्यानं घरीच खानावळ चालू केली. तात्याच्या हातचं खाणं, त्याच्या आग्रहाखातर खाणं, हा एक विलक्षण आनंद असतो. ज्याला जेंव्हा-केंव्हा संधी मिळेल तेंव्हा त्यानं ती अवश्य घ्यावी.
     भोजनानंतर आम्ही पुन्हा तिच्या घरी निघालो. ती म्हणजे शीतल. अधूनमधून कोणत्या कोणत्या तरी पेपरात तिची बातमी वाचलेली. मोहिनीनं काढलेल्या "पृथा" या अंकाला तिचं मुखपृष्ठ होतं. अतिशय सुंदर फोटो होता. संगमरवरी दगडात घडवलेल्या ग्रीक किंवा रोमन सौंदर्यदेवतेसारखा फोटो वाटत होता तो. कुणी कुणी तरी शीतलचा सत्कार केला होता. ते फोटोही मी बघितले होते. अलीकडं सत्कार करणं, पुरस्कार देणं स्वस्त झालंय. संस्थापकाचं ठळक नाव असलेली एक बाहुली दिली आणि खांद्यावर शाल टाकली की झाला सत्कार. अलीकडे सत्कार समारंभाचाही एक कुटीरोद्योग, खादी ग्रामोद्योग झालाय. शीतलच्या घरात म्हणजे पत्र्याच्या एका डब्यात गेलो. पत्रे ठोकल्यामुळं एक पोकळी तयार झाली होती आणि त्या पोकळीत ही राहत होती. चार बहिणी म्हणजे गुड्डी, ममता, पल्लवी आणि लग्नानंतर पुण्यात गेलेली सविता. सोतब दोन भाऊ आणि आई. कुटुंब तसं सात जणांचं. गुड्डी कंत्राटावर सरकारी ऑफिसात शिपाई म्हणून चिकटलीय. तिला तीन हजार रुपये पगार. भाऊ कुठंतरी गॅरेजात राबतोय. दोन बहिणी शिकतात आणि विधवा आई. अख्ख्या घराबा खांब होतोय... त्याचा तोल सावरतेय.
     ही आहे पुणे जिल्ह्यातील भोरमध्ये राहणारी शितल रामलाल चव्हाण. जगण्यासाठी तिनं मृतांचं जग जवळ केलंय. पण आता आपलं हे जग बदलायला हवं, असं तिला तीव्रतेनं वाटू लागलंय. कसं आणि कोण बदलणार तिचं हे जग? शीतल रामलाल चव्हाण हे तिचं संपूर्ण नांव. आपलं कुटुंब कुठून आलं भाकरीच्या शोधात हे कुणालाही सांगता येत नाही. वाल्मीकी समाजातलं हे कुटुंब कितीतरी वर्षांपासून भोरमध्ये स्थिरावलंय. शीतलचा आजोबा सफाई कामगार होता. डॉक्टरांच्या सहवासात राहून पोस्टमॉर्टम (पीएम) करायला तो शिकला. त्याचा मुलगा रामलाल. तो भोरमध्ये मजूरी करायचा. वडिलांमुळं त्यालाही पीएम करता यायचं पण हे काही पूर्णवेळ काम नव्हतं. कधी बोलावणं आलं तर जायचं, अन्यथा बिगारी काम शोधायचं. त्याला पहिली मुलगी झाली ती शीतल. ती बापाची लाडकी. बापाच्या कामात मदत करायची. बाप म्हातारा झाला. आजारी पडू लागला, तेंव्हा ती पोस्टमॉर्टमसाठी जाऊ लागली. पहिल्यांदा पीएम केलं तेंव्हा ती असावी 12-13 वर्षांची. सहावी-सातवीत गळून पडलेली. पाण्यात बुडून फुगलेली डेड बॉडी आली होती. पीएम करायचं होतं. बॉडी वरपासून खालपर्यंत फाडून पुन्हा शिवायची होती. वडीलांनी धीर दिला. मेलेल्या माणसाचा त्रास नसतो होत, असं सांगितलं. शीतल उभी राहिली हातात छन्नी-हातोडा आणि ब्लेड घेऊन. एक कोवळा जीव प्रेत फाडू लागला. शिवू लागला... वउील अधिकच अशक्त होऊ लागले. तेंव्हा तर शीतल सात्यत्यानं त्यांच्याबरोबर जाऊ लागली आणि बघता-बघता डेड बॉडीच्या जगात स्थिरावली. कारण तिला जगायचं होतं. कुटुंब जगवायचं होतं आणि त्यासाठी तिला उपलब्ध झालं मयतांचं जग...
     शीतल म्हणाली, "वारंवार प्रेतं बघून आणि ती फाडून नजर मरुन जाते. भीती संपून जाते. कामाचं काहीच वाटत नाही. भूत-पिशाच्च वगैरे काही नसतात. आत्मा असला तर तो मरणाबरोबरच निघून जात असावा. मला तरी कुठं तसं काही दिसलेलं नाही. एक खरं आहे की प्रताची दुर्गंधी सहन करणं खूप कठीण असतं. काही वेळा त्यात किडे-आळ्या होतात. दुर्गंधी रंधारंधात घुसते आणि पुढं चार दिवस डोक सुन्न होऊन जातं. अन्नापाण्यावरची वासना उडून जाते. मग पुन्हा रुटीनवर येतं. पुन्हा पीएम करण्यासाठी कॉल येतो. खंडाळा, शिरवळ, वेल्हे, वरंदळ आदी अनेक ठिकाणी स्पॉट पीएमसाठी बोलावलं जातं.
     पीएम करण्यासाठी बहुतेक सरकारी दवाखान्यांसमोर कुणीतरी कफल्लक, व्यसनी किंवा असाच कुणीतरी माणूस असतो. बहुतेक ठिकाणी राजस्थानमधून आलेले काही जण असतात. पीएम करण्यापूर्वी ते हातभट्टी भरपूर रिचवतात. जणूकाही नशेतच डेड बॉडी फाडायला लागतात, जोडायला लागतात. दुर्गंधीचं त्यांना काहीच वाटत नाही. कारण त्यावर मात करणारी दारु त्यांनी रिचवलेली असते. पीएम करणारा म्हणून कोणी पूर्णवेळ नोकरीत नसतो. कारण हे कामही ग्रामीण भागात रोज नसतं. दवाखान्यातला कुणी तरी स्वीपर किंवा बाहेरचा कुणीतरी कठोर दिलवाला अशी कामं करत असतो. शीतलंचही तसंच झालंय. वडीलांच्या निधनानंतर तिला स्वीपरची नोकरी मिळाली. सात-आठ हजार रुपयांत दवाखाना स्वच्छ ठेवायचा, तिथलं स्वच्छतागृह साफ करायचं काम असतं. शिवाय वर्दी आली, की पीएम साठी जायचं. वर्दी कुठूनही आणि कधीही येऊ शकते. आपलं काम झटपट आणि चांगलं व्हावं म्हणून तिनं स्वत:च स्वत:च्या पैशातून घिसाड्याकडून एक धारदार हातोडा आणि छिन्नी विकत घेतलीय. सरकारी खात्यात हत्याराला धार कमी असते आणि कागद अगदी धारदार असतात. कधी टेंडर मंजूर झालं तर हत्यारावर धारीचं पाणी पडतं.
     मुलांच्या जगातल्या विलक्षण अनुभवांनी शितलचं 28 वर्षांचं आयुष्य सरुन गेलंय. "कुणीतरी मातेनं आपलं दोन-तीन दिवसाचं अर्भक दिलं होत फेकून... त्याचं पीएम झालं. कुणी तरी एक बाईला जाळून फेकली होती. तिचं पीएम झालं. कुणी तरी कुणाचा खून करुन प्रेत पुरुन टाकलं होतं. कितीतरीदिवसांनी जंगली जनावरांनी ते प्रेत उरकून काढलं. त्याचे तुकडे झाले. त्याचंही पीएम झालं. एकाला कुणीतरी गोळ्या घातल्या होत्या. डेड बॉडी कुजलेली... गोळ्या सापडत नव्हत्या... डेड बॉडीला आंघोळ घालून लोहचुंबकाच्या मदतीनं गोळ्या काढण्यात आल्या. मांढरदेवीच्या यात्रेत चेंगराचेंगरी झाली आणि मृतांचा ढीगच लागला. रात्रंदिवस पीएम करुन डेड बॉडी नातेवाईकांच्या ताब्यात दिल्या. चेलाडी फाट्याजवळ कुणातरी धिप्पाड माणसाचा खून झाला होता. कवटी काही केल्यानं फुटत नव्हती. कवटी फोडणं आणि सडलेलं, कुजलेलं, जळलेलं, तुटलेलं देह फाडणं खूप आव्हानात्मक असतं." बोलता बोलता शीतलंन किती प्रेतांच्या आणि मरणाच्या कथा सांगितल्या हे तिलाही कळलं नसावं.
     अनेकदा खूप मोठं काम येतं आणि ते एकटीच्या क्षमतेपलीकडं जातं. रोहन हा शीतला भाऊ मदतीसाठी जाऊ लागला. गुड्डीही जाऊ लागली. गुड्डीचं  एक वैशिष्ट्य आहे, पीएमच्या वेळी कुणीतरी तिच्या आजूबाजूला उभं असावं लागतं. तशी ती घाबरट आहे. माणूस सुंदर आहे, पवित्र आहे पण त्याची आकडलेली बॉडी आणि पीएम करतेवेळी दिसणारी बॉडी पाहणं केवळ आणि केवळ कठीण असतं. शेरदिल माणूसच तसं करु शकतो. शीतल, तिचा भाऊ, तिची बहीण यांनी असं काळीज कमावलंय किंवा जगण्यासाठी ते त्यांना कमवावं लागलंय. पीएम झाल्यानंतर कुणीतरी नातेवाईक पैसे देतात, पण बरेचजण देतही नाहीत. ते दु:खात असतात. शीतलंन आत्तापर्यंत कुणाकडं स्वत:हून पैसे मागितलेले नाहीत. बऱ्याच वेळा बॉडी, शिवून त्यावर पांढरं कापड टाकून, ती पॅक करुन अंत्यसंस्कारायोग्य किंवा पाहण्यायोग्य करावी लागते. ते कामही शीतल करते. कपडे वगैरे वसतू स्वत:च विकत आणते. त्याचे पैसे कुणी देतात किंवा देतही नाहीत. प्रसंगच असा असतो, की दु:खापुढं बाकी कोणतीच गोष्ट टिकत नाही. स्पॉटवर पीएम करायचं असतं, तेंव्हा तर दिवसभर अन्न-पाणीही मिळत नाही.
     गुड्डीने एक-दोन अल्बम दाखवले. एरवी आपण एखाद्या कुटुंबात जातो, तेंव्हा सभासमारंभाची, सौंदर्याची आणि कुणी कुणाच्या गळ्यात गळा घातलेली छायाचित्रं बघायला मिळतात, आणि इथं...? छिन्न-विछिन्न झालेलं देह, कवटी फुटून बाहेर आलेला मेंदू वगैरे वगैरे...! छायाचित्र बघताना चक्कर आल्याशिवाय राहत नाही. प्रत्यक्षात शीतल हे काम कसं करत असेल, याचा अंदाज यायला लागतो.
     आपण किती पीएम केली याचा आकडा शीतलला सांगता येत नाही, पण आता कामात काहीतरी बदल यावा... साफसफाईचं काम मिळावं... शिपायाचं काम मिळावं... कुणीतरी आपला गांभीर्यानं विचार करुन आपल्यावर उपकार करावेत, असं तिला वाटातंय. लग्नाचा विचारही तिच्या मनात तरळून जातोय. प्रेतं फाडून तिचा एक केमिकल लोचा झालाय. दु:ख पचवण्याची दांडगी सवय लागल्यानं तिला रडताच येत नाही. काहीही घडलं तरी तिला रडू फुटत नाही. बाप मेला तरी हिचे डोळे ओले झाले नाहीत. रडायला येत नाही, याची खंतही तिला आहे. शिवाय सारं कुटुंब तिच्या खांद्यावर आहे. दोन बहिणी दहावी-बारावीत आहेत. त्या दोघीही कधी ना कधी प्रतांना जाऊन धडकल्या आहेत, पण त्यांना शिकून डॉक्टर-इंजिनीअर वगैरे व्हायचं आहे. घरात प्रत्येकाचं कोणतं ना कोणतं स्वप्न आहे. त्याला पंख देण्याची जबाबदारी शीतलची आहे. कदाचित या स्वप्नांमुळंच ती रडण्यापासून मुक्त झाली असेल. स्वप्नपूर्तीच्या साऱ्याच वाटा बंद झाल्या असल्यानंही ती प्रेत फाडून शिवत असेल.
     पीएम करणारी देशातली ती बहुतेक पहिलीच महिला असावी आणि आता तिला या जगातून                 दुस-या  जगात जायचं आहे. कसं जाणार? महाशक्तीमान असणा-या  समाजानं आणि शासनानं मनावर घेतलं तर तिला कुठंही शिपाई म्हणून नेमता येतं. आहे त्या पदावरुन इतर ठिकाणी बदली करता येते. भावडांच्या शिक्षणाचा खर्च उचलता येतो. बीपीएलसाठीच्या योजनांमध्ये वीतभर घर तिला देता येतं. आयुष्यभर पीएम करत राहणं.... मृतांवर हत्यार चालवत राहणं हे काही सोप काम नाही. खूप त्याग केलेला असतो. खूप संवेदनाही मारलेल्या असतात. प्रसंगी स्वत:चं रुपांतरही मृतात केलेलं असतं. शीतलच्या मनात समाजसेवेच्या इच्छा खूप मोठ्या आहेत आणि हेही खरंच की, तिच्या कामाचं कौतुक करुन तिला बढती देण्याचीही गरज आहे. तिच्या खांद्यावर नुसतीच शाल टाकून तिचं जग काही बदलणार नाही. ज्यांना कुणाला तिचं कौतुक करायचं असेल, शाब्बासकी द्यायची असेल, तिच्या स्वप्नांना पंख द्यायचे असतील तर हा तिचा पत्ता : शीतल रामलाल चव्हाण, घर नंबर 569, नागोबा आळी, भोर ता. भोर ‍जि. पुणे मोबाईल नंबर : 7038875310. शीतलनं जगण्यासाठी मृतांचं जग जवळ केलंय हे खरं आहे पण जीवंत माणसांच्या जगात आत्मसन्मानानं जगण्याचा तिचा हक्क नाकारुन कसा चालेल?
 
 लेखक : उत्तम कांबळे (सप्तरंग सकाळ पेपर तारीख 27 जुलै 2014.)
-------------------------------------------------------------------------------------------

सोमवार, १२ जून, २०१७

6. तिच्या आठवणी जपायच्यात...

सुंदर नि स्मार्ट संकल्प... 
माझ्या आयुष्याचा आणि भविष्याचा, 
आहे तिच्या आठवणी जपण्याचा... 
ती... 

सुंदर, सालस, सोजळ माझी पत्नी,
नशिबाने घाला घातला आणि 
तिला देवघराचं बोलावणं  आलं, 
दिल्या घेतल्या साऱ्या वचनांना,
विसरून ती दूर गेली. 

पाण्यात जशी साखर मिसळावी,
तशी ती माझ्यात मिसळली होती. 
थिजून गेलेल्या अश्रूंच्या सागरांनी, 
डोळ्यात माझ्या गर्दी केली. 
त्या सागरांना आलेली भरती,
 आजही ओसरायला तयार नाही. 
आजही माझ्या डोळ्यांच्या खाचांत,
शिरत जातो काळोख, 
पण त्या काळोखाचा मी तिला
स्पर्शही होऊ दिला नाही. 

माझ्या व माझ्या प्रेमाचे पंख, 
त्या नराधमांनी क्षणात छाटले. 
कसलीच दयामाया नाही आली त्यांना,
तिच्याशिवाय जगताना. 

मोठ्याने ओरडून म्हणावं वाटतं,
"निर्दयहो, तुडवा माझी वेदना,
कुरतुडून टाका माझी संवेदना, 
आणि संपवा रे माझं दुर्दैवी आयुष्य..."
कारण तिच्याशिवाय मला, 
क्षणभरही जगावं वाटत नाही. 
तिच्याशिवाय जगताना,
स्वतःचीच घृणा वाटते मला. 

पण तरीही मला जगावं लागेल... 
केवळ आणि केवळ तिच्यासाठीच. 
पण मारून पडलाय सारा आज
डोळ्यावर चिखल थापलेला घातक  प्रवास. 
लुप्त होत चालल्यायत,
घायाळ आठवणींच्या करूनक्रांत किंकाळ्या.  

ती तर माझी जीवन होती. 
ती गेली आणि माझा प्रत्येक 
अवयव निर्जीव झाला. 
दुनियेने तर कहरच केला आणि 
माझ्याच जीवाचा जीव घेतल्याचा 
हीन  आरोपही माझ्यावर केला. 

तरीपण आज मी स्थिर आहे,
हो... स्थिरच आहे मी... 
जगतोय तिच्या आठवणीत, 
कारण तिच्या आठवणीच तर,
माझ्या जगण्याचं कारण बनल्यात, 
माझा श्वास बनल्यात. 

मला मी संपण्याची मुळीच भीती नाही. 
पण मी संपल्यावर मात्र, 
तीही संपण्याची भीती वाटते मला. 
पण मी संपणार नाही... 

म्हणून माझा संकल्प हाच आहे की,
शेवटच्या श्वासापर्यंत मी,
तिच्या आठवणी जपणार आहे. 
तिच्या अदृश्य अस्तित्वाला सोबत घेऊन, 
रंगवणार आहे परत एकदा स्वप्न... 

मी आजही तिथेच थांबलोय,
जिथून ती गेली होती... 
मी आजही तिच्या जवळ आहे,
आणि जगतोय तिच्यासोबत,
भूतकाळातल्या त्याच प्रत्येक क्षणात,
ज्या क्षणात होतो फक्त मी आणि तीच,
आणि आमच्यातही होता तोच क्षण,
त्या क्षणांनाच जिवंत ठेवण्यासाठी, 
तिच्या आठवणी जपायच्यात मला... 
आणि मी जपणार आहे.... 
जपतच  राहणार आहे.... !

                                                                                                                                                                       लेखक : राजेंद्र शंकर राऊत, नाशिक. 

शनिवार, २७ मे, २०१७

5. निर्णय - भाग २

          शहरात येऊन विजयला १ वर्ष  झाले होते. एका अपार्टमेंटमधील  फ्लॅट त्याने भाड्याने  घेऊन तो राहत होता. १ वर्षात त्याने  बरीच माहिती गोळा केली होती. रात्री ११ वाजता विजय फ्लॅटला कुलूप लावून बाहेर पडला. मोटारसायकल घेऊन डोंगराळ भागातील एका खेडेगावात पोहोचला. ४  तासांचा प्रवास.... शेवटी त्याला ज्या ठिकाणी पोहचायचे होते तेथे पोहचला...  जुनी चाळ  होती ती.  विजयने  गाडी चाळीच्या शेजारी लावली व चाळीत प्रवेश केला. चाळीच्या गेटजवळ वाचमॅन झोपला होता. गेटला  कुलूप होते. पण गेटचा  छोटा दरवाजा उघडा होता. विजयने गेटमधून चाळीत प्रवेश केला. हळूहळू चालत जिन्यावरून तो पहिल्या मजल्यावरील चाळीच्या एका  रूमसमोर आला. दरवाज्याशेजारील बेल वाजवली. परंतु आतून काही प्रतिसाद येत नव्हता. परत  पुन्हा बेल वाजवली. पण काही  उपयोग झाला नाही. तिस-या वेळेस आतून दरवाजा उघडला गेला. दरवाजासमोरील व्यक्ती झोपेच्या नशेत जांभई देत विजयला म्हणाली,
"कोण पाहिजे आपणाला?"
"तू... तू पाहिजे  होतास." म्हणत विजयने लगेच त्याच्या तोंडावर एक हात ठेऊन दुस-या हाताने त्याला खोलीत ढकलले. ती व्यक्ती आरडा-ओरड करणार इतक्यात विजयने कमरेतील  चाकू काढला व त्याच्या पोटात तीन वेळा खुपसला. तो मृत झाला आहे याची खात्री झालेवर त्याने त्याच्या तोंडावरील हात काढला. त्या व्यक्तीचे शरीर हळूहळू भिंतीला घसरत खाली पडणार होते इतक्यात विजयने त्याला धरून पलंगावर ठेवले. दरवाजा बंद केला. चाकू पाण्याने धुऊन काढला. मृत शरीराजवळ स्प्रे मारला. रूममधील त्यांच्या झालेल्या हालचालींमुळे थोड्या वस्तू विस्कटलेल्या होत्या. त्या व्यवस्थित लावल्या. खोलीतील लाईट बंद करण्यापूर्वी बॉडीच्या हातात एक चिट्ठी ठेवली.  लाईट बंद करून दरवाजा लावून विजय चाळीतून बाहेर पडणार इतक्यात वॉचमॅनला जाग आली. तो झोपेच्या नशेतच होता. कोणीतरी जिन्यावरून खाली येत आहे म्हणून तो आळसातच  खुर्चीवरून उठला व थेट बॅटरीचा प्रकाशझोत विजयच्या चेह-यावर मारला. आता विजय त्याच्या समोर आला. विजयने चेह-यावर रुमाल बांधलेला होता. वॉचमॅनच्या ज्यावेळी हे लक्षात आले त्यावेळी मात्र त्याची झोप उडाली. विजय गेटमधून बाहेर पडणार इतक्यात त्याच्या समोर जाऊन त्याने विजयला आडवले व तो म्हणाला,
"तुम्ही कोण? इतक्या रात्री इथे कसे काय आला? तुम्ही इथे कोणाकडे आला होता?"
           वॉचमॅनच्या प्रश्नांचा भडीमार चालूच असतानाच विजयने खिशातून एक बाटली काढली. बाटलीतील द्रव पदार्थ आपल्या रुमालावर ओतला व तो रुमाल जलद गतीने वॉचमॅनच्या तोंडाला लावला. हे सर्व होत असताना वॉचमॅनने विजयला विरोध केला परंतु त्याला यश आले नाही. वॉचमॅनला बेशुद्ध अवस्थेत खुर्चीवर बसविले. आपली गाडी घेऊन विजय परत फ्लॅटमध्ये आला.
            दुसऱ्या दिवशी पहाटे ६ वाजता चाळीतील एका व्यक्तीने वॉचमॅनला झोपलेल्या अवस्थेत पाहून उठवण्याचा प्रयत्न केला. वॉचमॅन शुद्धीवर येताच त्याने मोठ्याने ओरडायला सुरवात केली.
"चोर... चोर... चोर..."
"अहो काका... असं  काय करताय. मी चोर नाही... मी सागर... इथे चाळीतच राहतो. सकाळी व्यायामासाठी बाहेर धावण्यासाठी गेलो होतो. परत फ्लॅटमध्ये जात असताना माझे लक्ष तुमच्याकडे गेले. तुमची झोप लागली वाटतं  म्हणून मी तुम्हाला उठविण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही असे ओरडायला लागलात."
"नाही... मी तुम्हाला चोर म्हणालो नाही... इथे काल रात्री एक माणूस आला होता. माहित नाही कोण होता. त्याने तोंडावर रुमाल बांधला होता. मी त्याची चौकशी करत असताना त्याने माझ्या तोंडावर रुमाल धरून मला बेशुद्ध केले."
               दोघांचे संभाषण चालू असताना चाळीतील लोक गोळा झालेत. त्यानंतर सर्वजण आपापल्या खोलीत जाऊन वस्तू व इतर साहित्यांची तपासणी करू लागले. वॉचमनसुध्दा वरती येऊन पाहणी करू लागला. अचानक त्याला एक दरवाजा बंद दिसला. त्या दरवाज्यासमोर उभे राहून पहिले तर बाहेरून कडी लावली होती. त्याने दरवाजा उघडला आणि समोर पाहतो तर काय पलंगावर एका व्यक्तीचा मृतदेह पडला आहे.
"खून... खून... खून.." म्हणत वॉचमॅनने  ओरडायला सुरवात केली. त्याच्या ह्या आवाजाने चाळीतील लोक गोळा झाले. बघता-बघता हि बातमी थोड्याच वेळात पोलिसांपर्यंत गेली. मग थोड्या वेळाने पोलीस चाळीत हजर झाले. त्यांनी जागेची पाहणी करून बॉडी ताब्यात घेतली व वॉचमॅनला  बोलावले.
"नमस्कार साहेब..." वॉचमॅनने  आल्या-आल्या नमस्कार केला. इन्स्पेक्टर कदम या केसचे मुख्य अधिकारी होते. त्यांच्यासोबत चार हवालदार होते.
"तुमचे नाव काय?" इ. कदम यांनी वॉचमॅनला  विचारले.
"संदीप." वॉचमॅन  म्हणाला.
"बर... ज्या व्यक्तीचा खून झाला त्याचे नाव काय?"
"विकास पाटील."
"तुम्ही सर्वप्रथम बॉडीला पहिले होते ना?"
"होय साहेब."
"तुम्हाला कसे समजले कि येथे खून झाला आहे."
"साहेब... मला ह्याबद्दल काही कल्पना नव्हती. हां... पण काल रात्री एक माणूस आला होता. त्याने चेहऱ्यावर रुमाल बांधला होता. मी त्याची चौकशी करत असताना त्याने मला बेशुद्ध केले. सकाळी मला जेंव्हा जागे केले तोपर्यंत तो निघून गेला होता. मग मला वाटले तो चोरच असणार. मी याबाबत येथील अध्यक्षांना कल्पना दिली. मग त्यांनीच तुम्हाला फोन करून बोलावून घेतले. इतक्यात अध्यक्ष तेथे हजर झाले.
"नमस्कार सर..." अहुजा म्हणाले.
"ह्म्म्म... तुम्ही बॉडीला कधी पहिले?"
"संदीपने सर्वप्रथम मला कल्पना दिली व त्यानंतर मी तुम्हाला कॉल केला." इ. कदम यांनी सर्वप्रथम पंचनामा केला. त्यांचे सर्व आटोपल्यानंतर ते म्हणाले,
"बरं... आम्ही आता बॉडी पोस्टमार्टमसाठी घेऊन जात आहोत. जर काही आवश्यकता भासली तर तुम्हाला व संदीपला चौकशीसाठी बोलावले नंतर यावे लागेल."
"ठीक आहे साहेब..." संदीप व अहुजा दोघेही एकदम म्हणाले.
            बॉडी ताब्यात घेऊन इ. कदम पोस्टमार्टम करण्यासाठी हॉस्पिटलकडे निघाले.  हवालदार शिंदे व इ. कदम यांची चर्चा सुरु झाली.
"सर... काय वाटते तुम्हाला?"
"आता तसे काही सांगता येणार नाही. पोस्टमार्टमचा रिपोर्ट आल्यानंतर काहीतरी सुगावा लागेल. शिवाय बॉडीजवळ एक चिट्ठी होती. त्यामध्ये फक्त 'ल' हे अक्षर टाईप केलेले आहे. यावरून तर काहीच समजत नाही. बघू... पुढे काय होते ते." बोलता-बोलता ते हॉस्पिटलमधून पोलिस स्टेशनला पोहचले.
               सायंकाळी ४ वाजता पोस्टमार्टमचा रिपोर्ट घेऊन शिंदे हवालदार आले. रिपोर्टमध्ये फक्त चाकूचा वापर करून खून करण्यात आलेला असावा. तसेच तो चाकू तीन वेळा एकाच ठिकाणी खुपसण्यात आला आहे असे निदर्शनास आले. इ. कदम यांनी विकास पाटील याची सखोल माहिती काढण्यास शिंदे व इतर हवालदाराना सांगितले.
                   या घटनेच्या दोन दिवसानंतर विजय पुन्हा आपल्या बाईकवरून रात्री एका ठिकाणी आला. सुरवातीला विजय ज्या डोंगराळ भागात गेला होता तेथून ५ किलोमीटर अंतरावर एक खेडेगांव  होते. त्या खेडेगावाजवळ असलेल्या शेतीत एक फार्म हाऊस होते. गावातील सरपंच यांची १० एकर शेती होती. रात्री २ च्या दरम्यान विजय तेथे पोहचला. गाडी मुख्य रस्त्याच्या एका बाजूला लावली. तोंडावर रुमाल बांधलेला होताच. हातमोजेसुद्धा घातलेले होते. फार्महाऊसच्या शेजारी एक छोटीशी खोली होती. विजयने  त्या खोलीजवळ जाऊन दरवाजा ठोठावला. सुरवातीला काही प्रतिसाद मिळाला नाही. परंतु सारखा दरवाजा ठोठावल्याने त्यामुळे होणा-या आवाजाने एक व्यक्ती दरवाज्याजवळ आली व तिने दरवाजा उघडला. त्या व्यक्तीने झोपेच्या अवस्थेतच प्रश्न केला,
"तुम्ही कोण आहात आणि कोण पाहिजे तुम्हाला?" विजयचा चाकू त्याच्या हातात तयार होताच.
"तूच पाहिजे होतास." म्हणत त्याच्या तोंडावर हात धरला. त्याचे तोंड दाबून त्याला आत भिंतीवर ढकलले आणि त्या व्यक्तीला काही कळायच्या आत चाकूने भोकसले ते पण सलग तीन वेळा. त्या व्यक्तीची धडपड पूर्णपणे थांबली कारण त्याने प्राण सोडला होता. विजयने त्याला खाटावर  झोपवले. हातात एक चिठ्ठी ठेवली व निघून गेला.
                        त्या रात्रीच्या दुस-या दिवशी सकाळी १० वाजता इ. कदम यांना call  आला.
"साहेब, मी सरपंच हणमंत पाटील बोलत आहे. आमच्या फार्महाऊसमध्ये एका नोकराचा  खून झाला आहे. तुम्ही ताबडतोब येथे या."
"ठीक आहे." म्हणत इ. कदम यांनी गाडी काढली व थोड्या वेळात सरपंचांच्या फार्महाऊसमध्ये पोहचले. बॉडी ताब्यात घेतली व सरपंचांना म्हणाले,
"तुम्हाला कसे समजले आणि ज्याचा खून झाला त्याचे नाव काय?"
"साहेब, त्याचे नाव राम होते. तो एक वर्षांपूर्वी आमच्या येथे कामासाठी आला होता. घरकामासाठी अगोदरच एक मोलकरीण आमच्या येथे आहे.  परत दुसरीकडे कुठेतरी काम बघ असे सांगितले. पण तो तयार नव्हता. म्हणाला, की  खूप ठिकाणी चौकशी केली पण काम काही मिळाले नाही. खूप आशा घेऊन आलो आहे तुमच्याकडे. कृपया नाही म्हणू नका असे म्हणत त्याने माझे दोन्ही पाय धरले."
"अरे... अरे.. हे काय करतोस? आधी उठ बर." म्हणत मी त्याला वर उठवले.
"बरं... घरामधील  काम मी तुला देऊ शकणार नाही पण शेतात काम करणार असशील तर ते देऊ शकतो."
"चालेल साहेब."
"पण शेतामध्ये तुला राहावे लागेल. महिन्यातून एकदा तुला घरी जाता येईल. ठीक आहे."
"बरं  साहेब..."
             त्याने हे सर्व मान्य केल्यावर मी त्याच्यासाठी एक छोटीशी खोली बांधली. रामचे नातेवाईक येथे जवळपास कोणी नव्हते. शिवाय त्याचे लग्नसुद्धा झाले नव्हते. तो दररोज सकाळी ७ वाजता  चहापाणीसाठी आमच्या घरी न चुकता येत होता.  आज सकाळी तो का आला नाही ते पाहण्यासाठी मी फार्महाऊसवर आलो असता त्याच्या खोलीजवळ जाऊन त्याला हाक मारली. २ मिनिटे मी फक्त हाक मारत होतो. पण आतून काही उत्तर मिळत नव्हते. शेवटी त्याला फोन केला असता फोन स्वीच  ऑफ आहे असे ऐकू येत होते. नकळत माझी नजर खाली गेली त्यावेळी दरवाजाला बाहेरून काडी असल्याचे निदर्शनास आले. दरवाजा उघडला असता समोरच रामचा मृतदेह खाटावर पडलेला मला दिसला. हे पाहून मला धक्काच बसला. मी खूप घाबरलो होतो. काय करावे सुचत नव्हते. मग लगेच तुम्हाला कॉल  केला.
"बरं... तुमचा कोणावर संशय वगैरे."
"नाही साहेब. रामला दारू पिण्याची सवय होती. ज्यावेळी तो कामावर हजर झाला होता त्यावेळी त्याने ह्याबद्दल काही सांगितले नव्हते. पण काही दिवसात ही  बातमी समजली. मी त्याला रंगेहाथ पकडले व तू जर दारू पिणार असशील तर कायमचे काम सोडून जाऊ शकतोस असे बजावले. त्याने गयावया करून माझी माफी मागितली व दारू सोडण्याचे वचन  दिले. त्यानंतर त्याने कधी दारूला स्पर्श केला नाही.
"ठीक आहे. पंचनामा करून आम्ही बॉडी पोस्टमार्टमसाठी घेऊन जात आहोत. जर काही माहिती मिळाली तर आम्हाला call  करा. शिवाय चौकशीसाठी जर आम्ही तुम्हाला बोलवले तर पोलीस स्टेशनला यावे लागेल."
"ठीक आहे" सरपंच म्हणाले.
गाडीतून जात असताना इ. कदम व शिंदे यांचे संभाषण सुरु झाली.
"सर, तुम्हाला काय वाटते? कोण खून केला असेल?"
"मला वाटते. दोन दिवसापूर्वी ज्याने चाळीत खून केला आहे त्यानेच रामला मारले असणार."
"एव्हढ्या  खात्रीने तुम्ही कसे काय सांगू शकता?"
"पहिली गोष्ट, खुनाची वेळ रात्रीची होती. दुसरी खून चाकूने भोकसून केला आहे असे बॉडीवरून दिसत होते. पण पोस्टमार्टमचा रिपोर्ट आल्याशिवाय नक्की काही सांगता येणार नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्या व्यकितच्या हातातील चिट्ठी ज्यावर टी हे अक्षर टाईप केलेले होते."
"असं  आहे तर... मग सर तुम्हाला काय वाटते... ती व्यक्ती तिसरा खून करेल"
"शक्यता आहे. पण त्या अगोदर आपणाला त्या व्यक्तीला म्हणजेच खुनीला  शोधून काढावयाचे आहे.
"बर... सर." शिंदे म्हणाले. बोलता बोलता दोघेही पोलीस स्टेशनला पोहचले. पोस्टमार्टमचे रिपोर्ट पहिल्या खुनासारखेच होते. इ. कदम यांना काहीच समजत नव्हते. हे नेमके काय चाललयं आणि कोण या पाठीमागे असेल आणि हे सर्व का करत असेल ?"
                       एक आठवड्यानंतर विजयने नितीनला फोन लावला.
"हॅलो... नितीन..."
"हा.... बोलतोय... आपण कोण?"
"मी विजय बोलतोय."
                   इतक्या दिवसांनी विजयचा फोन आल्यावर नितीनला धक्का बसला. पण आनंदही झाला होता. मग लगेचच त्याने प्रश्न केला,
"अरे... हा नंबर कुणाचा आणि तुझा पहिला नंबर का लागत नाही?"
"हा माझा नवीन नंबर आहे. सेव्ह करून ठेव. पहिला नंबर बंद ठेवला आहे. मला तुझ्याशी थोडे बोलायचे आहे."
"बोल ना..."
"फोनवर नाही. प्रत्यक्षात भेटूया. चालेल का?"
"चालेल... पण नक्की कुठे?"
"मी तुला पत्ता sms  करतो. तू त्या पत्त्यावर उद्या सकाळी ठीक ११ वाजता ये."
"Ok... येईन मी." म्हणत नितीनने फोन कट  केला. संध्याकाळी घरी परत यायच्या अगोदर किरकोळ रजेचा अर्ज नितीनने ऑफिसमध्ये दिला व घरी आला.
            दुस-या दिवशी विजयने सांगितलेल्या पत्त्यावर नितीन पोहचला. विजय नितीनच्या अगोदरच तेथे आला होता. नितीन विजयच्या समोरील खुर्चीत जाऊन बसला तसाच त्याने बोलायला सुरवात केली,
"अरे काय हे?... कुठे आहेस तू? आणि आपण इथे ह्या हॉटेलमध्ये काय करत आहोत?"
"सांगतो... सगळं काही सांगतो... तत्पूर्वी काहीतरी खाण्याची ऑर्डर करूया." म्हणत विजयने वेटरला हाक मारली. दोघांच्या आवडीचा वडापाव व त्यानंतर चहा आणण्याची ऑर्डर दिली. विजयने बोलायला सुरवात केली.
"कसा आहेस?"
"कसा असेन?... ठीक आहे. तू इतके दिवस होतास कुठे? तुला माहित आहे का बॉस तुझ्या नावाने दररोज ओरडायचे. मी कशीतरी त्यांची समजूत काढायचो. परंतु शेवटी एक महिन्यानंतर त्यांनी तुझ्या जागी दुस-या व्यक्तीची नेमणूक केली. मला काही करता आले नाही मग त्यासाठी. माफ कर."
"तू का माफी मागत आहेस? चूक तर माझी आहे. मीच ऑफिसला आलो नाही. जाऊ दे. बर  मला तुझी मदत हवी आहे." इतक्यात वेटर वडापाव घेऊन आला व दोघांसमोर ठेवला.
"कशाबद्दल?"  वडापावचा पहिला घास तोंडात घेत नितीन बोलत होता.
"चोरी करायची आहे." विजयने असे बोलताच त्याला त्या पहिल्या घासालाच जोराचा ठसका आला. विजयने त्याला पाणी दिले. पाणी पिऊन तो म्हणाला,
"काय?"
"हो..."
"पण का? कशासाठी आणि कोणासाठी?"
"मला फक्त एव्हढच सांग की  तू मला मदत करणार आहेस की  नाही."
"अजिबात नाही. असले वाईट काम करताना मी तुला मदत करेन असे तुला वाटले कसे?"
"कारण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि काम वाईट असले तरी त्या कामामागील हेतू चांगला आहे. पण हे सर्व मी एकटे करू शकत नाही. म्हणून करशील ना मदत मित्रा?"
नितीनला त्याक्षणी काही कळत नव्हते. त्याला ह्यावर काय बोलावे काय करावे काही समजत नव्हते. सुरवातीला ५ मिनिटे तो शांतच होता. मग त्यानंतर वडापावचा तुकडा तोंडात घेत बोलला,
"बोल, काय करायचे आहे?"
"कलेक्टरच्या पी. ए. च्या घरात चोरी करायची आहे."
"बरं... पण तिथे सिक्युरिटी असेल ना? शिवाय कुत्री व गार्डस पण असतील. चोरी कशी करणार?"
"सांगतो. लक्षपूर्वक ऐक. हे बघ." असे बोलून विजयने कलेक्टरच्या पी. ए. च्या घराच्या नकाशा नितीन समोर उघडा  केला."
"हे काय?" नितीन म्हणाला.
"हा त्या पी.ए. च्या घराचा नकाशा आहे."
"तुला कसा मिळाला?"
"मी स्वतः  हाताने तयार केला. शिवाय इतर लोकांच्याकडून त्यांना थोडे पैसे देऊन त्यांच्याकडून मदत घेऊन आणखी माहिती काढली. ह्या नकाशाप्रमाणे आपण मागील कंपाउंड वॉल वरून आत शिरायचे." बोलत बोलत विजयने सगळा प्लॅन सांगितला. शिवाय आपण हे का करत आहोत? ह्यामधून काय साध्य होणार आहे? हेसुद्धा सांगितले. नितीन लक्षपूर्वक ऐकत  होता.
"ठीक आहे. मी येईन रात्री. बरोबर ११ वाजता."
"बरं... मी पण सर्व तयारीने येतो." म्हणत हातात हात देऊन विजय तेथून निघून आला. नितिनसुद्धा त्याच्या पाठोपाठ घरी निघाला.
              रात्रीचे ठीक ११ वाजता दोघेही ठरलेल्या ठिकाणी पोहचले. नितीन विजयला म्हणाला,
"ही  कंपाऊंड वॉल तर खूप उंच आहे. आपण तिच्या पलीकडे कसे जाणार?"
"काळजी करू नकोस..." म्हणत  विजयने आपल्या बॅगेतून एक मोठी जाड दोरी काढली. नंतर तिला समोर एक हुक अडकवला. ती दोरी फिरवून त्याने त्या दोरीची हुकाकडील बाजू कंपाऊंड वॉलच्या मागे टाकली व दुसरी बाजू आपल्या हातात धरली. दोघेही दोरीचा आधार घेऊन कंपाऊंड वॉल वरती चढले. ज्या ठिकाणी दोरी अडकली होती तेथे एक झाड होते. त्या झाडाचा आधार घेऊन खाली उतरले. सर्वप्रथम त्यांनी सिक्युरिटी गार्ड्सना रुमालावर बेशुद्ध पडायचे औषध पसरून पाठीमागून हळूच हल्ला करून बेशुद्ध केले. त्यांच्या ह्या हालचालींची चाहूल कुत्र्यांना जाणवल्यामुळे त्यांनी भुंकायला सुरुवात केली. कुत्र्यांचा आवाज ज्या दिशेने येत होता त्या दिशेचा अंदाज घेऊन त्या बाजूंला दोघांनी मांसाचे  तुकडे फेकायला सुरवात केली. मग ५ मिनिटात कुत्र्यांचा आवाज बंद झाला. कारण त्या मांसामध्ये  गुंगीचे औषध मिसळले होते. आता घरात प्रवेश करण्यासाठी त्यांनी काचेच्या खिडकीवर दगड मारून काचा फोडल्या. त्या आवाजाने पी. ए. ला जाग आली. त्याने रूममध्ये लगेच लाईट लावली. तोपर्यंत नितीन व विजय आत आले होते. लाईटच्या उजेडाने पी. ए. ची पत्नी जागी झाली व म्हणाली,
"अहो... काय झालं? तुम्ही जागे का झालात?"
"काही नाही... मला कसलातरी आवाज ऐकू आला म्हणून जागा झालो."
"काही नाही... तुम्ही झोपा आता. सकाळी तुम्हाला लवकर मिटींगला  जायचे आहे." झोपेच्या नशेतच त्याची पत्नी बोलत होती. पी.ए. च्या खोलीतील लाईटचा उजेड काचेच्या खिडकीवर पडल्याने विजय व नितीन त्या उजेडाच्या दिशेने वरती आले. खालच्या मजल्यावर नोकर झोपला होता त्यालासुद्धा त्यांनी बेशुद्ध केले. ते त्या रूमसमोर आले. त्यांनी दरवाजा ठोठावला.
"इतक्या रात्री कोण आले असेल?" दोघेजण विचार करू लागले.
"कदाचित नोकर असेल. मी बघून घेतो. तू झोप." असे पत्नीला सांगून पी.ए. ने दरवाजा उघडला. इतक्यात विजयने त्याच्यासमोर बंदूक धरली व म्हणाला,
"हात वर...."
"कोण आहात  तुम्ही? आणि काय पाहिजे तुम्हाला?" हात वरती केलेल्या अवस्थेत पी. ए. म्हणाला. इतक्यात पी. ए. ची पत्नी जागी झाली.
"खबरदार... आवाज केला तर दोघांना पण उडवून टाकीन." विजय म्हणाला.
"तिजोरीची चावी पाहिजे .. नको... नको... एक काम कर.. तिजोरीतून पैसे काढून आण." म्हणत नितीनने एक बॅग त्याच्यासमोर फेकली.
"नाही... मी नाही देणार..."
"मग हिला मरावे लागेल..." म्हणत विजयने तिच्या पत्नीकडे बंदूक रोखली. पी. ए. च्या पत्नीला घाम फुटला.
"थांबा... थांबा... तिला मारू नका. मी देतो.. सगळे पैसे देतो." पी. ए. ने  तिजोरीतून पैसे काढून त्या बॅगेत भरले व बॅग त्यांच्या हवाली केली. नितीनने दोघांच्या तोंडावर बेशुद्ध करायचा गॅसचा फवारा मारला. विजयने दोघेही बेशुद्ध झालेवर पी.ए. च्या हातात एक चिट्ठी ठेवली व दोघेही ज्या मार्गाने आत आले होते त्याच मार्गाने बाहेर पळून आले.
       दुस-या दिवशी हि बातमी ब्रेकिंग न्युज म्हणून मीडियाने पसरवायला सुरवात केली. त्यांना ही  बातमी कोणी सांगितली हे पी.ए. ला देखील समजले नाही. ह्या घटनेनंतर कमिशनरांनी पोलिसांची मिटिंग बोलावली. कमिशनर  चौगुले हे ह्या केसचे मुख्य होते. त्यांनी बोलायला सुरवात केली.
"आज शहरामध्ये काय चालू आहे याची कल्पना आहे का तुम्हाला? सलग दोन खून झालेत व एका ठिकाणी चोरी. चोर व खुनी अजून सापडले नाहीत. आपले पोलीस डिपार्टमेंट झोप काढत आहे कि काय? मला उत्तर हवंय. . तुम्हाला जी सिक्युरिटी, जी काही परमिशन व इतर कोणत्याही गोष्टीची गरज असेल ती मी तुम्हाला देईन. परंतु रात्रीचा दिवस करावा लागला तरी चालेल. पण हे दोघे लवकरात लवकर सापडले पाहिजेत. या केसचा निकालही लवकरात लवकर लागावा अशी मी आशा धरतो." इ. कदमसुद्धा  आले होते. कमिशनर साहेब बाहेर उठून जाणार इतक्यात ते म्हणाले,
"Excuse  me... Sir" सर्वांनी इ. कदम ह्यांच्याकडे पहिले. कमिशनरही  त्यांच्याकडे पाहून म्हणाले,
"बोला कदम."
"सर... मला वाटते. चोर व खुनी दोघे नसून एकच  आहे."
"कशावरून?"
"सर, सुरवातीला जे दोन खून झालेत त्यांना चाकूने खुपसून ठार करणेत आले होते. त्यांचा हातात एक चिठ्ठी ठेवणेत आली होती. आणि काल ज्यांच्या घरी चोरी झाली तेथे मी चौकशीसाठी गेलो होतो. त्यांच्या हातातसुद्धा एक चिठ्ठी होती. त्यामध्ये 'पा' हे अक्षर टाईप केलेले आहे. ही  बघा सर..." म्हणत कदमांनी ती चिट्ठी कमिशनर साहेबांना  पाहावयास दिली. त्यावर ते म्हणाले,
"मग ह्यावरून ती व्यक्ती एकच  आहे हे कसे सिद्ध होते. चोरानेसुद्धा चिट्ठी ठेवली असेल?"
"सर, हा योगायोग असणे शक्य आहे. पण सर, जर त्याला खूनच करायचा असता तर त्याने ज्यांचा घरी चोरी केली त्यांना बेशुद्ध न करता सहजपणे ठार केले असते. पण तसे घडले नाही. शिवाय पहिला खून ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी वॉचमॅनने त्याला पहिले होते. मग त्याक्षणी तो खुनी त्याला ठार मारू शकत होता. परंतु त्याने त्याला फक्त बेशुद्ध केले."
"ह्म्म्म... असू शकते. कदम या केससाठी  मी तुम्हाला खास परवानगी देतो. तुम्ही या केसचे मुख्य सूत्रधार असणार. तुम्हाला जर आपल्या एरियातून बाहेर चौकशीसाठी जावे लागले तर त्याची काळजी करू नका. त्यासाठीही तुम्हाला कोणाची परवानगी हवी असेल तर मी आणून देईन पण या केसचा लवकरात लवकर निकाल लागावा अशी मी अपेक्षा करतो."
"Thank  You... सर..." इ. कदम म्हणाले. त्यानंतर कमिशनर  निघून गेले. इतर सर्व पोलिसही आपापल्या ड्युटीवर निघाले. इ. कदम गाडीत बसले. लगेच हवालदार शिंदेनी  गाडी सुरु केली व त्यांना विचारले.
"काय झाले सर...?"
"कमिशनर  साहेबांनी  ह्या केसची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे.
"मग आता काय करायचे?..."
"लवकरात लवकर ह्या आरोपीला पकडायला हवे. नाहीतर तो यापुढे काहीही  करू शकतो."
              बोलता-बोलता पोलीस स्टेशन आले. रात्री सर्व पोलीस व हवालदार घरी गेले. पण इ. कदम अजून पोलीस स्टेशनमध्ये होते. ते या केसबद्दल  अजून काही माहिती मिळते का ते पाहत होते. त्या रात्री कदम उशिरा घरी आले.
             दोन दिवसानंतर विजय आणि नितीन परत एका दुस-या हॉटेलमध्ये भेटतात.
"आता पुढे काय?" चहाचा घोट घेत नितीन म्हणाला,
"मुख्यमंत्री यांच्या घरी चोरी..." विजय बोलला.
चहाचा घोट घशातून खाली न सरकता सरळ तोंडातून बाहेर येऊन टेबलावर पडला. तोंड साफ करत तो म्हणाला,
"काय?... तू शुद्धीवर तर आहेस ना? काय बोलतोस तुला तर समजते का? कसं  शक्य आहे?"
"हे बघ मला माहित आहे कि रिस्क आहे. पण हे करावंच लागेल."
"पण एव्हढ्या  सर्व सिक्युरिटीना सामोरे कसे जायचे? आणि समजा आपण कशीबशी खटपट करून घरात शिरलो तर बाहेर कसं  पडायचं? जर काही गडबड झाली तर दोघेही फासावर नक्कीच."
"काही गडबड होणार नाही. प्लॅन पहिल्या चोरीसारखाच आहे पण थोडा वेगळा आहे. आणि समज  काही गडबड झाली आणि त्यामध्ये दोघांपैकी कोणी सापडलो किंवा दोघेही सापडलो तर ह्या बाटलींचा  वापर करून  स्वतःला संपवायचे." म्हणत विजयने दोन बाटल्या नितीनला दिल्या  व दोन  आपल्या खिशात ठेवल्या . मग थोड्या वेळाने दोघेही तेथून निघून गेले.
          ठरल्याप्रमाणे दोघेही रात्री १ वाजता घराजवळ आले. वॉचमॅन  व इतर दोन गार्डसना बेशुद्ध केले. अजून काही गार्डस तेथे होते. पण घरात शिरण्यासाठी मार्ग मोकळा झाल्याने त्यांनी त्या इतर गार्डसकडे दुर्लक्ष करून घरात प्रवेश केला. घरात घुसायच्या  अगोदर बाहेर जे सीसीटीव्ही कॅमेरे होते त्यांना लांबूनच पिस्तुलीने फोडून काढले. पिस्तुलीमध्ये  रबरी गोळ्यांचा वापर त्यांनी केला होता. घरात प्रवेश करताच टॉर्चच्या साहाय्याने हळूहळू मुख्यमंत्रांच्या रूमजवळ आले. दरवाजा ठोठावला. मुख्यमंत्री घरात एकटेच होते. त्यांची पत्नी काही कामानिमित्त बाहेरगावी गेली होती. अचानक आणि एवढ्या रात्री दरवाजा ठोठावल्याचा आवाज आल्याने त्यांनी आपल्याजवळ असलेल्या लॉकरमधील पिस्तूल काढली. दरवाज्याच्या आतून काचेतून बाहेर पलीकडे पहिले असता कोणी दिसत नव्हते. दरवाजा उघडून पहिले असता समोर कोणी नव्हते. बाहेर डोकावून विजयकडे  पहिले असता मागून नितीनने त्यांच्या डोक्यात वार केला. मुख्यमंत्री बेशुद्ध पडले. ज्यावेळी त्यांना शुद्ध आली त्यावेळी त्यांचे हातपाय बांधलेले होते आणि तोंडावर चिकटटेप  लावण्यात आला होता. एक तासांनी ते शुद्धीवर आले. विजय समोर पिस्तुल  धरून उभा होता. नितीनच्या हातात मुख्यमंत्र्यांची पिस्तुल  होती. त्याची पिस्तुल  त्याने बॅगेत  ठेवली होती. नितीन म्हणाला,
"सर, तिजोरीच्या चाव्या हव्या होत्या. कुठे आहेत ते शांतपणे सांगा नाहीतर दोघांच्या पिस्तुलातील सर्व गोळ्या तुमच्या डोक्याच्या व शरीराच्या आरपार जातील." त्यांना बोलू देण्यासाठी विजयने तोंडावरील चिकटटेप  काढला,
"बेडच्या खाली आहेत." चाव्यांचा जुडगा सापडला. मग विजय तिजोरीतून पैसे काढण्यात मग्न होता व नितीन मुख्यमंत्र्यांकडे लक्ष ठेऊन होता. तिजोरी लहान होती. पैशाचा पहिला पुंजका हातात घेणार इतक्यात अलार्म वाजला. त्यामुळे बाकीचे आसपासचे गार्डस सावध झाले. नितीन  विजयला म्हणाला,
"चल... पळून जाऊ... पैसे राहू देत... नाहीतर दोघेपण पकडले जाऊ."
"नाही... मला जास्त वेळ लागणार नाही. एक मिनिट थांब." विजय उत्तरला.
"अरे पण..."
"इतकी मेहनत करून आत आलो आहोत. रिकाम्या हाताने परत जायचे का? अजिबात नाही."
"तुम्ही येथून पळू जाऊ शकत नाही. आणि मी तुम्हाला सोडणार नाही." मुख्यमंत्री म्हणाले.
"ते आमचे आम्ही बघून घेऊ. तुम्ही तुमचे तोंड बंद ठेवा." नितीनने सांगितले. मग नितीन सुद्धा विजयला मदत करू लागला. दोघांनी शक्य तितक्या लवकर तिजोरी रिकामी केली. इतर चोरीसारखे  मुख्यमंत्र्यांना बेशुद्ध केले. त्यांच्या हातात चिट्ठी ठेवली.
"चल... पळून जाऊ..."
           दोघेही धावत बाहेर पडत होते. पण पळत असताना नितीनचा जिन्याच्या पायरीवरून पाय घसरला व तो घसरत खाली पडला. ओलांड्या खात समोरील टेबलावर त्याचा पाय जोरात आदळला. विजयाने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. पण काही उपयोग झाला नाही. बहुतेक फ्रॅक्चर झाला होता. मग नितीनच विजयला म्हणाला,
"तू जा... माझी काळजी करू नकोस."
"अरे.... पण तुला असे एकटे सोडून कसे जाऊ?"
"हे बघ... मूर्खपणा करू नकोस... माझ्यासाठी थांबलास तर आपण दोघेही सापडू. तू जा... मी आपला प्लॅन ठरल्याप्रमाणे पुढे नेईन." विजयने नाइलाजस्तव तेथून पळ काढला. नितीन एक पॉईजनची बाटली प्याला व लगेच दुसरी बाटली त्याने आपल्या चेह-यावर ओतली ज्यामध्ये acid  होते. विषाने मृत्यू व्हायच्या अगोदरच त्याचा चेहरा जळाला  होता. मग काही क्षणात त्याचा मृत्यू झाला.
             नेहमीप्रमाणे मिडीयाने  मुख्यमंत्री यांच्या घरातील चोरीची बातमी ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवली. इ. कदम यांनी नितीनची  बॉडी ताब्यात घेतली. मुख्यमंत्र्यांबरोबर थोडीशी चर्चा केली. व त्यांच्याकडील चिट्ठी घेऊन ते पोलीस स्टेशनला आले. शिंदे हवालदार त्यांना म्हणाले,
"सर, ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते?"
"परत त्याच चोराने व खुनीने हे केले आहे. चौथ्या चिट्ठीवर 'य' असे लिहले आहे. बघू... शोधायचा व पकडण्याचा प्रयत्न चालू ठेऊ."
"पण सर, ही  जी बॉडी आहे ती कोणाची असू शकते?"
"त्याच्याच ओळखीमधील एक व्यक्ती असेल किंवा त्याचा मित्र पण असू शकेल."
"म्हणजे सुरवातीपासून हे दोघे एकत्र काम करत होते."
"असेल कदाचित..."
"कदाचित म्हणजे?"
"म्हणजे... सुरवातीला दोन खून झाले. खून करण्यासाठी दोन व्यक्तींची गरज लागते असे नाही. एक व्यक्तीसुद्धा खून करू शकतो. पण चोरी करण्यासाठी कोणाचीतरी मदत नक्की घ्यावी लागते. हा माझा तर्क आहे. निश्चित काही सांगता येणार नाही. कदाचित दोघेही सुरवातीपासून एकत्र असू शकतात."
"मग आता काय करायचे?"
"पंचनामा झाल्यानंतर बॉडी पोस्टमार्टमसाठी पाठवून देऊ. तेथून काय रिपोर्ट येतात ते पाहू." बॉडी पोस्टमार्टमला पोहच करून इ. कदम व इतर हवालदार पोलीस स्टेशनला पोहचले.
            विजय आता एकटा पडला होता. त्याचा एकमेव आधार नितीन या जगात आता नाही याची त्याला जाणीव होती. खूप वाईट वाटत होते. खूप रडला तो.  या अनपेक्षित घटनेने तो खचला होता. मग थोड्या वेळाने डोळे पुसून घेतले व पुढच्या कामासाठी तयारी करू लागला.
               ३ दिवसानंतर विजय  पुन्हा रात्रीचे ठीक ११ वाजता आपल्या बाईकवरून बाहेर पडला. २ तासांनी एका ठिकाणी पोहचला. ज्या घरात शिरून चोरी करायची आहे त्या घराच्या मागील बाजूस गाडी लावली. नेहमीप्रमाणे कंपाऊंड  वॉलच्या मागील बाजूने प्रवेश केला. सिक्युरिटी गार्डला बेशुद्ध केले. बाहेर फक्त दोन सिसिटीव्ही कॅमेरे होते. ते पिस्तुलने रबरी गोळ्यांच्या साहाय्याने फोडले. खिडकीची काच फोडून विजय घरात शिरला. विजय ज्या घरात शिरला होता ते घर आमदाराच्या पी. ए. चे होते. इतक्यात पी. ए. ला जाग आली. त्याने खोलीतील लाईट लावली. लाईटच्या उजेडाने व पी.ए. च्या हालचालीने त्याची पत्नी जागी झाली व त्याला म्हणाली,
"अहो, काय झालं?"
"काही नाही. खाली कसलातरी आवाज झाला म्हणून जागा झालो."
"काही नाही ओ ... झोपा आता."
दोघांचे बोलणे चालू असताना विजयने जिन्यावरून जाऊन पी.ए. च्या बेडरूमच्या  दरवाजावर थाप मारली.
मग आता दोघेही जागे झाले. इतक्या रात्री कोण आले असेल असा विचार करत पी.ए. दरवाजाजवळ आला व दरवाजा उघडण्याआगोदर आतील काचेतून पहिले तर समोर कोणी दिसत नव्हते. मग म्हणाला,
"कोण आहे?"
                     बाहेरून काही प्रतिसाद नाही. मग दरवाजा उघडून पहिला तर समोर कोणी नव्हते. बाहेर येऊन पुढे पाहणार इतक्यात विजयने मागून पिस्तूल डोक्याला लावली.
"मागे वळून पाहू नका. नाहीतर पिस्तुलातील गोळी तुमच्या डोक्याच्या आरपार जाईल. दोन्ही हात वर करा आणि तसेच रूममध्ये चला." त्या अवस्थेत पी.ए. ला आत आणले. विजय पी.ए. च्या पत्नीला म्हणाला,
"वाहिनीसाहेब, मला पैसे हवेत. तिजोरीतून पैसे आणून ह्या बॅगेत  मला भरून द्या." म्हणत विजयने एक बॅग त्यांच्यासमोर फेकली.
"आरडाओरड  करण्याचा प्रयत्न करू नका. नाहीतर दोघांना येथेच ठोकून देईन." पी.ए. च्या पत्नीने बॅगेत  पैसे भरून बॅग विजयच्या हवाली केली व बेडवर जाऊन बसली. विजयने पी.ए. च्या डोक्यात वार करून त्याला बेशुद्ध केले व त्याला बेडवर त्याच्या पत्नीशेजारी ठेवले. मग पी.ए. च्या पत्नीच्या तोंडावर बेशुद्ध करायचा फवारा मारला व तेथून पळ  काढला. जाता-जाता पी.ए. च्या हातात एक चिट्ठी ठेऊन गेला.
               दुस-या दिवशी नेहमीप्रमाणे मिडिया  ह्या चोरीची बातमी ब्रेकिंग न्यूज म्हणून पसरवत होती. इ. कदम यांनी चोरीच्या ठिकाणी जाऊन तपासणी केली. पी.ए. सोबत थोडी चर्चा केली व निघून आले. शिंदे त्यांना म्हणाले,
"सर, आता काय करायचे?"
"पाचवी चिट्ठी सापडली आहे. त्यामध्ये 'ज' हे अक्षर टाईप केलेले आहे.
"मग आता..."
"प्रयत्न चालू ठेऊ... तुम्हाला जी माहिती गोळा करायला सांगितली होती ती मिळाली का?"
"हो सर. पहिला खून झाला त्या व्यक्तीचे नाव विकास पाटील नव्हते. तर हे होते." म्हणत शिंदेनी गाडीतील एक कागद कदम यांचेकडे दिला. त्यामध्ये पहिल्या खून झालेल्या व्यक्तीचे खरे नाव व त्याची इतर माहिती होती.
"बर... असं आहे तर..." मग शिंदे पुन्हा म्हणाले,
"दुसऱ्या खुनाबद्दलची सविस्तर माहिती ही  घ्या सर." म्हणत शिंदेनी दुसरा कागद  इ. कदम यांचेकडे दिला. कदम यांनी तो संपूर्ण वाचला.
"आणखी एक सर, यानंतर दुस-या चोरीच्या ठिकाणी जी बॉडी मिळाली त्याबद्दल अजून तपास चालू आहे. लवकरच आम्ही ती माहिती तुम्हाला पोहच करू."
"OK..." इ. कदम म्हणाले.
                    बोलता-बोलता पोलीस स्टेशन आले. थोड्या वेळाने इ. कदम त्याचबरोबर इतर सर्व स्टाफ आपल्या घरी निघून गेले. त्याच दिवशी रात्रीचे ११.३० वाजता इ. कदम जेंव्हा आपल्या घरी होते. त्यावेळी अचानक दरवाजावरील बेल वाजली. ते त्या वेळी जागेच होते कारण ह्या केसमुळे त्यांची झोप उडाली होती. दरवाजातील काचेतून बाहेर पहिले असता कोणी दिसत नव्हते. त्यांनी रिव्हॉल्वर हातात घेतली. दरवाजा उघडताच रिव्हॉल्वर समोर धरली. परंतु समोर कोणीच नव्हते. बाहेर येऊन पहिले असता आसपास कोणी दिसत नव्हते. आत येऊन दरवाजा बंद करणार इतक्यात त्यांचे लक्ष त्या दरवाज्या खालील  फरशीवर गेले. तेथे एक चिट्ठी ठेवली होती. त्यामध्ये फक्त एकच वाक्य लिहले होते. मला पकडण्याचा प्रयत्न करू नका. नाहीतर याचे परिणाम वाईट होतील." मग कदम लगेच धावत आपल्या गेटजवळील सिक्युरिटी गार्ड जवळ गेले. तेथे पहिले असता गार्ड बेशुद्ध अवस्थेत त्यांना दिसला. त्यांनी थोडे पुढे जाऊन पहिले असता त्यांना कोणी दिसले नाही. निराश अवस्थेत घरी आले. गार्डला उठवण्याचा प्रयत्न केला पण तो काही शुद्धीवर आला नाही. सकाळी गार्डला बोलवून चौकशी करू असा विचार त्यांच्या मनात आला. मग घरी येऊन झोपी गेले.
               सकाळी गार्डला  जेंव्हा जाग आली तेंव्हा  इ. कदम यांचा चेहरा त्याच्यासमोर दिसत होता. तो अचानक दचकला. लगेच खुर्चीवरून उठून त्याने सॅल्यूट केला व इ. कदम यांना म्हणाला,
"नमस्कार सर..."
"नमस्कार... बसा... बसा... अगोदर तुम्ही खाली खुर्चीवर बसा." गार्ड खाली बसला.
"काळ रात्री ११.३० च्या दरम्यान येथे कोणी आले होते का?"
"होय साहेब.. एक व्यक्ती आली होती. तिने डोक्यावर हेल्मेट घातले होते. मला म्हणाली, 'काका थोडेसे पाणी मिळेल का?' मी कारण विचारले असता तिने आपला हात माझ्यासमोर केला. तिच्या हाताला जखम झाली होती. थोडे रक्त पण आले होते आणि येत होते. मी गेट न उघडताच पाण्याची बाटली देत होतो तर ती व्यक्ती म्हणाली, काका जखम मोठी आहे. कृपया बाहेर येऊन हातावर पाणी घालता का? मी गेट उघडून बाहेर पाणी घालण्यासाठी आलो इतक्यात त्याने जलद गतीने पाठीमागे दुस-या हातात लपवलेला रुमाल माझ्या तोंडावर धरला व माझे डोके पहिल्या रक्त आलेल्या हाताने धरले. मी बेशुद्ध झालो. सकाळी जाग आली तेंव्हा तुम्ही माझ्या समोर आहात."
"बरं... पण इथून पुढे जर कोणी तुम्हाला कोणत्याही कारणास्तव बोलवत असेल किंवा गेट उघडायला सांगत असेल तर याबाबतची पूर्व कल्पना मला देत चला."
"ठीक आहे साहेब..." गार्डने बोलता बोलता मान हलवली. इ. कदम नेहमीप्रमाणे पोलीस स्टेशनला गेले.
             एक आठवड्यानंतर परत पुन्हा एकदा विजय आपल्या बाईकवरून कोठेतरी निघाला. त्या दिवशी रविवार होता. त्याच्या मनात वेगवेगळे विचार चालू होते. ' आता हे माझे शेवटचे काम आहे. हे पूर्ण झालेनंतर मला कुठेही जायची गरज नाही.' विजयला ज्या ठिकाणी जायचे होते तेथे तो पोहचला. गाडी बाजूला लावली. रात्रीचे २ वाजले होते. सिक्युरिटी गार्ड झोपला होता. गेटवर 'ठाण-ठाण' असा दगडाने आवाज केला व गेटच्या एका बाजूला लपून बसला. त्या आवाजाने गार्ड जागा झाला पण तो झोपेच्या नशेतच होता. त्याने खुर्चीवरून उठून समोर पहिले असता कोणीही नव्हते. मग तो पुन्हा झोपी गेला. विजयने पुन्हा तोच आवाज केला. आत मात्र गार्डची झोप उडाली. तो गेट उघडून बाहेर आला. इतक्यात मागून विजयने त्याचे डोके धरले. तोंडावर रुमाल ठेऊन त्याला बेशुद्ध केले. गार्डला गेटच्या एका कोप-यात झोपवले.
                    विजय ज्या ठिकाणी आला होता ती एक सहकारी बँक होती. बँकेची कुलुपे त्याने लेजर बीमच्या साहाय्याने तोडली. मुख्य दरवाजाचे शटर उघडले व परत बंद केले. टॉर्चच्या  साहाय्याने लाईटचा स्वीच  शोधला. तो शटर शेजारीच होता. लाईट लावली. आत पाय ठेवण्याअगोदर आजूबाजूस नजर फिरवली. त्याच्या डोक्यावर फक्त एक सीसीटीव्ही कॅमेरा होता. विजयकडे अत्याधुनिक कॅमेरा होता की  ज्याने फोटो काढला तर काही सेकंदात त्याची प्रत त्या कॅमेरातून बाहेर येत होती. विजयने त्या रूमचा एक फोटो काढला व  तो फोटो सीसीटीव्ही कॅमेरासमोर लावला म्हणजे रेकॉर्डिंग पाहणा-या व्यक्तीला त्या खोलीमध्ये कोणीच आले नाही असे भासावे. मग परत लेजर बिमच्या साहाय्याने कॅशरच्या रूमचा दरवाजाचे लॉक  तोडले. कॅश जेथे ठेवली होती ते सुद्धा लॉक  तोडून पैसे घेऊन विजय तेथून पळून आला. पण तेथून येण्याअगोदर एक चिट्ठी तेथे ठेवली होती.
             ती बँक इ. कदम यांचे घरापासून जवळच होती. त्यांनी सिक्युरिटी व इतर कर्मचा-यांशी चर्चा केली व पोलीस स्टेशनला आले.
             रात्रीचे ११ वाजले होते. फक्त शिंदे व इन्स्पेक्टर कदम पोलीस स्टेशनमध्ये होते. दोघांची चर्चा सुरु झाली. शिंदे म्हणाले,
"सर.. आता काय?"
"ही  सहावी चिट्ठी आहे ज्यामध्ये 'वि' असे लिहले आहे. चला आपण सुरवातीपासून पहिला खून ज्या ठिकाणी झाला तेथे एक चिट्ठी सापडली ज्यावर 'ल' असे टाईप केले आहे. दुस-या खुनाच्या ठिकाणी परत एक चिट्ठी सापडली त्यावर 'टी' असे टाईप केले आहे. त्यानंतर चार ठिकाणी चो-या झाल्या. तेथे ज्या चिट्ठ्या सापडल्या त्यामध्ये 'पा', 'य', 'ज', व शेवटी 'वि' असे टाईप केलेले आढळले. ह्या सहा चिट्ठ्या क्रमाने लावल्या असता तर अक्षर तयार होते 'लटीपायजवि'. त्यांना काही समजले नाही. बराच वेळ विचार करत होते. मग थोड्या वेळाने घरी जात असताना वा-याचा एक मोठा झोत त्यांच्या खिडकीतून आत आला व त्यांनी क्रमाक्रमाने लावलेल्या चिट्ठ्या विस्कटल्या गेल्या. त्या गोळा करत असताना तीन चिट्ठ्या अशा क्रमाने खाली पडल्या होत्या त्यातून त्यांना एक मार्ग सापडला. त्या तीन चिट्ठ्यापासून 'पाटील' हे अक्षर तयार झाले होते. मग त्यांनी उरलेल्या तीन चिठ्ठयांचा क्रम बदलला आणि थोड्या वेळाने त्यांना दुसरे एक नाव माहित झाले आणि ते होते 'विजय'.
            इ. कदम यांनी कमिशनर यांना बोलावून त्याच रात्री एक मिटिंग आयोजित केली. त्याचबरोबर इतर पोलीस स्टाफला देखील कळविण्यात आले. इ. कदम यांनी बोलायला सुरवात केली.
"गेल्या दोन आठवड्यापासून ज्या खूनीला  तसेच चोराला आपण शोधण्याचा प्रयत्न करत आहोत त्याच्याबद्दल कोणाकडेही काहीच माहिती अथवा पुरावा नाही. पण मला एक छोटासा मार्ग सापडलेला आहे. त्याचे नाव विजय पाटील आहे. कारण प्रत्येक ठिकाणी त्याने एक चिट्ठी ठेवली होती. ह्या सर्व चिट्ठ्या जर उलट क्रमाने लावल्या तर त्याचे नाव तयार होते. आता तुम्ही सर्वानी एक काम करा. शहरामध्ये जेव्हढे  विजय पाटील आहेत त्यांची माहिती शोधून काढा. काहीही करा. पण मला दोन दिवसांच्या आत ती माहिती मिळाली पाहिजे. शिवाय ज्या कोणावर संशय वाटतो त्याला अटक करा." त्यानंतर मिटिंग संपली.
                विजय पाटील बरेच होते. पण अचूक व्यक्ती कोण हे पोलिसांना नक्की सापडत नव्हते. शेवटी या सर्व विजय पाटील मधून  ४ विजय पाटील ज्यांच्यावर जास्त संशय होता त्यांची उद्यापासून  चौकशी करण्याचे इ. कदम यांनी ठरवले. यादरम्यान  एक आठवडा निघून गेला.
             एक आठवड्यानंतर सकाळी ११ वाजता इ. कदम यांना भेटण्यासाठी एक व्यक्ती आली. हवालदाराने त्यांना कदम सरांची केबिन दाखवली व परवानगी घेऊन ती व्यक्ती त्यांच्या समोर बसली. इ. कदम  व ती व्यक्ती या दोघांचे बोलणे सुरु झाले.  त्या व्यक्तीने बोलायला सुरवात केली,
"मला तुम्हाला काही  सांगायची आहे."
"तुमचे नाव काय? आणि तुम्ही कोठून आलात?"
"ते मी नंतर सांगतो. मला तुम्हाला काहीतरी महत्वाची माहिती सांगायची आहे."
"बोला.. मी ऐकतोय... तुम्हाला कसली माहिती द्यायची आहे."
"सर, गेल्या तीन आठवड्यामध्ये जे दोन खून आणि चार चो-या झाल्या आहेत त्याबद्दल थोडेसे बोलायचे होते."
"सांगा..."
"सर, हाच तो चाकू ज्याने सुरवातीचे दोन खून करण्यात आले. दुस-या खुनाच्या वेळी गुन्हेगाराचे ठसे ह्या चाकूवर उमटलेले आहेत. ते तुम्ही पाहू शकता." म्हणत त्या व्यक्तीने तो चाकू इ. कदम यांच्या समोर ठेवला.
"इतक्या खात्रीने तुम्ही कसे काय सांगू शकता आणि याबद्दल तुम्हाला कसे माहित?" मग परत त्या व्यक्तीने बोलायला सुरवात केली.
"ज्यावेळी खून झालें त्यानंतर तेथे चिट्ठी ठेवण्यापूर्वी एक मिनिटांचे व्हिडिओ  शूटींग  केले गेले ते या मेमरी कार्डमध्ये आहे आणि त्या खुनी व्यक्तीचा चेहरपण." म्हणत परत त्या व्यक्तीने एक मेमरी कार्ड इ. कदम यांना  दिले."
"ते ठीक आहे पण तुम्हाला कसे माहित?"
"माहित आहे सर... कारण हे सर्व मीच केले आहे. माझे नाव विजय पाटील." विजयने सांगितले.
इ. कदम यांना धक्काच बसला. लगेच त्यांनी रिव्हॉल्वर काढली. विजयसमोर धरून त्याला म्हणाले,
"Hands  Up...." विजयने  केले.
"घाबरू नका सर. मी शरणागती पत्करण्यासाठी आलो आहे. माझ्याजवळ इतर कोणतेही हत्यार नाही."
"माझा विश्वास नाही. शिंदे, जरा आत या." इ. कदम यांनी शिंदे हवालदार यांना जोरात हाक मारली. शिंदे आत येऊन म्हणाले,
"सर, तुम्ही मला बोलावलंत..."
"ज्या खुनी व चोराला आपण शोधात होतो तो स्वतःहून येथे आला आहे. त्याला लॉकअपमध्ये डांबून ठेवा." शिंदेनासुद्धा धक्का बसला. त्यांनी विजयला हातकडी लावली व लॉकअपमध्ये डांबले. नंतर शिंदे व इ. कदम यांची चर्चा सुरु झाली,
"काय विचित्र माणूस आहे. स्वतःच मूर्खपणा करून येथे सापडण्यासाठी आला." शिंदे बोलले.
"ह्म्म्म... ठीक आहे. मला त्याच्याशी थोडं बोलायचं आहे. मी नंतर त्याची चांगलीच चौकशी करून घेईन." सर्वप्रथम इ. कदम यांनी कमिशनर  साहेबांना  फोन करून ही बातमी कळवली. त्यानंतर मिडीयाला  बोलावून सर्वकाही सांगितले. ब-याच दिवसानंतर मिडिया  पोलिसांचे थोडेफार कौतुक करत होती.
रात्रीच्या वेळी इ. कदम विजयच्या लॉकअपमध्ये गेले व दोघांमध्ये चर्चा सुरु झाली,
"बोला... पाटील साहेब.... बोला... तुम्हाला हे सर्व करताना लाज वाटली नाही. का तुम्ही असे केले? तुम्हाला कल्पना आहे ना तुम्ही केलेल्या गुन्ह्यासाठी फक्त एकाच शिक्षा आहे आणि ती म्हणजे फाशी..."
"हो... माहित आहे सर..."
"मग तरीसुद्धा तुम्ही असे करण्याचे धाडस दाखविले. यामागील कारण मला समजले नाही."
"ते मी कोर्टात सांगेन. इथे नाही."
"बर... ज्या चो-या केल्यात तो पैसे कोठे आहे."
"माफ करा सर... याबद्दल मी तुम्हाला काही सांगू शकत नाही."
"मी सरळ आणि सौम्य भाषेत तुम्हाला विचारात आहे पाटील.  जर तुम्ही मला काही सांगितलं नाही तर माहिती काढण्यासाठी आमच्याकडे दुसरे भरपूर पर्याय आहेत."
"मी परत सांगतो सर... मी आपणाला काही सांगू शकत नाही."
"ठीक आहे.. तुम्ही असे सरळ नाही सांगणार."  इ. कदम यांनी शिंदेला हाक मारली.
"शिंदे, तुम्हाला जे काही करायचे ते करा पण ह्यांच्याकडून तुम्ही पैशाबद्दल सर्व माहिती काढा." एव्हढे बोलून कदम आपल्या केबिनमध्ये निघून गेले.
           शरीरावर तसेच तळ  पायावर लाठीचा मार  देऊन त्याचबरोबर इतर अनेक प्रकारचे शारीरिक त्रास देऊन हवालदार शिंदेनी विजयकडून पैशाबाबत माहिती काढण्याचा प्रयत्न केला. परंतु विजय काही बोलला नाही. थोड्या वेळाने शिंदे इ. कदम यांच्याकडे गेले व त्यांना म्हणाले,
"सर.. आम्ही खूप प्रयत्न केला पण विजय काही बोलला नाही. आता काय करायचे सर?"
"त्याला उद्या कोर्टात हजार करू. बघू काय होते ते."  दुस-या दिवशी कोर्टात विजयला दोषी ठरविण्यात आले व केसचा अंतिम निर्णय दोन दिवसांनी होईल असे न्यायाधीशांनी सांगितले.
             आज ह्या केसचा अंतिम निर्णय होता. विजय आणि इतर वकील तसेच काही लोकांचं जमाव कोर्टामध्ये हजर होता. दिपकसुद्धा आला होता. थोड्या वेळांनी न्यायाधीश आले व केसला  सर्वात झाली.
"श्री विजय पाटील. तुम्हाला काही बोलायचे आहे का? मी हे शेवटचे विचारत आहे."
"होय सर..." कित्येक दिवसांनी विजयच्या तोंडातून आज शब्द बाहेर पडले. "तुम्ही मला शिक्षा सुनावण्यापूर्वी मला तुम्हाला व इथे जमलेल्या कोर्टातील लोकांना काहीतरी सांगायचे आहे."
"बोला..." न्यायाधीश म्हणाले. विजयने बोलायला सुरवात केली,
"सर.. प्रत्येक व्यक्ती आपले कुटुंब सांभाळण्यासाठी धडपडत असतो. तसेच माझे एक कुटुंब होते. पण म्हणतात ना, चांगल्या गोष्टींना काहीवेळा  कोणाचीतरी वाईट नजर लागते तशी कोणाचीतरी नजर माझ्या कुटुंबाला लागली. मग सुरवातीला मुलीने आत्महत्या केली.  त्यानंतर मुलाचा अपघातात मृत्यू झाला व त्यानंतर पत्नीचा हार्ट अटॅकने मृत्यू. मी पूर्णपणे कोसळलो होतो. माझे संपूर्ण कुटुंब उध्वस्थ झाले होते. आता जगायचे तर कोणासाठी? मग डोक्यात विचार आला... नाही... आपण असे शांत राहून चालणार नाही. ज्यांच्यामुळे माझे कुटुंब उध्वस्त झाले त्यांना जिवंत राहण्याचा काहीच अधिकार नाही. त्यानंतर मी शहरात आलो. सर्वप्रथम माझ्या मुलगीने  आत्महत्या केली त्या अजयला मी ठार मारले. नंतर मुलाचा अपघात ज्या ट्रकने त्याला धडक मारली त्या ट्रक ड्राइव्हरला  मी ठार केले. माझे काम पूर्ण झाले. मी एका ठिकाणी भाषणात ऐकले होते. 'माझी नरकात जाण्याचीसुद्धा तयारी आहे पण त्याला कारण स्वर्गीय असले पाहिजे'... बस्स... मग आता दुस-यासाठी काहीतरी करायचे ठरवले व चार ठिकाणी चो-या केल्या. ज्या ठिकाणी चो-या केल्या ते लोक भ्रस्टाचारी होते. साहेबांनी  पैसे मागितले आहेत असे सांगून हेच लोक पैसे खात होते. तो पैसा ज्या ठिकाणी गरजेचा होता त्या ठिकाणी पाठविला." विजयचे बोलणे संपले.
"तो पैसा तुम्ही कोठे ठेवला?"
"माफ करा सर... याबद्दल मी तुम्हाला काही सांगू शकत नाही."
          विजयचे बोलणे ऐकल्यानंतर कोर्टाने कलम ३०२ अन्वये त्याला फाशीची शिक्षा सुनावली. ज्या दिवशी त्याला फाशी देण्यात येणार होती त्या दिवशी त्याला शेवटची इच्छा विचारण्यात आली. त्याने नकारार्थी मान हलवली. विजयचे जल्लादाने तोंड झाकले. गळ्यात फास अडकवला. शेवटचा विचार त्याच्या मनात तरंगला,
 "मी ते पैसे अनाथाश्रम, अपंग व निराधार तसेच इतर गरजू लोकांना अप्रत्यक्षरीत्या दिले. मी एका वाईट मार्गाने निघालो होतो. मला याचा अजिबात पश्चाताप होत नाही. कारण मी गरजू लोकांनां थोडीफार मदत केली. शेवटी आयुष्य थोडेच आहे. शक्य असल्यास परमेश्वर मला माफ करेल."
 पण कोर्टाने अगोदरच निकाल जाहीर केला होता. कारण त्यांच्या दृष्टिकोनातून विजय पाटील यांचा निर्णय चुकीचा होता. .... निर्णय... आयुष्याचा....

-------------------------------------------------------------- समाप्त -----
              


         


        

















शुक्रवार, ३ मार्च, २०१७

4. निर्णय - भाग १

"ऑर्डर... ऑर्डर" न्यायाधीशांनी सर्वांना  शांत राहायला सांगितले. 
" श्री विजय पाटील तुम्हाला याबद्दल काही बोलायचे आहे का?" सर्वजण विजयाकडे पाहू लागले. 
पण विजय कसल्यातरी विचारात मग्न होता. आज त्याच्या चेह-यावर  कोणतीच काळजी दिसत नव्हती. उलट नकळत एक स्मित हास्य  उमटले त्याचबरोबर डोळ्यांतून पाणी वाहत होते ते पण कोणाचीतरी आठवण येत होती म्हणून. आज विजयला आपले आयुष्य सार्थक झाल्यासारखे वाटत होते. पुन्हा एकदा न्यायाधीशांनी विजयला हाक मारली,
"श्री विजय पाटील... मी तुम्हाला परत विचारतो आहे. तुम्हाला आवश्यकता असेल तर तुम्ही तुमचा वकील नेमू  शकता... तुम्हाला काहीच बोलायचे नाही का?" विजय अजूनही शांतच होता एखाद्या पुतळ्यासारखा. 
"या केसचा अंतिम निर्णय दोन दिवसांनी होईल तोपर्यंत हे न्यायालय स्थगित केले जाते." असे म्हणून न्यायाधीश निघून गेले. 
    सायंकाळचे ५ वाजले होते. पोलीस विजयला न्यायालयातून पोलीस कस्टडीत  घेऊन जात होते. मिडिया तोपर्यंत कोर्टासमोर जमा झाली होती व ह्या केसाची बातमी Breaking News  म्हणून सर्वत्र पसरवायला सुरवात  केली होती. विजय पुन्हा त्या कोठडीतच्या एका कोप-यात बसला होता. ३ तासानंतर रात्रीच्या वेळी एक पत्रकार तेथे आला व म्हणाला, 
"इन्स्पेक्टर दीक्षित... मला विजय पाटील यांना भेटायचे आहे."
"तुम्ही कोण?"
"मी दिपक  पाटील... पत्रकार म्हणून काम करतोय..."
"माफ करा. रात्रीचे ८ वाजून गेले आहेत. ह्यावेळेस तुम्ही त्यांना भेटू शकत नाही. तुम्ही एक काम करा. तुम्ही उद्या सकाळी ठीक १० वाजता येथे या."
"साहेब... मला त्यांना भेटणे खूप गरजेचं आहे. कृपया फक्त ५ मिनिटे भेटू द्या. मी त्यापेक्षा जास्त वेळ घेणार नाही..." दोन्ही हात जोडून दिपकने इन्स्पेक्टर दीक्षित यांना विनंती केली.
"ठीक आहे पण ५ मिनीटांपेक्षा  जास्त वेळ तुम्हाला देता येणार नाही." म्हणत इ . दीक्षित  यांनी हवालदाराला बोलवून दिपकला विजयकडे घेऊन जाण्यास सांगितले.
विजय खाली मान करून दोन्ही गुढग्यावर हात ठेऊन बसला होता. 'विजय' म्हणून दिपकने हाक मारली. जेंव्हा विजयने दिपकला पाहिले तेंव्हा तो ताडकन उठून त्याला बिलगला व हुंदके देत रडू लागला. दोन मिनिटे दिपक  काही बोलला नाही. त्यानंतर म्हणाला,
"रडू नकोस... मला तुझ्याशी खूप काही बोलायचे आहे."
"पण आता खूप वेळ झाला आहे." विजयने सांगितले.
"पण तू असे काही करशील ह्या गोष्टीवर माझा विश्वासच बसत नाही. मला प्रथम वाटले दुसरा कोणीतरी विजय असेल. पण मिडीयाने  जेंव्हा बातमी पसरवली त्यावेळी मी मुंबईवरून तात्काळ तुला भेटायला आलो. खरं  काय आहे? हे सांगशील का मला..."
"न्यायालयात जे सिद्ध झाले तेच खरे आहे."
"पण का? काय गरज होती हे सर्व करण्याची?"
"ती फार मोठी गोष्ट आहे. जाऊ दे... कदाचित न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतर मी सांगेन. बरं ... तुझं कसं  चाललंय? घरचे  सगळे ठीक आहेत ना?"
"मला मुलगी झाली. हे पेढे पण तुझ्यासाठी आणले आहेत." पेढे देण्यासाठी दिपकने पिशवीतील बॉक्स पुढे केला.
"अरे व्वा.." म्हणतं  विजयने एक पेढा खाल्ला व एक आपल्या जिवलग मित्राला म्हणजेच दिपकच्या तोंडात चारला.
"दोन दिवसांनी ह्या केसचा अंतिम निर्णय आहे. माझी इच्छा आहे की  तू त्यावेळी न्यायालयात हजार रहावेस. येशील ना?"
"हे काय विचाराने झाले मित्रा... नक्की येईन." इतक्यात हवालदाराने दिपकला हाक मारली.
"ओ  साहेब... तुमची ५ मिनिटे पूर्ण झालीत."
"चल... निघतो मी. दोन दिवसांनी भेटू." असे म्हणून शेवटचे अलिंगन  देऊन दीपक निघून गेला... पुन्हा विजय त्या कोठडीच्या एका कोप-यात जाऊन बसला व कसल्यातरी विचारात गुंग होता. त्याला त्याचा भूतकाळ क्रमाक्रमाने आठवू लागला होता...
७ वर्षांपूर्वी : ... 
"आई, पप्पा कसे आले नाहीत अजून?" सोनल बोलली.
"येतील गं ... त्यांची यायची वेळ झाली आहे." सुप्रियाने उत्तर दिले.
"पण रात्रीचे ९ वाजून गेले आहेत. इतका वेळ पप्पांना कधीच लागत नाही." स्वप्नील म्हणाला.
"कदाचित काम जास्त असेल... बरं. तुम्ही दोघे जेवणाच्या टेबलजवळ बसा. मी ५ मिनिटात त्यांना फोन लावून खाली येते." म्हणत सुप्रिया फोन करण्यासाठी गेली. सोनल आणि स्वप्नील धावत जेवणाच्या टेबलापाशी गेले. सुप्रियाने विजयला फोन लावला व म्हणाली,
"अहो... अजून आला नाहीत तुम्ही? काही अडचण तर नाही ना? मुलांना व मला काळजी वाटते म्हणून फोन केला."
" काही अडचण नाही. मी ऑफिसमधुन १ तासांपूर्वी निघालो आहे  पण समोर एक अपघात झाला असल्यामुळे ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे. १० मिनिटात येतो मी... तोपर्यंत जेवणाची ताटे तयार ठेव." विजयने सांगितले.
"ठीक आहे... सावकाश या." एवढे  बोलून सुप्रियाने फोन ठेवला व खाली जेवणाच्या टेबलापाशी गेली.
"काय झालं आई? पप्पांना अजून किती वेळ लागणार?" सोनल म्हणाली.
"येतीलच १० मिनिटात... ट्रॅफिकमध्ये अडकले आहेत. पण लवकर येतील."
"मला तर जोराची भूक लागली आहे." म्हणत स्वप्नील चेहऱ्यावर उदाशीचे भाव आणू लागला.
"त्यांनी जेवणाची ताटे तयार ठेवायला सांगितली आहेत. तुम्ही सुरु करा तोपर्यंत येतील ते."
"नाही..." दोघेही एकदम बोलले.
"बरं  ठीक आहे. थोडावेळ वाट पहा."
     तिघेही एकदम शांत बसले. १५ मिनिटांनी दरवाजाची बेल वाजली. सुप्रियाने दरवाजा उघडला. विजय पावसात थोडा भिजला होता. हे पाहून सुप्रियाने लगेच त्याला प्रश्न केला,
"अहो... रेनकोट असताना भिजला कसे काय? आणि तुमचा रेनकोट कुठे आहे?"
"सांगतो... सर्वकाही सांगतो. अगोदर आत तर येऊ दे." म्हणत विजय घरात आला तसेच त्याच्याबरोबर घडलेला प्रसंग सांगायला सुरवात केली.
"तो रेनकोट मी एका वृद्ध माणसाला दिला."
"म्हणजे?... मला काही समजले नाही."
"तुला म्हणालो होतो ना, मी ट्रॅफिकमध्ये अडकलोय. सी.बी.एस.  जवळ खूप गर्दी होती. त्यात खूप पाऊसही पडत होता. मी गाडीवर होतो तेंव्हा माझे लक्ष शेजारी गेले. एक वयोवृद्ध माणूस पावसात भिजून थंडीने कडकडत होता. माझ्या डाव्या बाजूच्या एका इमारतीच्या कोप-यात  तो बसला होता. मी गाडी तिथेच ठेवली व माझा रेनकोट काढून त्याला दिला. त्याच्या चेह-यावरचे स्मित हास्य पाहण्यासारखे होते. त्याने माझ्या डोक्यावर हात ठेवला जणू तो मला आशीर्वाद देत होता. इतक्यात ट्रॅफिक पुढे सरसावल्याची जाणीव मला झाली. मी पटकन गाडीवर बसलो व घरी आलो."
"तुमचं हे नेहमीचंच आहे. मनात आले की  कोणालाही निःसंकोचपणे मदत करत असता. बरं... आधी अंग पुसून घ्या व जेवायला या. मुलं  केंव्हापासून  वाट पाहात बसली आहेत.
" दोनच मिनिटात येतो." म्हणत विजय फ्रेश होण्यासाठी गेला. थोड्यावेळाने आता चौघेही जेवायला बसले होते.
       पाटील परिवार... एकदम सुखी परिवार. मध्यमवर्गीय कुटुंब असले तरीही प्रत्येकजण आपापल्या कामात मग्न असायचे. विजय खाजगी कंपनीत नोकरीला होता. सुप्रिया त्याची पत्नी घरी शिवणकाम करत असे. स्वप्नील बी. ई. सिव्हील  च्या पहिल्या वर्षी शिकत होता व ११ वी  विज्ञान शाखेत कोमल शिकत होती. दिवसभर प्रत्येकजण आपापल्या कामात मग्न असायचे. परंतु रात्री न चुकता एकत्र जेवायला बसायचे.
         सर्वजण जेवण आटोपून आपापल्या खोलीत झोपण्यासाठी गेले. सुप्रिया थोड्या वेळाने किचनमधील काम आटोपून बेडरूममध्ये गेली. विजय तेथे अगोदरच आचार्य चाणक्यांचे  पुस्तक वाचत बसला होता. त्या पुस्तकांमधील एक वाक्य त्याला मनापासून भावले," सापाला, रस्त्यातील काट्यांना तसेच शत्रूला दगडाने ठेचून काढले पाहिजे." विजय पुस्तक वाचण्यात इतका गुंग होता की  सुप्रिया वरती आली आहे याचे त्याला भानच नव्हते. तेवढ्यात सुप्रिया म्हणाली,
"अहो, रात्र खूप झाली आहे. झोपा आता." विजयने पुस्तक बाजूला ठेवले आणि झोपी जाण्याचा प्रयत्न करू लागला. परंतु बराच वेळ गेला तरी त्याला झोप येईना. सुप्रियाला न काळात त्याची जाणीव झाली. तिने लाईट लावली व विचारले,
"काय झालं?"
"काही नाही."
"काही नाही तर मग अजून जागे कसे आहात? कसल्या विचारात मग्न आहात?"
"मुलांच्या..."
"पण का?"
"बघता-बघता मुले मोठी झालीत, समजलेच नाही. त्यांच्या शिक्षणाची काळजी वाटते. सोनल ११ वी  सायन्सला आहे. तिला डॉक्टर व्हायचे आहे आणि स्वप्नीलला इंजिनीयर. ह्या दोघांच्या शिक्षणाच्या खर्चाचा विचार करत होतो.
"असा विचार करणं  तसेच तो तुमच्या मनात याबद्दल येणं  साहजिकच आहे. पण एक सांगू तुम्हाला, तुम्ही ह्या दोघांच्या शिक्षणाच्या खर्चाची अजिबात काळजी करू नका. जर जास्तच आवश्यकता भासली तर आपण शैक्षणिक कर्ज काढू पण मुलांच्या शिक्षणात काहीही कमी पडू द्यायचे नाही. कारण शिक्षणच व्यक्तीला त्याच्या आयुष्यात मोठे, समृद्ध आणि समजूतदार बनवते."
"खरं  आहे तुझं. अडाणी माणसाचे आयुष्य कष्ट करण्यातच वाया जाते तर याउलट शिकलेला ज्ञानी मनुष्य, धडपड करून, प्रयत्न करत काही ना काही मार्ग काढत नोकरीला लागतो."
"बरं... चला, झोपा आता. खूप वेळ झाला आहे. रात्रीचे ११ वाजून गेले आहेत. उद्या परत तुम्हाला कामावर जायचे आहे ना?"
"हो... ठीक आहे. good night..."
"good  night..." म्हणून सुप्रिया झोपी गेली. लगेच विजयचाही  डोळा लागला.
                 दुस-या दिवशी सकाळी ९ वाजता विजय ऑफिसला चालला होता. स्वप्नील व सोनल दोघेही कॉलेजला जाण्याची तयारी करत होते. सुप्रिया व मुलांचा निरोप घेऊन विजय घराबाहेर  पडला. एका तासानंतर ऑफिसमध्ये पोहोचला.
"विजय, चल चहा घेऊ..." नितीनने विजयला हाक मारली.
"हो चल." म्हणत विजय  आणि नितीन ऑफिसच्या बाहेर जवळच असलेल्या चहाच्या टपरीवर आले.
              नितीन विजयचा खास व जिवलग मित्र होता. दोघेही एकाचवेळी ह्या ऑफिसमध्ये कामाला लागले होते. ह्या दोघांची एकमेकांशी ओळख मुलाखतीच्या वेळी झाली होती. विजय नितीनला प्रत्येक गोष्ट सांगायचा.  मग ती व्यक्तिगत स्वतःबद्दल असो किंवा कुटुंबाबद्दल. नितिनही खुल्या मनाचा. तोसुद्धा  प्रत्येक गोष्ट विजयसोबत share  करत असायचा. चहा घेऊन झालेनंतर दोघेही आपापल्या कामाला  लागले.
               सायंकाळी ६ नंतर विजय नितीनला 'चल, मी घरी जातो' म्हणून सांगून ऑफिसमधून बाहेर पडत होता. इतक्यात सुप्रियाचा फोन विजयला आला,
"अहो, कुठे आहेत तुम्ही?... जरा घरी लवकर येत येईल का?"
"ऑफिसमधून बाहेर पडत आहे. घरीच येत आहे. काय झालं?"
"तुम्ही आधी घरी या... मग सांगते."
"ठीक आहे. मी लवकर येण्याचा प्रयत्न करतो." असे म्हणून विजयने फोन ठेवला व घाईघाईने निघाला.
"का रे... काय झालं?" नितीनने लगेच प्रश्न केला.
"काही नाही... सुप्रियाचा फोन होता. घरी लवकर या म्हणाली म्हणून गडबडीने निघालो होतो."
"काही अडचण तर नाही ना..."
"नाही... आणि समज असेल तर तुला नक्की सांगेन."
"ठीक आहे. माझे पण थोडे काम राहिले आहे. तू जा. मी थोड्यावेळाने येतो."
            वाटेतून घरी जात असताना त्याच्या मनात अनेक विचार येत होते. का बरं  सुप्रियाने फोन केला असेल? घरी सर्व ठीक तर असेल ना? काही अडचण तर निर्माण झाली नसेल ना? मी कामावर असताना सुप्रियाचा असा यापूर्वी कधीही फोन केला नव्हता. परंतु आज अचानक काय झालं असेल? विचार करत-करत विजय घरी पोहोचला. सुप्रियाने दरवाजा उघडताच त्याने विचारले,
"काय झालं?"
"अहो, सोनल घरी नाही आली."
"म्हणजे?"
"सकाळी ती कॉलेजला गेली होती परंतु सायंकाळपर्यंत ती घरी आलीच नाही. तिला call  केला पण मोबईल कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर लागत होता. सुरवातीला मला वाटले कि तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली असेल. तिच्या मैत्रिणींजवळ चौकशी केली असता तेथे सुद्धा नव्हती. म्हणून मी तुम्हाला फोन केला." सुप्रिया घाबरत-घाबरत  सांगत  असताना तिच्या  डोळ्यांतून पाणी आले. विजय लगेच बोलला,
"घाबरू नकोस आणि रडू नकोस... आधी शांत हो... बस खाली. मी प्रयत्न करतो. मी परत फोन लावतो."
विजयनेसुद्धा फोन लावला पण आता फोन स्वीच  ऑफ आहे असे ऐकू येत होते.  मग स्वप्नीलकडे पाहत विजय म्हणाला,
"स्वप्नील, सोनलने तुझ्याजवळ काही सांगितले होते का? सकाळी काही बोलली होती का तुला..."
"नाही पप्पा..." म्हणत स्वप्नीलने नकारार्थी मान हालवली. मग विजयने शेजारी व इतर मित्रांना फोन लावून थोडी चौकशी केली परंतु सोनलचा काही सापडली नाही. त्यानंतर विजय म्हणाला,
"बर... ठीक आहे. आज रात्रीपर्यंत आपण सोनलची वाट पाहूया. जर ती आली नाही तर उद्या सकाळी पोलीस स्टेशनला ती हरवल्याची तक्रार करूया. ठीक आहे." दोघांनी होकारार्थी  मान  हलवली.
           रात्रीचे जेवण आटोपल्यानंतर तिघेही आपापल्या खोलीत गेले. विजयला तर जास्तच काळजी लागली होती परंतु त्याने तसे काही दोघांना दर्शविले नाही. रात्रीचे २ वाजले होते. विजय तर अजून जागाच होता. अचानक सुप्रियाला जाग आली. तिने लाईट लावली व बोलली,
"तुम्ही झोपला नाहीत अजून?"
"नाही. सोनलचा विचार डोक्यात घर करून राहिला आहे. ती ठीक तर असेल ना? आजपर्यंत ती कधी घरी उशिरा आली नाही. ती जे काही करायची त्याची कल्पना आपल्याला अगोदर द्यायची. पण अचानक अशी कुठे गेली असेल ..."
"मला पण खूप काळजी वाटते. आतापर्यंत आपण तिला कोणत्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही.  तीसुद्धा आपल्या आज्ञेच्या कधीच बाहेर गेली नाही. जर ती उशिरा येणार असेल किंवा मैत्रिणीच्या घरी राहणार असेल तर फोन करून नक्की सांगायची. बरं, तुम्ही झोपा आता. असेच जागे राहिलात तर झोप अपुरी होऊन सकाळी जागे होताना त्रास होईल."
"ठीक आहे." म्हणत विजयने डोळे मिटले.
                विजयला जाग आली ती सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशाच्या किरणांनी जी खिडकीच्या काचेतून आत त्याचा चेह-यावर पडली होती. विजय जांभई देत उठला. घड्याळात पाहतो तर काय, सकाळचे ८ वाजले होते. "बाप रे! उठायला उशीर झाला." विजय स्वतःशीच पुटपुटला. स्वप्नील आणि सुप्रिया दोघेही सकाळी लवकर उठले व उपहार करण्यासाठी टेबलाजवळ विजयाची वाट पाहत होते. विजय थोड्या वेळात फ्रेश होऊन तेथे आला. नाष्टा  करत असताना स्वप्नीलने प्रश्न केला,
"पप्पा मी पण तुमच्याबरोबर येऊ शकतो का?"
"नाही... नको. तू कॉलेजला जा. आम्ही दोघे जातो पोलीस स्टेशनला." विजयने सांगितले. मग थोड्या वेळाने स्वप्नील कॉलेजला गेला. विजयने  सुप्रियाला बरोबर घेऊन पोलीस स्टेशनला निघाला. दोघेही  पोलीस स्टेशनला पोहचले. इन्स्पेक्टर देसाई तेथील प्रमुख होते. त्यांच्याशी विजयने बोलायला सुरवात केली,
"साहेब... आमची मुलगी काल घरी परत आली नाही. तिला फोन केला आम्ही परंतु फोन स्विच ऑफ लागला. रात्रभर वाट पहिली परंतु ती काही घरी परतली नाही."
"बरं... म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का कि... तुमची मुलगी हरवली आहे." देसाई म्हणाले.
"होय साहेब..."
"तुमचा कोणावर संशय... म्हणजे तुमचे कोणी वैरी वगैरे..."
"नाही.."
"ठीक आहे. तुमच्याकडे तिचा फोटो असेल ना?"
"हो. आहे."  म्हणत विजयने सोनलचा फोटो देसाईंच्याकडे दिला.
"ठीक आहे. आम्ही आमचा तपास चालू ठेवतो. जर काही माहिती मिळाली तर आम्ही तुम्हाला लगेच कळवतो. यांदरम्यान  जर चौकशीसाठी तुम्हाला बोलावले तर पोलीस स्टेशनला यावे लागेल.
"बरं  साहेब..." म्हणत दोघांनीही इन्स्पेक्टर देसाईंचा निरोप घेतला. बघता-बघता तो दिवस असाच निघून गेला.
           त्यानंतर  काही दिवस असेच गेले. विजयने थोड्या  दिवसांची रजा घेतली होती. पोलिसांचा शोध चालूच होता. विजय प्रत्येक आठवड्याला चौकशी करण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये येत होता. पण सोनलचा  काही पत्ता लागला नव्हता. पोलिसांनी शक्य होईल त्या ठिकाणी सुप्रियाचे फोटो दाखवले. काही ठिकाणी 'हरवली आहे' असे पोस्टरसुद्धा चिकटवले. त्या पोस्टरवर आपण ह्या व्यक्तीस पाहिल्यास किंवा सापडल्यास पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. माहिती देणा-यास योग्य बक्षीस दिले जाईल असे लिहले होते. पण तरीसुद्धा सुप्रियाबद्दल काही कळू शकले नाही. बघता बघता एक महिना होऊन गेला. विजयची रजाही संपत आली होती. साहेबांना  सांगून त्याने आपली रजा वाढवून मिळण्यासाठी परत अर्ज केला पण 'तुम्ही थोडा उशिरा आलात तर चालेल पण यापेक्षा अधिक रजा मिळू शकणार नाही' असे साहेबानी सांगितले.
       विजय नाईलाजास्तव एक महिन्यांनी पुन्हा कामावर निघाला. जेवणाचा डबा सुप्रियाकडून घेत असताना सुप्रियाच्या मनातील सोनल विषयीची काळजी त्याने घेरली व तिला म्हणाला,
"काय झालं? तू ठीक तर आहेस ना?"
"काही नाही."
"मग तू उदास का दिसते आहेस? सोनलची काळजी वाटते का?"
"हो..."
"हे बघ.... काळजी करू नकोस. तुला तिची काळजी वाटणं  साहजिकच आहे. पण जास्त काळजी करू नकोस.  येईल ती परत घरी. चल मी निघतो."
          सुप्रियाला विजयने  थोडा आधार दिला तर खरा, पण तोसुद्धा मनाने खचला होता. त्यालासुद्धा सोनलची काळजी वाटत होती. पण आपणच घराचा  आधार असल्याने त्याला असे खचून चालणार नव्हते. थोड्या वेळातच तो ऑफिसमध्ये पोहचला. आपल्या टेबलपाशी जाऊन बसतो तोवर नितीनने त्याला हाक मारली.
"चल, चहा घेऊ..."
"चल." म्हणत दोघेही चहाच्या टपरीवर आले. चहा घेत असताना नितीनचे लक्ष विजयकडे गेले. तो कसल्यातरी विचारात मग्न असल्याची त्याला जाणीव झाली. त्याने त्याला विचारले,
"काय झालं?"
"काही नाही..."
"मग एवढा कसल्या विचारात मग्न आहेस...आणि इतके दिवस रजा कशासाठी काढली होतीस?."
"काही नाही रे..."
"हे बघ...मी तुला १० वर्षांपासून ओळखतो. तुला आपल्या मैत्रीची शपथ. काय झालंय  सांगशील का?"
"सोनल..."
"सोनल काय?"
"सोनल एक महिना झाला, तरी घरी आली नाही. तिची काळजी वाटते आहे. कुठे असेल? कशी असेल? डोके तिच्या विचाराने भणभणायला लागले आहे."
"तू पोलीस स्टेशनला ती हरवल्याची तक्रार नोंदवली आहेस ना?"
"हो..  गेलो होतो. त्यांनी त्यांचा तपास चालू ठेवला आहे. काही कळले तर सांगतो म्हणाले."
"बर...हे बघ, जास्त काळजी करू नकोस. मी जर तुझ्या जागी असतो तर माझीसुद्धा अवस्था अशीच झाली असती. ठीक आहे आता. जास्त विचार करत राहिलास तर ऑफिसवरील कामावर परिणाम होईल. चल ऑफिसमध्ये जाऊ." असे म्हणत नितीन व विजय चहा संपवून ऑफिसमध्ये कामाला गेले. सायंकाळी ऑफिस सुटल्यावर नितीनचा निरोप घेऊन विजय घरी निघाला. घरी पोहचल्यानंतर त्याने पहिले की  सुप्रिया दरवाज्यासमोर आपली वाट पाहत उभी आहे. तिला पाहताच विजयने विचारले.
"काय गं ... इथे का थांबली आहेस?"
"तुमची वाट पाहत उभी होते. काळजी वाटत होती म्हणून बाहेर थांबले."
"बर  चल.. आत चल.. थोड्या वेळात जेवायला बसूया. स्वप्नील आला आहे ना?"
"हो.. तो कधीच आला आहे."
"ठीक आहे."
                     जेवण करून तिघेही आपापल्या खोलीत झोपण्यासाठी गेले. दिवसामागून दिवस भराभरा निघून जात होते. एके दिवशी रात्रीचा जेवणाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर सर्वजण आपापल्या खोलीत होते.  सुप्रिया व विजय जागेच होते. मग थोड्या वेळाने सुप्रियाने बोलायला सुरवात केली,
"आपली सोनल ठीक तर असेल ना?"
"असेल." विजय उत्तरला.
"पण ती नेमकी कुठे असेल?"
"माहित नाही. पोलीस शोधून काढतीलच."
"पण कधी?... ६ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊन गेला. तरीही सोनलचा काही पत्ता सापडला नाही."
"हे बघ, पोलीस तिला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. थोड्या दिवसात काहीतरी मार्ग नक्की सापडेल. तू फक्त धीर धर." विजयच्या ह्या वाक्यावर ती काही बोलली नाही. ५ मिनिटांनी फक्त एवढेच म्हणाली,
"चला, झोपूया. उद्या परत तुम्हाला कामावर जायचे आहे."
"ठीक आहे. गुड नाईट..."
"गुड नाईट..."
                       बघता-बघता १० महिन्यांपेक्षा जास्त अवधी गेला. सोनलचा काही पत्ता नव्हता. पोलिसांचा तपास चालू होताच पण त्यांना काही धागेदोरे सापडले नाहीत. मग एके दिवशी सकाळी ९ वाजता इन्स्पेक्टर देसाईंचा विजयला फोन आला व ते म्हणाले,
"विजय तुम्ही आत्ता पोलीस स्टेशनला येऊ शकता का?"
विजय नुकताच ऑफिस कामावर जाण्यासाठी बाहेर पडला होता. तो म्हणाला,
"हो येतो साहेब... सोनलची काही बातमी मिळाली का?"
"हो... पण मी तुम्हाला फोनवर जास्त काही सांगू शकणार नाही. तुम्ही अगोदर पोलीस स्टेशनमध्ये या. मग तुम्हाला सविस्तर सांगतो.
"ठीक आहे." म्हणत विजयने फोन कट केला व ऑफिसला जाण्यापूर्वी पोलीस स्टेशनला निघाला. तत्पूर्वी याबाबतची कल्पना त्याने सुप्रियाला दिली होती. थोड्या वेळात विजय पोलीस स्टेशनला पोहोचला. इन्सेप्क्टर देसाईंना पाहून विजय म्हणाला,
"साहेब... सोनलची काही बातमी? ती ठीक तर आहे ना?"
"माफ करा विजय... पण एक वाईट बातमी आहे तुमच्यासाठी."
"काय झालं इन्स्पेक्टर?"
"तुमच्या सोनलचा मृतदेह सापडला आहे. इथून ३० किमी अंतरावर एक छोटस  खेडेगाव आहे. तेथील एका शेतात सापडला. सोनलचा इथून जवळपास काही पत्ता मिळत नव्हता म्हणून आम्ही बाहेर चौकशी केली. त्या गावाच्या जवळ राहत असलेल्या एका गावक-याने सोनलला तिथे एक-दोन वेळा पाहिल्याची बातमी दिली. मग आम्ही गावाच्या आसपास शोध चालू ठेवला. तपास चालू असताना एका हवालदाराला सोनलचा मृतदेह सापडला. ती बॉडी ज्या ठिकाणी होती त्या शेतातील भागाजवळ जास्त वस्ती नव्हती व जवळपास कोणी वास्तव करत नव्हते. त्यामुळे लोकांच्या निदर्शनास हे आले नाही. आम्ही बॉडी पोस्टमार्टमसाठी पाठवली आहे. येईलच थोड्यावेळात. तुम्हाला बॉडी नंतर घरी पोहचवली जाईल.
                विजय हे ऐकून धक्काच बसला पण स्व:ताला  सावरत त्याने देसाईंना प्रश्न केला,
"म्हणजे तुम्हाला सोनलने आत्महत्या केली आहे असे म्हणायचे आहे का?"
"सुरवातीस आम्हास सोनलला कोणीतरी मारून टाकले असावे असे वाटले पण सखोल चौकशी नंतर असे निदर्शनास आले सोनल जेथे राहत होती त्या भाड्याच्या खोलीमध्ये आम्ही गेलो. तेथे आम्हाला एक डायरी सापडली." असे सांगत देसाईंनी ती सापडलेली डायरी विजयच्या हातात दिली. विजयने ती उघडून वाचायला सुरवात केली.
"पप्पा, मी तुमच्या माफीच्या लायकीची नाही. आत्तापर्यंत मी जे काही वागले त्याचा पश्चाताप मला होत आला आहे. माझे अजय नावाच्या मुलावर प्रेम होते. सुरवातीला अभ्यासाच्या निमित्ताने फक्त मित्र म्हणून आमची ओळख होती. पण थोड्या दिवसानंतर हळूहळू आमचा संपर्क कोणत्या ना कोणत्या कारणाने होत होता. त्याचे बोलणे, चालणे, त्याचा स्वभाव सुरवातीला चांगला होता म्हणून तो मला आवडत होता. पण आमच्या प्रेमाला दोघांच्या घरातून विरोध होईल म्हणून आम्ही पळून जाऊन लग्न करायचे ठरवले.
        घरातून पळून आल्यानंतर अजयकडे थोडेफार पैसे होते. आम्ही रजिस्टर लग्न केले. मग उरलेल्या पैशात कसातरी एक महिना निघून गेला.  तो नियमितपणे कामावर जात नव्हता. एक-दोन दिवस जायचा आणि थोडे दिवस घरी बसून असायचा. कसेतरी दिवस पुढे ढकलत नेत  होते.  नंतर जसजशी आर्थिक अडचण जाणवू लागली तसतसा त्याच्या स्वभावात बदल होत गेला. तो दररोज मला शाब्दिक टोमणे मारून मानसिक त्रास देत होता. मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. कुठेतरी खाजगी काम करून थोडे पैसे मिळवून राहूया. तुझ्यासारखे  मी पण कुठेतरी खाजगी काम करते असे सांगितले. पण तो ऐकायला तयारच नव्हता. मी बरेच दिवस त्याची समजून काढत होते पण तो काही मनावर घेत नव्हता.
           एके दिवशी सकाळी सकाळी त्याने कहरच केला. आदल्या रात्री आमच्यातील भांडणाने मला लवकर झोप लागली नव्हती. रात्री बराच प्रयत्न केल्यानंतर मी जेंव्हा घड्याळाकडे नजर टाकली तेंव्हा २ वाजले होते. त्या दरम्यान माझा डोळा लागला होता. या कारणास्तव मला सकाळी लवकर उठता आले नाही. मी झोपेत असताना त्याने मला जोरजोरात हलवून उठविले व म्हणाला, "मला आज काही कामानिमित्त शहरात जावे लागणार आहे. मी एका ठिकाणी नवीन काम बघितले आहे. तेथील काम निश्चित करून मी रात्रीपर्यंत घरी येईन." असे सांगून निघून गेला. मी त्याला त्याच्या जेवणाचे विचारणार होते तोपर्यंत तो दार आदळून घराबाहेर पडलासुद्धा होता.
                त्या दिवशी रात्रीचे १० वाजून गेले होते. तरी अजय परत आला नाही. मी मोबाइल लावण्याचा प्रयत्न केला पण तो संपर्क क्षेत्राच्या बाहेर येत होता. वाट बघता-बघता रात्रीचे २ वाजले होते. तरीसुद्धा अजय आला नाही. शेवटी कंटाळून मी न जेवता झोपी गेले. दुस-या दिवशी अजयचा काही पत्ता नव्हता.  एके दिवशी मी जेंव्हा घरात एकटी होते त्यावेळी कॉलेजमधील ४ मुले आमच्या खोलीच्या  समोर आली व दरवाजा ठोठावला.  त्यातील एक मुलगा म्हणाला, "ताई, थोडे पाणी मिळेल का? खुप तहान लागली आहे."  'घेऊन येते' एवढे बोलून मी आत पाणी आणण्यासाठी गेले असता चौघांनी  घरात दुसरे  कोणी नाही याचा अंदाज घेऊन लगेच आत प्रवेश केला व दाराला काडी लावली. मी पाणी घेऊन बाहेर येत होते त्यावेळी ते चौघे एकमेकांकडे बघून हसत होते.  मी लगेच त्यांना मोठ्या आवाजात बोलायला सुरवात केली,
"तुम्ही दरवाजा का बंद केला? आणि  हसता  कशाला? तुमची घरात यायची हिम्मत कशी झाली. चालते व्हा." ते काही बोलले नाहीत. हळूहळू माझ्या जवळ येऊ लागले. मग मी पुन्हा त्यांना ओरडले,
"मी आरडाओरड करेन. माझ्यापासून लांब राहा." पण तरीही कोणी ऐकायला तयार नव्हते. मी ओरडणार इतक्यात त्यातील एकाने माझ्या तोंडावर हात धरला व दुस-याने माझ्या तोंडाला रुमाल बांधला. मी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही. त्या चौघांसमोर मी एकटी हातबल झाले.  थोड्याच वेळात माझी अब्रू लुटून ते तेथून पळून गेले.  मला ज्यावेळी शुद्ध आली त्यावेळी सायंकाळचे ४ वाजले होते. मी कशीबशी उठले. खूप रडले. ह्या बाबतीत सांगायचे तर कोणाला? कोणीच ओळखीचे नव्हते. त्या नराधमांना याचे काहीच नव्हते. तसेच अजयचाही  पत्ता नव्हता.
                   ह्या घटनेनंतर १५ दिवस होऊन गेले. मग  माझ्या लक्षात आले कि अजयने  मला फसवले आहे व मला एकटी सोडून कायमचा निघून गेला आहे. त्यावेळी खूप पश्चाताप होत होता मला. मी असा तडकाफडकी निर्णय घ्यायला नको होता. निदान एकदातरी तुम्हाला विचारायला हवे होते. तुमच्या मनाला व आईला किती वाईट वाटले असेल या विचाराने सतत रडायला येत होते. वाटत होते की, परत घरी तुमच्याकडे यावे व माफी मागावी. पण कोणत्या तोंडाने येणार? मी आई होणार आहे याची अजयला चांगली कल्पना होती. पण तरीसुद्धा तो मला सोडून गेला. मी आत एकटी पडले आहे. काय करावे काही सुचत नव्हते. माझी तसेच तुमचीही अब्रू मी घालवली होती.          
            मग ठरवलं आणि निश्चितच केलं, माझ्यासारख्या मुलीला जगण्याचा अधिकार अजिबात नाही. जिने कधी, ज्या आई-वडिलांनी आपल्यासाठी भरपूर काही केले, कधीही कुठल्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही, त्यांच्या मनाच्या विरुद्ध असे घराबाहेर  पळून जाताना जरासुद्धा विचार केला नाही तिला जगण्याचा काहीच अधिकार नाही. मी हे जग सोडून जात आहे. शक्य असल्यास मला माफ करा. - तुमची सोनल."
विजयचा सर्व मजकूर वाचून संपला. त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. काय करावे? काय बोलावे? काही सुचत नव्हते. त्याचा तोल जाऊन तो खाली पडत होताच इतक्यात इ. देसाईंनी त्याला सावरले व म्हणाले,
"सांभाळा विजय... स्वतःला सांभाळा. आम्हालासुद्धा खूप वाईट वाटले. पण आम्ही शेवटी काय करणार? तुम्हाला असे खचून चालणार नाही. घरातील इतर लोक तुमच्यावर अवलंबून आहेत. तुम्ही घरी जा. पोस्टमार्टम झालेनंतर मी स्वतः बॉडी घरी आणून देतो.
            देसाईंच्या सांगण्यावर विजयने काहीच प्रत्त्युत्तर केले नाही. तो थेट घरच्या मार्गाला लागला. डोक्यात अनेक विचार येत होते. गाडी चालवताना त्याचे आजूबाजूला लक्ष नव्हते. विजय ह्या धक्क्यातून अजून सावरलाच नव्हता. तो समोर एका वाहनाला धडकणार होताच इतक्यात हॉर्नच्या आवाजाने तो भानावर आला. पाहतो तर समोर नितीन होता.
"अरे, समोर लक्ष देऊन तर गाडी चालवत जा. कुठल्या विचारात मग्न आहेस..."
"काही नाही. मी आज ऑफिसला येऊ शकत नाही. साहेबांना  फोनवरून सांगतो. चल मी निघतो." म्हणत विजय गाडी सुरु करून जाणार इतक्यात नितीनने विजयच्या गाडीची चावी काढून घेतली.
"काय झालं? आज अचानक अशी ऑफिसला दांडी कशी? जोपर्यंत नक्की काय झालाय ते सांगत नाहीस तोपर्यंत गाडीची चावी मिळणार नाही." विजयने गाडी बाजूला घेतली. नितीन त्याच्या मागोमाग आला. गाडी बाजूला लावून पुलाच्या एका बाजूला बोलत उभे राहिले. विजयच्या डोळ्यात पाणी आले होते. नितीनला कळलं ते. विजयचे लक्ष नदीतील पाण्याकडे होते. त्याच्या खांद्यावर हात ठेवत नितीन म्हणाला,
"काय झालं मित्रा?"
"माझी सोनल... मला सोडून गेली कायमची. आम्हा सर्वांना पोरकं केलं तिने." म्हणत गालावर ओंघळत असलेले अश्रू पुसत होता.
"काय?.... पण हे सर्व कसे आणि कधी झाले?"
"आज सकाळी, मी पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो. पोलिसांनी सर्व सांगितले." दोघेही थोडावेळ शांत उभे होते. मग विजयच बोलला,
"चल, निघतो मी. मला घरी जायचे आहे."
"सावकाश जा. मी ऑफिसमधून रजा टाकून लगेच तुझ्या घरी येतो." म्हणत नितीन ऑफिसला गेला.
              सुप्रिया विजयची दारातच वाट पाहत उभी होती. विजय गाडीवरून उतरताच तिने प्रश्नाचा भडीमार सुरु केला.
"अहो, काय झालं? सुप्रियाचा काही पत्ता लागला का? पोलीस काय म्हणाले?"
"सांगतो... अगोदर आत चल." विजय गाडीवरून उतरत असताना म्हणाला. घरात आल्यावर दाराची कडी लावली. त्यानंतर लगेच सुप्रिया बोलली,
"अहो, काय झालं? सांगा ना..."
"सुप्रिया आपणाला कायमची सोडून गेली." असे म्हणत विजयने पोलीस स्टेशनमधील सर्व घटना सुप्रियाला ऐकवली. विजयचे बोलणे ऐकल्यानंतर तिला जागेवरच फिट आली. त्याने सुप्रियाला उठवण्याचा प्रयत्न केला पण ती काही शुद्धीवर आली नाही. तो सुप्रियाला बेशुद्ध अवस्थेतच बेडरूममध्ये घेऊन गेला. सुप्रियाला बेडवर ठेऊन लगेच त्याने डॉक्टर साबळे यांना फोन केला व आपल्या घरी बोलवून घेतले जे त्यांचे फॅमिली डॉक्टर होते. थोड्या वेळात ते विजयच्या घरी पोहचले. सुप्रियाची तपासणी करून त्यांनी तिला इंजेकशन दिले व काही गोळ्या लिहून विजयाकडे चिट्ठी दिली. ते म्हणाले,
"घाबरण्यासारखे काही कारण नाही. अचानक ब्लड प्रेशर वाढल्याने त्यांना चक्कर आली. त्या शुद्धीवर येतील. तोपर्यंत तुम्ही ह्या गोळ्या घेऊन या व जेवणानंतर सकाळी एक व रात्री एक द्या." असे सांगून डॉक्टर साबळे निघून गेले.
           मग काही वेळानंतर नितीन घरी आला. काही क्षणापुर्वी सुप्रियाबाबत घडलेली घटना त्याने नितीनला सांगितली. सुप्रिया थोड्या वेळाने शुद्धीवर आली. नितीन व विजय शेजारीच बसले होते. सुप्रियाने विजयला हाक मारली. ती बेडवरुन उठण्याचा प्रयत्न करत होती.
"अहो, ऐकलंत का?"
"हा... बोल." विजय लगबगीने सुप्रियाजवळ गेला.
"माझा उजवा पाय व हात मला उचलता येत नाही. जरा थोडी मदत करता का मला वर उठण्यासाठी."
"जड  झाला असेल किंवा अवघडला असेल. थांब.. मी मदत करतो." म्हणत विजयने सुप्रियाला धरून उठविले व पाठ मागे उशीला टेकवून बसविले. सुप्रियाला काय बोलावे? काय करावे सुचत नव्हते. तिच्या डोळ्यातून फक्त अश्रू वाहत होते. मग थोडावेळ ती शांत बसली. इतक्यात स्वप्नील कॉलेजवरून आला. त्यालाही याबाबतीत सर्वकाही नितीनने सांगितले. तोंडातून एक शब्द बाहेर न पडता फक्त डोळ्यातून अश्रू वाहत होते त्याच्या. सायंकाळी ४ वाजता पोलीस सोनलची पोस्टमार्टम बॉडी घेऊन आले व विजयच्या हवाली करून निघून गेले. बाकीचा सर्व कार्यक्रम रात्री १० पर्यंत आटोपला. १२ दिवसांचा कार्यक्रमही  व्यवस्तित पार पडून सर्वजण आपापल्या कामात मग्न झाले.
                  बघता-बघता चार वर्षे निघून गेली. स्वप्नीलचे बी. ई. (सिव्हील) चे शिक्षण पूर्ण झाले. तो नोकरीच्या शोधात होता. त्याला सरकारी नोकरी हवी होती. म्हणून त्याने त्यासाठी आवश्यक असणा-या परिक्षा  दिल्या होत्या. बराच प्रयत्न केल्यानंतर त्याची १ डिसेंबर रोजी मुंबईत एका ठिकाणी मुलाखत होती.  त्याची मुलाखतीचीसुद्धा संपूर्ण तयारी झाली होती. पण अचानक २६ नोव्हेंबर रोजी मुंबईतील एका हॉटेलवर अतिरेक्यांनी हल्ला केला. याबाबत मंत्रिमंडळातील एका नेत्याने एक वाक्य भाष्य केले, "मोठमोठ्या शहरात अशा छोट्या गोष्टी घडत असतात." या एका वाक्यामुळे  तेथील सर्व मंत्रिमंडळ बरखास्त झाले व १ डिसेंबर रोजी होणारी मुलाखत रद्द करण्यात आली.
              पोटाची भाकरी असणारा हातातील घास तोंडाजवळ आला होता खरा पण पोटात जाणार इतक्यात कोणीतरी त्याला हिसकावून घेतला अशी अवस्था स्वप्नीलची झाली. नैराश्याने त्याच्याभोवती कुंपण घातले. तो गप्प-गप्पा राहू लागला. जास्त काही बोलणे नाही. आई-वडिलांनी त्याला धीर दिला. त्यामुळे आता आपण न खचता पुन्हा एकदा काहीतरी करून दाखवायचे, निराश न होता काहीतरी मार्ग काढत राहायचा असा निश्चय मनाशी बाळगून त्याने पुन्हा नोकरीसाठी प्रयत्न चालू ठेवले. काही दिवसांनी तो कंत्राटी स्वरूपात एका शासकीय ऑफिसमध्ये कामाला लागला होता.
               एके दिवशी ३१ डिसेंबरच्या रात्री स्वप्निलच्या मित्रांनी डोंगरी भागात पार्टी ठेवली होती. स्वप्नीलचे सर्व वर्गमित्र येणार होते. त्यामुळे रात्री आई-वडिलांना मला यायला उशीर होईल, तुम्ही जेवण करून घ्या असे सांगितले. रात्री १० वाजता पार्टीला सुरवात झाली. पार्टीचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. सर्वजण आपापल्या घरी निघाले. मित्रांचे आभार मानून स्वप्नीलसुद्धा दुचाकीवरून घरी येत होता. स्वप्नीलच्या मागून एक ट्रक येत होता. ट्रक ड्रायव्हर जोर-जोराने हॉर्न करीत होता. स्वप्नीलने त्याला ओव्हरटेक करण्यासाठी गाडी बाजूला घेतली. परंतु ट्रक ड्राइव्हर ओव्हरटेक न करता नुकताच हॉर्न वाजवत होता. 'बहुतेक याने भरपूर देशी ठोसली  असेल' असा विचार त्याच्या मनात तरळत होता इतक्यात त्या ट्रकने स्वप्निलच्या गाडीला वेगाने धडक दिली. त्याचा गाडीवरून तोल जाऊन तो खाली पडला .  ट्रकचा धक्का इतका जोराचा होता की, तो रस्त्यावरून फरफटत गेला. त्याने हेल्मेट परिधान केलेले नव्हते. त्याचे डोके किलोमीटरच्या दगडावर आदळले. डोक्याला जोरात मर बसल्याने त्याची कवटी फुटली व तो जागीच ठार झाला. ट्रक ड्राइव्हरच्या लक्षात येताच त्याने ट्रक  न थांबवता हायस्पीडने ट्रकसोबत पलायन केले. थोड्या अंतरावर त्याने ट्रक लावला व शेतातून मिळेल त्या वाटेने पलायन केले. लोकांनी त्या ड्रायव्हरला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु तो काही हाती लागला नाही. थोड्या वेळात काही लोक तेथे जमा झाले. स्वप्निलच्या कुटुंबाला फोन करण्यासाठी एका व्यक्तीने त्याच्या खिशातून मोबाइल काढला. परंतु ती व्यक्ती कॉल करू शकली नाही. कारण मोबाईलवर स्क्रीनलॉक  पॅटर्न होता.
                   इतक्यात दुस-या दोन लोकांनी तेथून जवळच असलेल्या पोलीस स्टेशनला कळविले. पोलिसांनी  बॉडी ताब्यात घेतली व पोस्टमार्टमला नेली. रात्रीचे १ वाजले होते. स्वप्नील अजून कसा आला नाही म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला कॉल केला. फोन उचलताच विजयने बोलायला सुरवात केली,
"अरे बाळा, कुठे आहेस? रात्रीचे १ वाजून गेले आहेत. घरी कधी येणार?"
"हॅलो... मी इन्स्पेक्टर यादव बोलत आहे."
"माफ करा सर. मला वाटले मी माझ्या मुलाला फोन लावला आहे. तुम्हाला चुकून लागला असेल. माफ करा." म्हणत विजय फोन कट करणार इतक्यात पलीकडून आवाज आला,
"हॅलो... तुम्ही बरोबर नंबर डायल केला आहे. हा फोन तुमच्या मुलग्याचा आहे. आपण कोण बोलत आहेत? मोबाईलवर 'पप्पा' असे नाव सेव्ह केले आहे म्हणून विचारले."
"मी विजय पाटील बोलत आहे. हा मोबाईल माझ्या मुलाचा आहे. इन्स्पेक्टर साहेब, हा मोबाईल तुमच्याकडे कसा? आणि स्वप्नील कुठे आहे?"
"माफ करा विजय. एक वाईट बातमी आहे तुमच्यासाठी. तुमच्या मुलाचा अपघात झाला आहे. आम्ही त्याला वाचवू शकलो नाही. बॉडी पोस्टमार्टमसाठी हॉस्पिटलमध्ये आणली आहे. तुम्ही येथे या. मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगतो. मोबाईलवर जास्त वेळ बोलू शकत नाही."
"ठीक आहे. मी येतो लगेच." म्हणत विजयने मोबाईल कट करून एकटाच घराच्या बाहेर पडत होता. इतक्यात सुप्रियाला जाग आली.
"अहो, काय झालं?... तुम्ही एव्हढ्या  गडबडीने कुठे निघालात?"
"स्वप्नीलचा अपघात झाला आहे. पोलिसांनी मला हॉस्पिटलमध्ये बोलवले आहे." विजयचे हे वाक्य ऐकून सुप्रियाची झोपच उडाली. ती सुद्धा खाडकन उठली.
"मी पण तुमच्यासोबत येते." म्हणत सुप्रिया विजयसोबत निघाली. घरात कुलूप लावून दाराबाहेर आली. विजय चारचाकी घेऊन दारात तयारच होता. थोड्याच वेळात ते दोघे सी.पी.आर. मध्ये पोहचले. दोघेही चौकशी विभागामध्ये विचारपूस करत होते. इतक्यात इन्स्पेक्टर यादव यांनी त्यांना आपली ओळख करून दिली. विजय म्हणाला,
"साहेब, स्वप्नील कुठे आहे?"
"बॉडी पोस्टमार्टम विभागामध्ये आहे." यादव यांनी उत्तर दिले.
"पण हे सर्व कसे झाले?" सुप्रिया लगेच बोलली.
"दोन व्यक्ती आमच्या पोलीस स्टेशनमध्ये रात्री १२ वाजता आल्या होत्या. त्यांनी आम्हाला ह्या अपघाताबद्दल कल्पना दिली. आम्ही तातडीने अपघाताच्या ठिकाणी पोहचलो. थोडी लोक जमा झालेले. तिथली प्रक्रिया आटोपून आम्ही लगेच सी.पी.आर. ला आलो. मग तासाभराने तुमचा मोबाईल आला व मी तुम्हास येथे येण्यास सांगितले.
                 सुप्रिया व विजयला काहीच सुचत नव्हते. दहा मिनिटांनी परत सुप्रियाला चक्कर आली. त्याच हॉस्पिटलमध्ये तिला admit  करण्यात आले. विजयने नितीनला कॉल केला व याबाबत कल्पना दिली. नितीन थोड्या वेळात तातडीने हजर झाला. विजय म्हणाला,
"मी स्वप्नीलचा कार्यक्रम आटोपून येतो.  तोपर्यंत तू सुप्रियाकडे लक्ष ठेव." असे सांगून विजय घरी आला. शक्य होईल तेवढ्या नातेवाईकांना कॉल केला. स्वप्नीलचा सर्व कार्यक्रम आटोपण्यास पहाटेचे ४ वाजले होते. विजय लगेच हॉस्पिटलमध्ये परत आला. त्याने नितीनला प्रश्न केला,
"सुप्रिया शुद्धीवर आली होती का?"
"अजून नाही." नितीन बोलला.
"बरं... मी आता घरी जातो. थोडीशी विश्रांती घेऊन थोडेफार साहित्य इथे घेऊन येतो. कदाचित सुप्रियासाठी थोडे दिवस येथे थांबावे लागेल. तू थोडावेळ येथे थांबू शकतोस का?"
"हे काय विचारणे झाले मित्रा... तू घरी जा व सकाळी ये. तोपर्यंत मी वहिनींजवळ थांबतो. जा तू घरी."
"बर..." म्हणून विजय गाडीतून घरी आला. आला तसाच लगेच झोपी गेला. खूप कंटाळला होता तो. त्यामुळे त्याला लगेच झोप लागली.
              पहाटेची मंद सूर्यप्रकाशाची किरणे त्याच्या तोंडावर पडताच त्याला जग आली. घड्याळावर नजर टाकली असता सकाळचे ८ वाजले होते. तो लगेच उठून फ्रेश झाला. घरातील थोडेसे साहित्य घेतले व हॉस्पिटलकडे निघाला. हॉस्पिटलमध्ये पोहचल्यावर सुप्रियाच्या खोलीमध्ये जाऊन पहिले असता नितीन तेथे नव्हता. बाहेर चौकशी केली असता नितीन औषधे आणण्यासाठी बाहेर गेला आहे, असे समजले. विजय पुन्हा सुप्रियाच्या खोलीमध्ये आला. इतक्यात नितीन आला. विजयने बोलायला सुरवात केली.
"मी काही दिवस ऑफिसला येऊ शकणार नाही. साहेबांना फोनवरून सांगतो. हि माझी  रजा घे."
"बर .. मी दररोज संद्याकाळी ऑफिस सुटल्यावर येथे येईन. पण त्या अगोदर काही लागले किंवा कसलीही अडचण आली तर मला कॉल कर. मी येईन." नितीनने सांगितले.
"ठीक आहे. तू आता ऑफिसला जा. मी थांबतो इथे." नितीनने विजयचा निरोप घेतला व तो तेथून बाहेर पडला. ऑफिसला जाण्यापूर्वी घरी जाऊन फ्रेश झाला. जेवणाचा डबा घेतला, त्यानंतर कामावर गेला.
              सकाळी १० च्या दरम्यान  डॉक्टर चेकिंगसाठी आले. चेकिंग करून परत निघाले तेंव्हा विजयने त्यांना हाक मारली,
"डॉक्टर, सुप्रिया कधी शुद्धीवर येईल?"
"तसे काही सांगता येणार नाही. आमच्याकडे अजून ४८ तास आहेत. ४८ तासात त्या शुद्धीवर आल्या पाहिजेत नाहीतर...."
"तर काय डॉक्टर...."
"तर कदाचित त्या कोमामध्ये जाऊ शकतात. विजय त्यांना तुमच्या मुलाच्या घटनेचा जोराचा धक्का बसलेला आहे. त्या धक्क्यातून त्या अजून सावरलेल्या नाहीत. तुम्हाला यांची जरा जास्तच काळजी घ्यावी लागेल." असे सांगून डॉक्टर निघून गेले.
           विजय डॉक्टरांच्या पाठमो-या आकृतीकडे काही क्षण पाहत राहिला. मग  सुप्रियाच्या शेजारी ठेवलेल्या स्टूलवर तो बसला. रात्रीचे १० वाजून गेले तरीही सुप्रिया शुद्धीवर आली नव्हती. यांदरम्यान  नितीन भेटून गेला होता. विजयची भूक मेली होती. थोड्याच वेळात त्याचा डोळा लागला.
"अहो, अहो... जरा ऐकता का?" सुप्रियाला पहाटे-पहाटे ६ वाजता जाग आली. तिने विजयला हाक मारायला सुरवात केली. विजयलासुद्धा तिच्या आवाजाने जाग आली. लगेच तो उठून तिच्याजवळ गेला.
"हा... बोल..."
"मला माझे पाय उचलता येत नाहीत."
"अवघडले असतील... जरा प्रयत्न कर." विजयने सुद्धा तिला उठवण्याचा प्रयत्न केला पण तिला तिचे पाय हलवता येत नव्हते.
"नाही... मी सकाळी उठले. तुमच्याकडे पहिले तेंव्हा तुम्ही खाली झोपला होता. तुमची झोप मोड होऊ नये म्हणून मी उठण्याचा प्रयत्न करत होते पण मला ते जमलं नाही. म्हणून मी तुम्हाला हाक मारली." सुप्रिया उठण्याचा प्रयत्न करत असतानाच म्हणाली.
"एक मिनिट थांब. मी डॉक्टरांना बोलवून येतो." म्हणत विजय डॉक्टरांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांना बोलवून आला. डॉक्टर सकाळी लवकर आले होते. त्यांना दुस-या रुग्णाचे ऑपरेशन करायचे होते. ऑपरेशनला १ तास वेळ होता. तत्पूर्वी  त्यांनी सुप्रियाची तपासणी केली. सुप्रियाला पाय उचलण्याचा प्रयत्न करायला सांगितला पण तिला ते शक्य झालं नाही. आणखी थोडे चेकअप करून विजयला डॉक्टरांनी आपल्या केबिनमध्ये बोलावले व ते तिथून निघून गेले. त्यावर सुप्रिया विजयला म्हणाली,
"अहो, काय झालंय  मला?"
"काही नाही. तू जास्त वेळ झोपली होतीस ना, म्हणून पाय अवघडले असतील. तू लवकर ठीक होशील. मी डॉक्टर काय म्हणतात ते पाहून येतो. तोपर्यंत तो आराम कर." असे सांगून विजय डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेला.
" सर,आत येऊ का?"
"हो... हो... या विजय, बसा." तसा विजयने समोरच्या खुर्चीवर बसताक्षणी प्रश्न केला,
"डॉक्टर, सुप्रियाला काय झाले आहे?"
"हे पहा विजय, सुप्रियाला अर्धांगवायूचा झटका बसलेला आहे. त्यामुळे त्यांच्या कमरेपासून खाली पायापर्यंतच्या भागात संवेदना नाहीत. माफ करा विजय. त्यांची काळजी घेत रहा."
डॉक्टरांचे बोलणे ऐकल्यानंतर विजयला तर वेडच लागायचे राहिले होते. तो त्यांना म्हणाला,
"सुप्रिया ठीक कधी होईल?"
"अशा केसेसमध्ये मी काही निश्चित सांगू शकत नाही. कदाचित त्यांना ठीक व्हायला एक महिना किंवा एक वर्ष किंवा बराच कालावधी लागेल. तोपर्यंत तुम्हाला तिला व्हीलचेअरवर  ठेवावे लागेल. दोन आठ्वड्यानी  तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकता." यावर विजय काही बोलला नाही. फक्त 'ठीक आहे' म्हणून तेथून बाहेर पडला. सुप्रियाच्या खोलीमध्ये लगेच गेला नाही. थोडा वेळा बाहेर सुप्रियाला आता काय सांगायचे? याचा विचार करत होता. अर्ध्या तासाने तो सुप्रियाचया खोलीत गेला. विजयला पाहताच तिने बोलायला सुरवात केली.
"काय झालं?... डॉक्टर काय म्हणाले?"
"दोन आठवड्यात  तुला डिसचार्ज मिळणार आहे."
"ते ठीक आहे. पण मला काय झालंय? डॉक्टरांनी  सांगितले नाही का तुम्हाला?" सुप्रियाने असे विचारल्यावर ह्या प्रसंगी विजयला काय बोलावे? काय सांगावे हेच समजत नव्हते. विजयने दुस-या बाजूला चेहरा केला व म्हणाला,
"काही नाही... तुला थोडेदिवस व्हाईलचेअरवर बसावे लागेल. नंतर सर्वकाही ठीक होईल."
"मग तुम्ही दुसरीकडे तोंड करून का बोलत आहात. इकडे माझ्याकडे पहा. मला काय झालय  ते खरं-खरं  सांगा. तुम्हाला तुमच्या मुलांची शपथ..."
           विजयसमोर आता काही पर्याय उरला नव्हता. त्याने तिला डॉक्टरांनी सांगितलेले सर्व काही सांगितले. दोघेही थोडावेळ शांत राहिले. मग विजय म्हणाला,
"तू आराम कर. नितीनला अर्ध्या तासापूर्वी फोन करून मी बोलावून घेतले आहे. तो आल्यावर स्वप्नीलचा रक्षाविसर्जनाचा  कार्यक्रम आटोपून मी लगेच परत येतो." सुप्रिया मानेनेच 'हो' म्हणाली पण डोळ्यांत अजूनही अश्रू वाहत होते. विजयने तिला समजवण्याचा प्रयत्न केला.
"हे बघ... रडू नकोस. तू जर असे करायला लागलीस तर मला कसे वाटेल? मी लवकरात लवकर तुझ्याकडे येण्याचा प्रयत्न करीन. काळजी घे." इतक्यात नितीन तेथे हजर झाला.  तो आल्या आल्या विजय घरी आला.
नितीनने दोन दिवसांसाठी  किरकोळ रजा दिली होती. विजयला भरपूर मदत केली त्याने. स्वप्नीलचा १२ दिवसांचा कार्यक्रम आटोपल्यानंतर सुप्रियाला व्हाईलचेअरवर बसवून घरी आणण्यात आले. आता त्या घरात फक्त दोघेच... विजय आणि सुप्रिया. विजय सुप्रियाची पुरेपूर काळजी घेत होता. सर्वकाही व्यवस्थित चालू होते. यांदरम्यान  घरघुती कामासाठी एक बाई त्यांनी ठेवली होती. कल्पना नाव होते तिचे.
             आता सुप्रियाच्या या घटनेला ६ महिने होऊन गेले होते. एक दिवस सकाळी-सकाळी कल्पना धावत विजयच्या खोलीजवळ आली दरवाज्या ठोठावला व विजयला हाक मारू लागली.
"साहेब.. साहेब... उठा लवकर."
विजय आदल्या रात्री उशिरा घरी आला होता. त्यामुळे तो अजून झोपेतच होता. दोन मिनिटांनी कल्पनाच्या व दरवाज्याच्या आवाजामुळे त्याला जाग आली. जांभई देत त्याने दरवाजा उघडला व कल्पनाला म्हणाला,
"काय झालं?"
"साहेब... वाहिनीसाहेब काही बोलत नाहीत."
"म्हणजे?"
"मी सकाळी ७ वाजता त्यांना हाक मारली परंतु त्या काही बोलल्या नाहीत. तुम्ही जरा खाली येऊन पाहता का?" विजय तातडीने जिन्यावरून खाली आला. सुप्रियाला उठविण्याचा प्रयत्न केला परंतु काही उपयोग झाला नाही. त्याने लगेच डॉक्टर साबळेंना फोन केला व म्हणाला,
"डॉक्टर, सकाळी एवढ्या लवकर  तुम्हाला त्रास दिल्याबद्दल माफी मागतो. तुम्ही आता लगेच माझ्या घरी येऊ शकता का?"
"काय झालं?"  डॉक्टर म्हणाले.
"सुप्रिया काही बोलत नाही. तिचे शरीर थंड पडले आहे. कृपया लवकर या."
"बरं..." म्हणत डॉक्टर साबळे १ तासांत त्याच्या घरी पोहचले. त्यांनी सुप्रियाचा चेकअप केला व म्हणाले,
"माफ करा विजय. सुप्रिया आता ह्या जगात राहिली नाही."
"काय? पण कसे? कालपर्यंत तर ती ठीक होती आणि अचानक असे कसे झाले?"
"त्यांना रात्री ३ च्या दरम्यान हार्ट अटॅक आला. काळजी घ्या." असे सांगून डॉक्टर निघून गेले.
                विजयला खूप वाईट वाटले. त्याचा एकमेव शेवटचा आधारसुद्धा आता त्याला सोडून कायमचा दूर गेला होता. खूप रडला तो. त्याने नितीनला फोन लावला. घडलेली सर्व हकीकत सांगितली. नितीन लगेच विजयच्या घरी आला. त्याने त्याला आधार दिला. बघता-बघता सुप्रियाचासुद्धा कार्यक्रम आटोपून १२ दिवस होऊन गेले. असाच एक महिना गेला.
                    कल्पनाला पगार देऊन 'मी काही कामानिमित्त शहरात जात आहे. मला परत यायला वेळ होईल. ज्यावेळी मी येईन त्यावेळी तुला सांगेन' असे म्हणत विजयने घराला कुलूप लावले व तो घरातून गावाच्या बाहेर पडला. काहीतरी करण्यासाठी... काहीतरी शोधण्यासाठी... डोक्यात वेगळेच विचार चालू होते.
                                                                                                                                      क्रमशः ...
-----------------------------------------------------------------------------------------------


               
           






































2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...