गुरुवार, २९ फेब्रुवारी, २०२४

930. आकाश झाकोळतच जाणार आहे, तुम्ही तयार असायलाच हवं !

 आकाश झाकोळतच जाणार आहे, तुम्ही तयार असायलाच हवं ! चिनी लेखक झोऊ डॅकसीन च्या कादंबरीचा सारांश अतिशय सुंदर वाटला. म्हणून पाठवित आहे. विचार करायला लावणारं हे लिखाण पटलं तर स्वीकारा नाहीतर डिलीट हा पर्याय आहेच.
    प्रौढत्व आणि वृद्धत्व या आयुष्यातील वळणावर जे भावनिक जग अनुभवायला मिळते, जी उपेक्षा पदरी येते आणि त्यावर मात कशी करायची त्याची संवेदनशील आणि अचूक मीमांसा लेखकाने केली आहे. माणसाची प्रवृत्ती अशी असते की, प्रौढत्वाकडे झुकल्यानंतर स्वतः बद्दल वाजवीपेक्षा जास्तच आत्मविश्वास त्याच्या ठायी निर्माण होतो. आपल्याला आता सर्वच जगाचे ज्ञान आहे अशी त्याची धारणा असते. वास्तविक असे काहीच नसते आणि अनेक बाबतीत तो अज्ञानीच असतो. प्रौढत्वाकडे झुकणारा फार मोठा वर्ग आपल्या समोर उभ्या ठाकलेल्या भविष्याविषयी नुसताच अनभिज्ञ नसतो तर कमालीचा गोंधळलेला  असतो. त्यासाठी त्यांच्या मनाची तयारी झालेली नसते. आपण प्रौढ किंवा वृद्ध झाल्यावर आपल्यासमोर काय वाढून ठेवले असेल असा विचार त्यांनी केलेलाच नसतो. समाजात आपल्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या  अशा वर्गाला काय भोगावे लागत आहे हे पाहण्यासाठी त्यांना एक तर वेळ मिळालेला नसतो, किंवा सोयीस्कर दुर्लक्ष तरी केलेले असते किंवा आपली गोष्ट वेगळी आहे अशा भ्रमात ते असतात. वयाची साठी गाठल्यावर आयुष्याच्या वाटेवरील दिवे मंद होऊ लागतात. त्या वाटेवर संपूर्ण अंधार होण्यापूर्वी आपल्याला त्या मार्गावरून चालणे टाळता तर येत नाही. त्यामुळे या अंधाऱ्या वाटेवरून न गोंधळता, मनाचा तोल न ढळू देता मार्गक्रमण करायचे असते त्यासाठी मानसिक तयारी करावी लागते. तुमच्या आजूबाजूच्या मंडळींची संख्या कमी होत जाणार असते. ती तुम्ही रोखू शकत नाही. तुमच्या आधीच्या पिढीतील मंडळी आयुष्याच्या वाटेवर कितीतरी आधीच हरवलेली असतात. तुमचे समकालीन जे सहकारी असतात त्यांना आता स्वतःची काळजी घेणे ही अवघड झालेले असते त्यामुळे त्यांच्याकडून काही अपेक्षा ठेवू नका.
     तुमच्या पेक्षा लहान मंडळी ही त्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या टप्प्यावर स्वतःचे भविष्य घडविण्यात दंग असतात. तुमच्या आयुष्यात कमी अधिक स्वरूपात तुम्ही पण हेच केलेले असते! त्यामुळे त्यांना तुमच्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळणार नाही हे तुम्ही गृहीत धरायला हवे असते. मुलं आपल्याला विचारणार नाहीत हे गृहीत मनाशी पक्के बांधून ठेवा म्हणजे मुलं आपल्याला विचारीत नाहीत ही खंत मनाला कधीच वाटणार नाही. आयुष्याच्या या अवघड वळणावर तुमच्या आयुष्यातील सहचर तुमच्या आधी तुमची साथ सोडून जाण्याची शक्यता असते. त्यांनतर जीवनात जी पोकळी निर्माण होते तिला सामोरे जाणे तसे सोपे नसते! त्यामुळे एकाकी जीवन जगण्याची मानसिक तयारी असावी लागते. आपल्यासाठी आता कुणाकडे वेळ नाही हे सत्य वेळेवर स्वीकारले तर जीवन जगणे असह्य होणार नाही हे नक्की ! समाज आता तुम्हाला विसरत जाणार आहे आणि त्याच्या विसरण्याचा वेग हा तुमच्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त असतो. तुमचा इतिहास कितीही उज्ज्वल आणि दैदिप्यमान असला, तुम्ही कितीही प्रसिद्धी च्या झोतात वावरले असलात, तरी आता ते दिवस राहिलेले नाहीत हे सत्य तुम्हाला स्वीकारावेच लागेल. प्रौढत्वा कडे आणि वृद्धत्वा कडे जातांना तुम्ही सर्वसामान्य जनतेपैकी एक बनता हे ही सत्य स्वीकारता आले पाहिजे. आयुष्यात स्वतःवरच समाजाचे लक्ष केंद्रित राहील अशी चुकून सुद्धा अपेक्षा करू नका. एका कडेला उभे राहून जगाची प्रगती बघत असताना तिला दाद द्या, निसर्गाच्या सौन्दर्याचा आस्वाद जितका घेता येईल तितका घ्यायला शिका. स्वार्थ आणि मत्सर या दोन गोष्टी पूर्ण विसरून जा. तक्रार न करता आयुष्य जगायला शिका म्हणजे आयुष्य जगणे अवघड वाटणार नाही.
     तुमची पुढची वाट खाचखळग्यांची आणि अडथळ्यांची असणार आहे. या वाटेवर हाडे मोडणे, हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब, कर्करोग, विस्मरण यासारखे मित्र भेटण्याची शक्यता आहेच. त्यांना नाही म्हणणे तुमच्या आवाक्याबाहेर असणार आहे. त्यामुळे त्यांना मित्र मानणे हाच एक पर्याय तुमच्यासमोर राहणार आहे याची जाणीव सातत्याने ठेवा. शरीर जितके चांगले राखता येईल तेव्हढे राखण्यात कसलीही कसर पडू देऊ नका. सकारात्मक प्रवृत्ती हरवू देऊ नका. आयुष्याच्या या अवघड वळणावर तिची आज सर्वात अधिक गरज आहे हे ध्यानी असू द्या. स्वतः ला प्रोत्साहन देत राहा. पलंगावर लोळण्याचे नव्हे तर पलंगाला बांधले जाण्याचे दिवस येतील, त्यांचा स्वीकार करण्याची मानसिक तयारी करा. आपल्या आईने एका पलंगावर आपल्याला जीवनाची सुरुवात करून दिली होती. आयुष्यातील अनेक वळणांचा प्रवास पूर्ण करून आपण पुन्हा एकदा या पलंगावर पोहोचत आहोत, पण यावेळेला आईचा मायेचा हात मात्र पाठीवर नसेल हे ध्यानी घ्या. तिच्या मायेच्या हजारांश हिस्सा देखील आपल्याला आता मिळणार नाही ही खात्री ठेवा. जर तशी ती मिळाली तर आयुष्यातील ते सर्वात मोठे बक्षीस असेल आणि त्याची किंमत जरूर ठेवा. आजूबाजूचे लोक पैशासाठी तुमची सेवा करीत असतील तर त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवा आणि शक्य ती परतफेड उद्याची वाट न पाहता करीत राहा. कदाचित तुम्हाला अपेक्षित असणारा उद्या उजाडणार ही नाही ही शक्यता नेहेमीसाठीच गृहीत धरा. तुमच्या आयुष्यातील या अवघड वळणावरील वाटचालीत आर्थिक स्वातंत्र्य असले तर जीवन खूप सुसह्य होईल. समोरचे भरलेले ताट तुम्ही देऊ शकता पण बसायचा पाट मात्र कुणालाही देऊ नका. आपल्या या पुंजीचे आपल्यानंतर काय करायचे याच्या संबंधी कायदेशीर मृत्युपत्र नक्कीच तयार करून ठेवा म्हणजे समाजविघातक प्रवृत्ती त्यापासून दूर ठेवता येतील.
     जितके दिवस शक्य असतील तेव्हढे दिवस समाजाची जमेल तशी सेवा करा, सुहृदांनी मागितली तर जरूर त्यांच्या पाठीशी उभे राहून मदत करा, पण त्यात गुंतून पडू नका, पर्यटनातून आयुष्यातील आनंद उपभोगा आणि मृत्यूची भीती वाटू देऊ नका. आज जरी मृत्यू आला तरी मी त्याला सामोरा जाण्यासाठी ज्याची मनाची तयारी असते त्याने खऱ्या अर्थाने यशस्वी व सुखी जीवन जगलेले असते हे निश्चित ! 

शरद काळे.

929. स्पर्श

     लेकीची पाठवणी करुन घरी आली ती दोघं. कपिल आणि कावेरी. दोघंही एकटी पडली होती आता. आजच लग्न लागून सासरी गेली होती, त्यांची एकुलती एक मुलगी परी. परीच्या घरात पडलेल्या पहिल्या पावलापासुनचा. तिच्या आज घराबाहेर कायमच्या पडलेल्या पावलाचा प्रवास बघितला होता, त्या आता प्रचंड रिकाम्या वाटणार्‍या घराने. कावेरी हाॅलमध्येच सोफ्यावर बसली. मान मागे करुन, डोळे मिटून आणि तिला आवाज आला हुंदक्यांपासून तत्परतेने हमसून रडण्यापर्यंत पोहोचलेल्या, कपिलच्या आवाजाचा. कावेरी पळतच परीच्या बेडरुममध्ये गेली, आवाजाचा मागोवा घेत. कपिल परीच्या बेडवर बसून, घडी घातलेला एक हात डोळ्यांवर ठेऊन ओक्साबोक्शी रडत होता. कावेरी भरल्या डोळ्यांनी कपिलच्या बाजूला जाऊन बसली. त्याच्या पाठीवरुन हात फिरवू लागली.
"तरी मी तुला सांगत होते की काही अडलं नाहिये सांगायचं" कावेरी बोलली. 
      क्षणार्धात भुतकाळात. जवळजवळ पंचवीस वर्ष मागे गेली ती, एक वियोगात बुडलेली, हळव्या मनांची जोडी. दहा - पंधरा दिवसांच्या परिला कपिल हातात धरुन, छातीशी अलगद कवटाळून रात्र रात्र फेर्‍या मारत असे. सिझेरीयनमुळे प्रचंड थकलेल्या कावेरीला आराम मिळावा म्हणून. रडणारी परी क्षणार्धातच थांबत असे, जेव्हा कपिल गाणं सुरु करे "मेरे घर आई एक नन्ही परी". बेदम आवडतं गाणं होतं हे त्या पंधरा दिवसांच्या लुसलूशीत लाल भेंडोळ्याचं आणि त्यामुळेच परी हेच नाव ठेवावं असं वाटलं होतं कपिल - कावेरी दोघांनाही ते कपिल मधला 'प' नी कावेरी मधला 'री' हे ऊगिचच आपलं कोणी विचारलंच तर सांगायला. तर अशी ही परी खरंच शब्दशः परी होती तिच्या बाबाची. टोकाचे लाड करायचा तिचे कपिल, टोकाचे हट्ट पुरवायचा. परी नी कपिल ह्या दोघांनी मिळून घातलेल्या धुडगूसाला, कावेरी 'परीकथा' म्हणायची. अन् अधुनमधून बाप - लेकीला जमिनीवरही आणायची. पंधरा दिवसांची बाबाच्या छातीला चिकटलेली परी, पंधरा वर्षांची होईपर्यंतच बाबाला बुलेटवर मागे बसवून. गाव फिरु लागली होती. कावेरी नको - नको म्हणत असतांनाही लेह - लड्डाख करुन आली होती बाप - लेक बुलेटवरुन. हाईट करुन आईची हवा टाईट करण्यात. पटाईत झाली होती परी, तिच्या बाबाच्या कंपनीत. ते एकाच दिवशी आवडलेल्या पिक्चरचे लागोपाठ तीन शोज बघणं असो, बेट लाऊन गिरगाव चौपाटीवरची आठ - दहा प्लेट पाणिपुरी ऊडवणं असो, पायी चालत शिर्डीला जाणं असो, भर पावसात कुठल्या कुठल्या कडांवर नी गडांवर ट्रेकला जाणं असो. असे एक ना अनेक आईची छाती दडपून टाकणारे ऊद्योग करण्यात, आघाडीवर असे परी तिच्या बाबाच्या जोडीने. "मोठी झालियेस घोडे आता. निदान चार जणांत तरी ऊठसूठ चिकटू नकोस बाबाच्या अंगाला. काय म्हणतील लोकं?" कावेरी आपल्यापरीने परीला सांगायचा प्रयत्न करी. पण ऐकतीये ती परी कसली. "बुलशीट. वुई आर फ्रेन्ड्स. हू केअर्स अबाऊट अदर्स" असं म्हणत गप्प करत असे ती तिच्या आईला. "कपिल अरे तू तरी समजाव तिला. ईतका बिंधास्तपणा शोभत नाही मुलीच्या जातीला" हताश कावेरी कपिलकडे मोर्चा वळवत म्हणे. "कोण मुलगी ? कुठेय मुलगी?   मला तर बुवा मुलगा आहे. हो की नाही पठ्ठे बापुराव??" कपिल परीकडे बघत हे बोले. नी दोघांनी हसत एकमेकांना दिलेल्या टाळ्यांचा आणि कावेरीने जोरात कपाळावर मारलेल्या हाताचा, एकत्रच आवाज घूमे मग खोल्यांतून. 
      असे हे सगळे अतरंगी ऊद्योग करत, परी चांगली शिकली. सी.एस. झाली. एका मल्टिनॅशनल बॅन्केत कामाला लागली आणि एके दिवशी आली घरी सांगत, की तिने लग्न ठरवलंय. कावेरीच्या पायाखालची जमिन सरकली. कपिललाही आयुष्यात पहिल्यांदा परीची मुलगी म्हणून चिंता वाटली पण त्याचा त्याच्या लेकीच्या चाॅईसवर विश्वासही होता नक्कीच. आॅफिशीअली एकमेकांच्या घरच्यांना भेटण्याचा दिवस ठरला, आणि कपिलने कावेरीला सांगितलं की "नाऊ ईट्स टाईम टू से ट्रूथ टू आवर डाॅटर. तिला नी तिच्या होणार्‍या नवर्‍यालातरी निदान, वस्तुस्थीती माहिती असायलाच हवी". कावेरीची विशेष सहमती नसतांनाही, कपिलने परीला बोलावलं. परी आली ती नेहमीप्रमाणेच सरळ जाऊन कपिलच्या खांद्यावर हात ठेऊन, त्याला रेलुनच बसली. कपिल घसा खाकरुन बोलू लागला... 
"परी बेटा तू आता पंचवीस वर्षांची होशील. लग्न करुन लवकरच सासरी जाशील. पण त्याआधी एक गोष्ट तुला कळणं. रादर ती तुला आपणहून सांगणं मी माझं कर्तव्य समजतो. तुझी आई सात महिन्यांची प्रेग्नंट होती, जेव्हा मी तिच्याशी लग्न केलं. कावेरी माझ्या मावसभावाची बायको. दोघांचा छान संसार चालू होता. कावेरीला दिवस गेले होते आणि तशातच तिच्या नवर्‍याचा म्हणजेच तुझ्या बाबाचा रोड अॅक्सिडेंट झाला. आॅन दी स्पाॅट गेल्या होत्या दोन गोष्टी दोन शरिरांतून. तुझ्या बाबाचा जीव अन् तुझ्या आईचा आत्मा. अचेतन झाली होती कावेरी, जणू काही एखादा पुतळाच. डाॅक्टरांनी सांगितलं की ह्या वेळीच मोकळ्या झाल्या नाहित तर त्यांच्यावर नी पर्यायाने त्यांच्या पोटात वाढणार्‍या गर्भावरही, अतिशय वाईट परिणाम होतील. मी युके हून काही दिवसांकरताच आलो होतो ईथे. पण मग परतणं झालंच नाही माझं. तुझ्या आईशी लग्न केलं मी. एकट्याने पुर्णपणे सारासार विचार करत, कोणाच्याही दबावाला बळी न पडत. आमच्या पहिल्या रात्री मग कावेरी रडली. अगदी धाय मोकलून रडली. अॅन्ड आय डिडन्ट स्टाॅप हर. नाॅर्मल केलं होतं कावेरीला त्या तिच्या रात्रभर रडण्याने. हळूहळू रुळत गेली ती तिच्या नव्या संसारात, आमच्या संसारात. कावेरी जेव्हा पुर्ण बरी झाली. म्हणजे आमच्या लग्नानंतर चारेक महिन्यांनी, तेव्हा पहिल्यांदा मिठीत घेतलं मी तुझ्या आईला. बायकोआधी मुलीला मिठीत घेणारा पहिलाच पुरुष असेन मी ह्या जगातला. पण मग नंतर आम्ही एकमेकांच्या संमतीनेच ठरवलं, की आपलं दोघांचं मुल होऊ द्यायचं नाही. आता फक्त नी फक्त प्रेम करायचं आपल्या परीवर. प्रेमात कोणीही वाटेकरी आणायचाच नाही. अॅन्ड वुई स्टूड स्ट्राॅन्ग आॅन आवर डिसिजन". 
    एवढं बोलून कपिल थांबला होता. नी अचानक त्याला जाणवलं की परी आता त्याच्यापासून बर्‍यापैकी लांब झालेली, दूर बसलेली. हमसून हमसून रडत. कपिलने तिच्या डोक्यावर हात ठेऊ पाहिलेला. पण त्याआधीच परी रडत रडतच, तिच्या खोलीत पळाली होती. त्या दिवसानंतर मात्र अमुलाग्र बदल झाला होता परीत. अचानकच प्रगल्भ जाणवू लागली होती ती.  बाबाच्या पावलांतून घुटमळणारी ती, आता आईच्या पाठी - पाठी दीसू लागली होती. कपिलच्या अंगाशी जाणं तर दुरच, त्याच्या वार्‍यालाही ऊभं रहाणं टाळू लागली ती. जणू एका क्षणात तो माणूस, नी ते त्याचं घर परकं झालं होतं तिच्यासाठी. तो माणूस ज्याने त्याचं आयुष्य वेचलं होतं तिच्यासाठी. ते घर ज्याने हरवलेलं हक्काचं छत्र दिलं होतं तिला. नंतरचे काही महिने मग 'कधी एकदा जातेय ह्या घरातून' अशा पद्धतीने तुटक तुटकच राहिली होती परी त्या छताखाली. 
     कपिल भुतकाळातून भानावर येत. रडतच कावेरीला बोलला. "आज निरोप घेतांनाही मला फक्त लांबून नमस्कार करुन पुढे सरकली ती. कारण वस्तुस्थीती कळल्यावर मी ही एक परका पुरुषच झालो होतो तिच्यासाठी. फक्त एक पुरुष. मी केलेलं सगळं कवडीमोल झालं क्षणार्धात". कावेरी रडत, कपिलला सावरत, त्याच्या पाठीवरुन हात फिरवत सगळं ऐकत होती. 'आमची नाही तर माझी मुलगी ईतकी स्वार्थी निघावी' असा विचार करत. कपिल पुढे बोलला. "आता फक्त एकच कर म्हणावं परीला. जेव्हा मी जाईन कायमचा, तेव्हातरी येऊन बिलग मला. एक बाप समजून. ते निष्प्राण शरीर कुठल्या बाहेरच्या पुरुषाचं नसून, बापाचं आहे आपल्या असं समजून. निदान एक आपुलकीचा 'स्पर्श' तरी कर म्हाणावं तुझ्या बाबाला, ज्याने त्याची स्वतःची नसलेली लेक. पंधरा दिवसांची असल्यापासून पंचवीस वर्षांची होईपर्यंत, होणार्‍या तिच्या प्रत्येक स्पर्शातून. निखळ नी निव्वळ पितृत्वच शोधलं". 
ईतकं बोलून कपिल जागेवरुन ऊठला. शेरवानीचं वरचं बटण सोडलं त्याने. खूपच ऊकडत होतं. "मी कपडे बदलून आलोच.. तू ही घे आवरुन.. दमली असशील" हे कावेरीला बोलून तो वळला अन् समोर बघतो तर दारात परी ऊभी होती, हात जोडून घळाघळा रडत. "अर्ध्या रस्त्यावरुनच गाडी वळवायला लावली हिने. मी म्हंटलं ऊद्या जाऊया. पण छे. ऐकतीये ती परी कसली. तिच्या ह्याच मॅडचॅपपणावर तर मी भाळलो होतो. मग काय म्हंटलं भोगा आता" परीचा नवरा अनिष हसत हसत बोलत होता. कपिल ने चक्राऊन कावेरीकडे पाहिलं. "मी जरा टेकलेच होते की ही दोघं आली मागोमाग. तुला बोलावणारच होते की तुझ्या रडण्याचा आवाज आला आतून परीने तोंडावर बोट ठेऊन मला, ती आल्याचं तुला कळू देऊ नको असं खुणावलं होतं" कावेरीने एकदाचं सांगून हूश्श केलं. परी धावतच गेली कपिलकडे, नी कडकडून मिठी मारली त्याला. कपिलच्या शेरवानीचा खांदा चिंब झाला. तर परीच्या केसांतून, कपिलच्या डोळ्यांतून सांडलेले मोती विखूरले. "मी तुझ्यासारखी असामान्य नाहीये रे बाबा. मी सत्य पचवून घ्यायला माझा वेळ घेतला. पण तू का नाही आलास पुढे, मला जाब विचारत? तू का नाही फोडलंस मुस्काट माझं?" परी हमसून हमसून बोलत होती. कपिल काहीच बोलला नाही. फक्त हसला.  बर्‍याच दिवसांनी, अगदी मोकळेपणाने. परी पुरतीच सिमित असलेली मिठी सैल करत, त्याने त्याचे दोन्ही हात ऊघडले. अनिषकडे बघत.धावतच आला मग अनिषही, परीच्या बाबाच्या.अन् त्याच्या बाबांच्या मिठीत.एका अस्सल पित्याचा 'स्पर्श' अनुभवण्यासाठी !

928. तृप्तता

     ते दोघे मूळचे नागपूरचे, सध्या पुण्यात कॉट बेसिसवर राहायला. सगळं रुटीन ठरलेलं. सकाळी लवकर उठून आवरायचं. नायतर टॉयलेटला गर्दी होते. मग कोपऱ्यावर जाऊन नाश्ता करायचा. कधी पोहे, कधी उपमा, साबुदाणा खिचडी, ब्रेड पॅटिस, अगदीच कंटाळा आला की इडली, वडा सांबार. एक कडक चहा. तिथून सरळ ऑफिसमध्ये. १ ला डबेवाला येणार. मग लंच, ४ ला चौकात जाऊन चहा. ६ ला हॉस्टेल. मोबाईल कुटणे, घरी फोन करणे, इस्त्रीचे कपडे आणणे, येताना एखादा कटिंग, क्रीमरोल नाहीतर वाटी केक. ९ ला डबा येईल की डिनर. रात्री बेडवर आडवं पडून एखादा सिनेमा, तोही अर्धवट. ११ नंतर कधीही झोप. सगळं अगदी ठरलेल्या प्रमाणे. खरं तर तेच तेच खाऊन, धोपट मार्गाने जाऊन दोघांना प्रचंड कंटाळा आला होता. गोडधोड खावं, माणसांत मिसळून जावं, मनाला शांतता मिळावी असं आतून वाटत होतं. जसं कॉलेजमध्ये असताना अनोळखी लग्नात किंवा कार्यात जाऊन मस्त पोटभर जेऊन यायचं, असलं काहीतरी शिजत होतं.
       रविवार होता. सकाळी निवांतपणे आवरून चक्कर मारायला बाहेर पडले. जवळच एक छोटा कार्याचा हॉल होता. लगबग दिसली, गजरे, लफ्फे नेसलेल्या बायका, झब्बे सुरवर, जॅकेट, पायात करकर वाजणाऱ्या कोल्हापुरी घातलेले बापे. परकर पोलक्यात आणि शिवलेल्या धोतरात बारकी पोरी पोरं. च्या डोक्यात सोडियम व्हेपर लागला. गडी खुश. रूममध्ये येऊन कुर्ता, सुरवर घातला, डिओ ने अंघोळ केली. अहहह, वऱ्हाडी जणू. शून्य मिनिटात हॉल गाठला, सहजपणे दरवाजातून आत गेले. दारात एक तरुण उभा होता, अर्थातच यजमान घरातला. यांनी नमस्कार केला. त्यानेही नमस्कार केला. आत गेले.
हा तरुण त्यांच्या मागे गेला, म्हणाला "तुम्हाला कुठेतरी बघितलं आहे, तुम्ही कोणाकडून आहात?....."
यांची किंचित टरकली. तरी ध्येयवादी होते त्यामुळे बिनधास्त सांगितलं, " मुलाचे मित्र आहोत."
"ओहहहह या या" म्हणत त्या तरुण मुलाने त्यांना बसायला सांगितलं.
हे बोलणं संपलं.गुरुजींची आरोळी झाली, "ज्यांना पथ्यपाणी असेल त्यांनी जेऊन घ्यावं, मुहूर्ताला वेळ आहे." एक हशा पिकला, सत्तरीच्या पुढची बरीच यंग इंडिया तिथे होती. तशी मोजकीच माणसं उपस्थित होती, तीन पिढ्या एकत्र दिसत होत्या. हे दोघे मागे थांबले होते. अगदीच दगा फटका झाला तर कन्नी कापायची.
       तो तरुण त्या दोघांच्या जवळ गेला, म्हणाला, "तुम्हाला घाई असेल तर वरच्या हॉलमध्ये जेवायची सोय केली आहे, मुहूर्ताला वेळ आहे, तुम्ही जेऊन घ्या."
 "नको नको, आहे वेळ अजून. लग्न लागलं की जेवू...."
 "अहो ऐका माझं, जेऊन घ्या...."
     हो, नाही करत हे दोघे जेवायला गेले. मोजक्या पदार्थांचा बुफे मांडला होता. सनईचे सूर, उदबत्तीचा घमघमाट होता. वरण, भात छोटा बटाटावडा आणि हिरवी चटणी, सफरचंदाची कोशिंबीर, मटार उसळ अळणी आणि तर्री वाली, पोळी, दही बुत्ती, सीताफळ रबडी. अहहहहह कसला साधा पण रुचकर मेन्यू आहे असं म्हणत, पान वाढून घेऊन, टेबल खुर्चीवर आसनस्थ झाले.
"ए पाणी पिऊन घे रे, म्हणजे रबडी ओरपता येईल..."
"एक, दोन, तीन, चार....."
"ए अस मोजू नये रे," असले डायलॉग मारून, तड येइपर्यंत यथेच्छ जेवले, हात धुवून बनारस पान तोंडात.
तो तरुण इतर पाहुण्यांशी बोलत पुन्हा त्यांच्यापाशी आला. "काय पोटभर झालं ना जेवण?? सगळं ठीक आहे ना?" 
     इतकं आदरातिथ्य बघून या दोघांना गलबलून आलं, तोंडातले पान एका गालात सरकवून. "वाह अगदी मोजके पदार्थ पण अप्रतिम चव आहे, तृप्त झालो" अशी पावती दिली.
 तो तरुण म्हणाला, "चला आता मुहूर्त आला...."
 जवळपास वरचा हॉल खाली आला. गुरुजींनी आरोळी दिली, "नवरा मुलगा आणि नवरीला आणा."
      सर्वत्र हशा पिकला. या दोघांनी एकमेकांकडे बघितलं. काही कळायला मार्ग नाही. तो तरुण या दोघांच्या मागे उभा राहिला. स्टेजवर नवरा मुलगा, मुलगी आले. लग्नी कपडे, मुंडावळ्या, हातात हार. मंगलाष्टके झाली, सगळ्या मंडळींना कौतुक होतं या सोहळ्याचं. मुहूर्तावर लग्न लागलं. हार घातले गेले. सर्वांच्या कडे तोंड करून दाम्पत्य उभं राहिलं. ७५ गाठलेला वर. सत्तरीची वधू. गोड दिसत होते दोघे.
         त्यांना बघून हे दोघे अवाक झाले होते. हे काय भलतंच सुरू आहे, पोबारा करायची वेळ आली आहे, असं मनात आणत होते. इतक्यात तो तरुण, या दोघांना मागून म्हणाला, "नवरदेव तुमचा मित्र आहे ना. मी त्यांचा मुलगा आहे, माझ्या आई वडिलांच्या लग्नाला ५० वर्ष पूर्ण झाली म्हणून आज पुन्हा तसाच सोहळा केला. तुम्ही आत आलात आणि म्हणालात की नवरदेवाचे मित्र आहोत. तेव्हाच मला समजलं की तुम्ही आमच्या कोणाचेच कोणी नाहीत. पण काळजी करू नका, तुमचा हेतू मला कळला. मी पण याच वयात आहे."
       आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, देव कोणत्या रुपात येईल सांगता येत नाही आणि भोजनाने तृप्त झालेल्या माणसांचे आशीर्वाद, माझ्या आई वडिलांना मिळाले आहेत, यात मला समाधान आहे."
      काय बोलावं हे न समजता, त्या दोघांनी त्या तरुणाचे आभार मानले आणि नमस्कार करून बाहेर पडले, तृप्त होऊन आणि एक प्रकारची मानसिक शांतता त्या तरुणाच्या चेहेऱ्यावर होती.

©️ पराग दामले

बुधवार, २८ फेब्रुवारी, २०२४

927. शारीरिक सुख

       एकदा एका नदीत हत्तीचे प्रेत तरंगत होते. एका कावळ्याने मृतदेह पाहिल्यावर तो आनंदी झाला आणि लगेच त्यावर जाऊन बसला. पुरेसे मांस खाल्ले. नदीचे पाणी प्यायले. त्या मृतदेहावर इकडे तिकडे उडी मारणारा कावळा, परम समाधानाने ढेकर देत होता. तो विचार करू लागला, अहाहा ! हे एक अतिशय सुंदर वाहन आहे, येथे अन्न आणि पाण्याची कमतरता नाही. मग हे सोडून मी दुसरीकडे का भटकू? नदीकाठी वाहणाऱ्या मृतदेहावर अनेक दिवस कावळा करमवत राहिला. भूक लागली की तो मृतदेह टोचून टोचून खात असे; त्याला तहान लागली की तो नदीचे पाणी प्यायचा. अथांग जलसाठा, त्याचा वेगवान प्रवाह, किनाऱ्यावर दूरवर पसरलेली निसर्गाची सुंदर नजारे, हे पाहून तो मंत्रमुग्ध झाला. 
       एके दिवशी नदी शेवटी समुद्राला भेटली. ती तिच्या मुक्कामाला पोचली याचा तिला आनंद झाला. त्याचे अंतिम ध्येय महासागराला भेटणे हे होते, परंतु त्यादिवशी ध्येयहीन कावळ्याचे मोठे दुर्दैव घडले. चार दिवसांच्या मौजमजेने त्याला अशा ठिकाणी आणले होते जिथे त्याच्यासाठी अन्न, पिण्याचे पाणी किंवा निवारा नव्हता. सर्वत्र अमर्याद खारे पाणी उसळत होते. थकलेला, भुकेलेला आणि तहानलेला, कावळा काही दिवस आपले पंख चारही दिशांना फडफडवत राहिला, आपल्या उथळ आणि वाकड्या तिकड्या उड्डाणांनी खोटी प्रतिष्ठा पसरवत राहिला, परंतु त्याला समुद्राचा शेवट कुठेही दिसत नव्हता. शेवटी,थकून आणि दु:खाने भारावून गेलेला, तो समुद्राच्या त्याच आकाश - उंच लाटांमध्ये पडला. एका मोठ्या मगरीने त्याला गिळले. 
भौतिक सुखांमध्ये रमलेल्या लोकांची हालचालही कावळ्या  सारखीच असते, जे अन्न आणि निवारा हेच अंतिम ध्येय मानतात आणि शेवटी अनंत जगाच्या महासागरात लीन होतात.
  बोध
कोण जिंकतो, कोण हरतो? हा जन्मभराचा वाद कशासाठी? जो आला तो एक ना एक दिवस जाईल, मग एवढा घमेंड(अहंकार)कशाला?

926. मदत.......ईश्वर देतो !

     खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.  आंध्र प्रदेशाच्या भूमीवर एक उदार राजा राज्य करत होता. रोज दोन भिकारी त्याच्या दरबारात भिक्षेसाठी येत असत, आणि राजा नेहमीच त्यांना भिक्षा म्हणून जेवण आणि धन देत असे.
भिक्षा घेतल्यानंतर त्या दोघा भिकाऱ्यातील एक वृद्ध भिकारी कायम ईश्वराला धन्यवाद देत असे आणि म्हणत असे, "भिक्षेत जे काही मिळते, ते ईश्वर देतो."
दुसरा भिकारी जो त्या वृद्धांपेक्षा कमी वयाचा होता, भिक्षा मिळाल्यावर कायम राजाला धन्यवाद देत असे आणि म्हणत असे, "भिक्षेत जे काही मिळते, ते सर्व राजा देतो."
राजाला त्या वृद्ध भिकाऱ्याचे बोलणे अजिबात आवडत नसे. परंतु तो त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत असे.
एके दिवशी राजाने त्या भिकाऱ्यांना नेहमीपेक्षा अधिक धन दिले. हे बघून तो वृद्ध भिकारी आनंदाने आणि उत्साहाने ईश्वराला धन्यवाद देऊ लागला. आणि म्हणाला, "आम्हाला जे काही मिळते, ते ईश्वर देतो."
यावेळी राजा त्या भिकाऱ्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू शकला नाही, आणि मनातल्या मनात विचार करू लागला, "मी या भिकाऱ्याला कितीही धन दिले, तरीसुद्धा हा फक्त ईश्वरालाच धन्यवाद देतो आणि सांगत असतो की ईश्वर देतो, ईश्वर देतो." 
राजाने मनातल्या मनात निश्चय केला, की आता वेळ आली आहे त्या वृद्ध भिकाऱ्याला समजावण्याची की त्याचा खरा हितचिंतक कोण आहे ते.
दुसऱ्या दिवशी जेंव्हा ते दोन्ही भिकारी दरबारात भिक्षा घेण्यासाठी आले, तेंव्हा राजाने भिक्षा दिल्यानंतर दोन्ही भिकाऱ्यांना आदेश दिला, की ते रोज ज्या रस्त्याने जातात त्या रस्त्याने न जाता, एक छोटा रस्ता आहे, ज्याच्यावर वर्दळ कमी असते तिथून जावे.
राजाने सांगितले की, "आज दोघे बरोबर न जाता वेगवेगळ्या वेळी जा."
राजाच्या आदेशानुसार आधी तरूण भिकारी त्या रस्त्याने जाईल आणि त्यानंतर वृद्ध भिकारी जाईल.
राजाने, आधीच आपल्या गुप्तचरांना त्या रस्त्यावर एक सोन्याने भरलेली पिशवी ठेवण्याचे आदेश दिले होते, जेणेकरून जेंव्हा तो तरूण भिकारी त्या रस्त्याने जाईल त्याला ती सोन्याची पिशवी मिळेल.
जेंव्हा तो तरूण भिकारी त्या रस्त्यावरून जात होता, तेंव्हा तो मनातल्या मनात विचार करू लागला, "राजाने त्याला या रस्त्यावरून का पाठवले असावे ? येथे तर किती शांतता आहे. वृक्षांनी वेढलेला हा रस्ता किती सुंदर दिसतो आहे. कदाचित राजाला वाटत असेल, की मी या सभोवतालच्या दृष्याचा आनंद घ्यावा! मी तर या रस्त्यावरून डोळे बंद करून पण चालू शकतो." असा विचार करत तो तरूण भिकारी आपले डोळे बंद करून चालू लागला. 
यामुळे तेथे सोन्याने भरलेली पिशवी न बघताच तो पुढे निघून गेला. जेंव्हा तो वृद्ध भिकारी त्या रस्त्याने जाऊ लागला, त्याने ती सोन्याने भरलेली पिशवी बघितली आणि त्याने ती उचलून घेतली.
दुसऱ्या दिवशी राजाने त्या दोघांना विचारले की, "काल त्या रस्त्यावर काही पडलेले तुम्हांला सापडले का?"
त्या तरूण भिकाऱ्याने नाही म्हणून मान हलवली आणि सांगितले, "तो रस्ता तर खूप स्वच्छ आणि शांत होता. छान थंड हवा वाहत होती. मी डोळे बंद करून त्या हवेचा आनंद घेत त्या रस्त्यावरून चालत होतो, यामुळे मी तेथे काहीही बघितले नाही."
तेंव्हा त्या वृद्ध भिकाऱ्याने सांगितले, "मला तेथे सोन्याने भरलेली पिशवी सापडली. आयुष्यात जे काही मिळते, ते  सर्व  ईश्वरच देतो."
भिकाऱ्याचे बोलणे ऐकून आता राजाने मनातल्या मनात  दृढनिश्चय केला, की जोपर्यंत त्या वृद्ध भिकाऱ्यासमोर मी हे सिद्ध करत नाही, की देणारा ईश्वर नसून, राजा आहे आणि मीच त्याचा खरा हितचिंतक आहे, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही.
म्हणून जेंव्हा ते दोन्ही भिकारी भिक्षा घेऊन परत जात होते, तेंव्हा राजाने त्या तरूण भिकाऱ्याला परत बोलवले आणि त्याला एक भोपळा दिला.
राजाच्या आदेशानुसार, तो भोपळा आधीच आतून पोखरून त्यात चांदीची नाणी भरण्यात आली होती.
परंतु त्या तरूण भिकाऱ्याला हे माहीत नव्हते आणि त्याने विचार केला की ह्या भोपळ्याचे तो काय करणार. याच्यापेक्षा चांगले की मी याला विकून टाकतो. रस्त्यातच,तो भोपळा त्याने एका व्यापाऱ्याला विकून टाकला.
दुसऱ्या दिवशी जेंव्हा दोन्ही भिकारी राज दरबारात पोहोचले, तेंव्हा राजाने भिकाऱ्यांना विचारले की, "काल तुमच्याबरोबर कुठली घटना घडली का?"
तरूण भिकाऱ्याने सांगितले, “काहीच विशेष झाले नाही, शिवाय हे, की तुम्ही मला इतक्या उदारतेने जो भोपळा दिला होतात, त्याला विकून मी रोजच्यापेक्षा काही अधिक पैसे कमावले."
हे ऐकून राजा खूपच निराश झाला आणि अगदी उदास मनाने त्याने तोच प्रश्न वृद्ध भिकाऱ्याला विचारला.
वृद्ध भिकाऱ्याने उत्तर दिले, "काल माझ्याबरोबर तर एक खूपच असामान्य घटना घडली. जेंव्हा मी भीक मागून घरी परतत होतो, तेंव्हा एका व्यापाऱ्याने मला बोलावले आणि मला एक भोपळा दिला. जेंव्हा मी घरी जाऊन त्याला कापले, तेंव्हा मला तो चांदीच्या नाण्यांनी भरलेला आढळला. जसं की मी नेहमीच सांगत असतो, की आयुष्यात आपल्याला जे काही मिळते, ते ईश्वर देतो."
हे ऐकल्यावर राजा एकदम सुन्न झाला!
  
बोध.
"आपण ईश्वराबद्दल काय सांगू शकतो? तो अनंत आहे. सीमित विषयावर आपण पोथ्या लिहू शकतो. परंतु ' अनंताच्या 'बाबतीत आपण एकही शब्द सांगू शकत नाही.”

925. दोन चोरांची गोष्ट

 चोर १ –
अमेरिकेमध्ये ‘आर्थर बेरी’ नावाचा दागिने चोरी करण्याच्या कलेत पारंगत असलेला, आणि चोरीचं असामान्य टॅंलेंट लाभलेला चोर होऊन गेला. अमेरिकेच्या गुन्हेगारी इतिहासात त्याचं नाव आजही एक नंबरला आहे, इतका तो सफाईदार चोर होता.  एकोणीसशे वीसच्या दशकात लोकांनी त्याला ‘ग्रेटेस्ट ज्वेल थीफ’ अशी उपाधी देऊन एक प्रकारे त्याचा गौरवच केला होता. तो फक्त अतिश्रीमंत लोकांनाच टारगेट करायचा, आणि त्याने चोरी करणं, हे सुद्धा एक प्रतिष्ठेचचं लक्षण होवुन बसलं . चोरी करणं वाईट असलं तरी लोकांमध्ये ह्या चोराबद्द्ल आकर्षण, कौतुक आणि सहानभुती होती. त्याच्या दुर्दैवाने एक दरोडा टाकताना, पोलीसांनी त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या, आणि त्याला पकडला. वयाची पुढची अठरा वर्षे त्याने जेलमध्ये काढली. जेलमधुन बाहेर आल्यावर त्याने गुन्हे करणं, चोर्‍या करणं सोडुन साध जीवन जगण्याचा मार्ग स्वीकारला, पण ‘द ग्रेट ज्वेल थीफ आर्थर बेरी’ बद्द्ल लोकांचं कुतुहुल अद्यापही कमी झालं नव्हतं. लोकांनी बदललेल्या आर्थर बेरीची एक सार्वजनिक मुलाखत घेतली, ती ऐकायला मोठा जमाव जमला होता, अनेक प्रश्न विचारले, आर्थरनेही दिलखुलास उत्तरे दिली. मुलाखत खुप रंगली,
मुलाखतकाराने शेवटचा प्रश्न विचारला, “तुम्ही सर्वात मोठी चोरी कोणत्या माणसाकडे केली?, खरं खरं उत्तर द्या.”
“तुम्हाला खरचं, खरं खरं उत्तर ऐकायचं आहे का?” गर्दीकडे पाहुन आर्थरने विचारले.
“हो, हो!” एकच गलका झाला.
“मी सर्वात मोठी चोरी ज्या माणसाकडे केली, त्या माणसाचे नाव आहे, ‘आर्थर बेरी’, हो! मीच माझा सर्वात मोठा गुन्हेगार आहे.” 
सगळे एकदम अवाक आणि शांत झाले.
“मी एक सफल व्यापारी होऊ शकलो असतो, मी वॉल स्ट्रीटचा अनाभिषिक्त सम्राट होवु शकलो असतो. मी समाजाची सेवा करणारा एक नशीबवान व्यक्ती बनु शकलो असतो. पण हे न करता मी चोरी करण्याचा मार्ग निवडला आणि माझं एक तृतीयांश जीवन मी जेलमध्ये वाया घालवलं.”

चोर २ –
१८८७ चा एक पावसाळा. एका किराणा दुकाना मध्ये भिजत भिजत एक ग्राहक आत शिरला. त्याने काही वस्तु खरेदी केल्या, आणि काऊंटरवर वीस डॉलर्सची नोट दिली आणि तो बाहेर पडला. 
कॅश काऊंटर वर असलेल्या स्त्रीने स्मितहास्य केले, आणि नोट गल्ल्ल्यात टाकली, तो त्यांचा नेहमीचा ग्राहक होता, दुकानाजवळच राहणारा तो एक होतकरु चित्रकार होता. एमानुअल निंगर त्याचं नाव.
नोटा ओल्या असल्याने तिच्या हाताला शाई लागली, तिने बारकाईने नोट पाहिली, ती हुबेहुब नोट होती, पण शाई सुटल्याने तिला बनावट नोट असल्याचा संशय आला, शहानिशा करण्यासाठी, तिने पोलिसांना बोलावले. ती एक बनावट नोट होती, पण इतकी हुबेहुब नक्कल पाहुन पोलिसही चक्रावले. पोलिसांनी चित्रकाराच्या घरावर छापा मारला, त्याच्या पेंटींग्ज जप्त केल्या गेल्या. चित्रकार निंगर जेलमध्ये गेला. आतापर्यंत अनेक बनावट नोटा रंगवुन बाजारात वापरल्याचे त्याने कोर्टासमोर कबुल केले.  कोर्टाने त्याच्या चित्रांचा लिलाव करुन नुकसानभरपाईचे आदेश दिले. तो जेलमध्ये असतानाच त्याच्या चित्रांचा लिलाव झाला, त्याचे प्रत्येक चित्र पाच हजार डॉलरहुन अधिक किमतीला विकले गेले. लाखो डॉलर्स जमा झाले. विडंबना ही होती की पाच हजार डॉलर्सचे चित्र बनवणार्‍या निंगरला त्यापेक्षा जास्त वेळ, वीस डॉलर्सची नोट बनवायला लागायचा. 

तात्पर्य
- आपली अंगभुत कला न ओळखणारा, प्रत्येक जण चोर आहे.
- ती प्रत्येक व्यक्ती चोर आहे, जो आपल्या पुर्णपणे क्षमतेचा वापर करत नाही.
- ती व्यक्ती चोरच आहे, ज्याला, आपल्या स्वतःवर विश्वास नाही.
- तो प्रत्येक रिकामटेकडा चोर आहे, जो समाजाला काहीही देत नाही. आणि केवळ राजकारणावर फुकट चर्चा करण्यात आपला वेळ वाया घालवतो.
- आपल्या कामावर प्रेम न करणारा, कामाला न्याय न देणारा प्रत्येक जण चोर आहे.

स्वतः मधील टॅलेंट ओळखा व ते योग्य कामात वापरा 

924. उत्तर अनलॉक करा

 "स्वतः हून अभ्यासाला बसायचं नाही. आम्ही अभ्यास कर-अभ्यास कर म्हणून मागं लागलेलं आवडत नाही. आपलं महत्त्वाचं वर्ष आहे,आपणच रोजच्या रोज लिखाण वाचन पाठांतर केलं पाहिजे,असं हिला वाटतच नाही. जिवाला शिस्त म्हणून नाही. आजतागायत चहाचा कप उचललेला नाही की, जेवणाची पानं घेतलेली नाहीत. मी आधीपासून ह्यांच्या कानीकपाळी ओरडत होते, पण माझं कोण ऐकतंय? आईला कुठं अक्कल असते का?" समोरची मायमाऊली तावातावानं अन् खरं सांगायचं तर, हतबल होऊन रडत रडत बोलत होती. मी शांतपणे ऐकत होतो आणि पुन्हा पुन्हा माझ्या दहावीच्या दिवसांच्या फायली उघडू पाहणाऱ्या माझ्या आठवणींना थांबवण्याचा प्रयत्न करत होतो.
    "त्या इंस्टाग्राम नं तर सगळं बरबाद करुन ठेवलं आहे. मुली त्या इंस्टाग्राम मध्ये नांदायला गेल्यासारख्याच असतात. एवढं काय असतं हो त्या इंस्टाग्राम मध्ये? सगळ्या जगाची माहिती असते म्हणे त्यात. पण दहावीच्या मुलांनी आता बाकी सगळे वेळ वाया घालवणारे उद्योग बाजूला ठेवून अभ्यास करावा, असं ते इंस्टाग्राम सांगत नाही का? ऑनलाईन ऑनलाईन च्या नावाखाली मोबाईल फोन मुलांच्या हातात द्यायला लावला, कोविड संपला तरी त्याचे परिणाम भोगतोय आम्ही." 
     पु लं च्या 'असा मी असामी' मधली चंद्रिका सुरु झाल्याची जाणीव मला झाली. आता टाळ्या तरी पडल्या पाहिजेत किंवा पडदा तरी पडला पाहिजे, त्याशिवाय ही चंद्रिकेची गिरणी थांबणार नाही, असं वाटायला लागलं. समोर ती दहावीतली मुलगी निमूटपणे बसली होती. आईचा आवाज तर असा काही तापला होता की, त्याला थर्मामीटर लावला असता तर पाऱ्याचा फुगा फुटून त्याच्या ठिकऱ्या उडाल्या असत्या. 
"पण आत्ता इतकं तापण्यासारखं काही घडलंय का?" मी चक्रव्यूहात शिरण्याचा प्रयत्न करत होतो. आता जे सुरु होईल, तो तोफखाना डेंजर असणार, याची जाणीव असूनसुध्दा.
     "सर, दहावी बारावीच्या मुलामुलींचा ना, अभ्यासक्रम सरकारला बदलायला सांगा. आरसा, फेसबुक, इंस्टाग्राम असे पेपर ठेवायला सांगा. रिल्स कसे करावेत आणि आई वडिलांना मूर्खात कसं काढावं, ह्याची प्रॅक्टिकल्स ठेवा. मी तुम्हाला पक्कं सांगते,आमची मुलगी राज्यात पहिली येईल." आईचा नुसता संताप संताप होत होता.
"पण आत्ता नेमकं काय झालंय?" मी विचारलं.
     "चार दिवसांपूर्वी सहामाही परीक्षेचा निकाल हातात आला. एकाही विषयात निम्म्यापेक्षा जास्त मार्क नाहीत. तीन विषयांमध्ये जेमतेम पास. शाळेतले शिक्षक म्हणतात, 'आता तिचं तिनं करायला हवं.' क्लासचे शिक्षक म्हणतात, 'पालकांनी मुलांना वेळ देणं गरजेचं आहे, आम्ही कुठं कुठं बघणार?' आता तुम्हीच काय करायचं ते सांगा सर. इथं दहावी पास होण्याची लक्षणं दिसत नाहीयेत अन् हिनं आम्हाला अकरावीच्या क्लासचे पैसे भरायला लावलेत पन्नास हजार रुपये.." असं म्हणून आई रडायलाच लागली.
     दरवर्षी दिवाळी झाली की, रोज असं किमान एक तरी कुटुंब माझ्यासमोर असतंच. आपलं नेमकं चुकतंय काय, हे पालकांना कळत नसतं आणि मी कसा वागल्यानं यात बदल होणार आहे, हे मुलांना समजत नसतं.समस्या तर समोर दिसत असते,पण नेमका मार्ग कसा काढायचा,हेच समजत नसतं. परिक्षेचा बाऊ करु नका असं कितीही म्हटलं तरी,द हावी बारावीच्या निकालांच्या नंतरची प्रवेश प्रक्रियेची परिस्थिती तशी नाही. "प्रवेश मिळवण्यासाठी लागणारं मेरिट" हा खरोखरच पालकांच्या मनातला फार चिंतेचा मुद्दा आहे. जून महिन्यात इतर मुलामुलींचे नव्वद टक्के, पंच्याण्णव टक्के मार्क मिळाल्याचे पेढे हातात घेताना, त्याच शाळेत त्याच वर्गात शिकणाऱ्या आपल्या मुलाला किंवा मुलीला टक्क्यांची पासष्ठी सुध्दा ओलांडता आलेली नाही, ह्याचं दुःख खोटं नसतं. आपण मुलांसाठी जे जे चांगलं करणं शक्य होतं, ते ते सगळं केलं, पण तरीही असं कसं झालं, याचंही नैराश्य येतंच.
     बरं, मुलांना काहीही बोलायला किंवा सुचवायला गेलं की, "तुम्हाला यातलं काही कळत नाही ना,मग तुम्ही यात पडू नका. तुम्हाला नव्वद टक्के मार्क मिळवून दाखवल्याशी कारण." असं ऐकून घ्यावं लागतं. उलट उत्तरं ऐकून घेताना त्यांच्या गालांवर आपली पाचही बोटं उमटवावीत असं वाटत असतं. पण रोजच्या मिडीयातल्या मुलामुलींच्या आत्महत्यांच्या बातम्या वाचून मनात त्याचीही धास्ती बसलेली असते. वेताच्या छडीनं फोडून काढणारे पालक आता जवळपास नामशेष होण्याच्या बेतात आहेत. पण मुलांच्या अभ्यासाचे आणि मेरिटचे प्रश्न खरोखरच बिकट होत चालले आहेत, हेही खरं आहे.
      "आमच्यावेळी असं होतं अन् तुमच्यावेळी असं आहे" अशी तुलना करण्यानं काय साध्य होणार, ह्याचा विचार नको का करायला? आपण आपल्या मुलांचं संपूर्ण भवितव्य पुस्तकी शिक्षण व्यवस्था आणि मार्कलिस्ट वरचे टक्के यांच्यावर विसंबून असणाऱ्या मार्गातले झालेले आहोत, हे तर सत्यच आहे ना? उद्या एखाद्या वडापाव विकणाऱ्या तरुणाला महिन्याला पाच लाख रुपये मिळत असले तरीही आपल्या मुलांनी तो मार्ग निवडावा असं मनापासून वाटणारा पालक माझ्यात आहे का? आपला मुलगा कोण व्हावा किंवा आपली मुलगी कोण व्हावी, याविषयीच्या पालकांच्या काही निश्चित आणि ठाम अपेक्षा असतात. "रोज चार तास नियमित अभ्यास करुन हा नापास झाला ना, तर तेही मान्य करीन मी. पण अभ्यासच न करता नापास व्हायचं हे मला पटणार नाही" असं म्हणणाऱ्या कित्येक पालकांना मी भेटतो. अभ्यास न करतासुध्दा आपला मुलगा पास होतोच कसा, याचं त्यांना विलक्षण आश्चर्य वाटत असतं. पण तो अभ्यास का करत नाही, याचा शोध घेतला पाहिजे,असं का कुणास ठाऊक,पण त्यांना वाटतच नाही. मुलांच्या अभ्यास न करण्याची खरी कारणं शोधली पाहिजेत. मुलं अभ्यास का करत नाहीत यावर काथ्याकूट करत बसण्यापेक्षा ती आनंदानं अभ्यास कशी करतील,यासाठी आपल्याला प्रयत्न करायला हवेत. खरं तर,मुलांची विचारपूस करावी की त्यांची उलटतपासणी करावी, या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकजण 'विचारपूस करावी' असंच देईल. पण प्रत्यक्षात होतं काय? अभ्यास न करणाऱ्या मुलांशी मोकळेपणानं चर्चा झालेलीच नसते, हे अनेक मुलांशी बोलताना समजतं.
# अभ्यासाचा एकूण आवाका किती आहे, हेच लक्षात न येणं.
# काळ काम वेग यांचं गणितच न समजणं.
# वेळापत्रकाचा पार बट्ट्याबोळ झालेला असणं.
# अभ्यासाचा प्रचंड कंटाळा असणं.
# अभ्यासाविषयी सतत चालढकल करत राहणं आणि अगदी ऐनवेळी मात्र पार भंबेरी उडणं.
# अभ्यासाला बसलं की, मनात वेगवेगळे विचार येणं. सारखं जागेवरुन उठावंसं वाटणं,फोन पहावासा वाटणं, भलत्याच गोष्टी आठवणं.
# सतत झोप येणं.
# कितीही उत्साहानं अभ्यास सुरु केला तरीही पुढच्या काही मिनिटांमध्येच अस्वस्थ वाटणं.
# लिखाणाचा भयंकर कंटाळा येणं.
     अशा काही समस्या ढोबळमानानं अनेक मुलामुलींमध्ये आढळतात. पण त्यात मुलांच्या सवयींचा दोष जास्त असतो,असं दिसतं. त्यामुळं, मुलांच्या सवयी बदलल्या की,त्यांच्या अभ्यास करण्यात लक्षणीय सुधारणा दिसून येते.पण आता तर परिक्षा अगदी समोर उभ्या ठाकल्या आहेत.अशा वेळी काय करावं?  अभ्यास आणि परिक्षा यांचा जाच वाटू न देता शेवटच्या पन्नास दिवसांमध्ये प्रभावी अभ्यास आणि उत्तम परिक्षा देण्यासाठी मुलांना सहज सोपं पण प्रत्यक्ष कृतियुक्त प्रशिक्षण हवं. त्यातूनच,अभ्यास,परिक्षा आणि परिक्षेतलं यश यांचा एकत्र सकारात्मक मेळ घालणं मुलांना शक्य होईल. अभ्यास आणि परिक्षा ही कटकट वाटण्याची मानसिकता बदलली जाईल. मार्कलिस्ट महत्त्वाची आहे की नाही? तर निश्चित महत्त्वाची आहे. पण, डोक्याला बंदूक लावल्यासारखा धमक्या देऊन, सतत तोंडाचा पट्टा चालवून, मुलांचा उठसूठ पाणउतारा करुन, मारहाण करुन, उपाशी ठेवून, भरल्या ताटावर त्यांचा अपमान करुन परिस्थिती बदलणार आहे का? याचाही विचार व्हायला हवा ना.
     आपल्या मुलांची बोर्डाच्या परीक्षांसाठीची तयारी सुरू असली तरीही ती अपेक्षेनुसार नाही आणि जितकी चांगली असायला हवी तितकी नाही. आपली मुलं प्रयत्न करत असली तरीही ते प्रयत्न परिणामकारक ठरत नाहीयत, असं पालक म्हणून आपल्या लक्षात आलंय का? हे जास्त महत्त्वाचं आहे. मुलं त्यांच्या दैनंदिन दिनक्रमात इतकी व्यस्त झाली आहेत की, त्यांना स्वतःचा विकास खरोखरच होतोय की नाही याचाही विचार करायला वेळ नाही. परिक्षा तोंडावर आली तरीही, अतिप्रमाणात केवळ वह्या पूर्ण करत बसण्याच्या मागे लागलेली मुलंमुली पाहिली की,यांचा खरा अभ्यास होणार तरी कधी? याची काळजी वाटते. 
     गेल्या काही वर्षांपासून बोर्डाच्या परीक्षांचं मेरिट बदलायला लागलं आहे आणि हा खरोखरच काळजीचा विषय आहे. मार्कलिस्ट वर दिसणारी गुणवत्ता कितपत खरी किंवा खोटी यावर आत्ता चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. पण उत्तम मार्कलिस्ट घडवणं महत्वाचं आहे,कारण त्याशिवाय पुढे चांगल्या कोर्सला प्रवेश कसा मिळणार? ही काळजी आहेच. थोडक्यात काय,नव्वद टक्क्यांहून अधिक गुण मिळाले तरी त्याचा आनंद घेताच येत नाही. कारण, भविष्याविषयीची अत्यंत अनिश्चितता गेल्या काही वर्षांत वाढली आहे. पालक म्हणून आपल्याला काळजी वाटणं स्वाभाविक आहे. पण नुसती काळजी करून काहीच साध्य होणार नाही. त्यासाठी आता हाती असलेल्या काळाचा योग्य उपयोग करून घेतला तर फायदा होईल. गेली १७ वर्षं आम्ही या समस्येवर काम करत आहोत. आणि असं लक्षात आलं की, मुलांना ताण देण्यात काहीच अर्थ नाही.
उलट - 
१) त्यांना अभ्यासाची योग्य पद्धत शिकवणं गरजेचं आहे. 
२) ती पद्धत त्यांच्या अंगवळणी पडणं आवश्यक आहे. आणि 
3) त्याच पद्धतीनुसार त्यांचा दैनंदिन अभ्यास आणि सराव होणं आवश्यक आहे. 
४) शाळा/ कॉलेज, घर, क्लास या चक्रातून बाहेर काढून त्यांचं नवं वेळापत्रक सेट करणं आवश्यक आहे. 
5) शास्त्रशुद्ध पद्धतीने त्यांची "परीक्षा कौशल्ये" विकसित करण्याची गरज आहे.
6) केवळ एवढंच पुरेसं नाही. तर, यात कमालीचं सातत्य आणि शिस्त आणल्याशिवाय बदल होणार नाही. 
मुलांना मदतीची नितांत गरज आहे, हे आपणच समजून घेण्याची वेळ आली आहे. निकाल लागल्यानंतर युद्धजन्य परिस्थिती असते, पण त्याचा ताण आतापासूनच घेणं चुकीचं आहे. त्याहीपेक्षा अधिक आहे ते आताच मुलांना योग्य प्रकारे मदत करणं. मुलांना सुद्धा आपलं काहीतरी कमी पडतंय हे जाणवतच असतं. पण त्यासाठी नेमकं काय करावं हे मात्र त्यांना सुचत नसतं. नुसते धडे वाचून किंवा ऐकून शिकता येत नाही. त्यासाठी आणखीही काही गोष्टी कराव्या लागतात, हेच मुळात माहित नसतं. पालक म्हणून आपल्याला हे प्रश्न सोडवता येत नाहीत आणि "परीक्षा कौशल्ये" हा विषय दुर्दैवानं कोणत्याही ट्युशन्स किंवा कोचिंग क्लासेस मध्ये फारसा महत्वाचा मानला जात नाही. केवळ भरपूर प्रश्नपत्रिका सोडवल्या की चांगला सराव होतो, हा मोठा गैरसमज आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. 

©सौ.पूर्वा मयुरेश डंके
मानसतज्ज्ञ,संचालक-प्रमुख
आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

923. एक स्त्री

      फेसबुक मध्ये एक स्त्री म्हणून एक अकौंट काढावं आणि एक छानसा फोटो टाकावा कि आपला इनबॉक्स भरायला वेळ लागत नाही. कोणीही येत गुड मॉर्निंग करत. कोणीही येत मला तू आवडते सांगते. कोणीही येत माझ तुझ्यावर प्रेम आहे सांगते, कोणीही येत तुझ्याशिवाय माझ जग नाही सांगते, कोणीही येत तूच माझी राणी म्हणते. कोणीही येत माझ तुझ्यावर डिव्हाईन प्रेम आहे सांगते. कोणीही येत आणि मला तुझ्याबरोबर सेक्स करायचा आहे सांगते. कोणीही येत तू एकटी आहेस आणि मीच तुला खांदा देऊ शकतो अस सांगत. कोणीही येत माझ्याशिवाय मी तुला कोणाचीही होऊ देणार नाही सांगते. बर हे सगळ कोणी एकटा माणूस नाही तर रोज असे १०-२० मेसजेस तरी इनबॉक्स मध्ये धडकत असतात. आपण कोणाला इग्नोर कराव आणि कोणाला ब्लॉक?
     कोणतीही स्त्री दिसली कि ना ओळख, ना पाळख, ना तिच्या आयुष्याविषयी काही माहिती, ना तिच्या मनाची अवस्था. थोड छान बोलण झाल कि लगेच ती अव्हेलेबल आहे. ती कुठेतरी झुरते आहे स्पेशली तिच्या शारीरिक संबंधात आणि मीच तो काय हिरो जन्माला आलो आहे जो तिच्या सगळ्या माहित नाही पण निदान शारीरिक संबंधातील गरजा पूर्ण करू शकतो अश्या आविर्भावात आज प्रत्येक पुरुष बिनधास्तपणे स्त्री च्या समोर पहिल्या काही तासात उभा रहातो. तू एकटी आहेस आणि तू मला आवडतेस अस म्हणत तुझ्यासाठी माझ्या कुटुंबाला बाजूला टाकून मी सगळ काही करू शकतो. नाहीतर माझ्याकडे हे आहे ते आहे. माझ समाजात हे स्टेटस आहे. तूच माझी गरज भागवू शकते हे सांगत गोष्टी कुठूनही सुरु झाल्या तरी शरीर शरीर संबंधान पर्यंत येऊन थांबतात. हे मी नाही तर फेसबुक वापरणारी प्रत्येक स्त्री तुम्हाला सांगू शकेल.
     ह्या सर्वात वयाच काहीच अंतर नाही. नुकतीच मिसरूड फुटलेला २० वर्षाचा तरुण ५० वर्षाच्या स्त्री ला तर ६० ला पोचलेला एक पुरुष एका १८ वर्षाच्या स्त्री शी बोलताना फक्त तिकडेच येऊन थांबतो. तिथवर येण्याची पद्धत प्रत्येक पुरुषाची वेगळी असेल पण शेवटच स्थानक मात्र सेक्स. ना ओळख ना पाळख पण प्रेम व्हायला आणि आवड निर्माण व्हायला एक फोटो किंवा एक च्याट किंवा एक भेट पुरेशी असते आजकाल सगळ्यांना.
     समोरच्याला काय वाटेल, काय वाटते ह्याचा काहीच विचार नाही. आपण आपल्या भावना फक्त व्यक्त करायच्या. समोरच्याने काही विचार करण्याअगोदर आपण गादीवर जाऊन पोचलेले असतो. इतका उतावीळपणा?? कॉलेज ला जाणारे किंवा नुकतच तारुण्यात प्रवेश केलेल्या तरुणान कडून हे व्हाव हे एकवेळ समजू शकतो. त्या वयात येणाऱ्या भावनांना मोकळीक मिळण्यासाठी वेळ असताना किंवा मिळत नसताना त्या अश्या रीतीने बाहेर येण कदाचित एकवेळ समर्थनीय पण आयुष्य कोळून प्यायलेल्या आयुष्याच्या सगळ्या गोष्टींची चव चाखलेल्या पुरुषांनकडून पण त्याच तर्हेचे वर्तन होत असेल तर आपल्या भावना हरवलेल्या आहेत हे नक्की.
     पूर्वी स्त्री आवडली तरी स्वतःच्या भावना तिच्या पर्यंत पोचवायला अनामिक भीती असायची. किंबहुना स्त्री काय प्रतिक्रिया देईल ह्यातच आयुष्याची अनेक वर्ष वाया जात. आज उलट झाल आहे. तिला काय वाटेल हा विचार करण्याची गरजच पुरुषाला वाटत नाही. मला काय वाटते ते तिने ऐकावं आणि तसच कराव. नाही ऐकल तर तिला सोडणार नाही अश्या आविर्भावात अनेक पुरुष असतात. ती काय जागा, जमीन आणि वस्तू आहे का? हक्क गाजवायला. एखादी स्त्री आवडण ह्यात चुकीच काय? अगदी पहिल्या भेटीत तिने मनाचा ठाव घेण ह्यात हि चुकीच काहीच नाही. पण त्या भावना त्याच तरलतेने, त्याच हळुवार पद्धतीने आपण मांडतो आहोत का? ह्याचा विचार प्रत्येक पुरुषाने करावा. आपली आवड हि फक्त सेक्स पुरती मर्यादित आहे कि खरच एक स्त्री म्हणून ती आपल्याला आवडते ह्याचा हि त्यात विचार असावा.
      पोर्न बघून बघून आपले विचार ज्या वेगाने मशीन होत आहेत ते खूपच धक्कादायक आहे. एकेकाळी हळुवार उमलणाऱ्या आपल्या भावना आता कुस्करून आपण बाहेर आणत आहोत. एक एक पाकळी हळुवार उमलण्याची मज्जा न घेता आपल्याला फक्त फुलाला चाखायच असते. कारण आपल्या भावनाच संपल्या आहेत. एक फुल झाल का दुसर ह्याच्या शोधात अनेक जण भटकत असतात. हेच अनेकजण एकाचवेळी एकाच फुलाच्या आंगावर धडकत असतात. कधीतरी फुल होऊन विचार केला तर हे सगळ बघून त्या सगळ्यांचा किती तिटकारा वाटत असेल ह्याचा अंदाज पण आपण लावू शकत नाही. आपला स्लेफ रिस्पेक्ट अश्या बाजारू बाई प्रमाणे पायदळी तुडवला जात असेल. तर शांत तरी किती वेळ राहायचं आणि कोणासाठी?
      आपण आपल्या आत झाकून बघायला हव. आपण जर उठून रोज १० स्त्रियांना ज्यांच्याशी आपला किंवा त्यांचा आपल्याशी जास्ती काही संबंध नसताना. त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया येत नसताना नुसतच जर आयुष्यात डोकावण होत असेल तर आपण कुठेतरी आपल्या भावना शोधायला हव्या. ज्या कधीच आपल्यातून हरवल्या आहेत. रिस्पेक्ट, डिग्निटी जपण आणि त्याचा सन्मान करण हे कोणत्या शाळेत शिकवलं जात नाही. तर ते शिकावं लागते. फेसबुक असो वा खर आयुष्य. समोर येणारी कोणतीही स्त्री हि अव्हेलेबल नसते. तिला सहानभुतीची गरज नसते, तिला शरीरसंबंधात कोणाची तरी अजून गरज नसते. हे बाजूला ठेवून आपण जेव्हा संवाद साधू तेव्हा हरवलेल्या भावनांचा शोध आपण पुन्हा घ्यायला सुरवात करू अस मी म्हणेन.

सगळ्या महिलांच्या चरणी अर्पण हा लेख.

922. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ

     सकाळी त्याला कामावर निघायला थोडा उशीरच झाला होता. कशीबशी धावत धावत ट्रेन पकडली आणि स्वतःला आत झोकून दिले. ट्रेनमधील एकाने पटकन आधार दिल्यामुळे तो कसाबसा सावरला. आत आल्यावर दोन्ही  सीटच्या मोकळ्या जागेत उभा राहिला. 
"कशाला एवढी धावपळ करायची. जीवापेक्षा काम जास्त महत्वाचे आहे का." असे दोघांतिघांनी प्रेमाने रागावून  समजावले. त्याला आपण केलेल्या चुकीमुळे अपराधीपणाची जाणीव झाली होती..  मनातल्या मनात अशी चूक पुन्हा न करण्याचे ठरवले. त्याने थोडा मनात विचार केला की "चुकून हात निसटला असता तर". नुसती कल्पना करताच त्याच्या अंगावर काटा आला होता. तो थोडा वेळ डोळे मिटून शांतपणे बसून राहिला. नंतर मोबाईल काढून बराच वेळ मेसेज वाचत बसला. "पुढील स्टेशन."उदघोषणा ऐकल्यावर तो भानावर आला आणि पटकन ट्रेन मधून उतरला. प्लॅटफॉर्मवर उतरून तो चालू लागला. समोर एक साध्या कपड्यात असणारा मजूर गृहस्थ सामानाच्या गोणीचे ओझे उचलायला हाताने इशारा करून आवाज देत होता पण येणारे जाणारे तिकडे दुर्लक्ष करत घाईघाईने निघून जात होते. तो जवळ गेल्यावर त्याने हात देऊन त्या मजुराच्या  डोक्यावर ती सामानाची गोणी ठेवली व तो ब्रिजकडे निघाला. ब्रिजच्या पायऱ्या चढून वर जातो नाही तेच समोर टीसी उभा. टीसी पास/तिकीट करत समोर येताच त्याने पाकीट काढून पास दाखवला.  जंटलमन  तुमचा पास कालच संपलाय.आज चार तारीख आहे. 
अहो, ऐका ना. खरेतर घाईघाईत लक्षातच आले नाही की आज पास संपतोय. मला वाटले आज तीन तारीख आहे.
पण ही तुमची चूक तुम्हाला मान्य आहे तर तुम्हाला दंड भरावा लागेल.
साहेब, हे पहा गेल्या पाच सहा महिन्याचे पास सोबतच आहे. मी कधीही तिकीट, पास शिवाय प्रवास करून रेल्वेची फसवणूक करत नाही आणि हे पहिल्यांदाच झाले आहे. तरीही अनावधानाने झालेल्या चुकीची शिक्षा मी दंड भरून भोगायला तयार आहे आणि आता ऑफीसला जातानाच पहिला पास काढून नंतरच ऑफीसला जाईल.
मित्रा, मी तुला सांभाळून घेणारच आहे त्याचे कारण म्हणजे तू येताना केलेले काम. आमचे ब्रीजवरून खाली येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांकडे लक्ष असतेच. प्लॅटफॉर्मवर त्या माणसाचा पेहराव पाहून बाकीचे  दुर्लक्ष करत असताना तुझी  ओझे उचलून देण्यासाठी असलेली मदतीची भावना मला मनापासून आवडली. मला तुला आडवायचे नव्हते पण जाणूनबुजून आडवले आणि तू सापडला. पण त्यातही तू सापडला असला तरी तुझे जुने पास पाहून तू प्रामाणिक प्रवासी आहे याचा मला खरोखरच अभिमान वाटला.
साहेब हा तुमचा मोठेपणा आहे. आणि कोणालाही स्वार्थासाठी मदत करण्यापेक्षा त्या गरीब गृहस्थाला मदत करणे कर्तव्यच होते ते फक्त मी पार पाडले.
मित्रा, आज तुझे काम पाहून तुला दंड करायची इच्छा होत नाही. चल मी तुला तिकीट खिडकीवर सोडतो नाहीतर पुढे माझे सहकारी टीसी तुला विदाऊट समजून पुन्हा  पकडतील.
त्याला हे ऐकून खूपच आनंद झाले. आपल्या छोट्या मदतीने आज त्याचे होणारे नुकसान टळले.
तो टीसी सोबत तिकीट खिडकीवर आला. पास काढल्यावर टीसीला म्हणाला "चला चहा घेऊ". पण टीसीने नम्रपणे हसून  नकार देत म्हणाले, " धन्यवाद मित्रा. मी आता ड्युटीवर आहे. भेटू पुन्हा कधीतरी.
 टीसी सोबत हात मिळवत "ठीक आहे" म्हणत तो घाईने ऑफीसच्या दिशेने निघाला.
चांगल्या कामाचे फळ चांगलेच मिळते पण ते एवढ्या लवकर मिळेल यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. त्याला आज काही मिनिटांच्या अंतरावर देव माणसे भेटली. कदाचित ते चांगुलपणाची,प्रामाणिक पणाची परीक्षा पाहण्यासाठी भेटले असावे. चांगले काम करण्याची आलेली संधी अनोळखी प्रवाशांनी त्याला मदतीचा  हात देऊन हातातून जाऊ दिली नाही, तीच संधी मजूराने दिली आणि तीच सुसंधी शेवटी टीसीला मिळाली. संधीची अजब शृंखला फक्त ती कशी,कधी, कुठून येईल सांगता येत नाही  फक्त वेळेत संधीचे सोने करता यायला हवे हा बोध त्याला मिळाला. जाता जाता तो हळू आवाजात प्रल्हाद शिंदेंचे गाणे गुणगुणत होता.
जगी जीवनाचे सार,  घ्यावे जाणूनी सत्वर..  जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर।

माझा स्वानुभव आहे हा चांगले केलेले काम कधीही फुकट जात नाही. देव प्रत्येक वेळी तुम्हाला सावरत असतो ती पावती तुम्हाला मिळत असते. 
    संग्रहित

921. तो आनंदाश्रू होता

 "आई मी लग्न करतोय" मी आनंदाची बातमी सांगत मी एका मुलीचा फोटो आईपुढे धरला.
हे ऐकून आईला आनंद वाटण्याऐवजी तिच्या चेहऱ्यावर एक ऐक वेगळीच चिंतेची छटा उमटली. "काय झालं आई? तुला मुलगी आवडली नाही का?" फोटोकडे तिने पाहीलेच नाही. ती काहीच बोलत नव्हती. इतक्यात दरवाज्यावरची बेल वाजली.
मी दरवाजा उघडला बाहेर प्रसाद उभा होता. तो आईला भेटायला आला होता. डोळ्यात तराळलेले पाणी पुसत आई किचनमध्ये गेली. तिच्या डोळ्यातील पाणी पाहून मी गलबललो. आज तब्बल सहा वर्षानी आईच्या डोळ्यात पाणी पाहत होतो. प्रसादशी बोलत असताना माझं लक्ष त्या बोलण्यात नव्हते. तो त्या रात्री आमच्याकडे राहणार असल्याने मला आईशी काहीच बोलता आले नव्हते. तिचा काळवंडलेला चेहरा मला अस्वस्थ करत होता.
रात्री मला झोप येत नव्हती. विचाराने डोक्यात काहूर माजले होते. आईचा मुड असा का बदलला. खरतरं तिच लग्नासाठी माझ्या मागे लागली होती. मला काहीच कळत नव्हते. मन भूतकाळात जावू लागले होते.
तो दिवस मला चांगला आठवतो. संध्याकाळची वेळ होती. मी माझ्या रूमवर लवकर पोहोचता यावे म्हणून बसची वाट न बघता सरळ रिक्षा करून जायचे ठरविले. त्या दिवशी संकेतचा वाढदिवस होता. पाच मिनिटे झाली तरी रिक्षा येत नव्हती. इतक्यात पावसाची रिपरिप सुरू झाली. माझ्याकडे छत्री असून पण बसस्टॉपच्या आडोशाला आलो. बसस्टॉप जवळ अंधार होता. माझं सहज लक्ष एका कोपऱ्यात गेले. तिथे कोणीतरी कण्हत असल्याचा आवाज येत होता. मी जवळ जावून पाहीले असता तिथे एक बाई शरीराचे मटकुळं करून बसली होती. पावसाचे पाणी तिच्या अंगावर पडत होते. तिच्यात उठायचे त्राण नव्हते.
"अहो बाई, कोण आपण? इथे काय करताय?" तिच्या कडून काहीच प्रतिसाद नव्हता. त्यांची मध्येच खोकण्याची उबळ आणि कण्हण्याशिवाय काहीच हालचाल नव्हती. इतक्यात माझी बस आली पण त्या बाईंना तिथे असं सोडून जाणं प्रशस्त वाटेना. पण लगेच तो विचार झटकून आपण का त्या फंदात पडा ? असा विचार करून मी सुटणारी बस धावत धावत पकडली. सीटवर बसलो पण काही केल्या बसस्टॉपवरचे दृश्य डोळ्यासमोरून जाईना. बस काही अंतर पुढे गेली असेल आणि मी एका बसस्टॉपवर बस मधून खाली उतरलो. प्रसादला फोन लावून मी धावतच बसस्टॉपकडे निघालो. मी तिथे पोचलो तेव्हा त्या बाई एका बाजूने पुर्ण भिजल्या होत्या. पाऊस ओसरला होता. थोड्यावेळात प्रसादही तिथे पोचला. दोघांनी मिळून त्या बाईंना रिक्षात घालून हॉस्पिटलमध्ये दाखल केले. प्रसाद आणि मी हॉस्पिटलमध्ये असतानाच रूमवरून कॉल येत होते. आज संकेतचा वाढदिवस होता. त्यासाठीच सर्व आमची वाट बघत थांबले होते.
प्रसादला पुढे व्हायला सांगून मी हॉस्पिटलमध्येच थांबलो. इस्पितळ सरकारी असून पण चांगले उपचार होत होते.
" या पेशंटसोबत तुम्ही आहात ना?"
" हो"
" तुमच्या आई आहेत ना या?
हॉस्पिटलमध्ये आणायला इतका वेळ का केलात? " एका नर्सने मला विचारले.
"उशीर झाला खरा, पण उपचारात काही कमतरता ठेऊ नका, काही लागले तर सांगा" असे बोलून मी सारी सत्यकहानी त्यांना सांगीतली. त्या बरोबर तिथल्या नर्सही हळहळल्या.
" तुम्ही काहीही काळजी करू नका, आम्ही यांची नीट काळजी घेऊ, आपण घरी गेलात तरी चालेल "
" खरचं ना?"
" हो निश्चिंत राहा." त्या नर्सच्या आश्वासक शब्दानी बरं वाटले. किंबहुना त्यांनाही मी घेतलेल्या कामात खारीचा वाटा उचलायचा होता.
मी घरी आलो आणि सारी परीस्थिती सांगीतली. सगळे हळहळले पण संकेत काही न बोलता आत निघून गेला.
चार दिवसात त्या बाई किरकोळ खोकला वगळता ठणठणीत बऱ्या झाल्या. पण काहीच बोलत नव्हत्या. मी त्यांना खुप बोलते करायचा प्रयत्न केला. त्यांना काही विचारले की डोळ्यात पाणी भरायच्या. शेवटी मी त्यांना आमच्या रूमवर आणायचे ठरविले . त्या कुठून आल्या ? का आल्या? आम्हाला काहीच माहीत नसून सुद्धा मी आणि प्रसादने त्यांना आमच्या रूमवर घेऊन आलो. आम्ही पाचजण एका चाळीच्या खोलीत राहायचो. त्यातला संकेत सोडला तर आम्ही सगळेच एकमेकांना समजून घेत होतो. आम्ही पोहोचलो तेव्हा संकेत रूमवर होता. आमच्या सोबत त्या बाईंना बघून त्याने एक नाराजीचा कटाक्ष टाकला आणि तो बाहेर जाऊ लागला.
" संकेत थांब, तुम्हा सगळ्यांशी मला काही बोलायचे आहे" त्या बाईंना एका खुर्चीवर बसवून मी म्हणालो.
संकेत थांबला.
मी बोलायला सुरूवात केली. " हे बघा मित्रानो, ह्या बाईंबद्दल तुम्हाला अगोदरच बोललोय, यापेक्षा त्यांच्याबद्दलची माहीती मला अजून तरी मिळाली नाहीये. माझे आणि प्रसादचे असे मत आहे की, या बाईंना आपल्यासोबत राहू द्यायचे. "
"मला हे मान्य नाहीये, एकतर या कोण कुठल्या हे आपल्याला माहीत नाहीये आणि आपल्यालाच ही जागा पुरत नाहीये." संकेत तडतडला.
"संकेत मी परवानगी विचारत नाहीये, तुम्हाला सांगतोय, माझा आणि प्रसादचा निर्णय झालाय. आपणां सर्वांना थोडे ऍडजस्ट करावे लागेल." संकेत सोडून सगळ्यांनी होकारार्थी मान डोलवली. संकेत सोडला तर आम्ही सगळेच अनाथ होतो. त्याचे आईबाबा गावी असायचे. त्यामुळे संकेतशिवाय आम्हा सगळ्यांना अनाथपण काय असते हे चांगलेच माहीत होते. या बाईंची माहीती समजेपर्यंत त्या पण आमच्यासाठी अनाथ होत्या. आमच्या रूममध्ये एक दिवान होते त्यावर त्या बाईंना झोपायला देऊन मी किचन मध्ये झोपलो. तिथून आम्ही आळीपाळीने प्रत्येक जण किचनमध्ये झोपू लागलो. सुरूवातीचे दिवस त्या बाईंच्या खोकल्यामुळे आम्हाला झोप मिळत नव्हती. अशातच संकेतने आपली सोय दुसऱ्या ठिकाणी केली. आम्ही त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. फक्त थोडे जास्तीचे रूमभाडे सहन करावे लागले.
काही दिवसानी त्या बाई पुर्ण बऱ्या झाल्या. सगळ्यात पहिले त्यानी सर्व घर नीट लावले. किचनचा ताबा आपल्याजवळ घेतला. घराला घरपण आले. किचनमधले सामान जागच्या जागी राहू लागले. आम्ही नको म्हणत असताना सुद्धा आमची सर्व घरातली कामे त्या करू लागल्या. काही दिवसात त्या आमच्यात रूळून गेल्या.
एक दिवस मी त्यांच्याबद्दल विचारण्याचा प्रयत्न केला पण तोही असफल ठरला. त्यांच्या डोळ्यातील पाणी पाहून मी पण जास्त आग्रह केला नाही. तिथून पुढे मी तो विषय काढला नाही. त्यांचा सहवास आम्हाला हवाहवासा वाटू लागला. त्याही आमच्यावर आईची माया करू लागल्या. आम्ही त्यांना आई बोलावू लागलो. आमच्या सोबत नाटक, सिनेमाला घेवून जाऊ लागलो. आमची सर्व सुख दु:खे त्यांच्या सोबत शेअर करू लागलो. देवाने आम्हाला काही दिवसातच सनाथ करून टाकले होते. दिवसां मागून दिवस जात होते. एकदा तर माझ्या एका मोठ्या आजारपणातील एखादी आई सुद्धा लढली नसती अशी लढून तिने मला मृत्यूच्या दारातून आणले होते.
सहा वर्षात अशा बऱ्याच गोष्टीनी आमच्या मनात त्यानी घर केले होते त्याच दरम्यान संतोष, राकेश आणि प्रसादचे लग्ने देखील झाली. आता फक्त मी आणि आई घरी राहीले होतो. मी आईला कायम माझ्यासोबत ठेवायचे ठरवले होते. तिही आता थकत चालली होती. ती लग्नासाठी माझ्या मागे लागली होती. मी मात्र तो विषय टाळत होतो. न जाणो होणारी बायको कशी मिळेल? आईशी कशी वागेल? मला आईची खुपच सवय झाली होती. मला बालपणापासून प्रेम, माया काय असते हे माहितच नव्हते. कचराकुंडीतून अनाथाश्रम आणि मग शिक्षण झाल्यावर भाड्याच्या खोलीत असा फिरत होतो. आईकडे सर्व व्यवहार दिल्यापासून दोन वर्षात आम्ही स्वताचे घर घेतले.
पैसा जरी माझा असला तरी त्याला वळण मात्र आईने लावले होते. सुरूवातीला लोक काहीही बोलायचे. लोकांना फक्त नर मादीचेच नाते माहीत असते. त्या पलीकडे पण काही नाती असतात हा विचारही त्यांच्या मनात कधी डोकावत नाही. चार जवान पोर आणि एक पंचावन्न वर्षाची बाई या गणितामध्येच आपली बुद्धी गहान ठेवत होते. आम्हाला याचा खूप त्रास झाला . शेवटी आम्हाला भाड्याची रूम बदलावी लागली होती. पुढे मग काही दिवसात स्वताचे घर घेतले.
प्रसाद सकाळी लवकर उठून कामावर निघून गेला. मला पण ऑफीस साठी निघायचे होते. पण आईला रात्रीच्या प्रकाराबद्दल विचारायचे होते. मी नाष्टा करता करता विषय काढला.
"आई तुला, मुलगी पसंद नाहीये का? "
ती काहीच बोलली नाही.
"आई तू बोलत का नाहीस?"
"काय बोलू बाळा? या वयात मी खुप स्वार्थी वागतेय रे. मला तुला गमवायचे नाहीये."
" म्हणजे? मी काही समजलो नाही".
"मला तुझ्या लग्नाची खुप भीती वाटतेय"
"काय बोलतेस तू, तूच तर लग्नासाठी मागे लागली होतीस. तू म्हणत असशील तर लग्न देखील करत नाही."
"अस बोलू नको रे बाळा, मी इथे येण्यापूर्वी अगदी खुप सुखात होते. तुला कधी हे बोलले नाही. पण आज सांगतेय. मी, माझे पती आणि सागर असा आमचा तिघांचा संसार सुखात चालला होता. पण नियतीला ते पाहवले नाही. एके दिवशी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने सागरचे बाबा आम्हाला कायमचे सोडून गेले.
वडीलांच्या धाकात असलेला सागर मोकळा झाला. तो मनाला येईल तसा वागू लागला. त्याचे घराबाहेर राहणे वाढू लागले. नवऱ्याशिवाय कुठेही बाहेर न पडणारी मी घरातच कुढू लागले. अशातच माझा दम्याचा आजार वाढत चालला. सागरला सांगून सुद्धा तो कानाडोळा करत होता. एके दिवशी आपल्या लग्नाचा विषय त्याने स्वताहूनच माझ्याकडे काढला. मी ही खुश झाले. आपल्या कुटुंबात अजून एक मेंबर वाढणार होता. सुनेमुळे तरी हा घरी राहील. त्याचे लग्न झाले. नव्याची नवलाई संपली. सागर तर माझा मान राखतच नव्हता. सुनही त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालू लागली. ते माझ्या साधेपणाचा फायदा घेऊ लागले.
वरचेवर घालून पाडून बोलू लागले. औषधोपचार न झाल्यामुळे माझा दम्याचा आजार बळावला. नवऱ्याने मला एवढी पंगू करून ठेवले होते की घर आणि घर, या शिवाय मला काहीच माहीत नव्हती. मी साधी आहे मला कोणीतरी फसवेल या भीतीने ते मला एकटी कुठेच पाठवत नव्हते. त्याचे परिणाम त्यांची साथ सुटल्यावर भोगावे लागले. माझा खोकला त्यांना त्रास देवू लागला. माझं रात्रीचे अवेळी उठने यांची प्रायव्हसी भंग करू लागला. काही दिवसानी माझी रवानगी किचन मध्ये झाली. हॉलमध्ये झोपले तर माझ्या खोकण्याचा आवाज बेडरूम मध्ये जोरात जात होता. म्हणून मला किचनमध्ये झोपायला सांगण्यात आले.
किचनमध्ये फॅनही नव्हता शिवाय दरवाज्या बंद करून घेतल्यामुळे मला श्वासोच्छ्वास घेणे अवघड जावू लागले. एक दिवस मी कशी बशी झोपले. दुसऱ्या दिवशी मला फारच गुदमरायला झाले. अशातच मी आत धडपडले. स्टँडवरची सगळी भांडी माझ्या डोक्यावर पडली. त्या आवाजाने सागरने दार उघडले आणि निघून गेला. सागर एवढा का निष्ठूर वागत असावा तेच कळत नव्हते...., आणि तो दिवस उजाडला. निष्ठूरतेचा उच्चांक गाठणारा.
त्यादिवशी मला देवदर्शनासाठी म्हणून घेवून जाणारा सागर थोडा वेगळा भासला. खरं तर मला बाहेर पडायचे नव्हते. पण त्याचा आग्रह मला मोडता आला नाही. त्यावेळी पोटचा पोर असा का वागला याचे उत्तर मी आजही शोधते रे. हॉटेलमध्ये जेवण आणायला गेलेला सागर परतलाच नाही. मी मात्र भुकेने व्याकूळ होऊन वाट पाहत बसले. पोटची भूक विरली पण मनाची भूक त्याची वाट पाहत बसली. मुलाने आपल्याला फसवलेय हे समजून घ्यायला मी खूप वेळ घेतला. तरीही माझे एक मन माझी समजूत काढायचे. ज्याच्यामुळेच मी एकटी तग धरू शकले. जेव्हा मनाची पूर्ण समजूत झाली की आपले कोणीच नाहीये तेव्हा डोळ्यातील पाणी थांबायचे नावच घेत नव्हते. मला सोडून गेलेले ठिकाण मुंबई आहे हे कळल्यावर त्याने मला किती दुर केलयं हे समजले. मी गावी परतूही शकले असते. पण तसं नाही केले. जे काही होईल ते इथेच होऊ दे असे समजून दिवस कंठू लागले."
आईचे शब्दन शब्द माझे काळीज चिरत होते. मी निरूत्तरीत झालो होतो. जणू काही मीच त्या सर्व गोष्टीला कारणीभूत होतो. त्या रात्री मला झोप लागली नाही. मी त्या घरात परत लग्नाचा विषय काढला नाही. आईने पण त्या दिवसापासून त्या विषयाला पूर्णविराम दिला. मी असा निर्णय का घेतला हे माहीत नव्हते. पण माझ्या निर्णयामुळे आईला त्रास व्हायला नको होता. संतोष , राकेश आणि प्रसाद मला वारंवार लग्नाविषयी विचारणा करायचे. मी मात्र सारवासारव करून वेळ मारून न्यायचो.
आता आम्ही मुंबई उपनगरात राहत होतो. सारं काही सुरळीतपणे चालले होते. एक दिवस माझ्या सोबत एका तरुण मुलीला घराच्या दारात पाहून ती चपापली.
"आई ही , कल्पना. आज पासून आपल्या इथे राहील"
"अरे पण?" ती काय बोलावे या संभ्रमात पडली.
"अग, मी तुला मागे म्हणाला होतो ना, कपिल मामांबद्दल, त्यांची ही मुलगी."
"??" तिच्या चेहऱ्यावरील अजूनही प्रश्नचिन्ह तसेच होते.
"आई, मला सहा महीन्यासाठी दुबईला जावे लागतेय, मग तू इथे एकटी असणार ना? म्हणून मग मी कपिलमामांना सांगून कल्पनाला तुझ्या सोबतीला पाठवून द्यायला सांगितले." इतक्यात कपिलमामाच दारात आल्याबरोबर तिची समजूत पटली. तिची कळी लगेच खुलली.
" तू ना, धक्क्यावर धक्के देतोस बघ, आता हे दुबईचे कधी ठरले तुझे?"
" अगं आई कालच, माझे जायचे नक्की नव्हते. तुझ्या सोबतीला कोणी असले तरच जाणार होतो. पण कपिल मामांमुळे माझी परदेशवारी आज निश्चित झाली. मला परवाच निघायचे आहे, अजून खूप तयारी बाकी आहे" मामांना बसायला सांगून मी घराबाहेर पडलो.
ज्या दिवशी मी बाहेरगावी जायला निघणार होतो, त्यादिवशी ती खूपच भावूक झाली होती. मी ही तिला सोडून कधी गेलो नव्हतो. पण काही निर्णय थोडं कठोर होऊन घ्यावे लागतात.
आज तब्बल सहा महीन्यानी मी आईला पाहणार होतो. घराचे जिणे चढताना एक अनामिक हूरहूर मनात दाटली होती. तशी मी अधून मधून आईची ख्यालीखुशाली घेत होतो मी दरवाज्यावरची बेल वाजवली. बराच वेळ कोणीच दरवाजा उघडला नाही. मी परत बेल वाजवली. मला स्तब्धता नकोशी वाटत होती. अखेरीस आईने दरवाजा उघडला. आईला गाढ अलिंगन देऊन मी सोफ्यावर बसलो.
"कशी आहेस आई?" आईचा हात हातात घेऊन मी म्हणालो.
" मी एकदम मस्त, कल्पना बाजारात गेलीये"
" तेव्हाच." असे मनाशी बोलत मी आईकडे पाहीले. ती माझ्याकडे मिस्कील पणे पाहत होती. खूप खुशीत होती स्वारी. मला काहीतरी तिला सांगायचे होते पण तिला स्वताला आवरत होती.
"आई मी काय म्हणतोय, मी आता आलोय तर कल्पनाला जायला हरकत नाही ना?"
"ए, नाही हा, मी तिला कायम माझ्यासोबत ठेवणार आहे." मला हे तिचे उत्तर अपेक्षित होते.
" काय पण काय बोलतेस आई ? कायम कशी राहील ती आपल्या जवळ?"
"जावईबापू तुमच्या साखरपुड्याची तयारी झालीय आणि प्रश्न कसले विचारत बसलाय?" कपिल मामा घरात येत म्हणाले. सोबत येणारी कल्पना कमालीची लाजली होती. हे सगळे होणार याची मला कल्पना होती पण एवढ्या झटपट सगळं ठरेल असे मला वाटले नव्हते.
आई हसतच गोड आणायला स्वयंपाक घरात गेली. बाहेर मी, कल्पना आणि कपिलमामा हसायला लागलो. ही सगळी कल्पनाचीच योजना होती. कल्पनाचे स्थळ जेव्हा आले तेव्हाच ती मला पसंद होती. जेव्हा तिचा फोटो आईला दाखवायला घेऊन गेलो, तेव्हा तिने त्यावेळी तो फोटो पाहीला देखील नव्हता. त्याचवेळी तिने आपल्या मनातील सल बोलून दाखवली होती. आम्ही दोघानी एकमेकांना केव्हाच वरले होते पण आईला दुखवून मला काहीच करायचे नव्हते. तिच्या मनातील साशंकता घालवायची होती. तिच्या मनाला बसलेला पीळ सोडवायचा होता. तिला एक आश्वासक धीर द्यायचा होता. पण कसा ? तेच कळत नव्हते. मी आईची करूण कहाणी ऐकून हादरून गेलो होतो. अशीही मुलं असतात ज्यांना आईने नऊ महीने विनातक्रार जपलेले असते आणि जेव्हा जन्मदात्याना जपायची वेळ येते त्यावेळी मात्र सारं काही जाणीवपूर्वक विसरले जाते. म्हातारे आई बाप नकोशे वाटतात. बायको की आईबाप यात गफलत करून बसतात. सागरने पण असचं केले. यात त्याच्या बायकोची चुक असेल अस वाटत नाही. आपणच आपल्या जन्मदात्यांचा मान आपण ठेवला नाही तर ती तरी काय ठेवणार ?
या सगळ्यातून आईला बाहेर काढायचे होते. मग कल्पनाच्या मदतीने आम्ही एक बेत आखला. सहा महीन्याच्या कालावधीसाठी मला त्याच शहरात राहून आईपासून दूर राहणे थोडे जड जाणार होते. पण कल्पनाला आईसमोर आणण्याचा दुसरा मार्ग दिसत नव्हता. या सहा महीन्यात कल्पनाने आईचे मन जिंकले आणि ते होणारच होते. कल्पनाचा स्वभाव कमालीचा गोड होता. तिच्यात परक्यांनाही आपलेसे करण्याची कला होती. आईला माणसांची भीती नव्हती, भीती होती ती फक्त नवीन नात्याची! एका सूनकडून मिळालेले दुखः ती विसरू शकत नव्हती. आई कल्पनाच्या सहवासात छान रमून गेली. हळूहळू कल्पना, आई टाकत असलेला विश्वास सार्थ ठरवत गेली. आईलाही तिच्या स्वभावाची ओळख झाली. ती कल्पनाला आपल्या सूनेच्या ठिकाणी पाहू लागली. अर्थात कल्पनाला बऱ्याच छोट्या मोठ्या परिक्षा द्याव्या लागल्या.
फक्त माझ्या मनात एक खंत मात्र राहणार होती. आईशी खोटं बोलून हे सारं केले होते. माझ्या मनातील घालमेल कल्पनाने ओळखली असावी. तिने माझा हात हातात घेऊन धीर दिला. स्वयंपाक घरातून जिलेबी घेवून येणाऱ्या आईकडे पाहून मी भरून पावलो होतो. तिच्या चेहऱ्यावर एकटेपणाचा किंचितही लवलेश नव्हता. कपिलमामा आमचा हा कौतुक सोहळा दुरूनच पाहत होते. त्याचवेळी आईने, यापुढे कपिलमामाही आपल्यासोबत इथे कायम राहणार असं घोषित केले. कल्पनाच्या डोळ्यातील आनंदाश्रू पाहून आईने तिला जवळ घेतले.
"बाळ, एकमेकांच्या मनाचा विचार केला तर.. कोणतेही मन का बरं दुखावेल? तसं पाहायला गेलो तर आपल्यात कोणतेच रक्ताचे नातं नाही, तरीही आपण एकत्र आलो आणि एकमेकांचे झालोच ना?" त्याचवेळी आईच्या डोळ्यातून एक अश्रु गालावरून खाली ओघळला. आईच्या डोळ्यात पाणी पाहून मी चमकलो पण तो आनंदाश्रू होता.. आनंदाश्रू..
समाप्त...

© या कथेचे सर्व हक्क लेखकास्वाधीन आहेत. लेखकाच्या नावासहीत ही पोस्ट शेअर करायला हरकत नाही. तसे न झाल्यास कायदेशीर कारवाई अनिवार्य आहे.
लेखक - नितीन राणे.
सातरल - कणकवली
सध्या वास्तव्य - बदलापुर (ठाणे )
मोबाईल नं. ९००४६०२७६८

920. प्रार्थनेचे शब्द महत्वाचे नसतात

 प्रार्थनेचे शब्द महत्वाचे नसतात तर त्या मागचा भाव महत्वाचा असतो.
     एक लहान मुलगी रोज सकाळी मंदिरात जावून मूर्तीसमोर उभी राही व डोळे बंद करून हात जोडत दोन मिनिटे काहीतरी पुटपुटत असे. नंतर डोळे उघडून नतमस्तक होई व स्मितहास्य करून धावतपळत बाहेर जात असे. हा दिनक्रम रोजचाच झाला होता. देवळातील पुजारी तिच्याकडे निरखून पहात होता. ती रोज काय करीत असते हे समजण्याची उत्सुकता त्यांना वाटू लागली. त्यांना वाटले, ती मुलगी इतकी लहान आहे की धर्माचा सखोल अर्थ तिला समजणे केवळ अशक्य. तिला कोणतीही प्रार्थना येत नसेल. मग रोज सकाळी देवळात येण्याचा काय अर्थ. असेच १५ दिवस निघून गेले. तिच्या वर्तनाविषयी अधिक जाणून घेण्याच्या जिज्ञासेमुळे त्यांची बेचैनी वाढू लागली.  एकदा सकाळी ती मुलगी तेथे येण्याच्या अगोदर ते तिथे पोहोचले. तिचा नित्यक्रम संपण्याची त्यांनी वाट पाहिली. त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले, 
मागील १५ दिवसांपासून तू नियमितपणे येथे येते हे मी पहात असतो. तू काय करतेस ? ती एकदम म्हणाली
" प्रार्थना " 
पुजारी यांनी जरा साशंकतेनेच  विचारले, तुला एखादी प्रार्थना येते ? 
" नाही." असे ती म्हणाली.
मग तू डोळे मिटून रोज काय करते? असे त्यांनी हसून विचारले. 
अगदी निरागसपणे ती म्हणाली, मला कोणतीच प्रार्थना येत नाही "
a,b,c,d  पासून  z  पर्यंत माहित आहे. ते ५ वेळा मी म्हणते आणि परमेश्वराला सांगते की मला तुझी प्रार्थना येत नाही पण ती नक्कीच या alphabets च्या बाहेर असूच शकत नाही. ही alphabets तुझ्या इच्छेनुसार क्रमश: लावून घे आणि तीच माझी प्रार्थना !
ती उड्या मारत बेभानपणे धावत निघून गेली. ती दिसेनाशी होई पर्यंत निरखून तिच्याकडे पहात पुजारी नि:स्तब्ध होवून उभे राहिले.  
ज्याची आपण मनोभावे पूजा करतो अशा परमेश्वरावर अतूट असलेली हीच ती श्रद्धा. !!

अगा बावन्न वर्णा परता।
 कोण मंत्रु आहे पांडुसूता।।

शनिवार, २४ फेब्रुवारी, २०२४

919. "नाही !"

..तिला वाटलंच होतं ! तसंच घडतंय. महिन्याभराच्या ओळखीनंतर त्याने 'ती' मागणी केलीच. हो - तीच मागणी. नराने मादीकडे केलेली मागणी. 
- "नाही." ती शांतपणे म्हणते. आश्चर्य नाही. शॉक नाही. आवाजात, चेहऱ्यावर, देहबोलीत कुठेही अस्वस्थता नाही. अगदी... शांत! नेटकं, सरळ - 'नाही'! 
- "काय प्रॉब्लेम आहे?" तो विचारतो. 
हेही अपेक्षितच होतं! तिला मनात हसू येतं. 
- "प्रॉब्लेम असण्याचा संबंधच कुठे येतो?"
- "मग 'नाही' का?"
- "वडापावमध्ये प्रॉब्लेम काहीच नसतो. छान लागतो! पण मला तो आत्ता खायचा नाही. सिंपल! म्हणूनच, नाही."
हा युक्तिवाद ऐकून त्याची थोडी चलबिचल. मग अचानक साक्षात्कार झाल्याप्रमाणे -
- "आत्ता नाही... म्हणजे... नंतर चालेल का?" 
- "नाही." पुन्हा तितकाच शांतपणा. 
आता तो थोडासा चिडल्यासारखा.
- "आताही नाही; नंतरही नाही. तू... कोल्ड फिश आहेस का?" 
- "किंवा तुला बघून मी कोल्ड होत असेन!"
त्याच्या डोक्यात एक तीव्र सणक जाते. पण ती खट्याळपणे हसते.
- "अरे चिडू नकोस राजा ! चेष्टा केली मी. चांगला हँडसम आहेस बरं का तू ! इतकंच की, मला लग्नापर्यंत थांबायचंय."
- "हॅ...! फालतूगिरी आहे ही."
हे ऐकून ती शांतपणे मान डोलावते. मनात काहीएक प्रश्नाचं उत्तर मिळाल्याप्रमाणे.
- "दुसऱ्याचे विचार तुझ्याहून वेगळे आहेत, हे पाहून तुझी पहिली प्रतिक्रिया म्हणजे 'फालतूगिरी आहे ही'. इंटरेस्टिंग. आणि तुला माझ्याशी रिलेशनशिप हवीये म्हणतोस?!"
तो लगेच शाळा घेण्याच्या भूमिकेत -
- "हे बघ. ती आपली एक नैसर्गिक गरज असते. त्यात काहीही वाईट नाही. उलट या इच्छा दाबून ठेवणं, हा मूर्खपणा ---"
- "रस्त्यावर पडलेलं अन्न खाल्लंयस कधी?" 
- "अं?"
- "पोटाची भूकसुद्धा नैसर्गिकच असते. त्यातही काही वाईट नसतं. तीही इच्छा दाबून ठेवता येत नाही. पण म्हणून कुणी रस्त्यावर पडलेलं अन्न खात नाही. पोटाची भूक भागवण्याआधी स्वयंपाकाची जबाबदारी घ्यावी लागते! तो सात्विक असेल यासाठी कष्ट घ्यावे लागतात! हां, म्हणजे; तसं हॉटेलचं खाणंही चालून जातं; पण ते आपल्याआधी उंदीर-घुशींनी चाखलेलं असतं! त्यांचे रोग आपल्यालाही जडू शकतात."
तो आता दमदमीत चिडलेला.
- "मीही रस्त्यावर पडलेला पोरगा नाही ना? मी एका घरंदाज घराण्यातला इंजिनिअरिंग झालेला ---"
- "तांदूळ आहेस!"
- "अं?"
- "हो, तू तांदूळ आहेस; अन् मी भाज्या ! नातं म्हणजे मॅगी नसते, बिर्याणी असते.  मॅगी दोन मिनिटांत होते; बिर्याणीला वेळ लागतो. आपल्या नात्याची बिर्याणी अजून शिजलेली नाही; ओळखीला महिनाच झालाय. कुकरच्या शिट्या झाल्यात कुठे? भाज्या अजून शिजल्यात कुठे?  अजून बरेच मसाले घालायचे बाकी आहेत. अजून एकमेकांना समजून घ्यायचंय. एकमेकांचं पाणी जोखायचंय. शरीर बाजूला ठेवून मनाशी संवाद घडवायचाय. प्रोसेस असते साहेब! तांदूळ कसा पिठुळला जायला हवा! भाज्या कशा त्या ऊबेत समरसून जायला हव्यात! 'तू' आणि 'मी' बाजूला होऊन एक 'आपण' निर्माण व्हायला हवा. त्या 'आपण'ची जाण, म्हणजे प्रेम. आणि त्या प्रेमावर जबाबदारीने उमटवलेली मुद्रा, म्हणजे लग्न. असं मला तरी वाटतं. म्हणून मला लग्नापर्यंत थांबायचंय."
त्याला शब्द सुचेनात... तीच पुढे म्हणते,
- "एक मुलगी जेव्हा एखाद्याला शरीरात प्रवेश देते ना, तेव्हा नुसतं शरीर नाही; मनात- आत्म्यात- संपूर्ण अस्तित्वातच प्रवेश देते. सामावून घेते. घरात प्रवेश मागणारी ऊर्जा तेजस्वी आहे का वाळवी आहे, हे बघायलाच हवं! अन् हे घरानेच बघायला हवं. आत्ता जवळ आलो तर तुला कचवट भाज्या मिळतील नि मला वातड तांदूळ! समजलास? तुला चालेलही कदाचित; पण मला नाही!"
क्षणभर त्या उपमा त्याचं पुरूषपण थिजवून जातात. ही पहिली वेळ नसते त्याची. याआधी कधी असं झालं नव्हतं! पोरगी एव्हाना... गुंडाळली जायची... हीसुद्धा जायला पाहिजे होती... हे असं काय घडतंय? च्यायला फॉर्म गेला काय खेळातला? थांब बे, आता बोलायलाच हवं.
- "पण... बिर्याणी नाहीच मिळाली तर? उपाशी राहणार का?" (शब्दात नि चेहऱ्यावर पुन्हा एकदा शाळा घेण्याचा नूर.) "बाकीची लोकं बघ जरा! कशी मॉडर्न असतात! प्रेम वेगळं. संसार वेगळा. वासना वेगळी. हल्ली असं वेगवेगळं, सुटसुटीत, 'सॉर्टेड' जगतात."
- "हो! आणि मग एकदा व्हरायटीची सवय लागली की लॉयल्टी विसरतात!"
चपराक मारल्याप्रमाणे तो शटडाऊन झाला. ती समंजसपणे हसली. म्हणाली,
- "बिर्याणी नाही मिळाली तर पुलाव मिळेल. हां, पण एक नक्की! मी वातड भात तर खाणार नाही. आणि हो, मी माझी चोथा झालेली भाजी तर नक्कीच होऊ देणार नाही. सुटसुटीत 'सॉर्टेड' जगण्यात मजा येतही असेल; पण तिथे भात आणि भाज्या वेगवेगळ्या खाल्ल्या जातात. तिथे 'चव' येत नाही! मला प्रेमाचा एक उत्कट आविष्कार म्हणून मीलन हवंय; नुसती वासनाशांती नकोय! मला जेवणाची तृप्ती हवीये; फक्त पोट भरणं नकोय! बाकीच्या लोकांशी मला घेणं नाही. त्यांनी कसं जगायचं हे मी ठरवत नाही. माझंच बरोबर असाही माझा अट्टाहास नाही. मी फक्त माझ्यापुरतं चूक/बरोबर ठरवते. मला जे योग्य वाटतं ते मी जगते. ज्यांना मॅगी हवीये त्यांनी ती जरूर खावी. त्यातल्या 'अजिनोमोटो'चे किडनीवर होणारे परिणाम स्वीकारून खावी. मी नाही खाणार! मॉडर्न असणं म्हणजे असं विचारांच्या बाबतीत स्वतंत्र असणं. पन्नास वर्षांपूर्वी गर्दी 'नाही' म्हणायची म्हणून आपणही 'नाही' म्हणायचो. ते बुरसटलेलं होतं. आज गर्दी 'हो' म्हणते म्हणून आपणही 'हो' म्हणायचं हेही मॉडर्न नाही; ते बुरसटलेलंच झालं. कारण तोंडाने 'हो' म्हणण्याआधी डोळ्याने 'का' हे विचारलं जायला हवं. किती लोक असं स्वतंत्रपणे तपासतात हे? एखाद्या गोष्टीचं स्वातंत्र्य तेव्हाच असतं, जेव्हा ती गोष्ट नाकारण्याचंही स्वातंत्र्य असतं. तेच स्वातंत्र्य मी जगतेय! विषय संपला!"
तो तिच्या पाणीदार डोळ्यातल्या स्वाभिमानी बुद्धीकडे पाहत राहतो. त्याच्या मनात फटाफट गणितं चालू...
- "तुला लग्नाचं प्रॉमिस हवंय का? माझ्यावर विश्वास नाही का? मी ---"
तो बोलायचा थांबतो; कारण ती खळखळून हसूच लागलीये...
- "अरे अजिबात नाही! मी तुझ्याकडून कसलंही प्रॉमिस मागत नाहीये; तू दिलंस तरी मी फारसं गांभीर्याने घेणार नाहीये. प्रॉमिस तर सगळेच देतात रे! प्रॉमिसिंग नसलेले तर नेहमीच देतात. तू प्रॉमिसिंग आहेस का नाहीस ते तपासणं ही माझी जबाबदारी आहे. त्यासाठी शब्द पुरेसे नसतात; कृती पाहायची असते. आणि आता सध्या तर विश्वासाचा प्रश्नच येत नाही. महिन्याभरात काय कळतंय? कुठली वेब सिरीज भारी असते नि कुठे मिसळ भारी मिळते यापलीकडे आपण बोललोच काय आहोत?"
आता तो एकदा रागाने नाक उडवतो. काय अटिट्यूड दाखवते ही? अशा छप्पन कोलल्यात आजवर... त्याच्या नजरेत हाराकिरी...
- "देख! (हिंदी कशासाठी?) ही गोष्ट मला हवीच आहे. ओ के? माझ्या मते ही गोष्ट कोणत्याही रिलेशनशिपचा अविभाज्य भाग आहे. ती जर आत्ता मिळणार नसेल तर मी उगाच या रिलेशनशिपवर पुढे कष्ट घेणार नाही. मला आत्ताच सांग."
पुन्हा एकदा मनात काहीएक उत्तर मिळाल्याप्रमाणे ती धीमेपणाने मान डोलावते. मंद हसते. म्हणते,
- "थोडक्यात म्हणजे माझं शरीर तत्काळ मिळणार नसेल तर मीच नको! अंहं, मघाशी बोलताना चुकलास तू राजा! तुला वाटतंय तसं तुझ्यासाठी हा रिलेशनशिपचा 'अविभाज्य' भाग नाही. तुझ्यासाठी हाच 'सर्वोच्च' भाग आहे! कारण तो मिळणार नसेल तर बाकीचं सगळंच नाकारतोयस तू! हे उघड केल्याबद्दल थँक्यू सो मच! आय थिंक, मला आणखी काही तपासायची गरज नाही. कळायचं होतं ते कळलं! तुझ्या मताचा मी आदर करते. काही बिर्याण्यांचे बेत फसण्याआधी थांबावं! तांदूळ नंतर थालीपीठातही कालवता येतो; भाज्याच तेवढ्या सावराव्या लागतात."
तो उठून जातो; एकदाच मागे वळून बघतो - रडतेय वगैरे का पाहण्यासाठी. तेवढाच एक सुकून मिळाला असता; एक... 'विजय' वगैरे! पण - नाही! ही अगदी नज़ाकतदार तब्येतीत इअरफोनमधून पाझरणाऱ्या 'सिआ' च्या 'अनस्टॉपेबल'मध्ये मुरांब्यासारखी मुरूनही गेलेली असते. 

© अपूर्व विकास
समुपदेशक व मानसशास्त्र तज्ज्ञ
{कृपया लेख शेअर केल्यास लेखकाच्या तपशीलासहित करावा, ही नम्र विनंती.}

शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०२४

918. दोन गुरु

(लेखक - नाना पाटेकर)
वयाच्या तेराव्या वर्षी, 1963ला नोकरीला लागलो. दुपारी शाळा संपली की घरी असेल-नसेल ते खाऊन दोनच्या सुमारास आठ किलोमीटर चालत जायचं. रात्री नऊ-साडेनऊ ते दहा वाजता पुन्हा आठ किलोमीटर चालत यायचं. घरी पोहोचायला साडेअकरा, कधीकधी बारा वाजायचे. पुन्हा सकाळी पावणेसहाला उठून शाळेला. नोकरीचे महिन्याला 35 रुपये आणि रात्रीचं एक वेळचं जेवण मिळायचं. जाताना एकदा आणि येताना एकदा असं दोन वेळा स्मशान लागायचं. कधीच भूत दिसलं नाही. पोटातली भूक भुतापेक्षा भयाण होती. कुठल्याही शाळेत न मिळणारा धडा, परिस्थिती शिकवत होती. हळूहळू कशाचीच भीती वाटेनाशी झाली. मरायचं नव्हतं. येणाऱ्या दुखऱ्या क्षणांना बेदरकार होऊन सामोरा जात होतो, पर्याय नव्हता.
रात्रीचं एक वेळचं जेवण गिळताना भाऊ आणि आई-वडिलांची आठवण यायची. 'त्यांनी काही खाल्लं असेल का?' असा वांझोटा विचार मनात यायचा आणि भुकेच्या वावटळीत भिरकावला जायचा.
अपरात्री परतत असताना रस्ता निर्मनुष्य आणि भयाण असायचा. तेव्हाची मुंबई वेगळी होती. एखादा दारुडा झिंगत माझ्या आडवा आला, तर त्याला चुकवून पुढे सरकताना मागून शिवी ऐकू यायची आणि मग मीसुध्दा मागे वळून आई-बहिणीवरून शिव्या द्यायचो. तो वळून पुन्हा शिवी द्यायचा. त्याचा तोल जात असायचा. अंतर राखून मी परतफेड करत असायचो. एखाद वेळी रस्त्यावरचा दगड कुठलाही विचार न करता भिरकावत असायचो. परिणामाची भीती नव्हती. उद्याचा विचार नव्हता. आला क्षण जगायचा होता, जसा जमेल तसा. कधी काळी कुणी मागे धावला, तर जमेल तसा पळूनसुध्दा जात असायचो. नंतर खूप अंतरावरून शिव्यांची उजळणी.
नकळत मरणाची भीती धूसर होत गेली. समोरच्याला जोखण्याची ताकद रुजली डोळयात. तेराव्या वर्षी तिशीची समज आली.
भर दुपारच्या उन्हातून चालताना उडप्याच्या हॉटेलमधल्या वासाने चाल मंदावायची. क्षण दोन क्षण रेंगाळून पुन्हा चालायला लागायचो. एकदा जरा जास्त रेंगाळलो, तेव्हा आतून एका मुलाने दोन इडल्या ठेवल्या हातावर आणि मी ओरडलो होतो, "मी भिकारी नाही." तिथून निघाल्यावर पुढचा रस्ता धूसर झाला होता. रात्री झोपेतसुध्दा खूप रडलो, असं सकाळी आई म्हणाली. खूप खोदून विचारल्यावर मी खरं काय ते सांगितलं आणि शाळेत गेलो. दुपारी घरी आल्यावर खिडकीतून डोकावलं तर आई-वडील रडत होते. मी थोडा वेळ बाहेर फिरून मग घरी गेलो. तोपर्यंत पाऊस ओसरला होता.
मुलांसाठी काही करता येत नाही म्हणून वडील खूप खंतावायचे. बोलायचे नाहीत, पण आतून खूप खूप तुटायचे. त्या मानानं आई धीराची. मला वडिलांची खूप काळजी वाटायची. हळवे होते. माळकरी, कुठलंही व्यसन नाही, मांसाहार नाही. ही कमी पुढे मी पुरी केली. वडिलांचा व्यवसाय चांगला चालत असताना आम्हाला खूप नातेवाईक होते.
सुटीच्या दिवशी रात्रीचं जेवण घरच्यांसोबत. दोन चपात्या आणि डाळ. हिरवी मिरची खायचो. मग खूप पाणी. पोट भरायचं. आजही तिखटाची सवय सुटलेली नाही. चपातीच्या वासाची सर जगातल्या कुठल्याही फुलाच्या सुवासाला नाही. सणावाराला शेजारच्या घरातून गोडाचा वास यायचा. खावंसं वाटायचं. आज गोडाचा तिटकारा आहे. माणसंसुध्दा गोड वागली की संशय येतो.
अगदी जेवणाच्या वेळी "कसं आहे?" अशी वांझोटी चौकशी करण्यासाठी मी कितीतरी वेळा मित्रांच्या घरी गेलेलो आहे.
माझी सगळयात गोड मैत्रीण भूक
काय नाही दिलं या मैत्रिणीनं?
त्या वयातला तो अप्रतिम प्रवास.
पावला पावलागणिक किती शिकवलं तिनं!
सारी शिकवण पोटातून.
माझ्या पौगंडावस्थेत माझ्यासोबत कायम झोपलेली ही एकमेव मैत्रीण. खरं तर मी शिणून झोपायचो. ती कायम जागी असायची. माझ्या जिवंतपणाची खूण म्हणून. माझी खात्री आहे, न कळत्या वयात ज्यांना म्हणून ही मैत्रीण लाभली, ती मंडळी खूप सुखावली असतील पुढील आयुष्यात.
खूपदा कुणीतरी खात असताना मी आवंढे गिळलेत. आपण खातोय ही कल्पनाच सुखद होती त्या वेळी. अभिनय म्हणजे काय सरतेशेवटी? कल्पनाच की! पुढे होऊ घातलेल्या नटाच्या ढुंगणावर परिस्थिती दुगाण्या झाडत होती.
गळयात दप्तर, पोटात भूक आणि पायात पेटके घेऊन वर्गात गेल्यावर खोडया काढणं हा एकमेव उपाय होता भूक विसरण्याचा. गुरुजींनी कायम ओणवा उभा केल्यामुळे फळयावरचे सुविचार मी उलटे वाचले. आजही या वयात कमरेचं दुखणं नाही. त्या गुरुजनांचा मी आभारी आहे, ज्यांनी मला पायाचे आंगठे धरायला शिकवले.
डोळयाजवळचा दुसरा अवयव कुठला? असा प्रश्न विचारला तर सामान्यत: नाक, तोंड, कान असं लोक म्हणतील. पण शालेय जीवनात माझ्या डोळयाजवळचा अवयव माझ्या पायाचे अंगठे होते. आजसुध्दा व्यायाम करताना पायाचे अंगठे पकडतो, पण त्या वेळची गंमत न्यारी होती.
माझ्या भुकेचे मला लाड नाही करता आले. सारखं काहीतरी मागायची खायला, पण मी तिला शेफारू दिलं नाही. खपाटीला गेलेल्या पोटात निपचित पडून असायची. नंतर नंतर तिला अर्धपोटी राहायची सवय झाली. गोडाधोडाकडे परक्यासारखं पाहायला लागली ती. आपले डोळेच बुजवून टाकले तिने.  त्याचा फायदा असा झाला की, मी वेतासारखा शिडशिडीत झालो. गालाची हाडं वर आल्यामुळे बालपणीच्या अब्राहम लिंकनसारखा लुक आला थोडासा. गळयाजवळचा कंठमणी टकमक टोकासारखा बाहेर आला. सारखं पाणी पिण्याची सवय लागली. त्यामुळे किडनीचे विकार दूर पळाले. पाणी पिताना कंठमणी गमतीदार हलायचा. डोळे खोल गेल्यामुळे चेहऱ्याला वेगळीच खुमारी आली.
भुकेचा एक मित्र होता. 'अपमान' त्याचं नाव.
हा आला की खबदाडात गेलेल्या डोळयांना पाझर फुटायचा.
त्यामुळे डोळे स्वच्छ. कुठलाही विकार नाही.
खूप दूरचं लख्ख दिसायला लागलं.
रोजच्या चालण्यामुळे आरोग्य उत्तम.
मित आहारामुळे पचनेंद्रियांना योग्य तो आराम.
या सगळयाचा परिणाम म्हणजे सतत कूस बदलणारी उत्तम झोप, त्यामुळे मेंदू सतर्क.
माझ्या या मैत्रिणीला मी कुठेही घेऊन गेलो की तिथे अपमान हमखास टपकायचा. सुरुवातीला घाबरलो त्याला. नंतर वारंवार भेटल्याने सवय झाली. त्यानं मला चिंतन करायला शिकवलं. बरं, हा सर्वव्यापी. कुठेही, कधीही आणि कसाही पाठीराखा असल्यासारखा. पुढे यायचा कमी झाला, पण त्या आधी खूप शिकवून गेला.
(भूक आणि अपमान यांची खूप गट्टी. सगळीकडे बरोबरीनं जाणार. खूप दिवस मुक्काम होता माझ्याकडे यांचा. एकदा का जुळवून घेतलं या जोडगोळीबरोबर, की योगसिध्दी प्राप्त झाल्याचा साक्षात्कार होतो.)
अपमान हा कुठल्याही प्रसंगाकडे त्रयस्थपणे पाहायला शिकवतो तुम्हाला. सकाळ-संध्याकाळ अपमान पाण्याबरोबर गिळल्यास भूक शमते. असा स्थितीत कुठल्याही अंमली पदार्थाचं सेवन न करता उत्तम ग्लानी येते. एका वेगळयाच विश्वाचा फेरफटका घडून येतो. अपमान गिळताना सुरुवातीला थोडा त्रास होतो, डोळयातून पाणी येतं. पण एकदा सवय झाली की मात्र गोंडस कोडगेपणा येतो. एकदा तो आला की अपमान पचवता येतो आणि अपमान पचायला लागला की एक प्रकारची मेणचट, लोचट तुकतुकी येते चेहऱ्यावर. दिवस सरले.
'अपमान आणि भूक' विद्यापीठातून उच्च शिक्षण प्राप्त करून बाहेर पडलो. जगातली कुठलीही गोष्ट आता मला भिवडवू शकत नव्हती. कितीही उंचावरून फेकलं तरी चार पायावर पडणाऱ्या मांजरासारखा झालो मी. एक बेधडक निर्लज्ज हसू उगवलं माझ्या चेहऱ्यावर. माजुर्डी रग आली हालचालीत. मूठ वळण्यासाठीच असते, याची जाणीव झाली. समोरच्यालासुध्दा आपल्याइतक्याच वेदना होतात, ही उमज आली.
प्रत्येकाच्या आतडयात भूकेची वसवट आहे, याचा साक्षात्कार झाला.
अपमानाला जात नसते, याचा उलगडा झाला.
उभं राहण्याआधी प्रत्येक जण रांगतो, हे उमगलं.
उत्कर्षाच्या अलीकडच्या पायऱ्या आहेत भूक आणि अपमान.
आता मी पलीकडच्या तिरावर पोचलोय.
ही गुरू मंडळी अलीकडच्या तिरावर.
आता दुसऱ्यांची शिकवणी चाललीय.
अजून पुढचा तीर असेल कदाचित.
आज इथं एकटाच बसलो असताना मी या माझ्या गुरूंकडे पाहत असतो. माझ्या वाटेला येत नाहीत आता. ओळख नसल्यासारखे वागतात. पण मी त्यांना विसरलो नाही.
- साप्ताहिक विवेकच्या गुरुपौर्णिमा अंकात प्रकाशित, नाना पाटेकर यांचा लेख 'दोन गुरू'. 

917. ती बघ किती छान

    सकाळी चहाचा घोट घेत गॅलरीत संतोष उभा होता, बाजूचा विंग मधील अवणीला कामाला जातांना पाहून आपली बायको सुरेखा ला म्हणाला," काही पण म्हण पण या अवनी वहिनी ना मानलं पाहिजे, सकाळी 8 च्या ठोक्याला मस्त तयार होऊन कामाला जातात, रोज नवीन ड्रेस तो पण कडक इस्त्रीतील.. कसं त्यांना पाहिलं की प्रसन्न वाटत, तुझाच वयाचा असतील ना त्या."
सुरेखा चा हातात झाडू होता ,घर आवरता आवरता ,ती हो म्हणाली ...संतोष ने कप तिथंच ठेवला ,आणि चला मला उशीर होतो म्हणत अंगोळीला गेला.
सुरेखाला कळलं होतं की संतोषला काय अपेक्षित आहे .दोन चार दिवस गेले ...संतोष ऑफिस ला निघाला ,डबा तयार आहे का ,सुरेखा धावतच डबा घेऊन आली , डबा बॅगेत ठेवत संतोष म्हणाला आज माझे ऑफस चे सिनिअर घरी येणार आहेत ... जरा नीट आवरून बस ...नाहीतर जेव्हा बघावं तेव्हा तो डोक्यावर केसांचा गुंडाळा केलेला आणि तो पीठ आणि तेलाचे हात पुसलेला गाऊन ....सतत थकलेला चेहरा ...आणि बोलण्यात जरा आत्मविश्वास पण येऊ द्या ..
सुरेखा पुन्हा हलक्या सुरात हो म्हणाली ...तस पाहता सुरेखा उच्चशिक्षित परंतु तिला बाहेर पडण्याची संधीच कधी मिळाली नाही घड्याळाचा काटा सरकायचा तो इतरांना वेळ देण्यासाठी ...घर,कुटुंब ,नवरा ,मुलं ,नातेसंबंध याना न्याय मिळावा म्हणून घरातील काम व जबाबदारी यातच गुंतलेली असायची ...स्वतःला ही वेळ द्यायचा असतो हे ती विसरलीच होती...हे ती आनंदाने करत होती पण ती त्या चार भिंतीत इतकी गुरफटली होती की बाहेर पडणं तिला शक्य वाटत न्हवत ...संतोष चे जस जसे प्रमोशन होत गेले तस तस इतर बाहेर पडणाऱ्या महिलांना पाहून आपली बायको ही अशीच व्हावी असं सतत त्याला वाटू लागलं ...त्या साठी तो तिला नवीन ड्रेस ,साड्या आणून ही देत होता ...पण कुठं जायचं नाही घरात तर रहायचं म्हणून ती त्या कपटातच ठेवत होती ....संतोष तिचा राहणीमान आणि तिच्या कमी आत्मविश्वास यावर सतत बोलू लागला ..ती ला ही कळत होतं पण करायचं काय हा प्रश्न होता.
एके दिवशी अवनी सुरेखाच्या घरी पूजेच अमंत्रण द्यायला आली ...सुरेखाने तिला चहा दिला ...सुरेखाच नीट नेटकं सजवलेलं घर बघून अवणीच्या मुखातून सहज निघालं ..wow काय घर ठेवलं आहे तू ,मस्तच ...आणि ही पेंटिंग किती सुंदर ,कुठून आणलीस ...सुरेखाम्हणाली मी बनवली आहे ती ...अवनी अरे वाह ,खूपच छान ...
सुरेखाने थोडं घाबरतच अवणीला विचारले ताई एक विचारू का ? तुम्ही रोज इतक्या टापटीप कशा राहता ..घरात कामाला बाई आहे का ? आणि मुलं ? अवनी म्हणाली मला एक मुलगी आहे आणि घरात कामाला बाई नाही ...आणि राहिला प्रश्न टापटीप राहण्याचा ..मला कामा निमित्त बाहेर पडावे लागते ,चार लोक भेटतात मग त्यांच्या समोर जायचं म्हणजे व्यवस्थित राहावच लागत.
    अवनी तितकं बोलून ,तिथून निघून गेली ...सुरेखा ने मात्र स्वतःच्या मनाशी काहीतरी ठरवलं ...तीन आज पटापट काम आवरले आणि घराला कुलूप लावून बाहेर गेले ..मुलं आणि नवरा गेला की ही रोज आता दुपारच्या वेळेला झोपण्या ऐवजी बाहेर पडत होती ..संतोष आणि मुलांना काही माहीत न पडू देता.
      महिना होत आला सुरेखाच्या वागणं ,बोलणं आणि राहणीमानात संतोष ला थोडा फरक जाणवू लागला होता ..ती बाहेर जाते हे कोणालाही माहीत न्हवत असेच तीन महिने गेले. एके दिवशी  संतोष च्या इमेल वर एक invitation आलं ... International award ceremony चे...नेहमी प्रमाणे त्याने मस्त तयारी केली आणि सुरेखाला म्हंटला आज थोडा उशीर होईल घरी यायला ,ऑफिस चे काम झाले की  एका बड्या कर्यक्रमाला जायचं आहे ..तुला घेऊन गेलो असतो पण तिथं खूप मोठं मोठी माणसं येणार आहेत आणि तुला त्यांच्या समोर बोलता नाही आलं तर.
सुरेखा ने नेहमी प्रमाणे फक्त हो मान हलवली .
संतोष कामाला गेला ..संध्याकाळी संतोष त्या कार्यक्रमच्या ठिकाणी पोहचला ,अवनी वहिनीला तिथं बघून ,अरे वाह वहिनी तुम्ही इथं ..अवनी हो आमच्या कंपनीनेच हे arrange केलं आहे ...कार्यक्रम सुरू झाला मोठं मोठ्या हस्ती उपस्थित होत्या ..एक एक पुरस्कार जाहीर होत होता आणि announcement झाली "First Prize winner is Surekha Santosh Pandit " 
संतोष क्षणासाठी अवाक झाला ..स्टेज वर एक सुंदर ,केस मोकळे सोडलेले , चालण्यातील आत्मविश्वास  असणारी ती स्त्री दुसरं तिसरं कोणी नसून त्याची बायको सुरेखा होती ...त्याला आनंद झाला आणि तो चकित ही झाला..त्या क्षणी  मिश्र भावना होत्या त्याच्या.
कार्यक्रम संपला दोघे घरी आले ..संतोष ने सुरेखा ला विचारलं madam surprise  छान होत पण हे कसं घडलं.
सुरेखा ने हातातील बांगड्या काढत सांगितलं की , तुम्ही नेहमी राहणीमान आणि आत्मविश्वास या बद्दल जे सांगण्याचा प्रयत्न करत होतात ते मला कळत होतं पण मग कसं करायचं यात मात्र माझा गोंधळ होत होता. त्या दिवशी अवनी ताई घरी आल्या नसत्या तर हे शक्य न्हवत , त्यांनी मला ही दिशा दाखवली. आपल्या आवडीच्या कामाला वेळ दयायला सांगितला. तुमच्या मागे मागील 3 महिने मी एका पेंटिंग च्या क्लास ला जात होती जमवलेले पैसे फी साठी वापरले.दुपारची झोप बंद केली..बाहेर पडावं लागत होतं म्हणून तुम्ही आणलेले ड्रेस ही वापरले जात होते ..चार लोक तिथं भेटत होते म्हणून  नवनवीन माहिती व स्वतःतील आत्मविश्वास वाढत होता ..
त्यातच माझी कला पाहून अवणीने तिच्या कंपनी द्वारे या intrnational penting cometition मध्ये माझा सहभाग नोंदवला ..या बक्षिसा साठी मी अवणीची आभारी आहे .thanks to  अवनी.
अग पण मला का नाही सांगितलं तू हे , संतोष म्हणाला.
सांगितलं असत तर असं surprise मिळालं असतं का ???
अहो, अवणीचे ते शब्द अजून ही माझ्या लक्षात आहेत.," घराकडे लक्ष दिलं तर स्वतःकडे दुर्लक्ष होतं ,आणि स्वतः कडे लक्ष दिलं तर घरा कडे दुर्लक्ष " पण दोघांच्या कडे लक्ष द्यायच असेल तर आपल्या आवडीच्या कामासाठी स्वतःला वेळ दे म्हणजे बघ कसं जमत ते सर्व ." आणि खरंच ते शक्य झालं.
तेव्हा मैत्रिणींनो, सुरेखा सारख्या अनेक महिला आहेत ज्यांनी आज ही स्वतःला अडकवून ठेवलं आहे. कोणी बोलतंय म्हणून नाही की कोणाला दाखवायला नाही तर स्वतःला सिद्ध करा व स्वतःचा  आत्मविश्वास वाढायला थोडं तरी या चार भिंतींच्या चौकटीतून बाहेर पडा.

©आरसा मनाचा 
समुपदेशक
सौ.अर्चना दि.पाटिल
पुणे

916. ती सोनेरी मुलगी, खीर, आणि डॉक्टर.

   गोऱ्यापान, सोनेरी केसांच्या त्या चौदा-पंधरा वर्षांच्या सुंदर मुलीचं सगळं शरीर एखाद्या लाकडाच्या ओंडक्यासारखं कडक झालेलं होतं. हात पाय वाकडे तिकडे होऊन एकाच पोझिशन मध्ये जणू घट्ट रुतून बसले होते. पाठ देखील वाकडी झाल्याने तिला सरळ स्ट्रेचर वर झोपता येत नव्हतं. थोडाही बोलण्याचा, हलण्याचा प्रयत्न केला, तर अख्ख्या शरीराला झटके येत होते. तिला नीट रडता देखील येत नव्हतं, पण वेदनेमुळे सतत डोळ्यातून पाणी झरत  होतं, त्यामुळे तिची उशी ओली झालेली होती. तिच्या आई-वडिलांनी तिचं स्ट्रेचर ढकलत आणलं होतं. कालच ते इराकमधून तडक मुंबईमध्ये पोहोचले होते, तिथून तिला कारनं  पुण्याला आणलं होतं. वडील अशिक्षित कामगार, पण आई मात्र बगदाद विद्यापीठामधून सायन्सची ग्रॅज्युएट. स्वतःच्या मुलीची अशी अवस्था पाहतांना आतून खचून गेलेल्या त्या माउलीनं त्यांच्या बरोबर आलेल्या तबरेझ नावाच्या भाषांतर करणाऱ्या एका इराकी विद्यार्थ्यांच्या मदतीनं मला तिच्या या "खजान" नावाच्या मुलीची कहाणी सांगितली.
पाच-एक महिन्यांपूर्वी शाळेच्या वार्षिक कार्यक्रमामध्ये नाच सादर करत असतांना खजान लंगडत असल्याचं तिच्या एका शिक्षिकेनं पाहिलं, आणि तिच्या आईला कळवलं. इराक मधल्या एका न्यूरॉलॉजिस्टनं तिची तपासणी केली, त्यात त्याला तिच्या डोळ्यात तपकिरी रंगाच्या "रिंग" दिसल्या. खजान ला विल्सन डिसीज नावाचा अतिशय दुर्मिळ पण गंभीर आजार असल्याचं अचूक निदान त्यानं केलं.
यकृतामधल्या (लिव्हर) दोषामुळे शरीरात  कॉपर (तांबे) हा धातू साचत जातो. काही दिवसांत कॉपर ची रक्तामधली पातळी इतकी जास्त होते, कि त्याचे विषारी परिणाम सगळ्याच अवयवांवर व्हायला लागतात. पण सगळ्यात आधी लिव्हर आणि मेंदूचं अतोनात नुकसान होतं. ताबडतोब इलाज केला नाही, तर पेशंट काही आठवड्यांतच विकलांग होतो, आणि काही महिन्यांत सारा खेळ संपतो. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे याची जी मुख्य दोन औषधं आहेत, त्या दोन्हींमुळे सुरुवातीच्या काळात पेशंटचा आजार वाढतो, कारण रक्तातील कॉपरची पातळी आधी वाढते मग कमी व्हायला लागते. त्यातलंही एक औषध अतिशय महाग. 
     खजानला पाहिलं औषध सुरु केलं गेलं, पण दुर्दैवाने तिला त्याचे इतके साईड इफेक्ट झाले कि, तिच्या सगळ्या नसा खराब होऊन ती अगदी पलंगालाच खिळली. पॅरालीसीसचाच प्रकार होता हा. बोलणं कमी झालं, शब्दोच्चार समजेनासे झाले. मग डॉक्टरांनी दुसरं औषध सुरु करायचं ठरवलं. ते अमेरिकेतून इम्पोर्ट करायचं होतं. खजानच्या आई-वडिलांनी त्यांचं घर, जमीन आणि एक छोटंसं दुकान होतं ते सगळं विकून टाकलं. एका छोट्याशा घरात ते भाड्यानं राहू लागले. काही दिवसांतच नवीन औषध त्यांच्या हातात आलं, आणि खजानला ते देण्यात आलं. पण एखाद्या दुःस्वप्नासारखं घडलं, खजानची अवस्था आणखीनच बिघडली. बोलणं, खाणं-पिणं सगळंच बंद पडलं. आता ती वाचणार नाही, फक्त लिव्हर ट्रान्सप्लांटेशन (यकृत प्रत्यारोपण) केलं, तरच तिचा जीव वाचण्याची काही शक्यता आहे, पण त्यानंतर ही ती चालू-बोलू शकेल याची खात्री नाही असं त्यांना डॉक्टरांनी सांगितलं. त्यांनी मग अनेक धार्मिक आणि इतर संस्थांकडे कर्ज आणि मदत मागितली, नातेवाईकांकडून पैसे उसने घेतले, आणि ते तडक भारतात आले.
"भारतातले डॉक्टर आणि इलाज सगळ्या जगात सगळ्यात चांगले असल्याचं आम्हाला अनेकांनी सांगितलं होतं. अगदी अमेरिकेतूनही भारतात पेशंट इलाज करायला येतात असंही आमच्या डॉक्टरांनी सांगितलं. सगळेच इलाज, ऑपरेशन भारतात निम्म्यापेक्षाही कमी खर्चात,  जगात सर्वात स्वस्त होतात, असं कळल्यामुळे आम्ही भारतात येण्याचा निर्णय घेतला" खजानची आई मला सांगत होती. खरंच आहे हे! विकसित देशांमध्ये वैद्यकीय खर्च तर आवाक्याबाहेरचा आहेच, पण अगदी स्पेशालिस्ट डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळायला महिने महिने लागतात, ऑपेरेशनसासाठी अनेक महिने वाट पाहावी लागते. Urgent केस असेल तर भेटेल त्याच्या हाती निमूट ऑपरेशन करून घ्यावं लागतं. यामुळेच भारतात गेली पंधरा एक वर्षं अख्ख्या जगातून पेशंट इलाजाकरिता येतात. मला एकदा माझ्या लहानपणी एका काकांनी रोजसारखी ताटात प्रसादाची खीर वाढली. मी काही ती संपवली नाही. माझी मावशी आश्चर्यानं म्हणाली "अरे खीर कशी काय टाकून देतोस?" काका ताबडतोब म्हणाले "कारण याला  रोज विनासायास मिळते ना? ज्याला खीर बघायलाही मिळत नाही अशा एखाद्याला दे, त्याला नक्की आवडेल". भारतातल्या वैद्यक व्यवसायाचीच ही गोष्ट आहे जणू. खजानची आम्ही परत कसून तपासणी केली. शरीरावर जणू मांसच  राहिलं नव्हतं. रक्तही कमी. मी खजानच्या आई-वडिलांना तिची गंभीर परिस्थिती समजावून सांगितली. तिसरं, स्वस्त एक औषध चालू करून वाट पाहावं लागेल, बराच वेळ लागू शकतो हेही सांगितलं. कुठल्याही गोष्टीची मी "गॅरंटी" देऊ शकत नसल्याचंही स्पष्ट सांगितलं.  तिची आई म्हणाली "डॉक्टर, आम्हाला तिचं ऑपरेशन नकोय. बाकी तुमची मुलगी आहे असं समजून जे तुम्हाला योग्य वाटतं ते तुम्ही करा. ती बरी व्हावी म्हणून आमचा जीव तीळतीळ तुटतो, पण सगळं काही तुमच्या हातात नसतं, हे आम्हाला समजतंय. आम्ही डोळे बंद करून तुमच्यावर विश्वास ठेवतोय, पुढे जे होईल ते आमचं नशीब!"
आता मात्र केसची सगळी जबादारी माझ्यावर अली होती. नातेवाईकांनी, पेशंट्सनी पूर्ण विश्वास ठेवला, वाईटाचा दोष, संशय डॉक्टरवर नाही असं सांगितल्यावर डॉक्टर पूर्ण मनमोकळेपणाने निर्णय घेऊ शकतात. कायद्याची भाषा, संशय, धमक्या असे सुरु झाले, कि सगळेच डॉक्टर "बॅकफूट" वर इलाज करतात. आम्ही तिचे इलाज सुरु केले. खरंतर खजानच्या आईला या आजाराविषयी अनेक डॉक्टरांपेक्षा जास्त माहिती होती, पण तिनं कधीही उद्धटपणे प्रश्न विचारले नाहीत, कि आमच्या निर्णयांना आक्षेप घेतले नाहीत. जेवढी अवघड केस, तेवढा तो डॉक्टर जास्त अनुभवी बनतो. माझ्या विद्यार्थ्यांनी, इतर सहकाऱ्यांनी खूप मदत केली. खजानला घरच्यासारखी वागणूक दिली. प्रेमानं, सहानुभूतीनं दिलेली औषधं जरा जास्तच चांगला इफेक्ट करतात! त्यात जर पेशंटचा डॉक्टरवर पूर्ण भरवसा असेल, तर फारच उत्तम. मृत्यूच्या दाट, भीतीदायक छायेतून  खजान हळूहळू बाहेर पडली. जगण्याची आशा, परत  उभं राहण्याची जिद्द  तिच्या चेहऱ्यावर दिसू लागले. काही दिवसांनी ती घोट घोट पाणी प्यायला लागली, उठून उभं राहायला लागली. अजून नीट खाता, बोलता येत नव्हतं. कडकपणा हळूहळू कमी होत होता. व्हिसाची मुदत संपल्यानं त्यांना इराकला परतावं लागलं. पण तिथूनही विडिओ कॉल करून तिच्या पालकांनी तिचे इलाज चालू ठेवले. त्यानंतर दोनदा खजान आईवडिलांसोबत भारतात येऊन गेली. त्यांच्या शेवटच्या भेटीनंतर काही महिन्यांतच मला एक हातानं लिहिलेलं पत्र मिळालं. खजाननं स्वतः इंग्लिश मध्ये लिहिलं होतं: "मी आता कॉलेज मध्ये प्रवेश घेतलाय. तुमच्यासारखं डॉक्टर व्हायचंय मला"
तिच्या आईनं खाली अरबीत लिहिलं होतं: "डॉक्टर, तुम्ही माझ्या आयुष्यात उजेड परत आणला. माझी सोन्यासारखी मुलगी मला परत मिळवून दिलीत. तुमच्यासाठी आम्ही सगळे रोज अल्लाहकडे दुआ मागतो". मला माझा देव पावला होता.  आता गेली तीन वर्षं खजान एकदम छान  आहे. तिला लिहिलेल्या उत्तरात मी आवर्जून लिहिलं: " तुझ्या जगण्याचं सगळं श्रेय केवळ तुझा आईच्या जिद्दिलाच आहे".
     जादू, दैवी, अद्भुत म्हणता येतील अशा घटना भारतात वैद्यक शास्त्रात रोजच शेकडो वेळा घडतात. मरणाच्या दाढेतले लहानमोठ्या वयाचे रुग्ण केवळ आपल्या डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे, बुद्धिमतेमुळे उठून चालायला लागतात, हसत घरी जातात. हे रोजच, भारतातल्या प्रत्येक खेड्यात, शहरात, प्रत्येकच दवाखान्यात घडत असतं. अगदी सरकारी दवाखान्यात देखील! पण यातील काही थोड्या वाईट घटनाच सगळ्यांना दाखविल्या जातात, त्यांचीच सतत  चर्चा होते. चोवीस तास, वर्षभर राबणाऱ्या डॉक्टरांनी वाचवलेले लाखो जीव कुणालाच दिसत नाहीत. आजची खजानची ही कहाणी भारतातल्या अशाच शेकडो अनामिक मृत्युंजय डॉक्टरांना अर्पण.

डॉ. राजस देशपांडे, न्यूरॉलॉजिस्ट पुणे.
ता. क. : विल्सन्स डिसीज वर भारतात अनेक उत्तम तज्ज्ञ आहेत, आणि हा आजार पूर्ण बरा होऊ शकतो.

915. ॐ नमःशिवाय

   भारतीय संस्कृती सर्वांप्रति कृतज्ञता व्यक्‍त करण्यास शिकवते. त्या अनुषंगाने सूर्यदेवतेप्रति कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठी रथसप्‍तमी हा सण साजरा केला जातो. हिंदु धर्म आणि भारतीय संस्कृती यांमध्ये उच्च देवतांची उपासना आणि त्यांचे विविध सण अन् उत्सव आहेत. त्याचप्रमाणे त्यांत कनिष्ठ देवतांचीही उपासना आहे. सूर्य, चंद्र, अग्नि, पवन, वरुण आणि इंद्र या प्रमुख कनिष्ठ देवता आहेत. मानवाच्या जीवनात तसेच सर्वच प्राणिमात्रांच्या जीवनात या कनिष्ठ देवतांना महत्त्वाचे स्थान आहे. माघ मासातील (महिन्यातील) शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते. या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो. या रथाला सात घोडे असतात; म्हणून रथसप्तमी असा शब्द वापरला जातो. ज्या सूर्यामुळे अंधार नाहीसा होतो आणि चराचराला नवे तेज, नवे जीवन लाभते, त्या भास्कराची ही पूजा आहे. ही प्रकाशाची, सूर्यदेवतेची पूजा आहे. रथसप्तमी हा स्त्रिया संक्रांतीनिमित्त करत असलेल्या हळदी-कुंकवाचा शेवटचा दिवस मानला जातो. 

रथसप्‍तमी ,रथसप्तमी चे महत्त्व,  
    सर्व संख्यांमध्ये `सात’ या अंकाचे महत्त्व विशेष आहे. `सात’ या आकड्यात त्रिगुणांचे समतोल प्रमाण असण्याबरोबर सत्त्वगुणाच्या वृद्धीसाठी आवश्यक चैतन्य, आनंद इत्यादि सूक्ष्म-लहरी ग्रहण करण्याची विशेष क्षमता असते. सप्‍तमी या तिथीला शक्‍ति अन् चैतन्य यांचा सुरेख संगम झालेला असतो. या दिवशी विशिष्ट देवतेचे तत्त्व आणि शक्‍ति, आनंद आणि शांति यांच्या लहरी २० टक्के जास्त प्रमाणात कार्यरत असतात. रथसप्‍तमीच्या दिवशी निर्गुण सूर्याच्या (अतिसूक्ष्म सूर्यतत्त्वाच्या) लहरी इतर दिवसांच्या तुलनेत ३० टक्के जास्त प्रमाणात कार्यरत असतात.

रथसप्तमी हा सूर्यदेवाचा जन्मदिन !
‘माघ शुक्ल पक्ष सप्तमीला रथसप्तमी असे म्हणतात. महर्षि कश्यप आणि देवमाता अदिती यांच्या पोटी सूर्यदेवाचा जन्म झाला, तो हा दिवस. भगवान श्रीविष्णूचे एक रूप म्हणजेच श्री सूर्यनारायण होत. संपूर्ण विश्‍वाला आपल्या महातेजस्वी स्वरूपाने प्रकाशमय करणार्‍या सूर्यदेवांमुळे पृथ्वीवर जीवन अस्तित्वात आहे. सूर्याचे उत्तरायणात मार्गक्रमण होत असल्याचे सूचक असलेला रथसप्तमीचा सण. रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायणात मार्गक्रमण करत असल्याचे सूचक आहे. उत्तरायण म्हणजे उत्तर दिशेकडून मार्गक्रमण करणे. उत्तरायणात सूर्य उत्तर दिशेकडे कललेला असतो. ‘श्री सूर्यनारायण आपला रथ उत्तर गोलार्धात वळवत आहेत’, अशा स्थितीत रथसप्तमी दर्शवली जाते. रथसप्तमी हा सण शेतकर्‍यांसाठी सुगीचे दिवस आल्याचा आणि दक्षिण भारतात हळूहळू वाढणार्‍या तापमानाचा दर्शक असतो, तसेच वसंत ऋतू समीप आल्याचा सूचक असतो. कठीण दिवसांसाठी सिद्धता करण्याची आठवण करून देणारा सण. रथसप्तमीच्या दिवशी अंगणातील तुळशीकडे एका मातीच्या चुलीवर मातीच्या भांड्यात खीर शिजवली जाते आणि ती उतू जाईपर्यंत शिजवतात. त्यात ती खीर जळतेही. अशी चुलीवर जळलेली खीर प्रसादरूपात खायचा आनंद काही वेगळाच असतो. वर्षाचे सर्व दिवस काही सारखेच आनंद देणारे असत नाहीत. काही दिवस जळके अन्न खाऊनही काढावे लागले, तर त्याची सिद्धता हवी. याची आठवण करून देणारा हा सण. 

सूर्योपासनेचे महत्त्व आणि इतर माहिती
सूर्याच्या उपासनेने जिवाला स्वत:मधील सूक्ष्म-तेजतत्त्व वाढवण्याची संधी असते. यासाठी जिवाने तेजतत्त्वाच्या `ॐ’ काराची उपासना करणे उपयुक्‍त ठरते. त्याचप्रमाणे गायत्रीमंत्र आणि सूर्याचे विविध मंत्र यांचे पुरश्चरण करणे फलदायी ठरते. सूर्योपासनेने जिवाच्या मनाची एकाग्रता वाढते. नेत्र हे तेजतत्त्वाशी निगडीत असल्याने सूर्योपासनेने (तेजतत्त्वाच्या उपासनेमुळे ) जिवाला दिव्यदृष्टि प्राप्‍त होते.

१. सूर्योपासनेचे महत्त्व
भारतीय संस्कृती आणि हिंदु धर्म यांत सूर्याच्या उपासनेला खूप महत्त्व आहे. सूर्याला प्रतिदिन पहाटे अर्घ्य दिल्याने अंधःकार नष्ट करून जग प्रकाशमय करण्यासाठीचे बळ सूर्याला प्राप्त होते. (उपासनेमुळे मूर्ती जागृत होते, तसे हे आहे.) 
अ. सूर्योपासनेमुळे जिवाची चंद्रनाडी बंद होऊन सूर्यनाडी लवकर जागृत होण्यास मदत होते. चंद्राच्या उपासनेपेक्षा सूर्याची उपासना करणे अधिक श्रेष्ठ असते.
आ. सूर्याच्या उपासनेने सात्त्विकता ग्रहण करण्याची क्षमता ३० टक्क्यांनी आणि चैतन्य ग्रहण करण्याची क्षमता २० टक्क्यांनी वाढते.
इ. सकाळी सूर्याला अर्घ्य देऊन त्याचे केवळ दर्शन घेतले, तरीही तो प्रसन्न होतो. त्याचे दर्शन घेणे, हा त्याच्या उपासनेतील एक भागच आहे.
ई. उगवत्या सूर्याकडे पाहून त्राटक केल्याने डोळ्यांची क्षमता वाढते आणि नेत्रज्योत अधिक प्रबळ होते.
उ. पंचतत्त्वांच्या उपासनेत सूर्योपासना करणे (तेजतत्त्वाची उपासना करणे), हा महत्त्वाचा टप्पा आहे.
ऊ. योगासनांपैकी सूर्यनमस्कार घालणे हा महत्त्वाचा व्यायामप्रकार आहे. यात सूर्याला स्थूल शरीराचा वापर करून नमस्कार करायचा असतो. किमान २० वर्षे रोज नित्याने सूर्यनमस्कार घातल्यावर सूर्यदेवता प्रसन्न होते. सूर्यनमस्कारामुळे शरिरातील अनिष्ट शक्तींची स्थाने नष्ट होण्यास पुष्कळ साहाय्य हाते.

२. सूर्याचा रथ आणि त्याचे पूजन
सूर्याच्या रथात सूर्यलोक, नक्षत्रलोक, ग्रहलोक, भुवलोक, नागलोक, स्वर्गलोक आणि स्वर्गलोकाजवळील शिवलोक या सप्‍त लोकांमध्ये भ्रमण करण्याचे सामर्थ्य आहे. रथाची गति आवश्यकतेप्रमाणे बदलते. सूर्यदेवतेच्या इच्छेप्रमाणे रथ वायुमंडलात उड्डाण करतो. रथाच्या सोन्याच्या चाकांवर संपूर्ण सूर्याचे चित्र नाजूकपणे कोरले आहे. त्या चित्रातून सूर्याचे तेज आणि तेजतत्त्व हे आजूबाजूला ३० टक्के प्रक्षेपित होत असते. श्रीविष्णूच्या कृपाशीर्वादामुळे अन् तेजतत्त्वाच्या प्रक्षेपणामुळे रथाभोवती संरक्षककवच निर्माण झालेले असते. त्यामुळे सूर्यदेवतेच्या कार्यात वाईट शक्‍ती अडथळा आणू शकत नाहीत. सूर्यदेवता सतत या रथात विराजमान असते. रथ हे तिचे वाहनच आहे. देव देवळात असल्यामुळे देवळाला महत्त्व प्राप्‍त होते. तसेच महत्त्व सूर्याच्या रथाला आहे. त्यामुळे `रथसप्‍तमी’ला सूर्याच्या उपासनेबरोबरच प्रतिकात्मक रथाचेही पूजन केले जाते. रांगोळीने किंवा चंदनाने पाटावर सात घोड्यांचा सूर्यनारायणाचा रथ, अरुण सारथी आणि रथात सूर्यनारायण काढतात. सूर्यनारायणाची पूजा करतात. अंगणात गोवर्‍या पेटवून त्यांवर एका बोळक्यात दूध उतू जाईपर्यंत तापवतात; म्हणजे अग्नीला समर्पण होईपर्यंत ठेवतात. त्यानंतर उर्वरित दुधाचा सर्वांना प्रसाद देतात.
३. सूर्याच्या सारथ्याचे गुण
अरुण हा सूर्याचा सारथी आहे. त्याच्यात सूर्याचे ४० टक्के गुण अहेत. तो केवळ एकाच डोळयाने पाहू शकतो. `एकत्वाकडे जाणे आणि आहे त्या परिस्थितीत चांगल्या प्रकारे सेवा करणे’, हे गुण त्याच्याकडून शिकायला मिळतात.
४. सूर्यलोक
स्वर्गलोकाच्या बाजूला सूक्ष्म-सूर्यलोक आहे. सूक्ष्म-सूर्यलोकात पंचमहाभूतांपैकी सूक्ष्म-तेजतत्त्वाचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा जास्त असते. दिव्य प्रकाश, अग्नि आणि अग्नीच्या ज्वाळा दिसणे आणि उष्णता जाणवणे हे तेजाचे स्थूलरूप आहे. त्यांची अनुभूति सूर्यलोकात येते. अनेक जिवांची पातळी ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याने त्यांना सूर्यलोकात जाता येत नाही. पातळी ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्यास तेजतत्त्वाची उपासना करता येत नाही. पर्यायाने तेजतत्त्वाचे स्थूलरूप, म्हणजे दिव्य प्रकाश, अग्नि आणि उष्णता सहन होत नाही. सूर्यलोकात स्थान मिळण्यासाठी सूर्यदेवतेचे गुण ५० टक्क्यांपेक्षा अधिक आणि जिवाची पातळी किमान ५० टक्के असणे अपेक्षित आहे.
सूर्याचे गुण
१. नित्योपासना : सूर्याची ऋषींप्रमाणे सतत नारायणाची उपासना सुरू असते.
२. शिस्त : सूर्य वेळेचे पालन काटेकोरपणे करतो.
3. त्याग : सूर्य स्वत:च्या जवळील तेज, ऊर्जा आणि चैतन्य स्वत:पुरते मर्यादित न ठेवता इतरांना देतो. इतर कनिष्ठ देवतांच्या तुलनेत सूर्याची चैतन्य ग्रहण आणि प्रक्षेपण करण्याची क्षमता सर्वाधिक असते.
४. समष्टिभाव : सूर्य हा त्याच्याकडील तेज आणि ऊर्जा त्याच्या लोकापुरती मर्यादित न ठेवता विविध लोकांतील जिवांनाही प्रक्षेपित करतो. त्यासाठी तो सतत भ्रमण करीत असतो. समष्टि भाव जास्त असल्यामुळे त्याच्यात उच्च देवतांचे २० टक्के गुण आहेत.
५. ज्ञानदान आणि सूक्ष्मातून मार्गदर्शन करणे : ज्ञान म्हणजे प्रकाश होय. प्रकाश हे ज्ञानाचे एक रूप आहे. सूर्य ज्ञानासंदर्भातही कार्य करतो. त्यामुळे त्याच्याकडून सूक्ष्म अशा ज्ञानलहरी आणि ज्ञानप्रकाशलहरी प्रक्षेपित होत असतात. या ज्ञानलहरींच्या माध्यमातून तो ३० टक्के इतके ज्ञान देऊ शकतो. कर्णाला सूर्यदेवता रोज दर्शन देत असे आणि सूक्ष्मातून मार्गदर्शन करत असे. याचा महाभारतात अनेक ठिकाणी उल्लेख आढळतो.
६. उत्तम गुरु : सूर्य शास्त्र आणि शस्त्रकला या दोन्हींमध्येही निपुण आहे. या दोन्ही कला अवगत करण्यासाठी रुद्रावतार मारुति सूर्यलोकात गेला होता. तेव्हा त्याला सूर्याने `गुरु’ म्हणून उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले. तो इतरांना ज्ञानप्रकाश देऊन त्यांच्या जीवनातील स्थूल आणि सूक्ष्म अहंकाररूपी तिमिर नष्ट करतो.
७. उत्तम पिता : सूर्याने त्याचे पुत्र आणि पुत्री यांच्यासाठी आवश्यक ती सर्व कर्तव्ये वेळोवेळी पूर्ण केली. ब्रह्मांडातील सर्व जिवांप्रति तो पित्याच्या दृष्टीनेच पहातो आणि त्यांना मदत करतो.
८. व्यापकत्व : ब्रह्मांडातील विविध जिवांना सूर्य निरपेक्षपणे तेज, ऊर्जा आणि चैतन्य देत असतो.
९. समभाव : सूर्य सर्वच जिवांकडे समदृष्टीने पहातो. तो गुणग्राहक आहे. त्यामुळे तो कोणावरही अन्याय करत नाही. याचे उदाहरण म्हणजे मारुतीमध्ये शनीच्या तुलनेत शिष्याचे गुण जास्त प्रमाणात असल्यामुळे सूर्याने त्याला शिष्य म्हणून स्वीकारले आणि ज्ञान आणि विविध विद्या दिल्या.
१०. क्षात्रभाव : इंद्र हा सर्व कनिष्ठ देवतांचा प्रमुख आहे. सूर्यदेवता इंद्राच्या अधिपत्याखाली असली, तरीही इंद्राने अयोग्य निर्णय दिल्यावर ती त्याला विरोध करते आणि इंद्राच्या अयोग्य आज्ञेचे पालन करत नाही. पुढे येणार्‍या वाईट काळात (धर्मयुद्धाच्या वेळी) कनिष्ठ देवतांपैकी सूर्यदेवता ही क्षात्रवीर आणि धर्मवीर साधकांना आणि धर्माच्या बाजूने लढणार्‍यांना सर्वाधिक प्रमाणात मदत करील. कनिष्ठ देवतांपैकी सूर्यदेवतेमध्ये सर्वाधिक सात्त्विकता, व्यापकत्व, त्याग, समष्टि भाव आणि क्षात्रभाव असतो.  प्रभु श्रीराम सूर्यवंशी असल्याने रामराज्याची स्थापना करू शकणे
सूर्याच्या गुणांमुळे त्याच्या राज्यात (लोकात) पितृशाही असते. सूर्योपासकात वरील गुण असले, तरच त्याला सूक्ष्म-सूर्यलोकात स्थान मिळते. सूर्याची उपासना करणार्‍यांना आणि सूर्याचे गुण अंगी असणार्‍यांना `सूर्यवंशी’, असे संबोधले जाते. प्रभु श्रीराम हा सूर्यवंशी होता. त्यामुळे तो आदर्श पिता आणि आदर्श पुत्र होण्याबरोबरच रामराज्याची (पितृशाहीची) स्थापना करू शकला. ‘भारत’ हे सूर्याचे एक नाव असणे. सूर्य हा देवता, ऋषीमुनी आणि मानव या सर्वांनाच पूजनीय आहे. हिंदु धर्मात सूर्याला विशेष महत्त्व आहे. भारतीय पंचांगातही चंद्रापेक्षा सूर्याला जास्त महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. ‘भारत’ हेदेखील सूर्याचेच एक नाव आहे. ‘स’ हे सूर्याचे, म्हणजेच तेजाचे बीजाक्षर आहे. 

सूर्याच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय यांच्या संदर्भातील माहिती
स्थूल सूक्ष्म
१. उत्पत्तीच्या संदर्भातील माहिती सूर्यदेवतेपासून यम आणि शनि या देवता पुत्ररूपाने, तर तपी अन् यमी या देवी पुत्रीच्या रूपाने निर्माण झाल्या. यमीपासून यमुना नदीची निर्मिति झाली, तर तपीपासून तापी नदीची निर्मिति झाली. अ. सूर्यमंडलातील ग्रह अन् नक्षत्रलोक, शनिलोक आणि ग्रहलोक या सर्व उपलोकांची निर्मिति सूर्यापासूनच झाली आहे.
आ. तेज, तेजयुक्‍त चैतन्य आणि केवळ पहिल्या स्तराच्या चैतन्यापैकी ३० टक्के चैतन्य हे सूर्यापासून निर्माण झाले आहे.
इ. सुदर्शनचक्र, सूर्यास्त्र, तेजतत्त्वाशी संबंधित बाण आणि अस्त्रे यांची निर्मिति सूक्ष्म-सूर्यापासून झाली आहे.
ई. सूर्याने त्याचे तेज देवतांची विविध शस्त्रे आणि अस्त्रे यांना प्रदान केले आहे. त्यामुळे ही शस्त्रास्त्रे दिव्य अन् तेजस्वी दिसतात.
२. स्थितीच्या संदर्भातील माहिती सूर्यदेवता दररोज स्थूलातील सूर्याच्या रूपाने येऊन ब्रह्मांडातील विविध ग्रहांना आणि जिवांना ऊर्जा आणि प्रकाश देते. अशा प्रकारे सूर्यदेवता त्यांचे संगोपनच करते.
3. सूर्यदेवतेकडून स्थूलातून प्रक्षेपित होणारा प्रकाश आणि ऊर्जा यांच्याबरोबरच मोठ्या प्रमाणात चैतन्यही प्रक्षेपित होत असते. त्या चैतन्यामुळे अनेक जिवांना साधना करण्यासाठी शक्‍ति मिळते. तसेच त्यांचे मन आणि बुद्धि यांवरील आवरण कमी होऊन त्यांची बुद्धिमत्ता प्रगल्भ होते.
४. लयाच्या संदर्भातील माहिती सूर्याच्या उष्णतेने सरोवरे आणि नद्या यांतील पाण्याचे बाष्पात रूपांतर होते. त्यामुळे अनेक वेळा नद्या आणि सरोवरे सुकून जातात. अति उष्णतेमुळे अनेक वनस्पती जळून जातात, तसेच जिवांनाही त्रास होतो अन् काही जण मृत्यूमुखी पडतात. सूर्याचा प्रकाश आणि उष्णता यांमधून सूर्याचे सूक्ष्म-तेज प्रक्षेपित होत असते. या सूक्ष्म-तेजामुळे सूक्ष्मजंतू आणि रज-तमात्मक सूक्ष्म-जिवांचा नाश होतो. त्यामुळे वायुमंडलातील रज-तमाचे प्रमाण कमी होऊन सात्त्विकता वाढते अन् त्रिगुणांचा समतोल राखला जातो. सूर्य उगवल्यानंतर तो दिवसभर आकाशात असतो आणि सायंकाळी त्याचा अस्त होतो. सूर्याचे हे उत्त्पत्ति, स्थिति आणि लय यांचे कार्य अनुक्रमे सुरू असते. शरीरबळ, मनोबळ आणि आत्मबळ वाढवणारे सूर्यनमस्कार. रथसप्तमी या सणामध्ये सूर्यदेवाची पूजा सांगितली आहे. आरोग्यं भास्करात् इच्छेत् । म्हणजे सूर्याकडून आरोग्याची कामना करावी, असे शास्त्रवचन आहे. सूर्याचे तेज आपल्या अंगी यावे म्हणून सूर्योपासना. समर्थ रामदासस्वामींनी सांगितलेले साष्टांग सूर्यनमस्कार जर नियमितपणे मुलांनी घातले, तर काय बिशाद आहे गुंडांची आक्रमण करण्याची. शरीरबळ आणि मनोबळ वाढवण्याचे सामर्थ्य या नमस्कारांत आहे. जर हे समंत्र घातले गेले, तर आत्मबळसुद्धा वाढते.

जीवनाचा मूळ स्रोत असलेला सूर्य 
सूर्य हा जीवनाचा मूळ स्रोत आहे. सूर्यकिरणांतून शरिराला आवश्यक असलेले ‘ड’ जीवनसत्त्व मिळते. काळाचे मोजमाप सूर्यावरच अवलंबून आहे. सूर्य हा ग्रहांचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहांमध्ये आहे. तो स्थिर असून अन्य सर्व ग्रह त्याच्याभोवती प्रदक्षिणा घालतात. सूर्य स्वयंप्रकाशी असून अन्य ग्रह त्याचा प्रकाश घेतात. 

ज्योतिषशास्त्रदृष्ट्या रवीचे (म्हणजे सूर्याचे) महत्त्व 
ज्योतिषशास्त्रदृष्ट्या रवि (म्हणजे सूर्य) हा आत्माकारक आहे. ‘मानवी शरिरातील प्राण, आत्मिक बळ आणि चैतन्यशक्ती यांचा बोध रवीवरून होतो’, असा त्याचा अर्थ आहे. व्यक्तीच्या जन्मकुंडलीतील रवि जितका बलवान, तितकी त्या व्यक्तीची जीवनशक्ती आणि रोग प्रतिकारक शक्ती उत्तम असते. राजा, प्रमुख, सत्ता, अधिकार, कठोरता, तत्त्वनिष्ठता, कर्तृत्व, सन्मान, कीर्ती, आरोग्य, वैद्यकशास्त्र इत्यादींचा कारक रवि आहे. सूर्यदेवांच्या रथाला असणारे सप्त अश्‍व सप्ताहातील सात वार दर्शवतात. रथाला असणारी बारा चाके बारा राशी दर्शवतात. हिंदु संस्कृतीचा प्राण असणार्‍या भगवान सूर्यनारायणाची विविध फलदायी सूर्योपासना. सूर्योपासना हा भारतवर्षाचा प्राण आहे. आपल्या ऋषीमुनींनी साधना करून सूर्योपासनेचे लाभ मिळवलेले आहेत. रथसप्तमीच्या पावन पर्वावर भगवान सूर्यनारायणाविषयीची सखोल, शास्त्रशुद्ध आणि आध्यात्मिक माहिती पुढे देत आहोत. रथसप्‍तमीचा दिवस म्हणजेच तेजोपासनेचा दिवस. या दिवशी सूर्याच्या किरणांतून प्रक्षेपित होणार्‍या तेजतत्त्वात्मक लहरी पृथ्वीच्या कक्षा भेदून भूतलावर अवतरतात. ज्या वेळी त्यांचा पृथ्वीच्या अंतरिक्ष कक्षेत प्रवेश होतो, त्या वेळी त्या ठिकाणी असलेल्या आपकणांशी त्यांचा संयोग घडून येतो. त्यामुळे किरणातील तेज मवाळता धारण करते. हे तेजरूपी किरण आपतत्त्वात्मक लहरींच्या साहाय्याने प्रत्यक्ष पृथ्वीच्या वायूमंडलात प्रवेश करतात.
    ॐ नमःशिवाय

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...