पेंशनची कामे करता करता आता जवळपास वर्ष होत आले होते. अनेक पेंशनरांची बंद पडलेली पेंशन मी खर्चाविना पूर्ववत करुन दिली होती. याच्या बातम्या अनेक स्थानिक वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाल्या होत्या. मुळातच स्वतःला जनसेवेला समर्पित केले असल्याने मला कोणत्याही सामाजिक कामाचे मानधन घेणे रुचत नाही. ज्या कामाला पैसेच लागत नसतील किंवा शब्दावर काम होत असेल तिथे पैशांची आशा बाळगणे चूकीचे ठरते. तर ही कामे सुरुच होती. दूरदूरुन पेंशनसाठी लोकांचे फोन येत होते. त्यात एका फोनने मला आव्हानात्मक काम मिळाले.
सायंकाळची वेळ होती. अजूनही टपाल वाटणं सुरुच होतं. शिक्रापूरमधील एका पाटील नामक गृहस्थांचा फोन आला.
" नमस्कार देवा सर, तुम्ही पेंशनची कामे करता असे कळले. माझ्या एका मित्राचे कोरोनाकाळात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या पश्चात आठवीत शिकणारा मुलगा आणि गृहिणी असणारी पत्नी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. विप्रो कंपनीत कामाला असल्याने वहिनींना पेंशन सुरु होणार आहे. परंतु अनेक कागदपत्रांची पुर्तता करता करता त्यांना व्यवस्थेचा विदारक अनुभव आला. आम्ही सगळी कागदपत्रे जुळविली. परंतु एका गॅझेटेड ऑफिसरच्या सहीवाचून सगळं अडून बसलंय. याकामी तुमची काही मदत झाली तर फार बरे होईल. मी वहिनींना तुमचा नंबर देतो,त्या समक्ष भेटून तुम्हाला सर्वकाही सांगतील. "
" एका सहीवाचून काम अडलयं." मला हे वाक्य काहीसं खटकलचं..एखाद्या शाळेचे मुख्याध्यापक अथवा विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या सहीशिक्क्याने त्यांच्या पेंशनचे काम मार्गी लागले असते. परंतु तीच सही मिळत नाही हे काही पचनी पडेना. त्या दिवशी हा विषय वेळेवर सोपवून मी कामात गढून गेलो. दूसर्या दिवशी त्या ताईंचा फोन आला. मी त्यांना पोस्ट ऑफिसमध्ये भेटण्यासाठी बोलवले. तोपर्यंत मी पत्रांची बीटवगैरे लावून घेतली. पार्सलची थैली गाडीला बांधली. एकदोन कस्टमरच्या अकाउंटचे फॉर्म भरुन दिले. बराच वेळ वाट पाहिल्यावर त्या ताई आल्या.
मी बाहेरच उभा होतो. एकमेकांच्या चुळबूळीवरुन आम्ही दोघांनी एकमेकांना ओळखले. मी त्यांचा पूर्ण विषय समजून घेतला. कोरोना काळात अनेक कुटुंबाचा पायाच खचला होता. भरवश्याच्या भिंती पत्त्याप्रमाणे कोसळल्या होत्या. या ताईंचे पती किरकोळ तापासाठी स्वतः दवाखान्यात गेले. ते परतलेच नाहीत. क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. घरादारावर दुःखाचा डोंगर कोसळला. सगळं आलबेल असताना असे अचानक हे कसे जाऊ शकतात यावर त्यांचा विश्वासच बसेना. पण नियतीचे कट कुणालाच ठाऊक नसतात. आपण तयार नसतानासुद्धा आभाळ ऊरी येऊन पडतं.
हे सगळं सांगताना त्या ताईंच्या डोळ्यांतून अश्रूंची धार लागली होती. मलाही हुंदका आवरता आला नाही. कसाबसा आवंढा गिळत मी विषयाला बगल दिली. त्यांना व त्यांच्या मुलाला पेंशन सुरु होणार होती. घरचं फार बरं नव्हतं. धावपळ करणारा कुणी गडीमाणूस घरात नव्हता. जमिनीचे घोंगडे वादाच्या पावसात कित्येक वर्षांपासून भिजत पडले होते. पेंशन सुरु झाली म्हणजे त्यातून घरखर्च व मुलाच्या शिक्षणाचा खर्च भागवता येईल असा त्या ताईंचा होरा होता. पण केवळ एका सहीशिक्क्यामुळे काम अडले होते. मी याचे कारण विचारले असता त्या ताईंच्या उत्तराने माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली.
https://chat.whatsapp.com/GSVtuqzFIxdD6LYaC75lGg
मैताच्या टाळूवरचं लोणी खाणारी जमात अजूनही अस्तित्वात आहे याचा मला प्रत्यय आला. पेंशनच्या कागदपत्रांवर सहीशिक्का देण्यासाठी त्यांना प्रत्येक ठिकाणांवरुन पंधरा-वीस हजारांची मागणी करण्यात आली होती. संबंधितांना याचे कारण विचारले असता " आम्ही तुम्हाला ओळखत नाही, कागदपत्रे खरे कि खोटे आम्हाला त्याच्याशी घेणंदेणं नाही. असेच जर कुणालाही आम्ही सहीशिक्के वाटत बसलो तर आमच्या पदाचा काय उपयोग..?" हे सर्व सांगताना या निगरगट्ट आणि निर्दयी लोकांचे उंबरे झिजवताना झालेला त्रास ताईंच्या प्रत्येक अश्रूंतून जाणवत होता.
मी ताईंकडून कागदपत्रे घेतली अन् दुसर्या दिवशी भेटण्यास सांगितले. जाताना ताई डोळ्यात प्राण आणून म्हणाल्या. " दादा..नक्की करा ओ एवढं काम..या पेंशनवर खूप गोष्टी अवलंबून आहेत. "
मी फक्त डोळ्यांनीच होकार दिला.
माणूस पैशासाठी ऊरफुटेस्तोवर धावतोय हे तर मी रोजच पाहत होतो. परंतु तो इतक्या खालच्या थराला जाईल याचे मला वैषम्य वाटले. "आपल्याला पद भेटले म्हणजे आपण सर्वश्रेष्ठ आणि सर्वशक्तिमान झालोय आणि बाकीचे लोक आपल्यासाठी किड्या-मुंग्यासारखेच आहेत." असा अनेकांना भ्रम होतो. पदाचा माज येतो. गर्व होतो.
पण आपला सर्वकाही माज इथेच जिरतो हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवे. आपल्या प्रत्येक कर्माचा बारकाईने हिशोब ठेवला जातो. कर्म हे फल देऊनच शांत होते. माणसाच्या या बेफिकीर वागण्याची मला अक्षरशः किव येते. जे जे नगरचे वाटप संपवून मी रुद्रा सोसायटीत आलो. पत्रावरचे नाव वाचून माझ्या गंभीर मुद्रेवर हसू उमटले. रुद्रामध्ये पुणे विद्यापीठाच्या प्रा.डॉ. प्रतिभा घाग-सोनी राहत होत्या. त्यांचे दर महिन्याला सक्षम समीक्षा नावाचे मासिक येत असते. इतरही पत्रे येत असतात. परंतु सक्षम समीक्षा हा त्यांचा आवडता अंक असल्याने मी त्यांना फोन केला. मासिक आल्याचे कळताच त्यांना आनंद झाला. पण त्यांना यायला उशीर होणार असल्याने त्यांनी अंक सिक्युरिटीकडे ठेवण्यास सांगितले.
या मॅडमना फोन करण्याचे विशेष कारण म्हणजे त्यांना सहीशिक्क्याचा अधिकार होता.
त्यांचे पत्र पाहूनच माझ्या खांद्यावरचे ओझे हलके झाले होते. फोन ठेवता ठेवता मी सहजच त्यांना म्हणालो ,मॅडम, माझे एक छोटेसे काम आहे.कराल का ? " त्यांना सहीशिक्क्याचे सांगताच त्यांनी बिनशर्त होकार दिला.
मी आतुरतेने दुसर्या दिवसाची वाट पाहू लागलो. त्यात त्या ताईंचा व त्यांच्या दिरांचाही फोन येऊन गेला. रात्री झोपताना मी मनोमन सूर्याला बजावलेच.." देवा..उद्या माझ्या कामाची शाश्वती घेऊनच उगव. तुझ्याखातरं कौतुकाची रास लावीन मी..! "
कदाचित देवाला माझ्या प्रामाणिक प्रयत्नांचा नैवेद्य रुचला असावा म्हणून की काय घाग मॅडमचा फोन आला. त्यांनी संध्याकाळी साडेसातची वेळ दिली. " आपल्याला सायंकाळी सहीशिक्का घ्यायचा आहे " हे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून मी दिवसभरातली कामे चित्त्याच्या पायाने उरकली. माझ्या कामाची हमी घेतल्याशिवाय मी सूर्याला मावळूच दिले नाही. सात पंचवीसलाच मी घाग मॅडमच्या घरी गेलो. त्यांनी चहावगैरे ठेवला. शिळोप्याच्या गप्पा झाल्या. मग मी मुख्य विषयाला हात घातला. सहीशिक्क्यासाठी कागदपत्रे त्यांच्या पुढ्यात धरली अन् लाईट गेली.
लाईटसाठी कौतुकाचे शब्द ओठांवर येऊन ठेपले तोच मॅडम म्हणाल्या..' सर..मोबाईल टॉर्च लावा..टॉर्चच्या उजेडात त्यांनी दोन्ही फॉर्म वर सहीशिक्का दिला. हे करत असताना त्यांनी एकदाही विचारले नाही की कस्टमर कोण आहे? कशासाठी शिक्का हवाय..कागदपत्रेही तपासून पाहिले नाहीत. मला जाम आश्चर्य वाटलं. मी न राहवून विचारले. तेव्हा त्या म्हणाल्या. ' सर..तुम्ही निस्वार्थ भावनेने इतक्या लोकांची मदत करता..वेळकाळाचाही विचार करत नाही. त्यात आता रात्रीचे आठ वाजले आहेत. तुमचे घर इथून बेचाळीस किमी दूर आहे. तुम्हाला घरी जायला दहाच वाजणारेत. मग एवढं सगळं असेल तर तुम्ही आणलेलं काम नक्कीच एखाद्या अडल्या-नडलेल्याचचं असणार यात तीळमात्र शंका नाही. म्हणून नाही विचारले. "
मॅडमना मनःपूर्वक धन्यवाद देत मी त्यांना संपूर्ण प्रकरण समजावून सांगितले. जाता जाता सहजच म्हणालो.." तुमची फी..? "
" सर...तुम्ही माझ्या घरी आलात आणि तुमच्या सामाजिक कार्याला हातभार लावायची संधी मिळाली.अजून काय हवं..? "
मी मॅडमना पुनश्च एकदा धन्यवाद देत बाहेर पडलो. त्या ताईंना सोसायटीच्या गेटवर बोलवले. केसनंद रोडवर असणार्या मिकासा सोसायटीत त्या ताई राहतात. एव्हाना आठ वाजून गेले होते. मी मिकासाच्या गेटवर जाण्याआधीच त्या ताई तिथे हजर होत्या. मी पिशवीतून दोन्ही फॉर्म काढून ताईंना सुपूर्द केले.
दोन्ही फॉर्मवरचा सहीशिक्का पाहून त्या आनंदून गेल्या. मलाही काम झाल्याचे समाधान लाभले. मला घरी जायला अख्खा तासदिडतास लागणार होता. मी त्यांचा निरोप घेऊन निघणार तोच ताई मला थांबवत म्हणाल्या.." दादा..आधीच्या लोकांनी पंधरा-वीस हजार मागितले होते. तेवढे देणे मला शक्य नाही पण हे चारपाच हजारच मी देऊ शकते." मी ताईंना ती रक्कम आहे तशी पर्समध्ये ठेवायला सांगून म्हणालो. " ताई...माझ्या खांद्यावर अनेकांच्या उपकारांचे भारीभक्कम ओझे आहे. खारीच्या वाट्याने प्रयत्न करतोय..पण ओझे उतरत नाही. त्यात तुमचे पैसे घेऊन अजून मला त्या ओझ्यात भर घालायची नाही.
याउलट तुमच्या कामामुळे मला माझ्या क्षमतांची परत एकदा नव्याने जाणीव झाली. तुम्ही मला तुमचे काम करण्याची संधी दिली. हाच माझा मेहनताना..!! ताईंचे डोळे भरुन आले. त्या सहजच म्हणाल्या.." दादा..खरं सांगते..विश्वास बसत नाही. तुमच्यासारखे निरपेक्ष लोक या जगात आहेत."
मी गाडीला टाच दिली. अन् घर जवळ करु लागलो. मला ठाऊक आहे की जेव्हा बोलवणे येईल तेव्हा हातातले काम सोडून मला जावे लागणार आहे. कारण माझ्या प्रत्येक हालचालींवर देव पर्सनली लक्ष ठेवून आहे. तेव्हा मरतानासुद्धा मला कुणाच्यातरी उपयोगी पडूनच मरायचे आहे. काय सांगावे,कुठून काळसर्प येईल अन् अचानक पाठीवर धप्पा देईल..?
©️®️ लेखक
नामदेव सुखदेव गवळी
9767041875
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा