मंगळवार, ६ फेब्रुवारी, २०२४

900. आम्रशाप

     विठोबा आता त्याच्या घरात एकटाच असतो. सध्या उद्योग एकच, सकाळी उठून सगळं आटोपलं की अंगणात उन्हं अंगावर घेत बसतो, मधेच लहर आली की विडी शिलगावून स्वतःच्या आजोबांना आईमाईवरुन अस्खलित शिव्या देत रहातो. लोकं म्हणतात तो वेडा आहे. गावातले बरेच लोक त्याचा उल्लेख वेडा विठोबा असाच करतात. पण मला नीट ठाऊक असतं, विठोबा वेडा नाही. चाळीच्या भाड्याचे पैसे मोजून घेतो, दूधवाल्याला पैसे देताना चोख हिशेब ठेवतो. पेपरातल्या बातम्या वाचतो. मोदींवर अधिकारवाणीने बोलतो. असा मनुष्य वेडसर कसा असेल? छे.... विठोबा त्याच्या आजोबांना शिव्या देतो त्यामागं काहीतरी रहस्य नक्कीच असेल याची मला खात्री आहे. एवढ्या मोठ्या घरात तो गेली कित्येक वर्षे भुतासारखा एकटाच रहातो. सकाळी लवकर उठून काळा चहा बनवून ढोसतो. त्याला सकाळचा पहिला चहा कडक काळा बिनदूधाचा लागतो, उरलेला दिवसभर मात्र यथेच्छ दूधाचा फिकट चहा ढोसत रहातो. ठीक नऊ वाजता सुमन आली की केरवारे, धुणीभांडी करते. विठोबा नाष्टा करत नाही. साडेदहा वाजता तो खाटेवरुन बूड हलवतो. स्वयंपाकघरात जाऊन पिठलंभात, खिचडी किंवा वांग्याची तिखट रस्साभाजी यापैकी आलटून पालटून काहीतरी बनवतो. रविवारी मात्र आवर्जून अंडाकरी भात किंवा बोंबलाचं नाहीतर मांदेलीचं कालवण करतो. मी गावात असलो की आठवणीने रविवारी सकाळी डझनभर अंडी घेऊनच जातो. रविवार आणि मी गावात आलो की दुपारचं जेवण विठोबाकडे हे आता आईलाही पाठ असतं. मी मच्छी खात नाही त्यामुळे मी आलो आणि कालवण असलं तरी माझ्यापुरती अंडाकरी किंवा एखादी फक्कड पालेभाजी आणि चपाती असा बेत असतो. मला आवडते म्हणून लसणाची दही कोथिंबीर घातलेली ओली चटणीही कधीतरी करतो. माझ्यादेखत विठोबाने आजोबांना शिव्या दिलेल्या मला आठवत नाही. मी असलो की भाजप सरकार, खवय्येगिरी किंवा शेतीवाडी हेच विषय असतात आमचे....
    पण परवा सकाळी गेलो तर विठोबा अंगणात बाजल्यावर बसून विडीचे दम मारत आजोबांच्या (आणि स्वतःच्याही) अठरा पिढ्यांचा उद्धार करत होता. मला पाठमोरा असल्याने त्याला मी आलेलो क्षणभर समजलंच नाही. माझी चाहूल लागली तेव्हा एकदम दचकला...गोरामोरा झाला.... मी भुवया उंचावून विचारलं.... तशी म्हणाला..... आमचा आजा अक्करमाशी भडवा... वंशक्षय झाला आमचा त्याच्या भिकारचोटपणामुळे.... मला काहीच समजलं नाही... मग एकदम सावरुन म्हणाला, चल मरुदे, तुझ्यासाठी आज अंडाचाट, मसाला वांगी आणि चपात्या केल्यात बघ... विडी संपू देत. ताटं घेतो.... आज जेवणं झाल्यावर विषय काढायचा मी ठरवलं.... आज बेत फर्मास होता. जेवणं होईपर्यंत इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होतो आम्ही. जेवण झाल्यावर ताटवाट्या उरकून आवरुन भाजकी बडिशोप खात दोघं अंगणात आलो. पौषातली थंडी असल्याने दुपारी उन्हाचा कडाका जाणवत नव्हता. वातावरणात एक छान उब होती. विठोबाच्या घराच्या अंगणात एक तुळस सोडली तर झाड नव्हते. विठोबाच्या मालकीच्या चार चाळी गावात होत्या आणि हे रहातं घर एवढीच काय ती प्रॉपर्टी. विठोबाची आई गेल्यावर तिच्या माहेरहून, त्या कुटुंबाच्या जमीन विक्रीतून आलेले काही लाख रुपये मिळाले होते अशी वदंता होती. आणि ते खरंही होतं. त्यातली बरीचशी रक्कम विठोबाने फिक्स डिपॉझिट केली होती, थोडी म्युच्युअल फंडात होती, काही रक्कम घराच्या डागडुजीसाठी वापरली होती. पुढचे काही पावसाळे आता त्रास नव्हता. विठोबा साठीच्या आतबाहेर असेल. अविवाहित आणि सडाफटिंग...
माझं आणि विठोबाचे फार लहानपणापासून पटे. माझ्यापेक्षा तो दहाबारा वर्षे मोठा. मला तो मोठ्या भावासारखा वाटे... पण माझं विठोबाकडे आणि एकंदरीत नेन्यांकडे येणेजाणे आमच्या अप्पांना कधीच आवडलं नाही. मी विठोबाकडे भेटायला चाललोय म्हणल्यावर त्यांचा चेहरा बदले... आई काही बोलत नसे. पण एकंदरीत आमच्या म्हणजे परांजपे आणि नेने कुटूंबात विस्तवही मधून जात नाही किंवा नसावा असंच वातावरण होतं. मी, अरुण आणि विश्वेश आमच्या पिढीत आणि नेन्यांकडे विठोबा.... आम्हाला प्रत्येकी दोन दोन मुले पण विठोबा अविवाहित त्यामुळे त्यांची पिढी तिथेच थांबली होती....विठोबाला मी प्रेमाने ठो म्हणतो...
“काय रे ठो... मी आलो तर तुझ्या आजोबांना यथेच्छ शिव्या घालत होताससा?”
“कधीतरी तु हा प्रश्न विचारणार हे मला माहीत होते” विठोबाने विडी शिलगावली. “अप्पा तुला कधीच सांगणार नाही हे मला माहीत आहे. परांजपे आणि नेन्यांमधे विळ्याभोपळ्याचं नातं आहे हे एव्हाना तुलाही समजलं असेलच”
“हो अरे” मी म्हणालो, “नेने हे आडनावही आमच्या घरात वर्ज्य आहे असं मला वाटतं. तुझं नाव घेताक्षणी आईअप्पा झुरळ अंगावर पडावं तसे दचकतात. मी यायला निघालो की त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्याच.... काय भानगड आहे रे”
“तुला वेळ आहे ना रे. उद्या जातोयस ना पुण्यात?”
मी होकार दिला...
“मग ऐक...” मी सरसावून बसलो.
“सचिन, या गावात परांजपे आणि नेने गेल्या पाचेक पिढ्यांपासून रहात असतील. आपल्या जमीनही इथेच. आमच्या जमीनी कुठे? तर श्रीधरअण्णांच्या शेतालगतची दोन एकर, नदीपलीकडची तीन एकर आणि हरीहर मंदिराजवळची दोन एकर. तुमच्या आणि आमच्यातली ती एकच जवळ जवळ बांध असणारी. तुमचे आजोबा म्हणजे प्रतापभाई परांजपे शांत देवमाणूस. अत्यंत मेहनती, निःस्पृह आणि प्रेमळ माणूस. आणि आमचा आजोबा म्हणजे महादेव नेने हा देखील तसा बरा. पण एक नंबर लोभी आणि हावरट मनुष्य. एकदा फार पूर्वी पूर आला. बरंच नुकसान झाले. आणि आमच्या आजोबांना दुर्बुद्धी झाली आणि त्यांनी तुमच्या शेतीत बांध वाढवले. झालं... प्रतापभाईँनी आधी शांतपणे समजावून सांगितले. जमीनीच्या चतुःसिमा आठवून दिल्या. आमचा आजोबा तब्बल दहा गुंठे अतिक्रमण करत होता. कोण मायका लाल हे ऐकून घेईल? महादेव नेने ऐकत नाही म्हणून तुझे आजोबा कोर्टात गेले. सहा वर्षे केस चालली, हायकोर्टात तुमच्या बाजूने निकाल जाहीर करण्यात आला. पोलीस बंदोबस्तात मोजणी, आखणी केली आणि कायमस्वरूपी कंपाऊंड झाले. महादेव नेने केस हरले आणि थोडी नुकसानभरपाई पण द्यायला लागली.... इथे शांतपणे निकाल स्विकारुन गप्प बसणं अपेक्षित होतं ना?” विठोबाने क्षणभर उसंत घेतली आणि पुन्हा बोलू लागला....
“पण लोभापायी महादेवचं डोकं फिरुन बुध्दी भ्रष्ट झालेली. तुमच्या जमीनीत तेव्हा उत्कृष्ट कलमी आंब्याची चाळीस झाडं होती. डौलदार, दिमाखदार आणि भरपूर आंबे देणारी....महादेवने एक अतिशय दळभद्री आणि कुटील डाव आखला. शेजारच्या गावातील एक माणूस गाठला आणि कसलंसं जालिम विष आणलं, मोरचूदात कालवून एका रात्रीत गुपचूप तुमच्या वाडीत शिरुन एकेक कलमावर खाप मारुन ते जहाल विष खोडातून मारलं...त्या चुतमारिच्याच्या अंगात तेव्हा सैतान संचारला होता. आठवडाभरात झाडं वठत गेली... मेली..... डौलदार फळं देणारी कलमं सुकून कोळसा झाला....” विठोबा आता गहिवरुन गेला. मी उठून त्याच्या खांद्यावर हात ठेवला.. त्याच्या अश्रूंचा बांध फुटला होता... “सचिन, आमच्या आजोबाने चाळीस तरुण कलमं अक्षरशः मारुन टाकली रे...कसलेही पुरावे सापडले नाही. प्रतापरावांनी तक्रार केली पण काही उपयोग झाला नाही. आमच्या आजोबांवर संशय असला तरी पुरावा नव्हता. कलमांची अक्षरशः प्रेतं झाली रे सचिन....”
“आणि बरोबर पंधरा दिवसांत माझा आजा झोपेतून दचकून जागा झाला. त्याला फेफरं भरलं होतं. तापाने फणफणत होता...कलमाने शाप दिलानी मला... आम्रराजाने शाप दिलाय.... माझा वंश थांबणार.... एवढं बोलला आणि वाचाच गेली. पुढे वर्षभर जेमतेम जगला. बोटंही हलेनाशी झाली. हगणमुतणं बिछान्यावरच... खूप पैसे खर्च झाले तेव्हा म्हणतात. उपचारासाठी मिरजेला नेला पण परत आणला. सगळ्या जमीनी विकाव्या लागल्या. मला दोन काका... एक विष्णूकाका तो अविवाहित होता. आजोबा गेले त्याच्या दहाव्या दिवशी स्मशानातले विधी आटोपून जो परागंदा झाला तो नंतर कधीच आला नाही. दुसरा काका हेमंतकाका. तो लग्नाच्या महिनाभरात साप चावून तडफडत गेला. बायको माहेरी निघून गेली. आजोबांच्या आधी आजी अचानक गेली. माझे वडील, माझा भाऊ दिनकर आणि मी आम्हीच उरलो. आईला नंतर नंतर वेडाचे झटके येत. तीही असंबद्ध बडबडे, आमचं घराणं मुक्त करा.... आंब्याच्या देवा माझ्या सासऱ्याला माफ कर. आमचा वंश जगव असं काहीतरी बडबडे.... माझ्यापेक्षा दिनकर दोन वर्षे मोठा.... आई गेली त्याच्यानंतर सहाव्या महिन्यात तो सकाळी झोपेतुन उठलाच नाही. माझा तरुण भाऊ.... कशाने गेला अचानक समजलंच नाही. डॉक्टर म्हणाले, झोपेत ह्रदय बंद पडलं....”
“सचिन, माझे वडीलही असेच अचानक गेले. तेव्हा तु शिकायला पुण्यात होतास. माझं वय तेव्हा असेल तिशीच्या आतबाहेर....नेन्यांच्या पिढीतला आता मी एकटा वारस उरलो होतो. माझ्या कुंडलीत अष्टमस्थान आणि शनी बलवान रे. मला अपमृत्यू नाही. प्रदीर्घ आयुष्य... पण करायचं काय रे हे आयुष्य? आपली रक्ताची सगळी माणसं नजरेसमोर फटफट मरुन गेली रे... गाठीशी पैसा आहे पण उपयोग काय? आणि उपभोग तरी काय? एकेकाळी माणसांनी गजबजलेला हा नेनेवाडा आता सणासुदीलाही इथे थंड स्मशानशांतता असते. दिवाळीला मी चार पणत्या लावतो, आकाशकंदील लावून एकटाच बघत बसतो. रथसप्तमीला आईच्या आठवणीने गोखल्यांच्या उमाला बोलावून तिच्या हातून घरात चार सवाष्णींचं हळदीकुंकू करवून घेतो. गणपतीला आमच्या चुलतचुलत घराण्याच्या गणपतीला राजापूरला जाऊन येतो. आजोबांच्या लोभापायी हातून झालेल्या अक्षम्य अपराधांची शिक्षा आम्ही भोगली... काही सुटले. मी अडकलो”
“मग तु लग्न का केलं नाहीस?” मी म्हणालो
“तुला सांगतो, माझ्या मनात येई. आपणही लग्न करावं, घरात बाईमाणसाचा वावर होईल. एखादं बाळ जन्माला येईल. शाप संपेल... पण ज्या दिवशी हा विचार मनात येई त्या रात्री माझ्या स्वप्नात एक हिरवंगार आंब्याचं झाड येई आणि त्याच्या खोडातून आवाज येई.... हा मूर्खपणा करु नकोस. तुझा पुढचा वंशही नेस्तनाबूत..... जाऊ दे सचिन” आम्ही दोघं हताशपणे एकमेकांकडे बघत राहिलो... थोडा वेळ तसाच गेला. मी निघणार इतक्यात विठोबा तिरीमिरीत उठला.. माझे दोन्ही हात हातात घेतले. त्याचे डोळे पाण्याने डबडबले होते.... मला म्हणाला... “नेने आणि परांजपे घराण्यांना जोडणारे आता आपण दोघेच आहोत. माझी एक कळकळीची विनंती आहे.”
“बोल ना” मी म्हणालो
“हे बघ सचिन, तुमच्या इथल्या गावच्या प्रॉपर्टीत फक्त तुला इंटरेस्ट आहे. विश्वेश अमेरिकेत आणि अरुण युकेला... इथले निर्णय तु घेऊ शकतोस. कलमं मेल्यानंतर तुमची ती हरिहर मंदिराजवळची जमीन तशीच आहे. तिथे कोणीच जात नाही. तुम्ही ती विकणारही नाही. माझी एक विनंती आहे. मी स्वखर्चाने ती जमीन साफसफाई करुन घेतो. छान मशागत करतो. एक ॲग्रीकल्चर कन्सल्टंट आहे माझ्या परिचयातील त्याला आणून दापोली किंवा देवगडहून फर्स्टक्लास हापूसची पन्नास कलमं आणून लागवड करुन देतो.... सगळा खर्च माझा. मला एक पैसाही नको आणि नंतर एक फळही नको. तु म्हणशील तर MOU साईन करु. सगळ्या अटी मान्य....निदान मला तरी या अपराधातून मुक्त होऊ दे रे” विठोबाने हात जोडले... मी थांबवलं त्याला... होकार दिला.
त्याच्यादृष्टीने तोच जर शापमुक्तीचा मार्ग असेल तर ठीक आहे. मी अशावेळी स्वतःला विश्वस्त समजतो. जे होतं ते चांगल्यासाठीच.....

-सचिन मधुकर परांजपे (पालघर)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...