दत्ताराम अचानक खोकायला लागला. त्याच्या अंगावर लालसर पुरळ उठलं. नाडीचे ठोके मिनिटाला जवळपास दीडशे. ब्लड प्रेशर लागेचना. काही तासांपूर्वीच विषारी नागाने दंश केलेल्या या मजुराला आता प्रतिविषाची देखील रिऍक्शन आली होती! जे एकमेव औषध त्याला वाचवू शकलं असतं, त्याचीच रिऍक्शन येणं हे बिचाऱ्याचं केवढं दुर्दैव! त्याच्या इंजेक्शनची ड्रिप बंद करतच मी जोरात नर्सला हाक मारली: "सिस्टर क्रॅश कार्ट". आधीच तयार करून ठेवलेलं "ऍड्रेनॅलीन" हे सर्वात पॉवरफुल इंजेक्शन मी त्याला दिलं.
त्या पावसाळी रात्री जवळपास दहा वाजून गेल्यावर दत्तारामच्या एका मजूर मित्रानं त्याला थेट शेतातून दवाखान्यात आणलं होतं, नि तो मित्र लगोलग दत्तारामच्या घरच्यांना आणायला गेला होता. त्यांना दवाखान्यात येण्यासाठी काही तास लागणार होते, तोपर्यंत दत्तारामची जवाबदारी माझ्यावरच होती. घाटीच्या सरकारी दवाखान्यात तेंव्हा मी एक ज्युनिअर इंटर्न होतो. मोबाईल फोन आणि सरकारी दवाखान्यात "व्हेंटिलेटर" असण्यापूर्वीचा तो काळ होता. सुदैवानं त्यावेळचे तिथले डीन डॉ. व. ल. देशपांडे यांच्या प्रयत्नांमुळे निदान दवाखान्यात बहुतेक सगळी आवश्यक औषधं तरी हाताशी असायची.
काही विषारी सापांच्या दंशामुळे सगळ्या नसा आणि स्नायू निकामी होतात, पॅरालीसीस होऊन श्वसनाची क्षमता देखील जाते आणि माणूस दगावतो, तर काही वेळा विषाच्या परिणामामुळे शरीरातल्या धावत्या रक्ताच्या गाठी होऊन जीव जातो. काही मिनिटांचा किंवा तासांचाच हा सगळा खेळ असतो, बरेच रुग्ण दवाखान्यात देखील पोहोचू शकत नाहीत. "अँटी स्नेक वेनम" (सर्पदंशाचं प्रतिविष) हे अशा सगळ्याच रुग्णांना द्यावं लागतं. दत्तारामला पॅरालीसीस करणारा दंश झाला होता. नसांची ताकत थोडीशी वाढवणारं आणखी एक धोकादायक औषध असतं (त्याचा डोस थोडाही जास्त झाला तर हृदयगतीच बंद पडते) ते त्याला चालूच होतं. पण प्रतिविषच थांबवल्यानं आता सापाचं ते जीवघेणं विष दत्तारामच्या शरीरात पसरू लागलं होतं. जाणारा प्रत्येक क्षण त्याला मरणाच्या आणखी जवळ नेत होता, आणि त्याच्या या दुर्दैवी प्रवासाचा मी साक्षीदार असणार होतो! माझ्या छातीत धडधडू लागलं.
आता एकच मार्ग होता, पण तो अतिशय धोकादायक होता, आणि मला त्याचा अनुभवच नव्हता: त्याच प्रतिविषाचे अतिशय सौम्य, सलाईनमध्ये मिसळून खूप कमी तीव्रतेचे डोस पेशंटला द्यायचे, आणि हळूहळू, काही मिनिटांच्या अंतराने त्या डोसची तीव्रता वाढवत न्यायची. सहन झालंच तर पुन्हा पूर्ण डोस द्यायचा. या प्रकाराला "डिसेन्सिटायझेशन" म्हणतात. असं करतांना जर पुन्हा रिऍक्शन आली, तर खेळ संपलाच समजा!
एक तर मी हे आधी कधी केलेलं नव्हतं, आणि पेशंटच्या नातेवाईकांची अशा धोकादायक प्रकारासाठी परवानगी घेणं आवश्यक होतं. इथे नातेवाईकच नव्हते. आता पॅरालिसिस मुळे त्याच्या डोळ्यावरची झापड वाढतच चालली होती. मी सारखा त्याला बोलून धीर द्यायचा प्रयत्न करत होतो.
मी माझे प्रोफेसर डॉ. गायकवाड यांना फोन लावला आणि थोडक्यात परिस्थिती सांगितली. सर म्हणाले "सुरु कर, पण खूप जपून. काही अडचण आली तर मला फोन कर, मी येतो. ते नातेवाइकांची परवानगी वगैरे मूर्खपणाचे प्रकार मी उद्या सकाळी मेडिकल डिरेक्टरना बोलून करून घेतो"
डॉक्टरांचं कायदेशीर- कागदोपत्री काम वाढवल्यानं सगळ्यांचाच खूप वेळ वाया जातो हे खरंच!
मी दत्तारामकडे गेलो. "हे बघा, एक जरुरी औषध द्यावं लागेल, प्रतिविष आहे ते. एखाद्या वेळी परत रिऍक्शन येऊ शकते. मी जपून देईन, पण तुमची परवानगी हवीय". खोल, घोगऱ्या आवाजात दत्ताराम म्हणाला, "तुम्हीच मला देव हैत डॉक्टरसायब. जे तुमाला बरोबर वाटतं ते करा. फक्त माझी बायको, मुलगी येईपर्यंत मला जित्ता ठेवा. मला शेवट एकदा त्यांना बगु द्या". मी त्याला हो म्हणालो.
त्याला छोट्या छोट्या डोस मध्ये मी पुन्हा प्रतिविष सुरु केलं. मनात घालमेल होत होती. त्याचं बी. पी. आता ठीक होतं, पण श्वास कमजोर होऊ लागला. काही वेळातच त्याच्या नाडीचे ठोके परत खूप वाढले, आणि त्याची शुद्ध हरपायला लागली. अपूर्ण श्वसनामुळे त्याच्या रक्तातील ऑक्सिजन कमी व्हायला लागला होता! सिस्टर तयारच होती, आम्ही लगेच त्याच्या श्वासनलिकेत दुसरी नळी टाकून एका रबरी बॅगनं त्याच्या फुफ्फुसात श्वास भरायला सुरुवात केली. मला घाम फुटला. एकाच वेळी मी जलद विचार करत होतो, घाबरलेलो होतो, पेशंटची परिस्थिती बघून निर्णय घेत होतो आणि मनोमन देवाची देखील प्रार्थना करत होतो.
त्याचा श्वास कृत्रिमरीत्या थोडासा स्थिरावल्यावर मी त्याला प्रतिविषाचा पूर्ण डोस द्यायचा निर्णय घेतला. ज्या औषधानं काही तासांपूर्वीच त्याचा जवळपास जीव गेला होता, तेच आता मी परत त्याला सुरु केलं.
पहाटेच्या सुमारास दत्तारामची बायको आणि मुलगी वॉर्डात पळतपळतच आल्या. बेशुद्ध दत्तारामच्या डोक्यावर थोपटून रडणाऱ्या त्याच्या बायकोला मी परिस्थितीची थोडक्यात कल्पना दिली. बारा-एक वर्षांची त्यांची मुलगी हमसून हमसून रडत होती. "शॉक" च्याही पलीकडची नातेवाईकांची एक भयंकर अवस्था असते, ती डॉक्टरांना जवळपास रोजच बघायला मिळते. नवीन शहर, अतीव गरिबी आणि अशी जीवघेणी वेळ! नवऱ्याच्या चेहेऱ्याकडे बघत बसलेली दत्तारामची बायको अचानकच उठली. कमरेला बांधलेल्या पुरचुंडीतून दहा दहा रुपयांच्या काही नोटा काढून तिनं माझ्यासमोर ठेवल्या, आणि माझ्या पाया पडायला लागली. "डॉक्टरसायब, माझं कुंकू वाचवा. मी सगळं विकून टाकीन, काय अवशिद लागतं ते द्या त्याला, पण त्याला वाचवा" मग स्वतःच्या मुलीकडे हात दाखवून ती म्हणाली "ह्यांना काही झालं तर हिला मी कुठं घेऊन जाऊ? काय करायचं आम्ही? त्याला वाचवा डॉक्टर, मी तुमच्या पाया पडते. तुमी देव हायेत मला".
मला काही देव बनण्याची हौस नव्हती. एक चांगला डॉक्टर बनण्याचीच माझी इच्छा होती. लाच देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मी तिच्यावर रागावू देखील शकत नव्हतो. "तुला एक चांगला डॉक्टर व्हायचं असेल तर प्रत्येक पेशंटच्या, नातेवाईकांच्या मनःस्थितीचा विचार केला पाहिजे. त्यांना कसं वाटतंय हे कळलं पाहिजे" माझ्या आजोबांनी मला मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घेतली त्या दिवशीच सांगितलं होतं.
मी देव नाही याची जाणीव मला होतीच, पण त्या दोघींच्या भावनाही मला कळत होत्या. आपल्या लाडक्या व्यक्तीचा जीव या डॉक्टरच्या प्रयत्नावरच अवलंबून आहे असं त्यांना वाटणं साहजिक होतं. कितीही ब्रिलिअंट असला तरी मला "शब्दच्छल" आवडतच नाही. समोरच्याला काय म्हणयचंय ते शब्दांशिवाय कळलं पाहिजे. पेशंट बरा होणं ही डॉक्टरचीही इच्छा असतेच!
"ताई, शान्त व्हा. मी सगळे प्रयत्न करतो. ते पैसे तुमच्यकडेच असुद्या, आपल्याकडे सगळी लागणारी औषधं आहेत आत्ता. तुम्ही दोघी जरावेळ तिकडे बसा, मला त्यांच्याकडे लक्ष देऊ द्या. चहा हवा असेल तर सिस्टर देतील तुम्हाला".
सकाळी काही वेळानं दत्तारामनं डोळे उघडले. बायको-मुलीशी त्याची भेट झाली. दुपारपर्यंत त्याचा श्वासही पूर्ववत झाला, आम्ही त्याच्या घशातली ट्यूब काढून टाकली. आमचे प्रोफेसर डॉ. गायकवाड राऊंड साठी आले तोपर्यंत दत्ताराम बऱ्यापैकी स्टेबल झाला होता. वैद्यकशास्त्राचे कुठलेही प्रोफेसर कधीही विद्यार्थ्यांची थेट तारीफ करत नाहीत. डॉ. गायकवाड सर माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले "खरं तर चुकलंच तुझं. हीच गोष्ट तू क्रिकेटच्या मैदानावर किंवा एखाद्या फिल्ममध्ये केली असतीस तर तुझ्यावर बक्षिसांचा, आलिशान कार्सचा आणि बंगल्याचा वर्षाव झाला असता. दवाखान्यात अशी जीवापाड मेहनत करून जीव वाचविणाऱ्या डॉक्टरला आपल्या देशात फक्त शिव्याच मिळतात. नशीबवान असेल तर एखाद्याचे आशीर्वाद". कोल्हापुरी तिखट कमेंट्स साठी डॉ. गायकवाड सर प्रसिद्ध होते!
दत्तारामला वार्डातून सुट्टी दिली तेंव्हा त्याची बायको बाहेरच्या टपरीवरून माझ्यासाठी, वार्डातल्या लोकांसाठी पेढे घेऊन आली. "आमच्या गावी एकदा याच डॉक्टर. आमी लै गरीब हाओ, पन तुमच्यासाठी छान सैंपाक करून एकदा तुमाला खाऊ घालीन मी" ती जातांना म्हणाली. बापाचा हात हातात धरून नाचतच त्याची लेक वार्डाबाहेर पडली.
जवळपास सगळेच डॉक्टर प्रत्येक पेशंट बरा व्हावा म्हणून अथक, पूर्ण प्रयत्न करतात. पेशंट बरा झालेला कोणत्या डॉक्टरला आवडणार नाही? पण काही वेळेला डॉक्टर जिंकतो, काही वेळेला परिस्थिती त्याच्या सगळ्या प्रयत्नांवर मात करते. दत्तारामच्या वेळी माझ्या प्रयत्नांना यश आलं यासाठी मी माझ्याही देवाचे मनापासून आभार मानले. "पेशंटसाठी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकच डॉक्टरच्या हाताला नेहमीच यश येऊ दे" अशी प्रार्थनाही मी त्या दिवशीपासून रोज करतोय!
राहिली गोष्ट आलिशान गाड्यांची आणि बंगल्यांची.. रोज अनेक जीव वाचवण्याची शपथ घेतलेल्यांच्या आयुष्यात गाडी-बंगल्यांची हौस करायला इथं फुरसत आहेच कुणाला?
©डॉ. राजस देशपांडे, न्यूरॉलॉजिस्ट पुणे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा