शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०२४

909. ऋणानुबंध

अख्खा गाव जोशी गुरुजींच्या घरासमोर शोकाकुल अवस्थेत गोळा झाला होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक प्रश्न चिन्ह होते?  
गुरुजींचां अंत्यविधी आता कोण करणार? 
प्रत्येक जण हा योग मलाच यावा, या सारखे दुसरे भाग्य नाही असाच विचार करत होता.  
मुलगा समीर याला फोन केला.  त्याने स्पष्ट सांगितले मला यायला जमणार नाही. तुमच्या  पैकी  कुणीही बाबांना अन्नी दिला तरी मला काही प्रोब्लेम नाही. आणि हो, किती पैसे खर्च झाले ते सांगा मी तुमच्या अकाउंट मध्ये पैसे ट्रान्स्फर करतो. 
  माझ्या बाबांकडे पैसे नसतीलच, कारण समाजसेवा करण्यात त्यांनी सर्व उधळले. आईला सांगा मी जमेल तसे येऊन भेटून जाईल. 
   आता मात्र पुढच्या व्यक्तीचा संयम संपला. ते रागातच म्हणाले, हे बघ समीर या जोशी गुरुजींनी या गावा साठी जे काही केले ते सगळ्यांना माहीत आहे. अरे मीच काय त्या माऊली अनाथालयातला प्रत्येक जण आणि गावातील प्रत्येक जण या जोशी मास्तरला अग्नी द्यायला मागेपुढे पाहणार नाही. राहिला प्रश्न पैश्याचा तर आज तू इथे पाहिजे होता. अरे प्रत्येक जण म्हणतो मी सगळा खर्च करतो. अरे जितक्या शाल गुरुजींना सत्काराला मिळायच्या त्याहुंन जास्त आज इथे गोळा झाल्या. कपड्याचे ठीग पडले. अर्थात ते सगळे आम्ही कुठेतरी नक्कीच दान करू. कारण गुरुजींना ह्या शाल त्यांच्या सोबत जाळून टाकलेल्या अजिबात आवडणार नाही आणि त्यांच्या आत्म्याला शांती सुध्दा मिळणार नाही. 
    खरतर आम्ही स्वराजला फोन करणार होतो पण सुलभाताई नाही म्हणतात. 
     अजून एक,  तुला तो विकास आठवतो का? 
हो ! हो ! चांगलाच आठवतो.  तो माझ्या पेक्षा एक वर्षाने मागे होता. फार फार द्वाड होता. त्याच्या बाबांनी कंटाळून त्याला शेवटी बोर्डिंग मध्ये ठेवले होते. 
   पुढे त्याचे काय झाले माहित आहे ?
 नाही ? 
तुझे बाबा, म्हणजे जोशी मास्तर महिन्यातून एकदा त्याला भेटायला जायचे. तो सांगत होता. गुरुजी यायचे, मला म्हणायचे विकास, हे बोर्डिंग तुला एक संधी आहे. ही तुझ्या उनाडकी पणाची शिक्षा समजू नको. खूप अभ्यास कर, स्पर्धा परीक्षा दे. मोठा साहेब हो. मगच तुझे तोंड या गावात दाखव. 
https://chat.whatsapp.com/GSVtuqzFIxdD6LYaC75lGg
    त्याने त्या संधीचे सोने केले. डेप्युटी कलेक्टर झाला. नेमका आजच गावी आला. आज रडून रडून सांगतो. गुरुजी आज तुम्ही हवे होते. ही बघा गुरुजी माझी होणारी बायको. मी तिला म्हणालो, माझे गुरुजी थकले. आपणच त्यांना भेटायला जाऊ . मला काय माहीत मला आज माझ्या गुरुजींचे अंतिम दर्शन घडेल ? 
    गुरुजी , तुमच्या चितेला हा विकास अग्नी देणार. गुरुजी तुम्ही नसते तर हा विकास एक उनाड, वाया गेलेला पोरगा हेच लेबल लावून जगाला असता. गुरुजी मलाच नाही तर कित्येक मुलांच्या आयुष्याला तुम्ही दिशा दिली.
    त्यांचा फोन वरील संवाद चालूच, दारात जोरात बाबा म्हणून आरोळी ठोकल्याचा आवाज आला. फोन बाजूला करून समोर पहिले, स्वराज त्याच्या बायकोला घेऊन दारात उभा. बाबा... ! बाबा...! असा जोरात हंबरडा त्याने फोडला. 
    सगळेच आश्चर्य चकित झाले . हा आज नेमका इथे कसा. कारण त्याला बोलवायचे नाही हे सुलभाताईनी सगळ्यांना निक्षून सांगितले होते. 
    त्या बाहेर आल्या, म्हणाल्या का आलास इथे? 
   तो म्हणाला आई, आठ दिवसापूर्वी बाबा स्वप्नात आले होते. म्हणाले, स्वराज आता मी काही जगत नाही, शक्य तेवढ्या लवकरचे तिकीट काढ. मी तुझी वाट पाहतो. माझ्या चीतेला अग्नी तूच द्यायचा. तसेही समीर येणार नाहीच खात्री आहे. हो पण तुझ्या आईची भाबडी आशा अजूनही आहेच,  समीर नक्की येणार म्हणून. तिचा काहीच दोष नाही. आई असतेच अशी आंधळे प्रेम करणारी. त्यातले थोडे तुला दिले असते तर मला खूप बरे वाटले असते असो.
   इतके बोलले, मला जाग आली . त्याच दिवशी तिकीट साठी प्रयत्न केले. कालची मिळाली, आज पाहतो तर बाबा या जगात नाही.  पुन्हा त्याने बाबा म्हणून हंबरडा फोडला. 
   बाबा आज मी खरा अनाथ झालो. बाबा निदान मी येई पर्यंत तरी थांबायचे होते हो ! आता मी कुणाला बाबा म्हणू ! बाबा...! बाबा...! 
   सुलेखा ताई त्याच्याकडे एकटक पाहात राहिल्या. त्यांच्या डोळ्यासमोर गुरुजींचा तो घरी आणायच्या आदल्या दिवशीचा संवाद आणि त्याला  घेऊन आले त्या दिवशी पासून  आजपर्यंतचे सगळे  एखाद्या पुस्तकाचे पान पलटावे तसे स्पष्ट ऐकायला आणि दिसायला लागले. त्या,  त्या संवादामध्ये हरवून गेल्या. 
    सुलेखा, अग मी काय म्हणतो ? बोला आज काय नवीन ? नवीन असे काही नाही ग. तुला ठाऊक आहे, गेले कित्येक वर्ष मी " माऊली " या अनाथ आश्रमात जातो. 
  हो चांगलेच माहिती आहे  !  शिक्षकी पेशा, त्यात जेमतेम पगार तरीही त्या आश्रमात काही ना काही दानधर्म चालला असतो तुमचा. आपल्या पोटी एक पोर आहे, त्याची पण जबाबदारी आपल्यावर आहे तुम्ही किती वेळा विसरता?  
  हे बघ सुलेखा , मी कोणतीच जबाबदारी झटकत नाही. विसरत तर मुळीच नाही.  एका बापाची सगळी कर्तव्ये पार पाडतो. हो अनावश्यक कोडकौतुक नाही करत. कारण त्याने त्याचे काही अडत नाही. 
  आणि हो थोडा आश्रमात खर्च करतो, कितीतरी मुल ज्यांना वह्या , पुस्तक मिळत नाही. अशावेळी  ह्या मुलांना जुनी पुस्तक सुध्दा खूप मौल्यवान वाटतात. मी तेच करतो. एक हाडाचा शिक्षक आहे मी. त्यामुळे कुणी शिक्षणा पासून वंचित राहिलेले मला पाहवत नाही. 
 हो ! म्हणून साऱ्या पोरांचा ठेका काय तुम्हीच घेणार का? साऱ्या नाही , पण ह्या आश्रमातल्या मुलांना नक्की हवी ती मदत करणार. तुला काही कमी पडणार नाही याची खबरदारी नक्की घेणार. 
   तुम्ही कसे ठरवणार मला काय कमी पडते ते. 
बाकीचे मास्तर बघा, घरी कसे ट्युशन घेतात. त्या तुमच्या साठे गुरुजींची बायको सांगत होती ३० पोरं आहेत म्हणे त्यांच्या कडे ट्युशनला. चांगले महिन्याला ४०,५० हजार रुपये मिळतात म्हणाल्या. काय दागिने आहे हो तिच्याकडे?  परवा दामले काकूंकडे हळदी  कुंकू साठी आलेली. पिवळी धमक दिसत होती. जणू सोन्यानेच मढवलेली. 
   एक माझे नशिब बघा ! लग्नाच्या वेळी एक मंगळसूत्र घातले होते. त्या नंतर एक मणी सुध्दा घेतला नाही. 
   हे बघ सुलेखा ! मी मुलांच्या ट्युशन कधीच घेणार नाही. काही अडल तर मुलं माझ्याकडे  निसंकोच पणे येऊन त्यांच्या अडचणी सोडवून घेतात. मुळात माझी शिकवण्याची पद्धत मुलांना इतकी अवगत झाली की माझ्या विषयाचा क्लास कोणताच मुलगा लावत नाही ! 
  इथेच तर तुमचे चुकते !  म्हणजे  ?
 म्हणजे असे, वर्गात थातुर मातुर काहीतरी शिकवायचे. मुलांना कळले नाही की , आपसूकच क्लास लावतात.  
विद्या दान करायची असते ! विकायची नाही ! 
काही झाले तरी मी हे करणार नाही!  चांगला पगार मिळतो, गरजा भगतात त्यात. 
  तुमच्या भागत असतील , माझ्या नाही ?
 मग आता सवय करून घे ! 
सुलेखा ताई कुस बदलून झोपी गेल्या. 
   सकाळी उठल्यावर पाहतात तर त्यांचे मिस्टर घरात नव्हते. 
सुलेखा ताईंनी फोन केला.  नेहमी प्रमाणे रविवार म्हणून ते आश्रमात गेलेले. 
   बरोबर अकरा वाजता गेट वरूनच आवाज आला, सुलेखा, समीर बाहेर या ! 
दोघे मायलेक बाहेर आले. समीरला बघून म्हणाले, समीर तू नेहमी म्हणायचा बाबा मला एक भाऊ किंवा बहीण हवी होती खेळायला. हा बघ मी तुला भाऊ आणला. 
    सुलेखा ताई डोळे विस्फारून गुरुजी कडे पाहतच राहिल्या. 
    ते गेटच्या आत येत म्हणाले सुलेखा, समीर हा स्वराज. आजपासून आपल्याकडेच राहणार. आपण याला रीतसर दत्तक घेतोय. मी आश्रमात तसे बोलून आलो. 
   सुलेखा मला माहित आहे हे तुला आवडणार नाही. मी स्वराजला आधीच त्याची कल्पना दिली. तू अजिबात काळजी करू नको. असेल त्या परिस्थितीत तो adjest करेल. 
    मी नेहमी आश्रमात जायचो , सगळी मुलं मला सर म्हणायचे . हा एकटाच काहीच म्हणायचा नाही,  बोलायचा नाही. पण मी जेव्हा जेव्हा याला एकटा कुठे दिसलो की बाबा म्हणून हाक मारायचा आणि कंबरेला घट्ट मिठी मारत होता. नेहमी मला वाटायचे याचे नी माझे काही तरी ऋणानुबंध नक्की असावे. 
न राहून आज याला घरी घेऊन आलो. 
   सुलेखा ताईंनी त्याला कधीच आपले मानले नाही. त्याचा कायमच दुस्वास केला. तो मात्र नेहमी त्यांना आई म्हणून हाक मारायचा. 
   समीर, आणि स्वराज दोघे खूप हुशार. दोघे इंजिनिअर झाले. समीर एमएस करायला अमेरिकेत गेला. स्वराज कॅम्पस मधून जॉबला लागला. पहिली पोस्टिंग बंगलोरला मिळाली. चार वर्ष जॉब केला. उत्तम परफॉर्मन्स म्हणून मग कंपनीने त्याला दोन वर्षासाठी कॅनडाला पाठवले. लग्न करून कॅनडाला गेला. नित्य नेमाने फोन करत होता. गुरुजींची तब्येत आजकाल बरी नसते, त्याला सारखे एकदा भेटून जा म्हणून म्हणायचे. त्याला येणे जमले नाही. 
   अचानक यांनी त्याला स्वप्नात जाऊन भेटायला बोलावले. खरच स्वतःच्या मुलाला आई वडिलांची किंमत नाही. पण हा पोरगा रोज फोन करायचा. समीर महिन्या दोन महिन्यातून एकदा करायचा. थोडीफार विचारपूस केली की फोन ठेऊन द्यायचा. किती वेळा सागितले अरे तीन वर्ष झाली तू आलेला नाही. तर म्हणायचा वेळ नाही. वरून म्हणायचा तिकीट किती महाग आहे माहित आहे का ? मला परवडणार नाही. 
   मध्ये त्याचा फोन आला, त्याला म्हणाले अरे तुझे बाबा खूप थकले. एकदा तुझ्या लेकीला घेऊन ये. नातवंडं पहायची इच्छा आहे त्यांची. तर म्हणाला ती लहान आहे. तिकडची ती धूळ, ती गरमी तिला काहीच सहन होणार नाही. 
   हे खूप स्वाभिमानी पुन्हा त्याच्या बरोबर बोलले सुध्दा नाही. 
    शेवटच्या क्षणी फक्त स्वराज चे नाव घेत होते. स्वराज...  स्वराज.... करत प्राण सोडला. 
खरच किती निष्ठुर मी  ? त्याला फोन करून बोलवायला नकार दिला. पण हे स्वप्नात जाऊन त्याला दृष्टांत देऊन आले. आणि तो सुध्दा काहीही विचार न करता Direct निघून आला.
   खरच हे म्हणत होते तसे याचे नी आमचे काहीतरी ऋणानुबंध नक्की असावे. हे हाडाचे शिक्षण यांना कळले. मी स्वतःच्या मुलाच्या प्रेमात इतकी आंधळी झाले होते की,  स्वराज चे प्रेम , त्याची आईच्या प्रेमासाठीची धडपड नाही समजू शकले.
   आज तोच स्वराज , माझ्या मांडीवर डोके ठेऊन हमसून हमसून रडतो आहे. 
   आई तू एकटी नाहीस.  हा तुझा मुलगा तुझ्या सोबत आहे. आई मी तुला कधीच काही कमी पडू देणार नाही. आणि एकटी तर मुळीच सोडणार नाही. मी कंपनीला विनंती करतो की मला माझ्या देशात परत जायचे आहे . आई आज पासून तू माझी जबाबदारी. गुरुजींनी मला स्वप्नात हे ही सांगितले, स्वराज माझ्या माघारी तू तुझ्या आईला सुखात ठेवशील. मी बाबांना स्वप्नात वचन दिले. 
    सुलेखा ताईंचे डोळ्यातून अश्रू धारा वाहू लागल्या. म्हणाल्या स्वराज मला माफ कर बेटा. या तुझ्या आईला एकदा माफ कर. 
    स्वराज ने आई !!!म्हणून पहिल्यांदा सुलभा ताईंना मिठी मारली. सुलभा ताई त्याच्या डोक्यावरून हात फिरवत राहिल्या. 
    कुणीतरी आवाज दिला, स्वराज आला, चला आता गुरुजींना न्यायची तयारी करा. 
    सुलभा ताई भानावर आल्या. स्वराजच्या खांद्यावर डोके टेकून त्या अश्रू ढाळत होत्या. 
   कॅनडा हून आलेला स्वराज, घरासमोर लोटलेला जनसागर, ते हार, शाल, कपडे आणि अश्रुंनी डबडबलेले लोकांचे डोळे पाहून आज पहिल्यांदा सुलेखाताईंना आपल्या मास्तर पतीचा खूप अभिमान वाटला. 
   म्हणाल्या  स्वराजचे बाबा मला माफ करा. खरच तुमचे प्रत्येकाशी असलेले ऋणानुबंध समजून घ्यायला कमी पडले हो मी! पण मी आता माझी चूक सुधारते. स्वराज आपला मुलगा आहे आणि हो आजपासून आपल्याला फक्त एकच मुलगा आहे ....स्वराज...
   इतकंच म्हणाल्या, रक्ताच्या नात्यापेक्षा ऋणानुबंधाची नाती  अतुट असतात.
   जोशी गुरुजी उशिरा पटले हो ! 
   तुमच्या सुलेखाला माफ करा !
 प्लीज!!!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...