प्रार्थनेचे शब्द महत्वाचे नसतात तर त्या मागचा भाव महत्वाचा असतो.
एक लहान मुलगी रोज सकाळी मंदिरात जावून मूर्तीसमोर उभी राही व डोळे बंद करून हात जोडत दोन मिनिटे काहीतरी पुटपुटत असे. नंतर डोळे उघडून नतमस्तक होई व स्मितहास्य करून धावतपळत बाहेर जात असे. हा दिनक्रम रोजचाच झाला होता. देवळातील पुजारी तिच्याकडे निरखून पहात होता. ती रोज काय करीत असते हे समजण्याची उत्सुकता त्यांना वाटू लागली. त्यांना वाटले, ती मुलगी इतकी लहान आहे की धर्माचा सखोल अर्थ तिला समजणे केवळ अशक्य. तिला कोणतीही प्रार्थना येत नसेल. मग रोज सकाळी देवळात येण्याचा काय अर्थ. असेच १५ दिवस निघून गेले. तिच्या वर्तनाविषयी अधिक जाणून घेण्याच्या जिज्ञासेमुळे त्यांची बेचैनी वाढू लागली. एकदा सकाळी ती मुलगी तेथे येण्याच्या अगोदर ते तिथे पोहोचले. तिचा नित्यक्रम संपण्याची त्यांनी वाट पाहिली. त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले,
मागील १५ दिवसांपासून तू नियमितपणे येथे येते हे मी पहात असतो. तू काय करतेस ? ती एकदम म्हणाली
" प्रार्थना "
पुजारी यांनी जरा साशंकतेनेच विचारले, तुला एखादी प्रार्थना येते ?
" नाही." असे ती म्हणाली.
मग तू डोळे मिटून रोज काय करते? असे त्यांनी हसून विचारले.
अगदी निरागसपणे ती म्हणाली, मला कोणतीच प्रार्थना येत नाही "
a,b,c,d पासून z पर्यंत माहित आहे. ते ५ वेळा मी म्हणते आणि परमेश्वराला सांगते की मला तुझी प्रार्थना येत नाही पण ती नक्कीच या alphabets च्या बाहेर असूच शकत नाही. ही alphabets तुझ्या इच्छेनुसार क्रमश: लावून घे आणि तीच माझी प्रार्थना !
ती उड्या मारत बेभानपणे धावत निघून गेली. ती दिसेनाशी होई पर्यंत निरखून तिच्याकडे पहात पुजारी नि:स्तब्ध होवून उभे राहिले.
ज्याची आपण मनोभावे पूजा करतो अशा परमेश्वरावर अतूट असलेली हीच ती श्रद्धा. !!
अगा बावन्न वर्णा परता।
कोण मंत्रु आहे पांडुसूता।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा