त्यागाने उजळते मुर्ती. पण ती कोणाची ? म्हटल तर तुमची आमची आणि सर्वांचीच. पण मोबदल्यात कशाचीही प्राप्ती/अपेक्षा नसावी. असावा तो निर्मळ निर्व्याज त्याग. साधू तपस्वी जरुर असेल पण तो तेजस्वी असेलच असे नाही. हा तेजस्वीपणा येतो तरी कोठून ? तर तो तेजस्वीपण येत असतो तो त्याच्या अंर्तबाहय त्यागातून. जोपर्यंत तो अंर्तबाहयरीत्या त्यागी होती होत नाही तो पर्यंत तो तेजस्वी होत नाही. ब-याच वेळा आपल्या डोळयासमोर प्रसिध्द, थोर, पुजनीय व्यक्ती आणि त्यांनी केलेला त्याग हाच आपला आदर्श असतो. पण सामान्य व्यक्तीच्या चेह-यावर देखिल त्याच्या त्यागातून आलेला तेजस्वीपणा आपल्याला पहायला मिळतो. भले त्याला प्रसिध्दी मिळालेली नसेल, पण त्याचा त्याग मात्र निश्चितच उध्दारक असतो. याचीच प्रचिती येणारा हा लेख.
तसा मी फार लहानही नसेल आणि तरुणही नसेल अशा कुमार वयाच्या टप्प्यावर होतो. माझा मित्र प्रकाश हा जरी वयाने मोठा असला तरी त्याची आणि माझी दोस्ती जमायचे मुख्य कारण म्हणजे त्याच्या घरी असलेली असंख्य पुस्तके. प्रकाशचा मोठा भाऊ अशोक. त्याला आम्ही अशोकदादाच म्हणायचो. अतिशय सालस, निर्व्यसनी बाबासाहेब आणि तथागताच्या विचारप्रवाहाने प्रेरीत व्यक्तिमत्व. सर्वंकष वाचन, वास्तवाचे भान आणि नोकरीशिवाय तरणोपाय नाही, ही खुणगाठ बांधलेली असल्याने अशोकदादाला महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांनाच नाशिक येथील भारत सरकारच्या उपक्रमात नोकरी मिळाली. घरी, दारी आमच्या सर्व मोहल्ल्यात आनंदी आनंद झाला.
अशोकदादाचे नित्यनियमाने नोकरीवर जाणे-येणे सुरु झाले. सकाळी कामावर निघतांना घराबाहेर जे-जे दिसतील त्यांना हस्तांदोलन करुन, छोटयांना बाय-बाय करुन स्वारी हसतमुखाने कामावर जात असे. तर संध्याकाळी कामावरुन पतरतांनाही चेह-यावर कसलाही तान नाही की थकवा नाही अशा आनंदी मुड मध्ये स्वारी येत असे. सहाजीकच अशा गुणवान मुलाचे स्थळ प्राप्त करुन घेण्यासाठी अनेक उपवर मुलींच्या पित्यांचे येणे-जाणे सुरु झाले. नोकरीमुळे आर्थिक स्थैर्य प्राप्त झाल्याने अशोकदादाच्या आई-वडीलांनीही त्याच्यासाठी अनुरुप वधू शोधण्याच्या मोहिमेवर निघाले. सुस्वरुप मुली दाखवल्या जात होत्या काही नोकरीस देखिल होत्या पण अशोकदादा त्याबाबत काही मत देत नव्हता. श्रीमंत/धनवान मंडळी येऊन गेली, पण काही पसंती होत नव्हती.
अशातच त्याला त्याच्या कामावरील एका मित्राने आपल्या दुरच्या नातेवाईकाने त्यास मुलगी पहाण्यासाठी निमंत्रण पाठविले. मुलीच औपचारीक माहिती विचारली असता फक्त १२ वी पर्यंत शिकली आहे, एवढेच सांगण्यात आले. फोटो नाही की फोन नाही. अर्थात त्याकाळी फोन, मोबाईल यांचे फॅडच नव्हते. होता तो खुले आम पोस्ट खात्याव्दारे करता येणारा पत्रव्यवहार. मुलीचे गांव दूर असल्याने पत्राद्वारे पूर्वकल्पना देवून एक दिवस मुलगी पहाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अशोकदादाचे आई-वडील, मोठे चुलते, बहिणी आणि अशोकदादा असे ५-६ जन मुलगी पहाण्यासाठी गेले. मुलीच्या घरी जाताच मुलीच्या मातापित्याने मुलीची प्रशंसा करुन तिने केलेल्या अनेक कलात्मक वस्तुंची आरास मुलाकडील मंडळींना दाखविली. चहा-पोहे झाले. मुलगी सुंदर, सुनयनी , सुहास्यवदनी होती. वरपित्याने मुलीस समोर बसायला लावले व नांव विचारले आणि झर्रकन मुलीचा चेहरा उतरला. मुलीचा पिता सर्वांची माफी मागत, काळजावर दगड ठेवत म्हणाला,” मुलगी मुकी आहे”. क्षणभर सर्वत्र शांतता पसरली. आपल्याला मुलीची माहिती दिली नाही, आमची घोर फसवणूक करण्यात आली, येवढ्या लांब आलो नाहक आर्थिक भुर्दंड. अशोकचे आई-वडील, चुलते, बहिणी सर्वचजन तणतन करु लागले. मुलीचे वडील त्यांना थांबवून जेवणाचा आग्रह करत होते पण मंडळी काही थांबली नाही, अशोकदादाला पुढयात घेऊन तडक परत निघाली.
परतीच्या प्रवासात कोण-कोण काय-काय मत व्यक्त करत होते, पण पुर्ण प्रवासात अशोकदादाने कोणतेच मत व्यक्त केले नाही. मात्र घरी येताच आपले मत त्याने व्यक्त केले आणि त्याच मुलीशी लग्न करणार असे स्पष्ट सांगितले. सर्वांनी हरएक प्रकारे त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. मुकी मुलगी, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर अडचणी येणार. भविष्यात मुलबाळ झाल्यास तेही कसे होईल, अशा निरनिराळया शंका उपस्थित करण्यात आल्या. पण, पण तो निर्णय झाला होता. जणूकाही अशोकाच्या अंगात सम्राट अशोकच अवतरला होता. सामाजिक न्यायासाठी, समानतेसाठी एका सुस्वरुप मुलीला केवळ वाणी नाही म्हणून का म्हणून तीला नाकारायचे. तिचा उध्दार करण्यासाठी दुसयाकडे का म्हणून बोट दाखवायचे. तिच्या माता-पित्यास हीनता येईल असे तरी काय तिच्यात कमी आहे. शेवटी अशोकदादाचाच विजय झाला. मुलीचे माता पित्यांना निरोप पोहचविण्यात आला. मुलीच्या अश्रुंन्ना आनंदाची किनार आली. धुमधडाक्यात लग्न झाले. तिच्या सुस्वरुप स्वभावाने सर्वांची मने जिंकली. आता वाणी जरी नसली तरी डोळयांनी बोलता येते, स्पर्शाने भावना व्यक्त करता येतात, आणि आणि न बोलताच सा-या कुटूंबालाच दुस-याच्या मनातील अव्यक्त भाव ओळखता येतात, ही काय छोटी जादू आहे. यथावकाश अशोकदादास मुले बाळेही झाली ती देखिल कोणताही वाणीदोष वा कोणतेही व्यंग नसलेली.
एका सामान्य कुटूंबातील अशोकदादाचे हे वर्तन, हा त्याग अतुलनीय आहे. तुम्ही म्हणाल त्याग कसला, त्याग होता तो सुखासीन जगण्याचा, त्याग होता तो संपत्तीचा, त्याग होता परिपुर्णतेचा. त्याने ठरविले असते तर नोकरी असेलेली मुलगी, धनवान मुलगी, वा कोणतेही व्यंग-कमतरता नसलेली मुलगी त्याला आयुष्याची साथीदारीन म्हणून सहज निवडता आली असती. पण समानता ही एकतर्फी असून चालत नाही तर ज्यांच्याकडे काही कमी आहे त्यांना सोबतीला घेवून त्यांचेगतीने पुढे जाणे हीच खरी समानता. पुढे जाणे जरी महत्वाचे असले तरीही त्याहीपेक्षा सर्वांना सोबत घेवून जाणे अधीक महत्वाचे. “ जे का रांजले वा गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधु ओळखावा.” दुर्दैवाने आज त्यागी साधु दुर्मिळ झालेत आणि संधी साधुंचेच अमाप पीक आले आहे.
शब्दांकन :- किरण म.शार्दूल,
कक्ष अधिकारी, सा.प्र.वि. मंत्रालय, मुंबई.
मोबाईल-९८२०२६७७२६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा