आकाश झाकोळतच जाणार आहे, तुम्ही तयार असायलाच हवं ! चिनी लेखक झोऊ डॅकसीन च्या कादंबरीचा सारांश अतिशय सुंदर वाटला. म्हणून पाठवित आहे. विचार करायला लावणारं हे लिखाण पटलं तर स्वीकारा नाहीतर डिलीट हा पर्याय आहेच.
प्रौढत्व आणि वृद्धत्व या आयुष्यातील वळणावर जे भावनिक जग अनुभवायला मिळते, जी उपेक्षा पदरी येते आणि त्यावर मात कशी करायची त्याची संवेदनशील आणि अचूक मीमांसा लेखकाने केली आहे. माणसाची प्रवृत्ती अशी असते की, प्रौढत्वाकडे झुकल्यानंतर स्वतः बद्दल वाजवीपेक्षा जास्तच आत्मविश्वास त्याच्या ठायी निर्माण होतो. आपल्याला आता सर्वच जगाचे ज्ञान आहे अशी त्याची धारणा असते. वास्तविक असे काहीच नसते आणि अनेक बाबतीत तो अज्ञानीच असतो. प्रौढत्वाकडे झुकणारा फार मोठा वर्ग आपल्या समोर उभ्या ठाकलेल्या भविष्याविषयी नुसताच अनभिज्ञ नसतो तर कमालीचा गोंधळलेला असतो. त्यासाठी त्यांच्या मनाची तयारी झालेली नसते. आपण प्रौढ किंवा वृद्ध झाल्यावर आपल्यासमोर काय वाढून ठेवले असेल असा विचार त्यांनी केलेलाच नसतो. समाजात आपल्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या अशा वर्गाला काय भोगावे लागत आहे हे पाहण्यासाठी त्यांना एक तर वेळ मिळालेला नसतो, किंवा सोयीस्कर दुर्लक्ष तरी केलेले असते किंवा आपली गोष्ट वेगळी आहे अशा भ्रमात ते असतात. वयाची साठी गाठल्यावर आयुष्याच्या वाटेवरील दिवे मंद होऊ लागतात. त्या वाटेवर संपूर्ण अंधार होण्यापूर्वी आपल्याला त्या मार्गावरून चालणे टाळता तर येत नाही. त्यामुळे या अंधाऱ्या वाटेवरून न गोंधळता, मनाचा तोल न ढळू देता मार्गक्रमण करायचे असते त्यासाठी मानसिक तयारी करावी लागते. तुमच्या आजूबाजूच्या मंडळींची संख्या कमी होत जाणार असते. ती तुम्ही रोखू शकत नाही. तुमच्या आधीच्या पिढीतील मंडळी आयुष्याच्या वाटेवर कितीतरी आधीच हरवलेली असतात. तुमचे समकालीन जे सहकारी असतात त्यांना आता स्वतःची काळजी घेणे ही अवघड झालेले असते त्यामुळे त्यांच्याकडून काही अपेक्षा ठेवू नका.
तुमच्या पेक्षा लहान मंडळी ही त्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या टप्प्यावर स्वतःचे भविष्य घडविण्यात दंग असतात. तुमच्या आयुष्यात कमी अधिक स्वरूपात तुम्ही पण हेच केलेले असते! त्यामुळे त्यांना तुमच्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळणार नाही हे तुम्ही गृहीत धरायला हवे असते. मुलं आपल्याला विचारणार नाहीत हे गृहीत मनाशी पक्के बांधून ठेवा म्हणजे मुलं आपल्याला विचारीत नाहीत ही खंत मनाला कधीच वाटणार नाही. आयुष्याच्या या अवघड वळणावर तुमच्या आयुष्यातील सहचर तुमच्या आधी तुमची साथ सोडून जाण्याची शक्यता असते. त्यांनतर जीवनात जी पोकळी निर्माण होते तिला सामोरे जाणे तसे सोपे नसते! त्यामुळे एकाकी जीवन जगण्याची मानसिक तयारी असावी लागते. आपल्यासाठी आता कुणाकडे वेळ नाही हे सत्य वेळेवर स्वीकारले तर जीवन जगणे असह्य होणार नाही हे नक्की ! समाज आता तुम्हाला विसरत जाणार आहे आणि त्याच्या विसरण्याचा वेग हा तुमच्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त असतो. तुमचा इतिहास कितीही उज्ज्वल आणि दैदिप्यमान असला, तुम्ही कितीही प्रसिद्धी च्या झोतात वावरले असलात, तरी आता ते दिवस राहिलेले नाहीत हे सत्य तुम्हाला स्वीकारावेच लागेल. प्रौढत्वा कडे आणि वृद्धत्वा कडे जातांना तुम्ही सर्वसामान्य जनतेपैकी एक बनता हे ही सत्य स्वीकारता आले पाहिजे. आयुष्यात स्वतःवरच समाजाचे लक्ष केंद्रित राहील अशी चुकून सुद्धा अपेक्षा करू नका. एका कडेला उभे राहून जगाची प्रगती बघत असताना तिला दाद द्या, निसर्गाच्या सौन्दर्याचा आस्वाद जितका घेता येईल तितका घ्यायला शिका. स्वार्थ आणि मत्सर या दोन गोष्टी पूर्ण विसरून जा. तक्रार न करता आयुष्य जगायला शिका म्हणजे आयुष्य जगणे अवघड वाटणार नाही.
तुमची पुढची वाट खाचखळग्यांची आणि अडथळ्यांची असणार आहे. या वाटेवर हाडे मोडणे, हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब, कर्करोग, विस्मरण यासारखे मित्र भेटण्याची शक्यता आहेच. त्यांना नाही म्हणणे तुमच्या आवाक्याबाहेर असणार आहे. त्यामुळे त्यांना मित्र मानणे हाच एक पर्याय तुमच्यासमोर राहणार आहे याची जाणीव सातत्याने ठेवा. शरीर जितके चांगले राखता येईल तेव्हढे राखण्यात कसलीही कसर पडू देऊ नका. सकारात्मक प्रवृत्ती हरवू देऊ नका. आयुष्याच्या या अवघड वळणावर तिची आज सर्वात अधिक गरज आहे हे ध्यानी असू द्या. स्वतः ला प्रोत्साहन देत राहा. पलंगावर लोळण्याचे नव्हे तर पलंगाला बांधले जाण्याचे दिवस येतील, त्यांचा स्वीकार करण्याची मानसिक तयारी करा. आपल्या आईने एका पलंगावर आपल्याला जीवनाची सुरुवात करून दिली होती. आयुष्यातील अनेक वळणांचा प्रवास पूर्ण करून आपण पुन्हा एकदा या पलंगावर पोहोचत आहोत, पण यावेळेला आईचा मायेचा हात मात्र पाठीवर नसेल हे ध्यानी घ्या. तिच्या मायेच्या हजारांश हिस्सा देखील आपल्याला आता मिळणार नाही ही खात्री ठेवा. जर तशी ती मिळाली तर आयुष्यातील ते सर्वात मोठे बक्षीस असेल आणि त्याची किंमत जरूर ठेवा. आजूबाजूचे लोक पैशासाठी तुमची सेवा करीत असतील तर त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवा आणि शक्य ती परतफेड उद्याची वाट न पाहता करीत राहा. कदाचित तुम्हाला अपेक्षित असणारा उद्या उजाडणार ही नाही ही शक्यता नेहेमीसाठीच गृहीत धरा. तुमच्या आयुष्यातील या अवघड वळणावरील वाटचालीत आर्थिक स्वातंत्र्य असले तर जीवन खूप सुसह्य होईल. समोरचे भरलेले ताट तुम्ही देऊ शकता पण बसायचा पाट मात्र कुणालाही देऊ नका. आपल्या या पुंजीचे आपल्यानंतर काय करायचे याच्या संबंधी कायदेशीर मृत्युपत्र नक्कीच तयार करून ठेवा म्हणजे समाजविघातक प्रवृत्ती त्यापासून दूर ठेवता येतील.
जितके दिवस शक्य असतील तेव्हढे दिवस समाजाची जमेल तशी सेवा करा, सुहृदांनी मागितली तर जरूर त्यांच्या पाठीशी उभे राहून मदत करा, पण त्यात गुंतून पडू नका, पर्यटनातून आयुष्यातील आनंद उपभोगा आणि मृत्यूची भीती वाटू देऊ नका. आज जरी मृत्यू आला तरी मी त्याला सामोरा जाण्यासाठी ज्याची मनाची तयारी असते त्याने खऱ्या अर्थाने यशस्वी व सुखी जीवन जगलेले असते हे निश्चित !
शरद काळे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा