..तिला वाटलंच होतं ! तसंच घडतंय. महिन्याभराच्या ओळखीनंतर त्याने 'ती' मागणी केलीच. हो - तीच मागणी. नराने मादीकडे केलेली मागणी.
- "नाही." ती शांतपणे म्हणते. आश्चर्य नाही. शॉक नाही. आवाजात, चेहऱ्यावर, देहबोलीत कुठेही अस्वस्थता नाही. अगदी... शांत! नेटकं, सरळ - 'नाही'!
- "काय प्रॉब्लेम आहे?" तो विचारतो.
हेही अपेक्षितच होतं! तिला मनात हसू येतं.
- "प्रॉब्लेम असण्याचा संबंधच कुठे येतो?"
- "मग 'नाही' का?"
- "वडापावमध्ये प्रॉब्लेम काहीच नसतो. छान लागतो! पण मला तो आत्ता खायचा नाही. सिंपल! म्हणूनच, नाही."
हा युक्तिवाद ऐकून त्याची थोडी चलबिचल. मग अचानक साक्षात्कार झाल्याप्रमाणे -
- "आत्ता नाही... म्हणजे... नंतर चालेल का?"
- "नाही." पुन्हा तितकाच शांतपणा.
आता तो थोडासा चिडल्यासारखा.
- "आताही नाही; नंतरही नाही. तू... कोल्ड फिश आहेस का?"
- "किंवा तुला बघून मी कोल्ड होत असेन!"
त्याच्या डोक्यात एक तीव्र सणक जाते. पण ती खट्याळपणे हसते.
- "अरे चिडू नकोस राजा ! चेष्टा केली मी. चांगला हँडसम आहेस बरं का तू ! इतकंच की, मला लग्नापर्यंत थांबायचंय."
- "हॅ...! फालतूगिरी आहे ही."
हे ऐकून ती शांतपणे मान डोलावते. मनात काहीएक प्रश्नाचं उत्तर मिळाल्याप्रमाणे.
- "दुसऱ्याचे विचार तुझ्याहून वेगळे आहेत, हे पाहून तुझी पहिली प्रतिक्रिया म्हणजे 'फालतूगिरी आहे ही'. इंटरेस्टिंग. आणि तुला माझ्याशी रिलेशनशिप हवीये म्हणतोस?!"
तो लगेच शाळा घेण्याच्या भूमिकेत -
- "हे बघ. ती आपली एक नैसर्गिक गरज असते. त्यात काहीही वाईट नाही. उलट या इच्छा दाबून ठेवणं, हा मूर्खपणा ---"
- "रस्त्यावर पडलेलं अन्न खाल्लंयस कधी?"
- "अं?"
- "पोटाची भूकसुद्धा नैसर्गिकच असते. त्यातही काही वाईट नसतं. तीही इच्छा दाबून ठेवता येत नाही. पण म्हणून कुणी रस्त्यावर पडलेलं अन्न खात नाही. पोटाची भूक भागवण्याआधी स्वयंपाकाची जबाबदारी घ्यावी लागते! तो सात्विक असेल यासाठी कष्ट घ्यावे लागतात! हां, म्हणजे; तसं हॉटेलचं खाणंही चालून जातं; पण ते आपल्याआधी उंदीर-घुशींनी चाखलेलं असतं! त्यांचे रोग आपल्यालाही जडू शकतात."
तो आता दमदमीत चिडलेला.
- "मीही रस्त्यावर पडलेला पोरगा नाही ना? मी एका घरंदाज घराण्यातला इंजिनिअरिंग झालेला ---"
- "तांदूळ आहेस!"
- "अं?"
- "हो, तू तांदूळ आहेस; अन् मी भाज्या ! नातं म्हणजे मॅगी नसते, बिर्याणी असते. मॅगी दोन मिनिटांत होते; बिर्याणीला वेळ लागतो. आपल्या नात्याची बिर्याणी अजून शिजलेली नाही; ओळखीला महिनाच झालाय. कुकरच्या शिट्या झाल्यात कुठे? भाज्या अजून शिजल्यात कुठे? अजून बरेच मसाले घालायचे बाकी आहेत. अजून एकमेकांना समजून घ्यायचंय. एकमेकांचं पाणी जोखायचंय. शरीर बाजूला ठेवून मनाशी संवाद घडवायचाय. प्रोसेस असते साहेब! तांदूळ कसा पिठुळला जायला हवा! भाज्या कशा त्या ऊबेत समरसून जायला हव्यात! 'तू' आणि 'मी' बाजूला होऊन एक 'आपण' निर्माण व्हायला हवा. त्या 'आपण'ची जाण, म्हणजे प्रेम. आणि त्या प्रेमावर जबाबदारीने उमटवलेली मुद्रा, म्हणजे लग्न. असं मला तरी वाटतं. म्हणून मला लग्नापर्यंत थांबायचंय."
त्याला शब्द सुचेनात... तीच पुढे म्हणते,
- "एक मुलगी जेव्हा एखाद्याला शरीरात प्रवेश देते ना, तेव्हा नुसतं शरीर नाही; मनात- आत्म्यात- संपूर्ण अस्तित्वातच प्रवेश देते. सामावून घेते. घरात प्रवेश मागणारी ऊर्जा तेजस्वी आहे का वाळवी आहे, हे बघायलाच हवं! अन् हे घरानेच बघायला हवं. आत्ता जवळ आलो तर तुला कचवट भाज्या मिळतील नि मला वातड तांदूळ! समजलास? तुला चालेलही कदाचित; पण मला नाही!"
क्षणभर त्या उपमा त्याचं पुरूषपण थिजवून जातात. ही पहिली वेळ नसते त्याची. याआधी कधी असं झालं नव्हतं! पोरगी एव्हाना... गुंडाळली जायची... हीसुद्धा जायला पाहिजे होती... हे असं काय घडतंय? च्यायला फॉर्म गेला काय खेळातला? थांब बे, आता बोलायलाच हवं.
- "पण... बिर्याणी नाहीच मिळाली तर? उपाशी राहणार का?" (शब्दात नि चेहऱ्यावर पुन्हा एकदा शाळा घेण्याचा नूर.) "बाकीची लोकं बघ जरा! कशी मॉडर्न असतात! प्रेम वेगळं. संसार वेगळा. वासना वेगळी. हल्ली असं वेगवेगळं, सुटसुटीत, 'सॉर्टेड' जगतात."
- "हो! आणि मग एकदा व्हरायटीची सवय लागली की लॉयल्टी विसरतात!"
चपराक मारल्याप्रमाणे तो शटडाऊन झाला. ती समंजसपणे हसली. म्हणाली,
- "बिर्याणी नाही मिळाली तर पुलाव मिळेल. हां, पण एक नक्की! मी वातड भात तर खाणार नाही. आणि हो, मी माझी चोथा झालेली भाजी तर नक्कीच होऊ देणार नाही. सुटसुटीत 'सॉर्टेड' जगण्यात मजा येतही असेल; पण तिथे भात आणि भाज्या वेगवेगळ्या खाल्ल्या जातात. तिथे 'चव' येत नाही! मला प्रेमाचा एक उत्कट आविष्कार म्हणून मीलन हवंय; नुसती वासनाशांती नकोय! मला जेवणाची तृप्ती हवीये; फक्त पोट भरणं नकोय! बाकीच्या लोकांशी मला घेणं नाही. त्यांनी कसं जगायचं हे मी ठरवत नाही. माझंच बरोबर असाही माझा अट्टाहास नाही. मी फक्त माझ्यापुरतं चूक/बरोबर ठरवते. मला जे योग्य वाटतं ते मी जगते. ज्यांना मॅगी हवीये त्यांनी ती जरूर खावी. त्यातल्या 'अजिनोमोटो'चे किडनीवर होणारे परिणाम स्वीकारून खावी. मी नाही खाणार! मॉडर्न असणं म्हणजे असं विचारांच्या बाबतीत स्वतंत्र असणं. पन्नास वर्षांपूर्वी गर्दी 'नाही' म्हणायची म्हणून आपणही 'नाही' म्हणायचो. ते बुरसटलेलं होतं. आज गर्दी 'हो' म्हणते म्हणून आपणही 'हो' म्हणायचं हेही मॉडर्न नाही; ते बुरसटलेलंच झालं. कारण तोंडाने 'हो' म्हणण्याआधी डोळ्याने 'का' हे विचारलं जायला हवं. किती लोक असं स्वतंत्रपणे तपासतात हे? एखाद्या गोष्टीचं स्वातंत्र्य तेव्हाच असतं, जेव्हा ती गोष्ट नाकारण्याचंही स्वातंत्र्य असतं. तेच स्वातंत्र्य मी जगतेय! विषय संपला!"
तो तिच्या पाणीदार डोळ्यातल्या स्वाभिमानी बुद्धीकडे पाहत राहतो. त्याच्या मनात फटाफट गणितं चालू...
- "तुला लग्नाचं प्रॉमिस हवंय का? माझ्यावर विश्वास नाही का? मी ---"
तो बोलायचा थांबतो; कारण ती खळखळून हसूच लागलीये...
- "अरे अजिबात नाही! मी तुझ्याकडून कसलंही प्रॉमिस मागत नाहीये; तू दिलंस तरी मी फारसं गांभीर्याने घेणार नाहीये. प्रॉमिस तर सगळेच देतात रे! प्रॉमिसिंग नसलेले तर नेहमीच देतात. तू प्रॉमिसिंग आहेस का नाहीस ते तपासणं ही माझी जबाबदारी आहे. त्यासाठी शब्द पुरेसे नसतात; कृती पाहायची असते. आणि आता सध्या तर विश्वासाचा प्रश्नच येत नाही. महिन्याभरात काय कळतंय? कुठली वेब सिरीज भारी असते नि कुठे मिसळ भारी मिळते यापलीकडे आपण बोललोच काय आहोत?"
आता तो एकदा रागाने नाक उडवतो. काय अटिट्यूड दाखवते ही? अशा छप्पन कोलल्यात आजवर... त्याच्या नजरेत हाराकिरी...
- "देख! (हिंदी कशासाठी?) ही गोष्ट मला हवीच आहे. ओ के? माझ्या मते ही गोष्ट कोणत्याही रिलेशनशिपचा अविभाज्य भाग आहे. ती जर आत्ता मिळणार नसेल तर मी उगाच या रिलेशनशिपवर पुढे कष्ट घेणार नाही. मला आत्ताच सांग."
पुन्हा एकदा मनात काहीएक उत्तर मिळाल्याप्रमाणे ती धीमेपणाने मान डोलावते. मंद हसते. म्हणते,
- "थोडक्यात म्हणजे माझं शरीर तत्काळ मिळणार नसेल तर मीच नको! अंहं, मघाशी बोलताना चुकलास तू राजा! तुला वाटतंय तसं तुझ्यासाठी हा रिलेशनशिपचा 'अविभाज्य' भाग नाही. तुझ्यासाठी हाच 'सर्वोच्च' भाग आहे! कारण तो मिळणार नसेल तर बाकीचं सगळंच नाकारतोयस तू! हे उघड केल्याबद्दल थँक्यू सो मच! आय थिंक, मला आणखी काही तपासायची गरज नाही. कळायचं होतं ते कळलं! तुझ्या मताचा मी आदर करते. काही बिर्याण्यांचे बेत फसण्याआधी थांबावं! तांदूळ नंतर थालीपीठातही कालवता येतो; भाज्याच तेवढ्या सावराव्या लागतात."
तो उठून जातो; एकदाच मागे वळून बघतो - रडतेय वगैरे का पाहण्यासाठी. तेवढाच एक सुकून मिळाला असता; एक... 'विजय' वगैरे! पण - नाही! ही अगदी नज़ाकतदार तब्येतीत इअरफोनमधून पाझरणाऱ्या 'सिआ' च्या 'अनस्टॉपेबल'मध्ये मुरांब्यासारखी मुरूनही गेलेली असते.
© अपूर्व विकास
समुपदेशक व मानसशास्त्र तज्ज्ञ
{कृपया लेख शेअर केल्यास लेखकाच्या तपशीलासहित करावा, ही नम्र विनंती.}
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा