गुलजार ही व्यक्ती आयुष्यात कधी आली आता आठवतही नाही. ‘लकड़ी की काठी,’ ‘जंगल जंगल बात चली है, चड्डी पहेन के फूल खिला है’ - वगैरे पासून गुलजार साहेबांनी लिहिलेले शब्द बहुदा कानावर पडायला लागले असावेत. पुढे मग त्यांनी लिहायचं आणि आपल्यासाठी ते ब्रह्मवाक्य व्हायचं हे जणू पक्कंच झालं. आधी फक्त गाण्यांतून भेटलेले गुलजार नंतर ‘रावीपार’ मधल्या कथांतून भेटले. मध्येच कधी तरी त्यांच्या सिनेमांतून… पुढे पुन्हा ‘रात पश्मीने की’, ‘पुखराज’ आणि ‘त्रिवेणी’ मधुन भेटले. त्यांचं त्यावेळी धरलेलं बोट हातातून कधीही सुटलं नाही. अतीव आनंद, दुःख, नैराश्य, चिडचिड, भिती, प्रेम, हार्टब्रेक असा आपला प्रत्येक ‘मूड’ कुणाला कळत असेल तर तो गुलजार साहेबांनाच असं कितीदा वाटलंय त्याची काही मोजदाद नाही. एखाद्या प्रसंगात ‘मला नेमकं हेच वाटतंय… हेच म्हणायचंय… this exact feeling!’ हा अनुभव गुलजार साहेबांनी आतापर्यंत असंख्यवेळा दिलाय. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर गुलजार ऐकताना ‘हे आपल्यासाठीच लिहिलंय!’ हे अनेकांच्या मनावर ठसवणं त्यांना एवढं बेमालुम साधुन गेलंय की ‘गुलजार एक्सक्लुसिव्हली आपल्यासाठीच लिहितात!’ यावर ठाम श्रद्धा असलेले किमान दोन लाख डझन तरी लोक अगदी सहज सापडतील.
पाकिस्तानातल्या दीना गावी संपूरण सिंह कालरा नामक व्यक्तीचा जन्म… फाळणीनंतर त्यानं भारतात येणं… गॅरेजमध्ये नोकरी… ती करता करताच लायब्ररीतून सस्पेन्स पुस्तकं आणुन वाचणं… तशातच कधीतरी निर्वासित म्हणून पाकिस्तानातूनच आलेल्या लायब्ररीवाल्यानं आपल्या पसंतीचं एक पुस्तक वाचायला देणं… त्या पुस्तकामुळे रवींद्रनाथ टागोर (टॅगौर… ॲज गुलजार साहाब कॉल्ज हिम) ही व्यक्ती आयुष्यात येणं… संपूरण सिंह कालराच्या आयुष्याला इथं टर्निंग पॉईंट मिळणं… आणि ‘गुलजार’ म्हणून तो पुढे जगभर ख्यातनाम कवी, गीतकार, लेखक, दिग्दर्शक म्हणून ओळखला जाणं… काय आणि किती नाट्यमय असावं एखाद्या व्यक्तीचं आयुष्य. पूर्वी कधी तरी हे वाचलं किंवा ऐकलं होतं गुलजार साहेबांबद्दल… कुठे ते आता आठवतही नाही त्यामुळे संदर्भ सांगता येणार नाही. पण ते खुप खुप लहान असताना त्यांची आई गेली. त्यामुळे त्यांना तिचा चेहरा आठवत नाही. पुढे कधी तरी बरोबरच्या कुणी तरी रस्त्यावरच्या एका बाईला बघुन सांगितलं - देख, ऐसी लगती थी तेरी माँ… त्या बाईचा दात सोन्याचा होता. पुढे त्यांनी अनेकांना विचारलं, माझ्या आईचा दात सोन्याचा होता का? आई म्हणून तिचाच चेहरा त्यांच्या डोळ्यांसमोर राहिला. हे पहिल्यांदा वाचलं किंवा ऐकलं तेव्हा खुप आत खोलवर अस्वस्थ वाटलं होतं. आत्ता हे लिहितानाही ते वाटतं आहे…
गुलजार का आवडतात या प्रश्नाच्या उत्तरादाखल किती कारणं द्यायची? ‘तेरे बिना ज़िंदगी से कोई शिकवा तो नहीं…’ ‘तुझसे नाराज़ नहीं ज़िंदगी हैरान हूँ मैं…’ ‘जिनके सर हो इश्क़ की छाँव पाँव के नीचे जन्नत होगी…’ ‘मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा हैं…’ असं काही काळजाला हात घालणारं लिहिणारा हा मनुष्यच ‘बिड़ी जलैले जिगर से पिया, जिगरमां बड़ी आग है’ वगैरे लिहितो तेव्हा त्याच्यावर प्रेम करणारा माणुस निव्वळ अवाक होऊ शकतो. बाकी काही बोलायची प्राज्ञाच नसते. गुलजार साहेबांनी लिहिलेल्या आवडत्या गाण्यांची आठवण काढत कुठपर्यंत जायचं? माझ्या जन्माआधी ‘य’ वर्ष लिहिलेल्या, हेमंत कुमारनं गायलेल्या ‘तुम पुकार लो, तुम्हारा इंतजार है’ पर्यंत मागे जायचं की अगदी अलिकडे आलेल्या ‘राझी’ मधल्या ‘दिलबरो’ पर्यंत अलिकडे यायचं? आणि एवढं करुन रोज ही पोस्ट एडिट करुन आवडत्या यादीत नवी भर घालता येईल एवढं या माणसानं लिहून ठेवलंय ते वेगळंच. आर. डी. बर्मन अर्थात पंचमदांवर त्यांनी लिहिलेली कविता असो की ‘जिंदगी क्या है जानने के लिए जिंदा रहेना जरुरी है, आज तक कोई रहा तो नहीं…’ सारखी त्रिवेणी. काय काय आठवायचं आणि नोंदवायचं? बरं आपण कविता, गाणी लिहावीत… मोठमोठाली अवॉर्ड्स घ्यावीत आणि स्वांतसुखाय आयुष्य जगावं, तर तेही नाही… आपल्यावर प्रेम असलेल्या माणसांची मनं जिंकत राहण्याची एक संधी म्हणून सोडत नाहीत हे सद्गृहस्थ! मागे कधी तरी त्यांनी कुसुमाग्रजांच्या (मराठी माणुस काय करेल असा खास ‘तात्यासाहाब’ असा उल्लेख करतात गुलजार साहेब त्यांचा!) मराठी कवितांचा अनुवाद केला होता. नंतर समजलं, फक्त मराठी किंवा फक्त कुसुमाग्रज नाही, भारतातल्या ३२ भाषांमधल्या २७२ कवींच्या कविता गुलजार साहेबांनी अनुवादित केल्या आहेत. त्यांचं ‘अ पोएम ए डे’ नावाचं पुस्तकही केलंय. हे पुस्तक येण्यापूर्वी जयपूर लिटरेचर फेस्टिवलच्या एका कर्टन रेझर मुलाखतीत आपल्या या प्रोजेक्ट बद्दल बोलताना ‘रिजनल लँग्वेज’ या उल्लेखाबद्दल त्यांनी नापसंती व्यक्त केली होती. ते म्हणतात, मराठी, बंगाली, तमिळ किंवा कुठलीही भाषा ‘रिजनल लँग्वेज’ कशी? या सगळ्याच भाषा राष्ट्रीय भाषा आहेत. त्यांना ‘रिजनल’ म्हणणं म्हणजे त्यांचं अवमुल्यन करणंच. भारतीय भाषांमधल्या कविता या भारताचा मूड दाखवणारं उत्तम माध्यम आहेत असं गुलजार साहेबांचं निरिक्षण… देश कसा कसा बदलत गेला त्याचं ‘रिफ्लेक्शन’ या कवितांमध्ये असल्यामुळे त्या कालानुक्रमे लावल्या तर देशाचा प्रवास दिसेल असंही ते सांगतात. लिहिण्यासाठी ‘एक्सरसाईज’ म्हणून काय करता असं कुणी तरी विचारल्यावर ‘लिखने के लिए पढ़ना ही एक्सरसाईज है…’ हे सांगतात तेव्हा वाचनाचं महत्त्व ठसठशीतपणे अधोरेखित करतात.
स्वतः एवढी वर्ष फिल्म इंडस्ट्रीत राहिल्यानंतरही आपल्याला काय करायचंय आणि काय महत्त्वाचं याचं किती पक्कं भान होतं, आहे या माणसाला. बहुदा त्या जयपूर लिट फेस्ट इंटरव्यूमध्येच कुणी तरी त्यांना विचारलं, तुम्ही सिनेमा करणं का थांबवलंत, पुन्हा कधी सिनेमा करणार आहात का? ते त्याच्यावर देतात ते उत्तर केवळ साष्टांग नमस्काराला पात्र आहे. सिनेमेच बनवत बसलो असतो तर पुस्तकं वगैरे काहीच घडलं नसतं. मैं हमेशासे किताबें लिखना चाहता था, मोहब्बत तो किताबेंही थी, ये तो बस यूँ हुआ की जा तो मस्जिद की ओर रहे थे, बीच में मयखाना आया तो इस तरफ़ मुड़ गए… लेकिन जाना मस्जिद की ओर ही था, तो मस्जिद जाने के लिए मयखानेसे वापस आए, अब फिरसे मयखाने नहीं जाना! ‘आँधी’ नावाचा सिनेमा करुन राजकीय विषयावर भाष्य करणारे, ‘हालचाल ठीकठाक है, काम नहीं है वरना यहाँ सब ठीकठाक है, आदमी को खूनवून सब माफ़ है, आप की दुआ से सब ठीकठाक है…’ वगैरे राजकारण्यांना चपराक लगावणारं गाणं लिहिणारे गुलजार आजच्या राजकीय परिस्थितीकडे कसं बघतात तेही महत्त्वाचं आहे. ‘आँधी’ च्या निमित्तानं त्यांनीही ‘बॉयकॉट’ वगैरे अनुभवलेले आहेतच. अँटी एस्टॅब्लिशमेंट फ़िल्में तो हमेशाही बनती आई है, प्रो एस्टॅब्लिशमेंट बनना अभी शुरु हुआ है… हजार बल्ब लगानेसे रात छुपती नहीं है… वो दिन नहीं होगा, वो तो रात ही रहेंगी… हमारी आँखें चकाचौंध करने की कोशिश मत करना, हमें मालूम है की रात हैं… हे गुलजार साहेबांनी सांगणं म्हणजे सोनारानं कान टोचणंच की.
मध्यंतरी प्रसादबरोबर कारमधुन चालले होते. एफएम सुरु होतं. कुठलं तरी मी जेमतेम ऐकलेलं पण प्रसादला तोंडपाठ येणारं गाणं सुरु होतं. तो म्हणत होता. मी ऐकत होते. त्यातला एक शब्द ऐकुन मी ‘हँग’ झाले. ‘हा काय शब्द आहे?’ असं झालं मला. शब्द ‘वाईट’ नव्हता पण ‘गाण्यात’ अपेक्षित नसलेला कुठला तरी अगदी आजच्या पिढीच्या बोलण्यातला होता. गाणं संपलं. आरजे आली आणि म्हणाली - अमुक फ़िल्म, तमुक संगीतकार आणि गुलज़ार साहब के लब्ज… प्रसाद म्हणाला, आता बोल आता बोल… तुझ्या गुलजार साहेबांनी लिहिलंय म्हटल्यावर आता तोंडातुन शब्द नाही फुटायचा तुझ्या! मी फक्त चेहरा ओंजळीत लपवला आणि हसले. कधी पासून आठवायचा प्रयत्न करतेय पण ते गाणं काही आठवायला तयार नाही… पण नंतर वाटलं, आपल्याला धक्का बसायची गरजच काय? काळाबरोबर चालणं आणि नेहमी रिलेव्हंट राहणं कुणी शिकावं तर गुलजार साहेबांकडूनच! त्यांच्या समोरच्या प्रत्येक पिढीची भाषा आणि नस पक्की ओळखल्यामुळेच ते रिलेव्हंट राहतात. त्यांच्या या रिलेव्हंट राहण्यापुढे आपण फक्त नतमस्तक होऊ शकतो, बाकी काही नाही.
गुलजार साहेबांचं जन्म गाव पाकिस्तानातलं दीना… आठ वर्षांचे असताना ते भारतात आले. ७० वर्षांनंतर दीनाला जायचा योग आला त्यांच्या आयुष्यात. त्या भेटीत त्यांचं राहतं घर, शाळा त्यांनी पाहिली. तिथल्या एका वर्गाला ‘गुलजार कालरा ब्लॉक’ असं नाव दिलं होतं. त्यांच्या बहीणभावंडांची नावं माहिती असलेली, त्यांच्या आईचा चेहरा पाहिलेली माणसं त्यांना तिथे भेटली. तुझ्या वडिलांच्या घरी राहायचो मी, पाच रुपये भाडं घ्यायचे ते, आता तू आलायस ना, माझा मकान मालिक, हे घे किरायाचे पाच रुपये - म्हणणारी माणसं भेटली. त्या अनुभवाबद्दल सांगताना गुलजार म्हणतात, आपल्या जन्मगावी ७० वर्षांनी परत जाणं हा अनुभव माझ्यासाठी ‘इमोशनल’ होता. तिथल्या लोकांनी माझ्यासाठी पायघड्या घातल्या. माझ्या स्वागतासाठी जेवणावळी ठेवल्या. पण मी भारावलो होतो. गुदमरलो होतो. दिल इतना भरा था… पोटात भूक नव्हतीच. त्या प्रसंगात मला फक्त एक कोपरा हवा होता, आणि अगदी एकट्याला दोन मिनिटांचा वेळ… मला मनसोक्त रडायचं होतं. पण माझं ‘गुलजार’ असणं आड आलं आणि मला काही ती दोन मिनिटं मिळाली नाहीत - हे ऐकताना आपण फक्त आपले भरुन आलेले डोळे पुसू शकतो, बाकी काही नाही.
माझ्या आता पर्यंतच्या आयुष्यात मला भेटलेला हा एकमेव माणुस आहे, ज्यानं लिहिलेलं वाचताना ते त्याच्याच धीरगंभीर खर्जातल्या आवाजात मला ऐकू येतं. या माणसाचे अनंत उपकार आहेत माझ्यावर, आपल्या सगळ्यांवर… माझं, तुमचं, आपल्यासारख्या अनेकांचं आयुष्य समृद्ध केलेल्या या व्यक्तीला आपण काय शुभेच्छा देणार? एवढंच म्हणायचं, गुलजार साहाब, आप को हमारी उम्र लग जाए.
- भक्ती बिसुरे खानोलकर यांचा हा जुना लेख आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा