आमच्या गावामध्ये कुणाच्याही घरी शुभकार्य असेल तर गाव गाड्यातली अनेक मंडळी कुठल्याही निमंत्रणाशिवाय मदतीला यायची. त्या ठिकाणी लागेल ती आणि पडेल ती काम करायची. म्हणजे अगदी घर सजवण्यापासून, मांडव घालण्यापासून ते जेवण करण्यापर्यंत सर्व कामं हीच मंडळी करायची. या सर्व कामांमध्ये गावगाड्यातील मंडळींचा हिरीरीने सहभाग असायचा. मग सगळी काम झाल्यानंतर ही लोकं जेव्हा घरी जायची तेव्हा त्या कार्य असलेल्या घरातील व्यक्ती या लोकांना चहा आणि कानुला (करंजी) द्यायची. तेवढ्यावर ही मंडळी खुश होऊन आपापल्या घरी परतायची. यामध्ये कोणताही बेगडीपणा, दिखाऊपणा नव्हता तर एकमेकाप्रति असणारा जिव्हाळा अगदी ओसंडून व्हायचा. कारण हा एक सेवाभाव होता. यामध्येच एक महत्त्वाचा इव्हेंट असायचा तो म्हणजे जेवण बनवण्याaचा. त्या काळामध्ये आता जशी केटरिंग सर्विस आहे तशी कोणतीही केटरिंग सर्विस नसायची. मग जेवण कोण करणार? तर गावातलीच जाणती लोकं जेवण करायची. मोठमोठ्या भांड्यांमध्ये भात, आमटी, भाजी असे वेगवेगळे पदार्थ करायचे. ती जी जाणत्या लोकांची टीम असायची त्याच्यामध्ये एक वरिष्ठ असायचा. तो व्यक्ती आमटी करत असताना थोडसं बशीत घेऊन चव बघायचा. आणि काही चव इतरांनाही बघायला द्यायचा. इतरांची मते जाणून घेऊन त्याच्यामध्ये चटणी मीठ कमी जास्त झालंय का बघा असं म्हणून त्यांना द्यायचा. त्यांची मते पाहून कमी जास्त टाकायचा. मला हे नेहमी आश्चर्य वाटायचं, कारण हा माणूस इतका जाणता असून सुद्धा, अनेक मोठमोठ्या पंक्तींची जेवणं करून सुद्धा इतरांना का चटणी मीठ विचारतोय असं मला वाटायचं.
एकदा आमच्या घरामध्ये कार्य असताना अशीच जाणत्या लोकांची टीम आली होती. त्यावेळेला मी त्या मुख्य व्यक्तीला विचारलं, "तात्या, तुम्हाला हे सगळं अगदी व्यवस्थित जमतंयतरी सुद्धा तुम्ही इतर दोघा चौघांना चटणी मीठ का विचारतायसा?" यावर ते म्हणाले, "त्याचं कसं आहे विठू, प्रत्येक माणसाला आपलं बरोबरच वाटत असतंय. मी जे करतोय ते भारीच करतोय असं वाटत असतंय. इथं 400 ते 500 माणसं पंक्तीमध्ये जेवणार असत्यात. चटणी मीठ जर काय कमी झालं तर पंगतीची चव बिघडणार. 400 ते 500 माणसं वेगवेगळे मंत्रोच्चार करत तणतणत जात्यात. जेवण करणाऱ्याला नाव ठेवून जात्यात. त्यामुळे पंगत बिघडायची नसेल आणि होणारं नुकसान जर टाळायचं असेल तर चार चौघांना चटणी मीठ व्यवस्थित आहे का हे विचारणं केव्हाही चांगलं असतं. आता यात एकाची चव सपक असते तर एकाला एकदम तिखट हवं असतं त्यामुळे दोघा चौघांना विचारून, त्यांच्यातला मध्य काढून मी ठरवत असतो, नेमकं चटणी मीठ कमी जास्त घालायचं. यानंतर परत मी चव बघून, व्यवस्थितच झालेलं बघून ते भांडे खाली उतरतो. आणि हे लोकांना वाढलं जातं. अशा वेळेला कुठेच चटणी मीठ कमी जास्त झालंय असं होत नाही कारण जे केलेलं अन्न असतं ते खातरजमा करून केलेलं अन्न असतं. आणि तुला एक सांगतो लक्षात ठेव हे नुसतं जेवणा-पाण्याच्या बाबतीतच नाही तर आपल्या संपूर्ण जीवनामध्ये सुद्धा हे तत्त्व लागू आहे. तू इथून पुढे जीवनामध्ये जगत असताना हा माझा मंत्र लक्षात ठेव. काहीही करत असताना त्या क्षेत्रातल्या जाणकार असलेल्या चार चौघांचा सल्ला घ्यायचा. यांना जर विचारलं तर आपलं काम अधिक चांगलं होण्यासाठी योग्य तो सल्ला या व्यक्ती देत असतात. यामुळे आपलं होणार नुकसान टाळलं जातं आणि फार चांगला फायदा होतोय."
हे तत्व मी आमच्या बाबांच्या जीवनामध्येही अनेकवेळेला पाहिलं. बाबा ज्या ज्या वेळेला गावाकडे यायचे, आणि काही महत्त्वाचे निर्णय घेणे असायचं त्यावेळेला गावातल्या काही जाणकार लोकांना आवर्जून सल्ला विचारायचे. त्यांच्या सल्ल्याने पुढे जायचे. यामुळे आम्हाला अनेक वेळेला फार चांगला फायदा जीवनात झालेला दिसून आला. हे तत्व बाबांनी ही आम्हाला आमच्या जीवनामध्ये उतरवण्याचा सल्ला दिला.
याच सल्ल्यावरती आज माझं जीवन उभं आहे. मी आज जी काही डेव्हलपमेंट करू शकलो ती करण्यामागे सर्वात प्रमुख कारण म्हणजे हा सल्ला होता. माझ्या सुरुवातीच्या प्रकाशन व्यवसायामध्ये मी पहिला सल्ला विचारला तो डॉ. प्रदीप पवार यांना. प्रकाशन व्यवसायामध्ये मी नवखा असल्यामुळे मला फारशी त्यातली माहिती नव्हती. त्यावेळी डॉ. पवारांनी मुखपृष्ठ मांडणी कशी केली पाहिजे, प्रस्तावना कशी केली पाहिजे इथे पासून ते पुस्तक छपाई पर्यंतचा प्रत्येक सल्ला अगदी आवर्जून दिला. त्यामुळे पुस्तक व्यवसायामध्ये माझा जम दिवसेंदिवस अधिक अधिक भारी होत गेला. आज प्रकाशन व्यवसायामध्ये एक तज्ञ व्यक्ती म्हणून माझी जी ओळख आहे ती डॉ. पवारांना चटणी मीठ विचारल्यामुळेच.
आज सर्वत्र सेल्फ डेव्हलपमेंट या शब्दाच्या जोडीला हमखास आमचं नाव येतं. कारण सेल्फ डेव्हलपमेंटची चळवळ तळागाळामध्ये, वाड्यावस्त्यावरती पोहोचवण्याचं काम आमच्या मार्फत झालं. हे होत असताना 2006 च्या दरम्यान सेल्फ डेव्हलपमेंट संमेलन घ्यायची कल्पना माझ्या सुपीक डोक्यात आली. कल्पना ही नुसती डोक्यात येऊन चालत नाही तर ती मूर्त स्वरूपात यावी लागते. आम्ही त्यावेळेला नवखेच होतो. कार्यक्रम कसा करायचा, पाहुणे कसे गोळा करायचे, नियोजन आयोजन कसं करायचं याची काहीच कल्पना नव्हती. अशा वेळेला गारगोटीचे डॉ. अर्जुन कुंभार यांनी प्रमुख पाहुण्यांना बोलवण्यापासून अनेक गोष्टींमध्ये मोलाचे मार्गदर्शन केलं. शिवाजी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांना भेटण्यासाठी घेऊन गेले. कारण त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आम्हाला बोलवायचं होतं. या सगळ्या गोष्टी झाल्या आणि ते साहित्य संमेलन यशस्वी केलं. यामध्ये शिवाजी विद्यापीठाचे तत्कालीन परीक्षा नियंत्रक डॉ बी.एम. हिर्डेकर, सुरेन मानकोस्कर, प्रा डी यु पवार, प्रा डॉ संजय थोरात, डॉ सुनीलकुमार सरनाईक, चेंबर ऑफ कॉमर्सचे तत्कालीन अध्यक्ष आनंद माने, पंडित कंदले, डॉ विलास पाटील इ. यांच्या सहभागामुळे ते संमेलन यशस्वी झाले. फक्त तेच नाही तर त्यानंतर यशस्वी चार संमेलन स्वखर्चाने आम्ही कोल्हापुरात भरवली आणि सेल्फ डेव्हलपमेंटचा पाया घातला.
तेव्हा या आमच्या उमेदीच्या काळामध्ये आम्ही डॉ. प्रदीप पवार, डॉ. अनिलराज जगदाळे, डॉ. अर्जुन कुंभार, कृष्णकांत खामकर यासारख्या जाणकारांना मी चटणी मीठ विचारलं. त्यांनी आम्हाला कुठं चटणी जरा जास्त झाले, कुठं मीठ जरा कमी झाले हे आवर्जून सांगितलं. हे सांगितल्यामुळे त्यातला एक सुवर्णमध्य काढून आम्ही कामाला लागलो आणि या सगळ्यामुळे माझं व्यक्तिमत्व बहरत गेलं, फुलत गेलं, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये यश मिळत गेलं आणि माझ्या जीवनाचा स्वयंपाक हा चवदार होत गेला. विशेषतः माझा सेल्फ डेव्हलपमेंटचा स्वयंपाक हा अतिशय भारी झाला. ज्याची चव महाराष्ट्रातल्या हजारो लोकांनी घेतली आणि तृप्तीची ढेकर दिली. हे होण्याचे कारण म्हणजे मी जाणकारांना चटणी मीठ विचारलं .
पण मित्रहो आज समाजात नेमकं काय चाललंय? मलाच सगळं येतंय, मलाच सगळं माहित आहे या अविर्भावामध्ये अनेक लोक गुंतून पडलेले दिसत आहेत. समाज माध्यमांवरील त्रोटक माहिती मुळे, अपुऱ्या व ऐकीव माहितीच्या आधारे आणि हटवादी भूमिकेमुळे अनेक लोकांचे स्वयंपाक बिघडलेले मी बघत आलेलो आहे. अनेक लोकांची उमेंद गेल्याचं मी माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्षात बघितलेलं आहे.
सांगायचा मुद्दा असा, आपल्याला जीवनामध्ये काहीही करत असताना, घरदार, शेतीवाडी, गाडी-बंगला घेत असताना किंवा आपण करत असलेल्या क्षेत्रांमध्ये यशस्वी होत असताना आपल्या वाडवडिलांनी दिलेली ही जी काही संस्कारांची शिदोरी आहे, हे जे लाख मोलाचे सल्ले आहेत ते आपण आवर्जून वापरले पाहिजेत. ही सर्व जाणकार लोक आपल्या अवतीभवतीच आहेत. त्यामुळं मला असं वाटतंयं की आपण जर जाणकार लोकांना चटणी मीठ विचारत राहिलो तर आपल्या जीवनाचा स्वयंपाक हा नक्कीच चवदार होणार आहे, नाहीतर तो बिघडणार आहे हे ठरलेलंचं आहे . तेव्हा हे वापरून तर बघा..
🖋️ विठ्ठल कोतेकर, माईंड ट्रेनर
9921111665
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा