गुरुवार, १ फेब्रुवारी, २०२४

887. अध्यात्मिक कोण?

जी व्यक्ती, प्रत्येकाचे हृदय हे देवाचे मंदिर आहे आणि प्रत्येकाच्या हृदयात भगवंत वास करतो हे मानते...ती अध्यात्मिक.
जी व्यक्ती नेहमी सकारात्मक विचार करते, वाईटातूनही चांगले घेते...ती अध्यात्मिक.
शरीर सर्व कर्तव्याचे साधन आहे आणि शरीर असेल तरच सर्व काही प्राप्त करता येते अगदी परमात्मासुद्धा , म्हणून जी व्यक्ती शारीरिक आरोग्याची काळजी घेते...ती अध्यात्मिक.
ईश्वराने आपल्याला माणूस म्हणून जन्म दिला आहे तर,  माणसांशी माणसांसारखे वागते आणि आपली नैतिक जबाबदारी पार पाडते.... ती अध्यात्मिक.
जी व्यक्ती नुसतेच  पोथीपुराण वाचत नाही तर वाचून आपल्या जगण्यात  उतरवते...ती अध्यात्मिक.
 ज्या व्यक्तीला वरिष्ठांच्या आणि कनिष्ठांच्या  प्रती आदरभाव असतो.... ती अध्यात्मिक.
जी व्यक्ती आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये अस वागते. दुसऱ्याच्या भावना समजून घेते आणि इतरांच्या चांगल्या गोष्टीचा आदर करते....ती अध्यात्मिक.
जी व्यक्ती  वेद  वाचण्यापेक्षा दुसऱ्याच्या  वेदना वाचते....ती अध्यात्मिक .
जी व्यक्ती आपलं काम प्रमाणिकपणे करते. उच्च नीच्च भेदभाव न करता सर्वांशी समभावाने वागते....ती अध्यात्मिक.
जी व्यक्ती  आधी आपल्या  कौटुंबीक जबाबदाऱ्या पार पाडते आणि सामाजिक कर्तव्य पार पाडते ....ती अध्यात्मिक.
जी व्यक्ती मुक्या पशु-पक्ष्यांवर  आणि निसर्गावर देखील प्रेम करते....ती अध्यात्मिक.
जी व्यक्ती  निरपेक्षपणे सत्कर्म करते. निःस्वार्थीपणे सर्वांशी सेवाभाव ठेवते.. ..ती अध्यात्मिक.
जी व्यक्ती , जे जे आपल्याला चांगले मिळते आणि ज्यांच्यामुळे मिळते त्यांच्या प्रति  सदैव  कृतार्थभाव  ठेवते....ती अध्यात्मिक.
जी व्यक्ती , प्रत्येक चांगल्या गोष्टीचे विना अपेक्षा कौतुक करते आणि प्रत्येकाशी सद् भावाने राहते....ती अध्यात्मिक.
जी व्यक्ती, ग्रंथांतील आणि संतांचे  विचार आचरणात आणून आधी स्वतः त्याप्रमाणे वागते मग दुसऱ्याला सांगते , आधी केले मग सांगितले ....ती अध्यात्मिक.
जी व्यक्ती , आपण या समाजाचं काही देण लागतो, आणि ते आपण दिलेच पाहिजे अशी मानसिकतेने वागते....ती अध्यात्मिक.
जी व्यक्ती  गरजवंतांना यथा शक्ती मदत करते , मग ती सेवेच्या रूपात असुदे , दुसऱ्यासाठी वेळ देण्याच्या रूपात, एखाद्याला योग्य मार्गदर्शन रूपात , भुकेल्या ,तान्हेलेल्या अन्नाच्या रूपात मदत करते....ती अध्यात्मिक.
ज्या व्यक्तीच्या मनात आपल्या बरोबर इतरांची देखील प्रगती होवो हा भाव असतो....  ती अध्यात्मिक.
जी व्यक्ती  , सरळमार्गी आणि मनाने निर्मळ असते  आणि वागते....ती अध्यात्मिक.   
जी व्यक्ती फक्त पूजा, अर्चा, प्रार्थना आणि भक्ती करते असं नाही  पण  केलेली पूजा, अर्चा, प्रार्थना आणि भक्ती याप्रमाणेच आपली प्रत्येक कृती करते , वागते....ती अध्यात्मिक.
जी व्यक्ती राष्ट्रपुरुषांचे स्मरण ठेवते  आणि  राष्ट्रीय संताचं सदैव स्मरण ठेवते  त्यांच्या विचारांच स्मरण आपल्या जीवनात उतरवून जीवन जगते ....ती अध्यात्मिक.
जी व्यक्ती , आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका , या संतवचनाप्रमाणे वागते...ती अध्यात्मिक.
थोडक्यात जी व्यक्ती  सकाळपासून रात्री झोपेपर्यंत नित्य  कर्म, कर्तव्य पारदर्शक पद्धतीने  पार पाडते....ती अध्यात्मिक.  
जी व्यक्ती मुर्तीत देव मानून तीथेच न थांबता पुढे जाऊन  आपल्या आईवडीलात,  कुटुंबात, मुलाबाळात, निसर्गात, समाजात देव पहाते...ती अध्यात्मिक.
जी व्यक्ती स्वतः आनंदी राहते  आणि इतरांना आनंदी  ठेवण्याचा प्रयत्न करते ...ती अध्यात्मिक.
आणि सर्वात महत्त्वाचे ज्याच्यामुळे आपल्याला सर्व मिळाले आहे मिळते आहे त्या आपल्या अंतरात्म्यातील भगवंताचे सदैव आभार मानते.... तीच व्यक्ती अध्यात्मिक.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...