नरेशने आपली आलिशान गाडी मंगल कार्यालयासमोर पार्क केली आणि बायको-मीराला घेऊन तो कार्यालयात शिरला. हाँलमध्ये तुरळक लोक बसले होते. नरेशला आश्चर्य वाटलं.लग्न लागायला फक्त पंधरा मिनिटं बाकी असतांना उपस्थिती एवढी कमी कशी ?त्याने चौकशी केली तेव्हा त्याला कळलं की नवरा मुलगा नुकताच मिरवणुकीला गेला असून तो अजून दोन तास तरी येणार नव्हता. वऱ्हाडातील बरीच मंडळी या मिरवणूकीत गेल्यामुळे हाँल रिकामा वाटत होता. मीरा ओळखीच्या बायका दिसल्यावर त्यांच्यात जाऊन बसली. नरेशने हाँलमधल्या व्यक्तींवर नजर टाकली. कुणी ओळखीचं दिसतंय का हे तो शोधू लागला. एक चेहरा ओळखीचा वाटला पण तो कोण हे त्याच्या लक्षात येईना. तरीसुद्धा तो त्या व्यक्तीच्या जवळ जाऊन उभा राहिला. त्याला पाहिल्याबरोबर त्या माणसाने स्मित केलं.
"तुम्हांला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतंय पण लक्षात येत नाहिये" नरेश जरा अवघडून बोलला.
"काय राव नरेश मला ओळखलं नाही? अरे मी सुनिल भागवत. आपण दोघं दहावीपर्यंत एकाच वर्गात होतो. आठवलं?"
नरेशच्या डोक्यात ट्युब पेटली.
"हो हो आठवलं.अरे एकाच बेंचवर तर बसायचो आपण. अरे पण तू इतका तरुण कसा दिसतोस? आपण तर एकाच वयाचे असू ना?"
"यार किती वर्षांनी भेटतोहेस आणि दिसण्याचं काय घेऊन बसलास?"सुनीलने त्याला उठून आलिंगन दिलं.
"चल बसून निवांत बोलूया.लग्न लागायला अजून भरपूर अवकाश आहे"
दोघंही खुर्च्यात बसल्यावर नरेश संतापून म्हणाला "बघ यार सुनील या लोकांना वेळेची अजिबात किंमत नाही.उशीराच लग्न लावायचं होतं तर मुहूर्त काढायचाच कशाला?"
"जाऊ दे रे. हाच तर चान्स मिळतो नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना नाचण्याचा. करु दे त्यांना भरपूर एंजॉय. हेच तर दिवस आहेत त्यांचे एंजॉय करायचे. आता आपल्याला नाचता येणार आहे का? आणि बघ आपल्याला तर आता भरपूर वेळ आहे. मी तर रिटायर्ड झालोय.तुझं काय? अजून करतोच आहेस का नोकरी?"
" नाही रे.मीसुध्दा रिटायर झालोय.पण मला सांग तू कुठल्या तरी शाळेत शिक्षक होतास ना? मग रिटायर्ड होतांनाही शिक्षकच होतास का?"
" शेवटची दोन वर्ष हेडमास्तर होतो. म्हणजे तसा शिक्षकच"
" तुला खरं सांगू सुनील, मला शिक्षकी पेशा कधीच आवडला नाही. दँटस् ए व्हेरी बोअरिंग जाँब. त्यात काही थ्रिल नाही, चँलेंज नाही, जबाबदाऱ्या नाहीत.मी तर नेहमी म्हणतो शिक्षक लोक फुकटाचा पगार घेत असतात. त्यातून आजकाल शिक्षकांबद्दल काय भयंकर ऐकू येतंय. दारु पिणं काय! विद्यार्थीनींवर बलात्कार काय! बापरे! या लोकांनी तर शिक्षण क्षेत्र पार बदनाम करुन टाकलंय."
सुनील चिडला नाही.हसून म्हणाला
" शिक्षकांबद्दल असे गैरसमज बरेच जण करुन घेतात. सगळेच शिक्षक तसे नसतात. तुझ्या पाहण्यात आणि ऐकण्यात टवाळखोर कामचुकार आणि चारीत्र्यहिन शिक्षकच आले असतील. त्यातून वीसपंचवीस लाख रुपये देऊन नोकरीला लागलेले शिक्षक दुसरं काय करणार? त्यामुळे तुला दोष देण्यात काही अर्थ नाही. माझ्याबाबतीत म्हणशील तर मला दिवसभर फुरसत नसायची. शाळेत सतत काही ना काही प्रकल्प चालायचे. त्यातून जनगणना आहे, निवडणूका आहेत,वर्षभर चालणाऱ्या परीक्षांचं सुपरव्हिजन आहे,पेपर तपासणी आहे अशा सगळ्या कामात वर्ष कधी संपून जायचं ते कळायचं नाही.बरं मला एक सांग,तू कुठल्यातरी सरकारी खात्यात होतास ना?"
" हो मी सुपर क्लास वन आँफिसर होतो. खरं तर एक मामुली क्लार्क म्हणून मी नोकरी ची सुरुवात केली होती. प्रमोशन मिळवत मिळवत क्लासवन आँफिसर झालो" नरेश अभिमानाने म्हणाला "आपल्या हाताखालच्या स्टाफकडून काम करुन घेणं किती अवघड आणि चँलेंजिंग असतं हे तुमच्यासारख्या पाट्या टाकणाऱ्या शिक्षकांना नाही कळायचं. शासनाकडून मला त्यासाठी बरेच पुरस्कार देखील मिळालेत"
" वा खुप छान.पण मलाही तेच म्हणायचंय. तुझ्या हाताखालचे सर्वच कर्मचारी इमानदार, प्रामाणिक आणि कष्टाळू होते का?"
" अरे बाबा सरकारी खात्यात तर पन्नास टक्के लोक फक्त दिवस भरतात. त्यांना कामाशी काही देणंघेणं नसतं"
" शिक्षकांचीही तीच परीस्थीती आहे. काही मोजके नालायक शिक्षक पुर्ण शिक्षण क्षेत्राला काळीमा फासतात.त्याला काही इलाज नाही. आम्ही मात्र आमचं शिकवण्याचं काम जीव तोडून केलं. मोठ्या हुद्दयावरचे आमचे विद्यार्थी आता भेटले की पाया पडतात तेव्हा आपली किंमत कळते"
"पण तेवढ्याने हुरळून जायचं कारण नाही. तुम्ही आयुष्यात काय कमावता ते महत्वाचं आहे. माझ्याकडे बघ. मला नोकरीत असतांना किती मानमरातब मिळायचा. शिवाय माझा पगार,वरची कमाईही भरपूर असायची. आज माझ्याकडे काय नाही ते विचार. मोठा बंगला आहे, आलिशान गाडी आहे.मुंबई पुण्यात लक्झरीयस फ्लँट आहेत.दोन्ही मुलं बंगलोरमध्ये चांगल्या कंपनीत रग्गड पगारावर नोकरीला आहेत. पुढच्या महिन्यात मी फिरायला सिंगापूर मलेशियाला चाललोय.तुमच्यासारख्या शिक्षकांना हे सगळं शक्य आहे?"
नरेशच्या बोलण्यात अहंकार गच्च भरला होता. सुनीलच्या ते लक्षात आलं.तो हलकसं हसला आणि म्हणाला
" या अगोदरही फाँरेनला कुठे गेला होतास?"
नरेशने नकारार्थी मान हलवली.
"जमलंच नाही रे.कामात खुप बिझी असायचो. क्लास वन आँफिसरला वेळ कुठून असणार?"
सुनीलने स्मित केलं
" नरेश मी एकवीस देशात फिरुन आलोय."
" काय्य!!!काय सांगतोस?"आ वासून नरेश त्याच्याकडे पाहू लागला.
"हो नरेश. तुला माहीत नसेल मी गणिताचा मास्टर आहे. गणिताच्या परिषदांमध्ये व्याख्यान देण्यासाठी मी भारतातच नाही तर बऱ्याच देशातही गेलोय.मागच्याच महिन्यात मी कोरीयाला जाऊन आलो."
नरेशने सुनीलला वरपासून खालपर्यंत पाहिलं. त्याच्या साध्या कपड्यावरुन तो इतका विद्वान असेल असं वाटत नव्हतं.
" बरं मला एक सांग भारतात तू कुठंकुठं जाऊन आलाहेस" सुनीलने विचारलं
" महाराष्ट्र आणि दिल्लीशिवाय कुठंच जाता आलं नाही बघ. रिटायर झाल्यावर फिरु असं ठरवलं होतं"
" तुला काही आजारबिजार आहेत?"
"आहेत ना. बीपी आणि डायबेटीस. कोलँस्ट्रोलही वाढलंय. कारे असं का विचारतोस?" आपल्या टक्कल पडलेल्या डोक्यावरुन हात फिरवत नरेशने विचारलं.
"नरेश अरे आता या म्हातारपणात आणि असे आजार घेऊन तू कितीसा फिरणार आणि ते फिरण्यात तुला काय मजा येणार? मला सांग गोव्यातल्या बिचवरच्या सुंदर मुलींना पाहून तुला आता काय मजा वाटणार आहे?उत्तराखंडमधल्या व्हँली आँफ फ्लाँवरला तू आता जाऊ शकणार नाहीस. गेलास तरी ती फुलं पाहून तुला काहीच आनंद वाटणार नाही. तरुणपणी याच गोष्टींनी तुला कितीतरी आनंद दिला असता. मंदिरात जाण्याचे आपले दिवस.ही प्रेक्षणीय स्थळं पाहून कुठली मजा आपल्याला येणार? काही गोष्टी योग्य वयातच केल्या पाहिजेत.नंतर केल्या तर त्यातला आनंद नाहिसा झालेला असतो."
नरेश चिडून म्हणाला
"मला एवढं लेक्चर देतोहेस. तू तरी या गणिताच्या परिषदांव्यतिरिक्त कुठं फिरला आहेस का?"
सुनील हसला
" नरेश शिक्षकी पेशा मी जाणूबुजून स्विकारला. मला खरं आयुष्य जगायचं होतं. त्यातला आनंद लुटायचा होता. लहानपणापासूनच मी वेगळं आयुष्य जगण्याची स्वप्नं पहात होतो. घरच्या गरीबीमुळे ते शक्य नव्हतं. पण नोकरी लागली आणि मला पंख फुटले. गणित,विज्ञान हे माझे आवडते विषय. त्यात मी मास्टरी केली. शाळेच्या सहलींची जबाबदारीही मी माझ्यावरच घेतली. त्यातून मला खुप अनुभव आला शिवाय अनेक स्थळंही बघता आली. मग मी दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुटीत बाहेरचे ग्रुप घेऊन जाऊ लागलो. त्यातून मला खुप कमाई होऊ लागली. त्या पैशांची बचत करुन मी अख्खा भारत पालथा घातला. या काळात मला साहसाची आवड निर्माण झाली. एकदा मनात आलं.सायकल काढली. ग्रुप जमा केला. सायकलने नेपाळला जाऊन आलो"
"बापरे नेपाळला?"नरेश थक्क होऊन म्हणाला
"नुसतं नेपाळच नाही तर गोवा,लडाख,अरुणाचल,मेघालय इत्यादी सात राज्येही मी सायकलवर फिरलो. युरोपलाही जाणार होतो पण पैशांअभावी ते जमलं नाही. मग मी ट्रेकिंग करायला सुरुवात केली. हिमालयासहीत भारतातल्या जवळजवळ सर्वच पर्वतरांगात मी ट्रेकिंग केलंय. राँक क्लायंबिंग,रँपलिंग,व्हँली क्राँसिंग हेही मी केलंय. हे आयुष्य पुन्हा नाही हे मला माहित होतं. शिवाय म्हातारपणात या गोष्टी शक्य होत नाहीत म्हणून मी तारुण्याचा पुरेपुर फायदा उचलला. या प्रोसेसमध्ये मी माझ्या प्रमोशनकडेही दुर्लक्ष केलं. असाही मी मँनेजमेंटच्या मर्जीतला नव्हतो.त्यामुळे मँनेजमेंटने मला ज्युनियर असलेल्या आणि लायकी नसलेल्या व्यक्तींना माझ्या अगोदर प्रमोशन दिले.अर्थात मी ते कधी मनावर घेतलं नाही. मी माझ्या पध्दतीने आयुष्याचा आनंद घेत राहिलो.तू 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'हा पिक्चर बघितलाय?"
"नाही "
"जरुर बघ. आयुष्य कसं जगायचं ते तुला कळेल."
" पण कारे इतकं सगळं करत असतांना तुझं घरादाराकडे दुर्लक्ष होत असेल?"नरेशने विचारलं.
"अजिबात नाही.कारण मी या गोष्टी सुट्यांमध्येच करायचो. शिवाय बऱ्याचशा सहलीत माझी पत्नी आणि मुलंही सोबत असायची. त्यामुळे त्यांनी कधी तक्रार केली नाही.घर,परीवार,छंद आणि नोकरी यांची व्यवस्थित सांगड मला घालता आली. त्यामुळे मी भरभरुन जगलो.संगीताचीही मला आवड होती.माझा आवाज चांगला नव्हता. त्यामुळे गाणं शिकण्याऐवजी मी वाद्यं शिकलो.बासरी,हार्मोनियम, गिटार, व्हायोलिन ही वाद्यं वाजवण्यात पारंगत झालो."
" पण एवढं सगळं करायला तुला वेळ तरी कसा मिळायचा?" नरेशने विचारलं
"आम्हांला वेळ मिळत नाही असं म्हणणारे तासंतास टिव्ही बघत बसलेले असतात नाहीतर मोबाईलवर व्हाँट्सअप,फेसबुकमध्ये बुडून गेलेले असतात.मी त्याऐवजी वेळेचं मँनेजमेंट केलं. अर्थात खुप स्ट्रिक्टली नाही कारण मग आपण जे करतो त्यातला आनंद हरवून जातो. आणि मी जे करत होतो ते आनंदासाठी.मला काही त्यात करीयर करायचं नव्हतं."
नरेशला आपलं आयुष्य आठवलं.नोकरी एके नोकरी आणि नोकरी दुणे घर याशिवाय त्याला दुसरं काही माहित नव्हतं. अफाट पैसा कमवायचा मग तो कोणत्याही मार्गाने असो आणि तीन पिढ्या बसून खातील अशी प्राँपर्टी जमवायची हे त्याच्या आयुष्याचं एकमेव ध्येय होतं. हे ध्येय साधतांना आपण कधीही न मिळणारे आनंदाचे क्षण गमावतोय हे कधी त्याच्या लक्षात आलं नाही. निव्रुत्त झाल्यावर आपल्याला भरपूर वेळ असेल. तेव्हा जे करायचं राहून गेलंय ते करता येईल असं त्याचं मत होतं.
" मीही आता ठरवलंय.उरलेलं आयुष्य मजेत घालवायचं" नरेश म्हणाला " आताशी तर आपण साठी गाठलीये.अजून दहा वर्ष तरी काही होत नाही आपल्याला"
" तसं झालं तर सोन्याहून पिवळं. पण आयुष्य हे क्षणभंगूर आहे असं ग्रुहीत धरुनच मी माझं जीवन जगलो"
सुनीलच्या या म्हणण्यावर नरेश जोरात हसून म्हणाला.
" डोंट वरी यार. तुही काही लवकर मरत नाहीस.आता हे जग मला दाखवण्याची जबाबदारी तुझी.बरं ते जाऊ दे.तुझी मुलं काय करताहेत?लग्नं झाली असतील ना त्यांची?"
"हो तर! मुलगी डेंटिस्ट आहे आणि मुलगा चार्टर्ड अकाउंटंट. मुलगा माझ्याच सोबत रहातो आणि मुलगीही याच शहरात असल्याने नातवंडासोबत माझे दिवस झकास चालले आहेत"
नरेशचा चेहरा पडला. वर्षभरापासून बंगलोरला रहाणारी मुलं घरी न आल्याने नातवंडाशी त्याची भेट आजकाल व्हिडीओ काँलवरच व्हायची.
"घरबीर बांधलंस की नाही?"त्याने उत्सुकतेने सुनीलला विचारलं.
" हो तर! तुझ्यासारखा बंगला नाहीये माझा पण एक टूबीएचकेचं घर आहे. मुलगा चांगला कमावतोय. तो बांधेल मोठा बंगला पुढे. शेवटी त्यालाही काहीतरी स्वकष्टाची प्राँपर्टी केल्याचं समाधान मिळायला हवं ना! तुझी कार मात्र झकास आहे हं"
"तू केव्हा पाहिलीस?"नरेश आनंदाने फुलून म्हणाला
"मगाशी तू आलास तेव्हा मी बाहेरच होतो"
"अच्छा!लग्न लागल्यावर चल.तुम्हांला गाडीतून घरी सोडतो"
"अरे मी आणलीये ना माझी गाडी.तुझ्या गाडीइतकी आलिशान नाहिये पण ठिक आहे.माझं काम भागतंय तिने"
नरेशचा चेहरा पडला."अरेच्चा!आपण कमावलेल्या सगळ्या गोष्टी सुनीलकडेसुध्दा आहेत.मग आपण एवढा गर्व का करतोय?"त्याच्या मनात विचार आला.सुनीलला कमी लेखून आपण मोठी चुक करतोय हेही त्याच्या लक्षात आलं
तेवढ्यात नवरदेवाची मिरवणूक आली.अर्ध्या तासात लग्न लागलं.सुनीलला पाहून बरेच लोक त्याला आनंदाने भेटत होते.तरुण मुलंमुली त्याच्या पाया पडत होते.सुनीलला पाहून नवरीला खुप आनंद झाला.त्याच्या पाया पडून ती नवऱ्याला म्हणाली " हे आमचे भागवत सर.यांनी आम्हांला भरभरून जगायला शिकवलं.शिकणं आणि जगणंसुध्दा किती आनंददायी असतं हे त्यांच्यामुळेच आम्हांला कळलं" तिच्या नवऱ्याने सुनीलला वाकून नमस्कार केला.
सुनीलला मिळणारा आदर पाहून नरेश मनातून खट्टू झाला.त्याला आठवलं.निव्रुत्तीनंतर तो आँफिसला दोनतीन वेळा गेला तेव्हा तिथल्या स्टाफने त्याची दखलसुध्दा घेतली नव्हती.ही ब्याद कशाला इथे आली असेच भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते.
जेवण झाल्यानंतर दोन्ही मित्र एकमेकांना घरी यायचं निमंत्रण देऊन निघाले.
नरेशने ठरवलं आता सुनीलसारखं जगायचं. आहे ते उरलेलं आयुष्य आनंदात घालवायचं. आता त्याला त्याचा एकटेपणा खटकू लागला. म्हणून मग त्याने दुसऱ्याच दिवशी ज्येष्ठ नागरीक संघाची सदस्यता घेतली. आतापर्यंत कट्ट्यावर बसणारे हे म्हातारे त्याला आवडत नव्हते. हळुहळू त्याची त्यांच्याशी मैत्री झाली. माँर्निंग वाँक त्यांच्यासोबत होऊ लागला. एक दिवस तो त्याच्या बायकोला घेऊन गाण्याच्या कार्यक्रमाला गेला. या वयातही संगीत आपल्याला आवडतं,आपल्या मनाला भारुन टाकतं हा नवीन शोध त्याला लागला. अभ्यासाच्या पुस्तकांखेरीज इतर पुस्तकांना कधी त्याने हात लावला नव्हता. वपु.काळे,चेतन भगत,पाऊलो कोएल्होची पुस्तकं आता टेबलवर उपस्थिती देऊ लागली. स्वयंपाक हे बायकांचं क्षेत्र आहे असं तो आजपर्यंत मानत होता. पण आता नवीन रेसिपीज तो बायकोला सुचवू लागला आणि ती बनवण्यासाठी तिला मदतही करु लागला. एक दिवस ज्येष्ठ नागरीक संघाच्या सदस्यांना त्याने एका चांगल्या हाँटेलात पार्टी दिली. सुनीललाही त्याने स्पेशल गेस्ट म्हणून बोलावलं. आपल्या या मित्रामुळेच आपण आनंददायी जीवन जगायला सुरुवात केली आहे याचा त्याने सर्वांसमक्ष उल्लेख केला. सुनीलनेही मग आपण कसं जीवन जगलो आणि उरलेलं आयुष्य कसं भरभरुन जगलं पाहिजे याबद्दल एक खुमासदार भाषण ठोकलं. सिंगापूर, मलेशियाच्या टूरला आता चारपाचच दिवस उरले होते. ही टूर झाली की हिस्टोरिकल युरोपची टूर करायची हे नरेशने ठरवून टाकलं. आपलं हे सुंदर आयुष्य फार कमी उरलंय याचा खेद त्याला आजकाल वाटू लागला होता.
टुरला दोन दिवस बाकी होते.तो सकाळी आपल्या मित्रांसोबत माँर्निग वाँक करत होता. जाँगिंग ट्रँकचे तीन राऊंड त्याने पुर्ण केले. चवथ्या राऊंडला त्याने सुरुवात केली आणि त्याच्या छातीत कळ आली. कळ इतकी जोरदार होती की तो खालीच कोसळला. पडता पडता त्याचा उजवा गुडघा जोरात आपटला. त्याच्याबरोबरचे सगळे धावून आले. सगळ्यांनी मिळून त्याला बेंचवर झोपवलं. घामाच्या धारांनी तो न्हाऊन निघाला होता. अँब्युलन्स बोलवण्यात आली. त्याला हाँस्पिटलमध्ये अँडमिट करण्यात आलं. ट्रिटमेंट सुरु झाली. दोन तासांनी तो शुध्दीवर आला. समोरच त्याची बायको आणि डाँक्टर उभे होते.
"कसं वाटतंय?"त्याच्या बायकोने मीराने विचारलं. त्याच्या अंगात अजिबात त्राण नव्हतं.उजवा गुडघा भयंकर दुखत होता.
"मला काय झालं होतं?"खोल गेलेल्या आवाजात त्याने डाँक्टरला विचारलं.
"तुम्हांला मासीव्ह हार्ट अटँक आला होता. त्यात तुम्ही नेमके गुडघ्यावर आपटल्यामुळे तुमचा गुडघा तुटलाय. त्याचं आँपरेशन करावं लागणार आहे."
" मग करुन टाका. आम्हांला दोन दिवसांनी सिंगापूरला जायचंय"
डाँक्टर हसले
"साँरी मिस्टर नरेश.यु हँव टू फरगेट अबाउट युवर टूर. तुमची शुगर आणि बी.पी.जोपर्यंत नाँर्मल होत नाहीत तोपर्यंत आँपरेशन शक्य नाही. आँपरेशन नंतरही तुम्हांला लवकर चालता येईल असं वाटत नाही. दुसरी गोष्ट उद्या तुमची एंजिओग्राफी करणार आहोत. हार्टमधल्या ब्लाँकेजेसवर तुमची बायपास करायची की एंजिओप्लास्टी ते ठरेल. माझ्या अनुभवानुसार तुमची बायपासच करावी लागेल असं वाटतं. आणि बायपास झाल्यावर कमीतकमी तीन महिने तरी तुम्ही कुठे जाऊ शकणार नाही."
नरेशने हताशपणे बायकोकडे पाहिलं.
" जाऊ द्या .तुम्ही अगोदर बरे व्हा. मग बघू कुठे जायचं ते" ती त्याला समजावत म्हणाली " जीव वाचला ते काय कमी आहे? सिंगापूर काय नंतर केव्हाही करता येईल."
नरेश काही बोलला नाही. पण त्याला समजून चुकलं होतं. त्याच्या जीवाचं काही खरं उरलं नव्हतं. नशीबात असलं तर टूर होतीलही पण ते कायम तब्ब्येतीच्या काळजीने भरलेले असतील. त्यात आनंद,उत्साह यांचा अभाव असेल. जीवनात आता कुठेशी रंगत येऊ लागली होती आणि त्यात हे असं घडलं. आयुष्य हे क्षणभंगुर आहे असं सुनील म्हणाला होता. खरंच होतं ते! आता टूरच काय आयुष्यात राहून गेलेल्या कितीतरी गोष्टी करता येणार नव्हत्या. 'अनेक गोष्टी योग्य वयातच केलेल्या चांगल्या असतात ' असं सुनील जे म्हणत होता ते चुकीचं नव्हतं हे त्याला आता ठाम पटलं होतं. क्षणभर त्याला सुनीलचा हेवा वाटला आणि त्याच्यासारखं आयुष्य आपण का जगलो नाही या पश्चातापाने त्याचं मन भरुन गेलं.
© दीपक तांबोळी
9503011250
(ही कथा माझ्या "रंग हळव्या मनाचे "या पुस्तकातील आहे.कोणताही बदल न करता शेअर करण्यास हरकत नाही. माझ्या पुस्तकांबद्दलच्या अधिक माहितीसाठी क्रुपया वरील मोबा.क्रमांकावर संपर्क साधावा)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा