गुरुवार, १ फेब्रुवारी, २०२४

888. मोल

       आज जराशी उशिरानेच जाग आली सागरला. कालच नव्या घरी त्याने, कुंटुंबियांसमवेत गृहप्रवेश केला होता. त्या आधी गणेश पुजन, वास्तुशांत वगैरे सोपस्कारही त्याने पार पाडले होते, फक्त त्याच्या आई - बाबांच्या आग्रहाखातर. नाहीतर तसा सागर नास्तिकांतच जमा होता. मनगटात ताकद असेल तर. कोणाहीपुढे हात जोडावे लागत नाहीत, असं त्याचं ठाम मत होतं. आईसाठीच घरातील एक कोपरा त्याने, देवालय बांधण्यासाठी जराशा नाखुशीनेच दिलेला. त्याच्या बायकोचा, सुरेखाचा अर्थातच विश्वास होता देवावर. पण शक्यतो वादावादी नको अशा मवाळ विचारसरणीची होती ती. त्यामुळे "तुम्ही घरी देवाचं करा वा नका करु, मी बाहेर जाऊन ते माझ्यापुरतं करु शकते" असा स्टँड असे तिचा. सागरने बँकेतून घसघशीत लोन काढून, हा 3BHK चा फ्लॅट घेतला होता पवईला. सुरेखाचा जवळजवळ पाऊण पगार आता, EMI मध्ये जाणार होता. सागरने त्याच्या पगाराचीही, सविस्तर विभागणी केली होती खर्चानुरुप. आणि एक फिक्स्ड पोर्शन त्याच्या पगाराचा, दरमहा गुंतवणुकीतच जात असे अगदी ठरल्याप्रमाणे. एकंदरीतच चोख होता सागर, मनी मॅनेजमेंटमध्ये. 
      तर काल झालेल्या ह्या सगळ्या पुजा- पाठांमुळे.  त्यासाठी जमलेल्या पाहुण्यारावळ्यांमुळे, ह्या सगळ्यांनाच रात्री खूपच उशिर झाला होता झोपायला. त्यातून नव्या जागेतील पहिलीच रात्र... त्यामुळे अंथरुणावर पडल्यानंतरही बराचवेळ, चुळबूळ चालू होती सागरची. इतरवेळी पडल्या पडल्या खुडूक होणारी सुरेखाही, कुस बदलून पडली असली तरी जागीच आहे... हे ही जाणवलं होतं त्याला. पण तरीही तिच्याशी बोलायचेही त्राण नव्हते त्याच्या अंगात. तर एकंदरीतच ह्या सगळ्या प्रकारामुळे, सकाळी उशिराने जाग आली होती सागरला. "स्साला एक दिवस जास्तीची सुट्टी मागितली, तर दिली नाही" असा लाईन मॅनेजरबद्दल विचार करत... एक शिवीही हासडली त्याने मनातल्या मनात. सुरेखाने मात्र अजून दोन दिवस सुट्टी घेतली होती. त्यामुळे सागरचा चहा, नाश्ता, टिफीन करुन ती पुन्हा जरा पडायचे प्लॅन करतच उठली होती. सागर एकीकडे आवरत होता. आंघोळ - पांघोळ आटोपून, पुर्ण तयार होऊन तो डायनिंग रुमच्या खुर्चीवर येऊन बसला. 
     TOI उघडला सागरने, नी त्याच्या लक्षात आलं... आई - बाबांच्या रुमचं दार, अजूनही बंदच आहे. त्याला जरा आश्चर्यच वाटलं. कारण दोघेही साडेपाचला उठत असत रोज. त्यांच्या जुन्या घरी असतांना. घराजवळच असलेल्या गार्डनमध्ये, बाबा फिरायला जात. तर आई घरीच बसून हे निवड, ते निवड, चिराचीरी कर, पुसापुशी कर... वगैरे कामं करत बसे. मागाहून आंघोळ आटोपून तिच्या पोथ्या वाचत बसे. सागरने विचार केला की, त्यांनाही रात्री उशिराने आली असावी झोप... त्यामुळेच नसेल आली जाग. त्याने मग नाश्ता केला, चहा प्यायला, दहा मिनिटं बसून मेल्स चेक केले... काही अर्जंट पे-आऊट्सची अॅप्रुव्हल्स द्यायची, पेंडींग नाहीत ना वगैरे. आणि जाण्यासाठी शुज चढवले पायांत त्याने. या सगळ्यात आणिक पाऊण तास उलटलेला वर आता, तरीही आई - बाबा दोघांपैकी कोणीही आलं नव्हतं बाहेर. आता मात्र थोडा बेचैन झाला सागर. तेवढ्यात स्वतःची रुम उघडून बाहेर आलेल्या... त्याच्या लेकीला, रेवाला सांगितलं त्याने जरा आई - बाबांच्या रुमचा दरवाजा ठोठवायला. रेवाने मिनिटभर दरवाजा वाजवत... आणि बाहेरुन आवाजही देत, तिच्या आजी - आजोबांना बोलवायचा प्रयत्न केला. पण आतून काहीच प्रतिसाद मिळेना. रेवाने सागरकडे पाहिलं खांदे उडवत, नी ओठ मुडपत... आणि चर्र झालं छातीत त्याच्या.  सागर घाईतच उठला खुर्चीवरुन. सुरेखाही त्याच्या मागोमागच, आई - बाबांच्या रुमपाशी गेली. आता तिघांनीही मिळून दरवाजा नाॅक करायला, बाहेरुन हाक मारायला सुरुवात केली. पण आतून काहीच रिस्पाॅन्स मिळत नव्हता. आता मात्र सागर प्रचंड चरकला होता. रेवा तर रडायलाच लागली होती एव्हाना. तर सुरेखा रडवेली झाली होती. नव्या घरी आल्यावर... दुसर्‍याच दिवशी असं काही होईल, ह्याचा विचारही आला नव्हता तिघांपैकी कोणाच्याही मनात. बिल्डिंगमधले आजूबाजूचे कोणीही ओळखीचे नव्हते. त्या तिघांच बाहेरुन आवाज देणं... दरवाजा वाजवणं चालूच होतं. हताश झाले होते आता तिघेही. सुरेखाने तिथूनच हात जोडले देवाला... रेवाने हात जोडले तिच्या मागोमाग... आणि... आणि सागरनेही अखेर आज, हात जोडलेच त्या अदृष्य शक्तीला. सागर बोलला सुरेखाला... "आता दार तोडण्यावाचून पर्याय दिसत नाहीये". सुरेखा - रेवा बाजूला सरकल्या. तो आता दरवाजावर पुर्ण ताकदीनीशी धडक मारणारच होता की, रुमचा दरवाजा उघडला गेला. 
      दारात सागरच्या आई, सरोजिनीबाई उभ्या होत्या. तिघेही पार हबकले होते. आजीला सुखरुप बघून, रेवा रडतच तिला घट्ट बिलगली. सागर आणि सुरेखाही आईजवळ आले. सागरने वाकून आत पाहिलं. त्याला त्याचे बाबा, सुधाकरराव आत पलंगावर, शांतपणे बसलेले दिसले. सागर, सुरेखा आणि रेवा तिघेही आत गेले. तिघांनाही काहीच कळत नव्हतं, हे नक्की काय चाललेलं. तिघांच्याही तोंडून आता, अजिबातच आवाज फुटत नव्हता. सरोजिनीबाई येऊन, पलंगावर सुधाकररावांशेजारी बसल्या. रेवा त्यांच्या बाजूला बसली, त्यांना चिकटूनच. सागर आणि सुरेखा... भिंतीशी असलेल्या दोन खुर्च्या ओढत त्यावर बसले, त्यांच्या समोर. सागरने आई - बाबांचा एकेक हात, हातात घेतला त्याच्या... आणि... आणि अचानक बांध फुटला त्याचा... ओक्साबोक्शी रडू लागला तो. सुरेखाही रडतच त्याच्या पाठीवरुन, हात फिरवू लागली. रेवाही आजीच्या गळ्यात हात टाकून, तिच्या खांद्यावर डोकं ठेऊन रडू लागली. सरोजिनीबाई - सुधाकररावांनी काहीही न बोलता, शांत होऊ दिलं तिघांनाही. तिघांचं रडणं हळूहळू ओसरत बंद झालं. आणि सरोजिनीबाईंच्या डोळ्यांकडून मुक संमती घेत, सुधाकररावांनी बोलायला सुरवात केली... 
"खूप घालमेल झाली असेल नै तुम्हा सर्वांच्या जिवाची? विसेक मिनिटं हाका मारुनही, दरवाजा ठोठावूनही आतून काहीच प्रतिसाद न मिळणं... खूपच भयावह आहे. काय काय विचार येत असतील मनात? तो पुर्ण वेळ आपली कृती आणि आपले विचार ह्यांचा ताळमेळ बसवत, प्रयत्न करत रहाणं... बापरे... केवढा ताण पडत असेल मेंदूवर. पण अखेरीस दरवाजा तोडण्याशिवाय आता पर्याय नाही, ह्या कन्क्लुजनला आल्यावर रिलॅक्स्ड वाटलं का रे? कारण ह्या शेवटच्या आॅप्शनला हात घालणं... म्हणजेच मनाची तयारी झाली असणं की, ह्या दरवाजापलीकडे नक्कीच प्रचंड अघटीत असं काहीतरी घडलंय. कसंय की आशा असते तोपर्यंत, उत्साह असतो पर्याय शोधायचा... आशाच संपली की उत्साहही मावळतो, अन् पर्यायही सुचत नाहीत मग. उपाय तेव्हा करता येतो... जेव्हा नुसता आजार नाही, तर ते आजारी शरीर जिवंत असतं. एकदा का ते शरीर मेलं, की आजाराची किंमत शून्य होते... आणि उपायाची जागा औपचारीकता घेते. जिवंत माणसासाठी केले गेलेले प्रयत्न म्हणजे उपाय... आणि मेलेल्या शरीराचे केले जाणारे विधी म्हणजे औपचारीकता. तसेच तुम्ही तिघेही आत्ता उपाय सोडून, औपचारीकतेपर्यंत येऊन पोहोचला होतात... ह्या विचारानेच की, आम्ही दोघं काही आता जिवंत नसणार. आपलं अत्यंत जवळचं कोणी... डोळ्यांना मृत दिसण्याआधीच, मनाला मेलेत असं वाटणं किती क्लेषदायक असेल. हा मनाला वाटण्यातला नी डोळ्यांना दिसण्यातला कालावधी म्हणजे, अक्षरशः काळच समोर येऊन उभा ठाकणं नै का? आता हे नमनाला घडाभर तेल वाहण्यामागचं कारण, ही सांगेल तुम्हाला... कारण ते हिने ऐकलं होतं, आणि मग मला सांगितलं होतं".
आबाधुबीचा बाॅल हातात आल्याप्रमाणे... सरोजिनीबाईंनी तिघांकडेही पाहिलं... आणि लेकाला लक्ष्य करत, हातातला बाॅल मारला त्यांनी...
"तुझे आई - बाबा खोलीतून उत्तर देत नाहीयेत म्हंटल्यावरच, हवालदील झालेला तू... दुसर्‍या कोणाच्या आई - बाबांबाबतीत इतका निबर कसा असू शकतोस रे? आपले आई - बाबा आता आपल्याला मरणासन्न अवस्थेतच दिसणार, ह्या तात्पर्याला पोहोचून हतबल झालेला तू... दुसर्‍या कोणाच्या आई - बाबांबाबतीत इतका कोडगा कसा राहू शकतोस? मी काल किचनमध्येच काम करत होते, जेव्हा तुम्हा दोघांचं बोलणं मी ऐकलं... माझ्या सुदैवाने आणि तुझ्या दुर्दैवाने अर्थातच. आणि मला प्रचंड लाज वाटली, तू माझा मुलगा असल्याची. सुरेखा तुला विचारत होती की, तिच्या आई - बाबांना तिने इथे काही दिवस आणलं तर चालेल का? आता घर ही मोठं आहे... जागेची अडचणही होणार नाही. त्यावर तू तिला म्हणालास की, तिने जाऊन रहावं त्यांच्याबरोबर काही दिवस... आणि इतकंच असेल तर, तिच्या भावाला सांगावं लंडनमधलं सगळं आवरुन इथे यायला... तू म्हणे लोकांसाठी नाही घेतलंयस एवढं मोठं घर. लोकांसाठी?... अरे तुझ्या बायकोचे आई - बाबा रे. तिचे बाबा तुझ्या बाबांहूनही मोठे आहेत वयाने, ऐंशीच्या पुढे. तिची आई गेली चार वर्ष अंथरुणावर आहे. आधीच्या घरात कधीतरी बोलली का रे ती तुला की, आई - बाबांना आणू का? तिच आपली जमेल तसं त्यांचं जाऊन - येऊन करत असे ना... ते ही आम्हा दोघांची आबाळ अजिबात न होऊ देता. आणि तिचा भाऊ येईल न येईल... तो त्यांचं करेल न करेल, हे त्याचं कर्म आहे... ज्याची बरी - वाईट फळं तो भोगेलही. पण तू का आड येतोयस, तुझ्या बायकोच्या कर्माच्या? आम्ही दोघंही हाती - पायी धड आहोत, म्हणून तुला कल्पना नाहीये... आणि किंमत तर त्याहूनही नाहीये म्हातारपणाची. आणि तेच 'मोल' तुला कळावं, म्हणून हा सगळा घाट घातला आम्ही दोघांनी संगनमताने. वळ मिटून जातात रे, व्रण रहातो... म्हणून हे अतीरंजीत नाटक करावं लागलं आम्हाला. आणि आम्ही ठरवलंय की हिचे आई - बाबा, आता आपल्याकडेच येऊन रहातील. मी आणि हे झोपू हाॅलमध्ये. पण यापुढे ते दोघे काही दिवसांकरता नाही, तर कायमचेच आपल्याकडे रहातील. त्या दोघांच्या घराचा दरवाजा तोडून आत घुसावं लागायची वेळ, आम्हा दोघांना कोणावर आणू द्यायची नाहीये". 
सागर, सुरेखा, रेवा तिघेही अवाक् होऊन बघत होते... संजिवनीबाई अन् सुधाकररावांकडे. आज्जीच्या खांद्यावर डोकं टेकत रेवा म्हणाली... "त्या आजी - आजोबांना राहूदे माझ्या रुममध्ये... मी आलटून पालटुन दोन्ही आजी - आजोबांच्या रुममध्ये राहीन". सागर आणि सुरेखा दोघे खुर्चीवरुन उठत, पायाशी बसले आई - बाबांच्या. तो अपराधी भावनेने... आणि ती कृतार्थ.

--सचिन श. देशपांडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...