गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२

21. म्हातारपण येणे

 " हा लेख फक्त वयोवृद्ध लोकांसाठीच आहे असे नव्हे, तर सर्वांनी आवर्जून वाचावा असा आहे. म्हातारपण येणे ही एक सत्य स्थिती आहे आणि त्याला आनंदाने सामोरे जाण्यासाठी आपण सर्वांनी आधीपासूनच पावले उचलणे का आवश्यक आहे, काय करायला पाहिजे, हे समजावून सांगणाऱ्या कादंबरीची ही एक संक्षिप्त ओळख. "  
"The Sky Gets Dark, Slowly." हळूहळू आभाळ गडद होत चालले आहे, संधिकाल होऊ लागला आहे.
'Mao Dun साहित्य पुरस्कार' मिळालेले "श्री Zhou Daxin" यांची नवी कादंबरी “The Sky Gets Dark, Slowly” लवकरच प्रकाशित होत आहे. वृद्धापकाळातील परिस्थितीचा संवेदनशील शोध घेण्याचा हा एक प्रयत्न आहे, तसेच वेगाने वृद्ध होणाऱ्या लोकांमधील लपलेल्या पण व्यक्त न होणाऱ्या जटिल अशा भावना उलगडण्याचा प्रामाणिक प्रयत्न या कादंबरीत केला आहे.  
 त्यात त्यांनी असे म्हंटले आहे की बरेचसे वयोवृद्ध असे वागतात बोलतात की त्यांना जणू काही सगळेच माहित आहे. पण अशा उतार वयात ते लहान मुलांइतकेच अज्ञानी असतात. बऱ्याच वयोवृद्ध लोकांना आपल्यावर काय प्रसंग गुजरणार आहे, किंवा आपल्या पुढे काय वाढून ठेवले आहे हे माहित नसते व म्हणूनच त्या दृष्टीने त्यांनी काहीच तयारी केलेली नसते. .
वयाची ६० वर्षे उलटल्यावर  व त्यानंतर हळूहळू वय वाढत जाऊन शेवटचा श्वास घेईपर्यंतच्या काळात अशा वृद्ध व्यक्तींनी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात, जेणेकरून आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्याची मानसिक व शारीरिक तयारी होईल व घाबरून जाण्याचे काही कारण सुद्धा राहणार नाही.
१. :-  जस-जसे वय वाढत जाते तस-तसे तुमच्या आजूबाजूचे, तुमच्या जवळचे असणारे लोक हळू हळू कमी होतील. तुमच्या आई-वडिलांच्या आणि आजी-आजोबांच्या पिढीतील बऱ्याच जणांनी हे जग सोडले असेल, व समवयस्क असलेल्या तुमच्या आप्तांना व मित्रांना स्वतःकडे बघणे सुद्धा जड जाऊ लागेल. तरुण पिढी त्यांच्या कामात, त्यांच्या जीवनात व्यग्र-व्यस्त असेल. तुमच्या जीवनाचा जोडीदार सुद्धा कदाचित हे जग तुमच्या आधी किंवा तुमच्या अपेक्षेपूर्वीच सोडून गेलेला असेल. आणि यानंतर काय उरते तर एक नको वाटणारा एकटेपणा. अशा एकटेपणाच्या परिस्थितीत कसे जगायचे, एकटेपणाला सामोरे जाऊन उर्वरितजीवनातील आनंद कसा मिळवायचा, हे तुम्ही शिकून घेतले पाहिजे, त्यासाठी मानसिक तयारी केली पाहिजे.    
२. :-  उतार वयात समाज तुमच्याकडे क्वचितच लक्ष देईल किंवा तुम्हाला दुर्लक्षित करेल. तुमच्या पूर्वायुष्यात तुम्ही कितीही मोठे पद भूषवले असेल, अथवा समाजातील कितीही प्रसिद्ध व्यक्ती तुम्ही असाल, तरीही निसर्ग नियमाप्रमाणे तुम्हाला वार्धक्य हे येणारच आणि वार्धक्यात तुमच्या आजू-बाजूला घोटाळणारे लोक, तुमची हांजी-हांजी करणारे लोक तुमच्या पासून लांबच राहतील व तुम्हाला एका कोपऱ्यात गप्प उभे राहण्याची वेळ येईल. तुमच्या समोर, तुमच्या आजूबाजूला जे काही चालले आहे त्याचे कुठलाही मत्सर न दाखवता, काहीही तक्रार न करता कौतुक करणे, त्याला पसंती दर्शवणे, हेच अशा उतार वयात तुमच्या हातात आहे.
३. :-  वय झाल्यावर आता पुढचा रस्ता अडचणींचा व अडथळ्यांचा आहे. हाडे कमकुवत होणे, हृदय व रक्तवाहिन्यांचे आजार, मेंदूसंबंधी विविध विकार, कर्करोग व इतर अनेक आजार तुमचे पाहुणे म्हणून तुमच्यासमोर कधीही उभे राहू शकतात व त्यांना तुम्ही नाही म्हणू शकत नाही. तुमचे आजार, तुमची दुखणी-खुपणी यांना तुमचे मित्र समजा, कारण यांच्याबरोबरच आता तुम्हाला उर्वरित आयुष्य काढायचे आहे. तुम्हाला कुठलाही शारीरिक त्रास होणार नाही अशाभ्रमात राहूनका. पण सकारात्मक मानसिकता ठेवणे, योग्य आहार-विहार करणे हे तुमचे आता कर्तव्य आहे. आणि यात सातत्यठेवण्यासाठी स्वतःला प्रोत्साहित ठेवणे तुम्हाला गरजेचे आहे.    
४. :-  एखाद्या बालकाप्रमाणे आता आपले आयुष्य बहुतांशी पलंगावरच व्यतीत होणार आहे, ह्याची तयारी ठेवा. आपण मातेच्या गर्भातून ह्या जगात आलो ते प्रथम पलंगावरच. आणि त्यानंतर जीवनातील असंख्य चढ-उतार, हेलकावे, जीवनसंघर्ष वगैरेचा अनुभव घेऊन आपण आपल्या प्रारंभ बिंदूकडे, पलंगाकडे येतो. इतरांना आपली काळजी घ्यावी लागणार ह्या अवस्थेत असा वयस्कर माणूस पुन्हा येऊन पोचतो, फरक एवढाच असतो की बालपणात आपली काळजी घ्यायला आपली आई होती, पण ह्या टप्प्यावर असे कोणी असण्याची शाश्वती नाही. असे कोणी असले तरी ते आपल्या आईसारखी काळजी घेतील अथवा नाही याची शंकाच असते. परिचारिका 'nursing staff' वगैरेंवर अवलंबून राहण्याची वेळ वृद्धापकाळात येऊ शकते, पण त्यांच्या जवळ आईची माया कुठून असणार? चेहऱ्यावर हास्य ठेवून उपकार केल्याच्या भावनेने, कंटाळून, त्या परिचारिका तुमची सेवा करतील. पण अशाही कठीण परिस्थितीमध्ये शांत रहा व न विसरता कृतज्ञता व्यक्त करा.  
५. :-  आता जीवनमार्गातील शेवटच्या काळात तुम्हाला त्रास देणारे, तुम्हाला फसवणारे लोक भेटतीलच. त्यातील बहुतेक जणांना माहित असेल की तुम्ही बऱ्यापैकी संपत्ती जमा केली आहे, आणि तुम्ही जमवलेले हे पैसे तुमच्याकडून हिसकावून घ्यायला काय करावे याचाच विचार असे लोक करत असतील. तुम्हाला खोटे फोन करतील, टेक्स्ट मेसेजेस पाठवतील, ई-मेल करतील. तुम्हाला विविध अन्नपदार्थ किंवा वस्तूंची प्रलोभने दाखवतील, 'लवकर श्रीमंत व्हा' यासारख्या योजना तुमच्या समोर ठेवून तुम्हाला भुलवण्याचा प्रयत्न करतील, दीर्घायुष्यासाठी काही नवीन उत्पादने घेण्यासाठी तुम्हाला भाग पाडतील, वगैरे वगैरे. थोडक्यात म्हणजे तुमच्या संपत्तीवर डल्ला मारण्यासाठी अशी लोकं कुठल्याही थराला जातील. म्हणूनच सावध राहा, काळजी घ्या,आपल्या संपत्तीला कोणालाही हात लावू देऊ नका. शहाणपणाने वागला नाहीत तर तुमचे पैसे तुमच्यापासून दूर जायला वेळ लागणार नाही, म्हणून ह्या वयात काटकसरीने व हुशारीने पैशाचे व्यवहार करा.
शेवटची घटिका येण्यापूर्वी, आयुष्यातील संधीकालात, आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर सर्वकाही अंधारून आल्यासारखे वाटेल, आणि ते साहजिकच आहे. पुढील मार्ग दिसणे कठीण होऊन जाईल व त्यामुळे पुढील वाटचाल सुद्धा सोपी असणार नाही. आणि म्हणूनच, एकदा का वयाची ६० वर्षे पार झाली की मग आयुष्य जसे आहे तसे बघण्याचा प्रयत्न करा, आपल्याकडे जे काही आहे त्याचा आनंद घ्या, शक्य असेल तोपर्यंत आयुष्याची मजा अनुभवा. समाजातील कुठलेही ओझे अंगावर घेऊ नका. मुलांमध्ये नातवंडामध्ये अडकून राहू नका. वागणूक साधी व नम्र ठेवा, आपण वयाने मोठे आहोत म्हणून आपण फार शहाणे आहोत असे समजू नका व तसे इतरांना दाखवू पण नका. उद्धटपणे इतरांशी बोलू नका कारण त्याचा त्रास इतरांना होईलच, पण तुम्हाला त्याचा त्रास जास्त होईल. आपले वय जस-जसे वाढत जाते तस-तसे आदर म्हणजे काय व त्याचे महत्व समजून घेणे अत्यावश्यक आहे. कुठल्याही वस्तूची किंवा व्यक्तीची आसक्ती न ठेवणे किती गरजेचे आहे हे लक्षात घेणे अशा उतार वयात आवश्यक आहे व तशीच आपली मानसिकता ठेवणे गरजेचे आहे. निसर्गाचा मार्ग म्हणजेच जगण्याचा मार्ग. त्याच प्रवाहाच्या दिशेने वाटचाल करीत , जीवनातील शेवटच्या टप्प्यावरील आपले मार्गक्रमण संतुलित करा.     
आपण सर्वांनी वाचावे असेच हे पुस्तक आहे, खूप छान, खूप सुंदर
आत्ताच दिवस सुरु झाला ... आणि बघता बघता संध्याकाळचे ६ वाजले.
काल सोमवार होता असे वाटत होते ... आणि आज शुक्रवार आला सुद्धा.  
... महिना संपत आला,
... वर्ष संपायला आले,
...आणि वयाची ५०, ६०, ७० वर्षे केव्हां निघून गेली हे कळलेच नाही
..आपले आई-वडील,आपले आप्तस्वकीय, मित्र वगैरे हे जग सोडून गेले आणि मग समजेना की आता मागे कसे फिरायचे?  
चला तर मग, जो काही वेळ आता आपल्याकडे उरला आहे त्याचा पूर्ण फायदा करून घेऊ.
आपल्याला जे आवडते ते करण्यासाठी आता थांबायचे नाही ...
आपल्या आयुष्यात रंग भरुया ... 
छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घेऊया ...  
हृदयात आणि मनात चैतन्य निर्माण करूया ...  
उर्वरित काळाचा आनंद जर लुटायचा आहे
तरमग कुठलीही कृती पुढे ढकलू नका
... हे नंतर करेन
... हे नंतर सांगीन
... यावर नंतर विचार करेन  
'नंतर' आपल्या हातात आहे असे समजूनच आपण पुढे ढकलतो ना सगळे .....
कारण, आपण हे समजून घेत नाही की
चहा थंड झाल्यानंतर ...
प्राधान्य बदलल्यानंतर ...
उत्साह निघून गेल्यानंतर...
आरोग्य बिघडल्यानंतर ...
मुले वयात आल्यानंतर ...
आई-वडील म्हातारे झाल्यानंतर ...  
आश्वासन न पाळल्यानंतर...
दिवसाची रात्र झाल्यानंतर ...
आयुष्य संपल्यानंतर ...
आणि ह्या सगळ्या 'नंतर' नंतर आपल्याला कळते अरे बापरे... उशीर झाला की ...  
*" आणि म्हणूनच 'नंतर' काही ठेवू नका.
'नंतर' ने 'अंतर' वाढते व चांगल्या गोष्टी, चांगले क्षण हातातून निसटून जातात
उदाहरणार्थ ... उत्तम अनुभव, उत्तम मित्रमंडळी, उत्तम कुटुंब "
दिवस आजचा ... आणि क्षण आत्ताचा ...  
आजची गोष्ट उद्यावर ढकलणे आपल्याला झेपणारे नाही, कारण आता आपले वय उतरणीस लागलेय.
तर बघूया की वेळ न दवडता हा संदेश इतर लोकांपर्यंत कोण कोण पोचवत आहे? कारण, हा संदेश नंतर पाठवीन असा कोणी विचार केला तर ... तर कदाचित तो पुढे कधीच पाठविला जाणार नाही.
जे वयस्कर नाहीत त्यांच्या पर्यंत सुद्धा हा संदेश पोचावा.
सर्वजण आरोग्य संपन्न व आनंदी राहोत हीच सदिच्छा.  

20. कोण या तिघी ?

 तिघींना देवीचाही आशीर्वाद हवा,

म्हणून तो 'नवरात्री' साजरी करतो.

कोण या तिघी ?


पहिली त्याला जन्म देते,

दुसरी या जन्मात त्याला भेटते.

तिसरी त्याच्याकडे जन्म घेते.


पहिली त्याच्यासाठी जीवाचं रान करते.

दुसरी त्याला जीव लावते.

तिसरी त्याला जीव लावायला शिकवते.


पहिलीचा तो प्राण असतो.

दुसरीला तो प्रिय असतो.

तिसरी त्याला प्राणाहून प्रिय असते.


पहिली त्याला संस्कार देते.

दुसरी प्रेम देते.

तिसरी सुख देते.


त्याला ठेच लागताच,

पहिलीचे नाव त्याच्या तोंडात येते. 

दुसरीच्या डोळ्यात पाणी येते.

तिसरी त्यावर फुंकर घालते.


पहिलीचा तो 'बाळ' असतो.

दुसरीचा 'नवरा' असतो.

तिसरीचा तो 'बाप' असतो.


संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 


बुधवार, २८ सप्टेंबर, २०२२

19. निवृत्त होईपर्यंत प्रामाणिकपणे काम करणे, हेच सर्वोत्तम....

 एक सुतार काम करणारा ६० वर्षांचा माणूस होता तो आत्ता ज्या मालकाकडे काम करत होता तिथे त्याला ४० वर्षे झाले होते. ह्या ४० वर्षाच्या काळात त्याने हजारो घरे बनवली होती. पण आता त्याला संसाराला वेळ द्यायचा होता. तो त्याच्या मालकाकडे जाऊन म्हणतो, मालक ४० वर्षे मी तुमच्याकडे इमाने इतबारे काम केले पण आता मला माझ्या संसाराला वेळ द्यायचा आहे, माझ्या मुलांबरोबर, माझ्या मुलांच्या मुलांबरोबर वेळ घालवायचा आहे. मला निवृत्त व्हायचे आहे. 
आता मालक तर मालक असतात, जाता जाता सुद्धा आपल्या कामगारांकडून अजून थोडं काम कसं करून घ्यायचं हे त्यांना चांगलच माहिती असते...तेव्हा मालक त्या सुताराला म्हणतो ठीक आहे. तुला निवृत्त व्हायचंय तर तू होऊ शकतोस पण एक शेवटचे तीन महिन्यांचे काम आले आहे ते फक्त करून जा, ते काम झाल्यानंतर तुझा छान पैकी निरोप समारंभ करू आणि एकदम उत्साहात तुला निरोप देऊ.
एवढे वर्ष मालकाने आपल्याला सांभाळून घेतलं, आपल्याला आधार दिला, हा विचार करून त्या सुताराने ते काम करायला होकार दिला. पण आता त्याच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये फरक आला होता. त्याने विचार केला होता की मस्त घरी बसून आराम करेन, पण अजून ३ महिने काम करावे लागणार होते. आतापर्यंत प्रत्येक काम मन लावून केले होते पण आता कसेतरी करायचे म्हणून तो काम करत होता. ज्या सुताराने आपल्या पूर्ण आयुष्यात सगळ्यात सर्वोत्तम घरे बनवली पण आता शेवटचे घर बनवताना त्याचे अजिबात मन लागत नव्हते. कसेतरी लाकडे कापायची, कसेतरी खिळे ठोकायचे, कसेतरी पॉलिशिंग करायचे असे करत करत तो घर बनवत होता.कसंबसं त्याने ते अर्धवट मनाने का होईना पण ३ महिन्यात घर पूर्ण केले. घर पूर्ण झाल्यानंतर तो सुटकेचा निश्वास सोडतो. झालं बाबा कसतरी असा तो विचार करतो. तो मालकाला जाऊन सांगतो, मालक घर पूर्ण झालं आहे. तेंव्हा मालक त्याच्याबरोबर घर बघायला निघतो. घर एकदम जवळ आलेले असताना तो मालक थांबतो त्या सुताराचा हात पकडतो आणि त्याच्या हातात त्या घराच्या चाव्या देत म्हणतो.
हे जे घर तू बनवलं आहेस ते तुला मी माझ्यातर्फे भेट म्हणून देत आहे. गेली ४० वर्षे तू माझ्याकडे जी मेहनत केलीस त्याचे फळ म्हणून हे घर मी तुला देत आहे. हे तुझे स्वतःचे घर होते जे तू बनवत होता. 
मित्रांनो विचार करा काय वाटले असेल त्या सुताराला...?? काय चालले असेल त्याच्या मनात...??
मला कोणी सांगितले असते की हे माझे घर आहे तर माझ्या आयुष्यातले सगळ्यात वाईट घर बनवण्याऐवजी मी सर्वोत्तम घर बनवले असते. अरे! कोणी मला सांगितले का नाही की हे माझे घर आहे. सांगितले असते तर एक एक खिळा, एक एक लाकूड, पॉलिश करताना मी हजार वेळा विचार केला असता आणि एक सर्वोत्तम घर बनवले असते. मी आता परत मागे सुद्धा जाऊ शकत नाही. 
का मी असे केले...??
"नोकरीचे असो नाहीतर इतर, कुठलेही काम आपण स्वतःसाठीच करतोय असे समजुन करा..."
"आपल्यावर पश्चातापाची वेळ कधीच येणार नाही...आणि चांगले काम केल्याचा आनंद आपल्याला कायमचा मिळेल...!!"  सुंदर आहे ना कल्पना...!!  
कुठेही काम करा प्रामाणिकपणे करा आणि चांगले काम करा.चांगले काम केल्याचे फळ नेहमीच चांगले मिळते.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

18. कालबाह्यतेचा सापळा...

 जानेवारी १९२५...
स्वित्झर्लॅंडच्या जिनिव्हा या शहरामध्ये एक खास उद्योगसमूहाने एक गुप्त सभा आयोजित केली गेली होती.विजेवर चालणारे प्रकाशदिवे (बल्ब) बनवणारे सर्व आघाडीचे उत्पादक त्या मिटींगमध्ये सहभागी झाले होते.बल्बचा शोध लागून एव्हाना नव्वद वर्ष झाली होती.सुरुवातीच्या काळातले बल्ब अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि अल्पायुषी होते पण त्यात प्रचंड सुधारणा होत गेल्या. १९२० पर्यंत तब्बल अडीच हजार तासांचे आयुष्य असणारे दर्जेदार आणि दिर्घायुषी बल्ब बाजारात उपलब्ध व्हायला लागले होते.जनता बल्बवर खुश होती पण कोणालातरी बल्बचे इतके दिर्घजीवी असणे खटकत होते. ते कोण होते?
साक्षात बल्ब उत्पादक...
कारण त्यांना वाटत होते की प्रत्येक आवृतीनंतर बल्बचे आयुष्य वाढत जाणे हे त्यांच्या धंद्याच्या दृष्टीने धोक्याचे आहे. जिनिव्हाच्या त्या मिटींगमध्ये इंटरनॅशनल जनरल इलेक्ट्रील, ओसराम, फिलिप, टंगस्राम, असोसिएटेड इलेक्ट्रिकल इंडस्टिज या सर्व जागतिक आघाडीच्या बल्बनिर्मात्यांनी एक गुप्त करार केला.
आपल्या दिर्घकालीन हितासाठी आणि येणाऱ्या काळात भरघोस नफा मिळवण्यासाठी ते सर्वजण मिळून निकृष्ट दर्जाच्या अल्पायुषी बल्बचीच निर्मिती करतील. त्या सर्वांनी या कराराचे इमानेइतबारे पालनही केले. पुर्वी अडीच हजार तास चालणारे बल्ब बाजारातून नामशेष झाले. १९२५ नंतर बाजारात येणारे बल्ब फक्त एक हजार तास चालू लागले. आयुष्य घटले आणि साहजिकच बल्बची मागणी वाढली. खप वाढला.
निकृष्ट दर्जाचे बल्ब आधीच्या किंमतीत विकून कंपन्यांनी ग्राहकांना मनसोक्त लूटले होतेच. आता आयूष्यमान कमी झाल्यामूळे विक्रीही दुप्पट तिप्पट झाली. बल्ब विक्रेत्यांची चांदीच चांदी झाली. उत्पादनाचा दर्जा घसरवुनही पैसे कमवता येतात हे नवेच गुपित उद्योगजगताला माहीत झाले. बल्ब कंपन्यांच्या त्या एकत्र येऊन सापळा रचणाऱ्या कंपन्यांना फिबस कार्टेल या नावाने ओळखले जाऊ लागले. वस्तूंचा दर्जा घसरावून पैसे कमवण्याच्या त्यांच्या क्लृप्तीला म्हणतात "प्लॅन्ड ओबसोलेसेंस".
खरंतर हा सापळा आहे.
मराठीत याला "नियोजित अप्रचलन" असे म्हणता येईल. सोप्या शब्दात एखादी वस्तू लवकर कालबाह्य करुन ग्राहकाला पुन्हा एक नवी खरेदी करायला भाग पाडणे असे याचे वर्णक करता येईल.
दहा पंधरा वर्षापुर्वीचे मोबाईल फोन चांगले पाच पाच वर्ष चालायचे. हल्ली मात्र कितीही भारीचा घेतला तरी एक स्मार्टफोन दोन तीन वर्षापेक्षा जास्त टिकूच शकत नाही. कारण तेच.  *नियोजित अप्रचलन."
जाणून बुजून फोनची रचनाच अशी केली जाते की तीन चार वर्षात फोन निकामी व्हावा. जुन्या उत्पादन टिकाऊ असेल तर कंपनीने निर्माण केलेले नवे उत्पादन कोण घेईल? लाखो कोटी रुपयांचा बिजनेस हवा असेल तर पुर्वीच्याच ग्राहकांना पुन्हा खरेदी करायला भाग पाडले पाहिजे. आजची बहूतांश उत्पादने याच धर्तीवर बनवली जातात. पुर्वीचे टीव्ही वीस वीस वर्ष चांगले चालायचे. आताच्या एल ई डी मधे पाच सात वर्षात पट्ट्यापट्ट्या दिसायला लागतात.
१००० वेळा पुन्हा पुन्हा दाढी करता येईल आणि स्वच्छ करुन पुन्हा पुन्हा वापरता येतील अशा टिकाऊ ब्लेड बनवण्याचे तंत्रज्ञान आज उपलब्ध आहे पण कोणतीही नामांकित कंपनी तशा प्रकारच्या ब्लेड बनवण्यात पुढाकार घेत नाही. कारण मग सोन्याची अंडी देणारा बिजनेस कायमचा बसेल.
लहानपणी पेनमधील शाई संपली की नवी रिफील घ्यायची प्रथा होती. आता पेन कचऱ्यात फेकून नविन पेन घ्यायची प्रथा रुजली आहे. आजही जेव्हा पेनच्या रिफिलचा शोध घेतो तर बहूतांश पेनच्या रिफीलच मिळत नाहीत. कारण तेच. मग दुप्पट किंमतीला विकले जाणारे नवे पेन कोण विकत घेईल?
या नियोजित अप्रचलन नावाच्या विकृत व्यापार फंड्यामूळेच 'वापरा आणि फेका' नावाचा भस्मासुर जन्माला आला. सुंदर निसर्गाचे एका विशाल कचराकुंडीत रुपांतर व्हायला लागले. कपडे विटले, फेकून द्या. शुज उसवले, फेकून द्या. लॅपटॉप खराब झाला, दुरुस्तीऐवजी नवाच घ्या. इस्त्री चालेना झाली, नवीन घ्या. मिक्सर बिघडला, नवीन घ्या. वॉशिंग मशीन खराब झाली, नवे मॉडेल घ्या. पंधरावीस वर्षांखालच्या गाड्यांचे स्पेअरपार्ट मिळत नाहीत आणि उपभोक्ता कंटाळून गाडी कवडीमोल भावात विकून नवी गाडी घेण्याच्या तयारीला लागतो. एकदा माऊस किबोर्ड खराब झाला की फेकून द्यावा लागतो. लाईटच्या माळा, चार्जर, हेडफोन इत्यादी  इलेक्ट्रीक उपकरणांना दुरुस्त करणे ही संकल्पनाच आता मोडकळीला आलेली आहे. फुटबॉल किंवा क्रिकेटमध्ये प्रत्येक वर्षी प्रत्येक संघामध्ये नव्या प्रकारच्या जर्सीची ब्रॅंड न्यु डिझाईन लॉंच केली जाते. संघ तोच. खेळाडू तेच. प्रत्येक मौसमात अवतार मात्र नवा असतो. कारण प्रेक्षकांना शर्टपॅंटचे नवे जोड विकायचे आहेत. चाहत्यांना सामन्याला जाताना मागच्या वेळीचा शर्ट घालताना लाज वाटते. सर्वजण त्यांच्याकडे गरीब आहे असा दृष्टिकोन टाकतील म्हणून तो आपल्या आवडत्या संघासाठी नवी जर्सी आनंदाने खरेदी करतो. भारतात कमी असले तरी विदेशांमध्ये ही क्रेझ मोठ्या प्रमाणात दिसते. 
नियोजित अप्रचलनाचा आणखी एक छोटा भाऊ आहे. तो म्हणजे "समंजस अप्रचलन" (पर्सिव्हड ऑबसोलेसेंस). यामध्ये तुमची कार आता जुनी झाली आहे, पर्यायाने तुम्ही आऊटडेटेड झाले आहात असे तुमच्या मनावर बिंबवण्यात येते. जाणूनबुजुन आणि प्रयत्नपुर्वक तुमच्या वापरात असलेल्या जुन्या वस्तूंविषयी तुमच्या मनात उदासीनता आणि न्युनगंड निर्माण केला जातो. एखादी वस्तू विकत घेतली नाही तर तुमचे व्यक्तिमत्व अधुरे अपुर्ण आहे असे जाहिरातींच्या माध्यमातून सुप्त मनावर पुन्हा पुन्हा ठसवले जाते. साधे भोळे आणि खोट्या प्रतिष्ठेपायी या चतुर लोकांनी रचलेल्या जाळ्यात अलगद अडकतात. स्वतःला उच्चशिक्षित मानणारा सुजाण श्रीमंत वर्ग या कंपन्यांच्या तावडीत सापडतो आणी आवश्यकता नसताना कधी मजबुरीने नवी खरेदी करतो.त्यांना वारंवार सांगितल्या गेलेल्या उत्पादनांची ते आज्ञा पाळल्यासारखी निमूटपणे खरेदी करतात.कधी दिखावा करण्यासाठी, कधी छाप पाडण्याच्या नावाखाली, कधी स्वतःचा अहं पोसण्यासाठी, कधी स्टेटस मेंटेन करण्याच्या नावाखाली अव्याहत खरेदी सुरुच असते.कोणतीही नवी खरेदी करण्याआधी मला या वस्तूची खरंच तीव्र गरज आहे का याचा समग्र विचार करण्याची त्यांची आकलनशक्तीच त्यांनी हळूहळू गमावलेली असते.
लठ्ठ पगार कधीही एकटा येत नाही. येताना तो चंगळवादालाही सोबत घेऊन येतो. नवश्रीमंतांच्या बाबतीत तर हे हमखास घडते. महागड्या ठिकाणी पार्ट्यांना जाणे. आधी भरपुर वाढून घेणे आणि नंतर जात नाही म्हणून ताटात तसेच अन्न टाकून देणे ही याचीच लक्षणे असतात. आर्थिक सुबत्ता असूनही ज्याने संयम गमवला नाही आणि जो सत्व पाळू शकला तोच खरा भाग्यवान.  
वस्तूंना रुपयां-पैशात तोलणारी माणसं खरी कर्मदरिद्री. ती बनवण्यासाठी लागणारी साधनसंपत्ती, त्याच्या निर्मितीसाठी घेतले गेलेले कष्ट या सर्वांचे मोल ज्याला समजले तो खरा सुजाण... बिजनेस माईंडच्या चतुर पण मुठभर लोकांनी पर्यावरणाचा बट्ट्याबोळ केला आहे. स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी उभ्या जनतेला आणि त्यासोबत निसर्गाला त्यांनी स्वतःच्या दावणीला बांधले आहे. श्रीमंत लोकांच बरं आहे. ते फक्त पैसे देऊन किंमत चुकवतात. गरीब लोक आपलं आयुष्य देऊन अप्रचलनात बळी जातात. जल-प्रदुषण, भु-प्रदुषण आणी हवा-प्रदुषणाचे सर्वात गंभीर परिणाम त्या देशातील दारिद्र्यरेषेवर झगडणाऱ्या नाजुक नाशवंत लोकसंख्या घटकावरच होतो. 
हे बदलायला हवे. तुम्ही तयार आहात का? प्रत्येक खरेदी सजगपणे करा. वापरा आणि फेकाच्या गोंडस सापळ्यात अडकू नका. अप्रचनलाचे नवे बळी  बनू नका...!!

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

सोमवार, २६ सप्टेंबर, २०२२

17. स्त्री -जन्म...

 त्या दिवशी रात्री मी *स्वैपाक* करताना माझा

छोटा मुलगा जवळ उभा राहून पहात होता.
मी छोटासा फुलका लाटून तव्यावर टाकला
आणि एकदा परतुन भाजून घेतला.
तोवर दुसरा लाटून तयार होताच.
एका हातात पकड घेऊन तवा उचलला
आणि फुलका चिमट्याने त्यावर धरला,
लगेच तो फुगून आला.
मुलगा आश्चर्याने म्हणाला
"झाला पण फुलका?
*ईतका सोप्पा* ??"
😃
मी म्हणाले
"हो, कठीण नसतोच मुळी फुलका.
खर तर सगळा स्वैपाकच मुळी
सोप्पा असतो. कठिण असतं ते...
तो रोज रोज करणे, दिवसातून
अनेक वेळा ओट्याशी झुंजत उभे राहणे,
*आपल्या मूड चा, मनःस्थिती चा* ,
*आजारपणाचा, दुखण्याचा* *कशाकशाचा*
*विचार न करता अचूक आपली*
*भूमिका निभावत भयंकर*
*उकाड्यात देखील शेगडी जवळ*
*न कंटाळता लढत देणे .*

सगळे संपले असे वाटत असतानाच
ऐन वेळेवर नव्याने कणीक मळून
चार पोळ्या जास्त कराव्या लागणे,
स्वैपाक घर आवरून ठेवल्यावर
'संपली एकदाची दगदग आतापुरती'
असे वाटत असतानाच... बैठकीतून '
'आज जेवूनच जा' चा पुरुष मंडळींनी
पाहुण्यांना केलेला आग्रह
हसून साजरा करणे आणि तडक
बिनपगारी overtime करणे

आणि हे करीत असताना प्रत्येकाची भाजी,
तिखट, चटणी ची वेगळी आवड
आणि तर्‍हा समजून त्यानुसार
जास्तीत जास्त मने सांभाळत खपणे

बरे एवढे करून भागेल
तर कसले स्वैपाकघर? 
म्हणुन सगळा जिव निघून गेल्यावरही
ओटा, शेगडी, भांडी सगळे घासून
पुन्हा लख्ख करून ठेवणे,
ईतक्या मेहनतीला साधा कुणी
thank you चा उच्चार ही न करता
साधी पुढली ताट देखील न उचलता
निघून जाणे

भरीस भर म्हणून
'ह्यात कोणते जग जिंकले??
*स्त्रिया असतातच स्वैपाक आणि*
*घरकाम करण्यासाठी टाइप'*
*सामाजिक मान्यता असणे..*
आणि हे सगळे शिकल्या सवरल्या
स्त्रिया आहात म्हणुन बँक, शाळा,
नोकर्‍या, उद्योग, मीठ मसाला,
नातेवाईक, सण समारंभ ईत्यादी व
इतर अनेक गोष्टी जास्तीच्या सांभाळुन
फिरून ओट्याशी दोन हात करीत
न कुरकुरता उभे राहणे.

कामवाल्या बाईला निदान पगार तरी देतात,
घरच्या बाईला काही ठिकाणी तर तेवढीही किम्मत नसते.

अरे ..
**फुलका कठीण नसतोच मुळी..*
*कठीण असतो तो स्त्री जन्म* ."*

(खूप साऱ्या स्त्रियांचे मनोगत ...)

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

शनिवार, २४ सप्टेंबर, २०२२

16. लग्न कधी कसे जमणार विचार करा...

 सरकारी नोकरी नाही - नको

कमी शिक्षण आहे - नको

पगार कमी आहे - नको

खेड्यात राहतो - नको

स्वतःचे घर नाही - नको 

घरात सासू सासरे आहेत - नको

शेत नाही - नको 

शेती करतो - नको

धंदा करतो - नको

फार लांब राहतो - नको

काळा आहे - नको

टक्कल आहे - नको

बुटका आहे - नको

फार उंच आहे - नको

चष्मा आहे - नको

वयात जास्त अंतर आहे - नको

तो जिथे राहतो तो एरिया बरोबर नाही- नको

एक नाडी आहे - नको

मंगळ आहे - नको

नक्षत्र दोष आहे - नको

मैत्रीदोष आहे - नको

सगळ्यालाच नकार देत राहिलात तर मग लग्न कधी करणार?

संसार कुणाबरोबर करणार ?

आई/ वडील कधी होणार ?

सासू/सासरे कधी होणार?

आजी/आजोबा कधी होणार ?

बरं एवढया सगळ्या कारणांसाठी मुलाला नकार देत असताना मुलींमध्ये अशी कोणती खास गुणवैशिष्ट असतात हे आईवडील सांगू शकतील काय ? अनेक मुलींना संसार कसा करतात हे माहीत नसतं, तडजोड कशी करायची हे माहित नसतं, रोजच जेवण सुद्धा बनवता येत नाही काही मुलींना. मान्य आहे मुली हुशार आहे, शिकलेल्या आहेत, स्वतःच्या पायावर उभ्या आहेत म्हणून तुम्ही त्यांच्यापेक्षा हुशार जावयाची, त्याच्या लठ्ठ पगाराची, त्याच्या प्रॉपर्टीची अपेक्षा ठेवणार त्या अपेक्षा पूर्ण होत नाही म्हणून स्थळांना नकार देत राहणार आणि मुलीचं वय वाढत राहणार... या सगळ्यात नुकसान होतंय ते कमी पगार असलेल्या चांगल्या स्वभावाच्या आणि निर्व्यसनी मुलांचं... ज्यांना मनापासून जोडीदार हवा असतो पण मुलींच्या, त्यांच्या आईवडिलांच्या आणि नातेवाईकांच्या वेलसेटल च्या व्याख्येत ते बसत नाहीत त्यामुळे ते मागे पडतात,

मुलाच्या लग्नाच्या वेळेस असलेल्या पगारावर मुलीच्या भविष्याची चिंता त्यांच्या पालकांनी करण्यापेक्षा त्या मुलावर विश्वास दाखवून मुलीचं त्याच्यासोबत लग्न करून देण गरजेचं आहे, कारण त्या मुलाचा जो पगार आता आहे तोच भविष्यात राहणार नाही, त्यात दरवर्षी वाढ होत राहणार आहे तसंच लग्न झाल्यावर त्या मुलाला पण त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी, भरारी घेण्यासाठी नवीन उत्साह, उमेद, बळ मिळणार आहे आणि पगार चांगला आहे म्हणजे मुलगी सुखी राहील हा एक गैरसमज आहे, भविष्यात काय होईल हे कोणालाच माहिती नसतं, त्यामुळे राजाचा रंक आणि रंकाचा राजा होऊ शकतो.

हल्ली लग्न म्हणजे मुलामुलींपेक्षा त्यांच्या आईवडिलांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी स्टेटस सिम्बॉल चा विषय झालेला आहे.

माझा जावई डॉक्टर, इंजिनीअर, MBA, C A, MCA आहे हे सांगण्यात, एवढं लाखाचं पॅकेज आहे हे सांगण्यात पालकांना मोठेपणा वाटतं आहे आणि तसं स्थळ मिळावं यासाठी प्रत्येक मुलीचा, मुलीच्या आईवडिलांचा आणि नातेवाईकांचा प्रयत्न असतो, पण सर्वांनीच अशा अपेक्षा ठेवल्या तर बाकी मुलांनी करायचं काय ? त्यांची लग्न कशी होणार हा प्रश्नच आहे.

जेव्हापासून लग्नात माणसापेक्षा शिक्षण, पैसा, प्रॉपर्टी याला जास्त महत्व आलंय तेव्हापासून नवरा बायको मध्ये भांडणाचं आणि घटस्फोट होण्याचं प्रमाणही वाढलंय हे सत्य विसरून चालणार नाही.

लग्नात भौतिक सुखांपेक्षा मानसिक सुखाची, आधाराची, समजूतदारपणाची जास्त गरज असते.

आईवडिलांनी आपल्या मुलाचा / मुलीचा सुखाचा विचार जरूर करावा..

पण तो करताना त्यांच्या वाढत जाणाऱ्या वयाचं आणि निघून चाललेल्या वेळेचं भानही ठेवायला हवं कुठेतरी थांबायला हवं आणि अपेक्षांवर अडून न बसता तडजोड करून पुढे जायला हवं कारण अपेक्षा या कधीच न संपणाऱ्या असतात.....

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

15. नवे वृध्दाश्रम....नवी यातनाकेंद्रे...!!!!

 (सचिन मधुकर परांजपे) लेख वाचा, नावासह शेअर करा

ज्यांनी आयुष्यभर खस्ता खाऊन, ओढग्रस्तीने संसार करत स्वत:च्या मुलाबाळांना वाढवलं आहे...मोठं करुन स्वत:च्या पायावर उभं केलं आहे अशांच्या अनेक मुलांनी अत्यंत हुशारीने वागून त्यांना वृध्दाश्रमाचा रस्ता दाखवला नाहीये, पण स्वत:च्या मुलांच्या जबाबदाऱ्या म्हाताऱ्यांच्या अंगावर टाकून त्यांचा अनेकवेळा गैरफायदा घेतला आहे आणि घरातच नवे वृध्दाश्रम काढले आहेत. सोनेरी पिंजऱ्यात आईबापांना बंद करुन टाकले आहे आणि हक्काचे बिनपगारी नोकर बनवले आहेत....

आसपास घडणाऱ्या काही घटना बघितल्या की अक्षरश: अंगावर काटा उभा रहातो. माझ्या माहितीतील कित्येक मुलांनी म्हाताऱ्यांच्या वात्सल्याचा आणि प्रेमाचा गैरफायदा घेऊन, त्यांना Taken for granted धरुन स्वत:ची मुले त्यांच्या जबाबदारीवर टाकून स्वत:च्या करिअरकडे लक्ष दिले आहे. साधारणत: साठी पासष्ठीनंतर मनुष्य मग तो स्त्री असो की पुरुष इतक्या वर्षाच्या संघर्षाला थकलेला असतो, कंटाळलेला असतो, वैतागलेला असतो....मुले मोठी झालेली असतात, त्यांचे संसार सुरु झालेले असतात. अशावेळी या संध्याछायेच्या कातरवेळी त्याला स्वत:साठी थोडा वेळ हवा असतो, विश्रांती हवी असते...पण नकळतपणे आणि अलगदपणे नातवंडांच्या जबाबदाऱ्या पुनश्च अंगावर येऊन पडतात आणि तो पुन्हा गुरफटला जातो....

म्हाताऱ्या अजीआजोबांना नातवंडांबद्दल अपार प्रेम आणि माया असते, नाही असं नाही. पण वयोमानामुळे, थकलेल्या शरीराने त्यांना रोज नातवंडांना न्हाऊमाखू घालणं, जेवण देणं, त्यांच्या उत्स्तवाऱ्या करणं, त्यांना हवं नको ते पहाणं हे शक्य होईलच असं नाही. पण मुलांच्या इमोशनल ब्लॅकमेल खाली दबून जाऊन त्यांना हे स्विकारणं भागच होऊन जातं, तोंडा दाबून बुक्क्यांचा मार होतो. सेटल झालेला बिझी मुलगा, बक्कळ पगाराची सुनबाई यांना करिअरमधुन वेळ नसतो, मग आपल्या नातवंडांचं कसं होणार? डे-केअरमध्ये त्यांची देखभाल कोण आणि कशी करेल? दिवसभराची मोलकरीण ठेवली तर ती मायेने करेल का? असे अनेक प्रश्न म्हाताऱ्यांनाच पडतात आणि त्याभरात त्यांना स्वत:ला न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्विकाराव्या लागतात.....

एकदा जबाबदारी स्विकारली की मग स्वत:चं आरामाचं वैयक्तिक आयुष्य नातवंडांच्या दावणीला बांधलं जातं...लफ्फेदार ड्रेस घालून सुनबाई कार घेऊन कामाला गेल्या की नातवाला किंवा नातीला ब्रेकफास्ट बनवून देणे, त्याचा डबा भरुन देणे, त्याला स्कूलबसपर्यंत सोडायला जाणं इथपासुन ते दुपारी आडनिड्या वेळेला नातू किंवा नात शाळेतून परत आली की स्वत:ची वामकुक्षी टाळून त्याला आंघोळ घालणे, जेवायला देणे, झोपवणे ही कामं करावी लागतात..

नातवंडांची इतकी प्रचंड काळजी घेऊनही जरा कुठे काही कमीजास्त झालं किंवा त्याची तब्येत बिघडली की..."लक्ष कुठे असतं हो तुमचं?" किंवा "तुमच्याच आईने काहीतरी खाऊ घातलं असेल माझ्या पोराला..." असे खडे बोलही ऐकावे लागतात म्हाताऱ्यांना...

कधीकधी तर संध्याकाळी सुन किंवा मुलगा आला की स्वत:चा लॅपटॉप उघडून बसतात आणि मग कधीकधी रात्रीच्या जेवणाचंही सासुबाईंनाच बघावं लागतं....सुन असते हाय-क्वालिफाईड...त्यामूळे तिला बोलून चालणार नसतं...एखादा शब्द जर कमीजास्त झाला तर स्वत:चाच मुलगा डोळे वटारुन बघू लागतो....वर वर छान दिसणा़ऱ्या आयुष्यांचे हे असले सोनेरी बंदिस्त वृध्दाश्रम आता जागोजागी दिसायला लागले आहेत...इथे सर्व सुखे हात जोडून उभी आहेत पण विश्रांती नाही, जबाबदाऱ्या संपलेल्या नाहीत, थकलेल्या शरीराला आराम नाही. अमेरिकेत मुलाकडॆ कौतुकाने गेलेले आईबाप चार महिन्यांनी उतरलेल्या चेहऱ्याने एअरपोर्टवर आलेले मी स्वत: बघितले आहेत. कालपरवापर्यंत मुलाच्या अमेरिकन नोकरीचं कौतुक करणारे काकाकाकू यानंतर पुन्हा अमेरिकेला जायचं नावही घेत नाहीत त्यामागे हीच कारणं आहेत.

तुम्हाला मुलंबाळं जन्माला घालून जर त्यांचं करणं झेपत नसेल तर एकतर नोकरीचा राजीनामा देऊन घरी बसा किंवा हृदयावर दगड ठेऊन मुलांना डे-केअर सेंटरवर ठेवा की....तुमचं करिअर हेच जर तुम्हाला अतिशय महत्वाचे असेल तर मुलंच जन्माला घालु नका हे बेस्ट नाही का?...आपण जन्माला घातलेल्या मुलांची काळजी आपल्याच म्हाताऱ्या आईबापांवर सोपवून स्वत: करिअरच्या नावाखाली नामानिराळे राहिलेल्या सुनामुलांची मला अक्षरश: कमाल वाटते. हे नवे "बंदिस्त सोनेरी वृध्दाश्रम" आता साठीसत्तरीच्या वयातील वृध्दांसाठी यातनाकेंद्रे बनली आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. आणि यातील दुर्दैव म्हणजे या वृध्दांचा होत असलेला कोंडमारा हा असह्य असला तरी त्याची घनता किंवा तीव्रता ही शब्दात व्यक्त करता येत नाही हा सर्वात मोठा त्रास आहे....!!!

-सचिन मधुकर परांजपे (पालघर)

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...