शनिवार, १६ ऑगस्ट, २०२५

2200. नाते

 आज पूनम आपल्या वडिलांकडे आली आणि म्हणाली,
“पप्पा, मी माझ्या आवडत्या मुलाशी लग्न केलंय.”
वडील संतापाने लाल झाले पण वडिलांनी फक्त एवढंच सांगितलं,
“माझ्या घरातून निघून जा.”
पूनम म्हणाली, “पापा त्यांना काही काम नाही, आम्हाला सध्या राहू द्या, त्यांना नौकरी मिळाली की मग आम्ही     जाऊ .”
पण वडिलांनी एक न ऐकता तिला घराबाहेर काढून टाकलं.
काही वर्षं गेली.
पूनमचे वडील वारले. ज्याच्याशी पूनमच लग्न झालं होत तो ही सोडून गेला. तीच्या वडिलांच्या संपत्ती वर मज्जा मारता येईल म्हणूनच त्यानें लग्न केले होते. पण वडीलांनी हाकलून लावल्यामुळे त्याचा प्लॅन फसून गेला आणि  त्यानेही तिला धोका दिला आणि सोडून पळून गेला. 
पूनमला एक मुलगा आणि एक मुलगी होती. तिने स्वतःचं हॉटेल सुरू केलं आणि त्यावरच तिचं घर चालू लागलं. जेव्हा वडिलांच्या निधनाची बातमी आली, तेव्हा पूनमच्या मनात पहिला विचार आला.
“बरं झालं गेले . त्यांनी मला घराबाहेर काढलं, त्यांनीच मला दारोदार भटकवलं.”
तिने ठरवलं की ती त्यांच्या अंतिम दर्शनाला ही जाणार नाही.
पण तिचे काका म्हणाले,
“पूनम, चल. जो जाणार आहे तो गेला. आता त्याच्याशी वैर कशाचं?”
पूनमने त्यांचं म्हणणे ऐकलं आणि वडिलांच्या अंत्ययात्रेला जाण्याचा निर्णय घेतला.
ती पोहोचली तेव्हा घरात शेवटच्या विधीची तयारी सुरू होती. तिच्या मनात वडिलांच्या मृत्यूचं काही दुःख नव्हतं. ती फक्त काकाच्या सांगण्यावर आली होती. तेराव्या दिवशी काकांनी  तिला वडिलांनी लिहिलेलं एक पत्र दिलं. रात्री तिने ते उघडून वाचायला सुरुवात केली. पत्रात लिहिलं होतं,
माझ्या गोजिरवाण्या बाहुलीला,
मला माहीत आहे, तू माझ्यावर रागावली आहेस. पण तुझ्या पप्पाला माफ कर.
मला माहीत आहे, मी तुला घराबाहेर काढलं, आणि तू दारोदार भटकलीस.
पण मीही खूप दुःखी होतो… तुला कसं सांगू?
आठवतंय, तू फक्त पाच वर्षांची होतीस तेव्हा तुझी आई आपल्याला सोडून गेली.
किती रडलीस, घाबरलीस... माझ्याशिवाय झोपच लागत नव्हती तुला.
रात्री मी तुझ्यासोबत रडायचो, पण तुला जागं होऊ नये म्हणून अश्रू पुसून बसायचो.
शाळेत जायला तुला भीती वाटायची. 
मी तुझ्या शाळेच्या खिडकीबाहेर तासन्‌तास उभा असायचो आणि सुट्टी झाल्यावर तुला मिठी मारायचो.
तुला न आवडणारं अर्धकच्चं अन्न मी परत टाकून नवं बनवायचो, फक्त तू उपाशी राहू नये म्हणून.
तुला ताप आला की दिवसभर तुझ्या शेजारी बसून असायचो, आतून रडायचो, पण तुला हसवायचो.
दहावीच्या परीक्षांसाठी तू रात्रभर अभ्यास करायचीस, तर मीही रात्रभर तुला चहा करून द्यायचो.
कॉलेजात तुझी छेड काढणाऱ्या मुलांशी मी भांडलो. वय झालं होतं, अंगात ताकद नव्हती,
पण प्रत्येक मुलीच्या डोळ्यात वडील हे हिरो असतात, म्हणून मी वेदना सहन केल्या.
तुझे पहिले जीन्सचे कपडे, तो लहान स्कर्ट, ती गाडी.
सगळा समाज विरोधात होता, पण मी तुझ्या आनंदात अडथळा आणला नाही.
उशीरा घरी येणं, कधी पिणं, डिस्को, मुलांबरोबर फिरणं.
हे सगळं मी कधी लक्षातच घेतलं नाही, कारण त्या वयात असं होतंच.
पण एक दिवस तू एका मुलाशी लग्न केलंस,
ज्याच्याबद्दल तुला काहीच माहिती नव्हती.
मी त्याची चौकशी केली… किती मुलींना त्याने फसवलं होतं !
पण तू प्रेमात आंधळी झाली होतीस आणि मला विचारायनही तुला गरजेचं वाटलं नाही 
माझी स्वप्नं होती, तुला पालखीत बसवायचं, चंद्रासारखं सजवायचं,
लग्नात इतका थाट करायचा की लोक म्हणतील — “शर्माजींची मुलगी बघा, किती लाडाने वाढवली आहे!”
पण तू माझी सगळी स्वप्नं चुरगळलीस.
बाहुली, कपाटात तुझ्या आईचे दागिने आहेत आणि तुझ्या लग्नासाठी घेतलेले दागिनेही.
तीन-चार घरे आणि काही जमिनी तुझ्या आणि तुझ्या मुलांच्या नावावर आहेत.
बँकेत थोडे पैसे ठेवले आहेत, ते काढून घे.
शेवटी एवढंच सांगीन — मी तुझा शत्रू नव्हतो, मी तुझा बाप होतो.
तुझी आई गेल्यावर दुसरं लग्न केलं नाही, लोकांचे टोमणे सहन केले,
अनेक संबंध नाकारले, फक्त तुझ्या मनाला दुसऱ्या आईचा स्पर्श लागू नये म्हणून.
तू लग्नाच्या पोशाखात घरात आलीस तो दिवस —
मी पहिल्यांदाच पूर्ण मोडलो.
तुझ्या आईच्या मृत्यूनंतरही मी एवढा रडलो नव्हतो, जितका त्या दिवशी रडलो.
त्यानंतर रोज रडलो… समाज काय म्हणेल म्हणून नव्हे,
तर माझ्या लाडक्या बाहुलीने आयुष्यातला एवढा मोठा निर्णय घेताना
एकदाही मला विचारलं नाही म्हणून.
आता तू पण आई आहेस, तुला कळेल मुलाच्या आनंद-दुःखाचं मोल…
आणि मन तोडलं तर किती वेदना होतात.
देव करो, तुला ही वेदना कधी जाणवू नये.
तुला मोठं दुःख देणारा वडील म्हणून मला माफ कर, बाहुली.
इथे पत्र थांबवतो… शक्य असेल तर माफ कर.
---
पूनमने पत्रासोबत ठेवलेलं आपलं लहानपणीचं चित्र पाहिलं —
त्यावर तिने लिहिलं होतं, “I love you my father, my hero, I will obey your everything.”
पूनम रडत होती.
तेव्हा काका आले आणि म्हणाले,
“पूनम, तुला रेस्टॉरंट सुरू करायला, घर घ्यायला जी रक्कम दिली, ती तुझ्या वडिलांनीच दिली होती.
मुलं कितीही वाईट असली तरी आई-वडील वाईट नसतात.
मुलांनी आई-वडिलांना सोडलं तरी, ते मृत्यूनंतरही मुलांच्या भल्यासाठीच प्रार्थना करतात.”
पूनमच्या वडिलांना शांती मिळाली की नाही माहीत नाही पण ते पत्र वाचल्यानंतर पूनमला आयुष्यभर शांती मिळणार नाही.
---
फक्त एवढंच सांगायचं आहे, मित्रांनो 
लग्न प्रेमाचं असणं चुकीचं नाही,
पण त्यात आई-वडिलांचा होकार सामील करा.
पाणी दगडातूनही निघतं, पण ते पालक असतात.
मुलांच्या आनंदासाठी ते किती दिवस मोडून जगतील?
प्रत्येक बापाची इच्छा असते,
आपल्या मुलीला स्वतःच्या हाताने विदा करण्याची.
शक्य असेल तर ते स्वप्न अपूर्ण ठेवू नका. 🌿🌿
(लेखक अनामिक)

2199. शेवटची भेट

   भेट होणं म्हणजे खरं तर आनंदाचा क्षण असतो.त्या व्यक्तीचा सहवास हा हवाहवासा वाटणारा असतो. पण जेव्हा काही भेटी या शेवटच्या असतात,तेव्हा मनाला किती यातना होतात ते त्या व्यक्तीलाच माहित.
 व.पु. म्हणतात... सहवासाचा आनंद पैशात मोजता येत नाही. शेवटची भेट ही मात्र मनाला चटका लावणारी असते हे नक्की. अंथरुणाला खिळलेले वडील जेव्हा मुलीकडे बघत असतात, तेव्हा त्यांच्याकडे ती मुलगी मागे वळून नाही बघू शकत.
कारण इतक्या वर्षांचा सहवास, एकत्र घालवलेले क्षण डोळ्यासमोर आले की मनाचा तोल ढासळतो. शेवटी इथे देखील संबंध येतो तो आठवणींचा. 
व.पु. म्हणतात तसं.... काही काही औषधं आणि आठवणींना एक्सपायरी डेट नसते.
आज एक माझ्या घरातलंच उदाहरण तुमच्याशी शेअर करते. म्हणजे बघा, भेटी या शेवटच्या कशा असतात.
माझ्या आजोबांची तब्येत बरीचं खालावली होती. आम्ही सगळे त्यांना सकाळी नऊ वाजता भेटून गेलो, आपल्याचं जवळच्या माणसाला जेव्हा शेवटच्या क्षणी मरणयातना सहन कराव्या लागतात तेव्हा ते दुःख बघून आपला देखील बांध फुटतोच हो, तेच घडले. 
माझ्या आईच्या हातून कोल्ड ड्रिंक घेऊन तिला निरोप दिला व का कुणास ठाऊक त्यांना ही चाहूल लागली असावी की ही भेट शेवटची आहे आणि जायलाचं हवे का आत्ता,असं म्हणत होते. आम्हाला देखील ही कल्पना नव्हती की पुढे काय होणार ते.  आम्ही निघालो आणि अर्ध्या वाटेवर गेलो आणि आजीने फोन करून सांगितलं की आजोबा गेले. ही शेवटची भेट ठरली.अश्रूंचा बांध फुटला,पण व्यक्ती परत येणार नव्हतीच. 
तेव्हा वाटतं, आठवणींना वार्धक्याचा शाप नसतो. ध्यानीमनी नसताना होणारी भेट आणि तीही शेवटची हे पचवणं खरंच कठीण असतं हो.
मला या शेवटच्या भेटीवर जे गाणं आहे ते आठवतं. व.पु. म्हणतात... वियोगाची दहशत एका क्षणात रंगपंचमीची धुळवड करते. 'वो कौन थी' हा चित्रपट सर्वांनीचं पाहिला असेल.अभिनेत्री साधना आणि मनोज कुमार यांच्यावर 'लग जा गले' हे जे गाणं चित्रित झालं आहे,त्यातली एक एक ओळ ऐकताना मन आपल्या प्रिय व्यक्तीकडे धाव घेते. 
आपण जेव्हा प्रेमात पडतो ते विरहाची कल्पना करुन निश्चितच नाही.पण अशी कठीण वेळ जेव्हा आयुष्यात येते,तेव्हा निर्णय घेताना द्विधा मनस्थिती होते.
तुम्हाला सांगते. एखाद्या मुलाला काही कारणास्तव आपल्या आवडत्या व्यक्ती पासून दूर जायची वेळ आली आणि त्या मुलीला त्याने जर विचारलं की मला शेवटची भेटशील का? मुलगी जरी भेटायला गेली,तरी त्याला समोर बघून सर्रकन मागच्या आठवणी डोळ्या समोर फेर धरून नाचू लागतात. 
डोळे हे पाण्याच्या रुपाने त्याच्या वरचं प्रेम दाखवत असतात पण तो थांबणार नाही,दूर जाणारचं आहे हे पचवणं कठीण जातं. त्याने मारलेली मिठी ही ती कधीच विसरू शकत नाही. मग या चित्रपटातील गाण्यांच्या ओळी तिथे साजेशा आहेत-
लग जा गले के फिर ये हंसी रात हो ना हो,
शायद फिर इस जनम मे, मुलाकात हो ना हो..‌
व.पु. जे म्हणतात ते नेहमी पटतं, 'अश्रू हे कितीही प्रामाणिक असले तरी त्यांच्यात भूतकाळ परत आणण्याची ताकद नसते.'
तुमचे एखाद्या व्यक्ती सोबत निर्माण झालेले अनुबंध हे ती भेट शेवटची आहे या जाणीवेने मन कुरतडतात. आपल्याला जे आयुष्य आहे त्यात अशा घटना घडल्या तर मन सैरभैर होते. कसं आहे. सवय ही अशीचं लागत नाही. त्यासाठी सहवास निर्माण व्हावा लागतो.
प्रत्येक भेट ही वेगळी असते. काही भेटी या अनेक सुंदर क्षण देतात, तर शेवटची भेट ही मात्र मनात कालवाकालव करते.
माणसाला नेहमी आपलं असं कोणी तरी लागतचं. मघाशी लिहिले त्याप्रमाणे, आजारी व्यक्ती ही जास्त दिवस अंथरुणाला खिळून राहू नये असं आपल्याला वाटतंच.पण, तुम्हाला सांगू, आपला त्यांच्यात जो जीव अडकलेला असतो ना,तो सतत मन बेचैन करतो. इथे परत व.पु. म्हणतात ते खरं आहे, 'मन म्हणजे मरे पर्यंत नष्ट होत नाही ते मन.' 
लांब राहणारी व्यक्ती ही जेव्हा निघण्याच्या तयारीत असते,त्या वेळी पाऊल उचलत नाही आणि घरी गेल्यावर पण साधा फोन जरी वाजला आणि काही बातमी समजली तर वाटतं ही भेट शेवटची होती.म्हणून म्हटलं.
तुमच्या भावना या शेवटच्या भेटीत ओठांपर्यंत येऊन देखील बाहेर येत नाही.कारण त्या मनाच्या पल्याड असतात. त्यामुळे, येणारा प्रत्येक क्षण हा आनंदाने जगला पाहिजे.होणारी भेट ही देखील तृप्तता करणारी व्हावी हीच इच्छा असते.
शेवटी काय...!भावना व्यक्त करायला शेवटी शब्द कमी पडतात हेच खरे.,  इति व.पु.

मानसी देशपांडे,विरार
--------------------------------------------------------------------------------------


2198. मेडिकलच्या विद्यार्थ्यांनो, स्पेशालिस्ट पेक्षा Family Doctor व्हा !

 एक पोस्ट वाचनात आली त्यात म्हटलं होत की, मेडिकलच्या  विद्यार्थ्यांनो, स्पेशालिस्ट पेक्षा Family Doctor व्हा ! 
आणि मला ते पटलं एकदम कारण त्या वाक्यानेच मी भूतकाळात गेलो आणि मी अनुभवलल्येला माझ्या फॅमिली डॉक्टरच्या आठवणी जाग्या झाल्या !
आणि खरं सांगतो मंडळी...
स्पेशालिस्ट डॉक्टर महत्वाचे आहेतच पण त्या आधी तितक्याच महत्वाचे तुमचे फॅमिली डॉक्टर आहेत. आणि म्हणून काळाच्या ओघात नामशेष होणारी हि "फॅमिली डॉक्टर" संकल्पना पुन्हा रुजली पाहिजे... त्यासाठी हा पोस्ट प्रपंच !
*
मी तसेही सहसा आजारी फार पडत नाहीत. मन चांगलं ठेवावं, स्वच्छ वातावरणात, जंगल खोऱ्यात जमेल तेव्हा भटकून ऑक्सिजन घेऊन यावा... प्राणायाम अर्धा तास आणि पायी चालणे अर्धा तास, वेळच्या वेळी जेवण आणि झोप इतकं केलं तर आजारी पडण्याची शक्यता कमी होते. 
चाळीस वर्षांपासून माझी तब्येत स्वतःच्या तब्येतीपेक्षा जास्त जपणारे माझे फॅमिली डॉक्टर म्हणजे डॉ. भगली.... यांचा पुण्यातील सिंहगड रोडवरील हिंगण्यात पण एक दवाखाना होता. दुमजली वाड्याच्या लाकडी जिन्याने चढून जायचे. फी किती ? तर अवघी तीन रुपये.... औषध ? ते स्वतःकडे असलेलेच द्यायचे. त्यामुळे त्याचेही वेगळे पैसे नाहीत. (आता चाळीस वर्षानंतर सुद्धा मला वाटते फक्त पन्नास रुपये फी आहे.... काय सांगू अजून?)
आणि चार दिवसाच्या डोस मध्ये पेशंट टकाटक बरा व्हायचा. 
*
मी त्यांचा फॅन झालेला त्या काळात....आता सायबर मधील कामामुळे सायबर मुळे नव्याने ओळख झाली.
तर असे हे डॉक्टर..... 
माझं अनियंत्रित वेळापत्रक कारण सतत स्ट्रगल आणि स्वप्नाचा पाठलाग त्यामुळे कधीमधी बाहेरच काहीतरी खाऊन भूक शमवयाची..... आणि काहीवेळा त्याचा साईडइफेक्ट होऊन आजारपण फिक्स ! गपगुमान त्यांच्याकडे जायचो.... 
ते म्हणायचे... "काय मग देशपांडे... काल काय ? सारस बागेची भेळ खाऊन वर पाणी पिलेलं दिसतंय?"
आणि जणू ज्योतिषी असल्यासारखे मी त्यांच्याकडे पाहायचो.... 
नंतर नंतर मैत्री वाढली.
कधीतरी त्यांच्याकडे गेल्यावर मी सांगायचो.... डॉक्टर, अंगात अजिबात एनर्जी नाहीय आणि परवा दिवशी लेक्चर आहे.... तेही अमरावतीला... दहा तास प्रवास अन दोन तास लेक्चर ! तर मला चार दिवसाचा डोस नको.... एक दिवसात बरे करा "
ते बिचारे हात जोडायचे.... आणि हसून छान गोळ्या द्यायचे आणि खरेच एक दिवस बरे करायचे !
यावर मी त्यांना बोललो पण की "तुम्ही जादूगार आहात"
त्यावर ते म्हणाले, तसे नाहीय.... मी फॅमिली डॉक्टर असल्याने सर्व पेशन्टची पूर्ण हिस्ट्री, त्याचे वागणे, खाणे, राहणे माहित असते त्यामुळे औषध देताना वेगळ्या काही खास टेस्ट करायची गरज पडत नाही..... तशी तुमची हिस्ट्री माझ्याकडे आहे त्यामुळे हे घडत"
*
काहीवेळा अति काहीतरी आजारपण ओढवलं तर यांनीच स्वतःहून मला व घरच्यांना सांगितलं की, आता डोस काम नाही करणार, त्यांना अमुक तमुक हॉस्पिटल मध्ये दाखल करा. 
हा त्यांचा सल्ला फार मोलाचा !!
*
गंमत म्हणजे नंतर भगलीसारखेच इतर काही डॉक्टर्स जणू माझे "फॅमिली डॉक्टर झाले" इतके की यापैकी एकानेही आजवर एक रुपया पण घेतला नाही. अगदी दोन तीन लाखाची दोन ऑपरेशन्स झाली तरी डॉ. गोवर्धन इंगळे (पुणे) यांनी एक रुपयाही घेतला नाही. बिल विचारलं तर म्हणतात, "मला कुठं मर्सिडीज घ्यायची आहे तुमच्या पैशातून ? तुम्ही ठणठणीत राहा बास "
असेच माझ्यासोबत असणारे साठे कॉलेजचे डॉ. अजय असेरकर,विद्यार्थी सहायक समितीचे माझे होस्टेलमेट डॉ. अम्बिकर, कल्याणचे  डॉ. अवधूत शेट्ये, नांदेडचा माझा मानलेला लहान भाऊ डॉ. मंगेश नरवाडकर व राजेश नरवाडकर.... वारकऱ्यांची मोफत आरोग्य सेवा करतानाच माझ्यासारख्याला दवाखान्यात पण न बोलावता, फोनवर औषधे लिहून देणारे डॉ. सांडभोर..... कोरोना काळात मी व माझे सहकारी रस्त्यावर उतरून मदत करत होतो त्यावेळी मला कोरोना होऊ नये यासाठी धडपडणारा माझा होस्टेलमेट वैद्य हरीश पाटणकर.... किती किती नाव घेऊ ?  हे सगळे फॅमिली डॉक्टरच्या भूमिकेतून जणू देवदूत आले. 
*
डॉ,. डीडी क्लास : स्पेशालिस्ट डॉक्टर नक्कीच महत्वाचे आहेत. पण त्यापेक्षाही फॅमिली डॉक्टर हा जास्त महत्वाचा असतो. जो तुमची केवळ हाताची नस नव्हे तर जगण्याची नस ओळखून असतो. "रात्रीची जागरण बंद करा डीडी, नाहीतर ऍसिडिटीने अटॅक येईल !" असं जणू भविष्य भगली डॉक्टरांनी मला एक वर्ष आधीच सांगितलं होत... पण माझ्याकडूनच गलथानपणा झाला अन खरेच अटॅक आला. चक्क दोन दिवस आयसीयू मध्ये !!  नशीब बायपास न होता बाहेर आलो.... तेही प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ यांच्यामुळे ! तेही नंतर माझे स्नेही झाले. 
तर वादळाची सूचना देणारे जसे मौसम विज्ञान केंद्र असते तसे मला तरी फॅमिली डॉक्टर वाटतात. जे आगाऊ धोक्याची सूचना आधीच देतात. जर ते आपण ऐकलं. फॉलो केलं तर मोठ्या ऑपरेशनची आणि भयानक खर्चाची वेळच येत नाही, हे नक्की ! विचार करा आणि ज्यांचा फॅमिली डॉक्टर आहे त्याला जपा आणि मेडिकल कॉलेजला शिकणाऱ्या मुलांनो.. स्पेशलिस्ट होण्यापेक्षा काहीजण तरी "फॅमिली डॉक्टर" सेक्टर मध्ये या ! भले पैसे थोडे कमी मिळतील पण हजारोच्या दुवा मिळतील आणि याच दुवा तुम्हाला आयुष्य समृद्ध करतील. माझ्याकडे कुठे काय जास्त संपत्ती आहे ? मॅन बॅलन्स हाच माझा बँक बॅलन्स ! जो आजवर मला प्रत्येक संकटात पाठीशी राहिलाय !
तसे जमले तर विचार करून पहा ! 

Ⓒ डॉ. धनंजय देशपांडे (dd)
(सायबर सिक्युरिटी तज्ञ, चित्रकार, लेखक, समुपदेशक, निवेदक)

2197. वयाने दुप्पट असलेल्या पुरुषासोबत लग्न

 डोक्यावर रणरणतं ऊन त्यातही लक्ष्मीच पाऊल झपाझप चालत होते.. काबाडकष्ट करत असे लक्ष्मी उन्हातान्हाची पर्वा न करता शेतावर जाई. मर मर काम करी पण कधीही तिच्याकडे पाहून ती दमलेली वाटत नसायची. वयात आली असताना आई मेली पण तरीही निर्लज्जपणे बापाने दुसरी बायको केली आणि त्या दिवशी पासून लक्ष्मीचे घरात हाल होऊ लागले पण जिथं आपलाच बाप नालायक निघाला तिथं दुसऱ्याला बोलून काय उपयोग म्हणून लक्ष्मी तिच्या सावत्र आईच सगळं सहन करीत होती…!
आजूबाजूची लोक, शेजारी पाजारी तिच्यावर दया दाखवत असत. कोणी तिला जुनं लुगडं कपडे घालायला देत असत कारण त्यांना लक्ष्मीच हाल बघवत नसतं पण लक्ष्मीची आई त्यांच्याशी भांडण करायची म्हणायची पुन्हा तिला काय दिलं तर मात्र लक्षात ठेवा. त्यामुळे तिच्या आईच्या भीतीने तिला कोणी मदत करण्याचे ही टाळत असे पण मागच्या घरातील पूजा तिला नेहमीच काही ना काही द्यायची शिकलेली आणि शहरात राहिलेली पूजा तिला लक्ष्मीच हाल बघवत नसे आणि ती लक्ष्मी च्या आईला ला ही घाबरत नसे त्यामुळे ती बिनधास्त तिची मदत करे.
लक्ष्मी ही तिला काही गरज पडली तर पूजाला विचारीत असे. एक दिवस लक्ष्मीचं लग्न ठरलेलं पूजाला कळलं पण अस अचानक लग्न कसं ठरलं अजूनही लक्ष्मी लग्न करण्याइतपत मोठी झाली नव्हती इतकी घाई करायची नको होती असे पूजाला वाटायचे पण ती घरच्यांपुढे जाऊ शकत नव्हती. शेवटी दुप्पट वयाच्या आणि पहिली बायको सोडलेला अशा माणसाशी लक्ष्मीचं लग्न लाऊन दिलं.. गुणांनी आणि रूपांनी ही रूपवान अशा लक्ष्मीचं लग्न अशा माणसासोबत झालं याचा पूजाला खूप मनस्ताप झाला पण मनाची समजूत घातली जाऊदे इथ नायतरी तीच हाल कुत्र खात नव्हता.
आता तिथं तरी चार घास सुखाचे खाईल. पण ही पूजा ची समजूत पार चुकीची ठरली तिथं तर इथल्यापेक्षा जास्त हाल होत असत तिचे पण सगळं सहन करायची बिचारी दोन वर्षातच तिच्या सासरच्यांनी तिला हाकलून दिले. पहीलीला ही मुलं झाली नाही म्हणून सोडलं आणि आता हिला ही नाही.. झालं लक्ष्मीच्या नशिबाने तिला आता एका आणखी मोठ्या संकटात आणून सोडले होते.. बिचारी सासरी टोमणे ऐकून दिवस काढत होती आणि आता हिथ आल्यावर सावत्र आई ही तिला घालून पाडून बोलू लागली..!
आता मात्र लक्ष्मी पूर्णपणे हरली होती जगणे नकोशे झाले होते सावत्र आईचा अत्याचार पहिल्यापेक्षा दुपटीने वाढला होता.. गेलेली पिडा परत घरात आली म्हणून लक्ष्मीचा बाप ही तिला लहान सहान कारणाने मारझोड करीत असत..पूजाला तिचे हे हाल बघवत नसतं ती तिची समजूत घाली..असेच एक दिवस पूजाचा दूरचा नातेवाईक तिचा भाऊ लागत होता त्याची बायको ही मुलाला जन्म देऊन मरण पावली होती.. मुलाचे हाल नको म्हणून त्याने दुसरं लग्नं नाही केलं पण तरीही पूजा ने त्याच्याकडे लक्ष्मी साठी शब्द टाकला…!
म्हणाली मी तुला शब्द देते लक्ष्मी तुझ्या मुलाला आपलं मुलं म्हणून वाढवेल शिवाय तिला वांझोटी म्हणून तरी कोणाचे शब्द ऐकायला नको खूप त्रास सहन केलंय तिने पण आता तू तिच्यासाठी काही करू शकतोस.. प्लीज नाही म्हणून नकोस एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचेल आणि तुझ्या बाळाला ही आई मिळेल..खूप विचारा नंतर त्याने होकार दिला. पुजाने लक्ष्मीच्या घरच्यांना कसे बसे समजावले पण त्याची गरज नव्हती कारण त्यांना ही ती या घरात नको होती.
एका मंदिरात लग्न पार पडलं.. आणि त्या दिवसापासून लक्ष्मीच नशीब पालटलं समजूतदार नवरा आणि कुशीत पोर याशिवाय काय हवं होत तिला. आता लक्ष्मी येते माहेरपणाला पण तिच्या घरी नाही तर पूजाच्या घरी..सासरी जाताना प्रत्येक वेळी पूजाचे उपकार मानते. ह्या जगात जेवढी वाईट माणसे आहेत तेवढी चांगली सुद्धा आहेत फक्त ती आपल्याला भेटण्यासाठी वेळ यावी लागते.

अज्ञात लेखकांस सादर समर्पित........

2196. इतरांच्या घरांमध्ये भांडणं लावू नका

 एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीला विचारते:
"बाळ होण्याच्या आनंदात तुझ्या नवऱ्याने तुला काय भेटवस्तू दिली?"
मैत्रीण म्हणाली, "काहीच नाही!"
तेव्हा ती विचारते, "हे बरोबर आहे का? म्हणजे त्याच्यालेखी तुझी काही किंमतच नाही का?"
हा शब्दांचा विषारी बॉम्ब टाकून ती मैत्रीण तिला विचारात टाकून निघून जाते...
थोड्या वेळाने संध्याकाळी तिचा नवरा घरी येतो आणि पाहतो की बायकोचा चेहरा उतरलेला आहे.
मग दोघांमध्ये वाद होतो... एकमेकांना दोष दिले जातात...
शेवटी मारहाण होते आणि घटस्फोट होतो.
तुम्हाला माहितीये सगळ्याची सुरुवात कुठून झाली?
त्या निष्कारण प्रश्नातून, जो केवळ विचारपूस करण्यासाठी विचारला गेला होता...
---
रवि आपल्या जिवलग मित्र पवनला विचारतो:
"कुठे काम करतोस?"
पवन - "अमुक एका दुकानात."
रवि - "किती पगार मिळतो?"
पवन - "१८ हजार."
रवि - "फक्त १८ हजार? इतक्यात कशी चालते तुमची रोजची जिंदगी?"
पवन - (खाली मान घालून) "काय सांगू रे... बस तसंच."
या छोट्याशा संवादानंतर, पवनच्या मनात आपल्या नोकरीविषयी असमाधान निर्माण होतं.
त्याने पगारवाढीची मागणी केली, मालकाने नकार दिला.
पवन नोकरी सोडतो आणि बेरोजगार होतो.
पूर्वी त्याच्याकडे काम होतं... आता काहीच नाही.
---
एका गृहस्थाने एका वृद्ध पित्याला विचारलं,
"तुमचा मुलगा तुमच्याकडे फारसा येत नाही का? म्हणजे त्याला आता तुमच्याबद्दल प्रेम उरलेलं नाही वाटतं?"
वडील म्हणाले, "तो खूप व्यस्त असतो. त्याला कामं, बायको, मुलं... वेळ मिळत नाही."
ते गृहस्थ म्हणतात, "हे काय उत्तर झालं? तुम्ही त्याला वाढवलंत, सगळं दिलंत, आता तो म्हणतो त्याला वेळ नाही?"
त्या संभाषणानंतर, बापाच्या मनात मुलाबद्दल शंका निर्माण झाली.
जेव्हा मुलगा भेटायला यायचा, तेव्हा त्याला बघूनही त्याच्या मनात असंच चालायचं..
"माझ्यासाठी वेळच नाही..."
---
एक गोष्ट लक्षात ठेवा:
आपण सहज म्हणून बोललेले शब्द एखाद्याच्या मनात खोल परिणाम करू शकतात.
कधी कधी आपले प्रश्न निष्कपटीचे वाटतात, पण दुसऱ्याच्या आयुष्यात विष पेरू शकतात.
उदाहरणार्थ:
"तुम्ही हे का नाही घेतलंत?"
"तुमच्याकडे हे का नाही?"
"तुम्ही याच्यासोबत कसं राहू शकता?"
"तो तुमच्या योग्य आहे का?"
हे असले बिनधास्त प्रश्न, जे कधी कधी आपण नक्कीच चुकीच्या हेतूने विचारत नाही,
पण हे विसरतो की याचा परिणाम समोरच्याच्या आयुष्यावर किती खोल जाऊ शकतो.
आज समाजात जे काही तणावाचे वातावरण आहे,
त्याच्या मुळाशी गेलं, तर अनेकदा असं आढळतं की कोणी तरी असतं ज्याच्या चुकीच्या बोलण्यामुळे हे निर्माण झालं.
जाणीवपूर्वक किंवा अज्ञानात, आपल्या शब्दांनी आपण कोणाच्या तरी आयुष्यात वादळ निर्माण करू शकतो.
म्हणून एकच विनंती 🙏
 लोकांच्या घरात अंधळ्यासारखं शिरा आणि मुक्यासारखं बाहेर या...!
आपल्या शब्दांनी कुणाच्या घरी फूट न पडो, हीच खऱ्या माणसाची ओळख आहे.✍️

2195. एक किलो लोणी

         एक शेतकरी आपल्या गावामधून शहराच्या बाजारात लोणी विकण्यासाठी जायचा. एका दुकानदाराला त्याचे लोणी खूप आवडले. दुकानदाराने शेतकऱ्याला दररोज एक किलो लोणी घेऊन ये असे सांगितले. शेतकरीसुद्धा हे ऐकून खुश झाला. शेतकऱ्याने त्याच दुकानातून एक किलो साखर आणि इतर वस्तूंची खरेदी केली. सामान घेऊन तो घरी आला. दुसऱ्या दिवसापासून शेतकरी दररोज दुकानावर एक किलो लोणी देऊ लागला. दुकानदारही दररोज शेतकऱ्याला लोण्याचे पैसे देत होता. काही दिवस असेच चालू राहिले. 
       एका दिवशी दुकानदाराने शेतकऱ्याने दिलेल्या लोण्याचे वजन केले, तर ते 900 ग्रॅमच भरले. दुकानदाराला खूप राग आला. पैसे एक किलोचे घेतो. आणि लोणी 900 ग्रॅमच देतो, हे दुकानदाराला अजिबात आवडले नाही. शेतकरी फसवणूक करत आहे,असा विचार त्याच्या मनात आला.
दुसऱ्या दिवशी शेतकरी लोणी घेऊन दुकानात आल्यानंतर दुकानदाराने त्याच्या समोरच लोण्याचे वजन केले तर ते 900 ग्रॅमच भरले. आता मात्र दुकानदाराच्या क्रोधाचा पारा अधिकच वाढला. तो शेतकऱ्यावर ओरडून म्हणाला तू मला धोका देत आहेत.
शेतकरी म्हणाला अहो भाऊ माझ्याकडे वजन करण्यासाठी एक किलोचे मापच नाही. तुमच्याकडून जी एक किलो साखर खरेदी केली होती, त्याचे माप बनवूनच मी लोणी मोजून आणतो. 
शेतकऱ्याचे हे उत्तर ऐकून दुकानदाराची मान शरमेने खाली गेली, कारण तो स्वतःच चुकीचे काम करत होता...!!
त्याच्या लक्षात आले की, आपण जसे कर्म करतो तसेच फळ आपल्याला मिळते. कथेची शिकवण या छोट्याच्या कथेची शिकवण अशी आहे की,आपण चुकीचे काम केल्यास आपल्याला त्याचे फळही तसेच मिळते. कारण शेवटी जैसी करनी, वैसी भरनी...!!
मी जगाला देईन, तसे जग मला देईल ही भावना प्रत्येकाच्या मनात सतत असावी.
सुगंध देणारी अगरबत्ती संपली की मागे फक्त राख उरते. त्या राखेला परत कधीच सुगंध येत नाही.
तसंच मनुष्य देहात जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत छान जगा. कारण जीवन खूप सुंदर आहे त्याला आणखी सुंदर बनवा 
भूक लागली म्हणून, भाकरीऐवजी 'पैसा' खाता येत नाही. आणि 'पैसा' जास्त आहे म्हणून भुकेपेक्षा जास्त "अन्न" खाता येत नाही.
म्हणजेच जीवनात 'पैशाला' ठराविक रेषेपर्यंतच स्थान आहे. पैशाच्या राशीत झोपणाऱ्या माणसांपेक्षा, आयुष्यभर "प्रामाणिक" राहून कमाविलेली सोन्यासारखी माणसं हिच "श्रीमंती" आहे.... 
अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.
नाती सुंदर व्हायला माणसांचे स्वभाव निर्मळ असावे लागतात
*हर कोई सुख की चाबी ढूंढ़ रहा हैं, पर सवाल यह है कि सुख को ताला किसने लगाया हैं ?

2194. तिनं काय केलं पाहिजे ?

 प्राची तयार होऊन घरातून निघणार एवढ्यात तिची सासू मालतीबाई म्हणाल्या,
"सुनबाई, कुठं चाललीस?"
प्राचीने खूप विनम्रतेनं उत्तर दिलं,
"सासूबाई, माझ्या बाबांची तब्येत खूप खराब आहे. आई फार घाबरली आहे. त्यांना भेटायला चाललेय."
असं म्हणत प्राची उत्तराची वाट न पाहता घरातून बाहेर पडली.
मालतीबाईंना तिचं वागणं आवडलं नाही, पण वडिलांच्या आजाराची बातमी ऐकून त्या शांत राहिल्या.
प्राची घाईघाईने माहेरी पोहोचली तर बाबांना खोकल्याने फारच त्रास होत होता.
प्राचीने आईला सांगितलं,
"मी आधीच सांगितलं होतं की बाबांना चांगल्या डॉक्टरला दाखवूया. खोकला वाढतोय, पण तुम्ही दोघं कुणाचंच ऐकत नाही. तुम्ही बाबांना सांभाळा, मी ऑटो घेऊन येते, आपण मोठ्या हॉस्पिटलला जाऊया."
प्राची बाबांना घेऊन हॉस्पिटलला गेली. डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं आणि थोडा आराम मिळाला.
डॉक्टर म्हणाले,
"आत्ता आम्ही त्यांना अ‍ॅडमिट करतो. उद्या सगळे तपास करू, मगच योग्य उपचार सुरू होईल."
प्राचीने बाबांना अ‍ॅडमिट करून घरी परतली तर नवरा अमित वाट पाहत होता.
अमित म्हणाला,
"कसे आहेत बाबा? तू त्यांना भेटायला गेली होतीस, पण किती वेळ लावला. तुला ठाऊक आहे ना, आईला स्वयंपाक जमत नाही, सगळे भुकेले आहेत. किमान बाबांचा तरी विचार केलास का? तिथेच बसून राहिलीस ."
हे ऐकून प्राचीच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली –
"बाबांची तब्येत खूप बिघडली होती. त्यांना अ‍ॅडमिट करून आलेय. तुम्ही बसा, मी दहा मिनिटांत सगळ्यांसाठी जेवण करते."
अमितचा राग थोडा शांत झाला.
तो म्हणाला –
"नको, मी बाहेरचं जेवण मागवलंय. फक्त आईसाठी दोन पोळ्या कर, त्यांना बाहेरचं चालत नाही. आणि तू आंघोळ करून घे, हॉस्पिटलहून आलीस."
प्राचीला अमितचं  काळजी करणे बरं वाटलं. ती पटकन आंघोळ करून आईसाठी जेवण बनवू लागली. पण तिचं मन बाबांकडेच होतं. ती फोन करायला उत्सुक होती.
सगळं लवकर आटपून ती टेरेसवर जाऊन आईला फोन करते –
"आई, आता बाबांची तब्येत कशी आहे?"
आई म्हणाली –
"बाळा, तुझ्या जाण्यानंतर बाबांची तब्येत आणखी बिघडली. खोकल्यासोबत रक्त येत होतं. डॉक्टरांनी लगेच सगळे तपास केले, सकाळी रिपोर्ट येईल. माझं मन फार घाबरतंय. तू आत्ता येऊ शकतेस का?"
प्राची म्हणाली –
"ठीक आहे आई, मी येते."
आई म्हणाली –
"अगं, एवढ्या रात्री कशी येशील? सकाळी ये. आणि ऐक, माझ्याकडे चेकबुक आहे. सकाळी दहा हजार रुपये भरायचे आहेत, तेव्हाच उपचार सुरू होतील. तू माझ्याकडून चेक घेऊन बँकेतून पैसे काढून हॉस्पिटलमध्ये भरून दे."
थोडा वेळ बोलून प्राची खाली आली. सगळे झोपले होते. ती स्वयंपाकघरात जाऊन काम आटपू लागली.
तिला बालपण आठवलं – बाबांनी नेहमी म्हटलं होतं,
"माझा मुलगा नाही म्हणून काय झालं? मुलगी आहे ना. हिला मी इतकी सक्षम बनवेन की हिच माझा मुलगा बनेल."
आज तिला फार असहाय्य वाटत होते.. काश! ती मुलगा असती, तर वडिलांची सेवा करू शकली असती.
सकाळी लवकर उठून प्राचीने नाश्ता केला, अमितचा डबा भरला आणि निघायला लागली. कपाटात पाहिलं तर अमितने परवा दिलेले घरखर्चाचे दहा हजार रुपये ठेवलेले होते. तिने विचार करून ते पर्समध्ये ठेवले आणि हॉस्पिटलमध्ये जमा केले.
बाबांना भेटली तर ते थोडे बरे दिसले. आई म्हणाली –
"बाळा, हा चेक घे, बँकेतून पैसे काढून जमा कर. तेव्हाच रिपोर्ट मिळतील."
प्राची म्हणाली –
"आई, पैसे मी जमा केलेत. घरी गेले की बँकेतून काढून ठेवेन."
आई घाबरून म्हणाली –
"काय गं? सासरच्या लोकांना कळलं तर तुला रागावतील."
प्राची म्हणाली –
"आई, काळजी करू नकोस. माझ्याकडे घरखर्चाचे पैसे होते. सोमवारी काढून ठेवेन."
पण बँकेत गेली तर गार्ड म्हणाला –
"आज दुसरा शनिवार आहे, उद्या रविवार. बँक सोमवारलाच उघडेल."
हे ऐकून प्राची घाबरली. घरी गेली तर मालतीबाई रागात होत्या –
"सुनबाई, हे काय? काल बाहेरचं खाल्लं, आज पुन्हा तू गायब. असेच बाहेरचं खाल्लं तर आम्ही सगळे रुग्ण होऊ.. आम्हा सगळ्यांना तुझ्या बाबांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करायचं आहे?"
प्राची रडत म्हणाली –
"नाही नाही सासूबाई , मी लगेच स्वयंपाक करते."
ती धावत जाऊन जेवण बनवते. पण तिचं मन बाबांकडे आणि अमितच्या रागाकडे होतं.
सायंकाळी अमित आला आणि शॉपिंगला जाण्याचा विषय काढला. प्राचीने त्याला सगळं सांगितलं. अमितला राग आला –
"म्हणूनच मला भावाशिवायच्या बहिणीशी लग्न करायचं नव्हतं. आज तेच झालं. माझे पैसे माहेरी खर्च करून आली."
प्राचीचा संयम सुटला..
"फक्त एका दिवसासाठी घेतले आहेत. आणि भाऊ नसलेल्या मुलीशी लग्न केलं ते माझ्या माहेरच्या मालमत्तेसाठीच केलं होतंस! आज बाबांची तब्येत खराब आहे, आणि मी त्यांना भेटायला गेले तर तुम्ही गुन्हा केल्यासारखं वागवता!"
ती म्हणाली..
"मी आत्ता आईकडे जाते, बाबांना एकटे सोडणार नाही. सोमवारी पैसे मिळतील."
अमित म्हणाला..
"मी पाहतो, तिथे तुला किती दिवस ठेवतात ते. परत रडत येशील."
प्राची म्हणाली..
"तशी वेळ येणार नाही. बाबांनी मला इतकी सक्षम केलंय की मी स्वतःचा आणि आईबाबांचा सांभाळ करू शकेन."
ती कपडे घेऊन माहेरी गेली. तिला असं वाटत होतं की आज ती मुलगीपणाच्या बंधनातून सुटून बाबांची ‘मुलगा’ झाली आहे.
हॉस्पिटलमध्ये आईला काही सांगितलं नाही – फक्त इतकंच की,
"अमितने मला इथे राहून बाबांची सेवा करायला सांगितलं आहे."
आई खूश झाली. दुसऱ्या दिवशी रिपोर्ट आला – फुफ्फुसात संसर्ग. लगेच उपचार सुरू झाले.
सोमवारी प्राचीने दहा हजार रुपये सासरी पाठवले. काही दिवसांत बाबा बरे झाले.
या दरम्यान प्राचीने नोकरीही मिळवली.
बाबा म्हणाले –
"बाळा, आम्ही स्वतःचा सांभाळ करू. तू अमितकडे परत जा."
प्राची म्हणाली –
"बाबा, मी तुमच्यामुळे नाही, तर माझ्या स्वाभिमानासाठी ते घर सोडलंय. आता मी मुलगा बनून तुमची सेवा करेन."
प्राचीचा हा निर्णय चुकीचा होता का ???

2193. श्रीकृष्ण आणि श्री कृष्ण जन्मोस्तव

       कृष्ण खरंतर योगेश्वर होता. शरीरातल्या सोळा सहस्त्र नाड्या त्याच्या ताब्यात होत्या. जणू काय त्याच्या बायकाच.. लगेच आपण त्याला सोळा सहस्त्र बायका चिकटवल्या. ज्ञान फक्त काहींच्याच पोतडीत राहिले. उरलेले त्याला सोळा हजार स्त्रियांशी संग करणारा ठरवून मोकळे झाले. मग त्याचे उदात्तीकरणही केले.
एखाद्याला ‘देव’ बनवण्याच्या प्रक्रियेत हे उदात्तीकरण फार आवश्यक असतं. त्याशिवाय माणसाचा देव होत नाही. ही प्रक्रिया शेवटी माणसाला दगड बनवून मंदिरात कोंडते..!! आणि मग त्याने काय करायचं, काय खायचं, कसं वागायचं, कधी झोपायचं, कधी उठायचं हे त्याचे भक्तगण ठरवतात. तो लाचार होतो. कारण त्याचा देव झालेला असतो. आपण जसे असतो तसे आपल्याला जग दिसते . 
दुसऱ्याच्या पत्नीबरोबर रासलीला खेळणारा कृष्ण आणि आणि स्वतःच्या पत्नीला संशयावरून  वनवासात पाठवणारा राम ही सोयीस्कर रूपे भारतीय पुरुषांनी मनात जपली .पण त्याच्या ज्या रुपाची आज समाजाला गरज आहे त्याचा आपण  खरंच विचार करतो का ?????
 या माणसाने आपल्याला ‘गीता’ दिली.. जगभरातले विद्वान आज गीतेला एक सर्वश्रेष्ठ तत्वज्ञान मानतात.. या माणसाने आपल्याला ‘कृष्णनीती’ दिली.. राजकारण कसे खेळावे, खेळवावे याचे धडे स्वत:च्या वागणुकीतून घालून दिले....कृष्णाचे व्यक्तिमत्व इतके बहुरंगी आणि बहुढंगी आहे की,त्याचे पैलू दाखवण्यासाठी हरिवंश,भागवत आणि महाभारत या ३ ग्रंथाची निर्मिती करावी लागली आणि त्यानंतरही कितीतरी ग्रंथ आणि पुस्तके....पाळणा ,दूध ,दही ,रासलीला या पलिकडचा कृष्ण  गिरीश जखोटिया यांनी त्यांच्या  "कृष्णनीती "  या पुस्तकात रंगवला आहे...
 त्याने जपलेली मूल्ये कालातीत आहे असा-
१.तत्वज्ञानी , राजकारणी , मुत्सद्दी...
२.त्यावेळी अस्तित्वात असलेल्या इंद्रपूजेलाही आव्हान देऊन निसर्गाची पूजा करणारा , त्याचे महत्व पटवून देणारा...रूढी आणि परंपरा न पाळणारा बंडखोर , 
३.गवळी असूनही , आपल्या जातीची खंत न बाळगता लोकांना एकत्र करून त्यावेळच्या जुलमी राज्यसत्तेला उलथवणारा क्रांतिकारक....
५.द्वारकेला व्यापारी बाजारपेठ बनवणारा वेल्थ क्रिएटर .....
६. स्थापत्य शास्रज्ञ( इंजिनिअर) आपल्या कलात्मक दृष्टीने द्वारका नगरी बनविणारा...
अशा अनेक रूपात यातील कृष्ण दिसतो........
गीतेची निर्मिती करणारा  विप्र, पांडवांना विजय मिळवून देणारा क्षत्रिय, गोकुळात असताना दही दुधाचे योग्य वितरण करणारा, द्वारकेला बाजारपेठ बनवणारा वैश्य आणि गुराख्याच्या कामालाही प्रतिष्ठा मिळवून देणारा आणि त्यातही कमीपणा न मानता सर्वच समाजाचे स्वकर्तृत्वावर नेतृत्व करणारा  शूद्र अशा  सर्व वर्णात कृष्ण दिसतो आणि भावतो ....
"महाभारताचा" परिपक्व कृष्ण आपल्यासमोर येतो तो एक नेता, योध्दा, तत्त्वज्ञानी,
राजकारणी आणि क्रांतिकारी म्हणून...
"कृष्णकिनारा" मधून तो भेटतो राधा , द्रौपदी आणि कुंतीचा सखा , मित्र ,पाठीराखा म्हणून ...
आणि जितकं मन , मेंदू , मस्तक जागे ठेवाल तितक्या रूपात तो मग भेटतच राहतो....
कृष्णाची ही रूपं समजून न घेता केवळ ‘बाबा वाक्यं प्रमाणं’ला शरण जाऊन ज्या प्रथा,  जशा आहेत तशा पाळणाऱ्या, जे समज जसे होते तसे निर्बुद्धपणे पुढे नेणाऱ्या सुशिक्षित (??)लोकांची चीड येते!!!! निदान या गोष्टींचे भांडवल करतांना त्याची बुद्धिमत्ता, त्याची समज, त्याचा धोरणीपणा.. कलियुगात कसं वागावं याचा त्याने घालून दिलेला वस्तुपाठ तरी समजून घ्यायचा.....
 कृष्ण मस्तीत जगला.. कारण तो माणूस होता.. त्यामुळेच जेव्हा त्याच्या डोळ्यासमोर यादव वंश संपला, तेव्हा तो काही करू शकला नाही आणि खंतावला.. माणसासारखे मरण आले त्याला..!!!!!
माणूस म्हणून त्याचे तेज , त्याचा लढाऊ बाणा त्याचे 'योगेश्वर' रूप.. म्हणजेच खरा "कृष्ण"....त्याला विविध  पुस्तकांतून वाचणं म्हणजेच त्याची भक्ती , माणसाला माणूस म्हणून ज्यांना समजून घेता येत नाही किंवा घ्यायचंच नसतं त्यांना असे पोकळ भक्तीचे देखावे मांडावे लागतात....
ज्यांना समजून घेता येते त्यांच्यासाठी तर तो नेहमीच दीपस्तंभ....
कृष्णा ...तू थोडा तरी समजलास म्हणून आयुष्यातील कितीतरी चक्रव्यूह भेदता आलीत.
-----------------------------------------------------------------------------------------------------

       कृष्ण ही अतिप्राचीन भारतेतिहासातील इतिहासाला कलाटणी देणारी एक वास्तविक व्यक्ती होऊन गेली... विष्णूच्या प्रसिद्ध दशावतारातील मत्स्यापासून वामनापर्यंतचे पाच अवतार जसे काल्पनिक अवतार आहेत, तसा कृष्ण हा केवळ काल्पनिक अवतार नाही. रामही अशीच ऐतिहासिक व्यक्ती असणे फार शक्य आहे, असे पुराणसंशोधकांचे मत आहे.
हिंदुधर्माला मानवदेहधारी साक्षात परमेश्वरच या दोन ऐतिहासिक व्यक्तींच्या रूपातच विशेषतः मिळाला. विष्णू, शिव, देवी, दत्त, गणेश इ. साक्षात परमेश्वस्वरूप मानलेले देव या ऐतिहासिक व्यक्ती होत्या, असे कोणीही मानीत नाही... रामापेक्षाही कृष्णाला हिंदुधर्मात अधिक महत्त्व आले, ते त्याने स्थापन केलेल्या भागवतधर्मामुळे अथवा  भक्तिमार्गामुळे होय. कृष्णाचाच भक्तिमार्ग हा रामभक्तीतही परिणत झाला.
कृष्णचरित्रात अद्‌भुत अतएब काल्पनिक असे प्रसंग व असेच पराक्रम वर्णिलेले आहेत... अशा अद्‌भुत प्रसंगांनी आणि पराक्रमांनी भरलेल्या या चरित्रातही वास्तविक ऐतिहासिक अंश किंवा बीजे सहज अनुमानिता येतात. वास्तवालाच कल्पनारम्य अद्‌भुत रूप दिलेले लक्षात येते. बाल्यावस्थेत कृष्णाने पूतना या साक्षसीचे स्तनपान करतानाच तिचे प्राणापहरण केले या कथेचा ‘पूतना’ नामक बालरोगातून त्याची त्वरित सुटका झाली असा अर्थ लागतो. उखळला दोराने बांधलेल्या बालकृष्णाने दोन अर्जुनवृक्षांमध्ये अडकलेल्या उखळाच्या जोरावर ते दोन अर्जुनवृक्ष पाडले, ही कथाही बांधलेले उखळ त्याने फरफटत नेले आणि बागेतील लहान बालवृक्ष त्यामुळे मोडून पडले, या वस्तुस्थितीशी जुळू शकते. गाडा उलथून टाकणे प्रचंड उन्मत्त बैलाशी झुंज घेऊन त्याची शिंगे मोडून त्याला ठार करणे बेलगाम व बेफाम झालेल्या दांडग्या घोड्याला काबूत आणून व लोळवून ठार करणे इ. पराक्रमही नवतरुण व मल्लविद्येत प्रवीण अशा बलिष्ठ कृष्णाला शक्य आहेत असंभवनीय नाहीत.
शकटासुर, वृषभासुर, केशी दैत्य, मथुरेच्या दरवाजातील कुवलयापीड हत्ती इत्यादिकांच्या निर्दालनाच्या कृष्णाच्या नवयौवनातल्या घटना वास्तविक असू शकतात... त्यांत अलौकिक बुद्धिमत्ता, शरीरसामर्थ्य, चपलता, प्रसंगावधान, धैर्य आणि कुशलता हे गुण कृष्णाच्या ठिकाणी एकत्रित झालेले दिसून येतात. चाणूरासारखे अप्रतिम मल्ल, मल्लयुद्धात खेळ खेळत ठार करण्याचीही शक्ती मल्लविद्येत प्रवीण असलेल्या व्यक्तिला असू शकते.
कृष्णाच्या बाललीलांमध्ये त्याच्या नवयौवनातीस कथांचा अंतर्भाव केला आणि त्या अधिक अद्‌भुत रसात्मक केल्या ही गोष्ट कृष्णाला ‘दिव्यावतार’ मानण्याच्या कालखंडात झालेले परिवर्तन होय... यशोदेला बालकृष्णाने आपल्या मुखात विश्वरूप दर्शन दिले, ही कथा अशा परिवर्तनानंतर प्रविष्ट झाली. गोवर्धन पर्वत करंगळीवर कृष्णाने पेलला अशा तऱ्हेच्याही कथा त्याची दिव्यावतार म्हणून पूजा झाल्यानंतर कथा होत. या कथेतही वास्तवाचे बीज स्पष्ट दिसते.
इंद्रपूजा किंवा इंद्रध्वजोत्सव बाजूला सारून गोप्रचार तसेच भूमीच्या किंवा पर्वताच्या पूजनाचा कृष्णाने पुरस्कार केला, ही गोष्ट कृष्णाच्या नवयौवनात घडणे शक्य आहे... वैदिक श्रेष्ठ देव असलेल्या इंद्राचे माहात्म्य कमी करून जुन्या धार्मिक परंपरांना महत्त्व देऊन त्या सुरू करण्याचा कृष्णाचा यत्न होता. वैदिकेतर व वेदपूर्व हिंदुधर्मातील परंपरांना उजाळा देणारा थोर धर्मसुधारक म्हणूनही कृष्णाचे महत्त्व या कथेने चांगले सूचित होते. वैदिक यज्ञधर्माच्या परंपरेला दुय्यम लेखणारा आणि वासुदेवभक्तिसंप्रदाय, उपनिषदांच्या तत्त्वज्ञानाचा आधार देऊन, दृढ करणारा कृष्ण ही सर्वश्रेष्ठ ऐतिहासिक व्यक्ती होय, असे त्याच्या चरित्रातील अनेक कथांवरून सूचित होते. गोपालन आणि गोमातेची पूजा हा हिंदुधर्मातील एक केंद्रवर्ती आचारधर्म आहे. या आचारधर्माला कृष्णाने प्राधान्य दिले.
कृष्णाचा ‘देवकीपुत्र कृष्ण’ असा उल्लेख छांदोग्य उपनिषदात (३·७·६) आला असून, मनुष्य जीवनच यज्ञ म्हणून चालवावे या यज्ञाच्या दक्षिणा तप, दान, ऋजुता, अहिंसा आणि सत्यवचन ह्या होत असा उपदोश घोर अंगिरस या ऋषीने केल्यामुळे कृष्ण हा तृष्णामुक्त झाला, असे त्यात म्हटले आहे... भगवद्‌गीतेशी हा उपदेश जुळतो. वासुदेव कृष्णाचा अर्जुनाबरोबर उल्लेख पाणिनीने केलेला आहे. क्षत्रिय म्हणून या दोघांनाही पाणिनिकाली मान्यता नसावी. मूळ महाभारत (इ. स. पू. सु. ३००), हरिवंश (इ. स. पू. सु. दुसरे-तिसरे शतक), विष्णुपुराणाचा (सु. पाचवे शतक) पाचवा अंश, भागवताचा (सु. नववे शतक) दशमस्कंध आणि अखेरीस ब्रह्मवैवर्तपुराण (सु. पंधरावे शतक) हे कृष्णचरित्राचे ऐतिहासिक क्रमाने मुख्य आधारग्रंथ होत.
महाभारताच्या सभापर्वामध्ये राजसूय यज्ञात अग्रपूजेचा मान कृष्णालाच का देणे जरूर आहे, याचे समर्थन भीष्माने केले. त्या समर्थनाच्या निमित्ताने जे कृष्णचरित्र भीष्माने सांगितले आहे, ते हरिवंशातूनच जवळजवळ सगळे उचलले आहे, असे ‘भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिरा’ ने प्रसिद्ध केलेल्या हरिवंशाच्या संशोधित आवृत्तीच्या प्रस्तावनेत डॉ. प. ल. वैद्य यांनी सिद्ध करून दाखविले आहे. म्हणून असा निष्कर्ष निघतो, की कौरव-पांडवांच्या संदर्भात सांगितलेल्या कृष्णाच्या कथा ह्या महाभारतातील मूळच्या असून सभापर्वातील भीष्मोक्त कृष्णचरित्र ही हरिवंशातून घेतलेली भर आहे.
विष्णुपुराणातील कृष्णकथा ही हरिवंशांच्याच कथेत काही भर टाकून सांगितलेली आहे... आज भारतात सर्वत्र प्रसृत असलेली कृष्णकथा ही मुख्यतः भागवताच्या दशमस्कंधातील कृष्णकथा होय. दशमस्कंध हा कृष्णकथेला वाहिलेला स्कंध आहे. हरिवंशातीलच कथांना अधिक अद्‌भुत रम्य रूप दिले. वत्सक, अघासुर, प्रलंब आणि शंखचूड या असुरांच्या वधाचे प्रसंग, ही त्यातील हरिवंशापेक्षा निराळी अशी भर आहे. कुब्जेवरील प्रेमाच्या कथेतही अधिक रंग भागवताने भरला आहे. ‘ब्रह्मस्तुती’ आणि ‘वेदस्तुती’ हीही अधिक भर घातलेली प्रकरणे होत.
रूक्मिणीस्वयंवर कथेमध्येसुद्धा रूक्मिणीने कृष्णाला पाठविलेले प्रेमपत्र हरिवंशात नाही, ते येथे आहे... हरिवंशातील केवळ कृष्णाची किर्ती व रूक्मिणीच्या सौंदर्याचे वर्णन कानावर आल्यामुळे, दोघांची प्रीती एकमेकांवर बसली, असे म्हटले आहे. भागवतात गोपी आणि कृष्ण यांच्या शृंगाराचे उत्तान वर्णन आले आहे. तसेच कृष्ण व गोपींची रासक्रीडा खूप खुलवून सांगितली आहे. हरिवंशात हा शृंगार आणि क्रीडा सूचक रूपानेच तेवढी आली आहे. महाभारत, हरिवंश व भागवत यांमध्ये कृष्ण हा गोपींचा प्राणवल्लभ म्हणून निर्दिष्ट केलेला असला, तरी तेथे कोठेही राधेचा निर्देश नाही. हालाच्या गाथासप्तशतीत (सु. पाचवे शतक) राधा  व कृष्ण यांच्या प्रणयाचा उल्लेख आला आहे. राधा ही इतर गोपींप्रमाणेच परकीया आहे, असे एक मत धरून मध्ययुगीन काही काव्ये लिहिली आहेत, तर राधा व कृष्ण यांचा विवाह झाला, असे धरून काही काव्यांमध्ये वर्णन आहे.
राधा ब्रह्मवैवर्तपुराण  व जयदेवकविरचित गीतगोविंदात कृष्णाची परमप्रिया म्हणून चमकते. ब्रह्मवैवर्तात विष्णूची आदिमायाशक्ती हीच राधा बनली. मूळमहाभारतात जशी कालांतराने भर पडत गेली, तशी मूळ हरिवंशातही ती पडत गेली व मूळ ग्रंथ दुप्पट अथवा तिप्पट झाले. वरील सर्व ग्रंथांमध्ये असलेल्या कृष्ण चरित्रांपैकी भागवतातील कृष्णचरित्र हे मध्ययुगीन देशी भाषांमध्ये प्रामुख्याने प्रसृत झाले. कृष्णाच्या बाललीला आणि राधाकृष्णप्रणय मराठी संतांच्याही कवितांचा विषय बनला.

कृष्णचरित्र...:
यदुवंशाच्या वृष्णिकुलात कृष्णाचा जन्म झाला... वृष्णी हा यदुवंशातील भीम सात्वत याच्या चार पुत्रांपैकी एक पुत्र. भजमान, देवावृध, अंधक व वृष्णी या चार भावांमध्ये यादवांचे राज्य विभागले होते. अंधकाकडे मथुरा व तिच्या भोवतालचा परिसर होता. अंधकाचा पुत्र कुकुर. कुकुराच्या वंशातील आहुकाला देवक, उग्रसेन इ. पुत्र झाले. देवकाला चार मुलगे व सात मुली झाल्या. त्यांपैकी देवकी ही कृष्णाची माता होय. उग्रसेनाला नऊ पुत्र व पाच पुत्री झाल्या. उग्रसेनाचा सगळ्यात ज्येष्ठ पुत्र कंस होय. कंसाने आपला पिता उग्रसेन यास बंदिखान्यात टाकून मथुरेचे राज्य बळकावले. वसुदेव उग्रसेनाचा मंत्री होता. वृष्णी, अनमित्र, देवमीढुष, शूर आणि शूराचा वसुदेव अशा पिढ्या सांगितल्या आहेत. वसुदेवाची सख्खी बहीण ‘पृथा’ म्हणजे पहिल्या तीन पांडवांची माता कुंती होय. कुंती ही कुंतभोज राजाला दत्तक गेली होती. देवकाची कन्या देवकी ही वसुदेवाची पत्नी आणि कृष्णाची माता होय. वसुदेवाला देवकी, रोहिणी इ. सात भार्या होत्या.
वसुदेवाच्या विवाहाच्या अखेरीस वसुदेव व देवकी यांची रथावरून मिरवणूक निघाली... या रथाचे सारथ्य कंसाने आपली चुलत बहीण जी देवकी तिच्यावरील प्रेमामुळे केले. या मिरवणुकीच्या प्रसंगी आकाशवाणी झाली, की ‘कंसा तुझा शत्रू, तुझा वध करणारा, देवकीच्या पोटी जन्माला येणार आहे’. हरिवंशातील चरित्रात मात्र असे म्हटले आहे, की नारदमुनींनी कंसाचा आतिथ्यसत्कार स्वीकारल्यावर त्याला भविष्य सांगितले, की ‘देवकीचा आठवा गर्भ हा तुझा अंत करणारा होणार आहे’. वसुदेव हा उग्रसेनाचा मित्र असलेला मंत्री. त्याच्याबद्दल कंसाच्या मनात अढी होतीच. जरासंधाचा कंस हा जावई. जरासंध हा सर्व भारतवर्षातील सर्वश्रेष्ठ सम्राट, राजांचा राजा होता. त्याच्या पाठिंब्यावर कंसाने उग्रसेनाला म्हणजे आपल्या पित्याला पदच्युत करून सिंहासन बळकावले होते. कंस एका मोठ्या सम्राटाच्या पाठिंब्यामुळे अत्यंत उध्दट बनून त्याने प्रजेकडून जबरदस्त करभार वसूल करण्याचा सपाटा लावला. कंस यादवकुलीन होता. यादवांची विशेषतः वृष्णी आणि अंधक कुलांची गणराज्ये होती. स्वतः कंस गणांच्या संमतीने राजा न बनता आपल्या सासऱ्याच्या बळावर राजा बनला. त्यामुळे गणराज्याची पद्धत बिघडविल्या मुळे आणि जुलमी धोरण पतकरल्यामुळे कंसाविरुद्ध असंतोष माजला असावा आणि या असंतोषाचे प्रतिनिधी वसुदेवाचे दोन पुत्र बलराम आणि कृष्ण बनले, असा तर्क करण्यास बरीच जागा आहे.
वसुदेव हासुद्धा या असंतोषाच्या मुळाशी असावा... अनेक यादव कुले ही कृषी व गोपालन या व्यवसायांतील होती. पशुपालन व कृषिकर्म हे जोडधंदे, गंगा यमुनेच्या दुआबात भरभराटीस आले होते. भारी कारभारामुळे पशुपालन करणाऱ्या गणांमध्ये असंतोष माजला व नंदगोप हा वसुदेवाचा मित्र, कंसाचा गोपालक असूनही वसुदेवाच्या पक्षाला येऊन मिळाला. मथुरेच्या तीरावर ‘व्रज’ म्हणजे गोकुळ होते. ही विपुल समृद्धी मिळालेली व्रज्रभूमी होती. नंदगोपाकडे वसुदेवाने आपली दुसरी पत्नी रोहिणी ही सुरक्षिततेकरिता पाठविली होती.
आकाशवाणी वा नारदाची भविष्यवाणी ऐकल्यावर कंस भडकला आणि तो देवकीचा वध करण्यास उद्युक्त झाला... वसुदेवाने त्याची समजूत घातली व स्त्रीवधापासून त्याला परावृत्त केले, असे भागवतात म्हटले आहे. हरिवंशात ही मिरवणुकीतील आकाशवाणी सांगितली नाही. तेथे असे म्हटले आहे, की नारदाची भविष्यवाणी लक्षात ठेवून कंसाने वसुदेवाच्या घरावर गुप्त रक्षक ठेवले त्यांत स्त्रियाही होत्या. देवकीला संतती झाल्याबरोबर कंसाला संदेश येई आणि त्याप्रमाणे तो नवप्रसूत बालकाचा ताबडतोब वध करून निकाल लावी. अशी सहा बालके त्याने नष्ट केली. सातवा गर्भ उदरात आल्याबरोबर देवकीच्या गर्भाशयातून ओढून घेऊन योगनिद्रादेवीने तो रोहिणीच्या गर्भाशयात ठेवला. तोच बलराम म्हणून जन्मला. त्याचे जन्मनाव ‘संकर्षण’ होय. एकीकडून ओढून दुसरीकडे नेलेला म्हणजे ‘संकर्षण’ होय. आठवा गर्भ म्हणजे साक्षात विष्णूने मानवशरीर धारण केलेला कृष्ण होय. हा प्रसूतिकाली चतुर्भुज विष्णूच्या रूपाने देवकीपुढे प्रगट झाला परंतु देवकीच्या प्रार्थनेने त्याने पुन्हा  नवजात बालकाचे रूप धारण केले. हा श्रावण कृष्ण अष्टमीस मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रावर किंवा अभिजित नक्षत्रावर जन्मला.
यावेळी भागवतात सांगितल्याप्रमाणे वसुदेव व देवकी यांच्या पायांत लोखंडी बेड्या कंसाने अडकविल्या होत्या, त्या एकदम निखळून त्यांचे पाय मोकळे झाले. हरिवंशाप्रमाणे बेड्या घातल्याच नव्हत्या. वसुदेवाने मध्यरात्रीच या बालकाला नंदगोपाच्या गोकुळात नेले. नंदगोपाची पत्नी यशोदा नुकतीच बाळंतीण झाली होती तिला मुलगी झाली होती. ती मुलगी वसुदेवाने उचलली, बालकृष्णाला तिच्या कुशीत झोपविले व तिच्या कन्येला घेऊन परत सूर्योदयाच्या आत तो मथुरेत स्वगृही परतला. भागवतामध्ये हा प्रसंग अधिक अद्भुतरम्य करून वर्णिला आहे.
कृष्णजन्माच्या वेळी भर पावसाळा सुरू होता, यमुना दुथडी भरून वाहत होती, तिने दुभंगून वसुदेवाला वाट दिली, असे तेथे म्हटले आहे. सकाळी कंसाला देवकी प्रसूत झाल्याची वार्ता मिळाली... वसुदेवाने आणलेली यशोदाकन्या त्याच्या हाती लागली. त्याने तिला शिळेवर आपटण्याकरिता उचलले. तोच ती त्याच्या हातातून निसटून तिने आकाशात आपले संपूर्ण शारदादेवीचे रूप प्रगट केले आणि कंसाला सांगितले, की ‘तुझा शत्रू अन्यत्र वाढत आहे’. ही योगनिद्रादेवी यशोदेच्या गर्भात आली, कंसाच्या हातून निसटली, विष्णूच्या वरदानामुळे विंध्यवासिनी देवी बनली आणि सर्व मानवांना पूजनीय, विघ्ननाशिनी व सर्वकाम प्रदायिनी बनली, असे सर्व पुराणांतल्या कृष्णचरित्रांत सांगितले आहे.....

याचा अभिप्राय असा, की वासुदेव भक्तिसंप्रदायाने किंवा वैष्णव संप्रदायाने देवीपूजेचा वेदपूर्व धर्म मान्य केला.....

स्त्रोत: मराठी विश्वकोश...

2192. अवलिये

 निरनिराळ्या क्षेत्रात जिगर, मस्ती, कैफ, झिंग व अजब रसायनाने भरलेली माणसे जन्माला येतात. सामन्यातून असामान्य झालेली ही व्यक्तिमत्वे, यांच्या कामातून कुठे अनेकांचे प्रश्न सोडवले जातात, कुठे न्याय मिळवून दिला जातो तर कुठे शक्ती-बुद्धीचा मिलाफ होऊन नवनिर्माण घडते. या अवलियांचे एखादे वाक्य देखील अनेकांना स्फूर्ती देतात, जगण्याची उमेद वाढवतात, अनेकांचे जीवनमान बदलतात. या प्रतिभावंतांचं जगच निराळं. जगाला त्यांनी पादाक्रांत केलेली शिखरे दिसतात. परंतु ही शिखरे गाठताना त्यांनी शोधलेल्या वाटा, त्यावरचे दगडधोंडे, खाचखळगे, बोचलेले काटे, रक्ताळलेली पावले लोकांना दिसत नाही. अशीच काही अवलिये ज्यांनी जनसामान्यांच्या मनावर अधिराज्य केलेले आहे :
 01) भग्वद्गीतेवर  अपार श्रद्धा असणारा भगतसिंग फासावर जाण्यापूर्वी गीतापठण करत होता. जेलरने विचारले, "तुझं हे गीतापठण कधी संपणार?" राष्ट्रभक्तीवर प्रखर श्रद्धा असणारा भगतसिंग बाणेदारपणे उत्तर देतो, "पुढच्या जन्मी." त्यावेळेस जगाला भगवद्गीतेच्या पावित्र्याचा व राष्ट्रभक्तीचा प्रत्यय येतो.
 02) विलक्षण प्रतिभा घेऊन जन्माला आलेले श्रीमान योगीकार रणजित देसाई, ययातीकार वि. स. खांडेकर, द दा विंची कोडचे डॅन ब्राऊन, सिंहासनाधिष्ठ अरुण साधू, धर्म आणि विज्ञान यांची सांगड घालणारे आश्विन सांघी, तरुण पिढीला भुरळ घालणारे प्रतिपश्चन्द्रकार डॉ. प्रकाश कोयाडे यासारखे अनेक लेखक जगभरातील लोकांना वाचण्याचे वेड लावतात, तेव्हा 'वाचाल तर वाचाल' याचे महत्व कळते.
 03) "पाच हजार वर्षानंतर दानशूर कर्णाने शिवाजी सावंतांच्या रूपाने पुनर्जन्म घेऊन 'मृत्युंजय'द्वारे आपली व्यथा मांडली" असं ज्यावेळेस बोललं जातं त्यावेळेस शिवाजी सावंतांना ज्ञानपीठ पुरस्काराऐवजी हा पुरस्कार सर्वोच्च असल्याचे जाणवते.
 04) विक्रीचे अनेक रेकॉर्ड मोडणारे 'गॉडफादर'चे लेखक मारिया पुझो यांचे पहिल्या पानावर असलेले 'Behind every great fortune there is a crime.' हे वाक्य लोक वाचतात तेव्हा त्यांना प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे काळे वलय दिसते, यातच गॉडफादरचे यश दिसून येते.
 05) अद्यापही त्याच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत आणि कदाचित भावी काळातही ते अबाधित राहतील. परंतु अनेकदा आऊट नसूनही अंपायर सचिन तेंडुलकरला आऊट देतात, तेव्हा किंचितही त्रागा न करता तो अतिशय शांतपणे व नम्रतेने मैदान सोडतो. त्याचा हा नम्रपणा बघून तमाम भारतीयांकडून त्याला भारतरत्न देण्याची मागणी होते.
 06) सर्वोच्च शिखर सर करण्यास अनेक वेळेस अपयश येऊनही एडमंड हिलरी एखाद्या पहाडासारखा त्या बलाढ्य माउंटनसमोर उभा राहून म्हणतो, ''As a mountain you can't grow but as a human being I can." ही दुर्दम्य इच्छशक्ती त्याला पहिला एव्हरेस्टवीर हा किताब बहाल करते.
 07) गुरुत्वाकर्षणाचा शोध व भौतिक शास्त्राची व्याख्या बदलणारा जगप्रसिद्ध शास्रज्ञ न्यूटन जेव्हा मांजरीसाठी एक मोठे व तिच्या पिलांसाठी एक छोटे अशी दोन छिद्रे ठेवतो, तेव्हा खऱ्या अर्थाने तो घराघरात पोहचतो.
 08) तिसऱ्यांदा ऑलिम्पिकचा सुवर्ण चषक हातात घेऊन उंचावलेल्या पेलेला विचारणा होते, "आपल्या यशाचे गमक काय आहे," तेव्हा पेले नम्रतेने म्हणतो, "फुटबॉल हा खेळ ब्राझिलियन्सच्या नसानसात भिनलेला आहे. त्यामुळे या देशात लहान मूल चालायला शिकण्यापूर्वी किक मारायला शिकतं." त्याचे स्फूर्ती देणारे हे वाक्य जगभरातून चर्चिले जाते तेव्हा ब्राझिलियन्स म्हणतात, "स्वर्गात गॉड आहे व ब्राझीलमध्ये पेले आहे."
 09) हॉकी सम्राट मेजर ध्यानचंदच्या स्टिकचे अनेक तुकडे करून फोरेन्सिक लॅबला चेकिंगसाठी पाठवतात (अर्थात त्यात काहीही सापडत नाही) व खेळण्यास दुसरी स्टिक देतात. तरीही ध्यानचंद मिळेल त्या स्टिकने भारताला सलग तीन वेळेस ऑलिम्पिकचे सुवर्णपदक मिळवून देतो, त्यावेळेस भारतीय जनताच नव्हे तर जगभरातले व जर्मनीचे तमाम रहिवासी अगदी हिटलरसह त्याच्यासमोर नतमस्तक होतात.
 10) अतिशय सामान्य परिस्थितीतून आलेला पॉल म्युनी अनेक चित्रपटांतून असामान्य भूमिका करून ऑस्कर विजेता होतो. आयुष्याच्या उत्तरार्धात मरणासन्न अवस्थेत असताना त्याचा मित्र त्याला एक भले मोठे पुस्तक भेट देतो, तेव्हा केविलवाणे हसत तो म्हणतो, "मित्रा, हे पुस्तक मी वाचणे तर सोड पण ते आता उचलूही शकत नाही." ते पुस्तक म्हणजे इंग्लिश डिक्शनरीची नवीन आवृत्ती असते. त्यातील पहिल्या पानावर खूण केलेला शब्द मित्र त्याला दाखवतो. तो शब्द असतो 'actor' आणि त्याच्यासमोर त्याचा अर्थ असतो पॉल म्युनी. ते वाचून त्याच्या डोळ्यात अश्रू तरळतात, हुंदका दाटून येतो व म्हणतो, "तुझी ही गिफ्ट हजारों ऑस्करला मागे टाकेल इतकी अनमोल आहे. आता मी सुखाने प्राण सोडायला मोकळा झालो."
 11) मिल्खासिंगने पळण्याचा शर्यतीत सुवर्णपदक जिंकल्यानंतर, पंतप्रधानांनी, "He didn't run, he flew," असं म्हटल्यावर मिल्खासिंगला पदकापेक्षाही आपल्या जीवनाचे ध्येय गाठल्याचा आनंद मिळतो.
 12) महान क्रिकेटटू डॉन ब्रॅडमन खेळत असताना समालोचक म्हणतात, "He is in." तेव्हा he कोण आहे हे सांगण्याची गरज नसते. तो आऊट होतो तेव्हा ब्रॅडमन पॅव्हिलिअनमध्ये पोहचण्यापूर्वी सर्व प्रेक्षक स्टेडियम सोडून विषण्ण अवस्थेत बाहेर पडतात, तेव्हा क्रिकेटची झिंग काय असते हे जगाला कळतं.
 13) फ्रान्समधील लूव्हर संग्रहालयातून जगप्रसिद्ध मोनालिसाचे चित्र चोरीस गेल्यानंतर संपूर्ण देश आक्रंदन करतो. प्रथमच या देशाचा झेंडा अर्ध्यावर उतरवला जातो, तेव्हा लिओनार्दो दा विन्सी हा काय अवलिया आहे, हे जगाला कळते. तोच चोर पश्चातापदग्ध होऊन ते चित्र परत आणून देतो तेव्हा समस्त जनता त्याला माफ करते. तद्नंतर अशी आख्यायिका आहे की लिओनार्दो पुनर्जन्म घेऊन चोर झाला व त्यानेच त्याचे चित्र पळवले व जगाला मोनालिसाचे गूढ हास्य (अद्यापही न उलगडलेले) दाखवून दिले.
 14) तत्कालीन पंतप्रधान जेव्हा "कैसा दिखा रहा है हमारा देश" असं विचारतात तेव्हा राकेश शर्मा अवकाशातून 'सारे जहाँसे अच्छा हिंदुस्थान हमारा' असे उत्तर देतो, त्यावेळेस त्याच्या एका वाक्याने संपूर्ण देशभरात राष्ट्रप्रेमाची भावना उसळते.
 15) जगज्जेता सिकंदर एका फकिराला विचारतो, "तुला काय हवंय ते सांग." तेव्हा शांतपणे तो फकीर म्हणतो, "माझे ऊन अडवून उभा आहेस, थोडा बाजूला हो." अशावेळेस जगाला स्वाभिमानाची भाषा समजते.
     अशा असामान्य व्यक्तींना उदयास्त असतात व इतरांना जन्म-मृत्यू असतात. निरनिराळ्या क्षेत्रात असूनही, त्यांच्या बोलण्यात असलेले एक समान वाक्य, "आमच्या मनातून वाहणाऱ्या विचारधारा, देशासाठी आमच्याकडून झालेले कार्य हे आम्ही निर्माण करत नव्हतो तर ते आमच्यातून आपोआप वाहत होते. त्या निर्गुण-निराकार, नित्य-निरवयव, अनादि-अनंत परब्रह्माच्या कृपेने हे शक्य झाले." 
त्यांची ही एकवाक्यता जगभरातील लोकांना सर्व शक्तिमान ईश्वरापुढे नतमस्तक करते.

2191. आनंद

 "अरे वा ! आज चक्क गजरा !"
ती एकदम आश्चर्य चकित होऊन म्हणाली. सध्याच्या परिस्थितीत त्याच्याकडून एका साध्या कटाक्षासाठी तिला तरसायला लागत होतं. लग्नाला अनेक वर्षे उलटून गेलेल्या अनेक जोडप्यांसारखं त्यांच्यातल्या संवादाची पातळी आणि आपुलकी दोन्ही यथातथा झाली होती. त्यामुळे ह्या छोटयाश्या गोष्टीने सुद्धा तिला खूप आनंद झाला ह्यात काही नवल नव्हते. त्याने तिच्या हातात दिलेला गजरा घेतला आणि तिला म्हणाला,
" मागे फिर, माळून देतो." ती हसून वळली. त्याने हलकेच गजरा माळला. तिला खूप छान वाटलं.
लग्ना आधी तिला गजरा कधीच आवडायचा नाही. ती शक्यतो वेस्टर्न कपडे घालायची. त्यामुळे गजरा कधी फारसा माळला जायचा नाही. कधी सणा-समारंभाला आईने सांगितलं तर नाक मुरडायची ती.
पण लग्नानंतर अनेक गोष्टीं सोबत आवडी निवडीही बदलल्या. प्रेमाने सांगितलेल्या गोष्टी सक्तीच्या न वाटता नवऱ्याच्या प्रेमाखातर आवडू लागल्या. नंतर प्रेमाची व्याख्या बदलली किंवा priorities बदलल्या म्हणून सक्ती उरली. असो. ह्या क्षणी तरी छान वाटतंय ना! बास!
"काय बनवलंय आज जेवायला?" त्याने विचारलं.
"अजून सुरुवात नाही केलीये स्वयंपाकाला. काय बनवू सांग."
"काही नको. आपण आज बाहेर जाऊया जेवायला." 
आणखी एक shock ! ह्याला आज झालंय तरी काय? इतका कसा आज राजा उदार झालाय?
लगेच तिचं दुसरं मन उसळून म्हणालं "काहीही काय? तो काय कंजूष नाहीये." 
माहित आहे. पण आज काहीतरी घडलंय हे नक्की. स्वारी फारच खुशीत दिसत्ये आज. पण तो खुशीत तर आधीही असायचा. पण कधी आपल्याशी इतका चांगला वागला नाही.मग? 
काय करावं त्याने? चांगला वागला तरी तुला प्रॉब्लेम, नाही वागला तरी तू उदास. करावं काय त्याने? सगळ्या गोष्टीत संशय घ्यायची मेली सवयच झालीये तुला! आता तो प्रियकरासारखा वागतोय तर तू का टिपिकल 
बायको मोड मध्ये आहेस? ऐक ना त्याचं. जा तयार हो मस्तपैकी आणि दोघं छान एन्जॉय करा. नसती खुस्पटं काढत बसलीये! 
बरं बरं. एवढं काही बोलायला नको. आज तो काही बोलत नाहीये तर तू मला ऐकवतोय्स का?
ती खुद्कन हसली. तिच्या दोन मनांमधली खडाजंगी संपली होती आणि तिला positive कौल का काय तो मिळाला होता.
तिने त्याच्या आवडीचा पिवळा आणि गुलाबी सलवार कमीझ घातला. केस विंचरून गजरा पुन्हा नीट माळला. दोघे कार ने निघाली. वाटेत तो अखंड गप्पा मारत होता. ती शांतपणे पण लक्ष देऊन ऐकत होती. थोडं अंतर गेल्यावर तिला राहवलं नाही. तिने विचारलंच.
"तुझा मूड खराब करायचा नाहीये मला. पण एक विचारू?"
"अगं विचार ना. माझा मूड आज कशानेही खराब होणार नाहीये." तो
"आज काय झालंय तुला? अचानक बाहेर जेवायला वगैरे?"
"चालणार आहे ना तुला? तुझी इच्छा नसेल तर आपण घरी जाऊया. मी काहीतरी पार्सल आणतो"
"नाही रे. माझी इच्छा नसायला काय झालंय? पण मघाशी घरी आल्यापासून मी बघतीये, तू खूप आनंदात आहेस. मला सारखं वाटतंय कि आज काहीतरी छान घडलंय तुझ्या सोबत. काय ते सांगितलंस तर त्याचा मलाही आनंदच होईल असं तुला नाही वाटत का?"
"काही नाही ग. आज आमच्या ऑफिस मध्ये "happiness unlimited " असा एक सेमिनार होता. त्या माणसाने एक कथा सांगितली. तशी काल्पनिकच म्हणायची. पण त्या कथेचा मी अजूनही विचार करतोय. त्याचा प्रत्येक शब्द माझ्या कानात घुमतोय. मनात फिरतोय. अजून."
"कुठली कथा ?"
तिला आश्चर्य वाटलं. अशी कुठली कथा असेल ह्याला एवढी आवडलेली. ह्याला इम्प्रेस करणं म्हणजे ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्यापेक्षा महाकठीण काम. त्याला कधीच कुठली गोष्ट फार अशी आवडत नसे. तिच्या तर प्रत्येक गोष्टीत त्याने लग्नानंतर खोड काढली होती. असो.
तो सांगू लागला,
"फार पूर्वी म्हणे अरब देशात एक इसम रहायचा. त्याची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. साधा माणूस. पण नेहमी आनंदी आणि समाधानी. सतत चेहऱ्यावर हसू. एके दिवशी त्याला एक कप सापडतो. त्या कपात रडलं की अश्रुंचे मोती तयार होतात हे त्याला कळतं. पण ह्या पठ्ठ्याला कधी रडूच येत नसे. मग तो सतत उदास राहण्याचा प्रयत्न करू लागतो. दुःखाच्या ठिकाणी आवर्जून जाऊ लागतो. आणि त्या कपात रडून अश्रुंचे मोती तयार करू लागतो. हळूहळू त्याला ह्या मोत्यांच्या आणि त्यातून येणाऱ्या श्रीमंतीचा मोह होऊ लागतो. त्याचं लग्न होतं. बायकोवर प्रेम खुप. पण बायकोला आनंदी ठेवू शकत नाही. कारण स्वतःला आनंदी राहणं गरजेचं वाटत नसतं. शेवटी तो माणूस मोत्यांच्या डोंगरावर बसून आपण स्वतः संपवलेल्या बायकोच्या प्रेतावर रडतो असा त्या कथेचा शेवट आहे."
"बापरे" तिच्या अंगावर काटा आला.
" मी खूप विचार केला ह्या कथेचा. म्हटलं यार! आपण आनंद हवा, आनंद हवा म्हणून सगळी कडे भटकत असतो. पण जी माणसं आपली आहेत, आपल्या जवळ आहेत. त्यांच्या सुखात आनंद शोधणं किती सोप्पं आहे. मघाशी एका लहानश्या गजऱ्यानेही तू कित्ती खुश झालीस. तुझ्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून मलाही खूप बरं वाटलं."
ती खुदकन हसली पुन्हा. आपला नवरा आपल्यावर मनापासून खूप प्रेम करतो आणि आपल्या सुखासाठी प्रयत्न करतो ही कल्पनाच अत्यंत सुखावणारी आणि positive आहे. 
हॉटेल जवळ आल्यावर ती कार मधून उतरली. तो गाडी पार्क करून आला आणि दोघे जिना चढत असताना तिच्यातली बायको पुन्हा जागी झाली.
"काय रे. पण मला एक सांग. मोती मिळवण्यासाठी त्याला उदास राहायची काय गरज होती? रोज कांदा चिरला असता तर ढीगभर मोती मिळाले असते. उगाच त्या बिचाऱ्या बायकोला मारलं बावळाटाने."
तो हसू लागला आणि आश्चर्यचकितही झाला. हे त्याच्या डोक्यातही आलं नव्हतं. कसं येणार? असे उपाय बायकोलाच सुचू शकतात. त्या माणसाला पण हिच्या सारखी बायको असती तर ती वाचली असती.
कमाल आहे आपली. "हिच्याशी लग्न करून आपण फसलो" इथपासून "इतरांना पण हिच्या सारखी बायको मिळावी." इथपर्यंत आपण पोहोचलो. प्रगती आहे आपली....!
त्याला स्वत:वरच खूप हसू आलं!!!

लेखक अज्ञात 🙏🏻🙏🏻

2190. राक्षस

        पितृछाया बंगल्याचे गेट उघडून मी अंगणात पाऊल टाकले. बंगल्याकडे एक नजर टाकली. बंगल्याची संपूर्ण रयाच गेलेली होती. बंगल्याचा मालक कफल्लक झाला होता वगैरे काहीही परिस्थिती नव्हती. तो श्रीमंतच होता. मात्र गेले सात-आठ वर्ष आजारी होता; गेले दोन वर्ष तर अंथरुणावरच होता. जवळचं असं कुणी जवळ नव्हतं. आणि मी, त्याचा so called मित्र, एक डॉक्टर होतो. रोजच्या माझ्या visitसाठी मी त्या बंगल्यात शिरत होतो. माझ्या जवळच्या किल्लीने मी latch उघडून घरात शिरलो. थेट अंकुशच्या खोलीत शिरलो. अपेक्षेप्रमाणे अंकुश वेदनेने विव्हळतच होता. साठीलाही अजून न पोचलेला अंकुश अगदी गलीतगात्र होऊन कमालीचा वृद्ध वाटत होता.
मी त्याच्या जवळ बसलो. क्षीण आवाजात अंकुश म्हणाला,
`हे काय होऊन बसलं रे... आता... आता माझी आशा संपत चालली आहे. मला नाही वाटत आता मी जास्त जगेन.`
`नाही अंकुश, अजून किमान दहा-एक वर्ष तरी तुला जगायचं आहे. जगावंच लागेल.` मी त्याला म्हणालो. यावर त्यानं काहीच प्रतिक्रिया दिली नाही. माझं मन भूतकाळात गेलं. खूप दूर. अगदी माझ्या विद्यार्थीदशेत.
पाचवीत नव्या शाळेत गेलो आणि माझा अंकुशशी परिचय झाला. नाही, अंकुश माझ्या वर्गात नव्हता. पण आमची आडनावे अशी काही जवळ होती, की पाचवीपासून प्रत्येक वर्षी अंतिम परीक्षेला त्याचा नंबर बरोब्बर माझ्या मागच्या बाकावर येत असे. पाचवीच्या अंतिम परीक्षेत पहिल्या पेपरला माझा त्याचा पहिला परिचय झाला. माझ्या एकूण अवतारावरून मी अभ्यासू मुलगा असल्याचं अंकुशनं अचूक ओळखलं, आणि त्याच्या एकूण अवतारावरून अंकुश अगदी वाया गेलेला, गुंड प्रवृत्तीचा मुलगा असल्याचं मी ओळखलं. पेपर चालू होण्याच्या काही मिनिटे आधी अंकुशनं मला माझा उत्तरांचा पेपर अधून मधून दाखवण्याबद्दल सरळ सरळ धमकावलं. त्याच्याकडे असलेला धारदार चाकू की सुराही त्यानं मला सहज दाखवतोय, असं दर्शवत दाखवला होता. साध्या, सरळ, शामळू आणि खरं तर अगदी बुळ्या असलेल्या मला यास नकार देणं शक्यच नव्हतं. पेपर चालू झाल्यावर अधून मधून मला मागून हलकेच धपाटे मिळू लागले. मग समोरच्या शिक्षकांचे लक्ष जाणार नाही अश्या प्रकारे मी त्याला उत्तरे दाखवू लागलो. अर्थात अंकुश केवळ माझ्यावर अवलंबून नव्हता. शरीराच्या विविध भागावर महत्वाची उत्तरे लिहिणे, गाईडची पाने इकडे तिकडे लपवणे वगैरे उपद्व्यापही त्यानं केलेले होतेच. त्यामुळे त्यात असलेल्या मजकुरांवर प्रश्न असतील तर त्याचे तो लिहित होताच. अश्या प्रयत्नांनी तो काठावर का होईना प्रत्येक वर्षी पास होत होता आणि दहावीपर्यंत अगदी प्रत्येक वर्षी मला हा त्रास सहन करावा लागला होता. अर्थात पाचवीलाच मी त्याला संपूर्ण सहकार्य केले असल्याने पुढील कोणत्याही वर्षी मला धमकावणे वगैरे त्याला करावे लागले नव्हते. तो मला व्यवस्थित रिस्पेक्ट देऊ लागला होता. परीक्षेपुरते मला त्यानं त्याचा मित्रच मानलं होतं. शिवाय परीक्षा संपल्यावर आमचा कोणताच संपर्क राहत नव्हता. त्यामुळे मीही फारसा त्रासलो नव्हतो.
      डॉक्टर व्हायचं माझं स्वप्न असल्यानं दहावीनंतर मी science घेतलं आणि अपेक्षेप्रमाणे आमचा संपर्क संपला. पुढे मी डॉक्टर झालो आणि माझं राहतं गाव सोडून पुण्याला परंतु पुण्याच्या बऱ्यापैकी outsideला एका बऱ्यापैकी लोकसंख्येच्या भागात माझं क्लिनिक सुरु केलं. येथे येऊनही आता तीन-चार वर्षं झाली होती. माझं एक चांगला डॉक्टर म्हणून या भागात नावही झालं होतं. अधून मधून काहीतरी कारणांनी अंकुशची आठवण येत होती. तो आताशा मोठा गुंड वगैरे झाला असेल अशी माझी कल्पना होती.
अश्याच एका दिवशी, क्लिनिकमध्ये पेशंट बघत असताना समोर एक हडकुळा, गरीब तरुण मला दिसला. प्रथम मी त्याला ओळखलंच नाही. पण त्यानं मात्र मला अचूक ओळखलं. माझ्याही काही क्षणात लक्षात आलं. तो अंकुश होता. मग त्यानं त्याची सारी कहाणी मला सांगितली. तो पुढे विशेष शिकू शकला नव्हता. काम-धंदाही काही करू शकला नव्हता. तो यासंदर्भातच मला भेटायला आला होता. या भागात अनेक बंगले होते. ज्येष्ठ नागरिकही मोठ्या प्रमाणात होते. या घरांमध्ये, या लोकांसाठी लागेल ते काम करण्याची त्यानं तयारी दाखवली. मी लोकांना त्याची ओळख करून द्यावी अशी त्याची माझ्याकडून अपेक्षा होती. मी अंकुशला जसं आणि ज्या स्वरुपात पाहिलं होतं, ते पाहता त्याला कुणाला कामासाठी recommend करणं, खरं तर अवघडच होतं. पण आत्ताच्या आमच्या चर्चेवरून तो आता बदललेला वाटत होता. त्याची सगळी मस्ती जिरल्यासारखी वाटत होती. आमच्या पुढील काही भेटीत तो खरोखरच सुधारला असल्यासारखं मला वाटलं, आणि मी त्याला त्या भागातील काही लोकांची काही किरकोळ कामं मिळवून दिली. हळूहळू त्याला माझी ओळख न सांगताही कामं मिळू लागली. अधून मधून तो मला भेटायला येत होताच.
     याच भागातील एक कुटुंब म्हणजे तपस्वी कुटुंब. पती-पत्नी तसे म्हातारपणाकडेच झुकलेले. मुख्य म्हणजे त्यांच्या वयापेक्षा एकुलत्या एक परंतु बौद्धिक वाढ न झालेल्या मुलाच्या सेवेनं मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खचून ते अधिक वृद्ध वाटत होते. त्यात मुलाचा विचार करून त्यांनी एका खेडेगावातील अगदी साधी मुलगी पाहून आपल्या मुलाचा विवाहही करून दिला होता. आर्थिक बाबतीत मात्र काहीच अडचण नव्हती. आपल्या बंगल्याच्या एक भागात त्यांनी एक दुकानही उघडले होते. पुण्याच्या बाहेरच्या भागात ही सारी वस्ती असल्याने दैनंदिन व्यवहारात लागणाऱ्या असंख्य गोष्टी या दुकानात त्यांनी विक्रीस ठेवल्या होत्या, ज्यांची गरज आजूबाजूच्या प्रत्येकास वारंवार लागत होतीच. त्यामुळे हे दुकानही चांगले चालत होते. आजोबा-आजी सुनेच्या मदतीने दुकान चालवत होतेच, पण एका कायमस्वरूपी मदतनिसाची जेव्हा त्यांना गरज भासू लागली तेव्हा त्यांनी अंकुशला त्याबद्दल विचारलं. अंकुशनं हा प्रस्ताव स्वीकारला आणि संपूर्ण वेळ पगारी नोकरी त्यांच्याकडे करू लागला. हळूहळू अगदी घरातलाच एक होऊन त्यानं घरातल्या सगळ्यांचा विश्वास संपादन केला. एक-दोन वर्षे उलटली आणि एक दिवस अचानक तपस्वींचा मुलगा मृत्यू पावला. अंकुश आता तपस्वी पती-पत्नीचा अगदी जवळचा आधार झालेला असल्याने त्यांनी त्यांच्या सुनेशी विवाहाचा प्रस्ताव अंकुशसमोर ठेवला, जो अंकुशनं स्वीकारला. हा सारा काळ मलाही अंकुशमध्ये तो पूर्वीचा अंकुश कुठेच दिसत नसल्यानं मलाही तपस्वी कुटुंबाचा हा निर्णय योग्य वाटला. असेच काही महिने उलटले आणि तपस्वी दाम्पत्य माझ्याकडे आले. प्रकृतीच्या काही तक्रारी घेऊन.
बोलता बोलता तपस्वी आजोबा म्हणाले, `अंकुशने आता आमचे घर आणि व्यवसाय, दोन्हीही खूप चांगले सांभाळले आहे. आमच्या मुलीसारख्या सुनेलाही त्यानं चांगलं ठेवलं आहे. आम्ही दोघेही आता खूप थकलेलो आहोत. तेव्हा आता आमची सगळी property अंकुशच्या नावावर करायचं आम्ही ठरवलं आहे.`
आजोबांचं हे बोलणं ऐकून मात्र मी एकदम सावध झालो. मी त्यांना म्हणालो,
`माफ करा आजोबा, हा तुमच्या घरातील प्रश्न आहे. पण तरीही एक सांगावसं वाटतं. तुम्ही तुमचं सारं अंकुशच्या नावानं न करता तुमच्या सुनेच्या नावानं करावं असं मला वाटतं. असं मला का वाटतं ते मी सांगू शकत नाही, पण वाटतंय एवढं खरं...`
`ठीक आहे. विचार करतो,` असं म्हणून आजोबा-आज्जी माझ्या क्लिनिकच्या बाहेर पडले.
साधारण पंधरा-एक दिवसात मी क्लिनिकमध्ये शिरलो तेव्हा तेथे अंकुश बसलेला मला दिसला. पण नेहमीसारखा शांत न दिसता, कमालीचा उत्साही दिसला. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकलीच.
मी माझ्या केबिनमध्ये शिरताच नेहमीप्रमाणे अदबीने आत येऊ का? वगैरे न विचारता अंकुश माझ्या मागोमाग आत शिरला आणि माझ्या खुर्चीसमोरच्या खुर्चीवर बसता झाला. असं सारं त्यानं पहिल्यांदाच केलं होतं.
`मित्रा... माझं ध्येय पूर्ण झालं. इतक्या वर्षांच्या माझ्या कष्टांचं चीज झालं. म्हाताऱ्यानं सारं माझ्या नावावर केलंय. आता फक्त म्हाताऱ्यानं लवकर राम म्हटला पाहिजे. शाळेत करायचास तशी आता मला मदत कर. काहीतरी औषध दे आणि संपव या दोघाही म्हाताऱ्याना !`
मी जे ऐकत होतो त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. अंकुश अजिबात बदलला नव्हता. तो गेली काही वर्ष जे काही करत होता, जसं काही वागत होता, तो सगळा त्याचा अभिनय होता. त्याच्या पुढच्या सगळ्या बोलण्यातूनही मला सारा उलगडा झाला. त्यानं या कॉलनीतील लोकांचं व्यवस्थित निरीक्षण केलं होतं. बहुतेक लोकांकडे खूप पैसा होता. अनेक मंडळी ज्येष्ठ नागरिक होती. त्याच्या गळाला कोण लागतं एवढाच त्याच्यापुढे प्रश्न होता. एकूणच परिस्थितीने पिडलेले तपस्वी दाम्पत्य त्याच्या अगदी सहज गळाला लागले होते.
शाळेत असताना अंकुशला झिडकारून टाकणं जसं मला जमण्यासारखं नव्हतं, तसंच आत्ताही उघड उघड त्याला विरोध करणं मला शक्य नव्हतं. कारण आत्ता माझ्या समोर बसलेला अंकुश हा तोच पूर्वीचा अंकुश होता. अर्थात त्याच्या खुनशीपणात प्रचंड वाढ झालेला. त्याच्यातील राक्षस मला अगदी समोर साकार झालेला दिसत होता.
`अंकुश, मी एक डॉक्टर आहे. मला असं काही करणं शक्य नाही.` मी एवढंच बोललो. मग अंकुश त्यावर काहीही बोलला नाही. तो खूपच आनंदी मूडमध्ये होता. शिवाय त्याच्याकडे इतर काही पर्याय उपलब्ध असावेतच. नंतरही अंकुश अधून मधून माझ्याकडे येत राहिला. प्रत्येक वेळी त्याचे बोलणे माझ्यावर कमालीचे दडपण आणत होते. त्यानं आता आजोबा-आजींचा कमालीचा छळ चालवला होता. तो बायकोवर- वासंतीवरही हात टाकत होता. साधी-सरळ ही मंडळी त्याच्यातील अचानक समोर आलेल्या राक्षसाला पाहून अगदी घाबरूनच गेली होती. त्यानं इतका दरारा निर्माण केला होता, की या सगळ्याची कुठे वाच्यता करण्याचे धाडसही त्यांच्यात नव्हते. माझ्यासारखा तरणाताठा माणूस जर काही करू शकत नव्हता, तर त्यांच्याकडून अपेक्षाच चुकीची होती. त्यातल्या त्यात त्यानं या मंडळींना छळू नये यासाठी त्याला समजावण्याचा मी खूप, अगदी खूप प्रयत्न केला. पण ते सारं पालथ्या घड्यावर पाणीच ठरलं. या सगळ्याची त्याला याच आयुष्यात किंमत मोजावी लागेल, इतपत मी त्याला बोलून पाहिलं. पण काहीच उपयोग झाला नाही.
सारी estate त्याच्या नावावर केल्यानंतरच्या अगदी एका वर्षात या सर्व गोष्टींचं कमालीचं दडपण येऊन आजोबा-आजींनी हे जग सोडून दिलं. आता तर अंकुशला आणखीनंच मोकळं रान मिळालं. वासंतीच्या छळास पारावारच राहिला नाही आणि शेवटी ती साधी, सरळ मुलगी घर सोडून पळून गेली. अंकुशनं ही आनंदाची(?) बातमी मला येऊन सांगितली. त्याच्या मते, वासंतीनं नक्की कुठे तरी जाऊन जीव दिला असेल. मला कमालीचं वाईट वाटलं. अंकुश निघून जाताच मी क्लिनिक बंद करून बाहेर पडलो. आज हा सारा भूतकाळ माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. गलीतगात्र होऊन हा राक्षस माझ्या समोर पडला होता. मी त्याला म्हणालो,
`आज माझ्या गावी असलेल्या पत्नीला घेऊन येतो म्हणालो होतो न मी, आलीये आज ती बरोबर! ये गं...`
मी तिला आत बोलावलं.
अंकुशनं त्याही परिस्थितीत उत्सुकतेनं माझ्या मागे पाहिलं आणि आत आलेल्या स्त्रीकडे पाहून तो चपापलाच!
`वासंती???` त्यानं थक्क होऊन विचारलं.
`हो अंकुश, वासंती !` मी त्याला म्हणालो. ``त्या दिवशी ही पळून गेली आणि तू आनंदानं माझ्याकडे आलास. तू जाताच मी हिच्या शोधात बाहेर पडलो. तुझ्या आणि माझ्या अपेक्षेप्रमाणे नदीवरच्या पुलावर ही मला दिसलीच. जीव द्यायचं धाडस गोळा करीत होती. तुला आठवतं, त्यानंतर काही दिवस माझं क्लिनिक बंद होतं. कारण मी हिला घेऊन थेट गावी निघून गेलो होतो. पहिले एक-दोन दिवस ही प्रचंड भेदरलेली होती. पण मी तिच्याशी अगदी प्रेमानं संवाद साधून तिचं counselling केलं तशी ती अगदी भडभडा बोलायला लागली. तुझी पत्नी असूनही तू तिच्यावर अनेकदा केलेल्या पाशवी बलात्काराची कहाणी तिनं मला सांगितली. त्यातले अनेक प्रसंग ऐकून डॉक्टर असूनही माझ्या अंगावर काटा उभा राहिला. तुझ्या राक्षसीपणाचे अनेक किस्से तू स्वत: मला सांगितले असलेस तरी यातलं बरंच काही तू मला सांगितलं नव्हतंस. मी वासंतीला आश्वस्त केलं. पण तिला गावीच ठेवलं. तुला हे काही कळू दिलं नाही. कायदेशीर बाबीत अडचणीत येऊ नये म्हणून मी तिच्याशी विवाह मात्र करू शकलो नाहीये.
       देवभोळ्या, साध्या सरळ आजोबा-आजींना मारण्यासाठी तू मला औषध मागत होतास ना, मी तुझ्या बाबतीत तेच केलं. तू जेव्हा किरकोळ तक्रारींसाठी माझ्याकडे औषध घ्यायला येऊ लागलास तेव्हापासून मी तुझ्या औषधात असं काही मिळवत आलोय, की ज्यानं तुला तात्पुरतं जरी बरं वाटत असलं, तरी एकूण तुझ्या शरीरावर घातक परिणाम होणं सुरु झालं. मग तुझ्या तक्रारी वाढत गेल्या आणि तू माझ्याकडे येतच राहिलास. वासंती आणि आजी-आजोबांचा तू छळ करत होतास, तेव्हा तू जे काही करत आहेस, त्याची शिक्षा तुला याच जन्मी भोगावी लागेल, असं मी तुला समजावत असे, हे आठवतंय तुला? वासंतीची सगळी गाथा ऐकली आणि या तुझ्या शिक्षेसाठी देवावर अवलंबून न राहण्याचं मी ठरवलं. ही शिक्षा मीच तुला देण्याचं ठरवलं. तुझ्यातील राक्षसानं शेवटी माझ्यातील राक्षस जागा केला असं म्हटलंस तरी चालेल.
     लक्षात घे, आता तू कधीच अंथरुणावरून उठणार नसलास तरी तू लगेच मरणारही नाहीस. या अखंड आणि असह्य वेदना सहन करीत तुला आता पुढची अनेक वर्ष हा नरकवास भोगायचा आहे. तुझ्या हाता-पायातली ताकद तर संपलीच आहे, पण लवकरच तुझी वाचाही जाणार आहे. तुझी पत्नी या नात्यानं ही सगळी संपत्ती लवकरात लवकर वासंतीच्या नावानं होईल हे मी बघणार आहे. याच जन्मी तुला मरणयातना सहन कराव्या लागणार आहेत. अगदी २४ तास.``
     मी अगदी आवेशानं अंकुशला बोलत होतो आणि अंकुश माझं बोलणं शांतपणे ऐकत होता. सध्या वाचा गेलेली नसूनही तो यावर काहीच बोलला नाही. तशीही काही बोलण्याची ताकद त्याच्या शिल्लक नव्हतीच. माझ्याही मनात साठलेला इतक्या वर्षांचा संताप, आक्रोश आज बाहेर पडत होता आणि माझ्या मागे उभी असलेली वासंती पूर्वीइतक्याच साधेपणाने हा सारा संवाद ऐकत उभी होती.

बा. स कुलकर्णी

गुरुवार, १४ ऑगस्ट, २०२५

2189. एन्काऊंटर

 ************
तिचा मुलगा व ती पेढ्याचा बॉक्स घेऊन माझ्या घरी आ घले. मी कमरेला टॉवेल गुंडाळून हॉलमध्येच चटईवर पडून पडून टीव्हीवर चित्रपटशा बघत होतो. चित्रपटाचे नाव होते "हम दिल दे चुके सनम"..... आणि ओट्यावर खुर्ची टाकून माझी बायको किशोर शांताबाई काळे लिखित  "कोल्हाट्याचं पोर" हे पुस्तक वाचत बसली होती. ती दारात येताच माझी बायकोला आश्चर्याचा पण सुखद धक्का बसला.आणि मला म्हणाली अहो ! ऐकता का, आपल्या बाजूच्या सुवर्णा मॅडम आपल्या कडे आल्या आहेत ! मला वाटलं माझी बायको माझी मस्करी करत असेल. पण त्या दोघीचा आवाज ऐकला आणि मी पटकन टॉवेल कमरेला गुंडाळून उठलो आणि मागच्या खोलीत  पळत गेलो.माझ्या काळपट तोंडावर  डव साबण लावून पाणी मारले व चालूच इस्त्री केलेली पॅंट घालून हाँलमध्ये आलो. तोपर्यंत माझ्या बायकोने तिला बसायला प्लास्टिकची खुर्ची दिली होती.  अजुन मी घरात फर्निचर बनवले नव्हते. फक्त एक लोखंडी कपाट होते आणि त्यातही माझ्या वाचनाची पुस्तके ठेवलेली होती. खरं म्हणजे फर्निचर बनविण्यासाठी मी ग.स. बँकेतून कर्ज घेण्यासाठी अर्ज केला होता. पण विद्यमान संचालक मंडळाने करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केल्यामुळे प्रशासक बसला होता. आणि बँकेत ठणठणाट झाल्यामुळे माझं फर्निचर बनवायचं स्वप्न दुभंगलं होतं..... ती आज पहिल्यांदाच माझ्या घरी आली म्हणून त्या प्लास्टिकच्या खुर्चीवर बसून ती इकडे तिकडे माझ्या घरभर नजर फिरवीत होती.  तिच्या बंगल्यात आणि माझ्या घरात मनातल्या मनात तुलना करत होती. तुलनेत तिने माझी किमत केल्याचं स्पष्ट तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं. तिने मला तिच्या हाताने माझ्या हातात केसरी पेढा ठेवला.व तिच्या मुलाने माझ्या बायकोच्या हातात पेढा दिला.  मावशीचे पाया पडुन घे राज्या ! तिच्या मुलाने माझ्या बायकोच्या पायांना स्पर्श करीत आशिर्वाद घेतला. मग ती माझ्या बायकोबरोबर गप्पा करायला लागली. मी समोरच असलेली खाट घरात आणली व त्यावर बसत तिच्या मुलाला जवळ बसविले. तेवढ्यात तिच्या ओठातून शब्द बाहेर पडले..... आज दहावीचा निकाल होता ना ! आमच्या राजा बेटाने  शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. आणि ९७ टक्के गुण मिळवले. मी तिच्या मुलाच्या डोक्यावर हात फिरवून पाठीवर शाबासकीची थाप दिली आणि मनापासून अभिनंदन,कौतुक केले. तोच तिचा पुढचा प्रश्न ओठातून निघाला..... तुमचा मुलगा सुद्धा दहावीला होता ना ? मग त्याच्या निकालाचं काय झालं ? तो काही दिसत नाही घरात ? तिच्या या नाजूक प्रश्नामुळे माझ्या बायकोला थोडं अवघडल्यासारखं झालं.  तीनं माझ्या कडे नजर टाकत आपल्या मानेला चोळत चोळत म्हणाली हो हो तो पण गेला आहे निकाल घ्यायला..... येईलच एवढ्यात !  माझ्या बायकोनं तिच्यासाठी दुधात पाणी न टाकता चहा ठेवला..... तितक्यात माझं कारटं त्याच्या मित्रांसोबत जोरजोरात गप्पा हाणत घरात घुसलं.....आणि थेट किचन रुममध्ये गेलं ! माठावरचा ग्लास माठात बुचकवून घटा घटा दोन ग्लास पाणी प्याला. त्याचे मित्र माझ्या खाटेजवळ उभे राहिले. ती अतिशय बारकाईने त्यांचं निरीक्षण करत होती. माझ्या कारट्याच्या चेहरा घामाने डबडबलेला होता.तो घामाळलेला चेहरा त्याच्या आईच्या गळ्यात असलेल्या ओढणीला त्याने पुसला..... माझं कारटं तिच्या मुलाच्या पाठीवर थाप देत म्हणालं अभिनंदन दोस्ता..... जिल्ह्यात पहिला आलास.....I proud of you.  मी त्याच्या इंग्रजी बोलण्याकडे बघतच राहिलो. माझा कारटा तिच्या पायांना स्पर्श करत म्हणाला आई ! मला आशीर्वाद द्या पुढच्या शिक्षणासाठी ! तिने त्याच्या बोलण्याकडे लक्ष न देता सरळ प्रश्न केला..... किती टक्के गुण मिळाले रे तुला ? 
   माझं कारटं हसतच म्हणालं.....माझ्या बाबांपेक्षा जास्त ! माझ्या बाबांना दहावीला ६४% टक्के गुण होते. आणि मला ८९% टक्के गुण मिळाले. आणि राक्षसा सारखा हसला..... हा हा हा.....ती व तीचा राजा बेटा माझ्या कारट्याच्या चेहऱ्यावर असलेला आनंद न्याहाळत होते. त्याचे मित्रही लैच खूष दिसत होते. त्याच्या मित्रांपैकी एकाला ७१, दुसऱ्याला ६५ आणि तिसऱ्याला ८० टक्के गुण मिळाले होते.माझ्या मुलाने लगेचच त्याच्या आईकडून शंभर रुपये मागितले..... त्याच्या मित्रांना पाणी पुरीची पार्टी देणार होता तो ! तो सुद्धा त्याच्या सरकारी शाळेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता. तिने माझ्या मुलाला प्रश्न केला..... पुढे काय करणार आहेस ? माझा मुलगा हसतच म्हणाला मँकेनिक डिप्लोमा करणार त्यानंतर कम्प्युटर मध्ये बी.ई.करणार आणि बी.ई.झाल्यावर माझ्या बापाची शेती करणार ! एवढं बोलून तो लगेचच घराबाहेर पडला.आणि मित्रांसोबत सायकल घेऊन पाणीपुरी खायला निघून गेला. तेवढ्या वेळात माझ्या बायकोने एकदम स्पेशल चहा केला होता. खास तिच्यासाठी !.....मी तिच्या बाळाला प्रश्न केला तू काय करणार आहेस बेटा पूढे ? तो म्हणाला मम्मी पप्पा सांगतील तेच मी करणार आहे. तेवढ्यात तिच्या ओठातून शब्द बाहेर आले. त्याला बारावी करायची आहे. बारावी नंतर हैदराबाद किंवा दिल्ली येथे आयटी साठी पाठवायचे आहे. आणि जेईई च्या परीक्षेच्या तयारी साठी त्याला राजस्थान येथील कोट्टा येथे क्लासेस लावायचे आहेत.कोटाच्या क्लासमुळे त्याला बारावीला ९९%टक्के गुण मिळतीलच अशी आम्हाला खात्री आहे. मी तिच्या बोलण्याकडे टक लावून लक्ष देत होतो. तिचा मुलगा तिच्यासारखाच कोमल आणि नाजूक होता. त्यातल्या त्यात अतिशय सोज्वळ होता. थोड्याच दिवसात तिचा मुलगा कोटाकडे निघाला. त्याला पोहचविण्यासाठी ती, तिची छकुली,तिचा भाऊ व तिचे पतीदेव सारेच जण गेलेत स्वतःच्या फोर व्हीलने गेले. दोन लाख रूपये क्लासेसची फी,खाण्याचे व रहायचे वेगळे असे करून वर्षाला चार पाच लाखाचा खर्च म्हणाली होती ती ! माझं कारटही निघालं होतं नाशिकच्या गव्हर्नमेंट पाँलिटेक्निक कालेजात मँकेनिक डिप्लोमा शिकायला .....हळूहळू एक वर्ष पूर्ण झालं.माझं कारटं पहिलं वर्ष डिप्लोमा पास झालं.त्याची आई अधूनमधून नाशिकला त्याला भेटायला जायची. माझ्या कारट्याची मावशी नाशिकच्या आंबेडकर नगरमध्ये रहायची ती नेहमीच त्याचे पालक म्हणून कालेजात भेट द्यायची. मी मात्र एकदाच गेलो त्याला भेटायला. कारण माझं पूर्ण शिक्षण बोर्डिंग आणि वसतिगृहात झालं पण माझा बाप एकदाच मला भेटायला आला होता. माझ्या बापाचा बदला मी माझ्या कारट्या कडून घेत होतो.
   मी माझ्या मुलाच्या शिक्षणाच्या बाबतीत निश्चिंतं झालो होतो.पण तिची काळजी दिवसेंदिवस वाढतच होती. तिच्या मुलाचं बारावीचं वर्ष म्हणून ती मुलाला सारखा फोन करायची.महिन्यातून एकदा पतिदेवांसोबत कोट्याला जायची.त्याच्या आरोग्याविषयी विशेष काळजी घ्यायला सांगायची.आणि क्लासेसचं सांगाल तर तिच्या मुलाच्या चाचणी परीक्षेचे गुण तिला फोनवर मेसेज द्वारे कळत होते. तिचा मुलगा प्रत्येक विषयात ९५,९७,९८ गुण मिळवत होता. गणितात तर तो शंभर पैकी शंभर गुण मिळवत होता. ती रात्री गच्चीवर जाऊन त्याच्याशी फोनवरून बोलायची.मी माझ्या ओट्यावर बसून ऐकत रहायचो.ती म्हणायची तू अजून अभ्यास कर,मन लावून अभ्यास कर.....तुझ्यासाठी किती खर्च करीत आहोत आम्ही. प्रत्येक विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळाले पाहिजेत.आयटी साठी किती स्पर्धा आहे तुला माहिती आहे का? अठरा अठरा तास अभ्यास कर .तिच्या मुलाने तिच्या आज्ञेचं पालन करीत खूप अभ्यास केला.तिच्या मुलाला अभ्यास करून करून पाठीला वाक आला होता. माझं कारटं दुसऱ्या वर्षाला काँलेजला दांड्या मारायला लागलं होतं.प्राध्यापकांशी हुज्जत घालत होतं,प्रक्टीकल बुडवत होतं, विद्यार्थी संघटनेत सहभागी होत होतं.मित्रांसोबत कधी हाटेलात बिऱ्याणी खात होतं तर कधी सिगारेट फुकत होतं..... एकदा तर त्याच्या मित्रांशी पैज लावून दारु पिऊन चक्क मला फोन केला. म्हणतो कसा बाबा आज मी ड्रिंक घेतली आहे. आणि आय लव यू बाबा..... तूम इन्सान नही, इन्सान के रुप मे खूदा हो..... माझ्या कारट्याला त्याच्या आईने अँन्ड्राईड मोबाईल घेऊन दिला होता. त्याच्यावर स्टेट्स ठेवलं होतं.....जिंदगी का सफर युही कटता चला खुशीसे......मेरे हिसाबकी मुश्कीले भी मेरे वालिद उठाते रहे.....त्याचं स्टेटस वाचून आपण बाप आहोत याची जाणीव व्हायची .
 पण दारुच्या बाबतीत विचार यायचा सालं ज्या गोष्टीला मी कधी स्पर्श केला नाही ते माझा कारटा वयाच्या अठराव्या वर्षी करत आहे..... पण ह्रदयावर हात ठेवीत मी आल इज वेल आल इज वेल म्हणून स्वतःलाशांत केले.
   बारावीच्या परीक्षा होऊन निकाल जाहीर झाला . तिच्या मुलाला ९५%टक्के गुण मिळाले. तिच्या घरात स्मशान शांतता होती. मी पेढ्याची वाट बघत होतो आणि तिचीही. या दोन वर्षात परत ती माझ्याशी एक शब्द सुद्धा बोलली नव्हती. ती तिच्या मुलावर भयंकर रागावत होती. तिने त्या मुलाला धारेवर धरले होते. "तू आमचा अपेक्षा भंग केला आहेस, आणि असाच जेईई ला पण आमचा अपेक्षा भंग करशील. आम्ही केलेला एवढा खर्च वाया जाणार ,तू आम्हाला खाली मान घालायला लावणार, लोक आमच्यावर हसतील. नातेवाईक काय म्हणतील?दहावीला सत्त्याण्णव टक्के होते, बारावीला रिव्हर्स झाला. आम्ही काय तोंड दाखविणार "..... ती त्याला टार्चर करत होती. आणि तो सुन्नपणे तिच्याकडे बघत होता. त्याचा पप्पा ज्याच्या नावातच विनय होता तो एक शब्द त्याच्या बायकोला बोलला नाही..... ती रात्री जेवली नाही म्हणून घरात कुणीच जेवले नाही. एकमेकांना न बोलता जो तो ज्याचा त्याचा रुममध्ये गेले. ९७ चे ९५ झाले म्हणून तिच्या घरात दुखवटा झाला होता. तिचा मुलगा त्याच्या बेडरूममध्ये गेला. त्याचा बेडरूम म्हणजे अतिशय आकर्षक पीओपी केलेला. लाल ,निळे पिवळे,दूधी अशा प्रकाश देणाऱ्या  विद्युत दिव्यांनी सजवलेली ती बेडरूम.
   सकाळ झाली होती आज रविवार होता. सुटीचा दिवस असतांना सुद्धा कधी नव्हे एवढा आवाज तिच्या घरातून येत होता. माझी बायको मला म्हणाली..... अहो ! बघा तर,कशाचा आवाज होतोय तो?  मी तसाच टावेल कमरेला गुंडाळत पायात चपला न घालता  तिच्या घराकडे पळालो.वीस वर्षांत पहिल्यांदा तिच्या घरात मी प्रवेश करत होतो. तिच्या पतीला आरडाओरड करण्याचे कारण विचारले तर ती म्हणाली सकाळपासून माझ्या मुलाने दरवाजा उघडला नाही. आणि आम्ही आवाज देतो तर तिकडून काही एक प्रतिसाद येत नाहीये. मी त्यांना धीर दिला आणि दरवाजा तोडण्याची तयारी केली.  तो दरवाजा अतिशय भक्कम होता. तिने तिच्या मुलाच्या सुरक्षिततेसाठी पिवर सागाच्या लाकडाचा दरवाजा बनविला होता.आणि दरवाज्याला मेड इन जर्मनीचे लोखंडी कडी कोंडे बसविले होते त्यामुळे ते तुटता तुटत नव्हते. शेवटी आम्ही तीन चार जणांनी तीन तासाच्या प्रयत्नांनी तो दरवाजा तोडला. तिचा मुलगा त्या बेडरूममधील आरामदायी बेडवर निपचित पडला होता. तोंडातून फेस येत होता. त्याचा जीवनाचा प्रवास त्याने येथेच पूर्णविराम देऊन थांबविला होता. तिने त्या मुलाला बघताच टाहो फोडला आणि छाती ठोकू लागली. विनय सर नेहमीप्रमाणे मुकपटातल्या नायका सारखे भिंतीला पाट लावून बसले होते. त्या मानसशास्त्र शिकविणाऱ्या सरांनी आपली मान दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये घातली होती आणि त्या महागड्या फ्लोरींगवर आपले कवडीमोल अश्रू गाळीत होते. बाजूलाच त्या मुलाचा स्टडी टेबल होता .त्या स्टडी टेबलावर त्याच्या सुंदर अक्षरात त्याच्या मम्मीसाठी अखेरचा निरोप सोडला होता.
      प्रिय मम्मी,
          मला माफ कर मी तुझ्या नव्व्याणव ते शंभर टक्के पाडण्याच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही. पण मम्मी हे गुण मला का पडले नाही तर मी मध्यरात्री पर्यंत विचार केल्यावर मला त्याचं कारण गवसलं.....कोट्याच्या या आख्ख्या दोन वर्षात मी एकेदिवशी मित्रांसोबत एक चित्रपट बघितला कदाचित त्यामुळे माझा एक मार्क कमी झाला असेल..... या दोन वर्षात मी एकदा मित्रांसोबत एन्जॉय म्हणून फिरायला गेलो होतो त्याचा एक मार्क कमी झाला असेल..... मम्मी, मी तुला कधीच सांगितलं नाही गं.....माझ्या क्लासमधील मुळची राजस्थानचीच असलेली 'रुक्सार' मला बघून एकदा हसली होती. त्यामुळे संपूर्ण एक रात्र तिच्या हसणाऱ्या चेहऱ्याला पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर आणून घालविली होती कदाचित त्याचा पण एक मार्क कमी झाला असेल..... एकदा किनी मम्मी मी  हातगाडीवरची पाणीपुरी आणि वडापाव खाल्ला होता. त्याची चव लैच झ्याक होती. आणि मी त्या दिवशी तुला फोनवर सांगितले पण तू फार रागावली होतीस. आणि म्हटली होतीस की,बाहेरचं खात नको जाऊ,पोट खराब होतं,अभ्यासावर परिणाम होईल! या विचारातच माझी रात्र गेली कदाचित त्याचाही एक मार्क कमी झाला असेल..... आणि मम्मी, मी एक दिवस ठरविलं होतं की, क्लासला दांडी मारून कोट्टा शहर बघावं म्हणून मी दांडी मारलीच आणि एकटाच आनंद घेत फिरलो. कदाचित त्यामुळे एक मार्क कमी झाला असेल.....मम्मी, तुझी शप्पथ घेऊन सांगतो गं !  हे पाच दिवस सोडले ना ,तर मी संपूर्ण दोन वर्षे फक्त आणि फक्त अभ्यासच केला आहे. मम्मी, अशी नाराज होऊ नकोस  गं ! खरचं तू माझ्यावर खूप खर्च केलास त्याबद्दल तुझा आणि पप्पांचा आभारी आहे.
   मम्मी, जाता जाता तुला एक गोष्ट सांगाविशी वाटते.....ते आपले बाजूचे काका आणि मावशी आहेत ना ! ते त्यांच्या मुलाला काहीच सांगत नाही गं,त्यांची त्यांच्या मुलांकडून मोठी अपेक्षाही नाही. हां ते त्यांच्या मुलांवर खूप रागावतात ,कारण तो रात्र रात्र जागरण करुन पबजी खेळतो,दिवसभर झोपतो. परंतु मम्मी त्याला थोडेसे जरी यश मिळाले तरी त्यांचं कुटुंब त्याचा यशाचा किती एन्जॉय करतात गं ? मम्मी त्यांच्या मुलांवर त्यांचं रागावणं म्हणजे ते मुलांची काळजी करणारं असतं.....त्या रागावण्यात कुठल्याच अपेक्षा नसतात, कुठलाही हिशोब नसतो,त्यांना खाली मान घालायची भिती नसते, कोण काय म्हणेल याच्याशी त्यांचं देणघेणं नसतं, नावं ठेवणाऱ्यांचा उद्देश ते तपासून बघतात.
    माझी प्रिय प्रिय मम्मा,
       तू त्या शेजारच्या काकांची फेसबुक फ्रेंड आहेस ना ! मी पण त्या काकांचे लिखाण तुझ्या अकाऊंटवर वाचत होतो. त्यांचं जीवन ते कसं स्पष्टपणे जगासमोर मांडतात. त्यांना त्यांच्या भूतकाळाविषयी कमीपणा वाटत नाही, भविष्यकाळा विषयी तर सांगायलाच नको. आणि वर्तमान तर तू त्यांच्याकडे कधी बघितलच नाहीस तर तुला कळेल कसं गं ?.....त्यांचं जीवन स्पष्ट आहे आणि आपलं काय आहे ते नेमकं कळत नाही ?..... आणि जे जीवन कळत नाही नां मम्मी ! त्याला जगून आणि भोगून काय उपयोग गं ?
    मम्मी,
    तुला आणि पप्पांना चांगला महिन्याला दीड दोन लाख पगार घरात येत असतांना सुद्धा तुम्हाला नीट झोप येत नव्हती.म्हणून डोक्याला शांतता मिळावी म्हणून तुम्ही झोपेच्या गोळ्या घ्यायचे.मम्मी, जसा मी शाळेत जायला लागलो तसं तू मला अभ्यास अभ्यास आणि अभ्यास कर असचं सांगत आलीस ! त्यामुळे माझं डोकं पुरतं अशांत झालं आहे. त्या डोक्याला शांत करण्यासाठी तुझ्या त्या डबीतल्या गोळ्या नाश्त्यासारख्या खाल्ल्या.आणि डोकं कायमचं शांतं केलं.
     मम्मी,
    मला जर भगवंताने पुढचा जन्म मानवाचा दिला तर मी सपशेल नकार देणार आहे. कारण मला  माणसाच्या जन्मापेक्षा भुंगा व्हायला आवडेल ! फुलपाखरू व्हायला आवडेल ! मधमाशी व्हायला आवडेल,समुद्राच्या खोल खोल अतिशय खोल पाण्यात पोहणारा मासा व्हायला आवडेल! कारण हे कमी कालावधीच्या आयुष्यात खूप सारा आनंद उपभोगतात.मलाही तसचं स्वच्छंदी, निर्विकार, जीवन जगायचं आहे. पुढच्या जन्माण अपेक्षापुर्तीचं ओझं वाहणारं जीवन कधी, कधी, कधीच नको आहे. बस थांबतो...... कायमचाच......
           तुझाच 
           आयुष
    मी ह्या भावनांनी भरलेलं पत्र वाचून विनय पाटलाच्या हातात दिलं. आणि त्यांच्या बंगल्यावर खकारुन थुंकलो.....जिची कांती बघून माझी शांती भंग व्हायची आज ती मला अतिशय कुरूप आणि विद्रूप भासत होती. तिच्याकडे बघायची माझी अजिबात इच्छा नव्हती परंतु आज मी अखेरचे तिच्याकडे घृणास्पद नजरेने क्षणभर बघितले आणि दिर्घश्वास घेऊन तिला बोललो.....साले ,तुम्ही कशाचे आईवडील रे ! तुम्ही तर एन्काऊंटर स्पेशालिस्ट आहात ! जे अपेक्षा पुर्तीसाठी अनेक रूपात, अनेक बंगल्यात, स्वत:चेच मुलांचे एन्काऊंटर करतात..... आणि माझ्या कानात एकच आवाज भणभणायला  लागला.....एन्काऊंटर..... एन्काऊंटर..... एन्काऊंटर.....
✍️

2188. नात्यात आदर आणि आपुलकी

 "स्मिता... लॉकरच्या चाव्या कुठे आहेत?" भावेशने कठोर स्वरात विचारले.  
स्मिता म्हणाली, "आज अचानक तुम्हाला लॉकरच्या चाव्यांची काय गरज पडली?"  
"ते तुमचं विषय नाही... चाव्या द्या..."  
"आज सकाळी-सकाळी अशा रागाने बोलण्याचं कारण?"  
"कारण तू उत्तम प्रकारे जाणतेस, स्मिता... मी घरातील छोट्या गोष्टींत ढवळाढवळ करीत नाही, पण ज्या गोष्टीसाठी मी मनाई केली असेल, त्याचं उल्लंघन मी सहन करत नाही, हे तुला माहीत आहे... तरीही तू..."  
"पण त्यात असं काय आकाश कोसळलं, की तुम्ही तुमच्या पत्नीशी असं वागता?" स्मिता म्हणाली.  
"स्मिता, एखाद्या माणसाचा इतिहास न जाणता, कोणताही निर्णय घेऊ नये."  
"तुला माझ्या आईबद्दल काय माहीत आहे?"  
"माझी आई स्वर्गवासी झाल्यानंतर मी तिच्या पितळाच्या थाळीत, वाटीत आणि चमच्यातून जेवायचो — ते तुला आवडत नव्हतं. तू वारंवार म्हणायचीस की ती कचऱ्यात देऊन टाक. तुझ्या दृष्टिकोनात ती फक्त जुन्या थाळ्या-वाट्या होत्या."  
"मी तुला स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की तू या भांड्यांबद्दल कोणताही निर्णय घेऊ नकोस, तरीही तू ती थाळी, वाटी आणि चमचा कचरा विक्रेत्याला विकलीस?"  
"जर तुला माझ्या आईची थाळी आवडत नसेल, तर तिच्या जुन्या दागिन्यांवरही तुझा काही हक्क नाही. चाव्या दे, ते दागिने मी कुठल्यातरी गरीबाला दान करू इच्छितो."  
स्मिता फक्त बघतच राहिली.  
तेवढ्यात आतून मुलगा श्याम आला, "पप्पा, तुम्ही इतके रागावलेले कधीच दिसत नाही, आज काय झालं?"  
मी डोळ्यात पाणी आणून म्हणालो, "तुझ्या आजी आणि माझ्या आईची एक आठवण तुझ्या आईने कचऱ्यात विकली — आणि तेही मी स्पष्टपणे मनाई केल्यानंतर."  
"पण पप्पा, ती तर फक्त एक थाळी..."  
"मुला, जर तिचा इतिहास जाणून घ्यायचा असेल, तर चल आज गावाला जाऊया... आज मी ऑफिसला जाणार नाही."  
मी, श्याम आणि स्मिता — तिघेजण कारमध्ये बसून गावाच्या दिशेने निघालो.  
गावातील मंदिराजवळ कार थांबवली, आत गेलो. तिथे पंडित पंड्या दादा धावत आले, "अरे भिखा, तू!"  
स्मिता आणि श्याम हबकून गेले — एका मोठ्या कॉर्पोरेट कंपनीचा जनरल मॅनेजर, ज्याचा पगार दोन लाख रुपये महिना — त्याला कोणी "भिखा" म्हणावं?  
मी पंडितजींचे पाय धरले.  
ते म्हणाले, "खूप मोठा माणूस झालास बेटा..."  
मी म्हटलं, "सर्व आई आणि भगवंताची कृपा आहे."  
आम्ही मंदिरात दर्शनासाठी गेलो. पंड्या दादा म्हणाले, "जेवण न करता जाऊ देणार नाही."  
त्यांनी विचारलं, "बा सोबत नाही आल्या?"  
माझे अश्रू पुसताना पाहून ते समजले.  
म्हणाले, "तुझ्या आईमध्ये विलक्षण आत्मविश्वास होता. जास्त शिकलेली नव्हती, पण तुझं पालनपोषण वडिलांशिवाय केलं... असा कोणताही बापदेखील करू शकणार नाही."  
नंतर त्यांनी माझ्या कुटुंबियांना सांगितलं, "भिखाचं खरं नाव भावेश आहे. पण गावात सगळे त्याला 'भिखा' म्हणत. माहीत आहे का कारण?"  
"शांता बाईंची तीन मुलं जन्माला येताच मरत असत. चौथ्यांदा हा भावेश जन्माला आला, तेव्हा आईनं मन्नत मानली की तिचा मुलगा दीर्घायुषी जगावा, तर ती आयुष्यभर चप्पल घालणार नाही आणि एक वर्षभर पाच घरांतून भीक मागेल."  
"उन्हाळा, हिवाळा, पावसाळा — नागवे पाय — भीक मागून मुलासाठी अन्न जमवणं हे काही सोपं काम नव्हत."  
"भिखा वाचला खरा, पण एक वर्षानंतर त्याचे वडील निधन पावले. त्या नाजूक काळातदेखील शांता बाईंनी हार मानली नाही."  
"गावचं सगळं काम करीत, आणि मुलाला मंदिरात शिकायला सोडून जाई."  
"तिचं स्वप्न होतं — माझा मुलगा मोठा साहेब व्हावा."  
मी सारखा रडत होतो. माझा मुलगा श्यामदेखील आजीच्या गोष्टी ऐकून रडू लागला. पत्नी स्मिता हात जोडून म्हणाली, "मला माफ करा भावेश... आईला समजून घेण्यासाठी दहा जन्मही कमी पडतील..."  
भावेशने चेकबुक काढली आणि पंड्या दादांना म्हणाला, "ही दोन चेक आहेत — एक लाखाचा मंदिरासाठी, एक लाख तुमच्यासाठी. पण खरं काम अजून बाकी आहे..."  
"आई ज्या पाच घरांतून भीक मागायची, त्या घरांकडे चलो..."  
पंड्या दादांनी मला ती पाचही घरं दाखवली. मी प्रत्येक घरातील वृद्ध व्यक्तीचे पाय धरले आणि प्रत्येकाला एक-एक लाखाचा चेक दिला.  
परत जाताना पंड्या दादा म्हणाले, "बेटा, लोक तेरावी, अस्थिविसर्जन करतात... पण आज तू तुझ्या आईला खऱ्या अर्थानं मुक्त केलंस. तुझ्यासारखा मुलगा प्रत्येकाला मिळावा..."  
आम्ही परतायला निघालो. घराजवळ भांड्यांची दुकान आली तेव्हा स्मिताने कार थांबवली, दुकानात गेली आणि थोड्या वेळानंतर बाहेर आली.  
तिच्या हातात आईची तीच पितळाची थाळी, वाटी आणि चमचा होती.  
स्मिता म्हणाली, "काल मी हे येथेच विकली होती, आज पुन्हा विकत आणली... जर हे भांडं विकले गेले असते, तर मी माझ्याच मनाला कधीच माफ करू शकले नसते."  
"भावेश, मला क्षमा करा... मी इतकी क्षुद्र आणि अक्षम ठरले की या भांड्यांचं मूल्य समजू शकले नाही."  
"स्मिता, मी क्षमा करणारा कोण असतो? मी फक्त हे समजावण्याचा प्रयत्न केला की भावनांचे नाते किती खोल असतात."  
"ठीक आहे, पण एक अट घेऊनच गाडीत बसेन — आता पुढे मी याच भांड्यातून जेवण करेन. हीच माझी प्रायश्चित्त आहे."  
भावेश म्हणाला, "माझ्यासाठी एवढंच पुरेसे आहे की तुला तुझी चूक समजली. तू खाऊनस का मी, हे महत्त्वाचं नाही... महत्त्वाचं हे आहे की काहीही झालं तरी आपल्या नात्यात आदर आणि आपुलकी टिकून राहावी."  
"प्रेमाचं बंधन इतकं मजबूत असावं, की कोणी ते तोडायला आलं तर तोच मोडून पडावं..."  
जर या सत्यकथेने तुमचे डोळे आर्द्र केले असतील... तर ती नक्की पुढे पाठवा. 🙏  
भारतात १०.३८ कोटी वृद्ध आहेत...  
आपण आपल्या संस्कृतीचे जितकेही गुणगान करू, पण वृद्धांचा आदर आणि काळजी घेण्यात आपण अनेक देशांपेक्षा खूप मागे आहोत.  
🔸 ८०% वृद्ध पालकांना वेगळे बसवून जेवण दिले जाते.  
🔸 २०% पालकांना सोयी असूनही सुनांच्या भीतीने वेगळे ठेवले जातात.  
🔸 ९०% मुलगे कामावरून येऊन मुलांना मिठी मारतात, पण आई-वडिलांना "कशे आहात बाबा?" असंदेखील विचारत नाहीत.  
🔸 ७०% वृद्ध काही बोलले तर "तुम्हाला काय समजतं?" असं म्हणून चुप करवले जाते.  
🔸 ९०% वृद्ध पालकांना पैशांसाठी विनवावे लागते — जणू भीक मागत आहेत.  
जे कराल, ते भोगाल.  
अनेक घरांमध्ये हे पिढ्यान्पिढ्या चालत आले आहे.  
वृद्ध पालक विव्हळत जगतात — जणू प्राण्यांपेक्षाही वाईट अवस्था.  
अशा कुटुंबात संस्कार, सभ्यता आणि शिक्षणाची जबरदस्त कमतरता असते.  
विचार करा... समजून घ्या, तरुणहो...  
६० वर्षे पती-पत्नी एकत्र जगतात. जेव्हा एक जातो, तेव्हा दुसऱ्याचे संपूर्ण जीवन एकटेपणाने भरते.  
बालपणीचे भाऊ-बहीण, नातेवाईक, मित्र — एकेक करून सगळे निघून जातात.  
शिल्लक राहतो फक्त एकटेपणा आणि ओझे वाटणारं जीवन.  
शरीर साथ देत नाही.  
ऐकू येत नाही. बदलती भाषा, तंत्रज्ञान, फॅशन, संस्कृतीशी ताळमेळ बसत नाही.  
सगळंच ओझे वाटू लागतं...  
आणि अशा वेळी जर मुलगे-सुना नालायक ठरले... तर जीवन नरक बनतो.  
अशा क्षणी मुलांनी आपल्या बालपणाची आठवण करून घ्यावी.  
ज्यांनी चालायला, बोलायला, जेवायला शिकवलं... जग दाखवलं... त्यांच्यासाठी आज इतके निर्दयी का?  
पालकांना दुर्लक्ष करून कोणी सुखी झालेले नाही — न कधी होणार.  
जर वृद्धांची सेवा करू शकत नसाल, तर कमीतकमी त्यांचा अपमान तर करू नका.  
"कशी आहेस आई? कसे आहात बाबा?" — हे चार शब्दसुद्धा त्यांना अत्यानंद देऊ शकतात.  
हा लेख तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या प्रियजनांना नक्की पाठवा.  
🙏🏻🙏🏻🙏🏻 धन्यवाद.

2187. ताटात वाढलेलेलं भविष्य

 ती पहाटेची वेळ... सुमारे पाच वाजता सगळी गल्ली अजूनही गाढ झोपेत असायची  आणि मी मात्र माझ्या घराच्या गॅलरीत फेरफटका मारत असायची.
पेपरवाला द्देखील याच वेळेला सायकलच्या घंटीबरोबर माझ्या दारासमोरून जायचा, आणि दरवेळी म्हणायचा,
“नमस्कार मॅडम !”
हळूहळू वेळ बदलत गेली आणि माझी दिनचर्याही.
आता मी सकाळी सातला उठू लागले.
कदाचित काही दिवस मी त्याला न दिसल्याने चकित झाला असेल.
एक रविवार, तो सकाळी नऊ वाजता माझ्या घरी आला.  चेहऱ्यावर काळजी होती, पण बोलण्यात आदर.
"मॅडम," त्याने हात जोडत सांगितले,
"एक गोष्ट सांगू का?"
मी हसून म्हटले,
"नक्की, बोला."
तो म्हणाला,
"तुम्ही सकाळी लवकर उठणं का बंद केलंत?
मी रोज गांधी मार्गावरून सर्वात आधी तुमच्यासाठी पेपर उचलतो आणि विचार करतो, 'मॅडम वाट पाहत असतील'.
म्हणून सर्वात आधी तुमचंच घर गाठतो."
मी थोडीशी  आश्चर्यचकित झाले:
"तू एवढ्या लांबून येतोस?"
"हो मॅडम, तिथूनच वितरण सुरू होतं."
"मग तू झोपेतून किती वाजता उठतोस?"
"अडीच वाजता. सव्वा तीनपर्यंत तिथे पोचतो.
सातपर्यंत सर्व पेपर वाटून घरी जातो, थोडा वेळ झोपतो आणि मग दहाला दुसऱ्या कामावर निघतो...
मॅडम! मुलं मोठी करायची आहेत, शिकवायचं आहे... करावंच लागतं."
त्याचं समर्पण ऐकून मी निशब्द झाले.
फक्त एवढंच म्हणू शकले,
"ठीक आहे, मी तुझी गोष्ट लक्षात ठेवीन."
काही वर्षे लोटली...
पंधरा वर्षांनंतर, तो पुन्हा एके सकाळी माझ्या घरी आला.
हातात एक सुंदर आमंत्रणपत्रिका होती.
"मॅडम! मुलीचं लग्न आहे... सगळ्यांसह जरूर या."
मी कार्ड पाहिलं...
एक डॉक्टर मुलगी, एक डॉक्टर जावई.
आश्चर्याने विचारलं,
"तुझी मुलगी?"
तो हसला, आणि म्हणाला:
"काय बोलताय मॅडम! हो, माझीच मुलगी. तीने एमबीबीएस केलंय. आणि जावईही एमडी आहे.
आणि मुलगा? तो इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षात आहे."
त्याचा साधेपणा आणि यश बघून काही क्षण मी स्तब्ध झाले.
"आता निघतो, मॅडम … अजून खूप कार्डं वाटायची आहेत."
तो गेला...
पण माझ्या मनात एक वेगळंच भावचक्र सुरू झालं होतं.
---
दोन वर्षांनंतर तो पुन्हा भेटला.
"मुलगा आता जर्मनीमध्ये काम करतोय," असं अभिमानाने सांगितलं.
मी थोडं कुतूहलाने विचारलं,
"इतक्या मर्यादित उत्पन्नात हे सगळं कसं शक्य झालं?"
तो सौम्य हसला आणि म्हणाला:
"मॅडम! पेपर वाटण्याबरोबरच इतरही काहीतरी करत राहिलो.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे खर्चावर काटकसर.
जे स्वस्त, जे हंगामातलं.. तेच खात होतो.
कधी कधी फक्त दोडका, भोपळा, वांगी..."
थोडा थांबला, मग हळूच म्हणाला:
"एक दिवस मुलगा ताट पाहून रडला. म्हणाला,
‘रोज हीच कोरडी भाजी ! दुसऱ्यांच्या घरात काय काय बनतंय बघा.’
मी त्याच्याजवळ गेलो, त्याचे अश्रू पुसले आणि म्हटलं,
‘बाळा, आधी स्वतःचं  ताट पाहा. दुसऱ्यांची ताटे पाहशील, तर स्वतःचंही हरवून बसशील.
ही कोरडी भाजी नाहीये, या ताटात मी तुझं भविष्य वाढतोय. त्याचा अपमान करू नकोस.’
तो माझ्या डोळ्यांत पाहत राहिला, हसला... आणि चुपचाप सगळं खाल्लं.
त्या दिवसानंतर त्याने कधीही तक्रार केली नाही."
---
आज, ही आठवण शब्दांमध्ये उतरवत असताना, माझं मन विचारात गुंतून जातं...
आजकालची मुलं, आपल्या पालकांची परिस्थिती न समजता, ती प्रत्येक गोष्ट मागतात जी दुसऱ्यांकडे असते.
कोण त्यांना समजावेल, की कधी कधी कोरड्या ताटातही पूर्ण भविष्य वाढलेलं असतं...
फक्त डोळ्यांत पाहण्याची दृष्टी लागते...!

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...