गुरुवार, १४ ऑगस्ट, २०२५

2158.  चांगल्या सवयी व  चालीरीती

  कपाळावर कुंकू किंवा चंदन किंवा भस्म लावणे, नमस्कार करणे, चरणस्पर्श करणे, पाद्यपूजन करणे इ. कित्येक पारंपारिक विधी व शिष्टाचार आपण आजही पाळतो. पण त्याचे महत्त्व आता आपण जाणत नाही. या सगळ्यांच्या मागे काही न काही सांस्कृतिक संकेत आहेत. सर्व धर्मांमध्ये सर्व उपचार, त्या सत्यतत्त्वापर्यंत पोचण्याच्या विधींचे नाट्यरूपांतर आहेत. हिंदू धर्मातच नव्हे, तर बौद्ध, इस्लाम, ईसाई धर्मातील सर्व विधी तशाच आहेत. मंदिरात, यज्ञशाळेत आपण तेच करतो. आत्मसाक्षात्कारापर्यंत पोहोचण्याच्या वेदान्तिक मार्गाच्या त्या पायवाटा आहेत.   
    कपाळावर टिळा लावण्याची आपली प्रथाही खूप अर्थपूर्ण आहे. सकाळी पूजा-अर्चा-ध्यान  इ. करून मी स्वतःला आध्यात्मिकतेमध्ये स्थित करतो. बैठकीतून उठण्यापूर्वी देवाच्या पायावरील चंदन किंवा देवी मातेच्या पायऱ्यांवरील कुंकू किंवा शिवलिंगावरील विभूती मी माझ्या भालावर लावतो. व्यवहाराला बाहेर पडताना दुसऱ्याच्या माथ्यावर असा टिळा पाहून, मला त्यानेही सकाळी केलेल्या उपासनेचे आठवण येते. त्याच्या सात्विकतेची मला व माझ्या ईशसेवेची त्याला आठवण झाल्यानेएकमेकांबद्दल आदर निर्माण होऊन व्यवहार प्रेम-आदरपूर्ण होतो. देवासमोर एक समई प्रज्वलित केलेली असते. ती अखंड तेवत असते. पूजेच्या वेळी लहानसे अनेक निरंजन आपण लावतो. त्या निरांजनांमधील ज्योत त्या एका समईतून घेतलेली असते. निरांजनामधील विविध पवित्र ज्योती आपल्या जिवात्म-भावाच्या प्रतिकस्वरूप आहेत.त्या एकाच प्रकाशस्वरूप आत्मतत्त्वातूनच निर्माण झालेल्या असतात. हे तथ्य आपण पूजा करताना लक्षात ठेवायचे असते.
        प्रतिकांचा उपयोग कशासाठी करण्यात येतो, ते जाणून घेणे महत्त्वाचे आहे. निवडणुकांच्या वेळी तुमच्या विभागात  उभा असणारा उमेदवार कसाही असो, तो ज्या पक्षाचा आहे ते बघून तुम्ही मतदान करता, कारण तो उमेदवार त्या पक्षाचे प्रतिनिधित्व मात्र करीत असतो. मूर्ती,शिवलिंग,शालिग्राम ही सर्व त्या सत्याची प्रतिके आहेत. प्रतिकांच्या माध्यमातून उपचार, त्या तत्त्वापर्यंत आपल्याला पोचवावयाचे असतात. आपण दगडाची पूजा करत नाही. देवाची करतो. शिवलिंग हे शिवाचे, शालेग्राम हे विष्णूचे प्रतीक आहे. सद्गुरूंचे चरण हे संपूर्ण आत्मसाक्षात्कारी गुरु-परंपरेचे प्रतीक आहेत. त्यामधून आपण परब्रह्म परमात्म्याचे आवाहन करीत असतो. परस्पर त्याच्यापर्यंत आपल्याला पोहोचता येत नाही. ते आपल्या आवाक्याबाहेर असते. म्हणून आपल्याला एक माध्यम, एक प्रतिक आवश्यक असते. सद्गुरूंचे पाय आपण उसने घेतो. सद्गुरु, काही काळ त्यांचे पाय खेळायला आपल्याला देतात. त्या पायांना साक्षात देव मानून आपण पूजतो. शिवलिंगाप्रमाणे पाण्याने ते पाय धुतो, त्यांना चंदन लावतो.
    म्हणून मित्रांनो, तुम्ही असे समजू नका की, तुम्ही माझे पाय धूत  असता, तात्पुरते माझे पाय मी तुम्हाला देत असतो. काही वेळा त्या पूजेदरम्यान मला खूप त्रास सहन करावा लागतो. कोणी खूप गरम पाणीटाकतात, तर कोणी फ्रिजमधल्या गार पाण्याने पाय स्वच्छ करू लागतात. पण मला काहीही बोलण्याची मुभा नसते. कारण ते पाय, त्या वेळेला, तुम्हाला दिलेले असतात. तुमच्याप्रमाणे मी सुद्धा त्या पायांना,त्या वेळेला माझे नव्हे तर ईश्वराचे अधिष्ठान मानत असतो. तुम्ही तुमच्या गुरूंचे पाय धरता,तेव्हा गुरुसुद्धा मनोमन त्यांच्या गुरूंचे स्मरण करीत असतात. अशाप्रकारे संपूर्ण गुरुपरंपरेची एक साखळी निर्माण होते. तुमचे हात सद्गुरूंच्या पायावर असतात पण मन गुरुतत्त्वापर्यंत, परमेश्वरापर्यंत पोहोचले असते.
     चरण स्पर्श किंवा पाद-पूजा हीच एक खूप चांगली पद्धत आहे. Hand shake  करून भेटण्याची आपली प्रथा नाही. पाश्चिमात्य देशांकडून ती आली आहे. त्या काळी त्या लोकांमध्ये इतकी वैरभावना व हिंसा  वाढली होती की, एकमेकांच्या समोर येताना दोघांनाही शंका वाटायची की, समोरच्या माणसाच्या हातात काही शस्त्र तर लपवलेले नाही ना ! म्हणून हात मिळवून, जोरजोराने एकमेकांनी हात हलवून, ते हात रिकामे असल्याची खात्री करून घ्यायचे. मिठी मारून,पुढे अजून खात्री करून घ्यायची की, पाठीशी व पोटाशी काही दडलेले तर नाही ना !
    आपली संस्कृती वेदांतावर आधारित आहे. आपल्याकडे हात जोडून नमस्कार करण्याची खूपच सुंदर पद्धत आहे. समोरासमोर आल्यावर आधी आपण हे स्मरण करतो की, त्याच्यात व माझ्यात एकच चैतन्य क्रीडा करीत आहे. तो गुंड असू दे, खूनी असू दे, पण त्याच्या त्या व्यक्तिमत्त्वाच्या अंतर्यामी तेच दिव्य चैतन्य आहे. म्हणून हात जोडून आधी मी 'त्याला' प्रणाम करतो. त्या चैतन्याच्या अस्तित्वाची जाणीव ठेवून आपला व्यवहार व्हावा अशी सदिच्छा मनी बाळगतो. नमस्ते ...'नमः ते' म्हणतो... 'तुझ्यातील देवाला नमस्कार करतो.' असे म्हणतो. एका उच्चतर स्तरावर एकमेकांशी भेटतो. त्यामुळे पुढचा व्यवहारही सात्विक होतो.
    आपल्यामध्ये खूप वेगळेपणा असेल पण हा वेगळेपणा फक्त बाह्यत: आहे, वरवरचा आहे. आतून एकच चैतन्याच्याधाग्याने  आपण जोडलेले आहोत ही भावना दोघांमध्ये आपुलकी, प्रेम व विश्वास निर्माण करते. परस्पर नमस्काराने हे लगेच साधले जाते. आपण एकमेकांचे बंधू आहोत, कितीही भांडलो तरी आपली आई एकच आहे. हे न बोलता एकमेकांना सांगितले जाते. विविधतेमधील एकता, विषमतेमध्ये सुसंगतता स्थापित होते. पायावर मस्त ठेवून नमन करण्याची आपली पद्धत आगळीवेगळी पण आपल्या संस्कृतीशी खूप सुसंगत आहे. असे करणे, शरणागती दर्शवते, गुलामी नाही. आई-वडील, गुरु, व सर्व ज्येष्ठ व आदरणीय व्यक्तींच्या पायावर मी नतमस्तक होतो.हे पायअधिष्ठान आहेत, त्या तत्त्वाचे, त्या प्रेमाचे, त्या त्यागाचे, ज्यामुळे माझ्या व्यक्तिमत्त्वाचे संवर्धन झाले. त्या अमृतप्रवाहाचा ओघ पूर्णपणे माझ्यात स्वीकारण्यासाठी मी वागतो, नम्र होतो, नमन करतो, त्यांच्या चरणकमळी माथा ठेवतो. 
        म्हणून की काय गुरुजन बहुधा बूट घालत नसावेत !! तुम्हाला माहिती आहे, बुटांमुळे पायांना वारा लागत नाही आणि मग थोडा कुबट वास यायला लागतो. शिष्य आणि भक्त पायावर मस्तच ठेवायला येतात. म्हणून त्यांचे पाय स्वच्छ असले पाहिजेत, ह्याची काळजी गुरु घेत असतात. पण शिष्यांना शंका असतेच. म्हणून ते गुरूंचे पाय धुवून घेतात, चंदन वगैरे लावतात, मग पायावर मस्तक ठेवतात !! 
        असो. आता लक्षात ठेवा. पाद-पूजा म्हणजे एखाद्या लाकडी किंवा दगडी प्रतिकाची, शिवलिंगाची, क्रूसाची आपण जशी पूजा करू, तशी गुरुच्या सजीव चरणांची ती पूजा असते.   
          माझे पाय आहेत तसेच शाबूत परत कराल की अपेक्षा ठेवून मी पादपूजेला तुम्हाला माझे पाय उसने देत असतो.
            ०००००
सौ सुनंदा म जोशी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...