काळू आतून हादरला होता. संध्याकाळपासून चढवलेली दारू एका झटक्यात उतरली होती. काळूनि ते समोर असलेले दोन कागद परत परत बघितले, कदाचित त्याची वाचण्यात चूक झाली असावी. पण तसे काही झाले नव्हते, त्या पैश्याच्या पाकिटातून मिळालेले कागद एकाच गोष्टीकडे निर्देश करत होते.
काळू उर्फ काल्या, सडाफटिंग, उचलेगिरी, चोऱ्या, घरफोडीचे प्रयत्न करून शेवटी पाकिटमारीच्या धंद्यात स्थिर झालेला. आता एक अट्टल पॅकेटमार म्हणून नाव कमावलेले ,गेल्या पाच सात वर्षांपासून कुर्ला ते दादर रेल्वे स्टेशनच्या मध्ये रोज लोकांची पाकीट मारणे हा धंदा. मिळालेले पैसे बाईबाटलीवर उधळणे हा फावल्या वेळातला उद्योग. नीतिमत्ता, पाप पुण्यातला फरक आणि त्याचा दूरदूरच्या संबंध नव्हता.
पण गेले काही दिवस काळू आनंदात नव्हता. गेल्या एका आठवड्यापासून मनासारखा हात बसत नव्हता. महिन्याची २२-२३ तारीख त्यामुळे लोकांची पाकिटे हलकी झालेली....त्यामुळे मनासारखे भरपूर खायला प्यायला मिळाले नव्हते, दारू प्यायली तरी ती देशीच परवडत होती. गुलाबोकडेपण जायला झाले नव्हते... ऑन्टी नगद पैसे घ्यायची , तिथे उधारी चालायची नाही. आज सकाळपासून त्याने ५ पाकिटे मारली होती पण पाच जणांमध्ये वाटून फक्त २००/- रुपयांची कमाई झाली होती. २०० रुपयांमध्ये खाणे जमू शकले असते पण दारू आणि गुलाबो साठी १००० रुपये तरी लागणार होते. पण काल संध्याकाळी काळूला का कोणास ठाऊक पण वाटत होते की आज काहीतरी चांगला हात मारायला मिळेल.
ते साधारणतः ४-५ जण मिळून पाकीट मारायचे. काळू पाकीट मारायचे आणि त्याचे ३-४ साथीदार त्याला मदत करायचे. पण आज तो एकटा होता. एकट्याने पॅकेटमारने खूप कठीण. कारण पकडले जाण्याचे संभावना जास्त असते आणि पकडला गेला तर पब्लिक जबरदस्त मारते, सगळेजण हात साफ करून घेतात. आयुष्यातले सगळे फ्रस्टरेशन काढायला लोक वाटच बघत असतात. आणि अश्या वेळेस वाचवायला कोणी नसते. पण तरी का कोणास ठाऊक काळूला आज संध्याकाळपासून काहीतरी वेगळं होणार असल्याची जाणीव होत होती. त्याच्या डाव्या हाताला खाजही येत होती. बरेच दिवसात मजा केली नव्हती, खाणे पिणे आणि गुलाबो ची आठवण त्याला वेडं करत होती. शेवटी त्याने एकट्याने चान्स घ्यायचे ठरवले. साधारणतः ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना पाकीट मारायचं तंत्र असते, आज काळू सावज हेरत प्लॅटफॉर्मवर उभा होता. आणि त्याला समोरून एक माणूस येताना दिसला, जणू त्याला खात्रीच पातळी की त्याला एकट्यानेसुद्धा पाकीट मारता येणार होते. काळूची नजर तरबेज होती, त्याला सावज बरोबर कळायचे. माणूस मध्यमवयाचा होता, कपड्यावरून खूप श्रीमंत वाटत नसला तरी मध्यमवर्गीय वाटत होता म्हणजे १००० एक रुपये पाकिटात असण्याची शक्यता होती. पॅन्टच्या खिशातले पाकीट तसे जाडजूड वाटत होते. माणूस कसल्यातरी विचारात काळजीत वाटत होता त्यामुळे त्याचे त्याच्या खिशातल्या पाकिटाकडे, खांद्यावरच्या बॅगकडे लक्ष नव्हते. मुंबईतले अर्ध्याहून जास्त मध्यमवर्गीय माणसे कसल्यानं कसल्या काळजीत असतात त्यामुळे काळूसारख्यांचे फावते. काळू त्याच्या आजूबाजूला घुटमळत होता, त्याला वाटत होते की तो माणूस ठाणे डोंबिवलीच्या ट्रेनमध्ये चढेल पण झाले उलटेच त्याने VT कडे जाणारी ट्रेन पकडली. काळूचा नाईलाज झाला आणि त्यालापण त्या ट्रेनमध्ये चढावे लागले. ट्रेन उलट जाणारी असल्याने गर्दी नव्हती तेव्हा ट्रेनमध्ये चढताना काळूला चान्स मिळाला नाही. त्याला वाटले दादरला तो उतरेल तेव्हा बघू पण तो दादरलाही उतरला नाही,तो परळला उतरला जिथे उतरताना गर्दी नव्हती. शेवटी काळूला राहवेना , तो भरभर चालत पुढे गेला आणि उलट दिशेने चालत त्या माणसावर धडकला . त्या माणसाचे काही लक्ष नव्हते , तो अजूनही कुठच्यातरी विचारात चालला होता. त्या धडकेत काळुनी हातसफाई केली आणि पाकीट मारले आणि सॉरी सॉरी म्हणत दिसेनासा झाला. तो माणूस ओके म्हणून तसाच पुढे चालत गेला.
बाहेर आल्यावर कालूने पाकीट उघडले आणि त्याचा त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. पाकिटात १०००च्या आणि २००० च्या कोऱ्या करकरीत नोटा होत्या. नगद १६००० रुपयांची लॉटरी लागली होती. कालूने घाईघाईत पाकीट तसेच पॅंटमधे ठेवले आणि त्याचे पाय नेहेमीच्या बार आणि ऑंटीच्या कोठ्याकडे वळले. खाऊन पियुन ऐश करून काळू गुलाबोकडे गेला आणि उरलेले सगळे पैसे तिच्यावर उडवून मध्यरात्रीनंतर घरी आला. त्याने कपडे बदलून ताणून द्यायचे ठरावे होते, कपडे बदलताना पंत खाली फेकली त्यात खिशातली एक वस्तू बाहेर पडली. ते त्याने माणसाचे मारलेले पाकीट होतं. तसे पाकीटमार रिकामे पाकीट गॅंगकडे जमा करतात पण आज त्याने हे पाकीट एकट्याने मारले होते तेव्हा पाकीट जमा करणे गरजेचे नव्हते. पाकीट खाली पडले ते उघडले आणि त्यातून एक दोन फोटो बाहेर पडले. का कोणास ठाऊक काळूला काय वाटले , दारूच्या नशेत त्याने पाकीट उघडले , आतमध्ये मध्यमवर्गीय माणसाच्या पाकिटात असतात तसेच काही कागद, आधार कार्डची कॉपी , बायकोचा आणि मुलांचा हसरा फोटो होता. काळू पाकीट फेकणारच होता पण त्याला पाकिटात काहीतरी कडक कार्डासारखे काहीतरी लागले. ते टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे पेशंट कार्ड होते , कालूने कार्ड वाचले " सौ. शालिनी मधुकर चव्हाण, वय ३८ , ब्लड कॅन्सर".
काळू ते वाचून थोडा हलला. पाकिटात अजून एक कागद फोल्ड करून ठेवला होता. कालूने तो फोल्ड केलेला कागद उघडला आणि त्यावर लिहिलेले वाचून त्याचे हात थरथरायला लागले. ती एक रिसिप्ट होती. "राणा ज्वेलर्स , कुर्ला, मंगळसूत्र गहाण ,२३ ग्राम २२ तोळे, उधार रक्कम १६०००". त्याने परत एकदा दोन्ही कागद परत वाचले, सगळं प्रकार त्याच्या ध्यानात आला आणि एका झटक्यात प्यायलेली सगळी उतरली. काळू तसे बघितले तर अट्टल चोर पण तो सुद्धा त्या रात्री झोपू शकला नाही. आपण केलेली घोर चूक त्याच्या आली होती. त्यामाणसाची बायको कॅन्सरने पीडित होती , टाटा हॉस्पिटलमध्ये उपचाराकरता त्याने पैसे मंगळसूत्र गहाण ठेऊन घेतले होतं.
त्याला स्वतःच्या लहानपणीची आठवण झाली, ते मानखुर्दच्या झोपडपट्टीत राहायचे. बाप पेंटर होता , आई देवनारला लोकांकडे काम करायची. आईला चुना तंबाकू खाल्ल्याने तोंडाचा कॅन्सर झाला होता. आई कमला जायची बंद झाली. बापाची कामे पुरेनासी, शेवटी उपचाराअभावी त्याची आई हालहाल होऊन गेली. आई गेल्यानंतर बापाचे पिणे वाढले आणि १-२ वर्षात तोही गेला. १०-१२ वर्षांचा काळू एकटाच वाढला. त्याला अजूनही वाटायचे की आई अजून थोडी राहिली असती तर तो ह्या मार्गाला लागला नसता, त्याचे आयुष्याला दुसरेच वळण लागले असते
ह्यामाणसाची बायको कॅन्सरने आजारी होती, मंगळसूत्र उधार ठेवले म्हणजे घरात पैश्याची अडचण असणार. कालूने परत फोटो बघितला, मुलांच्या ठिकाणी त्याला त्याची लहानपणीचा काळूच दिसत होता. मन अस्वस्थ झाले होते त्यामुळे तो रात्रभर तळमळत होता. जीवनात पहिल्यांदा त्याला आपण काहीतरी चुकीचे केल्याचे वाट होते. त्या माणसाचा चिंतेतल्या चेहेऱ्याचे कारण त्याला आता कळले. त्या माणसाचे पाकीट मारून जणू त्या मुलांवर अन्याय केल्याचे त्याला जाणवले. पहाटे पहाटे त्याने आपण केलेली चूक निस्तरायचे ठरवले, मग त्याला त्यासाठी मार पडला तरी सहन करायची मानसिक तयारी केली होती. त्याने मित्रांकडून पैसे घ्यायचे ठरवले ,पैसे घेऊन त्यामाणसाच्या घरी जायचे, त्याची माफी मागायची आणि त्याचे पैसे परत करायचे.
सकाळपर्यंत त्याला थार नव्हता, सकाळी सकाळी त्याने गँगच्या दादाला गाठले , तो काही एव्हढे पैसे काळूला उधार देईना कारण त्याच्या सवयी सगळ्यांना माहित होत्या. पण त्याने दादाला सांगितले की आजपर्यंत एव्हढे वाईट धंदे केले पण आज पहिल्यांदा पैसे एका चांगल्या कामासाठी पाहिजे होते. का कोणास ठाऊक पण त्यादिवशी दादाला त्याच्या डोळ्यात वेगळीच झलक होती . पैसे घेऊन काळू आधी त्या सोनाराकडे गेला, उधार ठेवलेले मंगळसूत्र सोडवले त्या माणसाचा पत्ता घेतला आणि थेट त्या पत्त्यावर पोचला. कुर्ल्यातलीच बैलबाजारात चाळीतली खोली होती. तो माणूस कसा वागेल आजूबाजूच्या लोकांना बोलवून मारेल ,ह्या विचारात काळू मनाचा धीर करून अरुंद गल्लीत शिरला. गल्ली अरुंद त्यात जागोजागी सामान, त्यातच सांडपाण्याची घाण. माणसे तिथेच येतजात होती पण थोडा पुढे गेल्यावर थोडी माणसे उभी असलेली दिसत होती. पुढचे कालूने जे काही बघितले ते त्याच्या आयुष्यातले सगळ्यात विदारक सत्य होते. ते दृश्य बघून काळूच्या पायातले त्राणच गेले, तो तिथेच बसला.
तो माणूस आणि त्याची दोन मुले दरवाज्याच्या बाहेर बसली होती. मुले बावरून आपल्या वडलांना बिलगून बसली होती. आजूबाजूची माणसे घरात ये जा करत होती. त्या माणसाच्या डोळ्यात जणू शून्य होते, तो भकास नजरेने समोर तिरडीवर ठेवलेल्या आपल्या बायकोच्या कलेवराकडे बघत होता. ते दृश्य बघून काळूच्या पायातले त्राणच गेले, तो तिथेच बसला. आपल्या आईच्या मृत्यूनंतर एव्हढा मोठा धक्का त्याला पहिल्यांदाच बसत होता. काळ आपण ह्या माणसाचे पाकीट मारले नसते तर त्या बाईचा अजून इलाज होऊ शकला असता का? त्या मुलांना त्यांची आई थोडे जास्त दिवस मिळाली असती का? त्या बाईच्या जीवनातले काही दिवस आपल्या पाकिटमारीमुळे कमी झाले का? त्या माणसाला त्याची बायकोचा शेवटचा इलाज पण करता आला नव्हता , तो परत आयुष्यात उभा राहू शकेल का ? का आपल्याच आयुष्यासारखे, हि मुले पोरकी होतील? त्या बाईच्या अंत्यविधीला तरी त्या माणसाकडे पैसे असतील का?
ह्या सगळ्या विचारांनी जणू त्याच्यासारख्या चोराच्या निगरगट्ट मनाला वादळी तडाखे दिले होते,
काळू कोलमडला,
काळू तिथेच संपला....
त्या दिवसापासून काळू बदलला.त्याने टाटा कॅन्सर हॉस्पिटल समोर नारळाची गाडी सुरू केली.
"दादा, नारळाचे पाणी पेशंटसाठी हाय काय? मंग त्यानला आमच्याकडून दोन केळीपण घेऊन जा आणि बरोबर स्वामींचा अंगराबी घेऊन जा. धीर ठेवा माउली सगळं नीट करेल बगा". टाटा हॉस्पिटलच्या समोर एक फळवाल्याचा छोटीसी टपरी नवीनच चालू झाली होती, गळ्यात तुळशी आणि रुद्राक्षाची माळ , डोक्याला टोपी, वारकरी वेषातल्या काळूबांनी नारळ आणि फळांची पिशवी त्या माणसाच्या हातात दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा