बुधवार, ६ ऑगस्ट, २०२५

2143. मायबाप

 "काका चला तयार आहात न? घरी जाऊयात. मी सगळी औपचारिक कामं पूर्ण केली आहेत आणि डिस्चार्ज पण घेतला आहे. मीनाक्षी चल ग, काकांना घेऊन ये. मी गाडी काढतो. काकू घरी वाट बघत असतील." अमेयचं हे बोलणं कानावर पडलं आणि मीनाक्षी सगळं आवरायला उठली. निलिमाबाई घरी वाट बघतच होत्या. त्यांनी आरतीचं ताट तयार करून ठेवलं होतं. आणि आता एवढ्यातच श्रीकृष्णराव येतील म्हणून बाल्कनीत येरझाऱ्या घालता घालता त्या एकदम भूतकाळात गेल्या. 
"इतकी वर्ष झाली ह्यांना साधा खोकला ही नाही कधी. माझ्या आपल्या काही न काही कुरबुरी चालू असतात. पण अचानक परवा ह्यांच्या छातीत दुखायला लागलं आणि काय करावं सुचेचना. रात्री १२ वाजता मीनाक्षीकडे दार ठोठावायचं म्हणजे त्यांना खरं तर प्रशस्त वाटलं नाही. बाजूलाच रहात असले म्हणून काय झालं. तरीही ती नेहमीप्रमाणे नक्की मदतीला येईल म्हणून त्यांनी दबकतच दाराची बेल वाजवली आणि खरंच मीनाक्षी आणि अमेय तत्क्षणी ह्यांना गाडीत घालून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेसुद्धा. मुलांनी अगदी अजिबातच मागचा पुढचा विचार केला नाही. तरीच गेल्या काही दिवसांपासून हे म्हणतच होते, 
"निला, मला काही वाटत नाही यावर्षी मी आषाढीला पंढरपुरी जाऊ शकेन." मला वाटलं म्हणत असतील असंच. म्हणून  मी पण म्हंटल,
"तो विठोबा काही तुमची दर वर्षी वाट नाही बघत हो. त्याला भेटायला बरेच भाविक येतात, ते ही पायी चालत. तुम्ही तर छान गाडी करून जाता. त्यामुळे नाही गेलं एखादं वर्ष तर काही फरक नाही पडत. करा यावर्षी इथूनच नमस्कार." मग हे अचानकचं दुखणं आलं आणि खरंच या वर्षी विठुराया, तुझी वारी चुकणारच की रे बाबा ह्यांची. एवढं रे काय? मी ह्यांची गम्मत केली तर तू पण असं मनावर घेऊन माझीच चांगली फजिती केलीस की रे.." 
असं म्हणत त्यांनी देवघराकडे लटक्या रागातच बघितलं. आणि तेवढ्यात अमेयची गाडी फाटकातून आत शिरली. निलिमाबाई लगेचच उठून आरतीच्या ताटातील दिवा लावून दारापाशी आल्या. श्रीकृष्णरावांना ओवाळून त्यांनी आत घेतलं मात्र. आणि लगेचच मीनाक्षी ने घरात येऊन घराचा ताबा घेतला. 
"चला आता काकांना आराम करुदे. मी मस्त सगळ्यांसाठी चहा बनवते आणि काकांना गरम गरम हळदीचं दूध आणते." निलिमाबाई हलक्या स्वरात म्हणाल्या, 
"अग नको मी बनवला आहे चहा. तो दोघांनी घ्या आणि तुम्ही पण जरा आराम करा बरं. ४-५ दिवस खूप धावपळ झाली तुमची आमच्यामुळे. ह्यांचं दुखणं चार दिवसात कमी होऊन डॉक्टरांनी घरी सोडलं म्हणून ठीक. नाहीतर माझ्या तर त्यावेळी पायाखालची जमीनच सरकली होती. त्यात हा पाऊस पण मी म्हणतोय सारखा." त्यावर अमेय म्हणाला, 
"काकू अहो काकांना बरं व्हायचंच होतं. छोटा सौम्य हार्टअटॅक होता. आता बघा ते परत कसे फिट होतील तुमच्या हातचं खाऊन." असं म्हणताच तिथे सगळ्यांच्याच चेहऱ्यावर हास्याची एक लकेर उमटली. आणि थोडा ताण हलका झाला. 
"चला काका आराम करा आता. आणि हो सौम्य असला तरी काळजी मात्र सगळी मोठा असल्यासारखीच घ्यायची आहे बरं. डॉक्टरांनी मला सांगितलं आहे तसं." 
"हो रे अमेया! तू म्हणशील तसं..."असं म्हणून श्रीकृष्णराव हळूहळू चालत आत गेले. नंतर पण ते दोघे सारखी ये- जा करतच होते. शेजारीच म्हंटल्यावर काय? पथ्यपाणी, खाणंपिणं हे पण मीनाक्षी सारखी येऊन येऊन बघत होती. बाहेरून काय हवं नको ते आणून देत होती. अमेयही ऑफिसमधून कधी कधी तर थेट इथेच येई चौकशीला. १०-१५ दिवसांनी श्रीकृष्णरावांचा चेहरा पुन्हा थोडा पडल्यासारखा झाला. निलिमाबाई घाबरल्या. 
"काय हो परत काही होतंय का तुम्हाला? आपण जाऊयात का डॉक्टरांकडे." त्यावर श्रीकृष्णरावांनी नकारार्थी मान हलवली. 
"मग काय झालं? सांगा की." एक सुस्कारा सोडत श्रीकृष्णराव म्हणाले,
"निला, अग आपला मुलगा काही तासांवर असून आणि तू फोन करूनही आला नाही. एवढा कसा कठोर हृदयाचा झाला तो. आपण तर असे संस्कार नाही केले. शिवाय पहिल्यापासून आपल्याबरोबर माझे आईबाबा त्यानंतर मग तुझी आई असे सगळे होतेच की आपल्याकडे. तू किती आनंदाने केलंस त्या साऱ्यांचं. कधी कधी भांड्याला भांडं लागलं. घर म्हंटल की ते आलंच. पण तरीही घरातले वाद बाहेर पडणार नाहीत याची आपण काळजी घेतली. आणि तेच संस्कार त्याच्यावरही झालेत. मग तरीही आपण कुठे चुकलो का ग? इतका की, तो आला तर नाहीच पण नंतर एक कोरडा चौकशीचा फोन करून थांबला. अग तो ही बाप आहेच ना एका मुलाचा. मग या बापाचं हृदय त्याला नाही कळलं का? आणि हे आपल्या शेजारचे, ना नात्यातले ना रक्ताचे, पण दोघे किती करतात आपलं. गेले दोन- तीन वर्ष तर अगदी त्यांचे आईवडील असल्यासारखंच."  निलिमाबाई सगळं ऐकत होत्या त्या ही हुंदके देत होत्या पण मनातून. बाहेर त्या अगदी कणखर असल्याचं भासवत होत्या. त्यांनी धीर देत श्रीकृष्णरावांना समजावलं,
"अहो असं कष्टी नाही व्हायचं बरं ! ते चांगलं नाही तुमच्या तब्येतीला. नयन आता आपल्याकडे परत कधीच येणार नाही हे एकदा मनाला समजावून टाका बरं. त्याला इथे मुंबईत नाही आवडत. इथली धावपळ आणि घड्याळाच्या काट्यावर धावणं नाही पसंत पडत त्याला. त्याला बाहेरगावी जास्त आरामदायी वाटतं. त्याचं कुटुंबकबिला ही तिथे आहे. आणि तो त्यात रमलाय यातच आपण समाधान मानायचं. आपलं आता किती उरलंय! विठू माऊलीच्या चरणी लीन व्हायचं आणि शेवटच्या क्षणी हसत त्याच्या चरणांना मिठी मारायची की झालं कल्याण. अहो, आपण तर नयनचे फक्त जन्मदाते आहोत पण ती माऊली बघा उभ्या विश्वाची आई आहे. ती कुठे थकते आणि रुसते." 
श्रीकृष्णरावांनी हलकेच मान डोलवत म्हंटल, 
"हो. तुला असं आई असूनही विरक्त कसं रहाता येतं. मी सगळ्यात आणि विशेषतः नयन मध्ये अजूनही गुंतून पडलोय. पण तू म्हणतेयस तेही पटतंय मला. शिवाय यावर्षी मला पंढरीला पण नाही जाता येणार. परवा वर आली आता आषाढी. माझा इतक्या वर्षांचा नेम चुकणार बघ. लहानपणापासून बरीच वर्षे चालतच गेलो की वारीला गेल्या ७-८ वर्षात पायी जमेना म्हणून गाडीचा खटाटोप. पण तुला आठवतं? पूर्वी मी एवढया गर्दीत नयन ला खांद्यावर बसवून चालत घेऊन जायचो. तू चिडायचीस. पण तरी मी हट्टाने घेऊन जायचो. आणि आज बघ..." 
"अहो असं काय करताय? परत परत त्याचाच विषय काढलात तर कसं होणार मग. अहो हा अमेय आपल्या नयन एवढाच की. मग नयनचा नाही तर माउलींनी या मुलाचा खांदा दिलाच की आधाराला. चला सोडा तो विषय, बाहेर छान पाऊस पडतोय मी तुम्हाला गरम गरम चहा देते आल्याचा. तो घ्या म्हणजे बरं वाटेल".असं म्हणून त्यांनी स्वयंपाकघरात जाऊन आपल्या डोळ्यांना मनसोक्त वाहून जायला मोकळीक दिली. तीन दिवसांनी सकाळीच दारावरची बेल वाजली म्हणून निलिमाबाईंनी दार उघडलं. 
"अरे मीनाक्षी, एवढ्या सकाळी ७ वाजताच. काय ग काय झालं? सगळं ठीक ना?" 
"अहो काकू, आम्हाला दोघांना यायचंच होतं, ते ही अमेय ऑफिसला जायच्या आधी आणि आजच. मग म्हंटल बघू. तुम्ही उठला असाल तर, नाहीतर नंतर येतो संध्याकाळी." आत येत त्यांनी मीनाक्षीला म्हंटल, 
"अग ये की, आम्हा म्हाताऱ्यांना कुठे या वयात झोप लागते जास्त. आमचं आवरून झालं पण. त्यात आज एकादशी आहे न मग काय काका जपाला बसले पण. आणि मी पूजा करायला घेतच होते तेवढ्यात बेल वाजली. बरं आज उपासाची खिचडी केली आहे नाश्त्याला नंतर खाऊनच जा. आणि अमेय कुठे आहे?" 
"येईलच इतक्यात" असं म्हणून मीनाक्षी आणि निलिमाबाई आत गेल्या. 
"काय काका बरं वाटतंय न. अहो दोन दिवस खूपच बिझी होते. एक गोष्ट आणायची होती त्यासाठी खूप फिरले आणि शेवटी काल मनासारखी मिळाली." 
"काय ग कुठली गोष्ट? मला सांगायचीस न माझ्याकडे असती तर दिली असती की मी. आमचा मेला इतक्या वर्षांचा संसार कित्येक वस्तू जास्तीच्या घेतलेल्या असतात ज्या लागतही नाहीत." 
"हे काय, ती अमूल्य गोष्ट मी आलोच घेऊन." असं म्हणतंच अमेय आत शिरला. 
"मीनाक्षी उठ. हे देऊयात न आधी. मला दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा आहे." असं म्हणून दोघांनी हातातली जड गोष्ट काका काकूंना दिली. दोघांनी ती उघडून बघताच सर्वप्रथम ते अवाक झाले आणि मग दोघांचेही डोळे पाझरू लागले. थोडावेळ सगळंच निःशब्द होतं. मग काका आनंदाने म्हणाले, 
"अमेया, हे रे काय? माझी मायमाऊली आहे ही तर. किती सुंदर, आखीवरेखीव आणि मुख्यतः अगदी हसरी मूर्ती आहे. माझे मायबाप - विठुराया आणि रखुमाई !" त्यांनी त्या मूर्तीच्या पायावर डोकं ठेवलं. 
"किती कराल रे आमच्यासाठी. सख्या मुलाने तर ढुंकूनही पाहिलं नाही आणि तुम्ही तर रक्तापेक्षा ही खूप जास्त करताय आमच्यासाठी. कसे ऋण फेडू आम्ही तुमचे?" निलिमाबाई तर काही बोलूच शकत नव्हत्या. अमेय आणि मीनाक्षी दोघे हे दृश्य पाहून खूप आनंदले. मीनाक्षी म्हणाली, 
"काकू, ह्यांनाच तर मी शोधत होते. तुम्ही दोघे पाहून थक्क व्हाल अशी मूर्ती आणता-आणता पुरेवाट झाली बघा. अहो, आम्हाला तुमच्या ऋणातच रहायचं आहे. आमचे दोघांचेही आईबाबा आम्ही अगदीच लहान असताना गेले. दोघेही आईवडिलांशिवाय वाढलो वेगवेगळ्या अनाथाश्रमात. त्यामुळे आम्ही त्या विशेष वेगळ्या अशा प्रेमाला भुकेले होतोच. ५ वर्षांपूर्वी इथे आलो रहायला आणि ते प्रेम आम्हाला तुम्ही दिलंत. शिवाय इथे आले तेव्हा मला मेनोपॉज चा त्रास होत होता. त्यावेळी काकूंनी अगदी आईच्या मायेने केलं माझं. मग हे आम्ही करतोय ते तर काहीच नाही. आपल्या घरांच्या मधली भिंत आपलं नातं थोडीच अडवू शकणार. ते तर घट्टच राहणार. तुमची दर वर्षीची वारीची इच्छा या वर्षी होणार नाही म्हणून ही आमच्याकडून आम्ही आमच्या मानलेल्या मायबापाला दिलेली, त्यांच्या मायबापाची मूर्ती ! आणि हो, नयन दादांना पण नक्की कळेल आईचं आणि बाबाचं प्रेम. मग त्यावेळी कसे धावत येतील बघाच तुम्ही. चला आता माझं पुराण पुरे ! आम्ही येतो. काकू रात्रीला काही करू नका मी छानशी खारकेची खीर आणि बटाट्याचा किस घेऊन येते एकत्रच जेवू सगळे."असं म्हणून ते दोघे पाठमोरे होऊन दाराशी गेले आणि श्रीकृष्णराव म्हणाले, 
"नीलिमा ते बघ आपले खरे विठोबा- रखुमाई. आपली काळजी घ्यायला शेजारच्यांच्या, छे, आपल्या मानलेल्या मुलाच्या रुपात आलेत." दोघेही एकदा मूर्तीकडे आणि एकदा त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिले आणि मनात एकच गाणं होतं,
"विठू माऊली तू , माऊली जगाची,
माऊलीत मूर्ती विठ्ठलाची।।   
विठ्ठला मायबापा....."

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...