"किती गं उशीर झाला आज तुला यायला?" संकेत लतिकाच्या मागून येत बोलला.
"आई गं... असा भुतासारखा उगवतोस की दचकायला होतं," लतिका त्याला मारायला गेली तसा तो हसत दुर गेला.
"रोज का उशीर करतेस," किंचित चिडत तो बोलला.
"अरे बाबा ऑडिट सुरू आहे त्यामुळे ऑफिस मधून निघायलाच उशीर होतो."
"अगं, असं इतक्या रात्री या रस्त्याने येणं बरं नाही."
"तु आहे ना बॉडीगार्ड तर काळजी कसली."
"खुप दिवस नाही राहणार मी."
"कुठे जातो आहेस?"
"कळेल तुला."
"काय हे नेहमी कोड्यात बोलतोस सांग ना कुठे जाणार आहेस."
"सांगेल.चल निघतो तुझं घर आलं," ती काही म्हणायच्या अगोदरच तो निघून गेला.
लतिका एक फर्म मध्ये काम करणारी सत्तावीस वर्षांची युवती. मागच्या महिन्यातच ती या भागात रहायला आलेली. आता पगार वैगरे छान मिळायला लागल्यामुळे तीने छोटं घर किरायाने घेतले होते.आई बाबांना पण ती गावावरून घेऊन आली होती. आई वडिलांची एकुलती एक मुलगी असल्याने ते तिच्यासाठी शहरात आलेले.
प्रगती कॉलनी तशी फार मोठी नव्हती. तीस छोटे बंगले आणि पाच सहा मजली टॉवर त्यात होते. त्यातलाच एक बंगला लतिका ने कंपनीच्या लीझ वर किरायाने घेतला होता. ही कॉलनी मुख्य रस्त्याच्या थोडी दूर होती. तिथे जातांना मधला रस्ता रात्री आठ नंतर सुनसान होऊन जायचा. हा पाच मिनिटांचा रस्ता दुपारी तसा अवघड वाटायचा नाही. रात्रीच्या वेळेस जर स्वतःची गाडी असली की भुर्रकन निघून जाता यायचे. लतिका जवळ स्वतःची गाडी नव्हती. बस ने ती येजा करायची. बस मुख्य रस्त्यावर तिला सोडायची आणि तिथून ती पायी पायी घरी यायची.
पहिल्यांदा असाच तिला घरी यायला उशीर झालेला. ती भराभर चालण्याच्या झोकात असतांना अचानक तिची चप्पल तुटली तेव्हा संकेत कुठूनसा धावत आला. त्याने तिच्या कडच्या सेफ्टी पीन ने घरी जाण्यायोग्य तिची चप्पल तात्पुरती ठीक करून दिली आणि तो तिच्या सोबत घरापर्यंत आला. तिने घरी चलण्याच्या आग्रह केला तर तो लवकर घरी जायचे आहे कारण सांगून निघून गेला होता. त्यानंतर जेव्हाही तिला घरी परतायला उशीर झाला तेव्हा तेव्हा तो तिला सोबत करायला यायचाच आणि गेट येण्याच्या अगोदर तो बाजूच्या रस्त्याने वळून द्यायचा.
"लता, अगं आज किती गं उशीर केलास साडे नऊ वाजलेत. मी बाबांना आता पाठवणारचं होती बस स्टॉप वर," तिला बघून आई बोलली.
"ऑडीट मुळे उशीर होतो आई. बस चार दिवस. त्यानंतर जरा हे टेंशन कमी होईल." आत येत लतिका बोलली.
"मी येत जाईल उद्यापासून बसस्टॉप वर," बाबा बोलले.
"अहो बाबा काळजी करू नका संकेत असतो सोबत मला."
"संकेत कोण?" आईचा लगेच प्रश्न.
"आई अगं तो तिकडे ऑलिव्ह टाऊनशिप मध्ये राहतो."
"बरं, घेऊन ये घरी कधी."
"मी खुपदा म्हटले पण तो घाईत असतो."
"ठीक आहे. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा घेऊन येशील."
"हो गं नक्की."
आज शनिवार होता. ऑडीटचा शेवटचा दिवस होता त्यामुळे काम जरा जास्तच लांबले. निघता निघता दहा वाजले. संपले एकदाचे करत सगळ्यांनी सुस्कारा सोडला.
"लता आज तु पण कॅबनेच जा खूप उशीर झालाय," रीमा बोलली.
"तुम्ही दोघी जणी आहात म्हणून तुम्हाला कॅब परवडते गं. मला एकटीला एकदम हजार रुपये देणं जड जाते. मी बसनेच जाते. साडे दहाची शेवटची बस आहे.बाबांना बोलावून घेईल स्टाॅप वर," लतिका बोलली.
"चल,आपण हिच्या सोबत बसस्टॉप वर जाऊ. ही बसने गेली की आपणही कॅब करून घेऊ," खुशी बोलली.
"हे ठीक आहे चल," रीमाने म्हटले. तिघी बसस्टॉप वर आल्या.
बस आली आणि लतिका बस मध्ये चढली. वेळ झाल्यामुळे बसमध्ये लोकं तुरळक होती. लतिकाचा बसमध्ये बसल्यावर जीव घाबरु लागला. आपण पैशांकडे बघून बसने यायचं ठरवले हे बरोबर नाही केलं असं आता तिला वाटू लागले. पण आता पर्याय नव्हता. ती जीव मुठीत घेऊन बसली. एक एक करत लोकं कमी होत होती. तिचा स्टाॅप यायला अर्धा तास होता. बस एका स्टाॅप वर थांबली. दोन मवाली दिसणारी... नाही मवालीच मुले बस मध्ये चढली. आता बसमध्ये मोजून सात आठ माणसं होती. बस मध्ये चढल्यावर दोघे तिच्या आजूबाजूच्या सीटवर बसली. दारूचा उग्र वर वास आला. आता मात्र लतिकाचे धाबे दणाणले. बाबांना फोन करावा म्हणून तीने मोबाईल काढला पण तो डिस्चार्ज झालेला. दिवसभरच्या कामाच्या व्यापात फोन चार्ज करण्याची आठवणच राहिली नाही. मनातल्या मनात स्वतःला लाख शिव्या घातल्या. पुढच्या स्टाॅप वर बस पुर्ण खाली झाली. आता कंडक्टर, ती मुले आणि लतिका एवढेच होते. कंडक्टर जरा खमक्या होता. त्याने त्या मुलांना दटावले होते म्हणून ते गप्प होते. रात्रीचे पावणेबारा वाजायला आले होते. पुढचा स्टॉप तिचा होता. बस थांबली तशी ती उठली. तिच्या सोबत ते दोन मवाली पण उतरले. त्यांना आपल्या स्टॉप वर उतरलेले बघून लतिकाच्या पायात मणामणाचे गोळे आले होते. भीतीने सर्व शरीर थरथर कापत होते. घसा कोरडा पडला होता. रस्त्यावर चिटपाखरू नव्हते. तिला मनापासून वाटत होते संकेत नेहमी जसा येतो तसा आज पण तो यावा. पण...
बस नजरेआड झाली तसा एक मवाली तिचे हात पकडायला धावला. ती सगळे अवसान घेऊन धावली. अंधारातल्या दगडाने घात केला आणि ती धाडकन जमिनीवर कोसळून डोकं दगडावर आपटणार इतक्यात कोणीतरी तिला पडण्यापासून वाचवले. तो संकेत होता.
संकेत.... एक अस्फुट किंचाळी तिच्या तोंडातून बाहेर पडली आणि ती बेशुद्ध पडली.
डोळे उघडले तर समोर आई बाबा दिसले.
"आई,' क्षीण आवाजात तिने हाक मारली.
"हो बेटा,"
"आई, मी कुठे आहे?"
"दवाखान्यात आहेस बेटा," बाबा बोलले.
"आई, ते मवाली ते ते मवाली.."
"कोण मवाली?"
"माझ्या मागे जे धावत होते"
"ते... अगं त्यांच्यावर अचानक वीजेचा तार कसा काय पडला काय माहित. ते त्यात जळून गेले."
"काय?" लतिका मोठ्याने बोलली.
"हो गं"
"आणि संकेत कुठैआहे?"
"संकेत... तिथे तर कुणीच नव्हते.'
"तो पण तिथेच होता आई... त्यानेच तर मला पडण्यापासून वर वाचवले होते."
"आम्हाला तर कोणीच नाही दिसले." बाबा बोलले.
"अगं काल रात्री तुला खुप उशीर झाला होता यायला म्हणून तुझे बाबा तुला घ्यायला स्टाॅप वर नऊ साडे नऊ वाजेपासून उभे होते. वेळ जसजशी जास्त होत होती तसतशी त्यांची तगमग वाढत होती. अकराच्या सुमारास त्यांना एकदम घाबरून व्हायला आलं. घसा कोरडा पडला म्हणून ते पाणी प्यायला म्हणून घरी आले. मी बाजूच्या शरद काकांना म्हटले की सोबत चलता का. तर ते पण आमच्या सोबत आले. आम्ही तिघे बस स्टॉप कडे यायला निघालो. दुरून तुझी बस थांबलेली दिसली. तु खाली उतरली आणि दुसरे दोघं मुले उतरलेली दिसली. अचानक तु धावायला लागली तसे आम्ही इकडून धावायला लागलो पण बाबांचा पाय मुरगाळला. वेदनेने ते खाली बसले मी आणि काका त्यांना पकडायला खाली वाकलो इतक्यात तुझी कि़काळी ऐकू आली आणि त्या पाठोपाठ त्या दोन मुलांच्या पण आरडाओरडा ऐकायला आला . समोर बघितले तर वीजेचा तार त्या मुलांवर पडला होता आणि तु समोर बेशुद्ध पडली होती. याशिवाय तिथे कोणीच नव्हते." आई बोलली. लतिका आ वासून आईकडे बघत राहिली.
"काय म्हणते पेशंट?" आत येत डॉक्टर बोलले. त्यांच्या मागोमाग इन्स्पेक्टर पण आले.
"छान आहे," आई बोलली.
"का गं काय झालं अशी काय बघतेस?" डॉक्टरांनी लतिकाला विचारले.
"अं.... " ती अडखळली.
"तु सांगू शकतेस का काल काय झाले?" मध्येच इन्स्पेक्टरांनी प्रश्न विचारला.
तिका ने काल काय काय घडले ते हळूहळू सांगितले. संकेतचा उल्लेख येतात आश्चर्याची लकेर त्यांच्या डोळ्यात तरंगली.
"मिस लतिका तुम्हाला संकेत कुठे भेटला?"
लतिका ने थोडक्यात त्यांना सांगितले.
"संकेतने सांगितले होते का तो कुठे राहतो?"
"हो, आमच्या टाऊनशिप घ्या थोड्या दूर ऑलिव्ह टाऊनशिप आहे ना तो तिथे राहतो. इन्स्पेक्टर काल तो तिथे होता. त्यानेच मला पडण्यापासून वाचवले होते. पण आईबाबांना तो दिसला नाही."
"कसा दिसणार मिस लतिका. संकेतचा आणि त्याच्या होणा-या बायकोचा मागच्या वर्षी कोणीतरी खुन केला होता.
"काय?" लतिकाच नाही तर तिचे आईबाबा ही ओरडले
"हो, आणि संशयितांमध्ये या दोन मवालींची नावे होती पण पुराव्याअभावी त्यांची सुटका झाली होती." इन्स्पेक्टर बोलले.
"खुप दिवस नाही राहणार मी," संकेतच्या वाक्याचा अर्थ आज तिला कळला होता. काल खाली कोसळतांना संकेतचा अस्पष्ट स्वर तिला ऐकू आला होता, काळजी घेशील"
"संकेत," म्हणत तिने डोळे मिटले.तीच्या डोळ्यातून अश्रुंच्या धारा वाहू लागल्या. डॉक्टर आणि इन्स्पेक्टरांच्या डोळ्यांत अविश्वासाचे भाव तरंगत होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा