( सत्य घटनेवर आधारित )
************
नाशिकवरून आईला भेटून मी श्रीरामपूरला निघालो होतो. बसमध्ये इतकी काही गर्दी नव्हती, पण अंतरा अंतराने प्रवासी बसलेले होते. मीही दोन सीट सोडून वाहकाच्या समोरील सीट वर बसलो. लहानपणापासून खिडकीतली जागा माझ्या आवडीची. निवांतपणे बसून येणारा गार वारा, पळणारी दृश्य बघून मनाला शांती मिळायची. मग आपण आणि आपल मनच त्या गतिमान दृश्याबरोबर मग्न होऊन जाण हे नेहमीच होतं. अशावेळी आपलं मन आपल्याला एका वेगळ्याच ठिकाणी घेऊन जात. जेव्हा आपण आपल्या मनासोबत असतो तेव्हा खरं तर कोणाचीच गरज भासत नाही, आपल मनच आपल सोबती असत. कित्येक चांगल्या,वाईट विचारांचं वादळ मनात उठलेल असत, मात्र त्या सर्व विचारांना आपणच साक्षीदार असतो. आपण जर स्वतः मध्ये बघितलं तर आपल्याला बाहेर काही शोधायची गरजच भासत नाही.आपणच आपले वकील आणि आपणच स्वतः गुन्हेगार !!! या प्रवासात एसटी केव्हा संगमनेर जवळ आली ते समजलंच नाही. मधेच मला एक डुलकी पण लागून गेली होती. गाडी बऱ्याच ठिकाणी थांबायची आणि काही प्रवासी उतरत आणि काही गाडीत बसत होती. संगमनेर आता थोड्या अंतरावर राहील होतं. ढोलेवाडीचा थांबा आला आणि वाहकाने नेहमीप्रमाणे सिंगल बेल मारली. चालकाने गाडीचा वेग कमी करून गाडी हळूच थांब्याजवळ डाव्या बाजूला उभी करून ब्रेक मारले.
वाहकाने एका हाताने दरवाजा उघडून "चला, बसा लवकर ". हे नेहमीच्या सवयीप्रमाणे बोलला.
सात ते आठ लोक गाडीत चढण्यासाठी उभे होते, सर्व जवळील खेड्यागावातील असावीत. बारदान्याच्या पिशव्या घेतलेल्या जुन्या नऊवारी साडीतील बायका,पांढर धोतर घातलेली माणसे गाडीत बसण्यासाठी दरवाजाकडे सरसावले. सर्वजण आलेले बघून वाहकाने दरवाजा बंद केला आणि त्याच्या ठरलेल्या लयीमध्ये पुन्हा डबल बेल मारली . सगळे जण गाडीत बसण्यासाठी सोयीस्कर जागा शोधत होते. माझ्या अगदी उजव्या बाजूला मोठे तीन सीटची जागा मोकळीच होती. पाठीमागून एक चाळीसीतील गृहस्थ हातात काठी घेऊन येतांना दिसला, मी जास्त लक्ष दिले नाही, बसमध्ये कित्येक प्रवासी उतरतात आणि चढत असतात. खरंतर त्यांच्याशी आपलं काही नातं नसतं, आपण फक्त काही तासाचे सोबती असतो. अशी भेटणारी लोक आपल्याला आयुष्यात एकदाच भेटतात, पुन्हा हे लोक आयुष्यात कधीच भेटत नाहीत. त्या गृहस्थांनी जवळ येऊन माझ्या शेजारच्या मोठ्या सीटचा आधार घेतला आणि त्याच्या मुलांना आत बसायला सांगितलं. त्याची तीन मुलं सिट वर आत बसली. साधारण दोन वर्षाचे अंतर त्या तिघांमध्ये असेल, एक साधारण आठ वर्षाचा, दुसरा दहा तर तिसरा बारा वर्षाचा बहुदा असावा. त्यांचे वडील बाहेरच्या बाजूने आधार घेऊन माझ्या शेजारी बसले. डोक्यावर मळकट पांढरी टोपी, मळालेला शर्ट, पायजमा. पांढऱ्या दाढीची खुंटे वाढलेली, वयाची फक्त चाळीशी ओलांडलेली असेल पण चेहऱ्यावर वार्धक्य खूप दिसत होतं. इथपर्यंत सर्व ठीक होतं, पण माझं लक्ष जेव्हा त्या तिन्ही मुलांकडे गेले तेव्हा माझा विश्वासच बसेना. ती तीनही मुलं अंध होती.!
मग मात्र मी त्यांच्या वडिलांना निरखून बघितले, त्यांचे वडीलही अंध होते. मला तर धक्काच बसला एकाच वेळी चारही व्यक्ती अंध!!!वडिल आणि मुलं सीटच्या समोर असलेल्या आडव्या रॉडला दोन्ही हाताने पकडून शांत बसलेले होते. मी अचबींतच झालो. वडिलांसहीत ती तीनही अंध मुले बघून माझे डोळे पाणावले. क्षणभर तर मी बघतच राहिलो. मी आतल्या आत अवंढा गिळला. ते दृश्य बघून मला अगदी गहिवरून आल, डोळ्यात आपोआप पाणी भरलं. आधार काय असतो हे दिसत नसतांना सुद्धा ते एकमेकांना आधार देऊन धरून बसले होते आणि आमच्या जवळ सगळं असतांना आम्हाला किती दुसऱ्या कडून अपेक्षा....!! त्यांना काय विचारावे हेच मला कळेना. प्रारब्ध म्हणजे हेच का असा प्रश्न मीच मला विचारला. पुण्यांची कमाई आयुष्यात नक्की मिळते असे म्हणतात मग यांची कमाई हीच होती का? एखाद्याच्या आयुष्यात एवढंही दुःख येऊ नये की त्याची जगण्याची उमेदच नष्ट व्हावी. मला खरोखर राहवत नव्हतं. त्यांच्याशी काय बोलावे हेच कळेना.
" बाबा, ही तीनही मुले बघू शकत नाही का ?" मी न राहून निरर्थक प्रश्न केला.
तस माझ्या प्रश्नात काही वेगळ नव्हतं पण आपुलकी पोटी केलेली ती चौकशी होती.
" हो,रे बाबा. जन्मापासून ते तिघेही आंधळी आहेत. त्यांचं आणि माझ नशीबच फुटकं रे भाऊ, काय करणार "? बाबा उदगारले. मला खूप वाईट वाटले. मला माझ्या नशीबवान असण्याची जाणीव करून देणारे ते वाक्य होते. मी स्वतःला त्या क्षणाला भाग्यवान समजत होतो. माझं धडधाकड शरीर दोन डोळे,दोन हात आणि दोन पाय ह्या संपत्तीची किंमत मला आज समजली होती. डोळे नसतांना हे जग पाहणे हा किती विरोधाभास होता. बुद्धीला हे पटतच नव्हतं.
"बाबा, म्हणजे असं नेमक कस घडलं?" माझ्या मनात प्रश्नांचे वादळ उठले.
बाबांनी सांगितलं "आम्ही दोघे नवरा बायको जन्मताच आंधळी आहोत. आमचे लग्न झाले आणि वाटलं होत वंशाचा दिवा असावा, जो आमच्या जीवनात प्रकाश आणेल पण अजूनही आम्ही अंधारातच आहोत. आम्हीच यांच्या अंधःकारला जबाबदार आहोत रे, दुसरे कोणी नाही. आमच पहिल्या पासून एकत्र कुटुंब. त्यामुळे थोडा फार घरातील इतर नातेवाईकांची मदत मिळते, नाहीतर आमच जगणं अवघड झाल असत.पहिल्या मुलाच्या अंधपणाने आम्ही खरंच खूप घाबरलो. वाटलं होत दुसरं आणि तिसरं मुल तरी जग बघेल पण त्यांच्याही आयुष्यात बघ ना काय लिहून ठेवलंय. "
"बाबा, या गोष्टी आपल्या हातात नसतात. परमेश्वराच्या हातात सर्व काही. जे नशिबात असत ते मिळते."
मी त्यांच्याकडे बघून त्यांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या चेहऱ्यावर काळजीने भरलेला भाव मला स्पष्ट जाणवत होता. वार्धक्य भविष्याच्या काळजीने लवकर येते. एवढ्यात वाहक जवळ आला,
" बोला, कुठ जायचं बाबा?" तिकीट विचारतांनाच त्याच्याही लक्षात त्यांचे अंधत्वाचे रूप आले.
"भाऊ, बाभळेश्वरला जायचं."
"किती तिकीट आहे "? त्याने विचारले.
एक हाताने त्यांनी खिशातील नोट वर धरली. मनुष्य विकलांग जरी असला तरी स्वाभिमानी असला पाहिजे म्हणजे समाजात किंमत राहते व आदरही मिळतो.
"आम्ही चौघ आहोत साहेब...". मुलांच्या वडिलांनी सांगितले.
"बाबा,मुलांना दिसत नाही वाटत." वाहकाची नजर मुलांकडे गेली.
"हो साहेब, आंधळी आहेत तिघेपण."
" राहूद्या पैसे तुमच्याकडे,
मी काढतो सगळ्यांची तिकीट. असं म्हणत वाहकाने त्यांना पैसे परत दिले. माणुसकी जिवंत असली की दुसऱ्याचं दुःख समजते. माणुसकी संपलेली असली की मनुष्य मेलेल्या माणसाच्या टाळूवरच लोणी सुद्धा खायला कमी करत नाही. या एवढ्या वेळात माझ्या मनात विचारानीं अगदी थैमान घातले होते. समुद्रात उंच लाटा उठाव्या आणि किनाऱ्यावर आदळाव्या तशी विचारांची शृंखला स्वस्थ बसू देईना. मी मलाच हात लावून तपासू लागलो. परमेश्वराने दिलेले डोळे मला पहिले आठवले. संपूर्ण तंदुरुस्त शरीर मला दिले होते. कोणतही व्यंग माझ्याजवळ नव्हतं. निरोगी माणसाला आपल्या जवळ किती अनमोल गोष्टी परमेश्वराने दिल्या आहेत हे कधी दिसत नाही पण सर्व असून सुद्धा जे जवळ नाही त्या साठी मात्र तो रडत असतो. दिवस रात्र पळत असतो हे अगदी खरं आहे. आज त्यांना फक्त डोळे असावे एवढीच त्यांची इच्छा होती. आमच्याकडे मात्र सगळं असताना सुद्धा आमच्या इच्छा संपत नाही हे एक कटू सत्य आहे . सगळ्या गोष्टी एकदम मिळाल्या की त्याची जाणीव आणि महत्वही राहत नाही. एवढ्यात कधी बाभळेश्वर चा स्टॉप आला मला कळलच नाही.
"चला, बाभळेश्वर कोणी आहे का?"
वाहकाने सिंगल बेल मारली. माझ्या समोर बसलेल्या चौघाची एकच घाई उडाली. त्यांचा तो रस्ता शोधण्याची धडपड पाहून मला खूप वाईट वाटले. आता जीवनाच्या प्रत्येक वाटेवर त्यांना अशी धडपड करायची होती. जीवनातला प्रत्येक क्षण त्यांचा असाच अंधारमय असणार होता. त्यांच्या जीवनात दृष्टीचा प्रकाश पडेल अशी सुतनाम शक्यता दिसत नव्हती. संपूर्ण आयुष्य त्यांचं अंधकारात जाणार होतं. माझा हात नकळत पाकिटाकडे गेला. पाकिटातून शंभर रुपयांची नोट काढून बाबांच्या हातावर ठेवली. त्यांनी ती नोट स्पर्श होताच अलगद मूठ उघडून हातात घेतली. मला खूप बरे वाटले. त्यांनी तीच मूठ अंदाजाने माझ्या डोक्याकडे करत,
"कल्याण होईल तुझे" असा अंतकरणापासून पासून आशीर्वाद दिला. असे निःस्वार्थ आणि प्रामाणिक माणसाकडून मिळालेले आशिर्वाद खरे ठरतात असे म्हणतात. मला तो आशीर्वाद आणि डोक्यावर केलेला हात आजही आठवतो. पण एक खरं आहे, पुन्हा आयुष्यात कधी कोणतीच गोष्ट कमी पडली नाही. आयुष्यात खरोखर कल्याण होतं गेले. दिलेले आशिर्वाद कामी येतात फक्त ते अंतकरणापासून दिलेले हवेत. आई-वडिलांचे आशीर्वाद असेच अंतकरणापासून असतात म्हणून आई-वडिलांचा सांभाळ शेवटपर्यंत करायचा असतो त्यांच्या आशीर्वादासाठी. त्या आशीर्वादांमध्ये आपल्या आयुष्याचं भलं करण्याची ताकद असते. माझं बघून मग वाहकाला पण दया आली, त्याचाही हात चामड्याच्या पिशवीत गेला. उतरणाऱ्या शेवटच्या मुलाच्या हातात शंभर रुपयांची नोट ठेवत त्यांना खाली उतरून दिले. दरवाजा बंद करून वाहकाने डबल बेल मारली. मी त्यांना नजरेआड होईपर्यंत पाहत होतो, एका रांगेत चौघेजण काठीला धरून रस्त्यावर उतरले आणि नजरेआड झाले.
एक छोटासा काही तासांचा हा प्रवासातील व्यक्ती अनुभव होता पण खूप काही जीवनाबद्दल शिकवून गेला. सांगून गेला. आज कित्येक वर्षांनी पुन्हा तो प्रसंग आठवला की पहिला प्रश्न पडतो काय परिस्थिती असेल त्या चौघाची? कोठे असतील ते आता? जीवन जगत असतील की जग बघत असतील? कोणी डोळे दान केले असतील का त्यांना?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा