वृद्धाश्रमाच्या आवारात एक कार थांबली. बाहेर उतरला एक सुटसुटीत कपडे घातलेला, तीशीतला पुरुष — चेहरेपट्टीवर आत्मविश्वास, पण डोळ्यांमध्ये अस्वस्थतेचे सावट. सोबत होते त्याचे वडील — वयाची सत्तरी पार केलेले, केस पांढरे, पाठीवर थोडा कणा वाकलेला, पण चेहऱ्यावर अजूनही एक शांत, समाधानी झळक.
"बाबा, काही दिवस इथे राहा... मला कामं खूप असतात. घरी एकटं ठेवणं मला योग्य वाटत नाही," मुलगा म्हणाला, थोडसं हसत.
वडील काही बोलले नाहीत. केवळ एक मंद, समजूतदारशी हसू दिलं आणि हलकंच माना हलवली.
तरीही न सांगता खूप काही बोलून गेले ते डोळे...
मुलगा वडिलांना ऑफिसमध्ये सोडून परत फिरू लागला. बाहेरच्या गेटकडे जाताना त्याचं लक्ष पडलं — वडील एक खुर्चीत बसले होते आणि वृद्धाश्रमाचे संचालक त्यांच्याशी हसतमुखपणे बोलत होते. दोघांमध्ये काहीतरी खास ओळख आहे, असं वाटलं त्याला. कुतूहलाने तो परत वळला.
"सर, तुम्ही माझ्या वडिलांना ओळखता?" त्यानं विचारलं.
संचालक थोडंसं हसले, त्यांच्या डोळ्यांत ओळखीचा उजेड चमकला.
"हो... फारच जुनी ओळख आहे. आजपासून तीस वर्षांपूर्वी तुमचे वडील आमच्या अनाथाश्रमातून एक सात-आठ वर्षांचा मुलगा दत्तक घेऊन गेले होते..."
एक क्षणासाठी वेळ थांबल्यासारखा झाला.
त्या तरुणाचे पाय थरथरले... श्वास अडकला... हृदयाची धडधड अचानक वाढली.
"तो मुलगा... मीच?"
संचालक फक्त मंदसं हसले. त्यांच्या चेहऱ्यावर एक करूण स्मित होतं.
"हो... आणि आज, तोच मुलगा आपल्या वृद्ध वडिलांना इथे सोडून चालला आहे.
कधी कधी चांगले कर्मही माणसाला त्याची किंमत चुकवायला लावतात..."
ते शब्द त्याच्या काळजाच्या खोल गाभ्यात घुसले. एकाएकी त्याला त्याच्या लहानपणीचे क्षण आठवले — बाबा कसे शाळेत पोचवायचे, आजारी असताना अंगावर रात्रभर बसून राहायचे, त्याच्या प्रत्येक यशात भरभरून हसायचे, आणि त्याच्या प्रत्येक अपयशात खंबीरपणे पाठिशी उभे राहायचे.
त्या साऱ्या आठवणी, त्या प्रेमाचे प्रत्येक क्षण त्याच्या डोळ्यांसमोर चित्रासारखे तरळले...
काही क्षण तो स्तब्ध उभा राहिला. मग धावत वडिलांच्या पायाजवळ जाऊन बसला.
"बाबा... मला माफ करा... मला माफ करा... मी चुकलो...
तुमचं प्रेम, तुमचा त्याग, तुमचं आयुष्य... मी विसरलो.
चला, आपण घरी जाऊया."
वडिलांनी डोळ्यांतल्या अश्रूंना सावरणंही आवश्यक वाटलं नाही. दोघांनाही एकमेकांच्या मिठीतच शब्द सापडले...
-
कधीही विसरू नका —
ज्यांनी आपलं बालपण घडवलं,
तेच आपलं आयुष्य घडवण्याची प्रेरणा देतात.
आईवडिलांचं प्रेम कधीच ओझं नसतं,
ते फक्त ओंजळीत घेण्यासारखं असतं...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा