शनिवार, २ ऑगस्ट, २०२५

2124. अन दामले आज्जी हरवल्या

       दामले आजींना फिरायची भारी आवड होती पण आता त्याच्यावर जरा बंधन आली होती. तसं त्यांना घरचे फारसे बाहेर पाठवायला नाखूश असत कारण आजींनी एकटीने खरेदी करून येताना एक दोनदा घर विसरून बाकीच्यांची फार मोठी फजिती उडवून दिली होती. त्यांना शोधता शोधता आजोबा मुलगा सून आणि नातवंडं सगळेच हैराण झाले होते. आज आजींना चांगली संधी मिळाली होती. मुलगा ऑफिसला गेला होता. सुनेच्या माहेरी  लग्न होतं म्हणून रजा टाकून ती आणि नातवंडं पण त्या लग्नाला गेली होती. आजोबा ऐकू येत नसल्यामुळे मोठ्या मोठ्यांदा टीव्ही लावून वेगवेगळी चॅनल बदलत टीव्ही समोर बसले होते. आजोबांना दुपारचा चहा आणि खायला देऊन आजोबांचं लक्ष नाही असं बघून आजी हळूच घराबाहेर सटकल्या. तसं आजींनी पैसे वगैरे बरोबर घेतलेले होते पण मोबाईल वापरणं त्यांना सुधरत नव्हतं आणि पटतही नव्हतं. त्यामुळे एक छोटी पाण्याची बाटली पैसे असं पर्समध्ये घालून त्या निघाल्या. त्यांनी अगदी ठरवून ठेवलं होतं की सुनबाई आणि नातवंड मुलगा सगळे घरी यायच्या आत आपण पटकन परत यायचं. कधी कोणी मला एकटीला सोसायटीबाहेर जाऊ देत नाही. कधी हे सोबतीला येतात, कधी नातवंड येतात. कधी शेजारच्या वहिनींना सांगतात. आज मिळाली संधी तर त्याचा लाभ घ्यायचाच आणि छान पैकी एकटीने फिरून यायचं.
      आजी बाहेर पडल्या. सोसायटीच्या फाटकातून बाहेर गेल्या .रमत गमत इकडे तिकडे बघत चालायला लागल्या. वाटेत उसाचं गुऱ्हाळ दिसलं छान पैकी रस प्यायला, अजून थोडं चालत चालत पुढे गेल्या रामाच्या देवळात गेल्या. तोवर तहान लागली होती त्यामुळे त्या छोट्या बाटलीतलं पाणी पण पिऊन झालं. आजकाल देवळात काही कीर्तनं नसतात हो, नुसतं नमस्कार करावा आणि यावं परत असं स्वतःशीच म्हणत म्हणत देवळात गेल्या. दर्शन घेतलं, पायरीवर टेकल्या. ओळखीचं कोणीही दिसत नव्हतं त्यामुळे जरा वैतागल्या. इतक्यात पावसाची सर आली .त्यामुळे आजींना अजून थोडा वेळ तिथेच थांबावं लागलं. पाऊस उघडला तसं मात्र आजींनी ठरवलं की आता आपलं पटकन घरी जावं हे बरं. केलं तेवढं साहस पुरे. सून घरी पोहोचली असेल तर आपण एकट्याच बाहेर गेलो म्हणून डाफरेल आणि वर नवऱ्याच्या पण कानाशी लागेल, त्यापेक्षा आळी मिळी गुपचिळी ! या कानाचं त्या कानाला कळू न देता कोणीही घरी यायच्या आत घरी पोहोचावं म्हणजे झालं.  रामाच्या देवळापासून बाहेर पडल्यानंतर डावीकडे वळून दोन गल्ल्या जायचं मग उजवीकडे वळायचं मग मेन रोड येतो तो क्रॉस केला आणि एक चौक ओलांडला की आपली सोसायटी असं त्यांच्या डोक्यात पक्कं बसलेलं होतं आणि ते बरोबरही होतं. पण आज काहीतरी गोंधळ झाला आणि आजी रामाच्या देवळापासून डावीकडे वळण्याच्या बदली काही अंतर सरळ गेल्या मग उजवीकडे गेल्या आणि पुढे कुठे वळलो हे त्यांना काही समजेचना.
       आतापर्यंत सूर्य मावळायला आला होता. आजींना वेळेचा काही अंदाज येत नव्हता. त्यांनी रस्त्यातून जाणाऱ्या दोन मुलांना थांबवून किती वाजले ते विचारण्याचा प्रयत्न केला पण त्या मुलांनी कानात बुचं (इयरफोन्स) घातलेली होती त्यामुळे त्यांना काहीही समजत नव्हतं. आजींकडे वळूनही न बघता ती मुलं निघून गेली. एक माणूस  कुत्र्याची साखळी धरून मोबाईल वर बोलत बोलत चालला होता. त्यामुळे त्याला विचारण्याचा काही प्रश्नच येत नव्हता. मग एक मध्यमवयीन बाई दुचाकीवरून येत होती. पुढे सामानाच्या पिशव्या आणि चेहऱ्यावर दमलेले वैतागलेले भाव !आजींनी कसाबसा हात करून तिला थांबवलं. ती थांबली. आजींनी तिला किती वाजले विचारलं. साडेसहा वाजलेत, काय कमी नाही. अजून पोळ्या व्हायच्यात, गुड्डीला क्लास मधून घ्यायचं सासूबाईंची औषधं घ्यायची, हे येतीलच इतक्यात असं बडबडत  बाईंनी आपली दुचाकी परत सुरू केली. आजींना त्यातून कसाबसा साडेसहा वाजलेत हा बोध झाला. आता आजी थोड्याशा गांगरल्या. कारण त्यांना माहिती होतं की आतापर्यंत सून आणि नातवंडं नक्कीच घरी येतील. समजा ती आली नसतील तरी आजोबांचा टीव्ही बघून झालेला असेल. सोसायटीच्या आवारात फेऱ्या मारून झालेल्या असतील आणि आता आपली शोधाशोध सुरू होऊ शकते.  पण आता आजींना काही केल्या आपल्या घराचा रस्ता आठवेना. 
      आजी अगदी हवालदिल झाल्या आणि इकडे तिकडे बघायला लागल्या तर त्यांच्या असं लक्षात आलं की त्या एका बंगल्याच्या बाहेर उभ्या होत्या. एक छोटी मुलगी आणि कुत्रा त्या बंगल्याच्या अंगणामध्ये चेंडू पकडापकडी करत होते. आजींचा भांबावलेला, गोंधळलेला चेहरा बघून त्या मुलीने आजींना विचारलं की  कोण हवंय तुम्हाला? तुम्ही आमच्या घरी आलात का? आजी दमल्या होत्या. तहानही लागली होती. शिवाय डोक्यात चक्रं देखील चालू होती. आजींना काही सुधरलंच नाही. मुलीने परत विचारलं तर आजी म्हणाल्या पाणी हवंय. मुलगी घरात गेली आजींना पाणी आणून दिलं आणि ती घरातून आईला देखील घेऊन आली.
 आई, आई ,कोणीतरी आजी आल्यात बघ आणि सॉलिड कन्फ्युज दिसतात.
एरवी कोणीही आलं तरी जोरजोराने भुंकून घर डोक्यावर घेणारा कुत्रा मात्र अगदी शांतपणे आजीकडे बघत उभा होता. जणू काही मामला गंभीर आहे त्याच्याही डोक्यात शिरलं होतं. अनोळखी बाईना आपल्या अंगणात  घेतलेलं बघून मुलीची आई मुलीवर संतापली. पण आजींचा कावराबावरा चेहरा बघून काहीतरी गोंधळ आहे हे तिच्या लक्षात आलं. तिने पटकन घरातून स्टूल आणलं आजींना बसायला दिलं. आणि ती आजींची चौकशी करायला लागली कुठून आलात? नाव काय घरी कोण असतं? आजीने नाव तर व्यवस्थित सांगितलं पण आजींना कुठून आलात हे काही सांगता येईना. आजी म्हणाल्या रामाच्या देवळातून आल्ये. 
     हो ,पण तुमचं घर कुठे आहे? तुम्हाला घरी सोडू का? रिक्षा करून देऊ का? आजींना कुठल्याही प्रश्नाचे धड उत्तर देता येत नव्हतं आणि आता रडूच फुटायचं बाकी होतं. शेवटी मुलीच्या आईने विचारलं तुमच्याकडे मोबाईल आहे का? आजींनी नकारार्थी मान हलवली. बरं, घरातल्या कोणाचातरी मोबाईल नंबर सांगा. मी त्यांना फोन करून बोलवून घेते. तर कोणाचाही मोबाईल नंबर आजींना सांगता येत नव्हता. तुमच्याकडे काही नाव पत्त्याचा कागद दिलाय का, तुमच्या डॉक्टरांचा फोन नंबर वगैरे तुमच्या जवळच्या पिशवीत  आहे का? त्यालाही  नकारार्थी मान हलली. आजींना आता मनोमन स्वतःचाच राग यायला लागला होता.  त्या कुठेही बाहेर निघाल्या की सून तीन-तीनदा सांगायची की अहो मोबाईल घेऊन जा बरोबर. मी तुम्हाला किती वेळा दाखवलंय ना की त्याच्यात मी आमची नावं घालून मोबाईल कसा सेट केलाय ते. समजा तुम्हाला फोन लावता नाही आला तरी दुसऱ्या कोणाला तरी सांगून तुम्हाला आपल्या घरी फोन लावता येईल. तेव्हा आजी म्हणाल्या होत्या की काही नकोय ती कटकट मला. मोबाईलची काय गरज आहे? इथल्या इथे तर जाते मी. मुलाने, नातवंडांनी आजोबांनी सगळ्यांनी आजीला समजावून झालं होतं की बरं ते नाही तर नाही आधार कार्डची झेरॉक्स तरी जवळ ठेव .आजींना तेही मान्य नव्हतं. हे सगळं आठवून  परत परत भरून यायला लागलं. सून चिडचिड करते तरी जीव लावते, मुलगा बोलतो ते प्रेमापोटीच हे सगळं आजींना स्पष्टपणे जाणवलं.
    आता मात्र आजींनी रामाला प्रार्थना करायला सुरुवात केली "रामराया, एकदाचं सुखरूप घरी पोहोचव रे बाबा. इथून पुढे कधी विसरणार नाही, मोबाईल जवळ ठेवीन. पत्त्याचा कागद सुद्धा जवळ ठेवीन. रामराया, एक कर ही बाई भली दिसते. हिला मला पोलीस स्टेशनला न्यायची बुद्धी नको देऊ."
       आता मुलीच्या आईला पण टेन्शन यायला लागलं. कुठून ही ब्याद  मुलीने आपल्या अंगणात घेतली असं तिला वाटायला लागलं. ती रागाने डोळे मोठे करून मुलीकडे बघायला लागली तेवढ्यात मुलीच्याच लक्षात आलं आणि ती म्हणाली आई एक काम कर नं आजींच्या पर्समध्ये कोणाचं काही कार्ड बीर्ड आहे का बघ ना ! आपल्या आजोबांच्या बॅग मध्ये, माझ्या स्कूल बॅग मध्ये तू ठेवतेस ना तुझं आणि बाबांचं कार्ड, तसं काही असेल तर? आईने हात पुढे केला. आजींनी पर्स दिली. दुर्दैवाने आजींच्या पिशवीत तसं कुठलंही कार्ड नव्हतं. आजींना घराच्या जवळची खूण विचारली तर आजी सांगत होत्या की कायशी मोठीशी बँक आहे. बँकेच्या दारात गुलमोहराचं मोठं झाड आहे. त्याच्या उजवीकडे गेलं की आमची सोसायटी लागते हो. फार मोठी नाही आमची सोसायटी चार-पाचच बिल्डिंगी आहेत. आता आईने हातातल्या मोबाईल वर गुगल मॅप उघडला आणि त्याच्यावरती त्या परिसरातल्या बँका शोधायला लागली. एकीकडे ती स्वतः ही आठवत होती की आपल्या परिसरात कोणत्या बँका आहेत वगैरे.
      मॅप वर एखादी बँक सापडली की त्याचा फोटो दाखवायची आणि विचारायची ही आहे का असं दोन-तीनदा झाल्यावर एकदाची एक बँक आजींनी ओळखली. मग मुलीच्या आईने रिक्षा केली. मुलगी, आई, मुलीचा कुत्रा आणि आजी अशी सगळी वरात रिक्षातून त्या बँकेपाशी गेली. तिथे गेल्यावर सुदैवाने पुढचा रस्ता आजींना सांगता आला आणि मुलीने आणि तिच्या आईने आजींना एकदाचं सुखरूप घरी पोहोचवलं. तोपर्यंत घरामध्ये पुरेसा गोंधळ झालेलाच होता. पण आजी सुखरूप घरी आल्यामुळे सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला, छोट्या मुलीचं आणि तिच्याबरोबर तिच्या कुत्र्याचं पण आजींच्या घरच्यांनी खूप कौतुक केलं. आजींच्या  घरून  पाहुणचार घेऊन परत जाताना आईने पण मुलीचं खूप कौतुक केलं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...