आज दुपारी मंडईत बससाठी थांबलो होतो..बस आली. पुण्याच्या रिवाजानुसार उभी करून ड्रायव्हर चहाला गेले...गर्दी नव्हती.
पुढच्या दारातून एक फिरता विक्रेता बसमध्ये चढला.पिशवीतून दोन हातात दोनदोन पुस्तके काढली आणि भाषण सुरु केले...
या विक्रेत्यांची भाषणे मला नेहमीच काहीतरी शिकवत असतात.
कधीकधी प्रोडक्ट नाविन्यपूर्ण असते..कधीकधी विक्रेते अत्यंत उद्धट भाषेत बोलत असतात..आत्ता घेतलं तर ठीक आहे..पुन्हा हा माल बाजारात मागितला आणि शोधशोधशोधला तरी मिळणार नाही, हे प्रभावीपणे पटवून देत असतात...घासाघीस करणाऱ्या गिऱ्हाईकाला जागेवर आणतात...मजामजा चालू असते..
आज मी माझ्याच नादात आणि पायपीट झाल्याने डोळे मिटून बसलो होतो..खर्जातील आवाज आणि स्पष्ट पुणेरी मराठीतील शब्दोच्चार ऐकून डोळे उघडले.
पुसली की कोरी होणारी वही विकता विकता त्या माणसाने त्याच्या भाषेचे कसब पणाला लावले होते..
मला त्या माणसाबद्दल कुतूहल वाटले.
त्यांची दोन पुस्तके खपली...मागील दराने उतरत असताना मी हटकले.
हाक मारली...
" बसा.. " मी म्हणालो..
'" सर, वह्या घेणार ? "
" नको..मी तुमचं कौतुक करण्यासाठी थांबवलं...तुम्ही उत्कृष्ट विक्रेते आहात..तुमची भाषा समृद्ध आहे...."
" थान्क्यु, सर.." आता थक्क व्हायची पाळी माझी होती..
" आत्ता आपली बस जिथं उभी आहे, त्याच्यामागे मंडईत माझ्या वडलांनी बांधलेली तीनमजली इमारत आहे..माझ्या धाकट्या बंधूंना कुलूप ठेवायला एवढया मोठया घरात जागाच सापडली नाही..म्हणून नाईलाजाने त्यांनी बाहेरूनच कुलूप लावले आहे...माझे नशीब, मी आत नव्हतो...
मोठ्या बंधूंनी माझं अक्षर सुरेख आहे, त्याचा नमुना कायम स्वतःजवळ असावा म्हणून माझी सही घेतली..माझ्या नशिबाने तो कागद सरकारी राजस्व विभागाचा होता...आणि वडिलोपार्जित दुकानात आता माझा वाटा मी खुशीने सोडत आहे, असा मजकूर त्यावर किरट्या अक्षरात टंकित केलेला होता.."
हा इसम मला अतिसभ्य भाषेत विलक्षण धक्के देत होता...
" माझे कुणाशीही वितंडवाद नाहीत..देवदयेने दोन वेळेस जेवतो..जवळच जिलब्या मारुतीचे मंदिर आहे. त्याच्या शेजारी शहाळी विकणारा एकजण बसतो बघा..तिथे मी रात्री असतो.."
मला आतून वाटले की या माणसाबरोबर घोटभर चहा प्यायला हवा..काहीतरी बोलायला हवे..
" भाऊ, नेमका आज नाझ्या खांद्यावर कॅमेरा नाही, नाहीतर एक फोटो काढून ठेवला असता..पण मी नंतर नक्की गाठीन तुम्हाला.."
" जरूर भेटू.मी कायम मंडईतच असतो असं नाही.. मी स्वारगेटला असतो. हडपसरला असतो. पुणे स्टेशनवर विकतो..जिथेजिथे पालक असतात तिथे मी ही पुस्तके विकतो..काय आहे साहेब, लहान वयात मुलांचे अक्षर घोटून घ्यायला हवे..माझ्या पुस्तकात बाराखडी आहे..इंग्रजी एटूझेड अक्षरे आहेत.."
" सर, तरुण मुलं हुशार झाली पाहिजेत..शिकली पाहिजेत.मी माझं काम इमानदारीत करतोय.."
बसमधील दोन म्हातारे आमचं बोलणं ऐकत होते..पण त्यांनी संभाषणात भाग घेतला नाही.
कदाचित भाऊबंदांनी वडिलोपार्जित इस्टेट लुबाडण्यात जी गंमत असते, ती त्यांना आवडत नसावी..
मी आतून होणारा गलबला दाबत त्याचा हात घट्ट धरून ठेवला..त्यानेही तो झिडकारला नाही.
" कॉम्रेड, मी फार चिल्लर माणूस आहे. थोडासा लेखक आहे...मी पुन्हा कॅमेरा घेऊन भेटेन.." मी म्हणालो..
मी ' लेखक आहे..' हे कानावर पडताच त्याचा चेहरा बोलका झाला...विक्रेत्याचे शालीन भाव थोडे बदलले...
" सर, तुम्ही बरे झाले भेटलात..मला खूप लिहावेसे वाटते...माझ्याजवळ लिहिण्यासारखे , बोलण्यासारखे खूप आहे...सर, मी सतत गर्दीत असतो... तुम्ही आधी मी सांगतो ते लिहा..
बाईवर बळजबरी करणाऱ्या माणसाचे कायद्याने हातपाय कापायची शिक्षा आपल्या देशात करायला हवी. तरण्या बायका, शाळकरी मुलींना इथेतिथे हात लावणाऱ्या माणसांचे हात तोडायची शिक्षा द्या आणि असल्या गुन्ह्यांना फाशी नको.त्याऐवजी एक हात आणि एक पाय तोडून ही माणसे सार्वजनिक ठिकाणी, मुलांच्या शाळांसमोर दिवसभर बसवून ठेवा...आत्ता शाळेत जाणाऱ्या मुलांना, तरुणांना हे गुन्हेगार सतत दिसले पाहिजेत. सर, माझ्यासारख्या माणसाकडे सत्ता नाही. ती तशी कधीच नसते. मी गुन्हेगारांना वठणीवर नाही आणू शकत. म्हणून लहान मुलांना हुशार करावे असे वाटते.."
श्यामची आई हे पुस्तक घरोघर विकणारे आमच्या नितीन पुराणिकचे वडील एकदम आठवले..
" सर, मी गर्दीत हे रोज पाहतोय.
सोसणाऱ्या बायकांचे शाप या सरकारला, पोलिसांना, पुरुषांना कळू देत...."
-----------
कंडक्टरकाका तिकीट फाडायला आल्यावर कॉम्रेड उठला.
त्याचे मन अर्धवट मोकळे करून निघून गेला.
त्याचे केस अर्धवट पिकले आहेत. साधे पण फटके नसलेले कपडे अंगावर असतात.
वरचे तीन दात पडलेले आहेत..
अतिशय प्राज्ञ मराठी बोलणारे सभ्य विक्रेता श्री. नामदेव खंडोजी जमदाडे पुण्यात तुम्हाला कुठेही सापडले., तर त्यांच्यावर लक्ष ठेवा.
---------
आणि त्यांना शक्यतो बोलतं करू नका.
नंतरचा दिवस उगीच अस्वस्थ व्हाल..
----------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा