बुधवार, ६ ऑगस्ट, २०२५

2141. म्हणून प्रत्येक माणसाला पाठबळ हे हवेच

  पाठबळ या शब्दाचा अर्थ काय? तर पाठिंबा / आधार हा होय.
      पूर्वीच्या काळी आणि आताही दोन देशात युद्ध सुरू झाले तर किंवा इतर जागतिक विषयावर एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्यावरची चर्चा,किंवा निर्णय घेतला जातो त्यावेळी त्या देशांच्या मागे कोणाकोणाचे पाठबळ आहे हे नक्की विचारात घेतले जाते.
    शिवाजी महाराज पराक्रमी, निर्णय क्षमता असलेले लढवय्ये राजे होते हे आपण सर्वजण जाणतोच पण आईचे संस्कार विश्वास प्रेम, तसेच त्यांना मावळ्यांचे पाठबळ मिळाले ही त्यांच्या यशातील उजवी बाजू आहे हे पण लक्षात घेतले पाहिजे.
     हे आपण संभाजीराजांच्या पाठबळाबद्दल बोलता येत नाही. इतका शूर राजा पण आई, बाबा, आजी नसणे, आप्तच शत्रुगोटात सामील होणे या अशा अनेक कारणांनी त्यांचे पाठबळ कमी होऊन दुर्दैवी अंत झाला असे मला वाटते.
    आपल्याच लोकांची साथ नसणे (पाठबळ) या मुळे बाजीराव, मस्तानी यांचा दुर्दैवी शेवट झाला. सगळ्यात मोठी पानिपतची लढाई हरण्यातील अनेक कारणांपैकी हे पण एक कारण आहे.
     पाठबळ मग ते कुठेही असो, कुटुंबात, समाजात, नोकरीच्या ठिकाणी सगळीकडे महत्वाचे आहे. एखाद्या मुलीचा सासरी छळ होणे, तिला मरणाला सामोरे जावे लागणे याचेही कारण तिला ना सासर, माहेर मधल्या कोणाचे पाठबळ नसते हे प्रमुख कारण असू शकते.
     एकूणच कुठल्याही व्यक्तीच्या प्रगतीत त्यांचे स्वतःचे कष्ट, बुद्धिमत्ता, योग्य संधी नक्की असते त्याबरोबरच आर्थिक, मानसिक मिळालेले पाठबळ ऊर्जा टिकवून ठेवते हे ही महत्त्वाचे आहे ना? 
    कधी कधी चुकीच्या बाबतीत (गुंड,राजकारणी) मिळालेले पाठबळ समाजात दहशत निर्माण करते हे ही आपण अनुभवतो.
     मला वाटते प्रेमाचे, पैशाचे, अडचणीच्या वेळी मिळणाऱ्या योग्य आधाराचे पाठबळ मिळायलाही कुठेतरी देवाचा आशीर्वाद हवा जसा अर्जुन, द्रौपदीला मिळाला.
    एकूण जन्म ते मृत्यूपर्यंतच्या प्रवासात प्रेम आधार, खंबीर साथ, खडतर प्रसंगात पाठीवर हात ज्यांना जास्त प्रमाणात मिळते त्यांचे जीवन सर्वार्थाने फुलत राहते. आपणाला काय मिळते याचा हिशोब न करता आपण आपल्याला शक्य आहे तितका पाठिंबा इतरांना देणे हे तर आपल्याच हाती असते ना? प्रत्येक वेळी आर्थिक पाठिंबा देणेच गरजेचे आहे असे नाही. आपल्या प्रेमाच्या दोन शब्दांनी आणि पाठीवर ठेवलेल्या हातांनी सुद्धा जीवनात "अर्थ"आहे असे वाटू शकते..हो ना?
    संकटे कर्माप्रमाणे आली तरी पाठीशी श्रीकृष्ण हवा.. हो ना? त्यामुळे मी नेहमीच श्रीहरीला प्रार्थना करते पुढचे भवितव्य मला माहीत नाही पण तुझे पाठबळ असेल तर सुख असो वा दुःख मी तरणार हे नक्की.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...