बुधवार, ६ ऑगस्ट, २०२५

2134. बिन मुखवट्याचा समाधानी माणूस

 पावसाळी सहल संपवून आमचा परतीचा प्रवास नुकताच सुरू झाला होता.
धुवांधार पाऊस कोसळत होता.
निसर्गाने हिरवागार गालिचा पसरला होता दोन्ही बाजूला.
खड्डे चुकवत आमची गाडी सावकाश चालली होती.
मध्ये अचानक एक चाळीशीचा माणूस एका हातात छोटी मुलगी आणि दुसऱ्या हातात छत्री सावरत सावरत चाललेला दिसला आणि आम्हाला सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
मनांत विचार आला चटकन की हा माणूस त्या छोट्या मुलीला घेऊन येवढ्या पावसात कुठे बरं चालला असेल?
माझ्या मित्राने चटकन गाडी थांबवली. तो माणूस जवळ आल्यावर गाडीची काच किंचित खाली करून माझ्या मित्राने त्याला त्या बाबतीत विचारले. तेव्हा त्याच्याकडून कळलं की त्या माणसाला वाड्याच्या एसटी डेपो जवळ जायचे होते. आम्ही त्या दोघांना गाडीत घेतले. तो माणूस मुलीला तिच्या मामाकडे घेऊन चालला होता.
गाडी सुरू झाली. त्याच्या कष्टमय जीवनाची कहाणी आम्ही विचारली म्हणून त्याने सांगितली . ती ऐकून आमच्या अंगावर शहारे आले आणि मन केविलवाणं झालं. 
सहा महिने वीटभट्टीवर काम आणि उरलेल्या दिवसात घरची शेती करायचा तो. त्याला तीन मुली. वीटभट्टीवर काम करून पैसे साठवून मोठ्या मुलीला पुण्याला नर्सिंगच्या कोर्सला पाठवले आहे असं सांगताना त्याच्या डोळ्यांतून लकलकणारा आनंद आणि स्वाभिमान आम्हा सर्वांना थक्क करून गेला.
त्याच्या चेहऱ्यावर ठाण मांडून बसलेल्या हास्याचे रहस्य त्याने आम्हाला सांगितले.
"देवाने माणूस म्हणून जन्माला घातले . त्याचे आभार मानण्यासाठी रोजचा दिवस नवीन म्हणून जगतो आम्ही चेहऱ्यावर हसू आणत. आम्ही करतो ते कष्ट शिक्षा म्हणून न मानता देवाचा प्रसाद मानतो. त्यामुळे त्या प्रसादाचा गोडवा आमच्या चेहऱ्यावर कायम दिसतो बघणाऱ्याला."
नकळत आमच्यापैकी प्रत्येकाने त्याच्या बोलण्याची तुलना पावलोपावली क्षणिक सुखासाठी मशीनप्रमाणे राबणाऱ्या आपल्या आयुष्याशी केली. बारीकसारीक गोष्टी मिळवण्यासाठी आपण करत असलेली लढाई आणि त्या जर का त्या मिळाल्या नाहीत तर ताबडतोब येणारी निराशा आणि नैराश्य आठवलं.
जगण्यासाठी खरंच काय हवं असतं हेच ऐहिक सुखाच्या भ्रामक कल्पनांच्या जाळ्यात अलगद अडकून आपण विसरत चाललो आहोत हे त्या सुखी माणसाकडे बघून आमच्या पैकी प्रत्येकाला उमगले.
"आमचे रोजचे कष्ट आमचा श्वास आहे आणि म्हणूनच ते कष्ट करायचे आम्ही थांबवू शकत नाही तर त्यांतच सुख समाधान आणि आनंद शोधतो आम्ही."
त्याचं उतरायचे ठिकाण आले. आमच्या पैकी एकाने दरवाजा उघडून त्याला उतरायला मदत केली. एव्हाना खाणाखुणा करून आमच्या पैकी प्रत्येकाने शंभर रुपये काढून त्या नोटा छोट्या मुलीच्या हातात ठेवल्या तिला खाऊ म्हणून.
त्याने दोन्ही हात जोडून आमचे आभार मानले आणि बहुतेक त्याच्या ग्रामीण देवाकडे आम्हाला आशिर्वाद देण्यासाठी याचना केली दोन्ही हात जोडून 🙏
आमचा पुढचा प्रवास सुरु झाला पण गाडीत चिडीचूप शांतता पसरली होती.
त्या बिन मुखवट्याच्या समाधानी माणसाच्या खऱ्याखुऱ्या जगण्याच्या धक्क्यातून सावरायला आम्हाला वेळ लागला येवढं मात्र खरं होतं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...